संन्यास आणि करुणा या दोन महत्त्वाच्या मनोवस्था आहेत, ज्या बौद्ध आध्यात्मिक मार्गावरील मार्गक्रमणासाठी आवश्यक प्रेरणा विकसित करण्याच्या दृष्टीने गरजेच्या असतात. इथे मी या दोन मनोवस्थांशी संबंधित काही विषयांवर चर्चा करू इच्छितो, कारण या दोन्ही अवस्थांमध्ये गहन परस्परसंबंध आहे. खरेतर, या दोन्ही अवस्था एकच आहेत, यांच्यात फरक इतकाच आहे की यातील प्रत्येकीचे लक्ष्य काय आहे.
सर्व बौद्ध शिकवणींचे उद्दिष्ट आपल्याला दुःख आणि समस्यांपासून मुक्ती मिळवून देण्यास साहाय्यक ठरण्याचेच आहे. हे साध्य करण्यासाठी उपयोगात आणली जाणारी पद्धत ही आहे की स्वतःमध्येच दुःखाचा आणि त्याच्या यथार्थ कारणांचा शोध घेऊन स्वतःला त्या कारणांपासून अशा रीतीने मुक्त करावे की, जेणेकरून त्या पुन्हा उत्पन्न होणार नाहीत. ही पद्धत या दृढ विश्वासावर आधारलेली आहे की या कारणांना अशा रीतीने नष्ट करणे संभव आहे की जेणेकरून ती कारणे पुन्हा उत्पन्न होणार नाहीत. हे साध्य करण्यासाठी आपल्याला एक चित्त मार्ग विकसित करायला हवाः जो एक असा बोध आहे, जो आपल्या समस्यांचे मूळ कारण, अर्थात आपले अज्ञान आणि आपल्या अनभिज्ञतेचा प्रतिरोध करून त्यांना पूर्णतः संपवेल.
ही पद्धत बुद्धांची पहिली आणि सर्वात मूलभूत शिकवण असणाऱ्या चार आर्य सत्यांच्या स्वरूपाच्या अनुरूप आहे. जर आपण संन्यास आणि करुणेकडे पाहिले, तर आपल्या लक्षात येते की, दुःख नष्ट व्हावे या कामनेसह दोन्ही मनोवस्थांचे लक्ष्य दुःख हेच असते. या दोन्हीतील मुख्य फरक इतकाच आहे की संन्यासात आपले चित्त स्वतःच्या दुःखावर केंद्रित असते, तर करुणेत इतरांचे दुःख केंद्रस्थानी असते. तर अशा प्रकारे या दोन्ही चित्तावस्था फार मिळत्याजुळत्या आहेत, हो ना? पण त्यानंतर हा प्रश्न उपस्थित होतो की ही एकच मनोवस्था आहे का आणि आपण एका मनोवस्थेतून दुसऱ्या मनोवस्थेत परिवर्तन कशा रीतीने करू शकतो?
संन्यास आणि करुणेचा अर्थ
केवळ इंग्रजीतच नाही, तर त्या सर्व भाषांमध्ये ‘रिनन्सिएशन’ शब्दप्रयोग केला जातो, ज्या भाषांच्या माध्यमातून पश्चिमी जगतात बौद्ध धर्म प्रस्तुत केला जातो. पण तरीही हा प्रश्न उभा राहतो की, संस्कृत किंवा तिबेटी भाषेतील मूळ शब्दाचा हा नेमका अनुवाद असेल की नाही. इथे मनात याही शक्यतेचा विचार येतो की हा शब्द त्या धर्मप्रचारकांद्वारे प्रचलित केला गेला असेल, जे पश्चिमी जगतातील बौद्ध साहित्याचे सुरुवातीचे अनुवादक असतील आणि ज्यांनी बौद्ध शिकवणींच्या मूळ संदर्भांशिवाय या संज्ञेचा निराळाच अर्थ लावला असेल. शेवटी ‘रिनन्सिएशन’ शब्दाचा मथितार्थ सर्वसंगपरित्याग करून एखाद्या गुफेत किंवा मठात जीवन व्यतीत करणे असाच आहे कारण संसारिक गोष्टींबाबतची आसक्ती वाईट समजली जाते. पण संस्कृत भाषेतील या संज्ञेचा (निःसरण) किंवा तिबेटी भाषेतील या संज्ञेचा (न्गेस-ब्युंग) मथितार्थ हा नाही. या संज्ञेचा विशेषतः तिबेटी भाषेतील शब्द पाहिला तर त्याचा अर्थ आहे दृढ निश्चय, अर्थात निश्चितता प्राप्त करणे असा आहे. याचा संदर्भ विशिष्टतः दुःखातून मुक्ती प्राप्त करण्याच्या निश्चयाशी असतो, ज्यावर हा भाव केंद्रित असतो.
दुःखापासून मुक्ती मिळवण्याचा दृढ निश्चय विकसित करण्यासाठी दुःख आणि त्याच्या कारणांचा त्याग करण्याच्या इच्छेची आवश्यकता असते. त्यामुळे त्यात अर्थातच एखाद्या गोष्टीचा त्याग करण्याचा किंवा विरक्त होण्याचा संदर्भ आहे. ती ‘एखादी’ गोष्ट म्हणजेच दुःख आणि त्याची कारणे आहेत, ज्यांची ओळख पटल्यावर आपण त्यांच्यावर लक्ष केंद्रित करतो. आपल्याला हा बोध होतो की आपल्याला हे दुःख आहे आणि त्याचे हे कारण आहे, आणि मी हे दुःख आणखी सहन करू इच्छित नाही, मी यातून बाहेर पडू इच्छितो, तेव्हाच आपण त्या दुःखाचा त्याग करण्याची तत्परता जागृत करू शकतो. कदाचित हे व्यक्त करण्याची अधिक तटस्थ अभिव्यक्ती ही असेल की ‘माझी इच्छा आहे की हे दुःख संपून जावे’. ही गोष्ट दोन्ही स्थितींना लागू होते, भलेही ती मनोवस्था आपल्या स्वतःच्या दुःखावर केंद्रित असो किंवा करुणेच्या संदर्भातून इतरांच्या दुःखावर केंद्रित असेल. जरी दुःख सहन करणारी व्यक्ती – आपण किंवा इतर – वेगळी असली, तरी इच्छा एकसमान असते. आपली इच्छा हीच असते की दुःखातून मुक्ती मिळावी.
संन्यस्त भाव आणि करुणा विकसित करण्यासाठी आवश्यक घटक
आपण आपले लक्ष कोणत्या गोष्टीवर केंद्रित करत आहोत, एवढेच समजून घेणे पुरेसे नसते, अर्थात विशिष्ट दुःख आणि त्याची वास्तविक कारणे, जी आपण भोगत असतो – तर त्याच्याशी संबंधित असलेले इतर विविध घटक समजून घेणेही फार आवश्यक असते. त्सोंगखापा यांनी आपल्या सूत्र आणि तंत्र संबंधी व्यावहारिक उपदेशात खूप स्पष्टपणे सांगितले आहे की, सामान्यतः प्रभावशाली ध्यानधारणेसाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात. सर्वात आधी आपल्याला जाणून घ्यायला हवे की ध्यानधारणा म्हणजे नक्की काय. ध्यानधारणा ती पद्धती आहे, जिच्या द्वारे आपण वारंवार एखादी विशिष्ट चित्तावस्था विकसित करून किंवा त्यावर आपले ध्यान केंद्रित करून त्या अवस्थेची सवय अंगी बाणवतो.
आपण स्वतःला त्या चित्तावस्थेशी कसे परिचित करून हे जाणून घेण्यासाठी त्याच्या सर्व बारकाव्यांसंबंधीचा बोध प्राप्त करून घेण्याची आवश्यकता असते. त्यासाठी आपल्याला खालील गोष्टी जाणून घेण्याची गरज असतेः
- ती चित्तावस्था कोणत्या गोष्टीवर केंद्रित आहे- या प्रकरणात दुःख आणि त्याच्या कारणांवर केंद्रित आहे.
- त्या लक्षित गोष्टीकडे मन कसे पाहते. यासाठीची तांत्रिक संज्ञा आहे ‘मन त्या लक्षित गोष्टीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहते.’ इथे आपले मन त्या लक्षित गोष्टीकडे अशा दृष्टीने पाहते की ते कायमचे संपून जावे. आपले मन केवळ दुःख आणि त्याच्या कारणांवरच केंद्रित नसते, तर आपले मन त्यांना या दृष्टिकोनातून पाहत असते की ‘इथून निघून जा.’
कोणतीही चित्तावस्था एकाग्रता, प्रयोजन अशा अनेक मानसिक घटकांचे व्यामिश्र रूप असते. जर आपल्याला या सर्व घटकांची जाणीव असेल तर आपल्याला ती इच्छित चित्तावस्था विकसित करण्यासाठी साहाय्य मिळते. यासाठी त्सोंगखापा यांनी अनेक इतर मुद्देही सांगितले आहेत, ते ही जाणून घेण्याची आवश्यकता आहे. त्यात खालील मुद्द्यांचा समावेश आहेः
- ती चित्तावस्था कोणत्या गोष्टींवर अवलंबून आहे – दुसऱ्या शब्दात सांगायचे, तर ती चित्तावस्था विकसित करण्यापूर्वी आपल्याला इतर कोणकोणत्या चित्तावस्था विकसित करण्याची आवश्यकता आहे. त्यातून आपल्याला इच्छित चित्तावस्था विकसित करण्याच्या प्रक्रियेत साहाय्य मिळेल. उदाहरणार्थ, आपल्याला स्वतःतील आणि इतरांमधील दुःखांची जाणीव व्हायला हवी.
- आपल्याला जी चित्तावस्था प्राप्त करायची आहे, त्यासाठी कोणते मानसिक घटक साहाय्यक ठरतील आणि कोणते घटक बाधक ठरतील – उदाहरणार्थ, प्रेमाची भावना साहाय्यक ठरेल, मग ते स्वतःवरील प्रेम असो वा इतरांप्रति. आणि द्वेष, मग तो आत्मद्वेष असेल किंवा इतरांप्रतिचा द्वेष असेल, तो त्या चित्तावस्थेसाठी बाधक असेल.
- जेव्हा आपण ती चित्तावस्था विकसित करू, तेव्हा ती कशा रीतीने लाभकारक किंवा उपयुक्त ठरेल – उदाहरणार्थ, संन्यास आपल्याला स्वतःच्या दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी साहाय्यक असेल, तर करुणा आपल्याला इतरांनी दुःखातून मुक्त व्हावे, यासाठी साहाय्यक ठरण्यास मदत करेल.
हे सर्व जरी तांत्रिक विश्लेषण वाटत असले तरी वास्तवात हे बौद्ध साधनेसाठी किंवा प्रेम व करुणाभाव विकसित करण्यासाठीच्या कोणत्याही आध्यात्मिक साधनेसाठी उपयुक्त ठरते. हे कसे साध्य करता येईल? अनेकदा असे होते की आपल्याला प्रेम आणि करुणा म्हणजे नेमके काय, हेच माहीत नसते. त्यामुळे आपण काय करायचे आहे, हेच माहीत नसल्याने कोऱ्या मनाने नुसते बसून राहतो. किंवा असेही होऊ शकते की प्रेम किंवा करुणेबाबत आपल्या स्वतःच्या काही कल्पना असतात – पण सामान्यतः आपल्या कल्पना फार अस्पष्ट असतात. जर आपण एखादा अस्पष्ट भाव विकसित करण्याचा प्रयत्न करत असू तर त्यातून आपण फार फार एखादा अस्पष्ट भावच विकसित करण्याची अपेक्षा ठेवू शकतो आणि बौद्ध धर्म अशा अस्पष्ट अनुभूती विकसित करण्याची शिकवण देत नाही.
