प्रस्तावना
सहा व्यापक दृष्टिकोन “सहा परिपूर्णता” किंवा “सहा पारमिता,” म्हणून ओळखले जातात. त्या अशा मनोवस्था आहेत, ज्या आपल्याला इतरांची सर्वोतोपरी मदत करण्यास आणि स्वतःत सुधारणा घडविण्यास सक्षम करतात. आपल्या प्रगती आड येणाऱ्या आळशीपणा आणि क्रोधासारख्या अडथळ्यांवर त्या थेट वार करतात आणि त्यामुळे त्या उपयुक्त असतात. त्यांच्याकडे बौद्ध संदर्भातून पाहिल्यास, जेव्हा आपण त्यांना पूर्णतः विकसित करतो, त्या आपल्याला आपला मर्यादा आणि समस्यांचा सागर ओलांडून तिरावर पोहचवतात, म्हणून आपण त्यांना “व्यापक” म्हणतो. जेव्हा आपण संन्यस्त भावनेने प्रेरित होतो, अर्थात सर्व दुःखांपासून मुक्त होण्याचा निश्चय करतो, तेव्हा त्या आपल्याला मुक्तीपर्यंत पोहचवतात. आणि आपण बोधिचित्ताच्या प्रेरणेने, अर्थात इतरांच्या कल्याणासाठी बुद्धत्व प्राप्त करण्याच्या इच्छेने प्रेरित होतो, त्या आपल्याला ज्ञानप्राप्तीपर्यंत पोहचवतात.
सहा व्यापक दृष्टिकोन खालीलप्रमाणे आहेतः
- औदार्य
- नैतिक स्वयंशिस्त
- संयम
- चिकाटी
- मानसिक स्थैर्य (एकाग्रता)
- विवेकी जागरूकता (शहाणीव).
आपण आपल्या दैनंदिन कामकाजासोबत ध्यानधारणेतूनही या सहा दृष्टिकोनांचे प्रशिक्षण प्राप्त करतो. मजबूत शरीरयष्टीसाठी व्यायाम करावा, त्याप्रमाणे या मनोवस्थांमध्ये गुंतलो की आपण काहीही करत असलो तरी त्या अधिक दृढ होत जातात. कालांतराने त्या आपल्या जीवनात इतक्या समरस होतात की त्या आपल्या स्वतःबाबतच्या आणि इतरांबाबतच्या वर्तनाचा नैसर्गिक घटक बनतात.
औदार्य
औदार्य असा दृष्टिकोन आहे, ज्यात आपण इतरांना हव्या असणाऱ्या गोष्टी स्वच्छेने द्यायला तयार असतो. याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे जे काही आहे, ते सर्व देऊन टाकून आपण निर्धन व्हावे, जसे काही धर्मांमध्ये निर्धनता किंवा गरिबीही एखाद्या सद्गुणाप्रमाणे समजली जाते. इथे औदार्याचा अर्थ आपण स्वच्छेने कोणत्याही दूविधावस्थेशिवाय आणि अडथळ्याशिवाय दान करण्यास तयार असतो. आणि जिथे ते उपयुक्त असेल, तिथे दान करणे योग्य असते, याचा आपण विवेकाने विचार करणे आवश्यक असते. ज्याला बाहेर जाऊन गोळीबार करायचा आहे आणि हत्या करायची आहे, अशा व्यक्तीला आपण बंदूक देऊ शकत नाही आणि असा विचार करू शकत नाही की “हे बघ, मी किती उदार आहे. हे घे तुला बंदूक खरेदी करण्यासाठीचे पैसे घे.” अयोग्य दानाचे आणखी एक उदाहरण म्हणजे अशा व्यक्तीला पैसे देणे, जो त्या पैशातून अमली पदार्थ विकत घेईल.
औदार्य दाखविण्यासाठी आपण श्रीमंतच असायला हवे असे काही नाही, जरी आपण अत्यंत गरीब असलो आणि आपल्याकडे देण्यासारखी एकही गोष्ट नसली, तरी आपण औदार्य राखण्याची इच्छा तरी बाळगू शकतोच. नाहीतर, गरीब लोक औदार्य भावना विकसितच कशी करू शकतील? त्यामुळे जेव्हा केव्हा आपण सुरम्य सूर्यास्त पाहतो, तेव्हा अशी औदार्यपूर्ण इच्छा व्यक्त करू शकतो की प्रत्येकाला हे सुंदर दृश्य अनुभवायला मिळावे. आपण फक्त आपल्या मालकीच्या वस्तुंबाबतच औदार्य दाखवू शकतो असे काही नाही, तर ज्या वस्तू कोणाच्याच मालकीच्या नाहीत, त्याबाबतही औदार्य दाखवू शकतो. ध्यानधारणेत आपण कल्पना करतो की आपण इतरांना अनेक प्रकारच्या गोष्टी दान करत आहोत, पण प्रत्यक्षात आपल्याकडे अशा काही गोष्टी असतील, ज्या एखाद्याला उपयोगी पडू शकतील, तेव्हा आपण फक्त दानाची कल्पना करत बसत नाही, तर त्या वस्तू प्रत्यक्षात दान करतो.
