विध्वंसक वर्तनाची व्याख्या
नितीमूल्यांनुसार कृती करण्याच्या प्रत्येक पद्धतीमध्ये विध्वंसक वर्तनाचे काही प्रकार असतात. काय स्वीकारार्ह आहे आणि काय नाही यावर हे वर्तनाचे प्रकार आधारलेले असतात. धार्मिक किंवा नागरी व्यवस्था या प्रामुख्याने दैवी नियम, कुणीतरी प्रमुख शासनकर्ता किंवा काही प्रकारची विधीमंडळ स्वरूपाची रचना यांच्या माध्यमातून तयार झालेल्या असतात. जेव्हा आपण आज्ञेचे उल्लंघन करतो तेव्हा आपण दोषी ठरतो आणि आपल्याला शिक्षा देणे आवश्यक ठरते. जेव्हा आपण आज्ञाधारक असतो तेव्हा आपल्याला एकतर स्वर्गामध्ये त्याचे बक्षीस मिळते किंवा एक सुरक्षित आणि सौहार्दपूर्ण असा समाज आपल्याला लाभत असतो. मानवतावादी प्रणाली ही कोणत्याही प्रकाराने दुसऱ्याचे नुकसान होणार नाही यावर भर देते परंतु ते सुद्धा काहीवेळेस समस्या निर्माण करणारे ठरते. कारण आपण प्रत्येकवेळी एखादी बाब खरोखर दुसऱ्यांसाठी नुकसानकारक किंवा हितकारक आहे का हे ठरवू शकतो का? उदाहरणादाखल सांगायचे झाले तर एखाद्यावर दुसरा कुणी ओरडला तर कदाचित त्याने त्याच्या भावना दुखावू शकतात परंतु कदाचित ते ओरडणे एखाद्या पुढच्या धोक्यापासून वाचवणारेही ठरू शकते.
बौद्ध नीतीविचार हा आत्मविध्वंसक वर्तनापासून दूर राहण्यावर भर देतो. दीर्घकाळाचा विचार करता ज्या कृती आपल्यासाठी अहितकारक असतील आणि आपले नुकसान करतील त्यापासून दूर राहण्यावर भर देतो. वेडेपणाने आपल्या पुढे जाऊ पाहणाऱ्या गाडीच्या चालकावर आपण ओरडलो तर त्या क्षणापुरते आपल्याला बरे वाटेल परंतु त्यातून आपले मन अस्थिर होईल आणि आपल्या शरीरातील ऊर्जा विनाकारण जागृत होतील व त्यातून अंतिमत: आपले मन:स्वास्थ आपण हरवून बसू. जेव्हा आपण या ना त्या कारणाने ओरडण्याची सवय लावून घेऊ तेव्हा त्यानंतर कोणतीही असुविधाजनक परिस्थिती निर्माण झाली तर ती सहन करण्याची क्षमता आपण गमावून बसतो. त्यामुळे आपले इतरांशी असणारे संबंध तर बिघडतातच परंतु आपल्या आरोग्यावरही त्याचा विपरित असा परिणाम होतो.
दुसऱ्या बाजूला जेव्हा आपल्याला इतरांची खरोखर मनापासून काळजी असते, प्रेम, करुणा आणि समजुतदारपणा हे आपले स्वभावगुण बनतात तेव्हा आपल्याला एखाद्यावर ओरडावेसे वाटत असले तरीही आपण त्याच्यावर ओरडणे टाळतो. आपण त्या गाडीच्या चालकाला पुढे जाण्याची मुभा देतो तेव्हा परिणामस्वरूप त्या चालकाला मनापासून आनंद होतो आणि आपल्यालाही त्याचा लाभ होतो. आपण शांत आणि स्थिर राहतो. आपले मन:स्वास्थ चांगले राहून आपण शांत चित्त राहतो. आपण आपली ओरडण्याची आणि स्वत:ला अस्वस्थ करण्याची भावना अडवून धरत नाही. उलट, रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकालाच आपल्या इच्छित स्थळी वेळेत पोहोचण्याची इच्छा असते हे आपण लक्षात घेऊ लागतो. त्याचबरोबर, प्रवासात आपण विनाकारण स्पर्धेत अडकण्यापासून दूर होतो आणि त्यातील खरी निरर्थकता आपल्या लक्षात येते.