बौद्ध साधनेत जरी आपण ज्याला चित्तावस्थेची ‘आध्यात्मिक मूल्ये’ म्हणतात, त्याचा अभ्यास करत असलो, तरी या अभ्यासाचा दृष्टिकोन वैज्ञानिक आणि स्पष्ट असतो. याला स्पष्ट यासाठी म्हटले आहे कारण आपल्याला अगदी नेमकेपणाने माहीत असते की आपण आपल्या मनाशी काय करू इच्छित आहे आणि ते साध्य करण्यासाठीची पद्धत काय आहे. जर याबाबत स्पष्टता असेल की आपण आपल्या चित्त, हृदय आणि मनस्थितीशी संबंधित अभ्यास करणार आहोत, तर आपण त्याला सकारात्मक रीतीने विकसित करू शकतो. अन्यथा, हे सर्व फारच अस्पष्ट होईल.
असेही असू शकते की आपल्यापैकी काही जणांचा दृष्टिकोन वैज्ञानिक किंवा तर्कसंगत नसेल. शक्यता आहे की काही लोक अंतर्बोध किंवा भावनिक पातळीवर काम करत असतील. पण जर आपण सहजज्ञानाला अधिक सखोलपणे पाहिले, तर आपल्या लक्षात येईल की सर्वात चांगले सहजज्ञान तेच असते, जे स्पष्ट असते. अस्पष्ट सहजज्ञान आपल्याला फार दूर घेऊन नाही जाऊ शकत. त्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व कसेही असले, तरी आपल्या व्यक्तित्वात स्पष्टता असणे फार उपयुक्त असते.
संन्यास आणि करुणेशी जोडले गेलेले मानसिक घटकः ‘पुरे झाले’ अशी निर्णायक भावना
संन्यास आणि करुणेशी कोणकोणते मानसिक घटक जोडले गेलेले असतात? मी इथे एक स्पष्ट चित्र उभे करू इच्छितो की बौद्ध शिकवणींमध्ये सांगितल्या गेलेल्या मनोवस्था कोणत्या आहेत. पण जरी आपण या मनोवस्था आणि भावनांचे नेमके वर्णन करू शकलो, तरी एक प्रश्न स्वाभाविकपणे उभा राहतो की त्या मनोवस्थांची अनुभूती कशा प्रकारची असू शकते? आणि मग, आपल्याला ही जाणीव कशी होईल की आपण जे अनुभवत असू, ते यथार्थच आहे?
आणि जर आपल्याला याबाबत नेमकी कल्पना असेल की यथार्थ ठरण्यासाठी या चित्तावस्थांमध्ये कोणते गुण आवश्यक आहेत, तेव्हा आपण तुलना करून पाहू शकतो की आपण नक्की काय अनुभवत आहोत आणि वास्तविक अनुभूती नक्की कशी असायला हवी. आपल्या भावनांचे विश्लेषण करण्यासाठी आपण त्या विखंडीत करून त्यांच्यातील सर्व घटक तपासायला हवेत आणि शोधायला हवे की त्यातला कोणता अवयव कमजोर किंवा दोषयुक्त आहे. तेव्हा आपल्याला जाणीव होईल की अधिक निश्चित मनोवस्था प्राप्त करण्यासाठी नेमके काय करायला हवे. आपल्या भावनांचे विश्लेषण करण्याची आणि त्यांना समजून घेण्याची प्रक्रिया अशी प्रक्रिया नाही, जी त्या भावनाच नष्ट करेल. मनोचिकित्सेतही या प्रक्रियेचा वापर केला जातो, जेणेकरून आपण आरोग्यदायी होऊ आणि इतरांसोबतच स्वतःसाठीही अधिक लाभकारी होऊ.
संन्यास आणि करुणेत अशी कोणती भावना असते, जी सर्वात प्रबळ असते? तिबेटी भाषेत यासाठी ‘यिदब्युंग’ शब्दप्रयोग केला जातो, ज्याचा अनुवाद करणे सोपे नाही. पण ही एखाद्या गोष्टीचा उबग येण्याची अवस्था असतेः ‘मी एखादी गोष्ट मर्यादेपलीकडे सहन केली आहे’ कधी कधी याचा अनुवाद ‘तिटकारा’ असाही केला जातो, जी अधिक तीव्र भावना ठरेल आणि पूर्वी मी स्वतः त्याचा असा अनुवाद केला आहे. पण नंतर अधिक विचारांती माझ्या लक्षात आले की हा थोडा जास्त तीव्र शब्द आहे, कारण तिटकारा पुढे जाऊन घृणेच्या भावनेत परिवर्तित होण्याची शक्यता असते. मला वाटते की या मनोवस्थेची अर्थछटा अधिक तटस्थ आहे. ‘हे दुःख फार झाले, हे आता संपायला हवे.’ – मग ते आपले स्वतःचे दुःख असो किंवा आणखी कुणाचे. त्यामुळे यात एक प्रकारचा निर्णायक भाव आहे की ‘आता पुरे. फार झाले.’
मला वाटते की हे आपण आपल्या सर्वसामान्य अनुभूतीच्या संदर्भात समजू शकतो. आपण दुःखातून जात असू आणि त्यातून बाहेर पडण्याची इच्छा असू शकते. पण त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण त्या क्षणापर्यंत काहीच करत नाही, जोपर्यंत आपण दृढ निश्चय करत नाही आणि ‘आता पुरे. फार झाले’ या सीमेपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे ‘आता पुरे. फार झाले’ ही भावना संन्यस्त भावनेचा एक अवयव आहे आणि हा एक प्रमुख भावनात्मक फरक आहे.
एखाद्या तथ्याला सत्य समजणे
संन्यास आणि करुणेशी आणखी एक मानसिक घटक जोडला गेलेला आहे, तो म्हणजे एखाद्या तथ्याला सत्य समजणे. काहीवेळा याचा अनुवाद ‘निष्ठा’ असाही केला जातो, पण मला तो अनुवाद योग्य वाटत नाही. तो अयोग्य वाटण्याचे कारण निष्ठा एखाद्या असत्य गोष्टीविषयीही असू शकते, जसे संयत आर्थिक प्रगतीवर निष्ठा असणे. पण इथे एखाद्या तथ्यावर विश्वास ठेवण्याचा संबंध एखाद्या अशा गोष्टीशी आहे, जी सत्य आहे. इथे आपण ईस्टरमधल्या सशाच्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याविषयी बोलत नाही.
तर्कावर आधारित सत्यावर विश्वास ठेवणे
एखाद्या तथ्यावरील विश्वासाचे तीन प्रकार असतात. पहिला प्रकार तर्कावर आधारित तथ्यावर विश्वास ठेवणे. यात आपण दुःखावर लक्ष केंद्रित करतो आणि या तथ्यावर दृढ विश्वास ठेवतो की हेच वास्तव दुःख आहे आणि ते विशिष्ट कारणातून उत्पन्न झाले आहे. याशिवाय आपला दृढ विश्वास असतो की हे दुःख कायमस्वरूपी संपविणे शक्य आहे.
शेवटचा मुद्दा फार महत्त्वाचा घटक आहे. जर तर्कावर आधारित हा दृढ विश्वास नसेल की दुःख संपवणे शक्य आहे आणि काही विशिष्ट प्रतिबंधात्मक उपाय त्याला कायमस्वरूपी संपवू शकतात, तर संपूर्ण भावनिक प्रतिक्रियाच बदलून जाईल. उदाहरणार्थ, आपल्याला जीवनात समस्या असेल आणि आपल्याला त्याच्या कारणांचाही बोध झाला असेल. आपली कदाचित त्या समस्येतून बाहेर पडण्याची इच्छा असेल आणि ही सुद्धा शक्यता आहे की आपण त्या स्थितीपर्यंत पोहचलेले असू, जिथे आपल्याला असे वाटत असेल की आपले फार सहन करून झाले आहे. आपण ही स्थिती सुधारण्याठी निश्चितच काही तरी करण्याची गरज आहे. पण समजा आपल्याला असे वाटत असेल की प्रयत्न करणेच व्यर्थ आहे, वास्तवात त्या समस्येतून बाहेर पडण्याचा कोणता मार्गच नाही आणि आपल्याला शांतपणे सगळ्याचा स्वीकार करायला शिकायला हवे. किंवा आपल्याला असे वाटू शकते की आपण ते कायम सहन करत राहावे, असा आपल्याला शापच आहे. बौद्ध धर्मात सांगितल्या गेलेल्या तर्काधारित विश्वासापेक्षा ही फारच वेगळी अवस्था असेल, हो ना? अशा मनोवस्थेत जिथे आपल्याला वाटते की कोणती आशाच शिल्लक राहिलेली नाही, अशा स्थितीमुळे एखादी व्यक्ती निराश होणे स्वाभाविक आहे. आपण पूर्णतः निराश झालेले असतो कारण आपण आपल्या समस्येतून बाहेर पडू इच्छित असलो तरी आपल्याला जाणीव असते की ती केवळ आपली इच्छा आहे आणि त्याबाबत फार काही करण्याजोगे नाही.
त्यामुळेच आपण आपल्या दुःखांपासून कायमस्वरूपी मुक्त होऊ शकतो, यावरचा आपला दृढ विश्वास तर्कावर आधारित असायला हवा. आपल्याला जाणीव होते की आपण स्वतःला दुःखातून कसे मुक्त करू शकतो आणि आपल्याला दृढ विश्वासही असतो की आपला प्रयत्न यशस्वी होईल. यातून आपल्याला आशा जागृत होते आणि आशेतून बळ मिळते. स्वतःला समस्येतून मुक्त करण्यायोग्य बनण्याच्या दृष्टीने हे बळ फार महत्त्वाचे असते. हेच तर्कावर आधारित तथ्यावर विश्वास ठेवणे आहे.
एखाद्या गोष्टीसंबंधित तथ्यांवर विचारपूर्वक विश्वास ठेवणे
तथ्याला सत्य समजण्याचा दुसरा प्रकार म्हणजे ‘एखाद्या गोष्टीसंबंधित तथ्यांवर विचारपूर्वक विश्वास ठेवणे.’ हा विश्वास आपले विचार या दृष्टीने स्पष्ट करतो की ध्येयावरील ध्यान ढळू न देता आपले मन तणावदायी भावनांपासून मुक्त होते. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा आहे की आपले दुःख कायमस्वरूपी संपवण्यासंबंधीच्या विश्वासाचा हा प्रकार आपले मन निराशेपासून मुक्त करतो. आपल्या स्थितीबाबतचा आपला भ्रम दूर करतो, असहाय्य असल्याच्या आणि भयाच्या भावनांपासून मुक्ती देतो. जेव्हा आपण समस्यांनी घेरलेले असतो, तेव्हा आपले मन भीतीने व्यापलेले असते, आपण सतत असा विचार करत असतो की ‘हे कायम असेच राहणार आहे’ किंवा ‘मला काहीही करायची भीती वाटते कारण कदाचित मी परिस्थिती आणखी बिघडवून टाकेन.’
मला खात्री आहे की आपल्या सर्वांना अशी उदाहरणे माहीत असतील, मग ती स्वतःविषयीची किंवा इतरांविषयीचीही असू शकतात. उदाहरणार्थ, आपण एखाद्या व्यक्तीसोबत अशा एखाद्या अत्यंत तणावग्रस्त नात्यात असू शकतो, जे फार विनाशकारी, कलुषित नातेसंबंध असू शकतात, तरीही आपण ते नातं या भीतीने तोडत नाही की त्या व्यक्तीशिवाय आपले आयुष्य उध्वस्त होईल. पण आपण मनाला या दृढ विश्वासाच्या मदतीने भयापासून आणि अनिश्चिततेपासून मुक्त करू शकतो की ते नाते संपवल्याने आपण समस्यांपासून मुक्त होऊ शकतो आणि ते नाते संपवल्याने आपले जीवन अधिक सुरळीत होईल.