औदार्य ही कंजुसपणाच्या, अर्थात कोणसोबतही कोणतीही गोष्ट वाटून घेण्याच्या किंवा कुणाला एखादी गोष्ट देण्याच्या अनिच्छेच्या भावनेच्या विरोधी भावना आहे. कंजुसपणाची भावना कायम या भावनेशी संलग्न असते की आपण आपल्याकडील वस्तू इतरांना दिल्या तर आपल्याकडे काहीच शिल्लक राहणार नाही. पण या उलटः
जर मी सगळ्या गोष्टी माझ्याजवळच ठेवल्या तर इतरांना देण्यासाठी काय शिल्लक राहील? – तिबेटी म्हण
आपण दुराग्रही होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. इतरांची मदत करताना स्वतःच्या खाण्यापिण्याची आणि निद्रेचीही आपण काळजी घ्यायला हवी. आपल्याला स्वतःचीही काळजी घ्यायला हवी, कारण औदार्याविषयी बोलताना आपण आपल्याजवळ जे काही आहे, ते वाटून घेण्याविषयी बोलतो. परम उन्नत बोधिसत्व इतरांच्या कल्याणासाठी स्वतःच्या जिवाचाही त्याग करू शकतात, पण आपल्या पातळीवर आपण वास्तविकतः तसे करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला ते शक्यही नाही किंवा आपल्याकडून असे अपेक्षितही नाही की आपण इतके दान करत जावे की आपल्यावर भुकेने बळी जाण्याची वेळ यावी. तरीही आपण इतरांना शारीरिक मदत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, जसे कष्टाच्या कामांमध्ये किंवा अगदी मोलमजुरी करणाऱ्यांनाही मदत करायला हवी. आपण आपले हात खराब होतील, याची चिंता करता कामा नये.
ज्याला आपण “सद्गुणांचा मूलाधार,” म्हणतो, अशा गोष्टी वाटून घेणेही औदार्यामध्ये समाविष्ट आहे, ज्या आपण विकसित केलेल्या सकारात्मक ऊर्जेसाठीच्या सकारात्मक क्षमता असतात. मी माझ्या स्वतःच्या जीवनाचे उदाहरण देऊ शकतोः पूर्व जन्मात विधायक कार्यातून विकसित केलेल्या सकारात्मक क्षमतांमुळेच मी भारतात महान बौद्ध गुरूंना भेटू शकलो आणि त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करू शकलो आणि जगभरच्या निमंत्रणानुसार विविध जागांना भेटी देऊन विलक्षण लोकांसोबत सकारात्मक संबंध जोडू शकलो. यामुळे आणखी सकारात्मक क्षमता विकसित झाल्या आहेत आणि माझ्या साधनेचा भाग म्हणून मी माझ्या “सद्गुणांचा मूलाधार,” इतरांसोबत वाटून घेतो. आणि त्याचे फळ स्वतःपुरते मर्यादित ठेवत नाही. उचित वेळी मी माझ्या संपर्काच्या आधारावर या महान आचार्यांची आणि इतर परोपकारी विद्वानांची जगभरच्या इतर लोकांनाही ओळख करून दिली आहे. मी माझ्या विद्यापीठीय शिक्षणातून आणि भारतात अनेक दशके व्यतित करून अध्ययन आणि ध्यानधारणेतून मिळवलेले ज्ञान इतरांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सद्गुणांचा मूलाधार वाटून घेण्याचा अर्थ इतरांसाठी द्वारे खुली करण्याशी संबंधित आहे
सामान्यतः औदार्याचे चार प्रकार असतातः
- भौतिक गोष्टींची मदत
- शिकवण आणि मार्गदर्शन देणे
- भीतीपासून संरक्षण पुरविणे
- प्रेम प्रदान करणे
भौतिक गोष्टींच्या मदतीसंदर्भातील औदार्य