बौद्ध धर्मात विध्वंसक वर्तनाची व्याख्या केलेली आहे. त्यानुसार, विचलित करणाऱ्या भावना आणि नकारात्मक सवयी यांच्या प्रभावाखाली येऊन जबरदस्तीने होणारी ती कृती असते. नक्की काय नुकसानकारक आहे आणि काय उपयुक्त ठरणारे आहे याची विभागणी आपण नेमकेपणाने करू शकत नाही कारण कदाचित आपल्याला सर्वोत्तम काय आहे हेच ठाऊक नसते किंवा कदाचित ते माहित असले तरीही आपल्यामध्ये स्व-नियंत्रणाचा पूर्णत: अभाव असतो. लोभ आणि क्रोध या सर्वाधिक विचलित करणाऱ्या भावना आहेत. जेव्हा या त्रासदायक भावनांचा प्रभाव असतो तेव्हा आपल्या कृती, बोलणे आणि विचार यांच्यावरही त्यांचा परिणाम होत असतो. या शिवाय, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्याला आत्मसन्मानाचा अभाव असल्याची जाणीव होत राहते आणि त्यामुळे आपण कसे वागतो याची पर्वाही केली जात नाही. तरीही आपल्यामध्ये एक ताठा कायम राहतो. त्यामध्ये आपण इतर कोणत्याही महत्त्वाच्या बाबींना महत्त्व न देता वरवरच्या उथळ गोष्टींना महत्त्व देत राहतो. आपण कोणते आणि कसे कपडे घातलेले आहेत, आपले केस कसे दिसत आहेत आणि आपले मित्र कोण आहेत यांना अधिक महत्त्व दिले जाते. आपल्या संपूर्ण पिढीवर, आपल्या लैंगिकतेवर, राष्ट्रीयत्वावर, धर्मावर किंवा ज्यामुळे आपली ओळख असते त्या समूहावर आपल्या वागण्याचा काय परिणाम होणार आहे याची आपल्याला जराही पर्वा राहत नाही. आपण आत्माभिमान आणि आत्मसन्मान पूर्णपणे हरवून बसतो.
दहा विध्वंसक वर्तनांची पारंपरिक यादी
विध्वंसक म्हणता येतील अशा अनेक शारीरिक, शाब्दिक आणि मानसिक कृती असतात. बौद्ध धर्मात त्यापैकी दहा नुकसानकारक वर्तनांचा उल्लेख केलेला आहे. अशा प्रकारची वर्तने अहितकारक असतात कारण ती प्रामुख्याने अस्वस्थ करणाऱ्या भावना, निर्लज्जपणा, कशाचीच लाज न वाटणे आणि कशाचीही पर्वा नसणे यांच्यातून उद्भवत असतात. मनात खोलवर जाऊन बसलेल्या अंगभूत सवयींतून हे वर्तन बाहेर येत असते आणि त्यामुळे परिणामस्वरूप आपल्या नकारात्मक वृत्तींना प्रोत्साहन मिळत राहते. दीर्घकाळाचा विचार करता आपल्या विध्वंसक वर्तनामुळे आपण दु:खी आयुष्याच्या दिशेने वाटचाल करीत जातो. तिथे आपण आपल्यासाठीच नवनविन समस्या निर्माण करीत असतो.
विध्वंसक म्हणता येतील असे शारीरिक वर्तनाचे तीन प्रकार दिसून येतात.
१. दुसऱ्याचा जीव घेणे - अगदी दुसऱ्या व्यक्तीपासून ते अगदी छोट्याशा किड्यापर्यंत. परिणामस्वरूप, आपल्याला जी गोष्ट पसंत पडत नाही ती सहन करण्याची क्षमताच उरत नाही. त्यामुळे आपल्याला जे आवडत नाही त्यावरचा आपला तत्काळ प्रतिसाद ती गोष्ट दूर हटवणे किंवा नष्ट करणे हा असतो. त्यामुळे आपण सातत्याने संघर्षामध्ये सापडू लागतो.
