सम्यक वाणी, व्यवहार आणि जीवित

संक्षिप्त आढावा

नैतिक अनुशासन, एकाग्रता आणि विवेकी जागरूकता या तीन प्रशिक्षण अभ्यासांचा भर नेहमीच आपण अनुभवत असलेल्या समस्या आणि वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी साहाय्यक ठरण्यावर असतो. या पद्धतीत आपण अनुभवत असलेल्या समस्यांची कारणे शोधणे आणि ती कारणे नष्ट करण्यासाठी या तीन अभ्यास पद्धतींचा अवलंब करण्याचा समावेश आहे. 

आपल्या दैनंदिन जीवनात इतरांशी व्यवहार करताना या तीन अभ्यास पद्धती अत्यंत उपयुक्त ठरतात.

 • नैतिक अनुशासन – आपण इतरांशी कसे वागतो, बोलतो त्याचे निरीक्षण करणे महत्त्वाचे असते. इतरांना नुकसान पोहोचवेल असे विघातक वागण्यापासून स्वतःला रोखण्यासाठी आपल्याला नैतिक अनुशासनाची गरज असते. 
 • एकाग्रता – दुसऱ्यांशी संवाद साधताना आपण एकाग्र असणे आवश्यक असते, जेणेकरून त्यांचे काय चालले आहे आणि त्यांच्या गरजा काय आहेत, याबाबत आपले आकलन वाढेल. जर आपले चित्त सतत फोन किंवा इतर गोष्टींकडे विचलित होत असेल, तर आपल्याला संवाद साधणे कठीण होऊन बसेल.
 • विवेकी जागरूकता – आपण इतरांचे म्हणणे नीट ऐकले, तर आपण विवेकी जागरूकता वापरून वागण्याची योग्य पद्धत ठरवू शकतो. त्यातून इतरांशी योग्य प्रकारे वागण्या-बोलण्याच्या दिशेने मार्गक्रमण शक्य आहे.  

हे तीनही अभ्यास परस्परपुरक आहेत. आणि एकमेकास अधिक सक्षम करतात. त्यामुळे या तीनही अभ्यासांना एकत्रितरीत्या अमलात आणणं आवश्यक आहे. आपण इतरांसोबत नसलो तरी स्वतःच्या उन्नतीसाठीही हे तीनही अभ्यास लाभदायी आहेतः 

 • ते विघातक पद्धतीने वागण्यावर आळा घालतात.
 • आपले चित्त एकाग्र असते, त्यामुळे आपण इच्छित गोष्टी साध्य करू शकतो.
 • आपण आपली मूलभूत बुद्धिमत्ता वापरून योग्य-अयोग्याची विभागणी करू शकतो. 

अशा प्रकारे ही अगदी मूलभूत तत्त्वे आहेत, जी आपण आपल्या दैनंदिन जीवनात, व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवरही अंमलात आणू शकतो.

अष्टांगिक मार्ग 

आपण या तीन अभ्यासांमध्ये प्रक्षिशित होतो, तेव्हा ती प्रशिक्षण पद्धती अंमलात आणण्याची एक पद्धत म्हणजे ‘अष्टांगिक मार्ग’ होय. हे आठ प्रकारचे अभ्यास आहेत, ज्यांची साधना यासाठी केली जाते की जेणेकरून तीन भाव विकसित करता येतील. 

आपल्या नैतिक अनुशासनाच्या प्रशिक्षणात तीन अभ्यास अंतर्भूत आहेत.

 • सम्यक वाणी – आपली संवादाची पद्धत
 • कृतींची सम्यक मर्यादा – आपली वागण्याची पद्धत
 • सम्यक जीविका – आपण कशा प्रकारे जगतो ती पद्धत  

आपल्या एकाग्रतेच्या प्रशिक्षणातही तीन अभ्यासांचा समावेश आहे.

 • सम्यक प्रयास – आपले मन विघातक विचारांच्या साखळीतून मुक्त करून ध्यानधारणेसाठी अनुकूल करणे
 • सम्यक सचेतनता – आपली एकाग्रचित्तता आणि प्रेरणा कायम ठेवणे
 • सम्यक एकाग्रता – विधायक गोष्टींवर चित्त एकाग्र करणे

विवेकी जागरूकतेसाठी दोन अभ्यास आहेत.

 • सम्यक दृष्टी – योग्य-अयोग्य किंवा हानिकारक-लाभकारक गोष्टीतील फरक ओळखण्याच्या क्षमतेवर आधारित आपल्या विश्वासाची सत्यता पडताळणे
 • सम्यक संकल्प (सम्यक प्रेरणादायी विचार) – आपल्याला योग्य विचारांच्या दिशेने नेणारी विधायक मनोवस्था

आणखी विस्तृत अभ्यासात या आठही अभ्यासांची अयोग्य पद्धती सुद्धा अस्तित्वात आहे, जिचा आपल्याला त्याग करायचा आहे, आणि योग्य पद्धतीचा अवलंब करायचा आहे.  


वाणी

आपली इतरांशी बोलण्याची पद्धत आपल्या मनोवस्थेत प्रतिबिंबित होते. इतरांना काय वाटते आणि ते आपल्याशी कसे वागतात, यावरही त्याचा परिणाम होतो. यासाठी बोलण्याच्या कोणत्या पद्धती अधिक उपयुक्त आहेत आणि कोणत्या हानिकारक आहेत, याची जाणीव असणे गरजेचे आहे. 

अनुचित वाणी

अनुचित वाणी ती असते, जी दुःख आणि समस्यांचे कारण बनते. 

