मूलभूत बौद्ध शिकवणीत साधकाला तीन मुख्य साधनांचा अभ्यास करावा लागतो. आपल्या स्वतःच्या भल्याच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या तीन विषयांचा अभ्यास करायला हवा. किंवा आपण इतरांच्या भल्याच्या दृष्टिकोनातून प्रेम आणि करुणेच्या भावनेतून हा अभ्यास करू शकतो.  

हे तीन अभ्यास कोणते?

  •  नैतिक अनुशासन – हानिकारक स्वभावापासून दूर राहण्याच्या क्षमतेचा विकास. विधायक स्वभाव अंगीकारून आपण हे विकसित करू शकतो. यातील पहिला अभ्यास स्वयंशिस्तीचा आहे – आपण इतरांना शिस्त लावत बसण्याविषयी बोलत नाही. ;
  • एकाग्रता- असंगत विचारांनी मन भरकटू नये म्हणून आपले चित्त स्थिर करण्याची क्षमता विकसित करणे. यात आपण आपले मन निरुत्साही किंवा मंद होऊ न देता प्रखर आणि केंद्रित करतो. मानसिक संतुलनासोबत इथे भावनिक संतुलनही गरजेचे असते. जेणेकरून आपले मन क्रोध, आसक्ती आणि असुयेच्या आहारी जाणार नाही.
  • विवेकशील जागरूकता- कोणत्या गोष्टींचा स्वीकार करायला हवा आणि कोणत्या गोष्टींचा त्याग करायला हवा, हा भेद ओळखण्याच्या क्षमतेचा विकास. जसे तुम्ही भाजी आणायला जाता तेव्हा सुसंगत भेद करता, ‘ही भाजी फार चांगली दिसत नाही, पण ती चांगली दिसते.’ इथे आपण स्वभावाच्या संबंधातून अशी विभागणी करतो – आपण कोणत्या परिस्थितीत आणि कोणासोबत आहोत, त्यानुसार आपण काय योग्य आणि काय अयोग्य यातला फरक ओळखतो. अधिक सखोल विचार करत आपण वास्तव आणि कल्पनांमध्ये फरक ओळखतो.   

बौद्ध विज्ञान, बौद्ध तत्त्वज्ञान आणि बौद्ध धर्म 

आपण या तीन साधनांचा अभ्यास आपल्या किंवा इतरांच्या भल्यासाठी भलेही करत असू आपण दोन प्रकारच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहू शकतो. हे दोन्ही दृष्टिकोन त्या दोन भेदातून उत्पन्न होतात, ज्याचा उल्लेख परमपूज्य दलाई लामा आपल्या व्याख्यानातून करतात. या सभांमध्ये ते बौद्ध विचारधारेची विभागणी तीन भागात करतातः बौद्ध विज्ञान, बौद्ध तत्त्वज्ञान आणि बौद्ध धर्म. 

बौद्ध विज्ञान मुख्यतः मनाच्या विज्ञानाशी संबंधित आहे – मनाचे कार्य, आपल्या भावना, आणि ज्याला दलाई लामा मानसिक आणि भावनिक आरोग्य म्हणतात, त्या संबंधी – बुद्धिजममध्ये विविध मानसिक स्थिती आणि त्यांच्या कार्यपद्धतींची विस्तृत समीक्षा अंतर्भूत आहे. 

बौद्ध विज्ञानात खालील गोष्टींचाही समावेश आहेः

  • संज्ञानात्मक विज्ञान – आपली आकलनशक्ती कशा पद्धतीने काम करते, जाणिवांचे स्वरूप आणि एकाग्रता विकसित करण्यासाठीच्या प्रशिक्षण पद्धती
  • ब्रह्माण्डोपत्ती – विश्वाची निर्मिती कशी होते, ते कसे काम करते आणि त्याचा अंत कसा होतो
  • पदार्थ – पदार्थ, ऊर्जा, मूलकण यासारख्या गोष्टींच्या कार्याचे व्यापक विश्लेषण
  • चिकित्सा पद्धती – शरीरात ऊर्जा कसे काम करते

वरील विषयांचा कुणीही अभ्यास करू शकतं, त्यातून बोध आणि लाभ घेऊ शकतं आणि दलाई लामा कायम यासंदर्भात शास्त्रज्ञांशी संवाद साधत असतात. 