दुसऱ्या प्रकारच्या दृढ विश्वासामुळे आपण दुःखाच्या नकारात्मकतेला अतिरेकी महत्त्व देण्याच्या समस्येपासूनही मुक्त होतो. आपल्याला समस्या असण्याची शक्यता आहे, पण जर आपण त्या समस्येच्या नकारात्मकतेला अतिरेकी महत्त्व दिले, तर त्याचे मनातल्या एका भयंकर राक्षसात रूपांतर होईल. आपण त्या समस्येला मूर्त रूपही देऊ शकतो, ज्यामुळे आपली भीती अधिक वाढेल. पण आपली संन्यस्त भावना या विचारपूर्वक विश्वासावर अवलंबून असेल की दुःखातून कायमस्वरूपी मुक्ती शक्य आहे, तर आपल्याला भीती वाटत नाही. आपण आपल्या समस्यांपासून पळ काढत नाही आणि भीतीच्या भावनेत पळवाट शोधत नाही, तर आपण नक्की यशस्वी होऊ या दृढ विश्वासासह त्या समस्यांचा सामना करतो.
त्यामुळे आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की आपण ‘संसाराच्या बंदिवासातून सुटण्या’च्या अभिव्यक्तीशी जोडलेल्या भावनात्मक अवस्थांना कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो. असे नसते की अनियंत्रितपणे वारंवार उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या सांसारिक स्थितीबाबतच्या भीती किंवा तिरस्काराच्या भावनेमुळे आपले मन अस्वस्थ किंवा भ्रमित असते. या सर्व प्रकारच्या दुःखापासून आपण आपली मुक्तता करू शकतो, हे सत्य असल्याच्या दृढ विचारपूर्वक विश्वासामुळे आपल्याला शांत, स्पष्ट आणि निश्चित मनोवस्था प्राप्त होते.
एखाद्या तथ्याशी संबंधित आकांक्षेसोबत त्या तथ्यावर विश्वास ठेवणे
तिसऱ्या प्रकारचा विश्वास एखाद्या तथ्याशी संबंधित आकांक्षेसोबत त्या तथ्यावर विश्वास ठेवण्याशी संबंधित असतो. इथे ही आकांक्षा किंवा अपेक्षा असते की ‘मी या स्थितीतून बाहेर पडेन आणि मी इथून बाहेर पडण्यासाठी नक्की प्रयत्न करीन.’ या संदर्भात आपण दैनंदिन जीवनात अशा व्यक्तीचे उदाहरण पाहू शकतो, जी गरिबीत वाढली आहे आणि ती व्यक्ती तिच्या मर्यादांपासून मुक्त होऊन अधिक यशस्वी जीवन जगण्याची अपेक्षा ठेवते. अशा व्यक्तींच्या मनात त्यांच्या परिस्थितीबद्दल घृणा असते, असे काही नाही. पण त्यांचे मन स्पष्ट, शांत असते आणि त्यांना माहिती असते की त्यांची गरिबी संपवून, त्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना नक्की काय करायला हवे आणि ते करण्याचा त्यांनी निश्चय केलेला असतो कारण त्यांचं पुरेसं सहन करून झालेलं असतं. त्यांना माहीत असते की त्यांनी काय करायला हवे आणि ते थेट तसेच करतात.
मला माझ्या एका मित्राचे उदाहरण आठवते, जो एका फारच गरीब कुटुंबात वाढला होता, आणि फार कठीण भोवतालात होता. तो अशा शाळेत जात होता, जिथं त्याच्या वर्गातील मुलं गटागटाने एकमेकासोबत भांडत बसत. त्याने त्यातून मुक्त होण्याचा निश्चय केला. त्याला माहीत होते की त्याला तिथून बाहेर पडावेच लागेल; त्याने पैसा कमावण्यासाठी आणि विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतले. विद्यापीठात त्याने वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला आणि आता तो एक यशस्वी मस्तिष्क शल्यचिकित्सक आहे.
करुणा आणि संन्यासासंबंधीचे घटक एकसमान आहेत
जेव्हा आपली संन्यस्त भावना आपल्या दुःखावर केंद्रित असते, तेव्हा त्याची हीच स्थिती असते. जेव्हा इतरांच्या दुःखावर केंद्रित असते, तेव्हाही तशीच स्थिती असते. आपले लक्ष दुसऱ्यांच्या दुःखावर केंद्रित असते आणि आपले मन त्याकडे या दृष्टिकोनातून पाहते की, ‘हे संपायला हवे.’ त्यासोबत जोडली गेलेली चित्तावस्था आणि मनोभाव हाच असतो की ‘आता पुरे झाले.’ आपल्याला बोध होतो की इतर सर्व लोक त्याच समस्या अनुभवत आहेत, ज्या आपण अनुभवत आहोत, पण आपण त्याबाबत अपमानजनक किंवा असहाय्यतेचा भाव अनुभवत नाही. ही भावनाही अशांतकारी भावना आहे. आपल्याला आपल्या बोधावर विश्वास असतो की तेच त्यांच्या समस्येचे कारण आहे आणि त्यांनाही त्यातून बाहेर पडणे संभव आहे. असे नसते की आपण फक्त त्यांचे भले चिंततो, तर अंतर्मनात आपल्याला जाणीव असते की स्थिती निराशाजनक आहे. आपला विश्वास विवेकशील विश्वास असतो आणि म्हणून या करुणेच्या प्रभावातून आपले चित्त अशांतकारी भावनांपासून मुक्त होते. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.
मी अशीच आणखी काही उदाहरणे सांगू शकते. मला आठवते की माझी आई अमेरिकी दूरदर्शनवर स्थानिक बातम्या पाहायची आणि दर दिवशी होणाऱ्या खून, दरोडे आणि बलात्काराच्या घटनांबाबत ऐकायची, त्या बातम्या ऐकून ती क्रोधित होऊन भडकायचीः ‘किती भयंकर आहे हे. असे व्हायला नाही पाहिजे’ हा भाव करुणेसारखा वाटू शकतो, पण खरेतर ही फार तणावग्रस्त मनोवस्था आहे. ही काही ‘वास्तविक’ करुणा नाही. हे तर करुणा आणि चिंतेच्या भावनेसोबत क्रोध आणि निराशेच्या भावनेचं मिश्रण आहे.
करुणा- ‘वास्तविक’ करुणा – ही काही तणावग्रस्त मनोवस्था नाही; ती एक नितळ मनोवस्था आहे. ती या आकांक्षेसह दृढ विश्वासाशी जोडली गेलेली असते की ‘मी हे ठीक करण्यासाठी प्रयत्न करेन आणि हे दुःख दूर करण्यासाठी मदत करेन.’ अशा रीतीने ती फक्त एवढी अपेक्षा नाही की ‘त्यांनी’ स्थिती सुधारण्यासाठी काही तरी करायला हवे, तर मी मदत करण्याचा प्रयत्न करेन. पण ही अपेक्षा आणि हे प्रयोजन या व्यावहारिक बोधावर आधारित असायला हवे की समस्या काय आहे आणि ती दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो. हा असा व्यामिश्र विचार नसतो की ‘मीच सर्वशक्तिमान ईश्वर आहे आणि मी बाहेर जाऊन जगाचे रक्षण करेन.’ आणि ‘मी जर त्या व्यक्तीची मदत करण्यात यशस्वी झालो, तर मी किती चांगला आहे. आणि मी अयशस्वी झालो, तर माझ्यात दोष आहे.’ हेच कारण आहे की आपल्याला योग्य बोध व्हायला हवा आणि त्या प्रक्रियेवर विश्वास असायला हवा, ज्याच्या मदतीने दुःख दूर करता येईल. ही प्रक्रिया अनेक घटकांवर आणि कारणांवर अवलंबून असते, फक्त माझी इच्छाशक्ती आणि दुःख दूर करण्याच्या माझ्या इच्छेवर अवलंबून नसते.
पीडा आणि दुःखाच्या वेदनेवर केंद्रित संन्यास आणि करुणा
जसे आपण यापूर्वी स्पष्ट केले, संन्यास किंवा करुणा भाव विकसित करण्यासाठी आवश्यक पहिला घटक हा असतो की आपले स्वतःचे दुःख असो वा इतरांचे, त्या दुःखावर केंद्रित असायला हवे. त्या स्थितीत पहिला प्रश्न हा असतो की, हा भाव कोणत्या प्रकारच्या दुःखावर केंद्रित असतो? बुद्धांनी तीन प्रकारची यथार्थ दुःखे नमूद केली आहेत. इथे अधिक विस्तारात न जाता, आपण तीन प्रकारांपैकी पहिल्या प्रकारावर ध्यान केंद्रित करू शकतो तो पीडा आणि दुःख आहे.
पीडा आणि दुःख संपवण्याची इच्छा बाळगणे इतके कठीणही नाही. मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की आपण सर्वांनी हे दंतचिकित्सकाच्या खुर्चीवर बसून अनुभवलं असेल. पण हा फार विचार करण्यासारखा रोचक प्रश्न आहे. जेव्हा आपण एखाद्या दंतचिकित्सकाच्या खुर्चीवर बसलेले असतो आणि दंतचिकित्सक नोवोकेन औषध न देताच आपल्या दातावर ड्रिल फिरवायला लागतात, तेव्हा आपण जी वेदना सहन करत असतो, त्या वेदनेप्रति आपल्या मनात संन्यस्त भाव असतो का? ती आपली चित्तावस्था असते का? मला वाटते की आपल्यातील बहुतांश लोकांच्या मनात भय आणि चिंतेची भावना असते. जिथपर्यंत संन्यस्त भावनेचा संदर्भ आहे, आपले लक्ष आपण अनुभवत असलेल्या पीडेवर केंद्रित असते, पण इथे संन्यस्त भावनेच्या उलट आपण वेदनेला अतिरेकी महत्त्व देतो आणि त्याला राक्षसी रूप देतो. आणि त्या स्थितीत आपले चित्त शांत तर बिलकूलच नसते.
पण समजा आपण या स्थितीकडे संन्यस्त दृष्टिकोनातून पाहिले. तरीही आपले लक्ष ड्रिलिंगमुळे होणाऱ्या वेदनेवरच केंद्रित असेल. ती वेदना संपून जावी, अशी आपली इच्छा असेल. आपण ती वेदना पुरेशी सहन केली असेल आणि आता आपल्याला खात्री असेल की आपण त्यापासून मुक्ती मिळवू शकतो. पण आता इथे एक गमतीशीर गुंतागुंत निर्माण होते. आपल्याला हा बोध प्राप्त होऊ शकतो की आपण सहनशील राहून आणि ती प्रक्रिया संपण्याची वाट पाहून त्या वेदनेतून मुक्त होऊ शकतो. आपण काही आयुष्यभर त्या दंतचिकित्सकाच्या खुर्चीत बसून राहणार नसतो आणि तो आपल्या दातावर ड्रिलिंग करत राहणार नसतो. या स्थितीतही नश्वरतेचा भाव आहे आणि ड्रिलिंगची प्रक्रिया संपणार आहे, आपण फक्त सहनशीलता बाळगण्याची गरज आहे. या विचारामुळे आपले चित्त शांत होऊ शकते आणि आपण आश्वस्त होऊ शकतो की आपण शांत राहिलो आणि खुर्चीत बसून अस्वस्थ किंवा तणावग्रस्त झालो नाही, तर ड्रिलिंगची वेदना संपून जाईल.