 • खोटे बोलणे – खोटे बोलणे आणि दुसऱ्यांना धोका देणे. जर आपण खोटारडे किंवा लबाड म्हणून कुप्रसिद्ध झालो, तर कुणीही आपल्यावर विश्वास ठेवणार नाही किंवा आपले बोलणे ऐकून घेणार नाही. त्यातून दुःखदायी अवस्था निर्माण होते. 
 • फुट पाडण्याजोगे बोलणे – एखाद्या व्यक्तीविषयी त्याच्या मित्रांकडे, सहचराकडे वाईट बोलून त्यांचे संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करणे. यामुळे लोक असाही विचार करू शकतात की ही व्यक्ती आपल्या पाठीमागेही आपल्याविषयी असेच बोलत असेल, आणि त्यातून आपलेही संबंध बिघडू शकतात.
 •  कठोरपणे बोलणे – इतरांशी क्रूरपणे बोलणे, आरडाओरडा करणे किंवा अपशब्द वापरणे. जेव्हा आपण एखाद्याचा शाब्दिक अपमान करतो, तेव्हा तेही आपल्याशी तसेच वागू लागतात. आणि एखादी आत्मपीडा वृत्तीची व्यक्ती सोडून दुसरे कोणीही अशा आरडाओरडा करणाऱ्या माणसाच्या अवतीभोवती राहू इच्छिणार नाही. 
 • निरर्थक बडबड करणे – सतत बकबक करत राहणे, इतरांच्या कागाळ्या करत, निरर्थक बोलत लोकांच्या कामात अडथळा आणणे. परिणामी कोणीच आपल्याला गांभीर्याने घेत नाही आणि आपल्यासोबत राहणे लोकांना त्रासदायक वाटू शकते. अशा वृत्तीने आपण आपला आणि इतरांचाही वेळ वाया घालवतो. 

सम्यक वाणी

विधायक बोलण्याने वरील चार पद्धतीच्या चुकीच्या बोलण्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. याच्या अनुसरणाच्या पहिल्या पातळीवर, जर आपण इतरांशी खोटे बोलणार असू, ओरडणार असू किंवा निरर्थक बडबड करणार असू, तर आपल्याला तात्काळ जाणीव होते की ते हानिकारक आणि दुःखदायी आहे आणि आपण लगेच ते थांबवण्याचा प्रयत्न करतो.   

हे वाटते तितके सोपे नाही, कारण तुम्हाला तसे वागावेसे वाटले की भावनेच्या भरात वागण्यापूर्वीच स्वतःला सावध करावे लागते. हे एखादा केकचा तुकडा हवासा वाटण्यासारखे आहे. काही वेळेला आपल्याकडे केकचा दुसरा तुकडा मिळवण्याची संधी असते आणि आपण इच्छेच्या भरात तो मिळवण्यापूर्वीच विचार करायला हवा की ‘जरी मला तो केक हवा असला तरी मी तो घेऊ नये. मला त्या केकची गरज नाही; त्यातून माझी चरबी आणखी वाढेल आणि मला तर वजन कमी करण्याची गरज आहे.’ अनुसरणाच्या संदर्भात आपण याच गोष्टींविषयी बोलत आहोत. 

जेव्हा आपल्याला असे वागावेसे वाटते, तेव्हा प्राचीन भारतीय गुरू शांतिदेव आपल्याला लाकडाच्या ठोकळ्यासारखे राहण्याचा सल्ला देतात. मला ओरडावे किंवा काहीतरी ओंगळवाणे बोलावेसे वाटते, पण मला त्याच क्षणी जाणीव होते की अशा बोलण्याने मी आणि तुम्ही दोघे नाराज होऊ, म्हणून मी स्वतःला तसे बोलण्यापासून रोखतो. मी सरळ एखाद्या लाकडाच्या ठोकळ्याप्रमाणे शांत बसतो. मला काहीतरी बावळट विनोद सांगायची किंवा एखादी मूर्खपणाची प्रतिक्रिया द्यायची इच्छा होते, पण त्याच क्षणी त्या क्षुल्लक बडबडीची जाणीव होते आणि मी काही बोलायचे टाळतो, हे तसंच काहीसं आहे. 

दुसऱ्या पातळीवरील अनुसरणात प्रत्यक्ष विधायक कृतीचा समावेश आहे – जसे लाभकारक मार्गाने बोलणे. लाभकारक बोलण्यातून आनंद निर्माण होईल आणि कोणत्याही स्थितीत सुसंवाद अनुभवता येईल, या जाणिवेतून असे बोलणे शक्य होते. त्यामुळे कारण आणि परिणामांच्या संदर्भातून आपण विचार करणे आवश्यक असते. 

सम्यक वाणीच्या मशागतीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य वेळी योग्य प्रमाणात व अर्थपूर्ण रीतीने खरे, मृदू, आणि दयाळूपणे बोलण्याचा दृढ संकल्प आवश्यक असतो.   

 • इतरांना सतत संपर्क करणे, संदेश पाठविणे, नाश्त्याला काय खाल्ले, असे बाष्कळ प्रश्न विचारून भंडावून सोडणे, अशा पद्धतीचे वागणे रोखण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. ही सर्व इतरांना त्रास देणारी निरर्थक बडबड असते.
 • एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट पटवून देण्याचा अती अट्टहास न करता आणि उगाचच अवास्तव न बोलता योग्य प्रमाणात बोलावे. विशेषतः ती व्यक्ती जेव्हा आपल्याशी सहमत असते.  

