आजकाल लोकांना भेडसवणाऱ्या समस्यांचे प्रकार
काही समस्या या ग्रहावर जेव्हापासून माणसाचे अस्तित्व आहे, तेव्हापासून अस्तित्वात आहेत किंवा कदाचित त्याही पूर्वीपासून, जेव्हा माणसांच्या आधी इथे केवळ प्राण्यांचे अस्तित्व होते. जशा परस्परसंबंधांच्या समस्या, क्रोधातून, झगड्यातून आणि वादविवादातून उत्पन्न होणाऱ्या समस्या. या अशा समस्या आहेत, ज्या प्रत्येक जण कायमस्वरूपी अनुभवत असतो, त्यामुळे तुम्हाला किंवा मला भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये काहीच विशेष नाही. आणि अर्थात त्यातही अलीकडे आर्थिक आणि युद्धजन्य समस्यांसारख्या अशा काही समस्या आहेत, ज्या परिस्थिती आणखी बिकट करतात. त्यामुळे लोकांना अधिकाधिक समस्या अनुभवास येत आहेत. आणि ते यावर उत्तरे शोधत नाहीत, व्यक्तिगत पातळीवर विशेषतः स्वतःच्या भावना आणि मानसिक स्थितीच्या पातळीवर त्यांचा सामना करण्यासाठीचे उपाय शोधत नाहीत. त्यांच्यासाठी जो हा सहजसाध्य उपाय उपलब्ध आहे, त्यात ते समाधान शोधत नाहीत.
आधुनिक युगात विशेषतः ज्याला आपण माहितीचे युग म्हणतो आणि त्याही पुढे जाऊन सोशल मीडियाच्या युगात संपर्क क्षेत्रातील क्रांती ही मोठी उपलब्धी आहे. याचाच अर्थ आपल्याला अनेकानेक पर्यायी व्यवस्थांची अधिकाधिक माहिती उपलब्ध आहे. आणि परमपूज्य दलाई लामांसारखे अनेक महान बौद्ध गुरू जगभर प्रवास करून माहिती उपलब्ध करत आहेत. आणि मोठ्या संख्येने लोकांनी प्रत्यक्ष अनुभवले आहे किंवा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे की आपला देश सोडावा लागण्यासारख्या कठिणातल्या कठीण परिस्थितीतही या लोकांनी स्वतःला इतक्या असाधारण स्तरापर्यंत विकसित केले आहे की ते स्वतःचे चित्त शांत, स्थिर व प्रेममय राखू शकतात. त्यामुळे अर्थात अशा जिवंत उदाहरणातून लोकांना अधिक प्रेरणा मिळते, जी इंटरनेटवर किंवा पुस्तकातून मिळणाऱ्या प्रेरणेला अधिक प्रगल्भ करते.
त्यामुळे स्वतःच्या समस्यांवर उत्तर मिळवण्यासाठी आणि बौद्ध धर्मातून जीवनाला विशिष्ट दिशा लाभेल या आशेने प्रामुख्याने लोक बौद्ध धर्माकडे वळतात. भले मग त्यांचा समाज बौद्ध धर्माबाबत अनभिज्ञ असेल किंवा त्यांच्या लोकांसाठी ही परंपरागत पद्धती असेल.