दुसरी शक्यता ही असू शकते की आपल्याला हा विश्वास प्राप्त होऊ शकतो की आपण या वेदनेप्रति आपला दृष्टिकोन बदलून तिच्यापासून मुक्ती मिळवू शकतो. याचा संबंध प्रतिकूल स्थितीला सकारात्मक स्थितीत बदलण्यासाठीची चित्त साधना किंवा दृष्टिकोन बदलण्याच्या प्रशिक्षण पद्धतींशी आहे. उदाहरणार्थ, आपण तिबेटमधील किंवा जगभरातील इतर जागांवरील छळणूक होणाऱ्या पीडित लोकांचा विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की आपली वेदना तुलनेने फारच क्षुल्लक आहे. आपल्या वेदनेची सापेक्षता समजून घेतल्यास आपल्या तुलनेने छोट्या वेदनेत स्वतःला शांत ठेवण्यासाठी मदत मिळेल आणि आपल्याला त्याचा फार त्रास होणार नाही. तिथे वेदनेचे अस्तित्व असेलच, पण ती फार महत्त्वाची गोष्ट वाटणार नाही.
या दोन्ही स्थितीत आपण संन्यस्त भावना अनुभवतो. आपण नक्की कोणत्या गोष्टीचा त्याग करत असतो? पृष्ठीय पातळीवर आपण वेदनेचा त्याग करत असतो. पण वेदनेप्रति आपला दृष्टिकोन कसाही असला तरी आपण तत्काळ वेदनेतून मुक्त होऊ शकत नाही, जोवर ड्रिलिंग बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला वेदनेची भौतिक अनुभूती होतच राहते. खरेतर जोपर्यंत दंतचिकित्सक आपले काम पूर्ण करत नाही, तोपर्यंत वेदना होतच राहील, मग भलेही आपण त्याचा त्याग करू किंवा न करू. पण ड्रिलिंगमुळे होणारी वेदना नश्वर आहे आणि त्यापासून आपण लवकरच मुक्त होऊ, याविषयी आश्वस्त होऊन आपण ती सहन करू शकतो. या प्रकारे आपण अधिक सखोलपणे पाहिल्यास आपण त्या दुःखाचा त्याग करत असतो, ज्याची अनुभूती आपल्याला भौतिक वेदना अनुभवताना होते. दृष्टिकोन सुधारून आपण तत्काळ त्या दुःखातून मुक्ती मिळवू शकतो.
जेव्हा दंतचिकित्सकाच्या खुर्चीवर बसल्याच्या अनुभवात भीती आणि चिंतेची भावना जोडली जाते, तेव्हा ती मानसिक अवस्था आपल्याला अधिक दुःख देते. आणि आपली स्थिती आणखी बिघडवते. पण जर आपण वेदनेची नश्वरता किंवा तिच्या सापेक्षतेच्या बोधाच्या साहाय्याने वेदनेबाबतचा आपला दृष्टिकोन बदलला, तर आपण या गोष्टीविषयी आश्वस्त होऊ शकतो की आपल्याला ड्रिलिंगमुळे मानसिक किंवा भावनिक दुःख सहन करावे लागणार नाही.
अशा प्रकारे संन्यासाची साधना केली जाते, जी या बोधावर आधारित असते की आपण नक्की कोणत्या गोष्टीचा त्याग करत आहोत आणि आपण आपला दृष्टिकोन बदलून वास्तवात कोणत्या गोष्टींपासून मुक्त होऊ शकतो. आपण खालील गोष्टींचा त्याग करत असतोः
- एखाद्या भौतिक संवेदनेच्या अनुभूतीशी संबंधित दुःखाच्या अनुभूतीचा,
- वेदनादायी मानसिक आणि भावनिक अवस्थेचा,
- त्या वेदनादायी मानसिक आणि भावनिक अवस्थांशी संबंधित दुःखाच्या अनुभूतीचा.
दृष्टिकोनातील बदल दुःखाच्या अनुभूतीची स्थिती पूर्णतः बदलून टाकतो. आपण याची उदाहरणे त्या महान लामांच्या रूपात पाहिली आहेत, ज्यांचा मृत्यू पाश्चिमात्त्य जगतातील दवाखान्यात कॅन्सरमुळे किंवा एखाद्या अन्य मरणांतिक आजारामुळे झाला आहे. अर्थातच त्यांनी शारीरिक वेदना अनुभवल्या असतील, पण ही गोष्टही निश्चित आहे की त्यांनी दुःखी होण्याच्या आणि त्या वेदनेमुळे भयभीत होण्याच्या भावनेचा त्याग केला आहे. उलट त्यांनी इतरांच्या वेदनेचा, त्यांच्या दुःखाचा आणि विशेषतः वैद्यकीय चिकित्सकांच्या रुग्णांना वाचवता न येण्याबाबतच्या हतबलतेचा विचार करून स्थिती पूर्णतः उलटवली आहे. हे लामा या गोष्टीची विशेष काळजी घेतात की त्यांच्या वैद्यकीय चिकित्सकांच्या भावना काय असतील आणि त्याच प्रकारे त्यांना भेटायला किंवा त्यांच्याप्रति आदर व्यक्त करायला आलेल्या लोकांच्याही भावना काय असतील.
स्वतःच्या आजाराचा मुकाबला करताना त्यांनी अवलंबलेल्या या दृष्टिकोनाचा आधार काय आहे? तो आधार म्हणजे संन्यास आणि करुणा भाव होय. त्या लामांनी स्वतःबाबतच्या आणि त्या स्थितीशी जोडल्या गेलेल्या सर्व व्यक्तिंसंबंधीच्या दृष्टिकोनातून तणाव आणि मानसिक पीडेचा त्याग केला आहे. ते काही फक्त संन्यस्त असल्याची बतावणी करत नाहीत. हे लामा केवळ वरवर असे म्हणत नाहीत की, ‘सगळं ठीक आहे. मी ठीक आहे. काळजी करू नका.’ पण आतून ते ठीक नसतात. तसे असते तर त्यांच्यात अशा प्रकारचा विचारपूर्ण विश्वास नसताः असा दृढ विश्वास जो भय आणि अस्वस्थता दूर करतो, जे या बोधाच्या ज्ञानाने शक्य होते की अमुक एका प्रकारच्या मानसिक घटकाच्या वापराने या स्थितीतील तणाव पूर्णतः संपून जाईल. अर्थात, लामांप्रमाणे आपणही संन्यास आणि करुणेच्या या साधनांशी जितके परिचित होऊ, आपल्यात समग्र रूपात सर्व घटकांसहित संन्यस्त भावना उत्पन्न होईल. ती कृत्रिमरीत्या उत्पन्न करावी लागणार नाही.
कठीण परिस्थितीचं आणखी एक उदाहरण म्हणजे आपली नोकरी जाणे किंवा आपली बचत संपून जाणे. जरी आपल्याला त्या स्थितीत फार वाईट वाटत असले, तरी कोणत्याही व्यक्तीची नोकरी गेल्यास किंवा त्याची बचत संपल्यास त्याला तसेच वाटेल. आपली इच्छा असते की आपण आणि इतरही अनुभवत असलेले दुःख आणि निराशा संपून जावी. संन्यासातून करुणेच्या दिशेने वाटचाल करण्याचा अर्थ हा नाही की आपण आपल्या दुःखाचा त्याग करणे बंद करावे. उलट आपण आपल्या चित्तावस्थेचा इतका विस्तार करतो की स्वतःसोबत आपण इतर सर्वांनाही त्यात सामील करून घेतो.
सामान्य सुखाच्या दुःखावर केंद्रित संन्यास आणि करुणा
तर ती गोष्ट केवळ पीडा आणि दुःखातील वेदनेला लक्ष्य करणाऱ्या संन्यास आणि करुणेबाबत होती. पण आपले सामान्य सुखही समस्याजनक असते. एका प्रकारे ते ही दुःखाचेच एक रूप आहे. इथे दुःखाचा संदर्भ हा आहे की आपले सामान्य सुख कधीच चिरस्थायी नसते; ते कधीच समाधानकारक नसते आणि आपल्याला पुरेसे वाटत नाही. शिवाय ते लगेचच दुःख आणि नैराश्यात परिवर्तित होते. म्हणूनच त्याला ‘परिवर्तनाचे दुःख’ म्हटले जाते. उदाहरणार्थ, आईस्क्रीम खाणे जर सुखाचे यथार्थ कारण असते, तर आपण जितके जास्त आईस्क्रीम खाऊ आपल्याला तितकेच अधिक सुख मिळायला हवे. पण आपण अशा एका अवस्थेत पोहचतो, जिथे आपण जितके अधिक आईस्क्रीम खाऊ, आपली तब्येत बिघडायला लागते. आईस्क्रीमप्रमाणेच आपले सामान्य सुखही परिवर्तनशील आहे आणि आपण दीर्घ काळ सुखी राहू शकत नाही.
थोडक्यात सामान्य सुख निराशाजनक असते. आपल्याला कितीही वाटले की आपले सुख कायम राहावे, पण आपल्याला कधीही माहीत नसते की आपली मनोवस्था कधी बदलेल. शिवाय आपण आपल्या वर्तमान सुखाने आणि पूर्वी लाभलेल्या सुखानेही कधीच संतुष्ट होत नाही. आपल्याला नेहमी अधिकाधिक मिळवण्याची हाव असते. आपण स्वतःला दुःखातून मुक्त करण्याच्या निश्चयासोबतच या दुःखाचाही त्याग करतो.
पण सामान्य सुखाचा त्याग करण्याचा अर्थ नक्की काय आहे? याचा अर्थ असा आहे का की आपण पुन्हा सुखी होऊ इच्छित नाही? आपल्याला हे हवे असते काः आपले सुख असमाधानकारक असते, म्हणून आपल्याला सुखाचा त्याग करायचा असतो का? अशा प्रकारे विचार करणे बौद्ध धारणेचा पूर्णतः चुकीचा अर्थ घेण्यासारखे होईल. सामान्य सुख अस्थायी आहे आणि ते नष्ट होणार हे निश्चित आहे, जसे वेदना आणि दुःखाचे नष्ट होणे निश्चित आहे. पण संन्यस्त अवस्थेत आपण यथार्थाचा स्वीकार करतो आणि सामान्य सुख तोपर्यंतच टिकते, जोपर्यंत आपण त्याच्या परिणामकारतेबद्दल अतिशयोक्तीपूर्ण विचार करत नाही.
अशा प्रकारे आपण आपल्या सामान्य सुखातून उत्पन्न होणाऱ्या दुःखाला नियंत्रित करतो. आपण एका अस्थायी सुखद भावनेच्या रूपात त्याचा आनंद घेतो, पण याची परिपूर्ण जाणीव ठेवतो की ते कायमस्वरूपी टिकणार नाही आणि त्यामुळे आपण निराशही होत नाही. आपण ते चिरकाळ टिकावे, अशी अपेक्षाही करत नाही. पण जोपर्यंत ते असते, तोपर्यंत त्याचा आनंद घेतो. आपण ते चिरस्थायी असेल, असा विचार करून ते अनुभवत नाही, तर ज्या क्षणी ते संपून जाईल, त्या क्षणाचा विचार करून चिंतातूर असतो. लक्षात ठेवा, जेव्हा आपण विचारपूर्वक हा विश्वास बाळगतो की या सुखाचा अंत निश्चित आहे, तेव्हा आपले मन त्या कारणांनी उत्पन्न होणाऱ्या दुःखापासून मुक्त होते.
मी इथे आपल्या नियमित संपर्कात नसलेल्या मित्राचे उदाहरण देऊ इच्छितो. आपला मित्र थोडा वेळ आपल्यासोबत घालवल्यानंतर परत जातो आणि आपण त्या भेटीने संतुष्ट होत नाही. आपल्याला तो आणखी काही काळ आपल्यासोबत राहावा असे वाटत असते. तर त्या भेटीतून आपल्याला अशा कोणत्या गोष्टीची अपेक्षा होती, जी न मिळाल्याने आपल्याला असंतुष्ट वाटत राहते? आपण खरेच अशी अपेक्षा करत होतो का की त्या व्यक्तीच्या सहवासाने आपण अखेर सुखी होऊ आणि आपल्याला आपल्या एकटेपणातून किंवा असुरक्षिततेच्या भावनेतून कायमस्वरूपी मुक्ती मिळेल? जर ती किंवा तो पाच मिनिटे जास्त थांबला असता, तर आपले समाधान झाले असते का?