अर्थात त्यासाठी आपल्याला विवेक वापरायला हवा. उदाहरणार्थ, सत्य बोलण्याच्या दृष्टिकोनातूनच पाहिल्यास, एखाद्याने अतिशय घाणेरडा पोशाख घातला असेल आणि तुमच्या प्रतिक्रियेने त्याला वाईट वाटणार असेल तर तुम्ही थेट ‘हा पोशाख फारच वाईट दिसतो आहे.’ असे म्हणू शकत नाही. काही ठिकाणी तुम्हाला काळजी घ्यावी लागते, हे समोरच्या व्यक्तीवरही अवलंबून असते. अलीकडेच माझी बहीण माझ्याकडे आली होती. आम्हाला बाहेर जायचे होते, त्या वेळी माझ्या बहिणीने एक ब्लाऊज घातला होता. तो थोडा आकसलेला होता आणि तिला व्यवस्थित बसत नव्हता. पण ती माझी बहीण असल्याने मी तिला अर्थातच सांगू शकत होतो की ‘ते फारच वाईट दिसते आहे.’ पण तुमच्या कुटुंबाबाहेरील व्यक्तींना असे सांगणे फारच कठीण असते. तुमच्या नव्या नव्या मैत्रिणीला तुम्ही सांगू शकत नाही की ‘तू घातलेला ब्लाऊज खूपच वाईट आहे. दुसरे काहीतरी घाल.’ जरी ते सत्य असले तरी. 

कठोर बोलण्यासंदर्भातही, तुम्हाला कधीतरी कठोर बोलण्याची आवश्यकता भासू शकते. जर तुमचे मूल आगकाडी, लायटर किंवा आणखी एखाद्या धोकादायक गोष्टीसोबत खेळत असेल तर तुम्हाला कठोरपणे बोलावेच लागेल. ते बोलणे कठोर बोलणे समजले जाणार नाही कारण तिथे तुमचा उद्देश क्रोधाचा नाही. त्यामुळे उद्देश खरा महत्त्वाचा असतो.  

अनुचित वाणीची इतर उदाहरणे

या हानिकारक बोलण्याचा आपण फक्त इतरांशी बोलण्याच्या संदर्भातूनच नाही तर स्वतःच्या संदर्भातही विचार करायला हवा. हानिकारक बोलण्याच्या मार्गांचा आपण व्यापक पद्धतीने विचार करायला हवा. 

खोटे बोलण्यात आपल्या इतरांबाबतच्या भावनांबाबत खोटे बोलणे किंवा आपल्या इतरांबाबतच्या दृष्टिकोनाबाबत खोटे बोलणेही समाविष्ट असू शकते. कदाचित आपण एखाद्याशी फार चांगले वागत असू, त्यांच्यावर आपलं प्रेम असल्याचंही सांगत असू – कदाचित आपण स्वतःलाही यावर विश्वास ठेवायला लावून फसवत असू – तिथे आपली त्याच्या पैशावर किंवा एखाद्या अन्य गोष्टीवर नजर असेल. एका अर्थी ही फसवणूक आहे. अर्थात त्या परिस्थितीतही आपण तसेच थेट त्या माणसाकडे जाऊन ‘माझं काही तुझ्यावर प्रेम नाही. मला तुझा पैसा हवा आहे.’ असं म्हणत नाही. कारण ते अगदीच अयोग्य ठरेल. पण आपण आपल्या भावना आणि हेतुंबद्दल आत्मपरीक्षण करायला हवे.    

आपले मित्रही आपल्यापासून दुरावतील, असं घृणास्पद बोलणं, हे फूट पाडणारं बोलणं असतं. काही माणसं सतत तक्रार करत असतात किंवा कायम नकारात्मक बोलतात आणि त्यामुळे प्रत्येक जण त्यांच्यापासून दूर जातो. जर आपण असे असू, तर कोणाला आपल्यासोबत राहावे वाटेल? किंवा इतरांना संधीच मिळू नये अशा पद्धतीने सतत बोलत राहण्यानेही लोक दुरावू शकतात. आपल्या सर्वांना असे लोक माहिती असतात आणि आपण अशा लोकांना फार भेटू इच्छित नाही. त्यामुळे इतरांविषयी चांगले आणि शक्य तितके सकारात्मक बोलत राहायला हवे. 

कठोर बोलण्याने फक्त इतरांचा अपमान होत नाही, तर आपण स्वतःही अपमानित होत असतो. जेव्हा आपण लोकांना ते मूर्ख किंवा भयानक आहेत असे म्हणतो, तेव्हा तसे बोलणे अर्थातच निर्दयी असते. त्यामुळे आपण स्वतःबाबतही तसे बोलणे क्रूरच असते. त्यातून आपल्याला अर्थातच आनंद किंवा सुख लाभत नाही. त्यामुळे स्वतःबाबतही चांगला दृष्टिकोन बाळगणे आणि आपण आपल्या मनात स्वतःशी कसे बोलतो तेही महत्त्वाचे असते.   

निरर्थक बडबडीसंदर्भात बोलायचे झाल्यास, आपण आपल्या व्यक्तिगत संबंधांमध्ये, आपल्या शंकाकुशंकांबाबत, आपल्या चिंतांबाबत विवेकहीन बडबड करू नये. अशा काही गोष्टी असतात, ज्या इतरांना सांगितल्याच जायला नकोत. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्याने विश्वासाने तुम्हाला सांगितले की ते समलिंगी आकर्षण असणारे आहेत, किंवा त्यांना कॅन्सर झाला आहे आणि त्यांनी ते गुप्त ठेवायला सांगितले, तर तुम्ही तसेच वागायला हवे. लोकांचा विश्वासघात करणे निरर्थक बडबड करण्याच्या प्रकारातच मोडते. 