दुसरी श्रेणी ज्याला बौद्ध तत्त्वज्ञान म्हणतात, त्यात खालील गोष्टींचा समावेश असतोः

  • नीतिशास्त्र – करुणा आणि उदारतेसारख्या मूलभूत मानवी मूल्यांबाबतची चर्चा, जी मूल्ये धर्मनिगडित नसून त्यातून कोणालाही लाभ घेता येईल. 
  • तर्कशास्त्र आणि तत्त्वमिमांसा – तात्त्विक सिद्धांत, त्यांची सार्वत्रिकता, व्यक्तिगत तत्त्व, गुण, वैशिष्ट्ये आदी गोष्टींची एकत्रित कार्यपद्धती आणि त्याबाबतच्या आपल्या आकलनाचे विस्तृत सादरीकरण  
  • कारण आणि परिणाम – प्रासंगिकता, वास्तवाचे आकलन आणि वास्तवाबाबतच्या आपल्या कल्पना याबाबतचे विस्तृत विश्लेषण

आणि बौद्ध तत्त्वज्ञान फक्त बौद्ध धर्मियांपुरते मर्यादीत नसून कोणीही त्याचा लाभ उठवू शकते.

यातील तिसऱ्या बौद्ध धर्म विभागात बौद्ध साधनेच्या कार्यक्षेत्राचा अंतर्भाव आहे आणि म्हणून यात कर्म, पुनर्जन्म, धार्मिक विधी, मंत्र आणि यासारख्या गोष्टींवर चर्चा केली जाते. ही श्रेणी मुख्यतः बौद्ध अनुयायांसाठी आहे. 

या तीन साधनांना बौद्ध विज्ञान आणि बौद्ध तत्त्वज्ञानच्या दृष्टिकोनातून सर्वांसाठी लागू आणि उपयुक्त करून सादर करता येऊ शकते. किंवा त्यांना बौद्ध धर्माची जोड देऊनही सादर करता येऊ शकते. हे असे वर्गीकरण आहे ज्याला मी ‘धर्म लाइट’ किंवा ‘द रीयल थिंग धर्म’ म्हणून संबोधतो. 

  • धर्म लाइट – केवळ हा जन्म सुधारण्याच्या दृष्टीने बौद्ध विज्ञान आणि बौद्ध तत्त्वज्ञानातील पद्धतींचा अवलंब करणे
  • द रीयल थिंग धर्म – चांगला पुनर्जन्म, पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्ती आणि ज्ञानप्राप्ती ही तीन बौद्ध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तीन साधनांचा अभ्यास

जेव्हा मी धर्म लाइटविषयी बोलतो, तेव्हा त्याचा संबंध रीयल थिंग धर्माच्या पहिल्या पातळीशी असतो, कारण उन्नत आध्यात्मिक उद्दिष्टांचा विचार करण्यापूर्वी आपले सामान्य जीवन सुधारणे आवश्यक असते. पण बौद्ध विज्ञान आणि तत्त्वज्ञान बौद्ध धर्मातील प्राथमिकता नाहीत. त्यामुळे आपण त्यांना बौद्ध धर्मातील प्राथमिकतेच्या दृष्टीने पाहत असलो किंवा सामान्य आवश्यकतेच्या स्वरूपात पाहत असलो तरी, आपले जीवन सुधारण्यासाठी आपण तीन साधनांचा कसा वापर करू शकतो, ते पाहायला हवे.


चार आर्य सत्ये

बौद्ध तत्त्वज्ञानानुसार, बौद्ध विचारधारा कशा रीतीने काम करते हे ज्या मार्गिकांनी सादर केले जाते, त्याला चार आर्य सत्ये संबोधले जाते. त्यांना खाली नमूद केल्याप्रमाणे जीवनाची चार तथ्यं म्हणूनही पाहता येऊ शकतं. 