बौद्ध धर्माची विवेकी बाजू
आता, आपण जर बौद्ध धर्माला समस्यांचे समाधान पुरविणाऱ्या कार्यपद्धतीच्या रूपात पाहत असू, तर निरनिराळ्या लोकांना यातील निरनिराळे पैलू आकर्षित करतील. जर आपण परमपूज्य दलाई लामा ज्या गोष्टीवर भर देतात ती गोष्ट पाहिल्यास आणि जी गोष्ट अनेक लोकांना आकर्षितही करते ती म्हणजे बौद्ध धर्माची विवेकी, विश्लेषणात्मक आणि व्यावहारिक बाजू. ते नमूद करतात की बौद्ध धर्माचा दृष्टिकोन बऱ्याच अंशी वैज्ञानिक दृष्टिकोनासारखा आहे, याचा अर्थ आपण केवळ अंधविश्वास आणि आस्थेच्या आधारावर कोणताही सिद्धांत स्वीकारत नाही. तर आपण तर्क आणि कारणमीमांसा, सखोल चिकित्सा आणि स्वतः आजमावून पाहण्याच्या प्रागैतिक दृष्टिकोनाची वैज्ञानिक पद्धत अवलंबतो- प्रयोग करून पाहतो की बौद्ध धर्मात शिकवल्या गेलेल्या साधना खरोखरच दावा केल्याप्रमाणे चित्त शांत करण्यासाठी आणि समस्यांना अधिक चांगल्या रीतीने सामोरे जाण्यासाठी उपयुक्त आहेत की नाही. आणि आपण आदर्शवादी दृष्टिकोन अंगीकारण्याऐवजी व्यावहारिक दृष्टिकोन अंगीकारतो की, व्यावहारिक पातळीवर खरोखरच काय शक्य आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनासाठी नक्की काय उपयुक्त ठरेल.
या शिवाय पारंपरिक बौद्ध शिकवणीत जर एखादी अशी गोष्ट सांगितली गेली आहे, जी पुढे जाऊन वैज्ञानिक निष्कर्षांवर अयोग्य ठरली आहे – जसे ब्रह्मांडांच्या रचनेबाबतच्या बौद्ध धारणा – तर त्या बौद्ध शिकवणींतून दूर करण्यासाठी परमपूज्य आनंदाने तयार आहेत आणि त्याऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पर्याय स्वीकारायला तयार आहेत कारण त्यात कोणताही अंतर्विरोध नसेल. कारण बौद्ध धर्माचा भर वास्तवावर आहे, काल्पनिकतेवर नाही, आणि बुद्ध आपल्याला भूगोलाचे ज्ञान देण्यासाठी आले नव्हते, तर आपल्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठीच्या मार्गाची शिकवण देण्यासाठी आले होते. आणि हा ग्रह, आपल्या पृथ्वीचे सूर्य आणि चंद्रापासूनचे अंतर – या सर्व गोष्टी फक्त अडीच हजार वर्षांपूर्वीच्या लोकांना पारंपरिक अंगाने सांगितल्या गेल्या होत्या. त्यामुळे या संबंधीची पारंपरिक शिकवण तशी फार महत्त्वाची नाही; ते बौद्ध शिकवणीचे मुख्य सार नाही. परमपूज्य वैज्ञानिकांना आवाहनही करतात की त्यांनी पुनर्जन्माच्या संज्ञेचे खंडन करावे, पण तसे करताना ‘मला नाही वाटत असे असू शकते’ अशा विचारातून करू नये. ‘मला नाही वाटत असे असू शकते’ असे विधान/कारण एखाद्या गोष्टीचे अस्तित्व अमान्य करण्यासाठी वैध कारण नाही.
तर ही अशी गोष्ट आहे, जी विवेकी दृष्टिकोन असणाऱ्या लोकांना निश्चित आकर्षित करू शकते. आणि या शिवाय परमपूज्य दलाई लामांच्या नेतृत्वाखालील बौद्ध धर्म आणि वैज्ञानिकांमध्ये फलदायी वैचारिक आदान प्रदान झाले आहे. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये, कारण या संबंधी बौद्ध शिकवणीत सांगितल्या गेलेल्या महत्त्वाचा मुद्दांपैकी एक मुद्दा म्हणजे आपल्या मनःस्थितीवर आपले आरोग्य अवलंबून असते. जर आपण फार निराशावादी असू – फार नकारात्मक आणि कायम मी, मी, मीच्या चिंतेत गढलेले – तर आपली रोगप्रतिकारशक्ती क्षीण होते, आपला आजार अधिक बळावतो आणि आपण लवकर बरेही होत नाही. तेच जर आपण आशावादी असू, जर आपल्यासारख्याच आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींचा किंवा आपल्या कुटुंबाचा विचार करत असू तर आपण पूर्णवेळ तक्रार करत बसणार नाही. आपले चित्त अधिक शांत असेल, आणि त्यातून आपली रोगप्रतिकारशक्ती वाढेल. वैज्ञानिकांनी या मुद्द्याविषयी अनेक प्रकारे संशोधन केले आहे आणि त्यांनी त्याची सत्यता पडताळली आहे. त्यामुळे या पद्धतींच्या वापरासाठी अनेक इस्पितळांनाही प्रोत्साहित केले जाते.
