नैतिक स्वयंशिस्तीची पारमिताः शील पारमिता

शिस्त. या शब्दामुळे एखाद्याच्या मनात शाळा सुटल्यावर थांबायला सांगितल्याची शिक्षा किंवा आहारसंबंधीचे नियंत्रण अशी चित्रे उमटू शकतात. पण बौद्ध धर्मात, नैतिक स्वयंशिस्त आपल्या वर्तनामुळे स्वतः आपल्यावर आणि इतरांवरही पडणाऱ्या प्रभावाप्रति जागरूक करते. नैतिक स्वयंशिस्त आपल्याला निर्बंध घालण्याऐवजी उलट स्वतःसाठी आणि इतरांसाठीही लाभकारी ठरण्याचे स्वातंत्र्य देते.

प्रस्तावना 

सहा व्यापक दृष्टिकोनांपैकी (पारमिता) नैतिक स्वयंशिस्त हा दुसरा दृष्टिकोन आहे. हा संगीत शिकण्यासाठी किंवा एखाद्या क्रीडा प्रकारातील कौशल्य प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शिस्तीप्रमाणे नाही, तर हा आपल्या नैतिक वर्तनाशी संबंधित आहे. याचा संबंध इतर लोकांवर नजर ठेवण्याशी, कुत्र्यांच्या प्रशिक्षणाशी, लष्करातल्या लोकांवर नियंत्रण प्रस्थापित करण्याशी नाही. इथे आपण फक्त स्वयंशिस्तीविषयी चर्चा करत आहोत, ज्याचे तीन प्रकार आहेत. 

विनाशकारी कृत्यांपासून बचाव 

नैतिक स्वयंशिस्तीचा पहिला प्रकार आहे, कृती, वाणी आणि विचारांच्या संदर्भातून विनाशकारी कृत्यांपासून स्वतःचा बचाव करणे. सामान्यतः आपण दहा प्रकारच्या विनाशकारी कृत्यांपासून स्वतःचा बचाव करतो, जसे हत्या, चोरी, खोटे बोलणे, इत्यादी. जर आपण अशा प्रकारच्या व्यवहारापासून स्वतःला दूर ठेवण्याचे व्रत घेतले असेल, जो व्यवहार आपल्या आध्यात्मिक प्रगतीत बाधक ठरेल, तर आपल्याला त्या व्रताचे पालन करायला हवे. 

जेव्हा आपण विनाशकारी कृत्यांपासून बचावाविषयी बोलतो, तेव्हा त्याचे दोन प्रकार असतात. पहिले वर्तन, जे निसर्गतः विनाशकारी असते, जसे हत्या आणि चोरी, जे समजण्यासही सहजसोपे आहे. याशिवाय असे काही वर्तनही असते, जे स्वतः विनाशकारी नसते, पण बुद्धांनी सांगितले आहे की काही लोकांनी काही वेळेस त्यापासून दूर राहणे चांगले आहे. उदाहरणार्थ, भिक्षु आणि भिक्षुणींनी रात्रीचे भोजन टाळायला हवे, पण हे प्रत्येकाला लागू होत नाही. हा नियम या तथ्यावर आधारित आहे, की रात्री आणि प्रातःकाळी ध्यानधारणेसाठी चित्त निर्मळ असावे, तेव्हा आपण रात्री भोजन न करणेच योग्य ठरेल. भिक्षु आणि भिक्षुणीसंदर्भातील आणखी एक उदाहरण लांब केस न ठेवण्यासंदर्भातील आहे, कारण तसे केल्याने स्वतःच्या सौंदर्याबाबत आसक्ती निर्माण होण्याची शक्यता वाढू शकते आणि रोज केसांची निगा राखण्यात वेळेचा अपव्ययही होतो. अर्थातच हा सल्ला प्रत्येकासाठी नाही, फक्त भिक्षु आणि भिक्षुणींसाठी आहे. 

सकारात्मक कृत्यांमध्ये व्यग्र राहणे

दुसऱ्या प्रकारची नैतिक स्वयंशिस्ती सकारात्मक कृत्यांमध्ये व्यग्र राहण्याशी संबंधित आहे, जी कृत्ये ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक सकारात्मक ऊर्जा विकसित करण्यासाठी गरजेची असतात. ज्याचा संबंध शिकवणींचे अध्ययन, धर्मासंबंधी ध्यानधारणा आणि मनन, दंडवत, अर्पण या सारख्या नंद्रो(उन्नत तंत्र अभ्यासासाठीची प्रारंभिक तयारी) उपासनांशी आहे. 