सम्यक वाणी खरेतर योग्य वेळी, योग्य परिस्थितीत योग्य प्रमाणात बोलण्याशी संबंधित आहे. काही वेळेला आपल्याला औपचारिक बोलावे लागते तर काही वेळी अनौपचारिक. आपण अशा रीतीने बोलायला हवे, जे लोकांना आश्वस्त करेल. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला एखादी गोष्ट समजावून सांगत असाल, तेव्हा ती त्याला समजेल अशा रीतीने सांगायला हवी, पण हे वयस्कर आणि इतर संस्कृतीतील लोकांनाही लागू पडते. 

कृतीच्या मर्यादा (वागण्याच्या)

अष्टांगिक मार्गातील दुसरा मार्ग कृतींच्या सम्यक मर्यादांविषयी आहे, ही थोडीशी तांत्रिक संज्ञा आहे. जेव्हा आपण मर्यादांविषयी बोलतो, आपण काही निश्चित सीमांविषयी बोलत असतो, ‘मी एका सीमेपर्यंत हे काम करेन, त्या पलीकडे करणार नाही.’

अनुचित व्यवहार/कृती 

मर्यादेपलीकडे व्यवहाराचा संबंध तीन पद्धतीच्या हानिकारक वर्तणुकीशी आहेः 

 • जीव घेणे – एखाद्या जिवाची हत्या करणे
 • जे दिलं गेलं नाही, ते हडप करणं – जे आपलं नाही, ते चोरून घेणं
 • अनैतिक लैंगिक संबंध 

हत्या करणे

साध्या शब्दात याचा अर्थ एखाद्याचा जीव घेणे. हे फक्त मानवापुरते मर्यादित नाही, तर यात प्राणी, मासे, कीटक आणि इतर गोष्टीही समाविष्ट आहेत. 

मला वाटते, आपल्या बहुतांशी लोकांसाठी शिकार किंवा मासेमारीच्या सवयी संपवणे तसे फार कठीण नाही. काही लोकांसाठी कीटकांना न मारणे मात्र कठीण असू शकते. ‘ही माशी पूर्वजन्मात माझी आई होती’, अशा पूर्वजन्म किंवा पुनर्जन्माच्या कल्पनांमध्ये न अडकता या गोष्टीकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. मुख्यतः या गोष्टीवर भर असायला हवा की एखादा जीव आपल्याला त्रासदायक ठरत असेल तर आपली पहिली सहज प्रतिक्रिया म्हणून त्याच्या हत्येचा विचार मनात येता कामा नये. त्यातून आपल्याला न आवडणारी प्रत्येक गोष्ट हिंसक मार्गाने नष्ट करण्याची प्रवृत्ती बळावू शकते. आणि ही सवय आपल्या नाकावर भिरभिरणाऱ्या माशीला मारणाच्या सवयीच्याही पुढे जाऊ शकते. त्यापेक्षा आपल्याला त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टींना शांततेच्या मार्गाने सामोरे जाण्याची पद्धत शोधण्याची गरज आहे. त्यामुळे एखादी माशी किंवा डास आला तर तो जमिनीवर बसल्यावर आपण त्याच्यावर ग्लास ठेवू शकतो आणि ग्लासच्या खालून पेपर सरकवून ती माशी किंवा डास बाहेर सोडू शकतो. आपण अनेकानेक अहिंसक आणि शांततापूर्ण मार्गांनी आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी हाताळू शकतो. 

तुम्ही भारतात राहत असाल तर मी जसे कीटकांसोबत राहणे शिकलो होतो, तसे तुम्हीही करू शकता. भारतातल्या सगळ्या कीटकांपासून मुक्ती मिळण्यासाठी काही मार्गच नाही. मी तर ट्रॅव्हल एजन्टसाठी एका जाहिरातीच्या वाक्याचीही कल्पना करून ठेवली होती, ‘तुम्हाला कीटक आवडत असतील, तर तुम्हाला भारत आवडेल.’ जेव्हा मी पहिल्यांदा भारतात गेलो, तेव्हा मला कीटक अजिबात आवडत नव्हते, पण मला विज्ञान कथा फार आवडायच्या. मी कल्पना करायचो की मी एखाद्या दूरच्या ग्रहावर गेलो आणि तिथले सगळे जीव कीटकांसारखे असतील, तर किती त्रासदायक होईल की मी तिथल्या सगळ्या कीटकांना चिरडून टाकेन. पण तुम्ही जर स्वतःला त्या कीटकाच्या जागी ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल, ते फक्त त्यांचं काम करत आहेत – तेव्हा तुम्ही त्यांना एक जीव म्हणून आदर द्यायला लागाल. 

अर्थात, काही कीटक हानिकारक असतात, जसे काही माणसं हानिकारक असतात. आणि काही वेळा त्यांच्यावर नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याचा सल्ला दिला जातो. पण प्रथम प्रयत्न म्हणून शांततापूर्ण पद्धतींचा अवलंब करायला हवा, मग तो मानवी संघर्ष असो वा झुरळ आणि मुंग्यांनी भरलेलं घर असो. 

पण त्या परिस्थितीचा विचार करा, जेव्हा टोळ तुमची पिके खाऊन फस्त करत असतील. याचा प्रेरणेशी खूप मोठा संबंध आहे. बुद्धाच्या पूर्वजन्माचचं उदाहरण पाहा, जेव्हा ते जहाजावर नाविक होते. त्या जहाजावर कोणीतरी अशी व्यक्ती होती, जी जहाजावरील सर्व लोकांना मारण्याच्या विचारात होती आणि तेव्हा बुद्धांना जाणीव झाली की ही सामूहिक हत्या रोखण्यासाठी कोणताही शांततापूर्ण मार्ग उपलब्ध नाही, फक्त एकच उपाय होता तो म्हणजे त्या संशयित मारेकऱ्याला मारणे. त्यामुळे बुद्धांनी त्या व्यक्तीला मारले. पण त्यामागे करुणेची प्रेरणा होती – प्रवाशांचे प्राण वाचवण्याची प्रेरणा आणि त्या मारेकऱ्याला नकारात्मक कर्माच्या संचितापासून वाचवण्यासाठी – क्रोध किंवा भयामुळे नव्हे. तरीही बुद्धांना जाणीव झाली की त्यांनी हत्या केली आहे, त्या हत्येमागे कोणतीही प्रेरणा असली तरी हत्या विघातक कृती आहे. आणि म्हणून त्यांनी ठरविले, ‘ या कृत्याचा माझ्या सहकाऱ्यांवर परिणाम होऊ नये म्हणून त्याच्या कार्मिक परिणामांचा मी स्वीकार करतो.’

