मध्यवर्ती आणि उन्नत स्तराच्या प्रेरणा

पुनरावलोकन 

आपण यापूर्वीच्या अभ्यासात आध्यात्मिक मार्गातील श्रेणीबद्ध मार्गांची चर्चा केलेली होती. त्यामध्ये आपल्या मूळ प्रेरणेचा विकास करण्याच्या दृष्टीने त्याच्या छोट्या स्वरूपापासून प्रेरणेचा विकास विस्तृत आणि व्यापक स्वरूपात करून ती पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला जातो. या रीतीने पूर्वीच्या स्तराशी प्रत्येक नवा स्तर जोडला जात असतो. 

प्रगतीच्या या प्रक्रियेला दोन प्रकारे पूर्ण करता येऊ शकते हे देखील आपण पाहिले. आपण धर्म लाईटचा मार्ग निवडू शकतो. त्यामध्ये आपले जीवनमान सुधारण्यासाठी आणि आयुष्य अधिक चांगले करण्यावर आपले लक्ष केंद्रित करीत असतो. आपल्यातील बहुतांश लोकांना इथूनच सुरुवात करावी लागते. परंतु पारंपरिक विचारधारेमध्ये या स्तराचा विचार फारसा केला जात नाही, कारण त्यामध्ये अनादी व अनंत पुनर्जन्मावर विश्वास ठेवलेला असतो. खरा धर्म हा पुनर्जन्माच्या संदर्भात परखडपणानेच या विकासयात्रेची चर्चा करतो. 

आपण पाहिले की, सर्व स्तरांतील प्रेरणेच्या संदर्भात जसे असते तसेच इथेही सुरुवातीच्या प्रेरणेमध्ये एक उद्देश असणे महत्त्वाचे असते व त्या उद्देशासाठी काही एक कारण असते. त्या उद्देशाच्या मागे काही मनोभाव निश्चितपणे असतो जो आपल्याला ते लक्ष्य प्राप्त करण्यासाठी प्रेरित करण्याचे काम करीत असतो. सुरुवातीच्या टप्प्यावर आपण आपले भविष्यातील जन्म सुधारण्याच्या भावनेने प्रेरित होतो. आपल्याला मानव रूपामध्ये पुनर्जन्म मिळत राहावा यासाठी आपली धडपड सुरू होते. आपल्या विकासाची प्रक्रिया सुरू ठेवून अधिक मोठ्या लक्ष्यांपर्यंत पोहोचता यावे यासाठी आपल्याला मनुष्य जन्म आवश्यक वाटत असतो. एकाच आयुष्यामध्ये अंतिम लक्ष्य प्राप्त करणे अवघड आहे या गोष्टीचा बोध आपल्याला प्राप्त झालेला असतो. यामध्ये खूप वेळ लागू शकतो आणि त्यासाठी खूप कठोर परिश्रमही घ्यावे लागतात. अधिक चांगला पुनर्जन्म मिळत राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते कारण त्या मार्गावर राहून आपण आपले प्रयत्न सुरू ठेवू शकतो. 

मनुष्याच्या रूपात बहुमुल्य असा पुनर्जन्म प्राप्त करण्याचे उद्दिष्ट प्राप्त केल्यानंतर आपल्या मनातील योजना निश्चित असते. पुढच्या जन्मात स्वर्गात जाऊन चांगला वेळ घालवायला मिळावा असे आपण म्हणत बसत नाही. कनिष्ठ अवस्थेत पुनर्जन्म मिळण्याची आशंका मनात घर करून असल्याने अधिक चांगला पुनर्जन्म मिळावा ही मनोकामना निर्माण होत राहते. कारण कनिष्ठ अवस्थांमध्ये पुनर्जन्म मिळाला, तर त्यामध्ये आपल्याला सुधारणेची संधी फारशी मिळत नाही. मात्र, या परिस्थितीतून वाचण्याचा मार्ग उपलब्ध आहे, याचा आपल्याला विश्वास असतो. आपण सुरक्षित मार्ग अर्थात शरणागतीच्या मार्गावर विस्तृत चर्चा केलेली होती. आपल्यातील सर्व कमतरता,  सर्व मानसिक विचारांतील चढउतार,  विशेषत: आपल्या दैनंदिन व्यवहाराशी जोडलेले सर्व नकारात्मक पैलू कायमचे समाप्त करावेत या दिशेने आपल्या प्रयत्नांची दिशा असायला हवी. याच्याच जोडीला आपण सकारात्मक व्यवहार आणि कृती कराव्यात. आपल्याला प्राप्त झालेल्या बहुमुल्य अशा मानवी जीवनातील या संधीचे महत्त्व आणि मृत्यू झाल्यानंतर हे बहुमूल्य जीवन नष्ट होणार आहे ही गोष्ट समजून घेण्याची क्षमता आपण स्वत:मध्ये विकसित करतो. मृत्यू ही न टाळता येणारी गोष्ट आहे आणि आपला मृत्यू नक्की केव्हा होईल याविषयी कुणीही काहीही सांगू शकत नाही. 