याशिवाय नैतिक स्वयंशिस्त प्रत्यक्ष वर्तनापेक्षा एक मनोवस्था आहे. ही आपल्या मनाने प्रेरित शिस्त आहे, जी आपल्या वर्तनावर प्रभाव पाडून त्याला योग्य आकार देते. आपण सकारात्मक गोष्टींत गुंतलेले असू आणि विनाशकारी किंवा अयोग्य वर्तनापासून दूर राहू, याची खात्री करून घेते. या शिस्तीशिवाय आपले वर्तन एकदम अनियंत्रित होते आणि आपण पूर्णतः तणावदायी भावनांच्या आहारी जातो.  

नैतिक स्वयंशिस्त विवेकी, तथा सविवेकी जागरूकतेवर आधारित असते. विनाशकारी वर्तनापासून बचावासाठी आपण विवेकाचा आधार घेतो आणि विनाशकारी वर्तनाच्या दुष्परिणामांना निश्चितपणे समजून घेतो. सकारात्मक व्यवहारात गुंतून, आपण ध्यानधारणा, प्रारंभिक साधना आणि इतर साधनांचा सविवेक बोध प्राप्त करतो. विवेकामुळे कसे वागायला हवे याची जाणीव होऊन आपण त्याबाबत आश्वस्त होतो. 

परोपकारासाठी कार्यरत राहणे 

तिसऱ्या प्रकारची नैतिक स्वयंशिस्त आहे, इतरांच्या भल्यासाठी आणि मदतीसाठी कार्यरत राहणे. आपण विवेकामुळे इतरांची मदत करण्यातील लाभ ओळखतो आणि आपली इच्छा नाही म्हणून किंवा एखादी व्यक्ती आवडत नाही म्हणून तिची मदत करू नये, अशा प्रकारच्या भावनेपासून स्वतःचा बचाव करतो. 

इतरांची मदत करण्यात अनेक घटक समाविष्ट असतात. पण सामान्यतः, आपण ज्याला ‘इतरांना सकारात्मक प्रभावाखाली आणण्याचे चार मार्ग’ म्हणतात, अशी शिस्त बाळगतो. निराळ्या शब्दात सांगायचे तर, आपण अशा प्रकारे वर्तन करतो की इतर लोक आपल्याप्रति अधिक ग्रहनशील असतील, जेणेकरून आपण त्यांना सखोल शिकवण देऊ शकू.  

हे चार मार्ग आहेतः 

  1. दयाशील राहणे
  2. मृदू वाणी/ सुखकारक बोल
  3. इतरांना उद्दिष्टपूर्तीसाठी प्रोत्साहन
  4. या उद्दिष्टांप्रति सातत्य ठेवणे 

सहा पारमितांसंदर्भातील शिकवणींमध्ये ११ प्रकारच्या लोकांची सूची निर्देशित केली आहे, ज्यांच्याप्रति आपल्याला विशेष प्रयास करणे आवश्यक आहे. आपण याला केवळ एक सूची मानता कामा नये, तर त्याला एक विशेष सूचना समजून संधी मिळताच अशा लोकांची मदत करायला हवी आणि त्यांना दुर्लक्षित करू नये. 

  1. जे दुःख सहन करत आहेत.
  2. ज्यांना कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही.
  3. ज्यांनी यापूर्वी आपली मदत केली आहे. 
  4. जे भीतीने ग्रस्त आहेत. 
  5. जे शोकाकुल आहेत. 
  6. जे निर्धन आणि गरजवंत आहेत. 
  7. जे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. 
  8. ज्यांची आपण त्यांच्या इच्छेनुसार मदत करू शकतो. 
  9. जे इमानदारीने जगतात.
  10. जे विघातक आयुष्य जगतात.
  11. ज्यांना आपल्या असामान्य क्षमतांना व्यवहारात आणण्याची आवश्यकता आहे. 

