अत्याचारी आध्यात्मिक गुरुंशी वागण्याबाबतचा दलाई लामांचा सल्ला

तुमच्यापैकी जे तिबेटमधून आले आहेत आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले चिनी लोकही येथे आहेत, एका गोष्टीबाबत तुम्ही सर्वांनी ठाम असलं पाहिजे. जेव्हा दांभिक, खोटे आध्यात्मिक शिक्षक असतात, तेव्हा तुम्ही त्यांचा खोटेपणा आणि फसवणूक उघड करणे आवश्यक आहे. याबाबत आपण ठाम असणे आवश्यक आहे.

काही वर्षांपूर्वी धर्मशाळेत तिबेटी बौद्ध धर्म, झेन बौद्ध धर्म आणि यासारख्या गोष्टी शिकवणाऱ्या पश्चिमेकडून आलेल्या शिक्षकांची परिषद झाली होती. या परिषदेच्या प्रसंगी, त्यांच्यातील काही पाश्चात्य शिक्षकांनी असे सांगितले की, “आजकाल, झेन मास्टर्समध्ये असे काही आहेत ज्यांची वागणूक अत्यंत अपमानजनक म्हटली जाऊ शकते आणि त्याचप्रमाणे तिबेटी लामांमध्येही काही आहेत. जे अतिशय अपमानजनक असल्याचे म्हटले जाऊ शकते. या संदर्भात, त्यांना रोखण्यासाठी आपल्याला कुशल पद्धती आणि साधनांची आवश्यकता आहे.”

त्यावेळी मी त्यांना म्हणालो, “त्यांना रोखण्यासाठी आपण स्वतः काहीही करू शकत नाही. भगवान बुद्धांनी स्पष्टपणे आणि निर्णायकपणे घोषित केले आहे की काय सोडले पाहिजे आणि काय स्वीकारले पाहिजे. उदाहरणार्थ, ते स्पष्टपणे आणि निर्णायकपणे म्हणाले होते की, ‘इतरांना शिकवणीच्या उद्दिष्टांनुसार वागण्यास प्रवृत्त करा आणि या उद्दिष्टांनुसार स्वत: सतत कार्य करा.’ परंतु ते ते ऐकत नाहीत; त्यांना त्याची किंमत नाही. जर त्यांनी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या गोष्टींची किंमत केली नाही, तर आमच्या काही बोलण्याने काय साध्य होईल? त्याने काहीच साध्य होणार नाही.

“तुम्ही घडल्या प्रकारांना वाचा फोडणे आवश्यक आहे. लोकांच्या नावाचा थेट उल्लेख करून वर्तमानपत्रात प्रकाशित करा की धर्म शिकवणाऱ्या पण बेपर्वाईने वागणाऱ्यांची ही अशी प्रकरणे आहेत. याला प्रसिद्धी द्या. यामुळे थोडीफार मदत होईल आणि काही फायदा होईल, परंतु त्याशिवाय, आमचे स्पष्टीकरण त्यांना थांबविण्यात उपयुक्त ठरणार नाही.” असे मी त्यांना सांगितले.

आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की ते असे आहे. जेव्हा जेव्हा ढोंगी, खोटे शिक्षक असल्याची परिस्थिती उद्भवेल तेव्हा त्यांची नावे प्रसिद्ध करा आणि शेवटी, त्यांना तुरुंगात टाकणे आवश्यक असल्यास, त्यांना अटकही होऊ द्या. अमेरिकेत असे घडले आहे की काहींना अटक करण्यात आली आहे आणि कदाचित तैवानमध्येही काही जणांना अटक केली जाईल. त्यांना कायद्याने पकडलेच पाहिजे.

जेव्हा असे काही धर्मशिक्षक, “लामा” ही पदवी धारण करून, लज्जास्पद वागणुकीसाठी ओळखले जातात, तेव्हा लोकांच्या नजरेत ठळकपणे दिसतात, तेव्हा त्यांच्या बदनामीमुळे बुद्धधर्माला हानी पोहोचेल असा विचार करून काळजी करण्याची गरज नाही. काही वर्षांपूर्वी, एका प्रसंगी, जेव्हा मी इंग्लंडमध्ये होतो, तेव्हा एका ब्रिटीश धर्म केंद्रात एक लामा होता, ज्याने स्त्रियांशी गैरवर्तणुकीचा घोटाळा केला होता  आणि ज्याला अमेरिकेत कायद्याने पकडले होते. त्यांच्या विद्यार्थ्यांनी मला सांगितले की ते खूप काळजीत आहेत. त्यांना काळजी वाटत होती की, असे असताना, बुद्धाच्या शिकवणीचेच नुकसान होण्याचा धोका आहे. मी त्यांना सांगितले की त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. भगवान बुद्धांच्या आगमनाला २५०० वर्षे पूर्ण झाली आहेत. आजकाल, केवळ काही धर्मशिक्षक आहेत ज्यांना लांच्छनास्पद म्हणून संबोधले जाते. ते बुद्धाच्या शिकवणीचे नुकसान करू शकत नाहीत. हे शिक्षक ज्यांना आता लज्जास्पद म्हणून संबोधले गेले आहे ते बुद्धाच्या शिकवणीला हानी पोहोचवू शकत नाहीत. असे मी त्यांना सांगितले. याबाबत मला खात्री आहे.

Top