पुनर्जन्मातील सर्वोत्कृष्ट अवस्थासुद्धा असंतोषजनक असू शकतात 

मध्यवर्ती स्तराच्या संदर्भात आपण थोडे अधिक विश्लेषण करूयात. जर आपल्याला तथाकथित उत्तम पुनर्जन्म किंवा बहुमूल्य मानवी रूपातील पुनर्जन्माची प्राप्ती झाली, तरी केवळ असे पुनर्जन्म प्राप्त करीत राहणे ही सुद्धा एक असंतोष निर्माण करणारीच स्थिती असते. जीवन पुढे पुढे चालत राहते आणि त्यामध्ये चढ उतार येत राहणे हासुद्धा त्याचा एक नैसर्गिक भाग असतो. त्यामुळे पुढच्या क्षणाला आपल्याला नेमका कसा अनुभव येणार आहे, याविषयी आपण खात्रीने काहीही सांगू शकत नाही. असे होऊ शकते की वर्तमानात आपण आनंदी असू. परंतु कदाचित पुढच्या क्षणाला आपल्या अनुभवास येऊ शकते की आपण कमी आनंदी अगर दु:खी आहोत किंवा आपले अवसान गळाले आहे. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला अस्वस्थ करण्यास पुरेशा असतात. आपल्यासमोर वारंवार उभी ठाकणारी समस्या म्हणजे, प्रत्येक जीवनात आपल्याला जन्माच्या प्रक्रियेपासून सर्व अवस्थांतून जावे लागते. अगदी लहान असताना आपल्या शारीरिक कृतींवर आपले नियंत्रण कमी असते. आपल्याला चालायला-बोलायला शिकावे लागते. त्यामुळे वारंवार त्याच त्याच प्रक्रियेतून जावे लागणे कंटाळवाणे व उबग आणणारे असते. आपल्याला शाळेत जावे लागते. हीच गोष्ट वारंवार कुणाला करायला आवडेल? आपल्याला आपल्या आयुष्यासाठी जोडीदार शोधावा लागेल,  आपल्याला चरितार्थासाठी एखादी नोकरी शोधावी लागेल. आणि मग पुन्हा एकदा केवळ आपल्यालाच नव्हे, तर आपल्या जवळच्या लोकांना,  आप्तेष्टांना विविध व्याधी, म्हातारपण आणि अंतिमत मृत्यूचा सामना करावाच लागेल. 

या बहुमूल्य अशा जीवनामध्ये अनेक गोष्टी खूप अस्वस्थ करणाऱ्या आहेत. आपल्याशी संबंधित सर्व भावनिक गोष्टी तरीही तशाच राहणार आहेत. आपल्याला रागही येतो. आपण अशांतही होतो आणि आपल्या मनात लालसाही उत्पन्न होते. आपल्याला व्यक्ती आणि वस्तु या दोन्हीची खूप आसक्ती असते. आपण कारण, प्रभाव आणि यथार्थ या सर्वांपासून अनभिज्ञ असतो. त्यामुळे बऱ्याचदा आपण मूर्खासारखे वागत असतो. जसे की आपण विचार करतो की, आपण जे काही कर्म करीत आहोत आणि बोलत आहोत त्याचा दुसऱ्यावर काहीही परिणाम होत नसणार. आपण बऱ्याचदा असे वागतो की जणू दुसऱ्या कुणाचे अस्तित्वच नाही आणि त्यांना स्वत:च्या म्हणून भावनाही नाहीत. 

या सर्व समस्या अशाच राहणार आणि कितीही भाग्यशाली पुनर्जन्म प्राप्त झाला तरी आपल्याला आयुष्यातील या चढ उतारांचा सामना करावाच लागणार. एक वेळ अशीही येईल जेव्हा आपण भाग्यवान अवस्थेतून दुर्भाग्यपूर्ण अवस्थेतील पुनर्जन्म प्राप्त करू. चांगल्या उच्चतम अवस्थेतून कनिष्ठ अवस्थेतील पुनर्जन्म आपल्याला प्राप्त होईल. हा क्रम अखंडपणे सुरू राहील. अनियंत्रित पद्धतीने वारंवार घडणाऱ्या या अस्तित्वालाच संस्कृत भाषेत ‘संसार’ असे संबोधले जाते. 

संन्यास : मुक्त होण्याच्या संकल्पासह मोक्षाचे लक्ष्य निश्चित करणे 

मध्यवर्ती प्रेरणेच्या विषयासंदर्भात विचार करावयाचा झाला तर,  आपल्याला या सगळ्यातून मुक्ती मिळवायची आहे. आपल्या मानसिक सातत्याची ना कुठे सुरुवात होत असते ना कुठे शेवट होत असतो. अनियंत्रित पद्धतीने वारंवार होणाऱ्या आणि कधी संपेल की नाही याविषयी खात्री न देता येणाऱ्या या पुनर्जन्मांचे हे चक्र असेच यापद्धतीने सुरू राहावे असे आपल्यालाही वाटत नसते. कधीही न संपणारे हे पुनर्जन्माचे चक्र असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की जर आपण हे चक्र थांबवण्याचा प्रयत्न केला नाही तर हे चक्र अखंडीतपणे असेच सुरू राहील. आपल्याला हे थांबवायचे आहे आणि संसारचक्राच्या खऱ्या निरोधाचा अनुभव आपणास घ्यायचा आहे. का? कारण आपल्याला दु:खाला आपल्याजवळ येऊ द्यायचे नाही. भले आपल्यासमोर येणाऱ्या समस्या तितक्याशा भीतिदायक नसतीलही, परंतु आपल्याला छोट्या छोट्या समस्याही रोखायच्या आहेत. मुक्ती मिळवण्याची इच्छा बाळगण्याचे हेच कारण आहे. 

संस्कृत भाषेमध्ये मुक्तीला निर्वाण म्हटले जाते. त्यादिशेने जाण्यासाठी जो मनोभाव विकसित व्हावा लागतो त्याला आपण निवृत्ती किंवा संन्यास असे म्हणतो. हा सर्वथैव योग्य अनुवाद आहे असे नव्हे. परंतु मूलतः मुक्त होण्याची एक प्रबळ इच्छा त्यातून प्रदर्शित होते. संन्यासाचा भाव मनात विकसित झाल्यानंतर आपल्या मनाची पक्की धारणा होते की आता आपण पुष्कळ दु:खे भोगलेली आहेत. या सगळ्याचा आपल्याला आता वैताग आलेला आहे. आणि अगदी आंतरिक पातळीवर आपल्याला या सगळ्याचाच उबग आलेला आहे. त्यामुळे खूप झाले आता आपल्याला या सगळ्यांतून मुक्त व्हायचे आहे ही मनातील भावना प्रबळ झालेली आहे. 