याशिवाय बौद्ध धर्मात अनेक पद्धती आहेत, ज्या वेदनाशामक म्हणून उपयुक्त आहेत. वेदना स्वतःच एक वाईट गोष्ट असते, पण त्यात भीतीचीही भर पडली आणि संबंधित व्यक्ति भावनात्मक दृष्ट्या खूप तणावग्रस्त झाली तर स्थिती आणखी वाईट होते. बौद्ध धर्मात श्वासोच्छवासासंबंधीच्या ध्यानधारणांमध्ये अशा अनेक पद्धती सांगितल्या गेल्या आहेत, ज्या वेदनेला अधिक योग्य रीतीने नियंत्रणात ठेवण्यासाठी साहाय्यक ठरतात. या पद्धतींचे योग्य परीक्षण केल्यानंतर विविध इस्पितळात यांचा प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या पद्धतींचा अवलंब करण्यासाठी समग्र बौद्ध धर्म समजून घेण्याची गरज नाही. या पद्धतींच्या उपयोगासाठी लोकांना बौद्ध शिकवणींबाबत विस्ताराने सांगण्याची गरज नाही. या कोणतीही धार्मिक पार्श्वभूमी असणाऱ्या माणसाला स्वीकारता येतील, अशा वैश्विक पद्धती आहेत. पण त्या पद्धती बौद्ध धर्मातून आल्या असल्याने लोकांना बौद्ध धर्माबाबत जाणून घेण्याची रूची निर्माण होते. ही बौद्ध शिकवण नक्की काय आहे, याबाबत विस्तृत माहिती घ्यावी वाटते. आपण मार्शल आर्ट शिकणाऱ्या लोकांमध्येही अशा प्रकारच्या रूची पाहतो. मार्शल आर्ट बौद्ध समाजात विकसित झाले, आणि त्यामुळे त्यात रूची असणाऱ्या लोकांना या शिकवणींची बौद्ध पार्श्वभूमी जाणून घेण्यातही रस असतो.
आध्यात्मिक गुरूंकडून प्रेरणा
अर्थात असेही अनेक लोक असतात ज्यांना तर्काशी फार घेणेदेणे नसते, ज्यांचा जीवनाप्रति फार वैज्ञानिक दृष्टिकोन नसतो, त्यामुळे त्यांना बौद्ध धर्मातील वेगळेच पैलू आकर्षित करतात. एका पैलूचा उल्लेख मी महान आध्यात्मिक गुरूंकडून मिळणाऱ्या प्रेरणेच्या अनुषंगाने केला आहेः अधिकाधिक महान आध्यात्मिक गुरू जगभर प्रवास करत असल्याने आणि त्यांची शिकवण पुस्तकं, आडिओ बुक आणि व्हिडीओच्या स्वरूपात इंटरनेटवर उपलब्ध असल्याने अति धार्मिक लोकांना खूप प्रेरणा मिळते आहे. अशा वेळी जेव्हा खूप लोक आर्थिक, राजकीय किंवा अन्य क्षेत्रातील नेत्यांकडून निराश झाले आहेत, तेव्हा त्यांना या बौद्ध गुरूंमध्ये आशेचे किरण दिसत आहेत, की इथे त्यांना खरा प्रामाणिक मार्गदर्शक लाभेल.