भौतिक गोष्टींच्या मदतीसंदर्भातील औदार्याचा संबंध आपल्या मालकीच्या गोष्टी, अन्न, वस्त्र, पैसे किंवा अन्य गोष्टी इतरांना देण्याशी संबंधित आहे. यात योग्य वेळी योग्य भावनेने, एखाद्या कुत्र्याला हाडाचा तुकडा टाकल्याप्रमाणे नाही, तर सन्मानजनक दान करण्याचा भाव समाविष्ट असतो. भौतिक गोष्टींचे दान करण्यासाठी आपण श्रीमंतच असायला हवे आणि आपल्याकडे भरपूर गोष्टी असायला हव्यात, असे काही नाही. कारण आपल्या मालकीच्या नसलेल्या गोष्टीही दान करू शकतो. याचा अर्थ आधुनिक रॉबिन हुडप्रमाणे आपण बाहेर जाऊन चोरी करावी, असा अजिबातच नाही. इथे आपण सार्वजनिक गोष्टींविषयी बोलत आहोत, उदाहरणार्थ वातावरण स्वच्छ ठेवणे, जेणेकरून इतर लोक त्याचा आनंद लुटू शकतील. ही सर्वोत्तम भेट ठरू शकते. आपण आपले आनंददायी अनुभव वाटून घेऊ शकतो, जसे “प्रत्येकाला अशा सुंदर वातावरणाचा आनंद लुटता यायला हवा,” अशी भावना बाळगणे.
आपण फक्त मूर्त वस्तुंविषयी विचार करता कामा नये. आपण आपल्या शरीराच्या माध्यमातूनही खूप काही देऊ शकतो, जसे आपला वेळ, श्रम, ऊर्जा, प्रोत्साहन इत्यादी. हे सर्व भौतिक वस्तुंच्या उदार दानधर्माचे कुशल मार्ग आहेत.
हे अर्थातच स्पष्ट आहे, की विष, हत्यार किंवा एखादी गोष्ट जी आपल्यासाठी व इतरांसाठीही हानीकारक ठरू शकते, अशा गोष्टी देणे अयोग्य आहे.
शिकवण आणि सल्ला देण्यासंदर्भातील औदार्य
बौद्ध संदर्भातून हे धर्मविषयक दान आहे – बौद्ध शिकवणींच्या संदर्भातील – पण आपण हे गैरबौद्ध क्षेत्रालाही हे लागू करू शकतो. हे फक्त अभ्यास, भाषांतर, शब्दांकन, प्रकाशन किंवा शैक्षणिक केंद्रांमध्ये काम करण्यापुरते मर्यादित नाही, पण ते आपल्याला शक्य असल्यास लोकांच्या शंकाचे निरसन करणे, त्यांना सल्ला व माहिती देणे या गोष्टींशीही संबंधित आहे.
शाक्य परंपरेत समाधिअर्पणही (एकाग्रता) समाविष्ट आहे. ज्यात आपण इतरांना धर्मसाधनेचे विविध दृष्टिकोन दान करतो. आपल्या आपल्या अध्ययनातून, वाचनातून जे काही ज्ञान प्राप्त केले आहे, ते इतरांना सादर करतो आणि इतरांच्या मदतीसाठी त्याचा उपयोग करतो. आपण मिळवलेले ज्ञान, दृढ निश्चय, शिस्त, अंतर्दृष्टी, एकाग्रता, तसेच आपले शिकवणींसंबंधीचे स्पष्टीकरणही आपण असेच दान करतो. हे सर्व धर्माप्रतिच्या औदार्याच्या श्रेणीतच गणले जाईल. अर्थात हे आपण इतरांना लाभकारक ठरणाऱ्या अन्य गोष्टींनाही लागू करू शकतो.
भीतीपासून संरक्षणासंबंधी औदार्य
अशा प्रकारच्या औदार्याचा संबंध वाईट दशेत असणाऱ्या अन्य जीवांप्रति उदारभाव बाळगून त्यांना मदत करण्याशी आहे. यात कत्तलीसाठी आणलेले प्राणी, पिंजऱ्यात आणि बेड्या बांधून ठेवलेल्या जीवांना मुक्त करण्याचा समावेश होतो. जलतरण तलावात डुबणाऱ्या माशांना वाचविणे, तीव्र ऊन किंवा थंडीपासून माणसांचे व प्राण्यांचे संरक्षण करणे, हे सर्व संरक्षण देण्याशी संबंधित आहे. जर आपल्या फ्लॅटमध्ये एखादा कीडा आला तर त्याला आपण असा विचार करून खिडकीतून फेकून देत नाही की तो पाच मजली इमारतीवरून खाली पडला तरी त्याला दुखापत होणार नाही. भीतीपासून संरक्षणासंबंधीचे औदार्य ते असेल, ज्यात आपण त्याला दयाळूपणे बाहेर घेऊन जाऊ. त्याच्या प्रवासाला शुभेच्छा देत, त्याला आपण संडासाच्या फ्लशमध्ये टाकणार नाही.