आपली अपेक्षा पूर्ण न झाल्याने आपण असंतुष्ट राहिलो, पण मुळात आपली अपेक्षाच अव्यावहारिक होती. आपली अपेक्षाच अशक्य होती. दुसरीकडे आपण एखाद्या चमत्काराची अपेक्षा ठेवत नसू, तर जे काही घडते, त्यात आपण पूर्ण समाधानी असतो. हाच यथार्थाचा स्वीकार असतो. आपण त्या व्यक्तीची भेट, तिच्यासोबतचे भोजन, तिची जवळीक या गोष्टींचा आनंद घेतो. आपल्याला जाणीव असते की त्यातून आपले दुःख किंवा एकटेपण किंवा भूक कायमस्वरूपी संपणार नाही; पण आपण ती अपेक्षाही ठेवत नाही. आपण आपल्या मित्राच्या भेटीबाबत अतिशयोक्तीपूर्ण वागत नाही; त्याच्या भेटीबाबत आपल्याला स्पष्ट बोध झालेला असतो आणि त्याच्या जाण्याने आपण दुःखी किंवा निराश होत नाही. आपण ते जसं आहे, तेवढ्यातच त्याचा आनंद मानतो आणि ते संपेल, तेव्हा मोकळ्या मनाने ते संपल्याचे मान्य करतो.
एकदा का आपण स्वतः आपल्या सामान्य सुखातून उत्पन्न होणाऱ्या समस्यांचा त्याग केला, तर आपण इतरांच्या सामान्य सुखाबाबत त्या भावनेचा विस्तार कशा रीतीने करू शकू? अर्थात, जेव्हा आपण इतरांच्या सामान्य सुखांसंबंधित दुःखांवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपण विचारशील असणे फार गरजेचे आहे. निश्चितच इथे अशी स्थिती नसते की आपण सुखी नाही, पण इतर सुखी आहेत, म्हणून आपण त्यांच्याविषयी ईर्ष्येची भावना बाळगू. पण आपल्याला या गोष्टीची जाणीव झालेली असते की त्या व्यक्तींचे सुख त्यांनाही संतुष्ट करणार नसते. उलट आपल्याला जाणीव झालेली असते की ती व्यक्ती त्याच्या मित्रासोबतच्या नात्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवत आहे किंवा काहीही घडले तरी शेवटी ते निराश आणि दुःखी होणार आहेत. आपल्याला त्या समस्येची जाणीव होते. असे नसते की आपल्याला ते सुखी झालेले नको असते. आपले लक्ष त्या दुःख किंवा समस्येवर केंद्रित असते, जे त्या व्यक्तीच्या सामान्य सुखाची अनुभूती घेण्याच्या पद्धतीमुळे निर्माण होते.
इथे सुख आणि सुखाशी संबंधित समस्यांमधील फरक ओळखता आल्याने आपल्याला इतरांकडून अनुभवल्या जात असलेल्या सुखातून आनंद प्राप्त करण्याची योग्यता प्राप्त होते. बौद्ध शिकवणींमध्ये आनंदावर विशेष भर देण्यात आला आहे. आपण इतरांच्या सामान्य सुखातून आनंदित होतो, पण व्यावहारिक दृष्टिकोनातून आपल्याला सामान्य सुखांमधील दोषांची जाणीव होते आणि त्या व्यक्तीपुढे निर्माण होणाऱ्या संभाव्य समस्यांप्रति आपल्या मनात करुणा भाव निर्माण होतो. आणि हे सामान्य सुख सांसारिक असले तरी आपण त्याचा आनंद घेऊ शकतो.
सर्वव्यापी दुःखावर केंद्रित संन्यास आणि करुणा
बुद्धांनी ‘सर्वव्यापी दुःख’ दुःखाचे सर्वात गहनतम स्वरूप असल्याचे सांगितले आहे. याचा संबंध अनियंत्रित रीतीने वारंवार उद्भवणाऱ्या पुनर्जन्माशी, ज्याला ‘संसार’ संबोधले जाते, त्याच्याशी आहे, जो पहिल्या दोन दुःखांच्या अनुभूतीचा आधार आहे. हे त्या दुःखाचे स्वरूप आहे, ज्याविषयी बुद्धांनी चार आर्य सत्यांच्या सादरीकरणात विशेषतः स्पष्ट केले आहे. आपण सातत्याने कोणत्या ना कोणत्या रूपातील ‘दूषित’ शरीर धारण करतो, ज्याला जन्म घेण्याच्या संपूर्ण प्रक्रियेतून जावे लागते, त्याला प्रत्येक वेळी नव्याने चालायला शिकावे लागते आणि पुन्हापुन्हा त्याच गोष्टी शिकाव्या लागतात, ज्याला सहज इजा पोहचू शकते, जे वारंवार आजारी पडते, त्याच्या क्षमता हरवून बसते आणि मरण पावते. आणि आपले मनही ‘दूषित’ असेल, कोणत्या ना कोणत्या भ्रमात असेल आणि अनेक प्रकारच्या कल्पना रंगवत बसेल, विचित्र विचार करत बसेल आणि त्याच्या मनोवस्थांमध्ये वारंवार चढउतार असेल.
आपण गुंतागुंतीच्या नात्यांमध्ये अडकत राहू, ज्यातून आपल्याला कधीच समाधान लाभणार नाही. आपल्याला जे घडू नये असे वाटत असेल, अशा गोष्टी आपल्याबाबत घडत राहतील. प्रत्येक वेळी आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळेलच असे नाही. आणि उलट आपण आपल्या आवडत्या गोष्टींपासून दूर जात राहू आणि आपल्या नावडीच्या गोष्टी जीवनात येत राहतील. जेव्हा इतर लोक असेतसे वागू लागले की आपल्याला ते आवडत नाही, आपण आपल्या मार्गानेही जाऊ शकत नाही. आपण वैतागतो; आपल्याला हवी ती गोष्ट, जसे चांगली नोकरी, चांगला सहचर किंवा आणखी काही मिळवण्यासाठी आपण कितीही कष्ट घेतले तरी ती गोष्ट आपल्याला मिळत नाही. इथे कसलीच निश्चितता नसेल, फक्त भविष्याबद्दलच नव्हे, तर पुढील क्षणी आपण काय अनुभवत असू याबाबतही निश्चितता नाही.
आपल्याला वारंवार आपले वर्तमान शरीर आणि जीवनाचा त्याग करावा लागेल आणि पुन्हा एकदा पुनर्जन्माच्या फेऱ्यातून जात सर्व काही नव्याने शिकावे लागेल, पुन्हा एकदा मित्र बनवावे लागतील आणि अशाच इतर गोष्टी कराव्या लागतील. आणि अर्थातच इथे पुन्हा मानवी पुनर्जन्म मिळेल, याचीही शाश्वती देता येणार नाही. आपला झुरळ किंवा त्याहूनही निम्नतर स्तरावर पुनर्जन्म होऊ शकतो. संन्यस्त अवस्थेत आपण निश्चय करतो की हे आता पुरे झाले.
या स्तरावरील संन्यासाशी जोडलेल्या मनोवस्थेविषयी विचार करणे गमतीशीर आहे. मला वाटते की यात अनियंत्रितपणे वारंवार सांसारिक पुनर्जन्म घेण्यामुळे आलेली कंटाळ्याची भावनाही असते. कारण आपण सांसारिक जीवन कसे असावे, याबाबत अतिशयोक्तीपूर्ण विचार करू शकत नाही आणि त्या अर्थाने त्याकडे आकर्षितही होत नाही. आपल्याला त्यात रस राहत नाहीः ते कायम एकसारखेच पुन्हापुन्हा जन्म घेणे असते.
जीवनात पुन्हापुन्हा उद्भवणाऱ्या समस्यांचा आपल्याला मोह नसेल आणि खरेतर आपल्याला त्याचा उबग आला असेल, तर असे होत नाही की त्याच्या परिणामस्वरूप जे काही घडेल त्याच्याविषयी आपल्याला काहीच वाटणार नाही. असे नाही की आपण ‘जे होईल ते होईल’ असा दृष्टिकोन बाळगतो. उलट आपल्याला हा बोध होतो की अनियंत्रित रीत्या वारंवार होणाऱ्या पुनर्जन्माच्या व्यापक प्रश्नाला आपल्या तणावदायी भावना, तणावदायी दृष्टिकोन आणि त्याच्या प्रभावाखाली घडणारे बंधनकारक वर्तन कारणीभूत असते. त्याहूनही अधिक आपल्याला बोध होतो की या दुःखाचे यथार्थ कारण अज्ञान आणि आपली अशांत मनोवस्था व बंधनकारक व्यवहारामागे दडलेले भ्रम आहे. स्वतःला त्यातून मुक्त करण्याचा आपला दृढ निश्चय असतो.
संसारातून मुक्त होण्याचा दृढ निश्चयच ‘वास्तव’ गोष्ट आहे, तोच संन्यासाचा गहनतम स्तर आहे. याशिवाय, आपल्याला हा विश्वास प्राप्त होतो की सांसारिक पुनर्जन्माच्या या भयानक साखळीला आपण तोडू शकतो. परिणामी आपले मन या गोष्टीने अस्वस्थ होत नाही की आपण त्या अवस्थेत आहोत, आपले मन अधिक निर्मळ आणि स्वच्छ असते. स्वतःच्या मुक्तीसाठी प्रयत्न करण्याचा आपला दृढ संकल्प असतो. आणि आपल्याला माहिती असते की असे करण्यासाठी काय करायला हवे आणि ते साध्य करणे आपल्याला शक्य असल्याचाही आपल्याला विश्वास असतो. जेव्हा आपण संसारातून मुक्त होण्याचा आपला दृढ संकल्प केवळ स्वतःवर केंद्रित न ठेवता इतर सर्व लोकांवर समरूपात केंद्रित करतो, तेव्हा को ‘महाकरुणे’चे रूप धारण करतो.
संन्यस्त भाव विकसित करतेवेळी टाळावे लागणारे धोके
ज्ञानप्राप्तीचे श्रेणीबद्ध स्तर असणाऱ्या लाम-रिमच्या तीन स्तरीय प्रेरणेच्या संदर्भातून संन्यास आणि करुणा या संकल्पना मांडण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना या संदर्भातून पाहिल्यास त्या दोन भावनांना विकसित करताना येणारे संभाव्य धोके आपण पडताळून पाहू शकतो. प्रारंभिक स्तरावरील प्रेरणेत आपण आपल्या भविष्यातील जन्म सुधारण्यासाठी प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्याला अनमोल मानवी पुनर्जन्म पुन्हा लाभेल आणि ज्ञानप्राप्तीच्या आध्यात्मिक मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी संधी प्राप्त होईल. प्रेरणेचा हा प्रारंभिक स्तर विकसित करतेवेळी या गोष्टीचा धोका असू शकतो की आपल्याला अनमोल मानवी पुनर्जन्माबाबत खूप सहज आसक्ती निर्माण होऊ शकते. आपल्याला वाटते की ‘मला पुनर्जन्म घ्यायला आहे आणि माझ्या मित्र व आप्तेष्टांसोबत पुन्हा एकत्र यायचे आहे, आणि मला धनसंपत्ती व समाधान अनुभवायचे आहे.’ अशा प्रकारे चांगल्या पुनर्जन्मासाठीचा आपला प्रयत्न आसक्तसोबत मिसळून जाऊ शकतो. असे होते तेव्हा आपण अनमोल मानवी पुनर्जन्माच्या वैशिष्ट्यांना अतिशयोक्तीच्या रूपात पाहत असतो. तृष्णा आणि आसक्ती या दोन्ही भावना शेवटी एखाद्या गोष्टीला अतिरेकी महत्त्व देण्यातूनच उत्पन्न होतात. तृष्णेमध्ये ‘मला एखादी गोष्ट हवीच आहे’ असा आपण विचार करतो, तर आसक्तीमध्ये ‘मला हे हातून जाऊ द्यायचे नाही’ असा विचार करतो.