नैतिक स्वयंशिस्तीसंबंधी शांतिदेव यांची मते 

शांतिदेवांनी आपल्या बोधिसत्वचर्यावतार  ग्रंथातील दोन अध्यायात नैतिक स्वयंशिस्तीसंबंधी चर्चा केली आहे. 'अपरामदा' नामक पहिला अध्याय नैतिक स्वयंशिस्तीवर आधारित आहे, ज्यात आपण स्वतःच्या वर्तनाच्या परिणामांबाबत काळजी घेतो आणि तणावदायी भावनांच्या प्रभावाखाली न येण्याची काळजी घेतो. इतरांनाही भावना असतात आणि आपण विनाशकारी रीतीने वागलो, तर ते दुखावले जातील, याचा गांभीर्यपूर्ण विचार करतो. आपल्या वर्तनाचे भविष्यात आपल्यावरच होणारे परिणाम, याबाबतही आपण काळजी घेतो. हे सर्व नैतिक स्वयंशिस्तीसाठी आधार निर्माण करते. जर आपल्याला खरोखरच इतरांना किंवा आपल्या स्वतःच्या भविष्याला नुकसान पोहचवण्याविषयी काही काळजीच नसेल, तर आपल्याला नैतिक आचरण समजून घेण्याचीही गरज वाटणार नाही. 

अनेक भाषांमध्ये काळजी घेण्याच्या दृष्टिकोनाचे भाषांतर करणे कठीण आहे. यात काळजीचा भाव अंतर्भूत आहे आणि आपल्या वर्तनासंबंधी काळजी घेणे अभिप्रेत आहे. पण त्याहूनही पुढे जाऊन यात आपल्या वर्तनाचे इतरांवर आणि स्वतः आपल्यावर होणारे परिणाम, याबाबत गांभीर्याने विचार करण्याची बाबही अंतर्भूत आहे.

शांतिदेवांचा दुसरा अध्याय सचेतनता आणि सतर्कतेला वाहिलेला आहे. सचेतनता अशी मनोवस्था आहे, जी शिस्तीवर मानसिक नियंत्रण कायम ठेवते आणि तणावदायी भावनांच्या आहारी जाऊ देत नाही. ही एखाद्या मानसिक गोंदाप्रमाणे असते, जो आपल्याला शिस्तीपासून दूर जाऊ देत नाही. उदाहरणार्थ, आपण संतुलित आहाराचे पालन करत असू आणि जेव्हा आपण एखाद्या बेकरी जवळून जात असू, तेव्हा आपल्या आवडीचा केक पाहूनही आपण स्वतःला रोखू शकतो. आपण आपल्या आहारासंबधीचे नियम मोडत नाहीः ‘मी माझ्या लोभीपणा आणि आसक्तीच्या आहारी जाऊन तो केक विकत घेणार नाहीये.’ हे सचेतनतेमुळे घडते आणि नैतिक स्वयंशिस्तीच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण नियंत्रित आहाराच्या मार्गावरून विचलित होऊ लागतो आणि विचार करतो की, ‘जाऊ दे. केकचा छोटासा तुकडा तर खाऊ.’ अशा अवस्थेत आपण सतर्कतेच्या माध्यमातून स्वतःवर नजर ठेवू शकतो. आपली सतर्कता आतून एक चेतावणी देते, जेणेकरून आपण स्वतःला वेळीच थांबवून पुन्हा आत्मनियंत्रण मिळवू शकू. आपण या गोष्टींकडे लक्ष पुरवायला हवे. सचेतनता आणि सतर्कता नैतिक स्वयंशिस्तीचे आधारस्तंभ आहेत. ती अशी साधने आहेत, ज्याद्वारे आपण स्वयंशिस्त कायम ठेवू शकतो आणि नंतर एकाग्रता विकसित करण्यासाठी त्याचा वापर करू शकतो.    