२. जे आपले नाही ते सुद्धा मिळवणे - चोरी करणे, आपण जे दुसऱ्याचे घेतलेले आहे ते परत न करणे, दुसऱ्याच्या मालकीची असणारी एखादी गोष्ट आपण त्याच्या परवानगीविना वापरणे अशा कितीतरी गोष्टी यात येतात. त्यामुळे अंतिमत: आपण स्वत:ला कायम गरीब आणि आरोपी मानत राहतो. आपल्याला कुणीही काहीही कर्जाच्या स्वरूपात देण्यास तयार होत नाही. आपले इतरांशी असणारे संबंध हे प्रामुख्याने परस्परांच्या पिळवणुकीवर आधारित बनून जातात.
३. अयोग्य अशा स्वरूपाच्या लैंगिक वर्तनात गुंतणे - बलात्कार, व्यभिचार, जवळच्या नातलगांशी लैंगिक संबध इत्यादी. परिणामस्वरूप, आपले लैंगिक संबंध हे प्रामुख्याने अल्प काळापुरते राहतात आणि त्यामुळे आपण व आपला सातत्याने बदलणारा लैंगिक साथीदार हे क्वचितच एकमेकांवर आक्षेप घेऊ शकतात. प्रामुख्याने अश्लील, गलीच्छ असणाऱ्या गोष्टींकडेच आपला ओढा वाढतो.
शाब्दिक स्वरूपाच्या विध्वंसक वर्तनाचे चार प्रकार सांगितलेले आहेत.
१. खोटे बोलणे - सारे काही समजत असताना खोटे बोलून इतरांची दिशाभूल करणे किंवा यासारखे प्रकार. याचा परिणाम म्हणजे आपण जे काही बोलतो त्यावर कुणीही कधीही विश्वास ठेवत नाही अगर आपले म्हणणे खरे मानत नाही. त्याचप्रमाणे समोरची व्यक्ती काय सांगते आहे यावर आपणही विश्वास ठेवत नाही. वास्तव आणि आपण रचलेल्या गोष्टी यांच्यामध्ये नक्की फरक काय आहे हे आपल्याला नीटपणाने सांगताही येत नाही.
२. वाईट गोष्टी बोलून फूट पाडणे : दोघांमध्ये वितुष्ट निर्माण होईल अशा पद्धतीने वाईट गोष्टी सांगणे किंवा त्यांच्यातील शत्रुत्व वा परकेपणा आणखी वाढेल अशा पद्धतीने बोलणे. याचा परिणाम असा होतो की आपली कुणाशीही दीर्घकाळ मैत्री टिकत नाही. कारण आपल्या मित्रांनाही संशय येत राहतो की आपण त्यांच्याविषयी देखील त्यांची पाठ फिरल्यानंतर वाईट गोष्टी बोलत असू. त्यामुळे आपल्याला एकही जवळचा मित्र राहत नाही. आपण कायम एकाकी पडतो आणि अलिप्त राहण्याची वेळ येते.
३. कटू बोलणे - दुसऱ्याच्या भावना दुखावतील अशा पद्धतीचे बोलणे. याचा परिणाम म्हणजे लोकांना आपण आवडेनासे होतो आणि ते आपल्याला टाळू लागतात. जेव्हा लोक आपल्यासमवेत असतील तेव्हाही ते सहजतेने आरामात बसू शकत नाहीत. आपल्या पाठीमागे ते आपली बदनामी करत राहतात. त्यामुळे सुद्धा आपण एकटे पडतो आणि सर्वांपासून वेगळे होऊन राहण्याची वेळ येते.
४. निरर्थक बडबड - अत्यंत निरर्थक अशी बडबड करून आपला आणि इतरांचा वेळ वाया घालवत राहणे. जेव्हा इतर लोक काहीतरी सकारात्मक गोष्टी करत असतील तेव्हा त्यावेळी अर्थहीन बडबड करून त्यांच्या कामात व्यत्यय आणणे. त्याचा परिणाम म्हणून, आपल्याला कुणीही गांभीर्याने घेत नाही. आपण मनाने इतके अस्थिर होतो की आपण हाती घेतलेल्या कोणत्याही एका कामावर मन एकाग्र करू शकत नाही. आपल्या हातात असणाऱ्या उपकरणाकडे सारखे लक्ष जाऊन मन विचलित होत राहते. या निरर्थक कृतींतूनही आपल्या हाती काहीच लागत नाही.
विध्वंसक विचार करण्याचे तीन मार्ग आहेत.