त्यामुळे जर पीक वाचवण्यासाठी परभक्षी टोळांची हत्या करावी लागली – क्रोध, भीती किंवा पीक विकून खूप पैसा कमावण्याच्या प्रेरणेतून नव्हे – पण करुणेच्या प्रेरणेतून, तर त्याच्या परिणामांची गंभीरता क्रोधाच्या कारणातून केलेल्या हत्येचा तुलनेच खूप कमी असेल. तरीही बुद्धाप्रमाणे या गोष्टीचा स्वीकार महत्त्वाचा आहे की तसे कृत्य नकारात्मक आहे आणि त्याच्या परिणामांसाठी तयार असायला हवे. 

चोरी

बहुतांश लोकांना त्यांच्या संपत्तीपेक्षा त्यांच्या जीवनाबाबत अधिक आसक्ती असते. तरीही तुम्ही एखाद्याची संपत्ती घेतली की उभय पक्षांमध्ये दुःखाची भावना पाहायला मिळते. विशेषतः चोराच्या मनात सतत भयाची भावना असते की, ‘मी पकडला तर जाणार नाही ना?’

आपल्याला स्वतःला समस्यांपासून दूर ठेवायचे असते. अर्थात तुम्ही मासा किंवा कीटक मारले, तर ती त्यांच्यासाठी समस्या असते. पण कीटकांमुळे आपल्यालाही समस्या अनुभवावी लागते, आपल्या परिसरात डास घुसले तर रात्रभर जागून डास मारत बसावे लागू शकते. आणि ही मानसिक अस्वस्थता असते. आपण ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शांततापूर्ण मार्गांचा अवलंब केला तर आपले चित्त अधिक स्थिर आणि शांत राहील. 

चोरीच्या प्रकरणांमध्येही हे लागू होते, जिथे आपण पकडले जाऊ की काय, या भीतीने तुम्हाला सतत घाबरून राहावे लागते. चोरी करण्याची मानसिकता एका तीव्र इच्छेतून जन्मते, ज्यात इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी तुमची पुरेसे कष्ट करण्याची तयारी नसते. आणि म्हणून तुम्ही ते इतरांजवळचे चोरून घेता. 

विपरित कारणांसाठी केली गेलेली चोरी आणि हत्येचीही उदाहरणे पाहायला मिळतातः

 • तुम्ही मांस-मच्छी खायच्या इच्छेतूनही हत्या करू शकता. जेव्हा खाण्यासाठी काहीच उपलब्ध नसेल तेव्हाची गोष्ट वेगळी, पण खायला पर्याय असताना मात्र स्थिती वेगळी असते. 
 • इतरांकडून दुखावले गेल्याने आणि बदल्यात त्याच्या मालकीची गोष्ट हिरावून घेण्याच्या भावनेतून म्हणजेच तुम्ही क्रोध भावनेतून चोरी करू शकता.  

अयोग्य लैंगिक व्यवहार

हा आपल्या सर्वांसाठीच कठीण विषय आहे, तृष्णा आणि वासना आपल्या लैंगिक व्यवहारामागची मूलभूत प्रेरणा असते. बौद्ध धर्मात काही मूलभूत मार्गदर्शकतत्त्वे दिली आहेत, जी कोणत्या गोष्टींपासून दूर राहायला हवे, हे स्पष्ट करतातः 

 • आपल्या लैंगिक व्यवहारातून इतरांना इजा पोहोचवणे, ज्यात बलात्कार आणि विनयभंगासारखे प्रकार समाविष्ट आहेत.
 • आपला जोडीदार किंवा इतर कोणालाही त्यांच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंधांसाठी भाग पाडणे 
 • इतरांच्या जोडीदारासोबत लैंगिक संबंध ठेवणे, किंवा आपला जोडीदार असताना इतर कोणासोबत लैंगिक संबंध ठेवणे. आपण कितीही काळजी घेतली तरी अशा गोष्टी समस्या निर्माण करतातच. नाही का?

अयोग्य लैंगिक व्यवहारात इतरही घटक आहेत. पण यातील मुख्य कल्पना आपण प्राण्यांसारखे वागू नये, ही आहे. प्राणी भोवतालाची पर्वा न करता इतर प्राण्यांवर लैंगिक व्यवहारासाठी उडी मारू शकतात. ते पूर्णतः इच्छा आणि वासनेच्या आहारी असतात – हेच आपल्याला टाळायचे आहे. 