यात आपण इतरांचे सांत्वन करणेही समाविष्ट करू शकतो. जर ते दुखापतीच्या भीतीने भयभीत झाले असतील, मग ती आपली मुले असोत वा एखादा प्राणी ज्याचा शिकारीसाठी पाठलाग केला जात आहे. उदाहरणार्थ, मांजर उंदराला सतावत असेल, तर आपण उंदराला तिच्यापासून दूर नेऊन त्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करायला हवा.
तंत्रामध्ये भीतीपासून संरक्षणाच्या औदार्याची आणखी एक व्याख्या पाहायला मिळते. ज्यात आपली समभावाची भावना इतरांना देण्याचा समावेश आहे. याचा अर्थ इतरांना आपल्यापासून भीतीचे काहीच कारण असणार नाही, की आपण त्यांच्याप्रतिच्या आसक्तीमुळे त्यांना चिकटून राहू, त्यांच्याप्रति क्रोधाच्या भावनेतून त्यांचा अस्वीकार करू किंवा मूर्खपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करू. इथे आपण प्रत्येकाप्रति एकसमान उदारभाव बाळगू, जी एखाद्यासाठी अनमोल भेट ठरू शकते.
प्रेम प्रदान करण्याचे औदार्य
तंत्रात चौथ्या प्रकारच्या औदार्याचा समावेश आहे, ज्याला प्रेम प्रदान करण्याचे औदार्य म्हंटले जाते. याचा अर्थ आपण सगळीकडे फिरून प्रत्येकाला आलिंगन देत बसत नाही, तर ती अशी स्थिती आहे, जिथे आपण प्रत्येकाच्या सुखाची कामना करतो. प्रेमाची हीच परिभाषा आहे- दुसरी व्यक्ती सुखी असावी आणि तिच्या जीवनात सुखाची कारणे असावीत, अशी इच्छा बाळगणे.
दानाची योग्य पद्धत
जेव्हा आपण एखाद्या व्यापक दृष्टिकोनाची साधना करतो, तेव्हा आपण उर्वरित पाच दृष्टिकोनही समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतो. औदार्याचा अभ्यास करतेवेळी आपणः
- नैतिक स्वयंशिस्तीच्या संयोगातून आपण सर्व प्रकारच्या अनुचित गुप्त प्रयोजनातून स्वतःला मुक्त करतो.
- संयमाच्या संयोगातून आपल्या मार्गात येणाऱ्या अडचणींची चिंता करत नाही.
- चिकाटी आणि धैर्याच्या संयोगातून आपण दानधर्मातील आनंद प्राप्त करतो, जो कोणत्याही कर्तव्यभावनेतून किंवा बंधनकारकतेतून आलेला नसतो.
- मानसिक स्थैर्याच्या संयोगातून आपण दानातून लाभलेल्या सकारात्मक ऊर्जैच्या समर्पणावर लक्ष केंद्रित करतो.
- विवेकी जागरूकतेच्या संयोगातून आपल्याला याची प्रचिती येते की दाता(अर्थात आपण), दान घेणारा आणि दान केलेली वस्तू यांचे स्वस्थापित अस्तित्व नसते. ते परस्परावर अवलंबून असतात. जर दान घेणाराच नसेल तर कोणी दाता होऊ शकत नाही.
औदार्य आणि अयोग्य प्रेरणा
आपण एखाद्या गोष्टीचे अयोग्य रीतीने दान करत आहोत, हे सुचित करणाऱ्या अनेक परिस्थिती असतात आणि आपण त्या टाळायला हव्या. कधीकधी आपण इतर लोक प्रभावित होतील, या आशेने दान करतो किंवा आपण फार धार्मिक आणि चांगले आहोत, अशा विचारातून दान करतो किंवा हे तर अगदी सरसकट अनुभवायला मिळते की बदल्यात काही तरी मिळावे, अगदी किमान समोरच्या माणसाने आभार मानावे, या अपेक्षेने आपण दान करतो. आपण दान करतो, तेव्हा बदल्यात काहीतरी मिळावे, ही अपेक्षा करणे अयोग्य आहे. अगदी आभाराचीही अपेक्षा करू नये. त्यातून दान घेणाऱ्याची स्थिती सुधारण्यात असाधारण यश मिळेल, असेही काही नाही. हे त्यांच्या कर्मावर अवलंबून आहे. आपण त्यांना मदत करू शकतो, पण बदल्यात त्यांची परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा करू नये.