  • आपण जीवनात अनुभवत असलेली दुःखं आणि वेदनांचा विचार करता, पहिले तथ्य आहे की जीवन कठीण आहे.
  • दुसरे तथ्य म्हणजे आपली दुःखे कारणातून उत्पन्न होतात.
  • तिसरे तथ्य आहे की आपण दुःखाचे निवारण करू शकतो; आपण फक्त शांत बसून आपल्या दुःखांचा स्वीकार करण्याची गरज नाही, तर आपण आपली दुःखे संपवू शकतो.
  • चौथे तथ्य म्हणजे दुःखाचे मूळ किंवा कारण नष्ट करून आपण दुःखाचे निवारण करू शकतो. कशा रीतीने वागले, बोलले पाहिजे, यासंदर्भातला सजगतेचा मार्ग अवलंबून ते साध्य करता येऊ शकते. 

त्यामुळे जर आपल्या वागण्या-बोलण्यामुळे आपल्याला समस्यांना सामोरं जावं लागत असेल, तर आपण त्यात बदल करायला हवा. तीन साधना या आपल्या जीवनातील समस्यांच्या कारणांपासून मुक्ती मिळवण्याच्या प्रयत्नांचा भाग आहेत. या तीनही साधना समजून घेण्यासाठी ही एक उपयुक्त पद्धत आहे, ज्यात आपल्याला हे सांगितले जाते की आपल्यासाठी या तीन साधनांचा अभ्यास का गरजेचा आहे. त्यामुळे आपण जेव्हा जीवनात समस्यांचा सामना करत असतो, तेव्हा या गोष्टींकडे लक्ष देतोः 

  • मी ज्या पद्धतीने वागतो-बोलतो, त्यानुसार माझ्यातील नैतिक अनुशासनात दोष आहे का?
  • माझा सगळीकडे संचार असतो आणि मी भावनिक दृष्ट्या कमकुवत आहे, त्यामुळे माझ्या एकाग्रतेत दोष आहे का?
  • वास्तव आणि कल्पनांमध्ये फरक करताना माझ्या विवेकशील जागरूकतेत दोष आहे का?

आपण हे या जीवनातील सामान्य आयुष्याला लागू करू शकतो किंवा हे भविष्यातील समस्यांनाही लागू करता येऊ शकते. प्राथमिक पातळीवर, आपण या प्रशिक्षणाचा विचार दैनंदिन आयुष्याच्या संदर्भात करूः ते कशा रीतीने आपल्याला साहाय्यक ठरू शकते? आपण नक्की काय करत आहोत, त्यामुळे या समस्या येत आहेत? त्या सोडवण्यासाठी आपण काय करू शकतो? 

दुःखाचे मूळ किंवा कारण 

 बौद्ध तत्त्वज्ञानानुसार आपल्या दुःखाचे मूळ हे अज्ञानात असते. आपण मुख्यतः दोन गोष्टींच्या बाबतीत अज्ञानी किंवा गोंधळलेल्या अवस्थेत असतो. 

आपण अनभिज्ञ असतो ती पहिली गोष्ट म्हणजे कारण आणि परिणाम, विशेषतः आपल्या स्वभावाच्या संदर्भात. जर आपण क्रोध, लोभ, आसक्ती, गर्व, असूया अशा तणावदायी भावनांचा सामना करत असू तर याचा अर्थ आपण हानिकारक वागत आहोत. आपण क्रोधित होतो, इतरांवर ओरडतो, असूया बाळगतो, इतरांना इजा पोहोचवायचा प्रयत्न करतो, आसक्ती बाळगून लोकांना चिकटून राहतो, या सर्वातून समस्या निर्माण होतात. कारण या भावना आपल्याला हानिकारक किंबहुना आत्मघातकी वागायला भाग पाडतात, ज्याचा अंतिम परिणाम दुःखचं असतो. 

तणावदायी किंवा अस्वस्थ करणाऱ्या भावनांची व्याख्या पाहणे फायद्याचे ठरेल. ही अशी मनोवस्था असते, जी उद्भवली की आपण मनःशांती आणि आत्मसंतुलन हरवून बसतो. आपण इतरांवर ओरडलो तर कदाचित समोरच्याला वाईट वाटणार नाही. ते कदाचित आपल्या बोलण्याकडे लक्षही देणार नाहीत किंवा आपण मूर्ख आहोत, असे समजून हसून सोडून देतील. पण आपण मनःशांती हरवून बसू आणि भावनिक रीत्या अस्वस्थ होऊ. आणि ती अस्वस्थता कदाचित आपले ओरडणे संपल्यानंतरच कमी होईल. हा त्रासदायक अनुभव असतो कारण आपण आपले आत्मसंतुलन हरवून बसतो आणि भावनेच्या भरात नंतर पश्चाताप करावा लागेल, अशा गोष्टी बोलून जातो. 