शेवटी, शांतिदेवांनी सचेतनता विकसित करण्यासाठी आणि ती कायम ठेवण्यासाठी साहाय्यक ठरणारे तीन घटक नमूद केले आहेतः 

  • आपल्या आध्यात्मिक गुरूंच्या सान्निध्यात राहा. जर ते शक्य नसेल, तर तुम्ही कल्पना करू शकता की तुम्ही त्यांच्या सान्निध्यात आहात. आपण त्यांच्यासमवेत असू तर त्यांच्याप्रतिच्या आदरभावामुळे मूर्खासारखे किंवा विघातक पद्धतीने वागणार नाही. असा विचार करणे उपयुक्त असते की, ‘मी माझ्या गुरूंच्या उपस्थितीत असे वागू शकतो किंवा असे बोलू शकतो का?’ आपण तसे वागू शकत नसू, तर शांतिदेव आपल्याला ‘लाकडाच्या ओंडक्यासारखे’ राहायचा सल्ला देतात. अविचल राहण्याचा, तसे बिलकूल न वागण्याचा सल्ला देतात. सचेतन राहणे आपल्यासाठी साहाय्यक असते. अर्थातच आपण आपल्या गुरूंसोबत भोजन करत असू तर आपण आपला चेहरा केकने भरणार नाही किंवा उगाचच दुसऱ्यांवर आरडाओरड करणार नाही. 
  • गुरूंचा सल्ला तथा निर्देशांचे पालन करणे. त्यांची वचने आठवण्याचा प्रयत्न आपल्याला सचेतन ठेवू शकतो. 
  • सचेतन न राहण्याच्या परिणामांबाबत साशंकित राहणे. असे नाही की आपण भयभीत होतो. पण आत्मसन्मानाच्या दृष्टिकोनातून आपण सचेतन न राहण्याचे परिणाम भोगू इच्छित नाही. आपण सकारात्मक अर्थाने स्वतःचा पुरेसा विचार करतो, की क्रोध, लोभ आणि अशा तणावदायी भावनांच्या आहारी जाऊन आपण रसातळाला जाऊ इच्छित नाही. 

वर नमूद केलेल्या गोष्टींच्या सोबतच, आपल्याला आपल्या गुरूंप्रति आदरयुक्त भयाची भावना विकसित करायला हवी. याचा अर्थ जणू आपले गुरू आपल्यावर ओरडणार आहेत, म्हणून आपण आपल्या गुरूंना घाबरतो असा अजिबात होत नाही. आदरयुक्त भयाचे तात्पर्य हे आहे की आपण आपले आध्यात्मिक गुरू तथा बौद्ध धर्माप्रति इतका आदरभाव बाळगतो की जर आपल्या नकारात्मक वर्तनाने त्यांची प्रतिमा मलीन होणार असेल, तर आपल्याला फार वाईट वाटते. आपल्या वर्तनामुळे जर लोक विचार करू लागले की ‘अरे, या गुरूच्या शिष्याचे वर्तन असे आहे?’ किंवा ‘अरे हा तर स्वतःला बौद्ध धर्माचा अनुयायी म्हणवतो ना? तरी तो मद्यपान करतो आणि भांडणं करतो.’ तर अशा प्रतिक्रियांमुळे होणाऱ्या गुरूंच्या अनादराची आपल्याला भीती वाटते. आदरयुक्त भयाच्या भावनेच्या अधीन होत आणि गुरूंप्रति सन्मानाच्या भावनेतून आपण आपली सचेतनता कायम ठेवतो आणि नैतिक स्वयंशिस्ती पाळतो. 

सारांश 

आपण सर्वांनी अनुभवले आहे की जीवनात प्रगती करण्यासाठी अनुशासन आत्यंतिक महत्त्वाचे आहे. मग ते वर्णमालेचा अभ्यास करण्याशी संबंधित असो, परीक्षेचा अभ्यास करण्याशी असो किंवा वजन कमी करण्याशी संबंधित असो, स्वयंशिस्तीशिवाय आपण काहीही करू शकत नाही.

बौद्ध धर्माच्या अभ्यासाबाबत नेमकी हीच स्थिती आहे. या मार्गावर वाटचाल करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वभावाला शिस्त लावावी लागते. जर आपल्याला स्वतःची आणि इतरांची काळजी असेल, तर नैतिक स्वयंशिस्त ही फार दूरवरची असाध्य गोष्ट ठरत नाही, तर ती स्वाभाविक आणि सहज समजण्याजोगी गोष्ट होते. काळजीपर्वक रचनात्मक वर्तनाचा अभ्यास आणि इतरांना नुकसान न पोहचवण्याच्या संकल्पातून आपण वर्तमानातील आणि भविष्यातील आनंदाचा आधार निर्माण करतो. 

Top