१. मनात लालसा ठेवून विचार करणे : इतरांविषयी मनात हेवा असल्याने, वेडसरपणाने विचार केल्याने आणि इतरांना मिळू शकणारी गोष्ट आपणच कशी मिळवायची, अधिक प्रमाणात आणि चांगली कशा रितीने मिळवता येईल याचा विचार केला जातो. याचा परिणाम म्हणून आपल्याला कधीही मन:शांती किंवा आनंद मनापासून अनुभवता येत नाही. आपल्यावर कायम इतरांच्या यशाविषयी नकारात्मक विचारांचा प्रभाव राहतो.
२. द्वेषभावना ठेवून विचार करणे : इतरांना कसे दुखवता येईल याचा विचार करणे आणि तशी योजना आखणे किंवा ते जी गोष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत किंवा बोलले आहेत ती कशी होणार नाही हे पाहणे. याचा परिणाम म्हणून आपण स्वत: कधीही सुरक्षित अथवा निवांतपण अनुभवू शकत नाही. आपण कायम विकृतीच्या मानसिक आजारात किंवा भीतीमध्ये राहतो. इतर लोकसुद्धा आपल्या विरोधात अशाच योजना आखत असतील अशी भीती कायम आपल्या मनात घर करून राहते.
३. शत्रुत्वाच्या भावनेतून विकृत विचार करणे : जे खरे आहे आणि योग्य आहे त्याच्याऐवजी हट्टीपणाने त्याच्या नेमक्या विरोधात विचार करणे. आपल्या मताशी जे सहमत नसतील त्यांच्याशी आपल्या मनामध्ये वाद घालत राहणे आणि जाहीर मतभेद दर्शवून त्यांची मान खाली घालण्यासाठी आक्रमकपणे प्रयत्न करणे. याचा परिणाम म्हणून आपण अतिशय संकुचित विचार करू लागतो. कोणत्याही चांगल्या उपयुक्त सूचना आणि अगर सल्ले स्वीकारण्याची आपली तयारीच नसते. आपल्या मनाचे दरवाजे इतरांसाठी बंद होऊन जातात. आपण केवळ आपला स्वत:पुरता विचार करू लागतो आणि आपणच नेहमी बरोबर असतो असा आपला ग्रह होऊन जातो. आपण संपूर्णत: अज्ञानी आणि मूर्ख राहतो.
आपली धार्मिक पार्श्वभूमी किंवा श्रद्धा यांच्याखेरीज, ज्या व्यक्तीला आनंदी आयुष्य जगायची इच्छा आहे अशा कुणीही दहा वर्तणुकींपासून दूर राहणे वा त्यांना विरोध करणे गरजेचे आहे.
विध्वंसक वर्तनाचे दहा व्यापक प्रकार
दहा विध्वंसक वर्तनांमध्ये वागण्याच्या संदर्भातील व्यापक अशा दहा व्यापक प्रकारांचा समावेश होतो. अशा गोष्टी आपण टाळणे आवश्यक आहे. आपल्या वागण्याविषयी आणि त्याच्या परिणामांविषयी आपण जितका अधिक व्यापकपणे विचार करू शकू तितका करायला हवा. ज्यांचा आपण विचार करायला हवा अशी काही उदाहरणे पुढे दिलेली आहेत. परंतु मला विश्वास आहे की या यादीमध्येही भर घालून ती यापुढेही वाढवता येऊ शकेल.
१. इतरांचा जीव घेणे : लोकांना मारहाण करणे किंवा त्यांना मानहानीकारक पद्धतीने वागवणे, एखाद्याला प्रत्यक्षात गरज असेल तेव्हा त्याला शारीरिक मदत करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, एखादी व्यक्ती आजारी असताना किंवा ज्येष्ठ व्यक्तीला मदत हवी असताना चटकन तिथून काढता पाय घेणे, कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा, त्यामध्ये पर्यावरणाचे प्रदूषण आणि सिगारेट न ओढणाऱ्यांसमोर विशेषत मुलांसमोर सिगारेट ओढणे अशा कृतींचा समावेश होतो.