आणि अर्थात आपण वास्तववादी असायला हवेः बौद्ध पार्श्वभूमीतून आलेला प्रत्येकच आध्यात्मिक गुरू तितकाच प्रामाणिक आणि खरा असेल, हे जरूरी नाही. शेवटी ती ही आपल्यासारखी माणसंच असतात. त्यामुळे त्यांच्यातही काही चांगल्या गोष्टी, तर काही कमतरता असू शकतात. पण त्यांच्यातील बहुसंख्य गुरू असामान्य आहेत. त्यामुळे लोक अशा गुरुजनांकडून विलक्षण प्रेरित होतात- मी म्हणेन, विशिष्ट लोक – जसे मी यापूर्वीही नमूद केले आहे, परमपूज्य दलाई लामा या सर्वात अग्रणी आहेत. त्यामुळे प्रेरित होणाऱ्या लोकांच्या मनात अशी भावना निर्माण होते की, ‘मी ही त्यांच्यासारखा असतो तर किती छान झाले असते.’ ते आपल्यासाठी आदर्श घालून देतात की आपल्यातील प्रत्येक व्यक्तीमध्ये हे साध्य करण्याच्या स्वतंत्र क्षमता आहेत. कारण परमपूज्य दलाई लामांसारखी व्यक्ती सांगत असते की, ‘माझ्यात काहीही विशेष नाही.’ खरेतर बुद्धानेही हे सांगितले आहे, ‘माझ्यात काहीही विशेष नाही. मी ही तुमच्यासारखाच असताना सुरुवात केली. माझ्याकडेही तीच साधने होती आणि आहेत, जी तुमच्यातही आहेत – जसे मन, हृदय, इतरांची काळजी घेण्याचे मूलभूत मानवी मूल्य इत्यादी. आणि मी त्यांच्या विकासासाठी कठोर परिश्रम घेतले. आणि तुम्हीही कठोर परिश्रम घेतले तर तुम्हालाही ती विकसित करता येतील.’ त्यामुळे परमपूज्य दलाई लामासारखे आध्यात्मिक गुरू अशा प्रयत्नात असतात की लोकांनी त्यांना सर्वोच्च अतिपवित्र स्थानावर नेऊन बसवू नये, जणू त्यांच्यासारखी सिद्धी प्राप्त करणे अशक्य असावे. त्यामुळे ही गोष्ट अशा लोकांना फार आकर्षित करणारी असते, जे अति धार्मिक असतात आणि जीवनाप्रति त्यांचा दृष्टिकोन वैज्ञानिक नसतो.
बौद्ध साधनेच्या परंपरेचे पुनरुज्जीवन
मूलतः बौद्ध परंपरेचे प्रदेश असणाऱ्या भागांमध्ये, जिथे विशिष्ट परिस्थितीत बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला, तिथे बौद्ध धर्माप्रति आकर्षणाचे आणखी एक कारण म्हणजे आधुनिक काळात तिथे बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाचा प्रयत्न करणे हे ही आहे. हा फारच महत्त्वाचा आणि वैध दृष्टिकोन आहे, जसजसे आपण आधुनिकतेच्या आव्हानाला सामोरे जात आहोत, आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाची जाणीव कायम ठेवणे गरजेचे आहे. जर आपल्याला सांगितले गेले की आपल्या पूर्वजांच्या धारणा मूर्खपणाच्या होत्या आणि आपल्याला खरेच आधुनिकतेत प्रवेश करायचा असेल तर आपण त्या सर्व विसरून जायला हवे, तर आपण स्वतःला आणि आपल्या पूर्वजांनाही हीन दृष्टिकोनातून पाहू. त्यामुळे आपण फार चांगले नाही किंवा आपण मूर्ख आहोत, अशी भावना निर्माण होईल. आणि त्या भावनेमुळे, तशा मानसिकतेमुळे आपल्यात आत्मसन्मान आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होईल; तशा स्थितीत आपण ज्याचा अभिमान बाळगावा, अशी कोणती गोष्टच नसेल, ज्यामुळे आपला विकास होईल. आणि त्यामुळे आपल्या पारंपरिक रीती आणि धारणांकडे पुन्हा वळल्याने आणि त्यांना आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग समजून पुनर्जीवित केल्याने, आपल्या भविष्यातील समृद्धीसाठी आणि आधुनिकीकरणासाठी सक्षम भावनिक आधार मिळेल.