आपल्या तणावदायी भावनांचा त्याग करण्यासाठी सज्ज होणे 

आपल्याला मुक्त व्हायचे असेल तर आपल्या सर्व समस्या आणि दु:खाच्या कारणांपासून मुक्त होणे गरजेचे आहे. आपण केवळ दु:खाचा नाही तर त्याच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व कारणांचाही त्याग करण्यासाठी सिद्ध होतो. इथे आपण आईस्क्रीम किंवा चॉकलेटसारख्या तत्सम गोष्टी सोडण्याविषयी बोलत नाही. कारण हा परित्यागासंदर्भातला अगदीच क्षुल्लक समज आहे असा त्याचा अर्थ होईल. आपण स्वत:ला क्रोध, लोभ, आसक्ती यापासून मुक्त करण्याचा निश्चय करतो. जर आपल्याला चॉकलेटच्या सवयीपासून मुक्त व्हायचे असेल, तर त्याच्याप्रती आपल्या मनामध्ये जी आसक्ती निर्माण झालेली आहे, ती प्रथमत: सोडणे आवश्यक आहे. आपल्याच मनात आपणच चॉकलेटचे गुण वाढवून चढवून ठेवल्याने त्याविषयीची आसक्ती वाढलेली असते. कारण आपण विचार करतो की, ही जगातील अतिशय चवदार आणि अद्वितीय अशी गोष्ट आहे. ती खाल्यामुळे मी खूश होऊन जाईन आणि अगदी पूर्णपणे सुखी होईन. परंतु जर खरंच चॉकलेट खाल्याने आपण सुखी झालो असतो, तर आपण जितके चॉकलेट खाल्ले असते तेवढे सुखी झालो असतो. परंतु आपण कितीही चॉकलेटचे शौकीन असलो आणि आपल्याला ते कितीही खायला आवडत असले तरी काही दिवसांत आपण त्याच त्याच गोष्टीला खायला कंटाळतो आणि नंतर तेच चॉकलेट पुन्हा पाहावेसेसुद्धा वाटत नाही. 

आसक्ती आणि क्रोध यांचा त्याग करण्यासाठी स्वत:शी प्रामाणिक राहण्याची भावना विकसित करणे हे सर्वांत गंभीर आणि अवघड असे काम आहे. ही गोष्ट इतक्या सहजपणाने घेऊन चालणार नाही. ही स्थिती पुढे कथित केलेल्या विनोदासारखी आहे. एक माणूस आपले डोके भिंतीवर जोरजोराने आपटत आहे. परंतु तो डोके आपटायचे काही केल्या थांबत नाही. कारण त्याला केवळ याचीच भीती आहे की जर आपण डोके आपटायचे थांबलो तर न जाणो परिस्थिती या पेक्षा वाईट तर होणार नाही ना. आपल्याला एखाद्या गोष्टीची इतकी सवय होऊन जाते की, आपण सातत्याने भिंतीवर डोके आपटतच राहतो. अर्थातच,  हे अतिशयोक्ती असलेले एक उदाहरण आहे. या पेक्षा अगदी सोपे आणि व्यवहारातील उदाहरण सांगायचे तर एखाद्या व्यक्तीसोबतचे आपले संबंध सातत्याने आपले नुकसान करीत असतात. परंतु केवळ आपण एकटे पडू या भीतीने आपण ते संबंध तोडायला घाबरत असतो. त्याचा परिणाम होतो की, आपण बिघडलेल्या नातेसंबंधातील ते नाते तसेच पुढे ओढत राहतो आणि अंतिमत: आपल्या झोळीत दु:खच पडत राहते.

असे खूपदा होत राहते की नाही? आपल्याला एखादा माणूस सोडून जाईल केवळ या भीतीपोटी आपण बऱ्याचदा लोकांना अनेक गोष्टी सांगायचे टाळतो. आपण इथे कुठल्या अशक्यप्राय गोष्टीबाबत बोलत नाही आहोत. कारण आपण दैनंदिन व्यवहारात दररोज अशा अनुभवांतून जात असतो. 

पुनर्जन्माच्या अनियंत्रित चक्रातून मुक्ती मिळवणे शक्य आहे का?  हे करण्यासाठी मी सक्षम आहे का? 

मुक्ती आणि त्यानंतर ज्ञानोदयाची प्राप्ती करण्याचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी अगोदर समजून घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे एक तर हे शक्य आहे. आपण हे कसे साध्य करू शकतो याचा विचार करणे आणि समजून घेणे गरजेचे आहे. हा विषय काहीसा अवघड आहे कारण आपण जे उद्दिष्ट ठेवत आहोत ते साध्य करण्यासारखे आहे आणि ते साध्य करण्याची क्षमताही आपल्यातील प्रत्येकामध्ये आहे हे सारे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवणे अवघड आहे. त्यामुळे हे समजूनच न घेता अनेक लोक या संदर्भातील प्रयत्न सोडूनच देतात. ही खरंतर सर्वांत मोठी चूक असते. जर आपल्याला स्वत:लाच खात्री नसेल की आपण ते उद्दिष्ट प्राप्त करू शकू, तर ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात तरी काय अर्थ उरणार आहे?  उदाहरणादाखल सांगायचे तर आपण एखादा खेळ खेळत असतो. आपण खेळत राहतो. खेळता खेळता आपण एका अशा टप्प्यावर पोहोचतो की त्या खेळातला आपला रस संपून जातो. तो खेळ खेळावासा वाटत नाही आणि मग त्या खेळाला काहीही अर्थ नाही असं म्हणतो आणि आपण तो खेळ अर्ध्यातच सोडून देतो. 

त्यासाठी आपण बुद्ध धातू ( मुक्ती आणि ज्ञानोदय प्राप्तीतील सहायक घटक), चित्तातील सहज स्वाभाविक निर्मळता हे विषय सखोलपणाने समजून घ्यावे लागतील. आपले सतत अशांत असणारे मन आणि आपला सतत संभ्रमित असणारा दृष्टिकोन या दोन्ही गोष्टी आपल्या चित्तातील मूलतत्त्व आहेत का?  जर असे असते तर या मानसिक भावना आपल्या चित्तामध्ये प्रत्येक क्षणी उपस्थित राहिल्या असत्या. आणि मग जर हे चित्तातील मूळ तत्त्व नसेल तर ही तत्त्वे अस्थायी आहेत का?  पुन्हा पुन्हा या भावना मनात उमटू नयेत म्हणून त्यांना कायमचे नष्ट करणे खरोखर शक्य आहे का? 

