सर्वसामान्य भाषेमध्ये चार आर्य सत्यं
पुन्हा एकदा खलापामध्ये येऊन मला अतिशय आनंद झाला आहे, आणि आज संध्याकाळी मी ‘कर्म’ या विषयावर बोलावं, असं मला सांगण्यात आलेलं आहे. बौद्ध धर्मामध्ये आपण एखाद्या विषयाचा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला हा अभ्यास का करायचाय, त्याचं महत्त्व काय आहे आणि एकंदर बौद्ध धर्माच्या संदर्भात त्या विषयाचं स्थान काय, याची काहीएक कल्पना असणं आवश्यक असतं. बुद्ध मुळात प्रत्येकाच्या अनुभवाबद्दल बोलत होता, आपण जीवनात काय अनुभवतो, आणि हे काय चाललंय, याबद्दल बोलत होता. आपण सर्व जण, आपल्यातील प्रत्येक जण अनुभवतो अशी सर्वांत मूलभूत गोष्ट कोणती? काही वेळा आपण दुःखी असतो आणि काही वेळा आपण आनंदी असतो, ही ती गोष्ट. आपलं जीवन आपण अशा रितीने अनुभवतो, हो ना?
काही वेळा परिस्थिती दुःखद असते, काही वेळा आनंददायक असते, असा निर्वाळा आपण देतो, तेव्हा परिस्थितीशी निगडित अनेक समस्या आपल्याला जाणवतात. आपण आनंदी नसतो, तेव्हा अर्थातच आपण दुःखात असतो. कोणालाही दुःखी असायला आवडत नाही, हो ना? काही गोष्टी घडताना पाहिल्यावर आपण दुःखी होतो- उदाहरणार्थ, एखादा मित्र दूर जात असेल तर आपल्याला दुःख होतं. किंवा, काही गोष्टी ऐकल्यावर आपण दुःखी होतो- उदाहरणार्थ, वाईट शब्द ऐकल्यावर आपल्याला दुःख होतं. आणि, विविध गोष्टींबद्दल विविध भावनांसह विचार करतानाही आपल्याला दुःखी वाटणं शक्य असतं. परंतु, काही वेळा आपल्याला दुःखी वाटत असतं, पण आपण काय जे बघतोय किंवा ऐकतोय किंवा आपल्या आजूबाजूला काय घडतंय याच्याशी त्याचा काहीच संबंध नसतो. ही समस्या आहे, हो ना?
पण आनंदाचं काय? काही वेळा आपल्याला आनंदी वाटतं, हो ना? काही गोष्टी पाहून, ऐकून, जिव्हाळ्याच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून, आपल्याला आनंदी वाटतं, आणि काही गोष्टींबाबत विचार करून- उदाहरणार्थ, कोणासोबत तरी घालवलेला विलक्षण काळ आठवून आपल्याला आनंदीही वाटतं. पण खोलवर विचार केला तर लक्षात येतं की, आपल्या अनुभवाला येणाऱ्या या आनंदाशी निगडितही काही समस्या असतात. एक, हा आनंद कधीही टिकून राहत नाही, आणि तो किती काळ टिकणार आहे हे आपल्याला माहीत नसतं. आणि तो कधीही पुरेसा वाटत नाही. एक चमचा अन्न खाऊन आपल्याला आनंदी वाटू शकतं, पण ते पुरेसं नसतं- आपल्याला अधिकाधिक खायची इच्छा असते. खरं तर, हा खूप रोचक प्रश्न आहे- खरोखरचा आनंद मिळवण्यासाठी आपल्याला किती खायला हवं? याचा विचार करून पाहा. दोन, या आनंदाची दुसरी कमतरता म्हणजे त्यानंतर काय होणार आहे हे आपल्याला माहीत नसतं. पुढच्या क्षणी आपण आनंदीच राहू किंवा आपल्याला दुःखी वाटू शकेल. यात बदल होतो, त्यामुळे या आनंदाला काही सुरक्षितता नाही.
खरं म्हणजे अशा प्रकारे आनंदाचा आणि दुःखाचा आंतरिक शोध घेणं अथवा विश्लेषण करणं, हे बौद्ध धर्मापुरतं अनन्य नाही. जगातील अनेक महान विचारवंतांनी हे पाहिलेलं आहे आणि त्याची शिकवण दिलेली आहे. परंतु, बुद्धाने अधिक सखोल प्रकारची समस्या, किंवा दुःख सांगितलं, त्याची शिकवण दिली. प्रत्येकाच्या जगण्यातील या चढउताराच्या परिस्थितीकडे त्याने अधिक सखोलतेने पाहिलं. आनंदामध्ये व दुःखामध्ये चढ येतो, मग उतार येतो, पुन्हा चढ येतो, मग पुन्हा उतार येतो, हे त्याने पाहिलं. आपल्या अनुभवातील प्रत्येक क्षणामध्ये या घटिताचं कारण सामावलेलं असतं, हे त्याला आकळलं. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, आपण आनंद व दुःखाच्या चढ-उतारांसह गोष्टी ज्या तऱ्हेने अनुभवतो, त्यामुळेच असमाधानकारक परिस्थिती कायम राहते.
तर, असमाधानकारक परिस्थिती कायम ठेवणारं प्रत्येक क्षणामधलं कारण कोणतं आहे, ते बुद्धाने शोधलं व त्याला ते सापडलं. वास्तवाबाबतचा गोंधळ, हे यामागचं कारण असल्याचं त्याच्या लक्षात आलं. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, आपण अस्तित्वात कसे असतो, आपल्या आजूबाजूचा प्रत्येक जण अस्तित्वात कसा असतो, जग अस्तित्वात कसं असतं, याबद्दलचा गोंधळ याला कारणीभूत ठरतो.
इतर अनेकांनी जे काही सांगितलंय, त्यापेक्षा हे बरंच वेगळं आहे. उदाहरणार्थ, आपल्या अनुभवाला येणारे आनंदाचे व दुःखाचे चढ-उतार हे मुळात नियम पाळल्याने किंवा न पाळल्याने मिळणारं बक्षीस आणि शिक्षा यांमुळे आलेले असतात. अनेक गुरूंच्या मते, आनंदी किंवा दुःखी वाटण्यामागचा मुख्य मुद्दा नियमपालनाशी संबंधित आहे. पण बुद्ध म्हणाला: नाही, मुद्दा तो नाहीये. आपला गोंधळ हे या आनंदी अथवा दुःखी वाटण्यामागचं कारण आहे, नियम पाळणं किंवा न पाळणं याचा इथे काही संबंध नाही. जगण्याविषयी गोंधळलेलं असणं याला कारणीभूत आहे. गोंधळ हा जगण्याचा, आपण गोष्टी कशा अनुभवतो त्याचा अविभाज्य व आवश्यक भाग नाही, असं बुद्धाने सांगितलं. गोंधळ असण्याची गरज नाही. गोंधळ दूर सारणं शक्य आहे आणि तो परत कधीच येणार नाही अशा रितीने पूर्णतः दूर सारणंही शक्य आहे. गोष्टी अनुभवण्याचा आपला मार्ग बदलणं, हा त्यावरचा प्रत्यक्षातील उपाय आहे, असं त्याने सांगितलं.
आपल्यासाठी दुसऱ्या कोणीतरी हा गोंधळ दूर करावा असं काही शक्य नसतं, तर मुळात आपणच वास्तवाविषयीची आपली प्रवृत्ती, आपली समजूत बदलणं गरजेचं आहे. गैरसमजुतीच्या जागी आपण समजुतीला जागा दिली, आणि ही समजूत सदासर्वकाळ सोबत ठेवली, तर आपल्याला आनंद व दुःख यांच्या चढ-उतारांना सामोरं जावं लागणार नाही, आणि आनंद व दुःखाचे चढ-उतार आपण कायम ठेवणार नाही. तर, बुद्धाची ही सर्वांत पायाभूत शिकवण आहे, ती इथे दैनंदिन भाषेमध्ये मांडली आहे.