संन्यस्त भाव विकसित करण्यातील धोका हा आसक्तीच्या धोक्यासारखाच असतो, पण तो घृणेच्या रूपात असतो. अनमोल पुनर्जन्माबाबतच्या चांगल्या गुणांच्या अतिशयोक्तीपूर्ण भावनेतून येणाऱ्या आकर्षणापेक्षा, संन्यस्त भावात सांसारिक अस्तित्वाच्या नकारात्मक गुणांचा अतिशयोक्तीपूर्ण भाव उत्पन्न होण्याचा धोका असतो. त्या अतिशयोक्तीपूर्ण भावनेमुळे आपल्यात घृणेची भावना निर्माण होते, आणि ती त्या घृणाभावाकडे घेऊन जाते, ज्याविषयी आपण पूर्वी चर्चा केली आहे. तिरस्कार आणि घृणा या भावना जवळपास सारख्या भावना आहेत.
जेव्हा आपण संन्यस्त भाव विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असतो, तेव्हा मध्यवर्ती स्तरावरील प्रेरणेचा अभ्यासक होण्याच्या संदर्भातून आपण प्रयत्नशील असतो, विशेषतः जो अनियंत्रित पुनर्जन्माच्या चक्रातून, अर्थात संसारातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे सोपे काम नाही. इथे आपण संसारातील कमतरता किंवा त्रुटींवर लक्ष केंद्रित करतो, विशेषतः ज्याला ‘मनाला धर्माच्या दिशेने नेणाऱे चार विचार’ संबोधले जाते. आपण सदासर्वकाळ संसारातील दोषांचा विचार करण्याचा प्रयत्न करतो.
जेव्हा आपण त्यावर प्रत्यक्ष अंमल करू लागतो, तेव्हा आपल्या जीवनातील सर्व अनुभूतींमध्ये संसारातील दोष शोधू लागतो. हे आपल्या भावना आणि जीवनानुभवांवर तीव्र प्रभाव करणारे ठरू शकते. आपण ज्या कोणत्या अवस्थेत असू, आपल्याला मनात सर्व प्रथम दुःखाचा विचार येईल. उदाहरणार्थ, आपण एखाद्याला भेटू आणि आपल्याला त्याच्याविषयी थोडे आकर्षणही वाटेल, पण आपण लगेचच त्यातून निर्माण होणाऱ्या ‘दुःखाचा’ विचार करू. आपल्याला नवी नोकरी मिळेल आणि आपण विचार करू की, ‘पुन्हा दुःखः हे फारच वाईट होईल.’ काहीही होवो आपल्या मनात ‘दुःख’ भरलेले असेल. टेलिफोनची बेल वाजली, ‘दुःख’. आपण शावर घ्यायला जाऊ, तर मनात विचार येईल, ‘दुःखः हे संपून जाईल. मला आणखी काही काळाने पुन्हा दुसऱ्या शावरची गरज पडेल. हे फारच कंटाळवाणे आहे.’ अशा रीतीने फार सहजगत्या जीवनाबद्दल नकारात्मक भाव विकसित होईलः आपण जे काही अनुभवत असू त्या बद्दलही आणि विशेषतः लोकांबद्दलही. आपण नवा संगणक खरेदी केला, ‘दुःखः हा तुटून जाईल. यात व्हायरस येईल.’ आपला मित्र भेटायला येईल आणि आपल्या मनात पहिली भावना येईल की आपल्याला मिळालेला वेळ किती असमाधानकारक आहे. आपण कोणत्याच गोष्टीचा आनंद घेऊ शकणार नाही. प्रत्येक गोष्ट मूर्खपणाची आणि भयंकर आहे, अशा प्रकारचा नकारात्मक दृष्टिकोन आपल्याला नैराश्यात ढकलू शकतो.
संन्यास आणि करुणेला आनंदाची जोड देणे
नकारात्मकता आणि नैराश्याची ही भावना आपण कशा रीतीने नियंत्रित करु शकतो? ‘जीवनाच्या सौंदर्यांचा आनंद लुटा’ एवढे म्हणणे पुरेसे आहे का? इथे आपल्याला फार काळजी घेण्याची गरज आहे. जीवनाचा आनंद लुटणे, हे जीवनातील दुःखाबाबत अनभिज्ञ असणे असते का? हे संन्यस्तभावाच्या विरूद्ध आहे का? त्याला करुणाभावात परिवर्तित कराः इथे आपण विचार करतो की, ‘किती वाईट गोष्ट आहे की प्रत्येक जण दुःख भोगत आहे, किती भयंकर आहे हे.’ ही दुःखाची भावना एखाद्या व्यक्तीच्या भेटीशी जोडल्याने आपल्याला असे म्हणायचे असते का की ‘मी तुझ्या दुःखामुळे आनंदी आहे?’ अर्थातच असे अजिबात नसते. तर आनंद आणि प्रसन्नतेचा भाव संन्यास आणि करुणाभावाशी कसा जोडला जाऊ शकतो?
जेव्हा आपण स्वतः आपल्या जीवनात आनंद शोधू लागतो किंवा इतरांच्या भेटींमधून आनंद शोधू लागतो आणि त्यांच्या जीवनातून आनंदाचा शोध घेऊ लागतो, तेव्हा आपण एखाद्या अशा गोष्टीवर ध्यान केंद्रित करत असतो, जी आपल्या संन्यास आणि करुणाभावाहून भिन्न असते. आपण आनंदपूर्वक दुसऱ्या लोकांच्या बुद्ध स्वरूपाच्या क्षमता आणि आध्यात्मिक प्रगतीच्या त्या संधींवर लक्ष केंद्रित करत असतो, ज्या आपल्या जीवनाने आपल्याला दिलेल्या असतात. आपल्या सर्वांमध्ये बुद्धत्व प्राप्त करण्याच्या क्षमता असतात आणि ही स्वतःच एक आनंनदायी बाब आहे. हाच आनंदाचा स्रोत आहे. आपण आनंदपूर्वक स्वतःच्या किंवा दुसऱ्यांच्या दुःखमय प्रकृतीवर लक्ष केंद्रित करत नसतो.
उदाहरणार्थ, संन्यस्त भावात आपण स्वतःकडे आणि स्वतःच्या जीवनाकडे तटस्थपणे पाहतो आणि त्यातील दुःखाचा शोध घेऊन त्याचा स्वीकार करतो. ते दुःखमय असले तरी आपण निराश होत नाही. किंवा आपण ‘जे काही असेल ते असेल’ असा दृष्टिकोन बाळगत नाही, जो वास्तविकतः असाहाय्यतेचा आणि आशाहीनतेचा भाव असतो. उलट संन्यस्त भावात आपण आश्वस्त असतो की आपण स्वतःला दुःखातून मुक्त करू शकतो. आपला दृढसंकल्प असतो आणि निश्चित दृष्टिकोन असतो की आपण ही असह्य स्थिती बदलू शकतो, आपल्याला माहीत असते की आपण ते साध्य करू शकतो आणि त्यातून मुक्त होऊ शकतो. अशा स्वरूपाचा विचार आपल्याला आनंदी करतो, हो ना?
तरीही, आनंद आणि संन्यस्त भाव किंवा करुणा या दोन चित्तावस्था एकत्रित करणे फार नाजूक काम आहे. त्या एकाच वेळी घटित होतात का, की यातील एखादी अवस्था दुसऱ्यात अंतर्भूत असते? का त्या एकामागोमाग उत्पन्न होतात, जसे टाँग्लेन अभ्यासात केले जाते, जिथे दुःख देऊन सुख घेण्याविषयी चर्चा केली जाते? वास्तवात त्यांना आपण आपल्या प्रत्यक्ष जीवनात कशा रीतीने एकत्र आणू शकतो- प्रामाणिक संन्यस्त भाव, पण निराशा किंवा इतरांना मूर्ख किंवा अर्थहीन समजण्याच्या नकारात्मक भावनेशिवाय? मला वाटते संन्यस्त भाव किंवा करुणा आणि आनंद, जो आपण आपल्या किंवा इतरांच्या जीवनाच्या संदर्भातून पाहतो, हे दोन्ही विभिन्न दृष्टिकोन आहेत. पण प्रत्येकाने स्वतः हे पडताळून पाहायला हवे.
संन्यासाचा अर्थ इतरांशी संवाद टाळण्याशी संबंधित नाही
त करण्यात यशस्वी झालो, जेणेकरून आपण आपल्या सांसारिक अस्तित्वाशी जोडलेल्या गोष्टींकडे आकर्षित होणार नाही. समजा त्यानंतर आपण या निष्कर्षापत आलो की कोणत्याही प्रकारचा सांसारिक संबंध आपल्यासाठी दुःखाचे कारण ठरणार आहे आणि म्हणून आपण भिक्षु किंवा भिक्षुणी होऊन मठीय जीवन स्वीकारण्याचा निर्णय घेतला. जरी आपण असा निश्चय केला, तरी आपल्याला ही काळजी घ्यावी लागते की आपण सामान्य दृष्टिकोनातून इतर लोकांप्रति तिरस्काराची भावना बाळगू नये कारण तो त्यांच्याप्रति करुणा भाव बाळगतानाचा प्रमुख अडथळा बनतो. तेव्हा आपण अशा विचारांपाशी येऊन थांबू शकतो की, ‘तू म्हणजे निव्वळ संकट आहेस.’ यातून कोणासोबतच संबंध न ठेवण्याची सवय पडू शकते. जर आपण करुणाशील व्यक्ती बनू इच्छित असू, तर आपल्याला इतरांसोबत जोडलं जायला हवं आणि त्यांना गरज असेल तेव्हा त्यांची मदत करायला हवी.
अशा प्रकारे इतरांप्रति तिटकारा किंवा उदासीन भाव ठेवणे संन्यस्त भाव विकसित करण्यातील सर्वात मोठा अडथळा ठरू शकते. जेव्हा आपण एखाद्याला भेटू, तेव्हा आपल्याला कदाचित असे वाटेल की, ‘ही व्यक्तीच समस्या ठरेल. त्यामुळे तिच्यासोबत संबंध ठेवल्यास माझ्यासाठी दुःख आणि समस्याच निर्माण होतील. हा काही माझा सल्ला ऐकणार नाही, हा माझ्यासाठी परिस्थिती कठीण करून ठेवेल.’ आपल्याला अशा विचारांपासून स्वतःला दूर ठेवायला हवे.
संन्यस्त भाव विकसित करतेवेळी आपण स्वतः आपल्या दुःखांना दोन दृष्टिकोनातून पाहायला हवे. पहिला आपण आपल्या दुःखांना असह्य मानतो आणि त्यातून मुक्ती मिळवण्याचा संकल्प करतो. या शिवाय आपल्यातील बुद्ध-स्वरूप बनण्याच्या क्षमतांची आपल्याला जाणीव होते, ज्या आपल्याला दुःखापासून मुक्ती मिळवून देत मुक्त होण्यासाठी आणि अगदी बुद्ध होण्यासाठीच्या आधारभूत क्षमता असतात. आपल्या सर्व दुःखातून मुक्त होण्याच्या क्षमतांची जाणीव आपल्या जीवनातील आनंद नाकारत नाही, उलट आपल्याला आनंदाने परिपूर्ण करते. त्यामुळेच हा आनंद आपला संन्यस्त भाव, अर्थात आपल्या मुक्त होण्याच्या निश्चयाच्या विरोधात नाही. उलट हा आनंद आपल्या संन्यस्त भावाला अधिक प्रबळ करतो. त्यामुळे ‘जे असेल ते असेल’ सारख्या उदासीन दृष्टिकोनातून आपण स्वतःकडे दुर्लक्ष करत नाही आणि स्वतःला मुक्त करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याकडे दुर्लक्ष करत नाही, उलट आपण विशेष काळजी घेतो आणि एक प्रकारे स्वतःप्रति करुणाभाव बाळगतो.