या संदर्भात प्रश्न उपस्थित करणे आणि विचार विमर्श करणेही आवश्यक आहे. अगदी डोळे मिटून त्यावर विश्वास ठेवावा अशा प्रकारची ही बाब निश्चितच नाही. वस्तुत: या संदर्भात आपण जितके प्रश्न उपस्थित करू तितके अधिक चांगले आहे. कारण तेव्हाच आपल्या मनातील साऱ्या शंकाकुशंका दूर होतील. त्यातूनच आपण जे काही करायला जात आहोत त्या संदर्भात एक दृढ विश्वास निर्माण होऊ शकेल. आपल्या मनात १०० टक्के दृढ विश्वास निर्माण होत नाही, तोपर्यंत आपण त्याची वाट पाहावी का?  हे बघा, या प्रश्नाचे उत्तर देणे तसे सोपे नाही. कारण आपल्याला मनापासून खात्री वाटते आहे हे समजणार कसे? त्यामध्ये पुष्कळ काळ जाऊ शकतो. 

जर आपल्याला वाटत असेल की हा सगळाच फालतूपणा आहे तर अर्थातच आपण त्याचा अभ्यास करू शकणार नाही. परंतु जर आपल्या विचारांची दिशा ही जर सकारात्मक असेल. हे होऊ शकते, हे सर्व करणे शक्य होऊ शकते असे वाटत असेल, तर सारे काही शक्य असते. त्यामुळे तर्काच्या आधारावरच यातील कोणतीही गोष्ट सत्य मानायला हवी आणि डोळे मिटून त्यावर विश्वास ठेवू नये. केवळ माझ्या शिक्षकांनी वा गुरूंनी मला सांगितले आहे,  म्हणूनदेखील आंधळेपणाने कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवणे योग्य नव्हे. स्वत: बुद्ध सांगत असत की, केवळ माझ्यावर विश्वास आहे म्हणून मी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. ज्याप्रमाणे आपण दुकानात जाऊन सोने खरेदी करताना ते वारंवार पारखून,  तपासून घेतो त्याचप्रमाणे मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट सुद्धा तुमच्या तर्काच्या निकषावर वारंवार तपासून पाहा आणि मगच स्वीकार करा.

कोणतीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी ती खरी आहे की नाही हे आपण तपासून पाहणे गरजेचे आहे. 

पुनर्जन्माच्या संदर्भात विश्वास प्राप्त करणे : सरकॉंग रिंपोछे यांच्या दोन जन्मांची आठवण 

पुनर्जन्माच्या संदर्भात ते मान्य करण्यासाठी आपला विश्वास बसण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असू शकते. या विषयाचा मी अनेक वर्षे बारकाईने व खोलात जाऊन अभ्यास केलेला आहे, त्यामुळे या विषयाच्या संदर्भात मी आपल्याला माझा स्वत:चा अनुभव निश्चितपणे सांगू शकतो. मी ४५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून बौद्ध धर्माचा अभ्यास करत आलो आहे. एक वेळ अशी आली जेव्हा मी तर्काच्या आधारावर एका बौद्धिक निष्कर्षावर निश्चितपणे पोहोचलो होतो. पुनर्जन्माची बाब तर्कसंगत का आहे हे माझ्या लक्षात आले होते. दोन जन्मांतील माझ्या गुरूंशी माझे जे भावनिक संबंध प्रस्थापित झालेले होते. त्या पातळीवर त्यांनी मला या गोष्टीचा विश्वास मिळवून दिला. त्यांचे नाव सरकॉंग रिंपोछे असे होते. परमपूज्य दलाई लामा यांच्या शिक्षकांपैकी ते एक होते. त्यांचा अतिशय जवळचा शिष्य बनण्याची संधी मला मिळाली होती. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. मी सुमारे नऊ वर्षे त्यांच्या समवेत राहिलो होतो. त्याकाळात त्यांचा अनुवादक म्हणून आणि त्यांचा स्वीय सचिव म्हणून काम करण्याची संधी मला प्राप्त झालेली होती. 

मी त्यांच्या परदेश दौऱ्यांची व्यवस्था पाहत असे. त्यांच्या सगळ्या परदेश दौऱ्यांमध्ये मी त्यांच्या समवेत जात असे. त्यांचा अतिशय जवळचा विश्वासू सहकारी म्हणून मी काम करीत होतो. १९८३ साली त्यांचे निधन झाले आणि त्यानंतर त्यांचा पुन्हा पुनर्जन्म झाला. तिबेटमधील तुल्कु परंपरेनुसार त्यांचा पुन्हा शोध घेण्यात आला. 

आता ते २५ वर्षांचे आहेत. आजही मी त्यांचा निकटवर्ती आहे. अगदी पूर्वीच्या जन्मात होते तसे आमचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.  आता फक्त बदल एवढाच झाला आहे की आम्हा दोघांतील वयामध्ये अदलाबदल झालेली आहे. आता ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. नव्या सरकॉंग रिंपोछे यांच्याशी माझी भेट झाली तेव्हा ते अवघ्या चार वर्षांचे होते. जेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्या खोलीमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्या अनुयायांनी त्यांना विचारले की, तुम्ही यांना ओळखता का? त्यावर त्यांचे उत्तर होते, हा काय मूर्खासारखा प्रश्न आहे. अर्थात मी ओळखतो की हे कोण आहेत. अगदी सुरुवातीपासूनच जेव्हा ते चार वर्षांचे होते, तेव्हापासूनच त्यांचा माझ्यासमवेतचा जिव्हाळा खूप वेगळा होता आणि ते अगदी प्रेमाने माझ्याशी वागत असत. ते जसजसे मोठे होऊ लागते तसतसा त्यांच्या वागण्यात मात्र काहीही बदल झाला नाही. 