कर्माच्या स्पष्टीकरणासाठी अनेक व्यवस्था
बौद्ध धर्मातील अधिक अचूक स्पष्टीकरणाचा शोध आपण घ्यायला लागतो, तेव्हा केवळ एकच एक स्पष्टीकरण नसल्याचं आपल्या लगेच लक्षात येतं. काही पाश्चात्त्यांना हे थोडं अस्वस्थकारक वाटतं. पण आपल्यासमोर एखादी समस्या किंवा परिस्थिती असेल, तर तिचं स्पष्टीकरण विविध मार्गांनी करता येतं, आपल्या दृष्टिकोनावर ते अवलंबून असतं. पश्चिमेतही आपण हे करतो- आपण सामाजिक दृष्टिकोनातून गोष्टींचं स्पष्टीकरण करू शकतो, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून स्पष्टीकरण करू शकतो, अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून करू शकतो- यात काही आश्चर्यकारक नाही. घडतंय हे अधिक पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपल्याला या विविध स्पष्टीकरणांची खरोखरच मदत होते. काय घडतंय हे स्पष्ट करणारा प्रत्येक मार्ग विशिष्ट विचारव्यवस्थेवर आधारलेला असतो- मानसशास्त्राची व्यवस्था, राजकारणाची व्यवस्था, अर्थशास्त्राची व्यवस्था, इत्यादी. बौद्ध धर्मातही आपल्याला यासारखंच काहीतरी सापडतं. कर्म कसं कार्यरत असतं हे स्पष्ट करणाऱ्या विविध तत्त्वज्ञानीय व्यवस्था आपल्याला सापडतात. पश्चिमेत मानसशास्त्रासारख्या एका विद्याशाखेतही फ्रॉइडवादी मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून स्पष्टीकरण असू शकतं, किंवा युंगवादी मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून स्पष्टीकरण असू शकतं; तसंच समाजवादी मार्गाने किंवा भांडवलवादी मार्गाने स्पष्टीकरण देता येतं. बौद्ध धर्मातही आपल्याला हे सापडतं आणि अशा विविध व्यवस्थांकडे पाहणं खरोखर उपयोगाचं पडतं, कारण कर्म कसं कार्यरत असतं याबद्दलच्या वेगवेगळ्या मर्मदृष्टी त्यातून आपल्याला प्राप्त होतात. व्यवस्थांमधील भेदांच्या तपशिलात जाणं आपल्यासाठी इथे गरजेचं नाही, पण विविध व्यवस्था आहेत याबद्दल जागरूक राहणं मदतीचं ठरेल.
याचा गर्भितार्थ असाही आहे की, आपण काय अनुभवतो हे स्पष्ट करणाऱ्या पाश्चात्त्य व्यवस्थाही असणं शक्य आहे. कर्माविषयी आपण काय बोलतो, याला अशाने छेद जात नाही.
कर्म- अंतःप्रेरणेचा मानसिक घटक
कर्माविषयी आपण विशिष्ट गोष्ट म्हणून बोलतो तेव्हा- एका स्पष्टीकरण व्यवस्थेला अनुसरायचं असेल तर- मानसिक घटकाविषयी बोलत असतो. ‘मानसिक घटक’ म्हणजे काय? कशाबद्दल तरी जागरूक असण्याचा मार्ग म्हणजे मानसिक घटक. एक उदाहरण पाहू: आपण कोणाला तरी पाहतो आणि त्यांच्यापाशी जातो. या अनुभवामध्ये अनेक मानसिक घटक सहभागी असतात. त्या व्यक्तीबद्दल आपण कसे जागरूक आहोत, याचे हे विविध पैलू असतात. यातील काही अतिशय पायाभूत असतात- उदाहरणार्थ, ती व्यक्ती आणि दुसरी कोणीतरी व्यक्ती किंवा एखादी भिंत यांच्यातला भेद जाणणं. रस घेणं- समोर आलेल्या व्यक्तीबद्दल जागरूक असणं. यात एकाग्रता असू शकते; विविध भावना असू शकतात. हे सर्व मानसिक घटक आहेत, आणि संबंधित व्यक्तीला बघणं व तिच्यापाशी जाणं या क्षणामध्ये हे सर्व घटक एकमेकांशी जोडले जातात.
कोणता मानसिक घटक कर्म असतो? आपल्याला त्या व्यक्तीकडे ओढून घेणारा मानसिक घटक म्हणजे कर्म; व्यक्तीकडे पाहिल्यावर तिच्यापाशी जाण्याची उत्कट इच्छा म्हणजे कर्म. त्यामुळे काही सिद्धान्तांमध्ये कर्माचं स्पष्टीकरण जवळपास शारीरिक शक्तीसारखं केलेलं असतं. अर्थात, इतर मानसिक घटकही असू शकतात- उदाहरणार्थ, हेतू. या माणसाबाबत काय करायचा आपला हेतू आहे? त्यांना आलिंगन द्यायचा आपला हेतू असू शकतो किंवा त्यांच्या चेहऱ्यावर ठोसा लगावायचा आपला हेतू असू शकतो. इतरही अनेक घटक यात गुंतलेले असतात, पण कोणा व्यक्तीला आलिंगन देण्याची किंवा ठोसा लगावण्याची आपली मानसिक उत्कटेच्छा म्हणजे कर्म. कशाबद्दल तरी आपण विचार करतो, ती प्रेरक मानसिक इच्छाही असू शकते; केवळ काहीतरी बोलणं किंवा काहीतरी शारीरिक कृती करणं, एवढ्यापुरतं हे मर्यादित नाही. आपण काहीतरी विचार करत असतो, किंवा आपण काहीतरी बोलत असतो, किंवा आपण काही शारीरिक काम करत असतो- तेव्हा या सर्व गोष्टींमध्ये काही प्रकारची मानसिक इच्छा असते.
कर्मजन्य वर्तनाचे परिणाम
विज्ञानाप्रमाणे बौद्ध धर्मही कार्यकारण संदर्भामध्ये शिकवण देतो. त्यामुळे कर्माच्या प्रेरणेने- या इच्छेने- आपण गोष्टी करत असू, बोलत असू आणि विचार करत असू, तर त्याचा काहीएक परिणाम होणारच. आपल्या वर्तनाचा इतरांवर काय परिणाम होतो, याबद्दलचं फारसं बोलणं कर्माशी संबंधित नसतं. अर्थातच, इतरांवरही त्याचा परिणाम होतोच. पण आपल्या कृतीचा इतरांवर होणारा परिणाम हा बहुतांशाने त्या व्यक्तीला हाताळायचा असतो. आपल्या कृतीचे इतर लोकांवर होणारे परिणाम काही वेळा निव्वळ शारीरिक घटकांमुळे असतात: आपण कोणालातरी मारतो आणि त्या व्यक्तीच्या त्वचेवर ओरखडा उठतो. हा शारीरिक कार्यकारणसंबंध झाला. आपण अशा पद्धतीच्या वर्तनाबद्दल बोलत नाहीयोत. तर, आपण इतरांना काय बोलतो किंवा त्यांच्याबाबत कसे वागतो, याचा त्यांना कसा अनुभव येतो, त्या परिणामाबद्दल आपण बोलतो आहोत. हा परिणाम त्यांनाच हाताळावा लागतो ना? उदाहरणार्थ, आपण कोणालातरी अतिशय क्रूर असं काही बोललो आणि त्यांच्या भावना दुखावल्या, तर ते नाराज होतील. पण आपण मूर्ख बिनडोक आहोत, असंही त्यांना वाटू शकतं, त्यामुळे ते आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि आपलं बोलणं गांभीर्याने घेणार नाहीत. किंवा कदाचित ते आपलं ऐकूनही घेणार नाहीत किंवा ते आपलं बोलणं त्यांना चुकीचं ऐकू जाईल. कदाचित त्यांच्या मनात दुसरंच काहीतरी सुरू असेल, अशीही शक्यता आहे. तर, कोणा व्यक्तीच्या भावना खरोखरच दुखावण्याचा आपला भयंकर हेतू असेल, तरी प्रत्यक्षात तसं होईलच याची काही खात्री देता येत नाही. अर्थात, मुळामधे कोणी दुखावणार नाही, असा आपला प्रयत्न असायला हवा, असं बौद्ध धर्म आपल्याला शिकवतो. पण इथेही कर्माचा संबंध नाही.
एखाद्या गोष्टीच्या कर्मसंबंधित परिणामांविषयी आपण बोलतो, तेव्हा आपण भावनाविवश होऊन, अपरिहार्य असल्याप्रमाणे कर्मजन्य इच्छेने कृती करतो त्याचा परिणाम म्हणून आपल्याला येणाऱ्या अनुभवांच्या कर्मजन्य परिणामांबद्दल बोलत असतो.
आपल्या आत याचे काय परिणाम होतात? एक परिणाम- आणि हा परिणाम पाश्चात्त्य विज्ञानाच्या मांडणीशी साधर्म्य सांगणारा आहे- असा: आपण स्वतःला विशिष्ट पद्धतीने विचार करण्याची, विशिष्ट पद्धतीने बोलण्याची, आणि विशिष्ट पद्धतीने वागण्याची सवय लावून घेतो, यातून त्या वर्तनपद्धतीची पुनरावृत्ती करण्याची प्रवृत्ती विकसित होते. आणि कृतीची पुनरावृत्ती करण्याच्या प्रवृत्तीमुळे आणि कृतीची पुनरावृत्ती करण्याच्या सामर्थ्यामुळेही, आपण सामर्थ्य व प्रवृत्ती यांमध्ये काही भेद करतो, याच्या तपशिलात आता जाण्याची गरज नाही, पण या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला कृतीची पुनरावृत्ती करावीशी वाटते.