मला आठवते की एकदा भारतातल्या पावसाळी दिवसात धरमशाला येथे एका नाल्यात बुडणाऱ्या उंदराला मी बाहेर काढले. त्याला बाहेर काढून मी जमिनीवर सुकण्यासाठी ठेवले आणि तोपर्यंत एका बहिरी ससाण्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला घेऊन गेला. सर्व काही त्या व्यक्तीच्या कर्मावर अवलंबून असते, अगदी आपण त्यांना मदत करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी. आपण एखाद्याला यशस्वी होण्यासाठी सर्व संभाव्य संधी दिल्या, तरीही ते फार वाईट पद्धतीने अयशस्वी होऊ शकतात.
याशिवाय काही सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळाले, तर आपण त्या व्यक्तीसमोर बढाई मारू नये आणि आठवण करून देऊ नये की आपण त्यांच्यासाठी काय केले आहे किंवा त्यांना काय दिले आहे. जेव्हा आपण इतरांची मदत करतो, तेव्हा आपण त्यांच्यावर महान उपकार करत असल्याच्या भावनेतून त्यांना कमीपणा देऊ नये. वास्तव तर हे आहे की ते मदत स्वीकारून आपल्यावर उपकार करत आहेत, जेणेकरून आपण सकारात्मक ऊर्जा प्राप्त करू शकू, जी आपल्याला ज्ञानप्राप्तीपर्यंत पोहचण्यासाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी सक्षम बनवेल.
अपराधी भावनेतून किंवा इतर कुणी दान केले आहे, तर मलाही करायला हवे, त्यांच्याप्रमाणेच किंवा आपला अधिक प्रभाव पडण्यासाठी त्यांच्याहून अधिक दान करायला हवे, अशा स्वरूपाच्या बंधनकारकतेतून दान करणेही अयोग्य प्रेरणा आहे.
औदार्य आणि उपयुक्त प्रेरणा
औदार्य दाखवताना आपले एकमात्र उद्दिष्ट हे दान स्वीकारणाऱ्याचा स्थायी किंवा अस्थायी लाभ व्हावा, हेच असायला हवे. आपण यशस्वी होऊ किंवा नाही, पण आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो. ही काही एखादी अमूर्त कल्पना नाही, की “निःसंशय मला सर्व सचेतन जीवांची मदत करायची आहे.” अशा स्थितीत आपण इतरांच्या उष्ट्या प्लेट धुतानाही वाईट वाटून घेऊ नये.
अर्थात, औदार्य दोन्ही प्रकारे दाखवता येऊ शकते. जर दुसरे लोक आपल्याप्रति औदार्य दाखवू इच्छित असतील, तर आपण गर्व करू नये किंवा निमंत्रण वा भेटवस्तू नाकारू नयेत. अनेक लोक असं करतात, जेव्हा काही लोक त्यांच्यासाठी काही खरेदी करत असतात, अगदी एकवेळचे जेवण देत असतात. असे करून आपण त्यांना सकारात्मक ऊर्जा संचित करण्यापासून वंचित करतो. बोधिसत्व व्रतांमध्ये याचा समावेश आहे की, आपण आमंत्रण स्वीकारायला हवे आणि जे लोक आपल्याला मदत करू इच्छितात, त्यातून त्यांचे नुकसान होणार नसेल, तर ती मदत स्वीकारायला हवी.
मी एकदा सरकॉंग रिंपोछेंसोबत इटलीचा प्रवास करत होतो, तेव्हा तिथे कोणीतरी त्यांना प्रश्न विचारायला आले. ते जेव्हा गेले तेव्हा दरवाज्याशेजारच्या टेबलवर दक्षिणेचं एक पाकीट ठेवून गेले. सरकॉंग रिंपोछेंनी तेव्हा एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली, की “दानाची ही सर्वात चांगली पद्धत आहे. हे ते लोक नाहीत, जे लामांना व्यक्तिगतरीत्या भेट देत मोठा देखावा उभा करत दक्षिणा देतात, जेणेकरून लामा त्यांचं कौतूक करतील आणि त्यांच्याविषयी चांगला विचार करतील.” अशा प्रकारचे दान कोणताही गाजावाज न करता, अज्ञातपणे करणेच चांगले असते. अशा रीतीने सुखद आणि सन्मानपूर्वक केलेले दान सर्वश्रेष्ठ दान असते.