२. जे दिलेले नाही ते सुद्धा लुबाडणे : इंटरनेटवरून बेकायदेशीर मजकूर डाऊनलोड करणे, चोरणे, फसवणूक करणे, कर बुडवणे, इतरांच्या खासगी आयुष्यावर आक्रमण करणे, इतकेच काय पण पूर्वपरवानगी न घेता मित्राच्या किंवा आपल्या जोडीदाराच्या प्लेटमधून खाण्याच्या पदार्थांची चव घेणे या सर्व प्रकारांचा समावेश होतो.
३. अनैतिक लैंगिक संबंधांत गुंतणे : एखाद्याचा लैंगिक छळ करणे, प्रणयाराधन करताना आपल्या जोडीदाराच्या अपेक्षा आणि गरजांकडे दुर्लक्ष करणे, खूप कमी अथवा खूप जास्त आकर्षण प्रदर्शित करणे
४. खोटे बोलणे : आपण ज्यांच्यासमवेत नातेसंबंधात आहोत अशा एखाद्या व्यक्तीच्या खऱ्या भावनांची किंवा तिच्या मतांशी प्रतारणा करणे
५. विभक्तपणे बोलणे : एखादी सकारात्मक किंवा नैतिकदृष्ट्या समतोल असणारी गोष्ट करण्यासाठी एखादी व्यक्ती नियोजन करीत असेल त्याच्यावर टीका करणे किंवा त्याचा धीर खचेल असे बोलणे.
६. कठोर बोलणे : लोकांवर ओरडणे, आक्रमक भाषेत बोलणे, भावनिकदृष्ट्या अस्थिर असताना असंवेदनशीलरीतीने आणि टीका करणारे बोलणे. अयोग्य वेळी किंवा चुकीच्या लोकासमोर अश्लाघ्य किंवा उपहास करणाऱ्या भाषेत बोलणे.
७. असंबद्ध बडबड करणे : इतरांचा आत्मविश्वास खचेल असे बोलणे किंवा खासगी गुपीते इतरांसमोर उघड करणे, अत्यंत क्षुल्लक असणाऱ्या गोष्टीसाठी मध्यरात्रीच्या वेळी लोकांना मेसेज करणे, स्वत:च्या आयुष्याबाबतच्या अनेक क्षुल्लक बाबी समाजमाध्यमांवर फोटो आणि प्रतिक्रियांच्या माध्यमातून टाकत राहणे, एखादी व्यक्ती बोलत असताना त्यांचे बोलणे पूर्ण व्हायच्या आधीच त्यामध्ये व्यत्यय आणून बोलायला सुरुवात करणे, गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना अगदी मुर्खासारखे असंबद्ध बडबडणे.
८. लोभीपणाने विचार करणे : एखाद्या हॉटेलमध्ये ज्याने एखादी डिश मागवली असेल त्याने आपल्याला त्याच्या डिशमधील किंवा सूपची चव चाखायला द्यावी अशी अपेक्षा धरणे, समाजमाध्यमांवर जेव्हा चांगल्या गोष्टींचे व उत्तम विषयासंबंधीच्या पोस्ट दिसतात तेव्हा त्यातील फोटो पाहताना किंवा त्या पोस्ट वाचताना स्वत:विषयी खंत वाटून घेणे आणि आपणही असेच लोकप्रिय व आनंदी असावे म्हणून ईर्षा वाटून घेत राहाणे.
९. द्वेषभावनेने पछाडून विचार करणे : जेव्हा एखादा आपल्याला डिवचणारे किंवा क्रूर वक्तव्य करतो तेव्हा आपण शब्द हरवून बसतो. मग आपल्याही मनात हे द्वंद्व सुरू होते की आता आपण असे काय बोलावे ज्यामुळे त्याचेही मन अधिक दुखावले जाईल.
१०. शत्रुत्वाच्या भावनेने विकृतपणे विचार करणे : नकारात्मक विचार करणे, आपण जी गोष्ट स्वत:ची स्वत: हाताळू शकू असे वाटत असते त्या गोष्टीसाठी एखाद्याने मदतीचा हात पुढे केल्यानंतर आपण त्याची भलामण करणे. ज्या गोष्टीत स्वत:ला विकसित करण्याचा एखाद्याने प्रयत्न केला आणि त्यात कुणाचेही नुकसान होणार नसेल तर ते कसे मुर्खपणाचे आहे असा विचार करणे. अशा कोणत्याही विषयात आपल्याला कोणताही रस नसणे किंवा ते महत्त्वाचे नाही असा विचार करणे.