तेव्हा आपण स्वतःसाठी काही मर्यादा निश्चित करायला हव्यात, आणि त्या मर्यादेबाहेर व्यवहार न करण्याचा संकल्प करायला हवा. ही संकल्पित सीमा लैंगिक क्रिया, प्रकार, आसन किंवा अन्य कोणत्याही गोष्टीशी संबंधित असू शकते. या मुद्द्यात मुख्यतः लैंगिक जीवनासाठी एक मार्गदर्शकतत्त्व निर्माण करण्यावर भर आहे, जेणेकरून आपण कोणत्याही वेळी, कोणत्याही जागी आणि कोणाही सोबत प्राण्यांप्रमाणे लैंगिक वर्तन करणार नाही. नैतिक स्वयंशिस्तीसाठी किंवा अनुशासनासाठी हे फार महत्त्वाचे आहे. आपण ठरवलेल्या मर्यादांच्या बाहेर न जाण्याशी स्वयंशिस्तीचा संबंध आहे कारण आपल्याला जाणीव होते की मर्यादेबाहेरचे वर्तन हे केवळ वासनेतून उद्भवते आणि वासना अनेक समस्यांचे मूळ असते. 

मादक पदार्थांचे सेवन

मादक पदार्थांच्या सेवनाचा इथल्या विघातक कृतींमध्ये समावेश करण्यात आलेला नाही, पण आत्मविकासासाठी मादक पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

आपल्याला एकाग्रता विकसित करायची आहे. आपल्याला स्वयंशिस्त विकसित करायची आहे. पण आपण मद्याचे सेवन केल्यास आपलं स्वतःवरचं नियंत्रण ढासळतं, हो ना? आपण मारिजुवाना किंवा गांज्यासारख्या मादक पदार्थांचे सेवन करतो आणि आपण एकाग्रता हरवून बसतो. आपले चित्त भिरभिरते आणि कपोलकल्पनांच्या आहारी जाते. आपण मादक पदार्थ किंवा दारुच्या परिणामांचे निरीक्षण केल्यास आपल्याला आढळून येते की आपल्याला जे आत्मविकासाचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे, त्याला व्यसनाच्या सवयी विरोधाभासी आहेत. त्या अडथळे निर्माण करतात आणि ते ही फक्त मद्यपानाच्या काळापुरते नाही, तर त्यानंतरही हॅंगओव्हरसारखे परिणाम पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांच्या सेवनावर एक मर्यादा आखणे किंवा त्यांचा संपूर्ण त्याग करणेच योग्य आहे.  

कृतींची सम्यक मर्यादा

हानिकारक वागण्याच्या प्रकारापासून स्वतःला दूर ठेवणे हाही स्वयंशिस्तीचा एक पैलू आहे. तर इतर घटकांमध्ये विधायक कृतींचा समावेश आहे, ज्यांना ‘सम्यक व्यवहार’ म्हणतात.

अशा प्रकारे, तुम्ही इतरांचे जीवन संपवण्यापेक्षा, जीवनाच्या संरक्षणासाठी मदत करता. याचा व्यापक उपयोग असाही होऊ शकतो की आपण पर्यावरणाला हानी न पोहचवता, त्याची काळजी घेऊ, ज्यामुळे प्राणी आणि मासे मुक्त जीवन जगू शकतील. जर तुम्ही डुक्कर पाळले असतील तर त्यांना जाड करून मारून खाण्याच्या उद्देशाने खाऊपिऊ न घालता त्यांच्या संगोपनाच्या उद्देशाने – अर्थात जीवनाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने घाला. तोच जीवनाच्या संरक्षणाचा मार्ग आहे. यात आजारी लोकांची काळजी घेणे किंवा जखमी व्यक्तींची मदत करण्याचाही समावेश आहे.

तुमच्या घरात भिरभिरणाऱ्या माशीचा विचार करा. तिला खरेतर तिथे असण्याची इच्छा नसते. तिला बाहेर जायचे असते, पण कसे जायचे ते कळत नाही, त्यामुळे तुम्ही तिला केवळ तिच्या घरात शिरण्याच्या क्षुल्लक चुकीसाठी मारलेत तर ते फार चांगले नसेल, असेल का? तुम्ही खिडकी उघडून आणि तिला बाहेर काढण्यासाठी काही आवाज करून तिला बाहेर जाण्यासाठी मदत करू शकता – ती जीवनाच्या संरक्षणासाठी केलेली मदत असेल. आणि अर्थातच माशीलाही जगायचे असते. जर चुकून एखादा पक्षी तुमच्या खोलीत आला, तुम्ही त्याला मारण्यासाठी बंदूक काढाल का? पण माशी आणि पक्ष्यामध्ये फक्त आकाराचा, त्यांच्या दिसण्याचा आणि आवाजाचा फरक आहे. तुम्हाला माशी घरात शिरू नये असे वाटत असेल तर तुम्ही खिडक्या उघडू नका किंवा खिडक्यांना जाळी लावा.

चोरीच्या संदर्भात पाहिल्यास, सम्यक व्यवहार हा असेल की तुम्हीच इतरांच्या संपत्तीच्या संरक्षणासाठी प्रयत्न करावेत. जर तुम्हाला कुणी एखादी गोष्ट उधार दिलेली असेल, तेव्हा त्या वस्तुला नुकसान पोहचू नये म्हणून तुम्ही काळजी घ्यायला हवी. तुम्ही इतरांच्या वस्तू चांगल्या अवस्थेत राहाव्या म्हणून मदत करायला हवी. 

दुसऱ्यांसोबत किंवा स्वतःसोबतही अयोग्य लैंगिक व्यवहार करण्यापेक्षा आपण नम्र आणि उदार मनाने वागले पाहिले, एखाद्या वासनांध कुत्र्याप्रमाणे व्यवहार करू नये.