अनेकदा जेव्हा आम्ही त्यांच्या गत जन्मातील काही व्हिडिओ पाहायचो तेव्हा ते त्यासंदर्भात माझ्याशी बोलायचे. ते जेव्हा माझ्याशी बोलायचे तेव्हा त्यात वायफळ काहीही नसायचे. ते म्हणायचे, हो मला आठवतंय मी असे म्हणालो होतो. सर्व प्रकारचे तर्क आणि विचार यांच्याशिवाय हा प्रत्यक्ष अनुभव मला येत असल्याने हा, कदाचित असे असू शकेल या साशंकतेतून मी बाहेर पडलो. त्या भावनेच्या पुढे जाऊन मी विचार करू शकलो आणि तो समजून घेऊ शकलो. या अनुभवाने माझ्या विचारांना ठामपणा प्राप्त करून दिला. 

या गोष्टी तशा सोप्या नसतात. खरोखर मुक्ती मिळवणे सोपे आहे का? चित्ताची खरी प्रकृती खरोखर निर्मळतेचीच असते का?  जरी आपण तर्काच्या पातळीवर हे सारे समजून घेण्याचा प्रयत्न केला तरीही आत्मिक पातळीवर त्या गोष्टीचा बोध प्राप्त करण्यासाठी आपल्याला आणखी खोलात उतरून हे सारे समजून घ्यावे लागते. पण हळू हळू प्रयत्नपूर्वक आपण या दिशेने पुढे जाऊ शकतो. 

यथार्थ विषयीचा भ्रम हेच वारंवार घ्याव्या लागणाऱ्या पुनर्जन्मांचे खरे कारण आहे

लाम-रिममध्ये प्रेरणेच्या मध्यवर्ती स्तरावर अवलंबित उत्पत्तीच्या (प्रतीत्यसमुत्पाद) १२ व्या मालिकेमध्ये पुनर्जन्मासंदर्भात अगदी सविस्तर व्याख्या देण्यात आलेली आहे. ही एक अतिशय गुंतागुंतीची अशी प्रक्रिया आहे. ती कर्म, कार्मिक उत्तरप्रभाव अशा विविध विषयांशी जोडलेली आहे. आपल्याला क्रोध आणि लोभ यासारख्या अशांती निर्माण करणाऱ्या मनोभावना,  त्यांची उत्पत्ती आणि त्याची कारणे बारकाईने समजून घ्यावी लागतील. सोप्या शब्दांत या सुरुवातीच्या अवस्थेला मी भ्रम असे संबोधतो. त्यामध्ये आपण जे काही व्यवहार करीत असतो. त्याचा आपल्यावर व इतरांवर प्रभाव पडतो असा आपल्याला भ्रम निर्माण झालेला असतो. अधिक खोलात जाऊन आपण पाहिले, तर आपल्या अस्तित्वाचा खरा आधार काय आहे, दुसरे लोक कोणत्या अस्तित्वात आहेत आणि आजूबाजूच्या सर्वच गोष्टी कोणत्या अस्तित्वात आहेत या सगळ्याचाच आपल्या मनात संभ्रम असतो. 

आपली मूळ प्रवृत्तीच अशी असते की आपण वस्तुंचे स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानून चालत असतो. या वस्तू आपल्या सर्व शक्तीनिशी वेगळे स्वतंत्र अस्तित्व राखून आहेत आणि अन्य सर्व वस्तुंपेक्षा अर्थातच त्या भिन्न आहेत. समजा त्या सगळ्या वस्तू प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून ठेवलेल्या असल्या तरीही आतील सगळ्या वस्तू एकमेकांशी जोडलेल्या आहेत, असा आपण तात्पुरता विचार करायचे ठरवले तरी प्लॅस्टिकच्या आवरणाखाली त्या वस्तु स्वतंत्रपणे अस्तित्वात आहेत असेच आपले मन सांगत राहाते. लाकडाच्या तुकड्याने त्या बांधून ठेवलेल्या असल्याने त्या एकत्र एकमेकांशी जोडलेल्या असाव्यात असे आपल्याला वाटते. अस्तित्वाच्या संदर्भात खरोखर जाणून घ्यायचे असेल, तर अशक्य वाटणाऱ्या अनेक पर्यायांच्या माध्यमातून सूक्ष्म पातळीवर या संदर्भातील बोध प्राप्त करावा लागतो. अस्तित्व ही गोष्ट असंभव कशी आहे हे आपल्याला अगदी नीटपणे समजून घ्यावे लागणार आहे. प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक वस्तूवर आपला भ्रम कशा पद्धतीने कल्पनांचे आरोपण करीत असतो हे देखील समजून घ्यावे लागणार आहे.  

शून्यता : अस्तित्वाच्या अशक्य वाटणाऱ्या उपायांचा पूर्ण अभाव 

आपल्याला शून्यता म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. शून्यतेचा अर्थपूर्ण असा अभाव असतो. कोणत्याही वस्तुचे मुळात अस्तित्वच नाही. मग जी गोष्ट अस्तित्वातच नाही,  ज्या गोष्टी अशक्य आहेत त्याच गोष्टी आपल्या मनातील कल्पनेला खऱ्या अर्थाने बोध देणाऱ्या असतात. वास्तवात अस्तित्व असणाऱ्या कुठल्या गोष्टीचा त्यातून बोध होत नाही. 

सांता क्लॉजच्या उदाहरणाने हे आपण समजून घेऊ शकतो. असं धरून चला की आपण लाल रंगाचे कपडे घातलेल्या, लांब पांढरी दाढी असलेल्या कुठल्याही व्यक्तीला पाहिले तर आपण त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर स्वाभाविकपणे त्याला सांता क्लॉज म्हणू. आपल्याला असे वाटते की ती व्यक्ती सांता क्लॉज आहे. पण असे का वाटत असावे? कारण ती व्यक्ती सांता क्लॉजसारखी दिसत असते. परंतु वास्तवामध्ये सांता क्लॉजसारखी दिसणारी त्याची प्रतिमा प्रत्यक्षातील सांता क्लॉजप्रमाणेच नसते. कारण ती व्यक्ती वास्तवात सांता क्लॉजही नसते. शून्यता समजून घेताना हीच गोष्ट सांगितली जाते. प्रत्यक्षातील एखाद्या सांता क्लॉजचे अस्तित्वात नसणे हे त्या व्यक्तीच्या प्रतिमेशी केवळ जुळणारे असते. परंतु यामध्ये कोणत्याही दृष्टीने या गोष्टीचे खंडण करण्यात आलेले नाही की,  एक व्यक्ती आहे आणि ती सांता क्लॉजसारखी दिसते. ती व्यक्ती सांता क्लॉजसारखी दिसते, परंतु प्रत्यक्षात ती सांता क्लॉज नाही. कारण खरं तर सांता क्लॉजसारखे या जगात काहीही प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही.  