स्वत:च्या संदर्भात विध्वंसक कृती करणे
आपण जसे इतरांच्या बाबतीत वागत असतो त्यावेळी आपण स्वत:च्या संदर्भातसुद्धा विध्वंसक कृती करूनच वागत असतो. आपल्याला आनंदी जगायचे असेल तर आपण या नकारात्मक बाबी समजून घेणे गरजेचे आहे आणि त्या सुधारणेही आवश्यक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा, आपण पुढील दहा प्रकारच्या विध्वंसक कृती टाळून आपल्या वागण्यामध्ये असणारे दोष सुधारणे गरजेचे आहे.
१. इतरांचा जीव घेणे : अतिकामामुळे, निकृष्ट अन्न खाल्यामुळे, व्यायाम न केल्याने किंवा पुरेशी झोप न घेतल्याने आपण आपल्याच शरीराची आबाळ करीत राहतो.
२. जे दिलेले नाही ते सुद्धा दुसºयाकडून ओरबाडणे : क्षुल्लक गोष्टींवर पैसे वाया घालवणे किंवा ज्या गोष्टीवर आपण स्वत:साठी खर्च करण्याची क्षमता राखून असतो तिथेही कंजूसपणा दाखवणे किंवा खालच्या पातळीवर येणे.
३. अयोग्य अशा लैंगिक वर्तणुकीत अडकणे : आपल्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतील अशा लैंगिक कृतींमध्ये अडकणे किंवा अश्लील साहित्य पाहून आपले मन प्रदूषित करून टाकणे
४. खोटे बोलणे : आपल्याच भावना किंवा प्रेरणा यांच्याशी प्रतारणा करणे
५. विभक्तपणे बोलणे : तिरस्कार उत्पन्न होईल अशा पद्धतीने बोलणे, सतत सगळ्याच गोष्टींबाबत तक्रारीचे सूर लावणे. त्यामुळे त्या गोष्टी इतरांना अजिबात आवडत नाहीत आणि लोक आपला सहवास टाळू लागतात.
६. कठोर बोलणे : शब्दांनी स्वत:चाच अवमान करणे.
७. गोंधळल्यासारखी बडबड करीत राहणे : अंदाधुंदपणाने आपल्या खासगी बाबी, शंका किंवा चिंता यांच्याविषयी बोलत राहणे किंवा समाजमाध्यमांवर अखंडपणे वेळ वाया घालवत राहणे, मेंदू बाजूला ठेवून व्हिडिओ गेम खेळत राहणे किंवा इंटरनेटवर वेळ घालवत राहणे.
८. लोभीपणाने विचार करणे : स्वत:ला अती अचूकतेने काम करणारा समजत असल्याने आपण सर्वांपेक्षा वरचढ कसे राहू असा विचार करीत राहणे.
९. द्वेषभावनेने विचार करीत राहणे : आपण किती भयानक आहोत याचा विचार करून खेद वाटणे आणि आपल्याला आनंदी होण्याचा अधिकार नाही असे वाटत राहणे.
१०. शत्रुत्वाच्या भावनेने विभक्तपणाचे विचार करणे : आपण स्वत:ला विकसित करण्याचा प्रयत्न करणे किंवा इतरांची मदत करणे हा मूर्खपणा आहे असा विचार करणे.
विध्वंसक वृत्तीच्या जोडीदारांशी कसे वागावे?