सम्यक आणि गैर व्यवहाराची इतर काही उदाहरणे

आपण आपल्या चर्चेचा आणखी विस्तार करून पाहिल्यास, वरील तीन व्यवहारांचे आणखीही अनेक पैलू आहेतः 

उदाहरणार्थ, जेव्हा आपण हत्येविषयी बोलतो तेव्हा त्यात इतरांचा शारीरिक छळ न करणेही लक्षात घ्यायला हवे. यात मारपीट करणे, क्षमतेपेक्षा अधिक काम लावणे किंवा शारीरिक इजा पोहचवू शकतील अशा त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक गोष्टी करायला लावणे अशा गोष्टींचाही समावेश आहे. आपण हे स्वतःलाही लागू करू शकतो – आपण स्वतःही अतिरिक्त काम करून त्रास करून घेऊ नये, खराब अन्न खाऊ नये किंवा गरजेपेक्षा कमी झोप घेऊ नये. आपण कायम आपल्या वागण्याचा इतरांच्या संदर्भातून विचार करतो, पण ते स्वतःलाही लागू करणे आवश्यक आहे.

जिथे चोरीचा संदर्भ आहे, त्यात फक्त इतरांच्या गोष्टी चोरणेच समाविष्ट नसून इतरांची परवानगी न घेता, त्यांच्या गोष्टी घेणेही येऊ शकते. जसे दुसऱ्याचा फोन घेऊन महागडे कॉल करणे किंवा इतरांची परवानगी न घेता त्यांच्या फ्रीजमधील गोष्टी काढून खाणे. तिकिट न काढता लपूनछपून सिनेमा बघणे – किंवा लोकांना हे सांगितलेले आवडणार नाही, पण – आपले कर न भरणे, ही चोरीच आहे. आपण वाद घालू शकतो की, ‘मी कर भरू इच्छित नाही कारण तो पैसा युद्ध किंवा शस्त्रखरेदीसारख्या विध्वंसक गोष्टींसाठी वापरला जातो.’ पण वास्तव हे आहे की तो पैसा रस्तेबांधणी, दवाखाने, शाळा आणि इतर आवश्यक साधनसुविधांच्या उभारणीसाठी वापरला जातो. तुम्हाला त्या सुविधा हव्या असतील, तर तुम्ही कर भरणे आवश्यक आहे. 

लायसन्स नसलेले आणि चोरलेले सॉफ्टवेयर किंवा व्हिडीओ डाऊनलोड करणे, ही चोरी नाही का? मला वाटते, ती चोरीच आहे, विशेषतः जेव्हा तिथे हा स्पष्ट उल्लेख असतो की, ‘पैसे न भरता हे डाऊनलोड करू नये.’ तेव्हा ही गोष्ट स्पष्टच असते. तेव्हा ती चोरी नाही, असे मानण्याचा काही मार्गच नाही. अशा वेळी मर्यादा निश्चित करणे, हेच तत्त्व आहे. यातही वैविध्य आहे – परिणामांचा विचार न करता तुम्ही तुम्हाला हवी तशी कृती करत राहणे किंवा काहीच न करणे. चोरीच्या बाबतीत आपण असेही म्हणू शकतो की, ‘मी काही बॅंकेवर दरोडा घालत नाही किंवा दुकानातून चोरी करत नाही, फक्त पैसे न भरता डाऊनलोड करत आहे. मला ते याक्षणी तरी थांबवणे शक्य नाही.’ असे केल्याने किमान काही मर्यादा निर्माण होते, पण तरी पैसे न भरता डाऊनलोड करणे चोरीच आहे, याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. अर्थात तुमच्याकडे पैसे नसताना डाऊनलोड करणे आणि पैसे असूनही मोफत डाऊनलोड करणे यातही मोठा फरक आहे. तुमची पैसे भरण्याची क्षमता असताना असे वागणे गंभीर आहे, तुम्ही इतके निर्लज्ज आणि हीन पातळीवर वागता कामा नये. अशा पद्धतीचे वागणे टाळायला हवे. 

चोरीसंदर्भात बोलताना आपल्याला आणखी काही गोष्टींकडे पाहायला हवे – आपण अनावश्यक गोष्टींवर पैसा वाया घालवणे थांबवू शकतो. उदाहरणार्थ जुगार खेळून आपण आपल्याच संपत्तीचा गैरवापर करत असतो. आपली कुवत असेल तर स्वतःवर पैसा खर्च करताना फार कंजुषीही करता कामा नये. तुमच्याकडे चांगला आहार घेण्यासाठी आणि चांगले अन्न खाण्यासाठी पैसा असतो, पण तुम्ही कंजुषी करता आणि हलक्या दर्जाचे अन्नपदार्थ खरेदी करता. हे स्वतःजवळच चोरी करण्यासारखे आहे.  

जिथे अवैध लैंगिक संबंधांचा संबंध येतो, तिथे फक्त स्वतःला इतरांवर किंवा त्यांच्या जोडीदार लादण्याचाच संबंध नसतो, तर स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला धोका पोहचवणारी कृती करण्यापासून स्वतःला रोखण्याचाही संबंध असतो. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्याकडे आकर्षित होता आणि तुम्हाला त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवावेसे वाटू शकतात, पण ती व्यक्ती जर अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांनी घेरलेली असेल, तर तुम्हाला जाणीव होईल की त्यांच्यामुळे पुढे जाऊन तुमच्यापुढेही समस्या उद्भवतील. त्यामुळे तुमच्या व्यक्तिगत आरोग्यासाठी, तुम्ही तशा प्रकारच्या संबंधात अडकत नाही. फक्त एखादी व्यक्ती आकर्षक दिसते म्हणून आपण वासनांध होता कामा नये.  