इतर सर्वांप्रति करुणा भाव विकसित करण्यासाठी सुद्धा हेच विश्लेषण लागू होते. आपण त्यांच्यासाठी कामना करतो की ते त्यांच्या दुःखातून मुक्त व्हावेत आणि या गोष्टीने आनंदित व्हावेत की तेही आपल्या बुद्धस्वरूपाच्या आधारे मुक्त होऊ शकतात. अर्थात, आपली इच्छा असते की त्यांचे दुःख दूर व्हावे, पण आपल्याला त्या लोकांचीही काळजी असते, जे दुःख भोगत असतात आणि त्या दुःखातून बाहेर पडू इच्छित नसतात.
आपण हा दृष्टिकोन सर्वप्रथम स्वतःला लागू करतो. ‘माझी इच्छा आहे की माझी दुःखं दूर व्हावीत, पण असे नाही की मी स्वतःला उद्ध्वस्त करून घेऊ इच्छितो. माझा अस्वीकाराचा नकारात्मक दृष्टिकोन दुःखावर केंद्रित आहे, एक व्यक्ती म्हणून स्वतःवर केंद्रित नाही.’ या दोन्हीबाबत संभ्रमित होण्याची आणि आपण असा विचार करण्याची फार शक्यता असते की, ‘माझ्या दुःखांपासून मुक्त होण्यासाठी मी आत्महत्या करेन.’ जेव्हा स्वतःबाबतचा हा भेद स्पष्ट होतो, तेव्हा त्याच पद्धतीने आपण करुणेने प्रेरित होऊन विचार करू शकतो की, ‘माझी इच्छा आहे की तुझे दुःख दूर व्हावे, पण माझी अशी इच्छा नाही की तूच निघून जावेस.’
हा फरक ओळखणे सोपे नाही. तसेच जसे दोषपूर्ण संन्यस्त भावातून मुक्त होणे सोपे नसते, ज्याच्यामुळे आपल्याला लोकांबद्दल तिरस्कार वाटतो आणि आपण असा विचार करून लोकांशी संबंध ठेवण्यापासून लांब राहतो की, ‘मला एकट्याला राहू द्या. मी फक्त माझ्या गुफेत किंवा मठात जाऊन ध्यानधारणा करू इच्छितो.’ भलेही आपल्या अशांतकारी भावना इतक्या प्रबळ असतील की इतरांची मदत करण्याच्या आपल्या क्षमतेला गंभीर बाधा पोहचवतील आणि भलेही त्या भावना सुधारण्यासाठी आपल्याला एकांतवासातील ध्यानधारणेची आवश्यकता असेल, तरीही आपण इतरांप्रति किंवा स्वतःप्रतिही नकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यापासून किंवा करुणाहीन होण्यापासून स्वतःचा बचाव करायला हवा.
लोक आणि त्यांच्या दुःखाच्या अनुभूतीमधील परस्परसंबंध
आपण नकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या या समस्येपासून स्वतःचा बचाव करू शकतो. त्यासाठी आपल्याला, मी ज्याला मी ‘धर्म लाइट’ म्हणतो, त्याच्या कक्षेपासून पुढे जायला हवे आणि यथार्थ धर्म किंवा ‘रियल थिंग धर्मा’च्या दृष्टिकोनातून विश्लेषण करायला हवे. धर्म-लाइट फक्त वर्तमान जीवनातील पद्धतींशी संबंधित आहे, तर यथार्थ धर्म पूर्व जन्म आणि भविष्यातील जन्मांच्या स्वीकारावर अवलंबून आहे.
आपल्या जीवनातील सर्व क्षणांच्या सातत्यावर आपला जीवनकाळ आरोपित होतो. आपला जीवनकाळ केवळ एखाद्या क्षणाच्या संबंधातून ओळखला जात नाही, किंवा तो यापैकी कोणत्याही क्षणापासून स्वतंत्र अस्तित्व नसतो. पुढे जाऊन आपण असेही म्हणू शकत नाही की आपला जीवनकाळ सर्व क्षणांच्या बेरजेशी संबंधित असतो, कारण आपल्या जीवनकाळातील सर्व क्षण एकाच वेळी घडत नसतात. जेव्हा आपण मोठो होतो, आपले बालपण संपलेले असते. आपला जीवनकाळ फक्त एका सातत्यावर आरोपित असतो.
यथार्थ धर्मानुसार व्यक्तीही अशाच एखाद्या मानसिक सातत्यावर आरोपित होत असते. पण ज्या मानसिक सातत्यावर ती आरोपित होत असते, ते सातत्य केवळ वर्तमान जीवनकाळापुरते सीमित नसते. ते अनादी अनंत असते. तसेच व्यक्तीही मानसिक सातत्याच्या एखाद्या अशा क्षणाशी समरूप नसते, ज्यावर ती आरोपित होते, किंवा ती सातत्याहून स्वतंत्र रूपात अस्तित्वातही नसते. शिवाय ती व्यक्ती पूर्ण सातत्याशी अशा प्रकारे समरूप नसते, जणू पूर्ण सातत्य एकाच वेळी घटित होत असावे.
मानसिक सातत्याच्या कोणत्याही गुणावर आरोपित कोणत्याही व्यक्तीविषयी हे विश्लेषण लागू होते. संन्यास आणि करुणेच्या संदर्भात मानसिक सातत्याचा हा गुण सर्वव्यापी दुःखाशी संबंधित असतो. आपल्या अस्तित्वादरम्यान संबंधित व्यक्ती दुःखाची अनुभूती घेते, पण ती ज्या मानसिक सातत्यावर आरोपित असते, त्यावर घटित होणाऱ्या दुःखाच्या कोणत्याही विशिष्ट स्थितीशी ती समरूप नसते. किंवा ती त्या सर्वव्यापी दुःखाशीही समरूप नसते, जे अनादी काळापासून तिच्या मानसिक सातत्यात घटित होत आहे. जेव्हा आपण या तथ्यांचा बोध प्राप्त करतो, तेव्हा आपण स्वतः ‘मी’ किंवा अन्य कुणाला त्याच्याद्वारे अनुभवल्या जाणाऱ्या दुःखाच्या संदर्भातून ओळखत नाही. ‘मी’ किंवा ‘तू’ म्हणजेच दुःख असा गोंधळ घातला न गेल्याने आणि त्यांची ओळख पटल्याच्या विचारानंतर, आपण दुःख निघून जावे अशी कामना ठेवतो, ‘मी’ किंवा ‘तू’ निघून जावे, असे आपल्याला वाटत नाही.
अशा रीतीने आपल्याला स्वतःतल्या आणि इतरांच्या ‘मी’ची स्पष्ट ओळख होते. आपल्या मानसिक सातत्यातून दुःख आणि त्याच्या कारणांना कायमस्वरूपी संपवता येते, पण त्या दुःखाची अनुभूती घेणाऱ्या व्यक्तींचे अस्तित्व संपवता येत नाही. ज्या रीतीने मानसिक सातत्याला अंत नसतो, त्याच रीतीने मानसिक सातत्यावर आरोपित व्यक्ती, ज्यात प्रत्येकाचा ‘मी’ समाविष्ट असतो, त्यालाही अंत नसतो.
जर आपण मानसिक सातत्याची सहज शुद्धता आणि दुःख व त्याच्या कारणांना कायमस्वरूपी संपविणे शक्य असल्याची बाब समजू शकलो, तर आपल्याला याचीही काळजी घ्यायला हवी की ‘मी’ला सुद्धा शुद्ध मानसिक सातत्य समजू नये. अन्यथा आपल्याला दुःखाचे ज्ञान होणार नाही आणि आपण ते संपवण्याचा निश्चय गांभीर्याने घेणार नाही कारण आपल्याला असे वाटेल की दुःखाचे वास्तवात अस्तित्वच नाही.
टाँग्लेन साधनेतील दुःख घेऊन सुख देण्यासंबंधीचे स्थित्यंतर
जेव्हा आपण इतरांच्या किंवा स्वतःच्याही दुःखाचा विचार करतो, तेव्हा ते विषाद उत्पन्न करणारे असते. निश्चितच आपल्याला आपण किंवा आणखी कुणी दुःख भोगत असल्याबद्दल आनंदी वाटत नाही. जे घडत असते त्याबद्दल आपल्याला वाईट वाटते. टाँग्लेन, अर्थात देवाणघेवाणीच्या शिकवणुकीत आपण इतरांच्या दुःखावर किंवा स्वतःच्या दुःखावरही लक्ष केंद्रित करत असतो आणि अर्थातच त्यामुळे आपल्याला वाईट वाटते. असे नसते की आपल्याला काहीच वाटत नाही, जसे दुःख अवास्तविक आहे आणि त्यामुळे इजा होत नाही. त्यानंतर आपण दुःख ग्रहण करण्याची कल्पना करतो, आपण स्वेच्छेने स्वतः ते अनुभव करणे स्वीकारतो. त्यानंतर आपण स्वतःला किंवा इतरांना प्रेमभावना अर्पण करतो, अर्थात सुखी होण्याची कामना देतो. अशा रीतीने आपण स्वतः स्वीकारलेल्या दुःखाच्या भावनेतून इतरांना आनंदी करण्यासाठी पाठविलेल्या कामनेकडे स्थित्यंतर करतो.
टाँग्लेन साधना करतेवेळी दुःख अनुभव करतानाच सुखाची अनुभूती घेण्याचे हे स्थित्यंतर अनेक लोकांसाठी बाधक सिद्ध होते. आपण दुःखाच्या भावनेला अचानक सुखी होण्याच्या भावनेत कसे परिवर्तित करू शकतो? शेवटी हे दोन्ही भाव परस्पर भिन्न आहेत. आपण अशाच पद्धतीची समस्या, जेव्हा आपण संन्यासासोबत दुःखावर लक्ष केंद्रित कसे करायचे आणि नैराश्य येऊ न देता जीवन आणि त्यापासून मुक्तीच्या शक्यतांचा आनंद कसा साजरा करावा, याबाबत जी चर्चा केली होती, त्यावेळी पाहिली होती. हा विषयही तसाच आहे.
एखाद्या आजारी नातलगाला किंवा मित्राला भेटायला गेल्यावर आपल्याला दुःखाला सुखासोबत संतुलित करण्याच्या योग्यतेचे महत्त्व समजू शकते. त्याच्या आजारपणामुळे आपल्याला दुःख होते. पण आपल्या प्रियजनांना भेटायला गेल्यावर आपण दुःखी किंवा उदास झालो, तर त्याचा त्या व्यक्तीला काहीच लाभ होणार नाही. आपल्या आजारी नातलगाला किंवा मित्राला आपण धीर द्यायला हवा. पण त्या स्थितीत आपण आनंदी भावना कशी विकसित करू शकू? असा आनंद कृत्रिम असतो का? आपण आपले अंतर्मन भयंकर दुःखी असताना चेहऱ्यावर ओढूनताणून हसू आणतो का?
इथे दुःखातून प्रसन्नतेच्या दिशेने स्थित्यंतर करण्यासाठी आपण ‘महामुद्रा’ अर्थात ‘चित्त मुद्रांकन प्रकृति’संबंधीच्या उन्नत साधनेचा उपयोग करू शकतो. सर्वप्रथम जेव्हा आपण इतरांचे किंवा स्वतःचे दुःख ग्रहण करतो, तेव्हा आपण स्वेच्छेने दुःखाचा स्वीकार करतो. जेव्हा आपण हे कार्य निष्ठेने करतो, तर त्यातून आपल्याला आत्मविश्वास आणि बळ मिळते. आपल्या मनात मी गरीब बिचारा, मी दुःख भोगत आहे, अशा स्वरूपाची तथाकथित ‘पीडित मानसिकता’ डोकावत नाही.