आपण अशा रीतीने वागतो कारणः 

  • आपण कारण आणि परिणांमाबद्दल अज्ञानी असतो. आपल्याला अनेकदा लक्षात येत नाही की आपण त्रासदायक भावनांच्या प्रभावाखाली येऊन वागतो, ज्या आपल्याला दुःख देऊ शकतात.
  • किंवा आपण कारण आणि परिणामांबाबत गोंधळलेले आहोत आणि त्याचा आपण नेमका उलटा अर्थ लावला आहे. आपण कायम विचार करतो की, ‘मी या व्यक्तीवर ओरडलो तर मला बरे वाटेल.’ जे अर्थात तसे कधीच होत नाही. किंवा आपल्याला जेव्हा एखाद्याबद्दल आसक्ती असेल, आपण कदाचित म्हणू, ‘तू मला नियमित फोन का करत नाहीस, किंवा भेटायला का येत नाहीस?’ परिणामी ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाऊ लागते, हो ना? आपण आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवू शकत नाही कारण आपण कारणे आणि परिणाम याबाबतीत गोंधळलेले असतो. 

अज्ञानाचा दुसरा प्रकार वास्तवाच्या अनभिज्ञतेसंबंधित असतो. आपण वास्तवाबाबत गोंधळलेल्या स्थितीत असल्या कारणाने आपला दृष्टिकोन तणावदायी होतो. याचं उदाहरण म्हणजे स्वकेंद्री अवस्था, जिथे आपण सतत मी, मी आणि मी असा आत्मकेंद्री विचार करत असतो. ही स्थिती आदर्शवादी टीकात्मक स्वरूपाची ठरू शकते, ज्यात आपण आदर्शच असायला हवे, अशा प्रकारची मानसिकता बळावू शकते. जरी आपण विधायक काम करत असू, आदर्श व्हायचा प्रयत्न करत असू आणि प्रत्येक गोष्ट आदर्शवत करत असू, तरी ते वागणे एका बंधनकारक मानसिकतेतून आलेले असेल. कदाचित आपण थोडा क्षणिक आनंदही अनुभवू, पण तो लगेचच असमाधानात रूपांतरित होईल. कारण आपण कायम विचार करत असू की, ‘माझ्यात अजून कमतरता आहेत’ आणि या विचाराने आपण स्वतःला अधिकाधिक सुधारण्याचा प्रयत्न करत राहू. 

एखाद्या अशा माणसाचं उदाहरणच घ्या, ज्याला स्वच्छतेचं अती वेड आहे – जसे एक आदर्शवादी स्वतःच्या घरात साफसफाई करतो आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात आहे आणि आपण ती स्वच्छ व नीटनेटकी ठेवू शकतो, अशा गैरसमजुतीत ते वावरत असतात आणि ते अशक्य असते. तुम्ही सगळं स्वच्छ, साफ करता, एकदम आदर्श करता, तुम्हाला त्याबद्दल छानही वाटते आणि मग मुले येतात आणि सगळं विस्कटून टाकतात; तुम्हाला पुन्हा अस्वस्थ वाटू लागते आणि पुन्हा साफसफाईची गरज भासू लागते. अशा रीतीने ती बंधनकारक भावना बनते. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला थोडेसे समाधान वाटते की ‘आहा, आता सगळ्या गोष्टी जागच्याजागी आहेत.’ – ही भावना लगेचच बदलून जाते. आणि एखादा असा कानाकोपरा असतोच, जो तुमच्याकडून दुर्लक्षित राहतो. 

अशा प्रकारच्या मनोवस्था ज्या भलेही तणावदायी भावनांमधून उत्पन्न झालेल्या असोत किंवा तणावदायी दृष्टिकोनातून, त्या तुम्ही बंधनकारकरीत्या वारंवार अनुभवू लागला की तुम्ही ‘सर्वव्यापी दुःखा’चे शिकार व्हाल. आपल्या समस्या कायमस्वरूपी होतील, अशा पद्धतीने सवयी विकसित करण्याशी याचा संबंध आहे.  