यातून नक्की काय उत्पन्न होतं, ही प्रवृत्ती की सामर्थ्य? या प्रवृत्तीमधून भावना निर्माण होते- उदाहरणार्थ, समोरच्या व्यक्तीपाशी जाऊन तिला आलिंगन देण्याची भावना, किंवा समोरच्या व्यक्तीपाशी जाऊन काहीतरी खोडसाळ बोलण्याची भावना. आणि मग, असं करावंसं आपल्याला वाटतं तेव्हा आपल्यासमोर अर्थातच हे करायचं की नाही याची निवड करायचा पर्याय असतो. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे- आपल्याला काय करायचंय किंवा काय करायचं नाहीये, याची निवड करायचा पर्याय आपल्यासमोर असतो, हे लक्षात घ्यायला हवं. पण आपण ती कृती करायचं ठरवलं, किंवा कृती करायची की नाही याचा विचारही आपण केला नाही, आणि न विचार करताच कृती करून टाकली, तर त्यानंतरच्या टप्प्यात कर्म हा संदर्भ येतो. कर्म म्हणजे इच्छा, प्रेरणा, कृती करायला भाग पाडणारी अनिवार्यता.
या प्रवृत्तीमधून अनेक गोष्टी पक्व होऊन बाहेर येतात. एक गोष्ट म्हणजे आपण जे काही अनुभवतो त्याचा आशय. ‘आशय’ हा मोठा शब्द आहे; आपण थोडं विशिष्ट स्वरूपाचं बोलायला हवं. उदाहरणार्थ, इथे आपण बोलतोय ते या व्यक्तीला भेटण्याविषयी त्या व्यक्तीला भेटण्याविषयी नाही. लोक एकमेकांशी कशा पद्धतीने वागतात त्याचाही इथे संबंध येतो. अधिक अचूक होण्याच्या दृष्टीने आपण हे कसं बोलतो याची काळजी बाळगायला हवी. आपल्या कर्मामुळे समोरची व्यक्ती आपल्यावर ओरडत नसते, तर त्यांच्यामध्ये इतर लोकांवर ओरडायची प्रवृत्ती असते, त्याचा परिणाम म्हणून ती व्यक्ती आपल्यावर ओरडते. पण इतर लोक आपल्यावर ओरडतात या अनुभवाला आपलं स्वतःचं कर्मसुद्धा जबाबदार असतं.
ही गोष्ट समजून घ्यायला अर्थातच सोपी नाही, पण मला वाटतं हे समजून घेण्याचा एक मार्ग म्हणजे काहीएक उदाहरण देणं. तर, एखादं बाळ डायपर घालत असेल आणि त्याने ते घाण केलं, तर त्या बाळाला तशाच स्थितीत राहावं लागतं; त्या बाळाला त्याने केलेल्या गोंधळासोबतच राहावं लागतं. कोणी त्या बाळाचा डायपर बदलतं की नाही, हा मुद्दा जरा बाजूला ठेवू, पण इथे मुद्दा असा आहे की, आपण गोंधळ निर्माण करतो, आणि आपल्याला गोंधळ अनुभवावा लागतो. आपण आयुष्यात गोंधळ निर्माण करतो, आयुष्य पुढे जातं, आपण अधिकाधिक गोंधळ करत राहतो; आणि इतर लोकही आपल्याबाबतीत असंच वागत असल्याचं आपण अनुभवतो. पण कर्माशी संबंधित एक आणखी महत्त्वाचं तत्त्व असं आहे की, हे क्षणार्धात घडत नाही. आपण कोणाशी तरी कनवाळूपणे व सौम्यपणे बोलू, आणि तरीही ती व्यक्ती अत्यंत वेडगळपणे वागण्याची शक्यता असतेच, ती संतापून आपल्यावर ओरडू शकतेच.
त्यामुळे कर्म समजून घेण्यासाठी आपल्याला पुनर्जन्माविषयीची पूर्ण चर्चा इथे करावी लागेल. गोष्टींचा एखादा परिणाम दिसण्यासाठी खूप, खूप दीर्घ काळ जातो, आणि कदाचित या जीवनकाळामध्ये हा परिणाम दिसणारही नाही. किंबहुना बहुतांश वेळा असा परिणाम दिसतच नाही. आपल्यासारख्या पाश्चात्त्यांना हे स्वीकारणं खूप सोपं जाणार नाही. “या जन्मात चांगलं वागलात तर या जीवनानंतर, स्वर्गामध्ये तुम्हाला त्याचे परिणाम अनुभवायला मिळतील; वाईट वागलात तर या जीवनानंतर, नरकामध्ये तुम्हाला त्याचे परिणाम अनुभवायला मिळतील.”
हे आपण खरोखरच सूक्ष्मरित्या तपासायला हवं: बौद्ध धर्म तीच गोष्ट सांगतो आहे, की हे काही वेगळं आहे? हा सहज सोपा विषय नाही, अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे, कारण कर्मजन्य कार्यकारणभाव खरोखर समजून घेण्यासाठी आपल्याला पुनर्जन्म समजून घेणं गरजेचं ठरतं- आणि बौद्ध धर्माची पुनर्जन्माची संकल्पना समजून घ्यावी लागते, दुसरी कुठलीतरी पुनर्जन्माची बिगरबौद्ध संकल्पना नव्हे. कर्मजन्य कारण कोणाच्या कृतीतून मिळतं आणि त्याचा परिणाम कोणाला अनुभवावा लागतो? बक्षिस मिळणारा किंवा शिक्षा होणारा ‘मी’ असतो का?
पण पुनर्जन्माचा आणि ते कोण अनुभवतो, हा मुद्दा बाजूला ठेवून सुरुवातीला हे लक्षात घ्यायला हवं की, शास्त्रपालनावर आधारित बक्षिस व शिक्षा देणाऱ्या व्यवस्थेबद्दल बौद्ध धर्म बोलत नाहीये. हे आयुष्य म्हणजे कोणत्यातरी प्रकारची परीक्षा आहे आणि त्याचा निकाल आपल्याला पुढच्या आयुष्यात मिळणार आहे, असं बौद्ध धर्म म्हणत नाहीये. एखाद्या गोष्टीचा परिणाम दिसायला बराच वेळ जातो, एवढंच त्याचं म्हणणं आहे. पर्यावरणाच्या बाबतीत आपल्याला हे दिसून येतं. आपण एका विशिष्ट पद्धतीने कृती करतो आणि त्याचे आपल्या जीवनकाळात काही परिणाम होतात, पण त्याचे भावी पिढ्यांच्या जीवनकाळात खूप जास्त परिणाम दिसून येणार आहेत. यासारखंच ते आहे.
आनंद आणि दुःख
या व्याख्यानाच्या सुरुवातीला आपण ज्याबद्दल बोलत होतो त्याच्याशी- आनंद व दुःखाच्या परिमाणांशी- या कर्मजन्य कृतींच्या परिणामांचं परिमाण संबंधित असतं. काही कृतींची पुनरावृत्ती करत असताना आपल्याला काही गोष्टी अनुभवायला मिळतात- लोक आपल्याशी विशिष्ट तऱ्हेनं वागतात, किंवा एखादा खडक कड्याच्या टोकावरून कोसळून आपल्या डोक्यावर पडू शकतो. या गोष्टी आपण आनंदाने किंवा दुःखाने अनुभवतो. याचा विचार करा. काही लोकांना एखाद्या झुरळावर पाऊल पडल्यावर खूप आनंदी वाटतं- हे मला भयंकर वाटलं! इतर काही लोकांना झुरळावर पाय पडल्यानंतर किळस वाटते, त्यांना अतिशय दुःख वाटतं. काही लोकांना कोणी मारलं किंवा त्यांच्यावर कोणी ओरडलं, तर अतिशय वाईट वाटतं, दुःखी वाटतं, आणि इतर लोकांना आनंदी वाटतं, “होय, मी पापी आहे; मी चांगला नाहीये; मी वाईट आहे; माझ्यावर ओरडायलाच हवं आणि मला मारायलाच हवं.”
एक म्हण तुम्हाला माहीत असेल, मला वाटतं ती इथूनच, मॅक्सिकोतून आलेली आहे, किंवा कोणीतरी ही कहाणी रचली असेल आणि माझा त्यावर विश्वास बसला, तर ती म्हण अशी: “माझ्या नवऱ्याने मला मारलं, तर तो माझ्यावर खरोखरच प्रेम करतो, असा त्याचा अर्थ होतो; त्याने मला मारलं नाही, तर त्याला माझी काळजी नाही, असा अर्थ होतो.”