महामुद्रा पद्धतीत आपण दुःखातून उत्पन्न होणाऱ्या उदासीनतेला मनाच्या सागरात उठणाऱ्या लाटांच्या वरच्या स्तरासारखे समजतो. स्वेच्छेने दुःखाचा स्वीकार केल्याने मिळालेल्या आंतरिक बळामुळे ती लाट आपल्याला उचलून फेकत नाही. आपण शांतचित्ताने त्या लाटेला ओसरू देतो. एकदा का ती लाट सहज रीत्या स्थिर झाली, की आपण मनाच्या अंगभूत आनंदापर्यंत पोहचतो. तो स्वाभाविकपणे आपल्या हृद्यातून स्वतःच चमकतो आणि टाँग्लेन अभ्यासात आपण हेच दुसऱ्यांना देत असतो किंवा आपण स्वतः त्याची अनुभूती घेत असतो.
मनाच्या या नैसर्गिक आनंदात काहीही अशांत किंवा तणावदायी नसते. आपण आपल्या आनंदाच्या घोषणा देत फिरत नाही किंवा त्याचा देखावाही करत नाही, ‘किती वाईट गोष्ट आहे की तू आजारी आहेस, मला तुझ्याबद्दल वाईट वाटते, पण मी माझ्या जीवनात आनंदी आहे. माझे तर सर्व काही सुरळीत सुरू आहे.’ आपला निश्चिंत, सहज आनंद इतरांना आणि स्वतः आपल्यालाही समाधानाचा अनुभव देतो.
संन्यस्त भाव आणि करुणा विकसित करण्याचा आधार
आपल्या या व्याख्यानाच्या सुरुवातीला मी त्सोंग्खापा यांनी दिलेली शिकवण नमूद केली होती. ते सांगतात, करुणेसारखी चित्तावस्था विकसित करण्यासाठी आधी हे समजून घेणे आवश्यक असते की त्या चित्तावस्थेचा आधार काय आहे. करुणा विकसित करण्यासाठी हे आवश्यक आहे की, त्याच्या आधारस्वरूप आधी उचित संन्यस्त भाव विकसित करावा. संन्यस्त अवस्थेत आपण अनियंत्रितपणे वारंवार उत्पन्न होणाऱ्या पुनर्जन्माच्या चक्रास कारणीभूत असणाऱ्या तणावदायी भावनांपासून मुक्त होण्यासंदर्भात दृढ संकल्प केलेला असतो आणि आपण त्या भावनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतो.
करुणेचा आधार विकसित करण्यातला पुढचा टप्पा म्हणजे आपल्या संन्यस्त भावनेवर आधारित, अर्थात आपल्या अशांतकारी भावनांपासून मुक्ती मिळवण्यासाठीच्या प्रयत्नांच्या आधारावर समतोल वृत्ती विकसित करणे. समतोल वृत्तीच्या साहाय्याने आपण आसक्ती, तिटकारा किंवा उदासीनता या अशांतकारी भावनांपासून मुक्त होऊन सर्व जीवमात्रांचा उदार दृष्टिकोनातून विचार करतो. आपण प्रत्येकाप्रति समभाव बाळगतो कारण आपण सर्व अनादी आणि अनंत मानसिक सातत्यावर आरोपित असल्याच्या दृष्टिकोनातून एकसमान असतो. अनादी काळापासून आपला प्रत्येक जिवासोबत कोणत्या ना कोणत्या प्रकारचा संबंध असल्या कारणाने आपण कोणालाही एका विशिष्ट वेळचा आपला मित्र, शत्रू किंवा अनोळखी व्यक्ती असण्याच्या संदर्भातून ओळखत नाही. त्यामुळे तिथे आकर्षण, तिटकारा किंवा उदासीनता अशा भावनांचा काही संबंध नसतो.
जो दुसरा टप्पा आहे, त्याचे सर्वसाधारण भाषांतर ‘मायेची परतफेड’ असे केले जाते. पण मला वाटते की ‘परतफेड’ शब्दातून चुकीचा अर्थबोध होतो. कारण परतफेड ही एखाद्या व्यावहारिक सौदेबाजीतल्या कर्जाच्या संदर्भात असते आणि आपण ते कर्ज फेडू शकलो नाही, तर आपण दोषी ठरतो. या टप्प्यावर जी भावना अभिप्रेत आहे ती सक्ती किंवा अपराधीपणाची नाही, तर आपल्यावर केल्या गेलेल्या उपकारांबद्दलची प्रशंसनीय किंवा कृतज्ञतेची भावना आहे. आणि या भावनेच्या आधारावर आपण आपल्या आईबद्दल कल्पना करतो की ती एक अंध, भ्रमित किंवा संभ्रमित व्यक्ती आहे, जी एखाद्या खडकाला धडकून एखाद्या हानिकारक वर्तनाच्या दरीत कोसळणार आहे आणि आपण तिच्यासमोर उभे आहोत व आपल्याला माहीत आहे की तिची कशी रीतीने मदत करता येईल, तर स्वाभाविकपणे आपण तिचे अधःपतन थांबवण्यासाठी सर्वतोपरी जबाबदारी उचलतो. तिचा स्वतःचा मुलगा किंवा मुलगी तिची मदत करणार नाही, तर आणखी कोण करेल?
या भावनेच्या आधारे पाहिल्यास प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या काळात आपल्यासोबत मायेने वागला आहे आणि आपण त्याबद्दल कृतज्ञ आहोत आणि वास्तविक अर्थाने त्यांची मदत करून आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तत्पर असल्या कारणाने आपण स्वतः ‘उबदार प्रेमभावना’ विकसित करू शकतो. आपल्याला प्रत्येकाबद्दल इतका स्नेहभाव जाणवतो, की जेव्हा जेव्हा आपली त्यांच्याशी भेट होते, आपल्याला ते आपल्या जवळचे वाटू लागतात, जसे आपल्या एकुलत्या एक मुलाबद्दल आईच्या भावना असाव्यात, तशा आपल्या भावना असतात. आपल्याला प्रामाणिकपणे त्यांच्या भल्याची चिंता असते आणि जर त्यांच्याबाबतीत काही वाईट घडले, तर आपल्याला दुःख होते.
अशा प्रकारच्या उबदार प्रेमाच्या आधारावर बौद्ध धर्मात प्रेमभाव विकसित केला जातोः जो या कामनेच्या रूपात असतो की सर्व जीव समान रूपात सुखी असावेत आणि सर्वांना सुखप्राप्तीची साधने प्राप्त व्हावीत. प्रत्येकाप्रतिच्या या प्रेमभावनेच्या आधारे, आपण करुणा विकसित करतोः अर्थात त्यांनी दुःखातून आणि दुःख निर्माण करणाऱ्या कारणांमधून मुक्त व्हावे ही कामना करतो. अशा प्रकारे आपण पाहू शकतो की करुणेशी जोडल्या गेलेल्या सकारात्मक भावनांचा एक मिश्रित समूह असतो, जसे उदारता, सर्वांप्रति जवळिकीची भावना, त्यांच्या दयाभावाप्रति कृतज्ञता, प्रेम, स्नेह इत्यादी. हे सर्व करुणेत अंतर्भूत असते.
याचा अर्थविस्तार असा होतो की, करुणा संन्यस्त भावाची ती चित्तावस्था आहे, जी इतरांच्या दुःखावर केंद्रित असते आणि त्याच प्रकारे करुणेचा आधारही संन्यस्त भावनेच्या एखाद्या रूपात समाविष्ट असू शकतो. याचा अर्थ असा झाला की आपल्याला स्वतःप्रति समतोल वृत्ती बाळगायला हवी. जिथे आसक्ती, तिरस्कार किंवा उदासीनता नसेल. त्यानंतर आपल्याला ही जाणीव व्हायला हवी की आपल्याकडून या जन्मात किंवा मागील जन्मात घडलेल्या नकारात्मक कार्यांवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर नाही. दुसऱ्या जीवनात ते आपली आई होते आणि आपल्यासोबत प्रेमळ व्यवहार करत होते या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत असतानाच आपल्याला आपण केलेल्या सकारात्मक गोष्टींवरही लक्ष केंद्रित करायला हवे. आपण अनमोल मानवी जन्माचे सर्व लाभ आणि आनंद घेत असतो, हा आपण गतजन्मात केलेल्या सकारात्मक कृतींचा कार्मिक परिणाम असतो. त्यामुळे आपण ती कृत्ये करून स्वतःप्रति जो दयाभाव दाखवला आहे, त्याबद्दलही आपण कृतज्ञ असतो. त्यामुळे स्वतःप्रतिही आत्मघृणेच्या जागी प्रेमभाव उत्पन्न होतो. आपण प्रामाणिकपणे आपल्या भल्याची चिंता करतो आणि आपल्या बाबतीत काही वाईट घडले तर आपल्याला फार दुःख होते.
करुणाविषयक अभ्यासादरम्यान एक प्रमुख सिद्धांत सर्वांना समान बनवतो. तो सिद्धांत म्हणजे प्रत्येकाला सुखी व्हायचे असते, कुणालाच दुःख नको असते आणि प्रत्येकाला सुखी होण्याचा व दुःखी न होण्याचा समान अधिकार असतो. इथे ‘प्रत्येक’ जण म्हणत असताना त्यात आपलाही समावेश असतो. त्यामुळे आपल्यालाही सुखी होण्याचा आणि दुःखी न होण्याचा अधिकार असतो. त्यामुळे संन्यस्त भाव विकसित करणे, अर्थात मुक्ती मिळवण्याचा संकल्प करणे हे मूलतः स्वतःविषयी करुणा विकसित करणे आहे.
कृपया यात गल्लत करू नका. मी स्वतःप्रति असा द्वैतवादी दृष्टिकोन बाळगण्यासाठी प्रेरित करत नाहीये की स्वतःप्रति करुणा भाव बाळगणारा ‘मी’ त्या ‘मी’हून भिन्न आहे, ज्याच्याप्रति मी करुणाभाव अनुभवत असेन. ‘स्वतःप्रति दयाभाव बाळगणे’ हा एक आलंकारिक शब्दप्रयोग आहे. पण आपण स्वतःप्रति दयाभाव ठेवू इच्छित असू आणि आपण स्वतःला दुःखातून मुक्त करू इच्छित असू, तर आपल्याला अशा प्रकारचा दृष्टिकोन विकसित करायला हवा की, ज्यात आपण विचार करू, ‘मी या व्यक्तीसोबतचे नाते तणावदायी होऊ देऊ इच्छित नाही. मला क्रोधित व्हायचे नाही. मला उदास व्हायचे नाही. मला आसक्त व्हायचे नाही.’ अशा रीतीने आपण स्वतःला दुःखातून मुक्त करण्याचा दृढ संकल्प विकसित करतो. आणि त्याची आणखी एक बाजू म्हणजे तो ‘सर्व काही दुःखदायी आहे’ सारख्या भावनेला उबदार सुख आणि शांतचित्ततेच्या मूलभूत अनुभूतीसोबत संतुलित करतो.
सारांश
इथे आपण अनेक मुद्द्यांवर सर्वंकष चर्चा केली आहे. पण मला बौद्ध धर्मातील या महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चित्र सादर करायचे होते. फक्त एक अभ्यासाचा विषय म्हणून नव्हे, पण व्यक्तिगत विकासाच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे आहे. आपण संन्यस्त भाव आणि करुणा कशा रीतीने विकसित करु शकतो, याचे संकेत देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. आपण इथे पडताळून पाहिले आहे की संन्यास ते करुणेपर्यंतचे परिवर्तन आरोग्यदायी आणि स्थिर मार्गाने कसे घडवून आणायचे आणि या दोन्हीतील परस्परसंबंध काय आहे.