आपण भूतकाळामध्ये कशा पद्धतीच्या विध्वंसक वर्तनाचा आधार घेऊन वागत होतो हे जेव्हा आपण मागे वळून पाहायला लागतो तेव्हा स्वत:विषयी नकारात्मक भावनेने विचार करणे टाळणे अतिशय महत्त्वाचे असते. स्वत:च्या मनात खंत निर्माण करून स्वत:ला अधू करू नये. अज्ञानामुळे आपण कोणत्या चुकीच्या गोष्टी करीत होतो आणि त्या वागण्याचे काय परिणाम होतात हे फक्त जाणून घेणे महत्त्वाचे असते. आपल्याला अस्वस्थ करणाऱ्या भावनांमुळे आपलीही त्यांच्या समवेत फरफट होत राहते. त्याचे कारण आपण मुळात वाईट प्रवृत्तीचे असतो असे नाही. परंतु आपण जे काही केले त्याविषयी आपल्याला खेद वाटत राहतो. असे घडले नसते तर किती बरे झाले असते असे सारखे वाटत राहते. परंतु आपण भूतकाळ बदलू शकत नाही. जे घडून गेले ते गेले. परंतु अशा पद्धतीचे वागणे आपल्याकडून पुन्हा होणार नाही याची दक्षता मात्र आपण आता सर्वतोपरी घेऊ शकत असतो. त्यानंतर, आपले आयुष्य सकारात्मक दिशेने नेण्याच्या दृष्टीने आपण निश्चय करू शकतो आणि प्रेम व करुणेवर आधारित अधिकाधिक चांगल्या कृती करण्याच्या दिशेने प्रयत्न करू शकतो. त्यामुळे आयुष्यातील समतोल राखला जाण्याच्या दृष्टीने अधिकाधिक सकारात्मक कृती केल्या जातात आणि त्यामुळे नकारात्मक कृतींवर मात करू शकेल अशा सकारात्मक बाबींचे नवे आव्हान आपण उभे करू शकतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात जी माणसे येतात आणि ज्या घटना घडत असतात त्यांच्यासंदर्भात आपण जो प्रतिसाद देत असतो त्याचा वेग कमी करू शकतो. आपल्याला विध्वंसक कृती करण्याची सवय असणे आणि प्रत्यक्षात आपण कृती करणे यांच्यामध्ये जो अंतराल असतो तो लक्षात येऊन आपण अधिक सजग होतो. अधिक हितकारक काय असू शकते आणि कोणती गोष्ट नुकसानकारक ठरू शकते हे ठरवण्यासाठी त्या क्षणाचा उपयोग करायला आपण शिकतो. जे काही विध्वंसक ठरू शकते अशी कृती करणे, बोलणे किंवा विचार करणे या सर्वांना प्रतिरोध व्हायला त्यामुळे मदत होते. महान भारतीय बौद्ध संत शांतीदेवा यांनी सुचवले आहे, ‘‘लाकडाचा अडथळा असल्यासारखे राहा.’’ आपण जे काही करू ते समजून उमजून, प्रेमाने, करुणेने आणि स्वत:विषयी व इतरांविषयी आदरभाव राखून केले पाहिजे. याचा अर्थ आपण कुठलीही गोष्ट दाबून टाकीत आहोत असे नाही. कारण त्यामुळे आपण अधिक ताण अनुभवू आणि अधिक अस्वस्थ होऊ. अधिक समंजस आणि करुणापूर्ण मन असेल तर आपण नकारात्मक ऊर्जेला रोखू शकतो आणि नकारात्मक भावनेच्या भरात केलेल्या एखाद्या कृतीमुळे नंतर पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. आपण अधिक योग्य पद्धतीने कृती करण्याचे स्वातंत्र्य अनुभवू शकतो. त्याला सकारात्मक भावना आणि समजूतदारपणाचा भक्कम आधार असतो.
सारांश
आपण जेव्हा विध्वंसक स्वरूपाच्या वर्तनापासून दूर होतो तेव्हा त्याचा फायदा केवळ इतरांनाच होतो असे नाही तर त्याचा सर्वाधिक लाभ आपल्याला स्वत:ला होत असतो. आपल्या दु:खाचे मुख्य कारण आपल्या या वागण्यातच दडलेले होते याची जाणीव जेव्हा होते तेव्हा आपण स्वाभाविकपणे अशा पद्धतीच्या विध्वंसक, नकारात्मक सवयी व कृती टाळण्यासाठी प्रवृत्त होतो. जेव्हा आपण या अशा सवयींचा आपल्यावरील प्रभाव थांबवतो तेव्हा आपले इतरांशी असणारे नातेसंबंध सुधारतात आणि आपण अधिक वास्तववादी व सच्चे होतो. आपल्या रोजच्या जगण्यात आपण शांतता अनुभवतो. आपल्याला खरोखर मन:शांती हवी असेल तर आपल्या विध्वंसक कृती, बोलणे आणि विचार करणे यांच्यावर मात करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे सर्वकाही सातत्याने करीत राहिल्यास आपल्या आयुष्याची गुणवत्ता निश्चितपणे वाढते.