हे आनंदी किंवा दुःखी असणं हे जवळपास पूर्णतः वेगळ्या प्रकारचं परिणाम असावं, नाही का? आपल्याबाबत जे होतं, ते आपण अनिवार्यतेने करतो, पुनरावृत्तीद्वारे करतो, आणि आपण जे अनुभवतो, आपल्याबाबत जे होतं- ते एक परिमाण आहे. आणि हे आपण आनंदाने किंवा दुःखाने खरोखर कसं अनभवतो, त्याच्या दुसरं परिमाण जोडलेलं असतं. या आपण अनुभवतो त्या गोष्टी, ही दोन परिमाणं, आपल्या गतकालीन, पण वेगवेगळ्या कर्मजन्य कृतींमधूनही पक्व होऊन आलेली असतात. आपण केवळ आनंदी व दुःखी असण्याच्या परिमाणाकडे पाहिलं, तर हे अतिशय ढोबळ परिमाण आहे. आपण विध्वंसक मार्गाने कृती करतो की रचनात्मक मार्गाने कृती करतो, याच्याशी त्याचा संबंध असतो. आपण विध्वंसक रितीने कृती केली, तर त्याचा परिणाम दुःखद असतो; आपण रचनात्मक कृती केली, तर त्याचा परिणाम आनंददायक असतो.
रचनात्मक व विध्वंसक वर्तन
रचनात्मक व विध्वंसक यातून बौद्ध धर्माला कोणता अर्थ अपेक्षित आहे, याचा आपण तपास करतो तेव्हा हे खूप रोचक असल्याचं आढळतं. स्वाभाविकपणे याची अनेक स्पष्टीकरणं आहेत. पण आपण आधी पाहिल्याप्रमाणे, कोणत्याही कृतीचा इतर कोणावर काय परिणाम होतो, या संदर्भात त्या कृतीची चौकट आपण निश्चित करू शकत नाही, कारण त्याचा परिणाम काय होईल हे आपल्याला माहीत नसतं: त्यात इतर अनेक घटकांचा संबंध येतो. तर, आपण कोणत्या मनस्थितीमध्ये कृती करतो त्याच्याशी रचनात्मक व विध्वंसक वर्तनाचा संबंध असतो. आपली कृती लोभावर, किंवा अभिलाषेवर, किंवा संतापावर, किंवा निव्वळ पूर्ण भाबडेपणावर आधारलेली असेल, तर ती विध्वंसक असते. दुसऱ्या बाजूला, आपली कृती संताप, लोभ, अभिलाषा, भाबडेपणा यांच्यावर आधारलेली नसेल, तर ती रचनात्मक असते. अर्थातच याहून बरंच काही यात आहे- आपली कृती प्रेम, करुणा व दयाभाव इत्यादींवर आधारलेली असेल, तरीही ती रचनात्मक असते.
इतरही काही घटक आहेत. एखादी कृती रचनात्मक किंवा विध्वंसक ठरवणाऱ्या इतर घटकांची तपासणी करणंही अतिशय रोचक असतं. यातील एक घटक आहे नैतिक स्वप्रतिष्ठा. याचा संबंध आपल्या स्वप्रतिमेशी व आपल्या स्वाभिमानाशी असतो. आपल्याला स्वतःबद्दल काहीच आदर नसेल, तर आपल्या वर्तनाचा इतरांवर काय परिणाम होतो याची फिकीर आपण करत नाही. “काय वाट्टेल ते होईल” अशा प्रकारची ही प्रवृत्ती असते. आपल्यात स्वाभिमानाचा अभाव असेल, तर आपण विध्वंसक कृती करतो. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, मी स्वतःबद्दल सकारात्मक विचार करत असेन, मला स्वतःबद्दल एक व्यक्ती म्हणून आदर असेल, तर मी मूर्खासारखा वागायला जाणार नाही. मी मूर्खासारखं किंवा क्रूरपणे वागायला जाणार नाही, कारण मला अशा कृतीने स्वतःचं अधःपतन करायचं नाही- माझं स्वतःबद्दल आणि मी काय करू शकतो याबद्दल खूप चांगलं मत आहे. इथे आपण याच घटकाबद्दल बोलणार आहोत. नैतिक स्वप्रतिष्ठेची जाणीव असणं किंवा नैतिक स्वप्रतिष्ठेची कोणतीही जाणीव नसणं. आपण रचनात्मक मार्गाने कृती करतो की विध्वंसक मार्गाने कृती करतो, हे ठरवण्यासाठी हा अतिशय कळीचा घटक असतो.
आपल्या वर्तनामुळे इतरांच्या प्रतिमेवर काय परिणाम होतो, याची काळजी घेणं, हा आणखी एक घटक आहे. आपण कशाबद्दल बोलतोय? आपण चुकीच्या पद्धतीने कृती केली, तर त्याचा माझ्या कुटुंबाच्या प्रतिमेवर कोणता परिणाम होईल? त्याचा माझ्या देशाच्या प्रतिमेवर कोणता परिणाम होईल? मी चुकीच्या पद्धतीने वागलो, तर बाकीचे लोक मॅक्सिकन लोकांबद्दल काय विचार करतील? आपण बौद्ध असू, आणि मी दारू पिऊन बाहेर गेलो, कोणाशी तरी भांडलो, तर त्याचा बौद्ध धर्माच्या आणि बौद्धांच्या प्रतिमेवर कोणता परिणाम होईल? आपल्याला आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या समूहाविषयी- म्हणजे धर्म, देश, शहर अशा कशाविषयी तरी- पुरेसा आदर असतो, त्यामुळे आपल्या वर्तनाचा परिणाम कसा होईल याची चिंता आपल्याला वाटते, आपल्या वर्तनामुळे इतरांची प्रतिमा कशी होईल याची चिंता आपल्याला वाटते. ही जाणीव आपल्याला असेल तर आपण विध्वंसक कृती करणं टाळू. अशी जाणीव नसेल, तर आपण विध्वंसक कृती करू. ही बौद्ध धर्मातून मिळणारी असामान्य मूलगामी मर्मदृष्टी आहे. यातला कळीचा घटक कोणता? स्वाभिमान, स्वप्रतिष्ठा व आपल्या समुदायाच्या अभिमानाची जाणीव.
दहशतवाद हाताळण्यासंदर्भात आपण जे काही घटक विचारात घेणं गरजेचं आहे, त्या संदर्भात यातून आपल्याला काही महत्त्वाची मर्मदृष्टी मिळते. एखाद्या व्यक्तीला व तिच्या समुदायाला तुम्ही सर्व प्रकारची स्वप्रतिष्ठा नाकारलीत, त्यांचं जगणं भयानक करून ठेवलंत, त्यांच्याविषयी भयंकर विचार करायला लागलात, तर त्यांना ते जे काही करू पाहतायंत ते निरर्थक वाटू लागेल. त्यांच्यामध्ये आत्मादराची किंवा त्यांच्या समुदायाच्या आत्मादराची भावना नसेल, तर पुढे जाऊन विध्वंस का करू नये, असं त्यांना वाटतं. त्यांच्याकडे गमावण्यासारखं नाही, असं त्यांना वाटतं. इतरांशी आपण कसे वागतो, विशेषतः जगातील समस्याग्रस्त परिस्थितींमध्ये आपण त्यांच्याशी कसे वागतो, या संदर्भात हा विचार करणं मदतीचं ठरू शकतं, असं मला वाटतं. कोणालाही स्वप्रतिष्ठेच्या भावनेपासून किंवा त्यांच्या समुदायही मूल्ययुक्त आहे या भावनेपासून वंचित न करणं आवश्यक असतं.
एखादी कृती विध्वंसक किंवा रचनात्मक होते, तेव्हा त्यामध्ये असे काही मानसिक घटक गुंतलेले असतात. आपण इतरांबाबत कशी कृती करतो व त्यांच्याशी कसे वागतो, याचा त्यांच्यावर परिणाम होणार आहे, ही वस्तुस्थिती गांभीर्याने विचार करणं, हा घटकसुद्धा महत्त्वाचा ठरतो. इतरांचा विचार करण्याची किंवा आस्थेने वागण्याची समज असणं- याला मी ‘आस्थेवाईक प्रवृत्ती’ म्हणतो. पण काही वेळा आपण अतिशय भाबडे असतो. मी समोरच्याला काहीही बोलेन, त्याने काही फरक पडत नाही, असा आपण विचार करतो. आपण समोरच्याच्या भावना गांभीर्याने घेत नाही, असं असेल तर आपल्यामध्ये आस्थेवाईक प्रवृत्तीचा अभाव आहे.
लोभ, राग, आत्मादराची भावना नसणं, आपल्या कृतीचा इतरांवर काय परिणाम होतो याचा विचार न करणं, आस्थेवाईक नसणं, आपण काय करतो याचा इतरांवर व स्वतःवरही कोणता परिणाम होतो हे गांभीर्याने न घेणं- याचा परिणाम काय? हे दुःख शिक्षेसारखं मात्र नसतं.