आपण जे दान करणार आहोत, त्यासाठी लोकांना प्रतिक्षा करावी लागू नये किंवा आज दान करतो असे सांगून उद्या दान करू नये. हे पुन्हा दक्षिणेसारखेच होईल. सरकॉंग रिंपोछे परमपूज्य दलाई लामांच्या गुरूंपैकी एक होते आणि त्यांना भेटायला अनेक लोक येत असत. लोक त्यांना प्रणाम करण्यासाठी ते समोर येऊन उभे राहण्याची वाट बघत असत, ते त्यांना फार हास्यास्पद वाटत असल्याचे त्यांनी नमूद केलं. त्यांचं म्हणणं होतं, “या सगळ्यामुळे माझ्या वेळेचा अपव्यय होतो. त्यांनी प्रणाम केलेले मी पाहत बसणे आवश्यक नाही. त्यांनी सादर केलेला प्रणाम माझ्या उपयोगाचा नाही. त्यांनी इथे येण्यापूर्वीच प्रमाण करून घ्यायला हवा आणि इथे आल्यावर त्यांना जे बोलायचे असेल, ते थेट बोलायला हवे.”
व्यक्तिगतरीत्या भेट देणे
आपण जे काही भेट करू इच्छित असू , ते आपण व्यक्तिशः देणे महत्त्वाचे असते. अतिशा यांचा एक शिष्य होता, तो त्याच्या गुरूंच्या अर्पणाची सर्व तयारी करून ठेवत असे. पाण्याचे वाडगे भरून ठेवत असते आणि इतरही सर्व तयारी करून ठेवत असे. आतिशा म्हणाले,“ हे सर्व माझं मी करणं गरजेचं आहे. माझ्यावतीने भोजनही तूच करणार आहेस का?” जेव्हा जेव्हा शक्य असेल, तेव्हा आपण व्यक्तिशः या गोष्टी करायला हव्या.
जेव्हा आपण काही दान करण्याचा निश्चय करतो, तेव्हा आपले मन बदलू नये किंवा पश्चाताप होऊन ते दान परत घेऊ नये. शिवाय आपण दिलेल्या दानाचा आपल्या इच्छेनुसार विशिष्ट पद्धतीनेच वापर व्हावा, अशीही अपेक्षा करू नये, हे विशेषतः जेव्हा आपण पैसे दान करतो आणि ते कसे खर्च करावे याचा आग्रह धरतो, तिथे लागू होते. जसे आपण एखाद्याला एक चित्र भेट दिले आहे आणि आपण त्याच्या घरी गेल्यावर पाहतो की ते चित्र भिंतीवर लावलेलेच नाही, तेव्हा आपण नाराज होतो. खरेतर आपण एखादी गोष्ट दान केली की ती आपली राहत नाही.
मला आठवते की एकदा धरमशाला येथील एका मठात अन्नाची गुणवत्ता विशेष चांगली नव्हती, त्यामुळे भिक्षुंची स्थिती फार चांगली नव्हती. आमच्यासारख्या पाश्चिमात्त्यांनी काही पैसे जमा केले आणि चांगल्या अन्न पुरवठ्यासाठी दान केले. पण शेवटी, त्यांनी ते पैसे चांगल्या मंदिराच्या उभारणीसाठी विटा खरेदी करण्यात खर्च केले. याचा अनेक पाश्चिमात्त्यांना राग आला. त्यांनी ते पैसे अन्नधान्यावर खर्च झाले नाहीत, म्हणून मोठा दंगा केला. पण यावरचा उपाय हा होता की आम्हाला जर त्यांनी चांगले अन्न खावे असे वाटत होते, तर आम्ही त्यांच्यासाठी अन्नधान्याची खरेदी करायला हवी होती. तेव्हा त्यांनी ते अन्न खाल्ले असते. त्यामुळे आपल्याला थोडे हुशारीने काम करायला हवे. तरीही आम्हाला त्यांच्या आवडीचे अन्न खरेदी करायला लागले असते आणि तिबेटी लोकांच्या आवडीचे अन्नपदार्थ मांसाहारी आहेत, ज्याबाबत काही पाश्चिमात्त्यांनी आक्षेप घेतला असता. जे ते कधीच खाणार नाही असे टोफू किंवा इतर काही खरेदी करणे कधीच योग्य ठरले नसते.