आपण ठरवलेल्या मर्यादांच्या पलीकडे आपण गेलो तर काय करावे

नेहमी असे होते की आपण स्वतःसाठी ठरवलेल्या मर्यादांच्या पलीकडे जातो, त्यामुळे बौद्ध धर्मात काही संतुलनकारी उपाय सुचवलेले आहेतः 

 • स्वतःच्या चुकीचा स्वीकार करा. स्वतःशी प्रामाणिक राहा.
 • तुम्ही तसे वागला नसता तर किती बरे झाले असते असा विचार करून स्वतःच्या चुकीबद्दल पश्चाताप करा. हे स्वतःला दोषी समजण्यापेक्षा वेगळे आहे, ज्यात तुम्ही स्वतःला वाईट व्यक्ती समजून, ती घटना विसरू शकत नाही. 
 • संकल्प करा की तुम्ही प्रयत्नशील राहाल आणि ती चूक पुन्हा करणार नाही.
 • तुमच्या प्रेरणेची पुन्हा पुष्टी करा की तुम्ही तुमच्या मर्यादांच्या बाहेर जाऊ इच्छित नाही आणि तसे करणे त्रासदायक आणि समस्या निर्माण करणारे आहे.
 • एखादा प्रतिसंतुलनकारी उपाय आजमावा. जसे, तुम्ही एखाद्यावर रागावलात, तर त्याची माफी मागू शकता आणि समजवू शकता की तुमची मनोवस्था ठीक नव्हती. 

उपजीविका

याचा संबंध तुम्ही कसे जगता त्याच्याशी आहे. काही मार्ग नैतिक असतील, काही असणार नाहीत.

अनुचित उपजीविका

याचा संबंध धोकादायक उद्योगातून पैसा कमावणे किंवा इतरांना व स्वतःलाही धोका पोहचेल अशा पद्धतीने पैसा कमावण्याशी आहे. उदाहरणादाखल खालील गोष्टींचा उल्लेख करता येईलः

 • शस्त्रांची निर्मिती किंवा व्यापार
 • पशूहत्या, शिकार, मासेमारी किंवा कीटकांचा नाश करणे
 • मद्य आणि मादक पदार्थांची निर्मिती आणि विक्री
 • जुगाराचे अड्डे चालवणे
 • अश्लील साहित्य प्रकाशित आणि वितरित करणे.

उपजीविकेचे असे प्रकार इतरांना नुकसान पोहोचवतात किंवा अश्लील साहित्यामुळे कामवासनेत वाढ होते. जरी आपण नियमित साध्या नोकरीत असलो, तरी प्रामाणिक असणे आणि अप्रामाणिकपणा टाळणे महत्त्वाचे असते. 

 • ग्राहकांकडून जास्तीतजास्त पैसा कमावण्याच्या लालसेने अतिरिक्त पैसे आकारणे.
 • अपहार करून व्यवसायातून स्वतःच्या वापरासाठी पैसा घेणे
 • धाकधपटशाह करून खंडणी वसूल करणे
 • भ्रष्टाचार
 • इतरांची पिळवणूक, शोषण
 • दिशाभूल करणाऱ्या जाहिराती
 • पैसा कमावण्यासाठी अन्नधान्यातील भेसळ

उपजीविकेसाठी अनेक अप्रामाणिक मार्ग असतात. पण आपण स्वतःच्या उपजीविकेसाठी नैतिक स्वंयशिस्त किंवा अनुशासन पाळणे आवश्यक असते.

सम्यक उपजीविका

आपण आपले जीवन प्रामाणिकपणे आणि समाजासाठी हितकारक रीतीने जगण्याचे ध्येय ठेवायला हवेः 

 • औषधोपचार
 • सामाजिक कार्य
 • नैतिक व्यवहार
 • समाजोपयोगी वस्तुंची निर्मिती आणि विक्री

सामाजिक स्वास्थ्यासाठी आणि समाज कल्याणासाठी केलेले कोणतेही कार्य महान असते. त्यामुळे आपल्याला खालील गोष्टी अंगीकारणेही आवश्यक आहेः

 • इतरांची फसवणूक करू नये किंवा व्यवहारात अतिरिक्त दर लावू नयेत.
 • रास्त किंमत ठेवावी, जेणेकरून आपण नफा तर मिळवू, पण तो प्रामाणिक असेल.
 • कामगारांना योग्य वेतन द्यायला हवे, जेणेकरून त्यांचे आर्थिक शोषण होणार नाही. 

एका मुदद्यावर कायम प्रश्न उपस्थित होतात, तो म्हणजे गरज. एकदा मी ऑस्ट्रेलिया मधील एका तिबेटी गुरूंसाठी अनुवादकाचे काम करत होतो, जिथे खूप शेळ्या असतात. आणि कुणीतरी विचारले, ‘मी ज्या शहरात राहतो, तिथे एकच काम उपलब्ध आहे, ते म्हणजे शेळ्या सांभाळणे, ज्या लोकर आणि मांसासाठी वापरल्या जातात. मी काय करावे? मी दुसऱ्या एखाद्या शहरात स्थलांतरित होऊ शकत नाही किंवा दुसरे काम शोधू शकत नाही.’ तिबेटी लामांनी सांगितले, ‘सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे स्वतःच्या कामाबाबत प्रामाणिक राहणे. आणि इतरांची फसवणूक न करणे. तुझ्याबाबतीत शेळ्यांची फसवणूक न करता, त्यांना योग्य आहार देऊन योग्य रीत्या पाळणे, त्यांची योग्य ती काळजी घेणे.’ अशा रीतीने मुख्य भर हा दयाळू आणि प्रामाणिक राहण्यावर आहे.

z

सारांश

जेव्हा आपण अष्टांगिक मार्गांमधून लाभणाऱ्या सल्ल्याकडे पाहतो, त्यांना एखाद्या बंधनकारक नियमांसारखे पाहता कामा नये. पण त्यांना आपल्याला व इतरांना हानी पोहोचवणाऱ्या नकारात्मक कृतींना रोखणाऱ्या मर्यादा म्हणून पाहिले जायला हवे.

Top