याबद्दल आपण खरोखरच सखोल विचार करायला हवा. या सर्व नकारात्मक घटकांसह असणारी मनस्थिती खरोखरच आनंदी मनस्थिती असेल का, आणि त्यातून खरोखरच आपल्याला आनंदाचा अनुभव मिळेल का? की त्यातून केवळ दुःखच उत्पन्न होईल? याबद्दल आपण अधिकाधिक विचार केला, तर अशी मनस्थिती, अशी नकारात्मक मनस्थिती दुःखानुभवच निर्माण करेल ही बाब आपल्या लक्षात येते; आणि याच्या उलटी मनस्थिती असेल, लोभ, संताप व इतर घटक नसलेली मनस्थिती असेल, तर त्यातून आनंद उत्पन्न होईल. त्यामुळे रचनात्मक व विध्वंसक अशा वर्तनाच्या सर्वसाधारण कोटी आपण केल्या आहेत, आणि याचा परिणाम म्हणून आपण आनंद व दुःख अनुभवतो.
यात भर म्हणून आपण काही विशिष्ट प्रकारच्या कृती करतो: कोणावर तरी ओरडतो, किंवा कोणाबद्दल तरी दया दाखवतो, इत्यादी; आणि याचाही परिणाम होत असतो- त्या वर्तनाची पुनरावृत्ती करायची प्रवृत्ती आणि इतर लोक आपल्याशी अशाच तऱ्हेने वागतील अशा परिस्थिती घडायची प्रवृत्ती, या संदर्भात हा परिणाम दिसतो.
आपल्या कर्मजन्य वर्तनाचा आणखी एक परिणाम असा- (पण इथे याच्या जास्त तपशिलात जाण्याची गरज नाही)- आपल्याला कोणत्या प्रकारचा पुनर्जन्म मिळाला आहे त्याच्याशी याचा संबंध आहे: प्राथमिक शरीर आणि कुत्र्याचं, झुरळाचं, मानवाचं मन अशा स्थितीत आपला पुनर्जन्म होणार आहे का. आपल्यासोबत घडणाऱ्या विशिष्ट गोष्टींच्या संदर्भात आणि आपण विशिष्ट मार्गाने कृती करतो त्या संदर्भात आपल्याला कोणत्या प्रकारचं शरीर व मन मिळणार आहे. इथे इतर अनेक तपशील आहेत, पण या प्रास्ताविक स्वरूपाच्या व्याख्यानात मी केवळ सर्वाधिक सर्वसाधारण तत्त्वांवर बोलू इच्छितो.
नियतिवाद की मुक्त इच्छा
तर, एका बाजूला, विशिष्ट प्रकारच्या वर्तनाची पुनरावृत्ती होताना व गोष्टी आपल्यासोबत घडत असताना आपण अनुभवतो; आणि दुसऱ्या बाजूला, हे सर्व आनंद व दुःखाच्या चढ-उतारांसह आपण अनुभवत असतो, ते काही वेळा आपल्या वर्तनाशी जुळतं आणि काही वेळा अजिबात जुळत नाहीसं दिसतं. हे सगळं सदासर्वकाळ चढ-उताराला सामोरं जात असतं आणि पुढे काय येणार आहे, हे आपल्याला माहीत नसतं. आणि आपल्याबाबत काय घडतं ते केवळ आपल्यामुळे किंवा आपल्या कर्मामुळे घडलेलं नसतं. विश्वातल्या इतर प्रत्येक व्यक्तीसोबत व त्यांच्या कर्मासोबत काय घडतंय आणि ते काय करतायंत याचा परिणाम त्यावर होत असतो, शिवाय भौतिक विश्वामध्ये काय घडत असतं- हवामान, भूकंप, यांसारख्या गोष्टी- याचाही परिणाम त्यावर होतो. त्यामुळे आपण पुढे काय अनुभवणार आहोत, याचं भाकित करणं अतिशय अवघड असतं- भविष्यावर परिणाम करणारे घटक खूप, खूप जास्त गुंतागुंतीचे असतात, किंबहुना काय होऊ घातलंय हे समजून घेणं ही सर्वांत व्यामिश्र गोष्ट आहे, असं बुद्ध म्हणतो.
याबाबत आपण स्पष्टता राखायला हवी, कारण अनेक लोक कर्माविषयी हे विचारतात- हा नियतिवाद आहे की मुक्त इच्छा आहे? यातील कोणताही पर्याय बरोबर नाही, ही दोन्ही टोकं आहेत. आपण काय करणार आहोत किंवा आपण काय अनुभवणार आहोत, हे इतर कोणीतरी निर्धारित केलेलं आहे- कोणातरी बाह्य अस्तित्वाने, उच्च अस्तित्वाने, किंवा कोणीतरी निर्धारित केलेलं आहे, असं नियतिवादातून सर्वसाधारणतः सूचित होत असतं. परंतु, परिस्थिती अशी नाही, असं बौद्ध धर्म म्हणतो; आपण काय करणार आहोत हे इतर कोणी ठरवलेलं नाही आणि आपण केवळ कळसूत्री बाहुल्या नाहीयोत, दुसऱ्या कोणीतरी आपल्यासाठी लिहिलेली नाटिका सादर करणं एवढंच आपलं काम नाही.
दुसऱ्या बाजूला, मुक्त इच्छेच्या सिद्धान्तामध्ये असं असतं की, जणू काही सगळे एखाद्या उपाहार गृहात बसलेले आहेत, त्यांच्या हातात मेनूकार्डं आहेत आणि कोणता पदार्थ मागवायचा हे ते ठरवत आहेत. परंतु जीवन असं नसतं. जीवन असं असतं अशी कल्पना करणं चुकीचं आहे, गोंधळलेलं आहे, असं बौद्ध धर्म म्हणतो. जीवनापासून वेगळा, अनुभवापासून वेगळा असा ‘मी’ आहे, असं वाटू शकतं, जाणवू शकतं. आणि आपल्यासोबत जे काही घडतं, ते मेनूकार्डावरच्या पदार्थांच्या यादीसारखं नसतं, त्यातून आपल्याला निवड करायची सोय नसते. सर्व घटक आधीपासून अस्तित्वात आहेत, आणि आपण फक्त बटण दाबलं की, एखाद्या यंत्रातून हवा असलेला पदार्थ बाहेर पडतो, अशासारखं हे नसतं. हे किती मूर्खपणाचं आहे, यासाठी सदर प्रसंगाचं चित्र डोळ्यांसमोर उभं करणं उपयुक्त ठरेल, असं मला वाटतं. एखाद्या व्हेंडिंग मशिनमधल्या कॅन्डी बारसारखे अनुभव अस्तित्वात नसतात, त्यामुळे त्यांची तशी पदार्थासारखी निवड शक्य नसते- बटण दाबलं, पैसे टाकले, कॅन्डी बाहेर आली, असं अनुभवाच्या बाबतीत होत नाही. जीवन असं नसतं, हो ना? “आज मी आनंदाचा अनुभव घेईन आणि सगळे माझ्याशी चांगलं वागतील असं मी अनुभवेन,” असं आपण आधीच ठरवू शकत नाही. जीवनाच्या यंत्रात पैसे टाकून आपण निवडलेला अनुभव बाहेर आला, असं घडत नसतं. ही मुक्त इच्छा झाली. आपल्यासोबत काय घडेल आणि आपण काय करणार आहोत, हे ठरवण्याची मुक्त इच्छा. पण आपल्यासोबत घडणाऱ्या गोष्टी नियतिवाद व संपूर्ण मुक्त इच्छा या दोन टोकांहून बऱ्याच सूक्ष्म आणि व्यामिश्र असतात.
कर्माचा स्रोत गोंधळामध्ये
आपल्या आनंदी व दुःखी अनुभवांमध्ये सतत येणाऱ्या चढउतारांचं आणि आपल्याला नको असतानाही आपल्यासोबत घडणाऱ्या, आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या सर्व प्रकारच्या गोष्टींचं कारण बुद्धाने आपल्याला शिकवलं, म्हणून बौद्ध धर्म अनन्य ठरतो, असं आपण या व्याख्यानाच्या सुरुवातीला म्हटलं. आपल्या अनुभवातील प्रत्येक क्षणामध्ये कारण सामावलेलं असतं आणि ही संपूर्ण प्रक्रिया त्याने कायम राहत असते- आणि त्याचं कारण गोंधळामध्ये असतं. एवढंच नव्हे तर, आपण गोंधळामध्ये विध्वंसक अथवा रचनात्मक कृती करतो- तेव्हा त्यातून ‘सततची सवय’- सतत गोंधळून कृती करण्याची सवय- दृढ होत असते, त्यामुळे आपण प्रत्येक क्षणी गोंधळून कृती करणं सुरू ठेवतो.