आपले चित्त प्रत्येक वेळी याच पद्धतीने काम करीत असते. आपण सर्व प्रकारच्या बिनबुडाच्या कल्पनांमध्ये रममाण होत असतो. जसे की ही व्यक्ती सर्वांत सुंदर दिसते किंवा ही व्यक्ती सर्वाधिक कुरूप आहे. आपण या संसारविश्वातील सर्वांत चांगल्या व्यक्ती आहोत किंवा दुसरे टोक म्हणजे आपण या संसारविश्वाच्या पसाऱ्यातील सर्वाधिक नालायक व निरुपयोगी व्यक्ती आहोत. आपण या गोष्टींची कल्पना करीत असताना आपले आणि इतर लोकांचे अस्तित्व खरोखर तसे आहे  असा विचार कल्पनेच्या आधारे करीत असतो. जणू काही त्यांचे अस्तित्वही पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि हीच अपरिवर्तनशील अशी गोष्ट असावी अशी आपली धारणा असते. 

खरे वास्तव हेच आहे की कुणाचेही अस्तित्व म्हणून असे नसतेच. खरं तर असे असणे असंभव आहे कारण प्रत्येक एका वस्तूचे अस्तित्व हे दुसऱ्या वस्तूच्या सापेक्ष असते. परमपूज्य दलाई लामा हे या संदर्भात कायम आपल्या बोटांचे उदाहरण देतात. आपल्या हाताचे चौथे बोट हे आकाराने मोठे आहे की लहान? पाचव्या बोटाच्या तुलनेत ते मोठी आहे. परंतु मधल्या बोटाच्या तुलनेत लहान आहे. मग ते बोट स्वत:च्या बळावर, स्वत: म्हणून मोठे म्हणायचे की लहान?  याचे काहीही उत्तर असू शकत नाही कारण ते बोट दुसऱ्या गोष्टींच्या तुलनेत मोठे किंवा लहान आहे. त्या बोटाचे अस्तित्व संपूर्णपणे दुसऱ्या गोष्टींवर अवलंबून आहे आणि एखादी गोष्ट लहान की मोठी या संदर्भात आपली धारणा काय आहे यावर ते अवलंबून आहे. मला असे वाटते की आपल्याला माझ्या मनातील विचार आता पुरेसा योग्य पद्धतीने समजलेला असावा. 

एकाग्रता आणि नैतिक आत्मानुशासन यांचे महत्त्व 

शून्यतेचा बोध प्राप्त करायचा असेल तर आपल्याला एकाग्र होणे आवश्यक आहे. एकाग्रता विकसित करायची असेल तर आपल्याला नैतिक आत्मानुशासनाचा विकास करावा लागतो. हे समजून घेण्यासाठी जेव्हा एखादे झाड कापले जाते, तेव्हाच्या प्रक्रियेचे उदाहरण दिले जाते. बुद्धी ही एखाद्या धारदार कुऱ्हाडीप्रमाणे असते. परंतु एखादे झाड कापायचे असेल तर त्या कुऱ्हाडीचे घाव एकाच ठिकाणी वारंवार पूर्ण शक्तीनिशी पडत राहणे आवश्यक असते. सातत्याने आणि वारंवार एकाच ठिकाणी घाव करीत राहणे म्हणजे एक प्रकारची एकाग्रताच असते. वास्तवात कुऱ्हाड उचलून आणि फिरवून पुन्हा त्याच जागी मारण्यासाठी आपल्याला शक्तीची आवश्यकता अधिक असते. ही ताकद आपल्याला नैतिक आत्मानुशासन असेल तर प्राप्त होते. त्यामध्ये आपण स्वत:ला विनाशकारी पद्धतीने कोणताही व्यवहार करण्यापासून रोखत असतो. 

मध्यवर्ती स्तरामध्ये जी विविध प्रकारची व्रते घेतली जाऊ शकतात तीसुद्धा सादर केली जातात. त्यामध्ये पूर्ण किंवा नव्याने दीक्षा घेतलेले भिक्षु आणि भिक्षुणी यांच्याद्वारे घेतले जाणारे व्रत किंवा गृहस्थ, पुरुष वा स्त्रियांद्वारे घेतल्या जाणाऱ्या  व्रतांचाही समावेश होतो. गृहस्थ म्हणजे अशी व्यक्ती असते जी एखाद्या मठामध्ये राहते, परंतु ब्रम्हचार्याप्रमाणे ती व्यक्ती जीवन व्यतित करीत नाही. अर्थात याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीचे कुटुंब, परिवार असायलाच हवा असे काही नाही. त्यामध्ये अविवाहित व्यक्तींचादेखील गृहस्थ म्हणून विचार होऊ शकतो. प्राचीन भारताच्या संदर्भात विचार करायचा झाला तर अशी परिस्थिती अपवादात्मक असायची. कारण ज्यांना गृहस्थ असे संबोधले जात असे त्यापैकी बहुतांश लोकांचे स्वत:चे कुटुंब असायचे. या मठामध्ये राहणाऱ्यांना आणि गृहस्थांना एकत्रितपणे व्यक्तीच्या मुक्तीसाठीचे व्रत असे संबोधले जाते. कारण हे व्रत आपल्या मुक्तीच्या उद्देशानेच घेतले जात असते. आपली ध्यानधारणा आणि दुसऱ्या सकारात्मक कृत्यांमध्ये विघ्न बनतील अशा सर्व प्रकारच्या व्यवहारांपासून दूर राहण्यासाठी अशी व्रते उपयुक्त ठरतात. 