याचा केवळ आपल्या मानसिकतेवर परिणाम होत नाही, तर शारीरिक परिणामही होतो. उदाहरणार्थ, आपण कायम क्रोधित होत राहिलो, तर आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवू शकतो. तसेच सततच्या चिंतेने आपल्याला अल्सर होऊ शकतो. किंवा तुम्हाला स्वच्छतेचं अती वेड असेल तर तुम्ही कधीच निवांत राहू शकणार नाही. सर्व गोष्टी आदर्शवत असायला हव्यात म्हणून तुम्ही कायम तणावात राहाल, पण तसे घडणार नाही.


आपल्या समस्यांची कारणे नष्ट करण्यासाठी तीन साधना कशा साहाय्यक ठरतात 

आपल्याला तीन साधनांची खऱ्या अर्थाने गरज आहेः

  • आपल्याला गोंधळाच्या मनोवस्थेपासून मुक्ती मिळवण्यासाठी विवेकशील जागरूकतेची गरज आहे. उदाहरणार्थ स्वच्छतेच्या वेडाबाबतीतच पाहिले तर तिथे तुमची कल्पना असते की ‘प्रत्येक गोष्ट आदर्शवत आणि स्वच्छ असायला हवी आणि माझ्या नियंत्रणात असायला हवी’ पण अशा भावनेच्या जागी तुम्ही ‘माझे घर घाण होणारच, त्यावर कोणाचेच नियंत्रण असू शकत नाही’ असा विचार केलात तर तुमच्यावरचा ताण आपोआप कमी होईल कारण तुम्ही घर साफ करत असला तरी त्याबाबत सक्ती बाळगणार नाही. पारंपरिक ग्रंथांमध्ये यासाठी धारदार कुऱ्हाडीने वृक्ष तोडण्याचे उदाहरण वापरण्यात आले आहे. 
  • कुऱ्हाडीने वृक्ष तोडण्यासाठी आपल्याला एकाच जागेवर सतत प्रहार करायला हवा आणि त्यासाठी एकाग्रतेची गरज असते. जर आपले मन सतत भरकटलेले असेल, तर आपण ती विवेकशील जागरूकता हरवून बसू. त्यामुळे आपल्याला एकाच जागेवर प्रहार करण्यासाठी एकाग्रतेची गरज असते. 
  • ती कुऱ्हाड वापरण्यासाठी ताकदीची गरज असते. तुमच्याकडे ताकद नसेल तर तुम्ही कुऱ्हाड उचलूच शकणार नाही, आणि ही ताकद नैतिक अनुशासनातून मिळते.

अशा प्रकारे तीन साधना आपल्या समस्यांच्या कारणांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कशा साहाय्यक ठरतात, याची जाणीव होऊ शकते. बौद्ध धर्माच्या संदर्भाशिवाय आपण वरील सर्व मुद्द्यांचा अंगीकार करू शकतो. त्यामुळे त्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहेत. पुढे जाण्याआधी आपण काय शिकलो, त्याची थोडक्यात उजळणी करूः  

  • कल्पना आणि वास्तवातील फरक ओळखण्यासाठी आपण विवेकशील जागरूकतेचा वापर करतो, ज्यातून आपल्याला आपल्या वागण्यातील कारण आणि परिणामांची जाणीव होते. आपल्याकडे विवेकशील जागरूकता नसेल, तर आपला स्वभाव आणि दृष्टिकोन दुःख निर्माण करतात किंवा अशा प्रकारचा आनंद निर्माण करतात, जो फार काळ टिकत नाही.
  • वरील गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला चांगल्या एकाग्रतेची गरज असते, ज्यामुळे आपण केंद्रित राहू शकतो. 
  • चांगली एकाग्रता विकसित करण्यासाठी अनुशासनाची गरज असते, जेणेकरून आपले चित्त भरकटणार नाही, आपण त्याला पूर्वपदावर आणू शकू.
  • आपल्या समस्यांपासून मुक्ती मिळवून जीवन सुधारण्यासाठी आपल्याला या तीन साधनांचा अवलंब करणे आवश्यक आहे.