एखाद्या परंपरेत काही चांगल्या गोष्टी असतील तर काही कमतरता असतील आणि त्यांचा दुरूपयोग केला गेला असेल, याबाबत दुमत असायचा प्रश्नच नाही. अशा परंपरांमधील चांगल्या गोष्टींवर भर दिला जाणे महत्त्वाचे आहे. आधुनिक मानसशास्त्राच्या एका शाखेत निष्ठेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्ती आपले कुटुंब, आपली जात, आपला धर्म किंवा अशा स्वरूपाच्या इतर गोष्टींबाबत निष्ठा बाळगतो. आणि ही निष्ठा दोन भिन्न दिशांना जाऊ शकते, एकतर सकारात्मक गोष्टींप्रति निष्ठा बाळगणे किंवा नकारात्मक गोष्टींप्रति निष्ठा बाळगणे. उदाहरणार्थ, एखाद्या धर्मात दुसऱ्या धार्मिक परंपरांप्रति असहिष्णुतेचा नकारात्मक गुण असेल, आणि त्या धर्माबाबत हीच बाब अधिक बिंबवली गेली असेल, तर त्या धर्मातील धर्म नाकारणाऱ्या लोकांमध्येही असहिष्णुतेच्या गुणांप्रति निष्ठा कायम असेल. आणि ते त्या धर्मातील ती विशिष्ट बाब नाकारत असल्याने, त्या गोष्टीवर श्रद्धा असणाऱ्या कोणत्याही व्यक्तिप्रति ते असहिष्णु होतील. हीच नकारात्मक किंवा अनुचित निष्ठा होय. तर दुसरीकडे एखादा धर्मातील कमतरता नाकारत नसेल, पण त्यातल्या सकारात्मक बाबींवर भर देत असेल, तर धर्मातील कमतरतांचे अंधानुकरण करण्यापेक्षा सकारात्मक गोष्टींप्रति निष्ठावान असू शकतो. त्यामुळे बौद्ध धर्माबाबतचं हे आणखी एक आकर्षण आहे, विशेषतः अशा भागांमध्ये जिथे परंपरागत व्यवस्था अस्तित्वात होती. अशा भागांमध्ये आपली संस्कृती, पूर्वज आणि स्वतःविषयीही आत्मसन्मानाची भावना पुनर्जीवित करणं आणि विकसित करणं गरजेचं आहे.
बौद्ध धर्माची अद्भुत बाजू
एक गट असाही आहे, ज्याला स्वतःच्या कपोलकल्पनांमुळे बौद्ध धर्माबाबत आकर्षण वाटते. त्यांच्या जीवनात समस्या आहेत आणि त्या समस्यांवर त्यांना एखादे चमत्कारिक, अद्भुत समाधान हवे आहे, आणि बौद्ध धर्म – विशेषतः तिबेटी/मंगोलियन/काल्मिक प्रकार – सर्व प्रकारच्या अद्भुत गोष्टींनी, जसे चमत्कारिक चेहरे, हातपाय असलेल्या या वेगवेगळ्या देवदेवता, सर्व प्रकारचे मंत्र आणि अशा इतर अनेक गोष्टींनी भरलेला आहे. हे मंत्र जादुई, चमत्कारिक शब्दांसारखे वाटतात, जणू त्यांचे लाखो वेळा स्मरण केल्यास आपल्या सर्व समस्या नष्ट होतील. आणि खरोखरच या विचित्र हातापायांच्या आकृत्यांमध्ये काहीतरी गूढ असावे असे वाटते. त्यामुळे ते बौद्ध धर्माकडे सुखप्राप्तीचे साधन म्हणून पाहतात.