एखाद्या व्रताचे पालन करणे हे फार महत्त्वपूर्ण असते. का? तर आपण जेव्हा कोणतीही गोष्ट पुन्हा न करण्याचे व्रत घेतो, तेव्हा आपण निश्चय न करण्याच्या भावनेतून मुक्त होऊन जातो. उदाहरणादाखल आपण विचार करूया की आपण दारू किंवा सिगारेटच्या सवयीपासून मुक्त होण्याचा विचार करतो आहोत. जे लोक दारू आणि सिगारेट पितात अशा व्यक्तींसोबत आपण जेव्हा असतो, तेव्हा आपणही दारू प्यावी किंवा सिगारेट ओढावी असे एका बाजूला वाटते तर दुसऱ्या बाजूला त्याला नकार द्यावा असेही वाटते. अशी द्विधा मन:स्थिती बनलेली असते. मग आपल्याला भलेही ते व्यसन सोडून द्यायचे असेल तरीही जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा आपल्याला एक निर्णय घ्यावा लागेल. असे करणे हे प्रत्येकवेळी ताण वाढवणारे नसले तरीही आव्हानात्मक नक्कीच असते. 

परंतु जर आपण त्याची प्रतिज्ञाच घेतली तर तो निर्णय अंतिम होऊन जातो. आपण एकदा का ठाम निर्णय घेतला, की मी दारू पिणार नाही. मी सिगारेट ओढणार नाही. अथवा जी कोणती गोष्ट आपल्याला सोडायची आहे त्यासंबंधात निर्णय घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत मग आपल्या आजूबाजूचे सगळे लोक दारू पित असतील तरीही त्याने काहीही फरक पडणार नाही. कारण आपल्या मनाने तसा निर्धार केलेला असतो. हे निर्धार केलेले व्रत म्हणजे कोणती शिक्षा किंवा प्रतिबंधात्मक बंधन नसते. उलट यातून आपल्याला फार मोठे आत्मबळ प्राप्त होत असते. यातून आपण निश्चय न करू शकण्याच्या दुर्बलतेतून बाहेर पडतो. विशेषत: अशा गोष्टी आपल्या अंतिम मुक्ती प्राप्त करण्याच्या मार्गातील अडथळे बनत असतात. 

बौद्ध धर्मामध्ये कोणत्याही प्रकारचे व्रत घेण्याचे कोणतेही बंधन लादण्यात आलेले नाही. हे आपल्याला नीट समजून घ्यावे लागेल. तुम्हाला अमुक किंवा अमुक व्रत घ्यावे लागेल असे आपल्याला कुणीही सांगू शकणार नाही. तसेच भिक्षु अथवा भिक्षुणी बनून मठामध्येच राहावे लागेल असे बंधनसुद्धा तुमच्यावर कुणीही लादणार नाही अथवा सांगणार नाही. परंतु या संसारविश्वाच्या चक्रातून मुक्त होण्याबाबत आपण खरोखर गंभीर असाल तर काही निश्चित प्रकारची व्रते स्वीकारल्यामुळे या उद्दिष्टांची प्राप्ती निश्चित आणि सहजसाध्य होऊन जाईल. कदाचित असे होऊ शकेल की ही व्रते स्वीकारण्यासाठी आपण अद्याप तयार नसू. तर त्यात काहीही अडचण नाही. अत्यंत प्रामाणिकपणाने आपण स्वत:चे आणि आपल्या परिस्थितीचे मूल्यांकन करायला शिकले पाहिजे. 

हे झाले मध्यवर्ती स्तराच्या बाबतीत. एकाग्रता व शून्यता याचाच भाग आहे. पण आपण त्या संदर्भात संपूर्ण चर्चा केलेली नाही. उन्नत स्तराच्या शिकवणुकीमध्ये या विषयी संपूर्ण सविस्तर चर्चा केली जाते. 

उन्नत स्तराची प्रेरणा : दुसऱ्या सर्व जिवांचा विचार करणे 

उन्नत स्तरामध्ये आपण असा विचार करतो की या विश्वाच्या प्रचंड मोठ्या पसाऱ्यामध्ये आपण एकटेच नाही. दुसरे जीवसुद्धा आहेत आणि इतर लोकसुद्धा आपल्या स्थितीसारखेच आहेत. दुसरा प्रत्येक जीव दु:ख भोगत आहे आणि नियंत्रणाच्या पलीकडे असलेल्या पुनर्जन्माच्या प्रक्रियेतून वारंवार जातो आहे. आपल्याला शाश्वत सुखाची ओढ आहे आणि दु:खापासून स्वत:ला वाचवायचे आहे. दुसऱ्या प्रत्येक जिवालासुद्धा हेच तर हवे आहे. या दृष्टीने विचार केला तर आपण एकसमान आहोत. ही गोष्ट केवळ मी आणि काही निवडक जिवांच्या बाबतीत लागू होते असे नाही, तर या सृष्टीतल्या प्रत्येक जीवाला लागू पडते. आपण सगळेच एकमेकांशी जोडलेले आहोत आणि एकमेकांवर अवलंबूनसुद्धा आहोत. आपले अस्तित्व इतरांपेक्षा पूर्ण स्वतंत्र नाही. खरे वास्तव हेच आहे की या पद्धतीने जगू पाहिल्यास आपले अस्तित्वच राहणार नाही. काही अवघड परंतु प्रभावी ठरणारे असे काही उपाय आहेत, ज्यांच्यामुळे आपल्या विचारांमध्ये सर्वांना सामावून घेण्याची व्यापकता येते आणि त्याद्वारे आपले हृदय अधिक व्यापक आणि उदार होते. या संदर्भात आपण पूर्वी थोडी चर्चा केलेली आहे. त्यात आपण असे म्हटले होते की सर्व जीव गेल्या जन्मामध्ये आपल्या माता होत्या. आपल्यावर त्यांनी खूप माया केली आणि त्यांचे आपल्याशी असणारे सारे व्यवहार करुणेने ओतप्रोत भरलेले होते. एक धर्म लाईटचा स्तर आहे. त्यामध्ये,  दुसरे जीव आपल्या मातेचे रूप घेऊन व्यवहार करण्याची क्षमता कसे राखून असतात या विषयीचा बोध आपल्याला प्राप्त होतो. परंतु या प्रकारचा बोध मर्यादित असतो कारण डासांसारख्या आपल्या मित्र जिवांना ते लागू करणे अवघड असते. 