मी सरकॉंग रिंपोछेंना जवळपास रोज भेटत असलो तरी मी त्यांच्यासाठी छोटीशी भेट घेऊन जात असते. काही दिवसांनंतर ते ओरडले आणि म्हणाले, “तू मला इतके केट्स आणि धूप का आणतोस? मला या भंगाराची गरज नाही.” त्यांनी त्याला भंगात म्हंटले. “मी १००० केट्स घेऊन काय करू?” ते म्हणाले,“जर तुला काही आणायचेच असेल, तर मला आवडेल आणि वापरता येईल असे काहीतरी आण.” त्यांना केळी आवडत असल्याचे मला माहीत होते, मग मी त्यांच्यासाठी केळी घेऊन जाऊ लागलो. आपल्याला इतरांना काही द्यायचे असेल, तर ते फार कौशल्यपूर्णतेने द्यायला हवे आणि त्यांना आवडेल, असेच द्यायला हवे. माझ्यावर विश्वास ठेवा, लामांकडे खरोखरच पुरेशी धूप असते.
त्याचवेळी आपण चांगल्या दर्जाच्या गोष्टी आणायला हव्यात, ही सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे, अशा गोष्टी नकोत, ज्या आपल्याला आवडत नाहीत किंवा आपण त्या वापरत नाही. काही लोक असतात, ज्यांना कधीच दान स्वीकारायची इच्छा नसते, त्यामुळे त्यांना आपण असे म्हणू शकतो की, “मला कुणीतरी हे दिले आहे आणि मला त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कृपया, हे स्वीकारा. मला हे फेकून द्यायचे नाही.” काही विशिष्ट प्रकारच्या गोष्टी देणेही अयोग्य असते, जसे शाकाहारी माणसाला हॅमबर्गर देणे. जर एखादी व्यक्ती विशिष्ट आहार घेत असेल, तर आपल्याला त्याच्या अनुसार वागायला हवे. जो आहाराबाबत प्रचंड जागरूक आहे, त्याला आपण केक देऊ नये.
धर्मविषयक दान
धर्मासंदर्भात एखादी व्यक्ती क्रोध, आसक्ती, दांभिकता किंवा केवळ कुतूहलातून आपल्यासोबत धार्मिक चर्चा करू इच्छित असेल, तर आपण त्याच्यासोबत धार्मिक चर्चा करू नये आणि त्याला बौद्ध ग्रंथही देऊ नयेत. आपण केवळ अशाच लोकांना धर्मविषयक ज्ञान देतो, जे ग्रहणक्षम असतात. व्यक्ती ग्रहणक्षम नसेल तर त्याला शिकवण देणे आणि त्यांच्यासोबत चर्चा करणे अयोग्य आहे. वस्तुतः तो वेळेचा अपव्यय आहे आणि त्यातून केवळ त्यांच्या नकारात्मक मानसिकतेला आणि द्वेषाला खतपाणी मिळते. आपण मोकळ्या मनाच्या आणि शिकण्याची इच्छा असलेल्या लोकांनाच केवळ शिकवण देतो.
आपण शिकवण देतो, तेव्हा आपण विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार शिकवण देतो. आपण किती विद्वान आहोत, हे सिद्ध करायला आपण आपल्या ज्ञानाचा आणि माहितीचा पूर्ण समुद्र त्यांच्यावर फेकत नाही. आपण तोपर्यंत फार उन्नत शिकवणही देत नाही, जोपर्यंत त्याचा हलकासा आस्वाद उपयुक्त ठरत नाही. काहीवेळा उन्नत शिकवणी लोकांना अधिक कष्ट करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी प्रेरणा देतात आणि एखादी व्यक्ती हेकेखोर असले, तर त्याच्यासाठीही त्या उपयुक्त ठरतात. काही वेळा परमपूज्य दलाई लामा विद्यापीठातील प्राध्यापकांना बौद्ध शिकवणी किती परिष्कृत आहेत, हे प्रदर्शित करण्यासाठी फार जटील पद्धतीने शिकवतात. त्यामुळे बौद्ध धर्म आदिम किंवा मागास असल्याचा समज दूर करण्यात ते उपयुक्त ठरते.