हा गोंधळ म्हणजे काय? बौद्ध धर्मातील हा अतिशय सखोल विषय आहे. पण अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, इथे आपण बोलतोय ते अस्तित्वाशी निगडित गोंधळाबद्दल आहे- मी कसा अस्तित्वात आहे, तुम्ही कसे अस्तित्वात आहात आणि सर्व जण कसे अस्तित्वात आहेत, याबद्दलचा हा गोंधळ असतो. उदाहरणार्थ, मी विश्वाच्या केंद्रस्थानी आहे; मी सर्वांत महत्त्वाचा आहे; प्रत्येक वेळी मलाच वाव मिळायला हवा; प्रत्येक वेळी माझंच बरोबर असतं; लोकांनी माझ्यासाठी वेळ काढायला हवा- असं आपल्याला वाटतं. आपल्या सेल-फोनच्या बाबतीत ही प्रवृत्ती आपल्याला जाणवते: मला कधीही कोणालाही कॉल करता यायला हवा आणि कोणी काहीही करत असलं तरी मी त्यांच्या कामात व्यत्यय आणू शकतो, आणि तरीही त्यांनी माझ्यासाठी उपलब्ध असायला हवं, कारण ते जे काही करत असतील त्यापेक्षा मला बोलायचं ते जास्त महत्त्वाचं आहे, अशी भावना त्यामागे असते. आपण या गोंधळानुसार कोणाबद्दल तरी विध्वंसक कृती करतो- त्यांच्यावर ओरडतो, त्यांच्याशी क्रूर वागतो- आणि मला हवं तसं ते करत नाहीत किंवा ते जे काही करत आहेत ते मला आवडत नाही, त्यामुळे मी हे करायलाच हवं, अशी ही भावना असते. मला जे काही हवंय ते त्यांना हवंय त्यापेक्षा अर्थातच जास्त महत्त्वाचं आहे, त्यामुळे मला हवं ते त्यांनी करायला हवं. किंवा अशाच गोंधळानुसार, आपण सर्वांशी काहीतरी चांगलं वागू शकतो, इतरांशी दयाळूपणे वागतो, कारण त्यांना मी आवडावं असं मला वाटत असतं; त्यांनी माझ्यासोबत आनंदी राहावं असं मला वाटत असतं. इतरांना जे काही हवंय असं मला वाटतं त्यानुसार मी काहीतरी करत राहतो, मला आवश्यक वाटतंय ते करतो, माझ्या मुलीने तिची मुलं कशी वाढवावीत ते सांगतो, तिने तिचं घर कसं चालवावं ते सांगतो. हे मदतीचं ठरणार नाही का? आणि माझ्या मुलीला माझा सल्ला व मदत हवी आहे की नाही, याने काही फरक पडत नाही, मी सर्वांत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं, मला मी स्वतः आवश्यक ठरावं असं वाटतं, आणि तिची मुलं कशी वाढवायची हे माझ्या मुलीपेक्षा मला अर्थातच जास्त चांगलं माहितेय आणि तिला अर्थातच हे माझ्याकडून ऐकून घेण्याची गरज आहे- अशी ही भावना असते.
तर, हा असा गोंधळ विध्वंसक व रचनात्मक अशा दोन्ही वर्तनांमागे असतो. या गोंधळामुळे आपण चढ-उतारांचं चक्र कायम सुरू ठेवतो. यातून कसं बाहेर पडायचं, याचा तपास करायला हवा.
गोंधळातून स्वतःला बाहेर काढणं
या कर्मजन्य प्रवृत्ती व सवयी, विशेषतः प्रवृत्ती कशा परिपक्व होतात, याची यंत्रणा पाहिली, तर आपण अनुभवत असलेल्या आनंद व दुःखाच्या चढ-उताराबद्दलच्या आपल्या प्रवृत्तीशी त्याचा संबंध असल्याचं दिसून येतं. आनंद व दुःख यांच्या आपल्या अनुभवासोबत दोन मानसिक घटक येतात आणि ते इथे महत्त्वाचे आहेत. पहिल्या घटकाला ‘लालसा’ असं म्हणता येईल. आपण आनंद अनुभवतो तेव्हा आपल्याला लालसा वाटते- म्हणजे त्या आनंदापासून वेगळं व्हायला लागू नये, अशी अत्यंत तीव्र इच्छा आपल्यामध्ये निर्माण होते. “दूर जाऊ नकोस, सदासर्वकाळ माझ्यासोबत राहा! जास्त वेळ राहशील का?” – असं आपल्याला इतर कोणासोबत तरी आनंद उपभोगताना वाटत असतं. किंवा आपण चॉकलेट खाताना आनंद अनुभवत असू, अशा वेळीही त्या आनंदापासून आपली फारकत होऊ नये, असं आपल्याला वाटत असतं. त्यामुळेच आपण अधिकाधिक खात राहतो, नाही का? याला लालसा म्हणतात. मग आपण दुःख अनुभवतो तेव्हा त्यापासून मात्र लवकरात लवकर फारकत व्हावी अशी लालसा आपल्यामध्ये निर्माण होते. या दोन्हीच्या खाली दुसरा मानसिक घटक सक्रिय असतो- ‘मी’, ठोस ‘मी’ आणि माझा अनुभव यांच्यात सांगड घालण्याची तीव्र प्रवृत्ती याला कारणीभूत ठरते. मला हा आनंद मिळायलाच हवा आणि मला आनंद देणारं काहीही असेल ते मला अधिकाधिक हवं, त्यापासून माझी फारकत व्हायला नको. मला आवडत नाही, त्यापासून माझी फारकत व्हावी. तुम्ही बोलताय ते मला आवडत नाही, त्यामुळे तुम्ही गप्प बसलात तर बरं किंवा मी तुमच्यावर ओरडेन.
आपल्या जीवनामध्ये आनंद व दुःख यांचा चढ-उतार आपण अनुभवतो, तेव्हा ही लालसा आणि ‘मी’ची अनुभवाशी सांगड घालण्याची उत्कट प्रवृत्ती, या गोष्टी शेवटी गोंधळावर आधारलेल्या असतात- यातून सर्व प्रकारच्या कर्मजन्य प्रवृत्ती पक्व होत जातात. अशा प्रकारे आपण आनंद व दुःखाचा चढ-उतार सुरू ठेवतो आणि आपल्या आधीच्या सगळ्या वर्तनाची पुनरावृत्ती करत राहतो, कारण त्या प्रवृत्तींमधून हेच परिपक्व होऊन बाहेर आलेलं असतं. आनंद व दुःखाच्या प्रत्येक क्षणामध्ये हे दुःख असतं, हे विस्मयकारक आहे. यातून आनंद व दुःखाचे आणखी क्षण निर्माण होतात, ते गोंधळासोबत राहतातच. आपणं आत्ता अनुभवत असलेला गोंधळ आपल्या आधीच्या- म्हणजे आपण आधी आनंद व दुःख अनुभवलं तेव्हाच्या- गोंधळाचा परिणाम असतो.
हे नियंत्रणाबाहेर गेलेलं चक्र, सतत सुरू राहणारं चक्र- यालाच बौद्ध धर्मामध्ये ‘संसार’ असं म्हटलं आहे. या गोंधळापासून आपली सुटका झाली, तर कर्माची संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडते आणि आपण संसारापासून मुक्त होतो. गोंधळाच्या जागी आपण अचूक समजुतीला स्थान दिलं- याच्या अर्थविवरणाच्या अधिक तपशिलात मी जात नाही, फक्त ढोबळ संकल्पना मांडतो- तर, या ठोस ‘मी’ला काही पाया राहत नाही- “मला हे हवंच आणि मला ते नको” या भावनेला काही आधार राहत नाही. लालसा राहत नाही, त्यामुळे अशा प्रवृत्ती व सवयींना सक्रिय करणारा काही घटकच उरत नाही. असा घटकच नसल्यावर आपल्याला अजूनही त्या प्रवृत्ती व सवयी आहेत, असंही म्हणता येत नाहीत.
मी एक उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो. डायनासॉर पाहण्याची प्रवृत्ती असेलही, पण डायनासॉर नामशेष झाल्यावर त्यांना बघायची प्रवृत्ती उरलेली नाही, तुम्ही जंगलातून फेरफटका मारता तेव्हा अशी काही भावना मनात निर्माण होत नाही, हो ना? ही प्रवृत्ती पूर्वी होती: मी जंगलातून चालत जात असताना कायम डायनासॉर पाहत असे. पण आता डायनासॉर नाहीत, त्यामुळे डायनासॉरना पाहण्याची प्रवृत्तीही आता उरलेली नाही. आणि कर्मजन्य प्रवृत्ती पक्व होत नसतील, तर प्रवृत्ती उरणार नाही, त्यामुळे आपल्याला आनंद व दुःख यातील चढ-उतार अनुभवावे लागणार नाहीत, आणि त्या संबंधीचा गोंधळही अनुभवायला लागणार नाही; ते सगळंच गेलेलं असेल.