कदाचित त्यांना अशा साधनेतून काही फायदे होतही असतील (जरी आपण बौद्ध धर्माबाबत असा आदर्शवादी आणि अव्यावहारिक दृष्टिकोन ठेवला तरी असे फायदे नाकारता येणार नाहीत), परमपूज्य दलाई लामा यावर कायम भर देतात की हे खरंच वास्तवाला धरून नाही. याचे क्षणिक फायदे असतीलही, पण दीर्घकालीन परिणामांमध्ये तुमच्या पदरी निराशाच पडू शकते, कारण दुर्दैवाने अशा चमत्कारिक गोष्टी अस्तित्वात नाहीतच. आपल्याला खरेच मानसिक शांती हवी असेल आणि आपल्या समस्यांतून मुक्त व्हायचे असेल, तर आपल्यातील फार चांगल्या नसलेल्या काही गोष्ट आपल्याला स्वीकारायलाच हव्या. आपल्याला स्वतःतील क्रोध, स्वार्थीपणा, लोभ, आसक्ती अशा गोष्टींचा सामना करायलाच हवा. आणि अशा व्यक्तिगत गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त एखाद्या चमत्कारिक पर्यायाची अपेक्षा ठेवणे उपयुक्त ठरणार नाही. पण तरीही अनेक लोक अशा अद्भुत वैशिष्ट्यांसाठी बौद्ध धर्माकडे आकर्षित होतात.
सारांश
थोडक्यात आपण बौद्ध धर्मात असे अनेक घटक पाहतो, जे लोकांना आकर्षित करतात, पण ते सर्वच जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळवण्याच्या एका मूलभूत इच्छेतून आलेले असतात. आणि बौद्ध धर्माच्या साहाय्याने जीवनातील समस्यांना नियंत्रित करणारा मार्ग शोधण्यासाठी आपल्याला आकर्षित करतात, बौद्ध धर्माबाबतची प्रत्येकाला आवडणारी विलक्षण गोष्ट म्हणजे बौद्ध धर्म आपल्या समस्यातून मुक्ती मिळवण्यासाठी उपयुक्त पद्धती सादर करतो. ही अडीच हजार वर्षांपासूनची जीवंत परंपरा आहे आणि तरीही आजही लोक या परंपरेचे पालन करतात आणि त्यांना त्याचा लाभही होतो. त्यामुळे मुद्दा केवळ बौद्ध पद्धतींच्या पालनासंबंधीचा आहे; ज्या विधिवत निर्धारित केल्या गेल्या आहेत. आणि केवळ एकच पद्धत नव्हे तर बुद्धांनी प्रत्येक व्यक्ती अन्य व्यक्तींहून निराळी असल्याच्या जाणिवेनुसार अनेकानेक पद्धती सांगितल्या आहेत. लोकांना ही गोष्ट फार आकर्षित करते कारण बौद्ध धर्मात वैविध्यपूर्ण साधना पद्धती आहेत, जसे एखाद्या उपाहारगृहाच्या मेन्यू कार्डवर विविध प्रकारचे पदार्थ असले की आपण आपल्या आवडीचा पदार्थ निवडू शकतो; आणि एखादी गोष्ट आजमावून पाहिल्यास व ती न आवडल्यास, अशा वेळी इतरही अनेक पर्याय उपलब्ध असतात. आपण माहितीच्या युगात जगत आहोत, याचाच अर्थ आपल्याला अनेकानेक पद्धती उपलब्ध आहेत, भलेही आपण कोठेही राहत असू.