आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कर्माची प्रस्तुतता

‘कर्म’ संकल्पना समजून घेताना

आपल्या दैनंदिन जीवनामधील कर्माच्या प्रस्तुततेविषयी आज मी बोलणार आहे. यासाठी सुरुवातीला कर्म म्हणजे काय हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. याची सर्वसाधारणतः दोन स्पष्टीकरणं दिली जातात. एक, आपल्याला विविध प्रकारच्या कृती करण्यासाठी- शारीरिकदृष्ट्या काही करणं, शब्दांद्वारे काही बोलणं, किंवा मानसिक पातळीवर काही विचार करणं यांसाठी- उद्युक्त करणाऱ्या प्रेरक इच्छांकडे ‘कर्म’ ही संज्ञा निर्देश करते. दुसऱ्या स्पष्टीकरणामध्ये शारीरिक व शाब्दिक कृतींच्या बाबतीत वेगळं प्रतिपादन केलं जातं. अशा कृतींसाठी कर्म हे आपल्या शारीरिक कृतींचा अनिवार्य आकार असतं, आपल्या शाब्दिक कृतींचा अनिवार्य ध्वनी असतं, आणि दोन्ही प्रकारच्या कृतींसोबत येणारी व आपल्या मानसिक सातत्यासोबत कायम राहणारी प्रेरक सूक्ष्म ऊर्जा असतं. ‘कर्म’ या संज्ञेसाठी वापरला जाणारा तिबेटी शब्द ‘कृती’ या अर्थाशी जवळीक सांगणारा असला, तरी यातील कोणत्याही स्पष्टीकरणामध्ये कर्म म्हणजेच प्रत्यक्षातली कृती असं म्हटलेलं नाही, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. 

अशा प्रकारच्या अनिवार्य कर्मजन्य पद्धतींनी एखादी कृती केली की आपल्या मानसिक सातत्यावर काही विशिष्ट प्रकारचे कर्मजन्य परिणाम होतात. यातील सर्वाधिक चर्चा झालेली सकारात्मक वा नकारात्मक कर्मजन्य सामर्थ्यं व कर्मजन्य प्रवृत्ती यांबद्दल बोलू. या दोन्हींमध्ये किंचितसा फरक आहे, आत्ता आपण त्या तांत्रिक तपशिलात जाण्याचं कारण नाही. पुरेशी परिस्थिती उपस्थित असताना परिणामाला किंवा निष्पत्तीला वाव देण्याची क्षमता हा या कर्मजन्य सामर्थ्यं व प्रवृत्तींचा एक पैलू आहे. तांत्रिक परिभाषेमध्ये बोलायचं तर, फळाच्या फोडीप्रमाणे, हे कर्मजन्य घटक ‘परिपक्व’ होतात.

Top