मला आठवते जेव्हा सरकॉंग रिंपोछें पाश्चिमात्त्य धार्मिक केंद्रात गेले होते आणि तिथल्या लोकांनी त्यांना आग्रह केला त्यांनी दोन दिवसात शांतिदेव यांच्या ग्रंथातील शून्यतेसंदर्भातील प्रकरण शिकवावे. ते फारच हास्यास्पद होते. त्या ग्रंथाचा केवळ हा भाग परिपूर्णपणे समजून घेण्यासाठी वर्षभराचा काळ लागतो. रिंपोछेंनी प्रकरणातील आरंभीच्या शब्दांची फार अद्ययावत आणि जटील व्याख्या मांडली, त्यातील प्रत्येक शब्द किती जटील आहे, हे त्यांना स्पष्ट करायचे होते. तिथे उपस्थित असलेल्या एकालाही ते काय म्हणत आहेत, ते समजत नव्हते. त्यामुळे हे ही स्पष्ट होत होते की अशी शिकवण फक्त दोन दिवसात शिकवली जावी, असा विचार करणे किती दांभिक होते. त्यानंतर रिंपोछे यांनी आपला वेग कमी केला आणि त्या शिकवणीतील एक छोटा भाग त्याच्या सर्वसामान्य अर्थासह स्पष्ट केला.
जेव्हा परमपूज्य दलाई लामा एखाद्या मोठ्या समूहाला संबोधित करतात, तेव्हा ते तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या बौद्धिक पातळीकडे लक्ष देतात. बहुतांश वेळा ते तिथे उपस्थित महान लामा, गेशे आणि खेंपों यांच्या उन्नत स्तरावर शिकवण देतात. कारण ते कोणत्याही व्यक्तीहून अधिक उन्नत स्तरावर आहेत, त्यामुळे ते त्यांना त्या स्तरावर शिकवण देतात आणि त्यानंतर ते लोक जाऊन आपल्या विद्यार्थ्यांना थोड्या आकलन करण्याजोग्या सोप्या मार्गाने स्पष्ट करू शकतात. अशा परिस्थितीत निम्नस्तरावर शिकवले जाऊ शकत नाही कारण त्या स्तरावर इतर लोक शिकवण देऊ शकतात. ते उच्चस्तरावर शिकवण देतात कारण ती एखाद्या झऱ्याप्रमाणे खालील निम्नस्तरापर्यंत झिरपत जाऊ शकेल.
अंततः ती शिकवण ज्यांना आवश्यकता आहे अशांनाच दिली जायला हवी. जर एखाद्याला त्याची गरज नसेल आणि त्याला निव्वळ लोभ आणि आसक्तीपोटी ती हवी असेल, जसे एखाद्या मुलाला दिवसभर चॉकलेट खायला हवे असते, तर अशा व्यक्तीला शिकवण देणे अयोग्य असते. आपण कोणाला आणि कुठे शिकवण देणे योग्य आहे, हे ठरवण्यासाठी आपल्या विवेकी जागरूकतेचा वापर करण्याची गरज असते. त्रुंगपा रिंपोछेनी एक फार अद्भुत शब्द निर्माण केला होता, “मूर्ख करुणा”; आपण प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकत नाही, कारण कदाचित ते मूर्खपणाचे ठरेल. आपले औदार्य आपल्या प्रज्ञेच्या अनुरूप असायला हवे.
सारांश
औदार्य दाखविण्यासाठी आपण गर्भश्रीमंत असायला हवे आणि आपल्याकडे खूप गोष्टी असायला हव्या, असे काही नाही. आपण कोठेही असू, काहीही करत असू, आपण औदार्यपूर्ण मन विकसित करू शकतो, आपण आपला मानसिक आनंद इतरांसोबत वाटून घेऊ शकतो- आपण अनुभवत असलेली शुद्ध हवा, आपण अनुभवत असलेला सुरम्य सूर्यास्त, आपण अनुभवत असलेले स्वादिष्ट भोजन. आपण अनुभवत असलेला प्रत्येक आनंद इतरांना अनुभवायला मिळावा, अशी इच्छा करणं हा त्या पुढील पायरीचा आधार आहे, ज्यात आपण त्यांच्या गरजेच्या वस्तू प्रत्यक्षात दान करतो.
जर आपण सक्षम असू, तर भौतिक दान करणे चांगले आहे, पण आपण आपला वेळ आणि ऊर्जैबाबतही औदार्य बाळगू शकतो. जेव्हा आपण आनंदाने आणि निर्मळ प्रेरणेने दान करतो, तेव्हा औदार्य आपल्या आणि इतरांच्या सुखसमृद्धीचे संरक्षण करणारे एक सशक्त बळ ठरते.