अशा प्रकारे आपण या संपूर्ण संसारी स्थितीतून मुक्त होऊ. आनंद व दुःखाचे असमाधानकारक व असुरक्षित करणारे चढ-उतार आपल्याला अनुभवावे लागणार नाहीत, पण त्याऐवजी एका अतिशय वेगळ्या प्रकारच्या आनंदाचा, एका अतिशय वेगळ्या गुणवत्तेचा अतिशय स्थिर अनुभव आपल्याला येईल- हा आनंद गोंधळात मिसळलेला नसेल, आणि “मी खेळात जिंकलोय, तर हे माझं बक्षिस आहे” अशा प्रकारचाही हा आनंद नसेल. एखाद्या अडचणीतून बाहेर पडल्यावर अनुभवायला मिळतो तसा हा आनंद असेल. एक साधं उदाहरण माझ्या मनात येतंय, आपण बोलतोय त्या संदर्भात हे अगदी अचूक उदाहरण नाही, पण तरी सांगतो- आपले घट्ट झालेले बूट आपण दिवसाअखेरीला काढतो, तेव्हा त्या वेदनेपासून मुक्त झाल्याचा जो अत्यानंद असतो, तशा प्रकारच्या आनंदाबद्दल मी बोलतो आहे.
शिवाय, या मुक्तीमधून आपल्या अनुभवास येतं की, आपल्या कृती आता कर्मजन्य अनिवार्य उत्कटतेने प्रेरित होत नाहीत, त्यामुळे आपण विशिष्ट प्रकारेच वागून विशिष्टच अनुभवत घेत नसल्याचं आपल्या लक्षात येतं. उलट, आपण केवळ मुक्ततेच्या पलीकडे जाऊन बुद्ध होण्यासाठी कार्यरत राहतो, आपल्या कृती करुणेने प्रेरित झालेल्या असतात- इतरांनी त्यांच्या दुःखापासून आणि दुःखाच्या कारणांपासून मुक्त व्हावं ही इच्छा त्यामागे असते.
समारोपाचे शब्द
कर्म या विषयाशी निगडित काही तत्त्वांची ही प्राथमिक ओळख आहे. याहून बरंच, बरंच, बरंच काही बोलण्यासारखं आणि स्पष्ट करण्यासारखं आहे. यातील काहींचं स्पष्टीकरण विशिष्ट सर्वसाधारण तत्त्वांद्वारे करता येतं. यातील काही तत्त्वांचं काही सर्वसाधारण तत्त्वांद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे, म्हणजे अशा प्रकारची कृती अशा प्रकारचा परिणाम करते, आणि अशा प्रकारचा घटक असेल, तर हा परिणाम जास्त तीव्र असतो आणि तो घटक नसेल- म्हणजे एखादी गोष्ट हेतूतः न करता अपघाताने झालेली असेल- तर त्याचा परिणाम निराळा असतो, इत्यादी. यात आणखी बरेच तपशील आहेत.
शिवाय, आत्ता या क्षणी काय पक्व होणार आहे, या संदर्भात सर्वसाधारण तत्त्वांद्वारे बोलणं अतिशय अवघड आहे, कारण आपल्या भोवती घडणाऱ्या सगळ्याचा त्याच्यावर परिणाम होत असतो. आपल्यासोबत आत्ता काय घडतंय, याचं सर्वसाधारणीकरण सर्वसाधारण तत्त्वांद्वारे करता येत नाही, कारण आत्ता आपल्यासोबत काय घडतंय याच्यावर इतर सर्व घडामोडींचा परिणाम होत असतो. रस्त्यावर तुमचा अपघात झाला, तर तो कशाने झाला असेल? या प्रश्नाचा विचार करा. कर्मामुळे इतर सर्व जण त्यांच्या-त्यांच्या बाजूने रस्त्यावर आले, वाहतुकीची अवस्था बिकट होती, आणि हवामान, आणि रस्त्याची परिस्थिती- या सगळ्याचा तो परिणाम असतो. त्यामुळे एखाद्या अपघातासारखी घटना पक्व होत असतानाही अनेक घटक त्यासाठी कारणीभूत ठरलेले असतात.
आपल्याला या विषयामध्ये रस वाटला, तर त्याचे अनेक वेगवेगळे पैलू शोधायला बराच वाव आहे. कर्माविषयी आपण जितकं अधिक जाणून घेऊ तितकं ते आपल्याला कर्माच्या नियंत्रणावर मात करायला मदतीचं ठरेल, असं मला वाटतं. अशाने आपण सांसारिक दुःखातून स्वतःला मुक्त करू शकतोच, शिवाय इतर सर्वांनाही मदत करण्यासाठी आपल्याला अधिक उचित स्थान प्राप्त होईल.
आपले काही प्रश्न आहेत का?
प्रश्न
या संदर्भात अपराधभावाचा विचार होत नाही का? इथे अपराधभावाचा संबंध नाही का?
बरोबर आहे. कर्माविषयीच्या बौद्ध स्पष्टीकरणामध्ये अपराधभावाचा काहीही संबंध नाही. अतिशय ठोस ‘मी’ हे वेगळं अस्तित्व मानण्यावर आणि हे वेगळं अस्तित्व म्हणून मी केलेल्या कृतीवर अपराधभावाचा विचार आधारलेला आहे. हे पिंग-पाँग बॉलांसारखं असतं. ‘मी’ हे अस्तित्व इतकं वाईट आहे आणि या अस्तित्वाद्वारे ‘मी जे काही केलं’ ते इतकं वाईट आहे, अशी आपली धारणा निर्माण होते. ही दोन ठोस अस्तित्व आहेत, आणि त्यापासून फारकत शक्य नाही- असा निवाडा यामध्ये आहे, त्यातून अपराधभाव येतो. आपल्या घरातून कचरा कधीच बाहेर फेकून न देण्यासारखा हा प्रकार आहे. कचरा सतत घरात ठेवायचा आणि मग हे किती भयंकर आहे, याचा किती घाण वास येतोय, हे किती गलिच्छ झालंय, असं बोलत राहायचं.
हे अतिशय स्पष्ट व अतिशय तर्कशुद्ध वाटतंय, आणि मला संपूर्ण व्यवस्था व गोंधळापासून, उत्कट इच्छेपासून, प्रवृत्तींपासून आणि सगळ्यापासून सुटका कशी करून घ्यायची, हे माझ्या लक्षात येतेय. पण आत्ता अनुभवापासून किंवा अनिवार्यतेने कृती करण्याच्या प्रेरणेपासून सुटका करून घेण्यासाठी ही समजूत पुरेशी नाही, असं मला वाटतं.
बरोबर आहे. यासाठीच आपण पहिल्यांदा नैतिक स्वयंनियंत्रणाचा वापर करणं गरजेचं असतं. “तू आज किती घाणेरडा ड्रेस घातलायंस” असं म्हणावंसं मला वाटणं आणि मी प्रत्यक्षात तसं म्हणणं यात किंचितसा विराम असतो, असा उल्लेख आपण सुरुवातीला केला, ते आपल्याला आठवत असेल. तो अवकाश आपल्याला पकडता आला, तर आपल्या अशा बोलण्याचा परिणाम काय होईल हे ठरवण्याची क्षमता आपल्यामध्ये येईल. आणि असं बोलणं उत्पादक ठरणार नाही, हे आपल्या लक्षात आलं, तर आपण तसं बोलणार नाही. इथे आपली सुरुवात होते- नैतिक शिस्त व आत्मनियंत्रण यांपासून.
शिवाय, मला एखादी गोष्ट करावीशी वाटते, तेव्हा माझ्या मनात कोणती भावना असते, याचीही तपासणी आपण करू शकतो. काहीतरी करण्याची माझी इच्छा लोभासारख्या अस्वस्थकारक भावनेवर आधारलेली आहे का? ती संतापावर आधारलेली आहे का; ती भाबडेपणावर आधारलेली आहे का? ‘तुझा ड्रेस घाणेरडा आहे’ असं समोरच्याला म्हटल्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, असं मला वाटतं का? की, माझी इच्छा दयाळूपणावर आणि अशा अधिक सकारात्मक गोष्टींवर आधारलेली आहे? यासाठी अस्वस्थकारक भावना किंवा प्रवृत्ती याची व्याख्या करणं अतिशय मदतीचं ठरू शकतं: ही एक मनोवस्था असते, ती निर्माण होते, तेव्हा त्यातून आपली मनःशांती ढासळते आणि आपलं आत्मनियंत्रण संपून जातं.