या सर्वांतून घेण्याजोगी सर्वात महत्त्वाची अंतदृष्टी म्हणजे आपल्या जीवनातील आनंद आणि असमाधानाचे कारण आपल्या गोंधळलेल्या मनोवस्थेत आहे. आपल्या समस्यांसाठी इतरांना, समाजाला किंवा अर्थव्यवस्थेला दोष देण्यापेक्षा आपण अधिक सखोल पातळीवर लक्ष केंद्रित करू शकतो. अशा परिस्थितीकडे पाहण्याचा आपल्या मनाचा कल आपण अभ्यासू शकतो. कदाचित आपल्यासमोर अनेक आव्हानात्मक परिस्थिती येतील, पण आपला भर मुख्यतः दुःख किंवा क्षणभंगुर आनंद देणाऱ्या सामान्य भावनांवर आहे. आपण यापेक्षा अधिक भव्य उद्दिष्ट ठेवायला हवे, अशा आनंद व सुखाचे उद्दिष्ट, जो शांतचित्तातून प्रकट होईल आणि चिरस्थायी असले. 

आपण समस्यांनी घेरलेले असतो तेव्हा अस्वस्थ आणि दुःखी असू शकतो किंवा शांतचित्ताने त्याचा सामना करू शकतो, कारण तेव्हा आपण परिस्थिती नितळपणे पाहू शकतो. आणि स्वतःबद्दल वाईट वाटून घेण्यापेक्षा, दुःखाचे कारण शोधून ते सोडवण्याच्या मार्गांचा विचार करू शकतो.

उदाहरणादाखल तुम्ही त्या स्थितीचा विचार करा जेव्हा तुमचे मूल एकटेच रात्री बाहेर गेले आहे आणि तुम्ही चिंतेत आहात की ‘ते सुरक्षित घरी परत येईल का?’ इथे पुन्हा तुमची चिंता या मानसिकतेतून आली आहे की ‘माझ्या मुलाच्या सुरक्षिततेची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती माझ्या नियंत्रणात असायला हवी.’ ही अर्थातच निव्वळ तुमची कल्पना आहे. जेव्हा ते सुरक्षित घरी पोहचते, तेव्हा तुम्हाला हायसे वाटते, पण पुढच्या वेळी ते पुन्हा बाहेर पडले की तुम्ही पुन्हा चिंतेत पडता. त्यामुळे या भावनेला काही विरामच नाही, हो ना? कारण आपण कायम चिंतेत असल्याने ती भावना कायमस्वरूपीच झालेली असेल. आपण स्वतःला ती सवय जडवून घेतली आहे म्हणून आपण सगळ्या गोष्टींबाबत चिंतीत होतो – आणि त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. ती फारच त्रासदायक मनोवस्था आहे. 

खरी गुरुकिल्ली हीच आहे की सर्व समस्यांचे मूळ आपल्या गोंधळाच्या मनःस्थितीत आहे, याची समज येणे. आपल्याला वाटते की विशिष्ट पद्धतीच्या वागण्याने आपल्याला सुख मिळेल किंवा सर्व गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत, असा आपला दृष्टिकोन असतो. पण तसे नसते. ‘त्या गोष्टी फार महत्त्वाच्या नाहीत’, असा विचार करून आपण स्वतःला त्यापासून दूर ठेवतो आणि त्यावरच स्वतःला केंद्रित ठेवतो. 

सारांश

जेव्हा आपण जीवनातील चार सत्यांचा विचार करतो, तेव्हा आपल्याला या जाणिवेने प्रोत्साहन मिळते की आपल्या समस्या आणि नकारात्मक भावना स्थायी नसून, त्या सुधारल्या जाऊ शकतात किंवा त्याही पुढे जाऊन त्या पूर्णपणे नष्ट करणेही शक्य आहे. एकदा आपण दुःखाच्या कारणांवर नियंत्रण मिळवले की दुःख संपून जाते, पण ही कारणे आपोआप नष्ट होत नाहीत. 

नैतिक आचरण, एकाग्रता आणि विवेकी जागरूकता या तीन अभ्यासांना केंद्रस्थानी ठेवून जगणे ही अद्भुत जीवनपद्धती आहे. या तीन साधनांचा एकत्रित उपयोग आपल्याला असे सुख प्राप्त करून देऊ शकतात – जे आपण संपूर्ण जीवनभर शोधत असतो. 

Top