आपली मनःशांती ढासळल्याचंही आपल्याला सांगता येतं: अशा वेळी आपल्या हृदयाचे ठोके वेगाने पडतात; आपल्याला थोडं अस्वस्थ वाटतं. मग आपण सूक्ष्म गोष्टी लक्षात घ्यायचा प्रयत्न करावा- उदाहरणार्थ, हे मी अभिमानाने बोलतो आहे का? “मला हे कळलं नाही,” असं कोणी म्हणालं, आणि तुम्ही म्हणालात की, “ओह्, पण मला समजलं!”, तर त्यातून आपल्याला थोडं अस्वस्थ वाटतं, यामागे काही अभिमानाची भावना असते, काही अहंकार असतो, तर अशा गोष्टी शोधाव्यात.
परंतु, वास्तव समजून घेणं, म्हणजे पोकळीची समज प्राप्त करणं अतिशय अवघड असतं, आणि आपल्याला अशी समज येते, तेव्हा आपण तिच्याशी जुळवून घ्यायला हवं, जेणेकरून ती सदासर्वकाळ आपल्यासोबत राहील. यासाठी आपण नैतिक स्वयंशिस्त अंगीकारायला सुरुवात करतो, जेणेकरून आपल्याला विध्वंसक कृती करण्यापासून थांबवता येईल.
मला काही गोष्टी समजल्या नाहीत. या आनंदाला व दुःखाला, या चढ-उताराला कायम ठेवण्याचं काम दोन भावना करतात, असा उल्लेख तुम्ही केलात. यातील एक भावना लालसेची असते, असं तुम्ही म्हणत होतात आणि दुसरी कोणती असते?
कर्मजन्य प्रवृत्तींना सक्रिय करणारे दोन घटक मी स्पष्ट करून सांगत होतो- परावलंबी उदयाच्या बारा दुव्यांसंबंधीच्या शिकवणीतून हे आलेलं आहे. यातील एक आहे, लालसा. आणि दुसरी- हे मी सुलभीकरण करून सांगत होतो- दुसरी गोष्ट मुळात “प्राप्तकर्त्याची प्रवृत्ती किंवा भावना” अशी आहे, त्यात पाच भिन्न शक्यता आहेत. त्यातील सर्वांत ठळक शक्यता म्हणजे ठोस ‘मी’ आणि आपण अनुभवतोय त्या गोष्टीची सांगड घालणं.
ठोस ‘मी’ची सांगड घालण्याची ही कृती कशाशी जोडलेली असते का? इथे गोंधळ असतो, आणि सावध राहून आपण गोंधळातून सुटका करून घ्यायला हवी, हे स्पष्ट आहे. पण आपण कशामुळे गोंधळलो आहोत आणि आपण कशा संदर्भात गोंधळलो आहोत?
हा सहजपणे उत्तर देता येईल असा सोपा प्रश्न नाही. आपण अस्तित्वात असलेल्या ‘मी’च्या बाबतीत, प्रचलित ‘मी’च्या बाबतीत गोंधळ करतो आहोत. हा ‘मी’ आणि अस्तित्वात नसलेला भ्रामक ‘मी’ यांच्यातला हा गोंधळ आहे. प्रत्यक्षातील ‘मी’ अस्तित्वात नाही, अशी एक अशक्यता आपण कल्पितो आहोत, ही अतिशयोक्ती आहे. अस्तित्वात नसलेल्या गोष्टीची भर यातून टाकली जाते. उदाहरणार्थ, मी आनंदी आहे किंवा मी दुःखी आहे. तुम्ही दुःखी आहात असं नव्हे; मी दुःखी आहे. आनंदाचा किंवा दुःखाचा अनुभव येतो, तेव्हा आपण मी आनंदी आहे असं म्हणतो. तुम्ही आनंदी आहात किंवा दुसरं कोणीतरी आनंदी आहे, असं ते नसतं- मी आनंदी असतो. हा ‘मी’ म्हणजे प्रचलित ‘मी’, अस्तित्वात असतो.
या प्रचलित ‘मी’चं उदाहरण देतो. समजा आपण एखादा चित्रपट पाहत असू, समजा, ‘गॉन विथ द विंड’ हा चित्रपट असेल. त्यामध्ये एका आनंदी दृश्य आहे, मग एक दुःखी दृश्य आहे, आणि मग पुन्हा आनंदी दृश्य आहे. तर, इथे काय सुरू असतं? हे आनंदी दृश्य ‘गॉन विथ द विंड’मधलं असतं आणि ते दुसरं दुःखी दृश्य ‘गॉन विथ द विंड’मधलंच असतं. या सगळ्या गोष्टीला आपण रूढ धाटणीनुसार ‘गॉन विथ द विंड’, असं संबोधू. त्यातल्या सर्व आनंदी व दुःखी दृश्यांना याच नावाने संबोधू. परंतु, ‘गॉन विथ द विंड’, हे फक्त शीर्षक आहे, एक नाव आहे. पण आपण ‘गॉन विथ द विंड’बद्दल बोलत असतो, तेव्हा फक्त त्या शीर्षकाबद्दल बोलत नसतो. आपण त्या प्रत्यक्ष चित्रपटाबद्दल बोलत असतो- ते शीर्षक ज्या चित्रपटाचा निर्देश करतं त्याबद्दल बोलत असतो. हा प्रचलितरित्या अस्तित्वात असलेला चित्रपट आहे: तो अस्तित्वात आहे. तो चित्रपट त्यातील दृश्यांपासून विभक्त नसतो- त्या दृश्यांपासून विभक्त असलेला चित्रपट भ्रामक चित्रपट असेल. तो अस्तित्वात नसतो. प्रचलित अस्तित्वात असलेला चित्रपट म्हणजे आपण दृश्यांच्या आधारे ज्यावर शिक्का मारू शकतो असा चित्रपट.
त्याचप्रमाणे, आपल्या जीवनामध्ये आनंदी क्षण असतात, आपल्या जीवनामध्ये दुःखी क्षणही असतात, इत्यादी, आणि या सगळ्याला आपण काय संबोधतो? याला आपण ‘मी’- प्रचलित ‘मी’ असं संबोधतो- हा ‘मी’ अस्तित्वात असतो: हा तुम्ही नसतो, ‘मी’ असतो. त्याचप्रमाणे तो चित्रपट ‘गॉन विथ द विंड’ आहे, ‘स्टार वॉर्स’ नव्हे. पण आनंद व दुःखाचे क्षण अनुभवणाऱ्या माझ्याहून वेगळा असा काही ‘मी’ नसतो. तसा ‘मी’ भ्रामक असेल, अस्तित्वात नसलेला ‘मी . आणि ‘मी’ हा फक्त एक शब्द आहे; त्यामुळे एका जीवनातल्या सर्व क्षणांच्या अनुभवाआधारे तो शब्द केवळ ‘मी’ असा निर्देश करत असतो.
या शरीराच्या आत, त्यात रहिवास करणारा, शरीराशी कसातरी जोडला गेलेला, बटणं दाबणारा, कोणीही विभक्त ‘मी’ आहे, असा विचार करणं गोंधळाचं असतं. माझ्या पायातील वेदना तो ‘मी’ अनुभवतो आहे आणि मी अतिशय दुःखी आहे आणि मला ते आवडत नाहीये. शरीर नावाच्या त्या परक्या गोष्टीमधला संपूर्ण अनुभव त्या विभक्त ‘मी’द्वारे घेतला जात असल्यासारखी ही मांडणी आहे. तर, हा विभक्त ‘मी’- हा भ्रामक ‘मी- आणि प्रचलित ‘मी’ यांच्यात गोंधळ करून, भ्रामक ‘मी’शी स्वतःची सांगड घालून आपल्याला लालसेने असं वाटू लागतं की, “या दुःखापासून, या वेदनेतून, या शारीरिक वेदनेतून अनुभवाला येणाऱ्या दुःखातून माझी सुटका व्हायला हवी.” अर्थातच, ठोस ‘मी’बद्दल आपली अशी गैरसमजूत नसते, पण आपण नुसतं बसून राहून वेदना सहन कराव्यात, असा याचा अर्थ नव्हे. आपला पाय आगीत असेल, तर अर्थातच आपण पाय आगीतून बाहेर काढतो, पण यामागची ‘मी’ची संकल्पना बरीच वेगळी आहे. त्यात भीती नाही.
पण भ्रामक ‘मी विरुद्ध प्रचलित ‘मी’, ही संकल्पना अतिशय गुंतागुंतीची व पुढारलेली आहे. त्यामुळे आत्ता ती बाजूला ठेवू. आजच्या संध्याकाळी आपण इथेच थांबू. यातून जी काही समजूत, जी काही सकारात्मक शक्ती निर्माण झाली असेल, ती खोलवर जावो आणि अधिक सक्षम होत जावो, आणि सर्वांच्या लाभासाठी साक्षात्काराकडे पोचण्यासाठी ती कारणीभूत ठरो, असा विचार आपण करू.