प्रेम 

आपल्या हृदयामध्ये उदारता निर्माण करण्याची सुरुवात प्रेमाचे भाव विकसित करण्यापासून केली जाते. या प्रक्रियेची सुरुवात खरंतर समवृत्तीच्या भावनांसह होते. ज्यात आपण काही ठरावीक लोकांकडे आकर्षित होत नाही आणि ठरावीक लोकांचा द्वेषही करत नाही. ना उरलेल्या लोकांच्या बाबतीत आपण तटस्थ राहू पाहतो. आपण सगळ्यांच्याच संदर्भात उदार बनण्याचा अभ्यास करतो. त्या आधारावर प्रत्येक जीवाशी आपण आंतरसंबंधांचा बोध प्राप्त करतो. प्रत्येक जीव पूर्वी आपली माता होती, या तर्काच्या आधाराने आपण ही गोष्ट समजून घेऊ शकतो. आपल्याला आवडणारी प्रत्येक वस्तू किंवा आपण ज्याचा वापर करतो ती वस्तू कशाप्रकारे दुसऱ्या जीवाच्या परिश्रमाने आपल्याला प्राप्त होते याचा विचार करून आपण समजून घेऊ शकतो. आपल्या पायांखालची फरशी पाहा. ज्या घरात आपण आहात ते घर पाहा. जे पाणी आपण पितो त्याचा विचार करा. आपण कधी विचार करतो का हे सारे कुठून आले?  आपले पाणी, आपले जेवण आपल्यापर्यंत कशा रीतीने पोहोचले?  हे सारे इतरांच्या परिश्रमामुळे शक्य झालेले आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक लोकांच्या मेहनतीने हे साध्य झालेले आहे. आपण सारे समान आहोत. त्यामुळे केवळ आपल्या लाभासाठी काम करीत राहणे अयोग्य आहे. कारण खऱ्या अर्थाने आपले भले करायचे असेल, तर सर्व जीवमात्रांचे भले व्हायला हवे. 

अशाप्रकारे आपण प्रत्येक जीवितमात्रासाठी समान प्रेमभाव विकसित करू शकतो. या प्रेमामुळे प्रत्येक जीव सुखी व्हावा आणि प्रत्येक जीवाला सुखी होण्याची जी इच्छा असते ती विकसीत होण्यासाठी मदत मिळते. सामान्यत: जे आसक्तीयुक्त असे जे रुमानी प्रेम असते, त्याच्याशी या प्रेमाचा काहीही संबंध नाही. जेव्हा आपण म्हणतो की माझे तुझ्यावर प्रेम आहे, तेव्हा सर्वसाधारणपणे त्याचा अर्थ असा असतो की मला तुझी खूप गरज आहे. तू मला कधीही सोडून जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. जर आपल्याला दुसऱ्या व्यक्तीकडून हा अपेक्षित प्रतिसाद मिळालाच नाही. अथवा त्या व्यक्तीने काही अप्रिय गोष्ट सांगितली तर आपली भावना लगेचच माझे तुझ्यावर प्रेम नाही अशा पद्धतीने बदलू शकते. 

बौद्ध धर्मामध्ये आपण ज्या प्रेमाच्या संदर्भात विचार करतो आहोत, त्यामध्ये दुसरे काय पद्धतीने कृती करतात किंवा आपल्याशी त्यांचे वागणे कसे आहे याचा त्या प्रेमाशी काहीही संबंध नसतो. त्या प्रेमामध्ये केवळ एकमात्र इच्छा भरून राहिलेली असते ती म्हणजे तुम्ही सुखी व्हावे. इतर सगळेजण माझ्याच शरीराचा भाग आहेत अशा पद्धतीने पाहिले जाते. असा एकदा विचार केला की मग पायाची केवळ ठरावीक बोटेच सुखी व्हावीत असा विचार आपण करणार नाही. सर्वच बोटे सुखी असावीत असा विचार स्वाभाविकपणे होईल. ती बोटे आपल्यासाठी काय करतात याने मग तसा काहीही फरक पडत नाही. 

करुणा 

प्रेमयुक्त होऊन मग आपण आपल्यामध्ये करुणाभाव विकसित करू शकतो. इतर सर्व जण दु:खातून आणि दु:खाच्या सर्व कारणांतून मुक्त व्हावेत अशी इच्छा यामध्ये मनात धरली जाते. याचा संबंध केवळ वरवरची दु:खे,  जीवनातील चढ उतार यांच्याशी नसतो, तर अनियंत्रित पद्धतीने वारंवार होणाऱ्या पुनर्जन्मासारख्या गूढ प्रकारांतून निर्माण होणाऱ्या दु:खाशीही असतो. इतरांना उगीचच दया दाखवणे आणि अरेरे, बिचारे तुम्ही असे म्हणून त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करावी असा करुणायुक्त होण्याचा अर्थ अजिबात होत नाही. बौद्ध करुणा ही दुसऱ्याचा आत्मसन्मान जपण्यावर आधारित आहे. दु:ख आणि दु:खाच्या कारणांतून इतरांचीही मुक्ती शक्य आहे हा करुणेचा खरा आधार आहे. ही केवळ एक सदिच्छा किंवा मोहक शब्दांच्या प्रयोगापुरती मर्यादित संकल्पना नाही. करुणेमध्ये दु:खातून मुक्त होण्याची अवस्था प्रत्यक्षात येऊ शकण्याची जबाबदारी आपण आपल्या शिरावर घेतो. असे करण्यासाठी अंगी मोठे धाडस असणे आवश्यक असते. 

जेव्हा आपल्यामध्ये महाकरुणेचा भाव विकसित होतो, तेव्हा आपली करुणा सर्व जीवितमात्रांसाठी समान पातळीवर असते. एखादी प्रेमळ माता ज्याप्रमाणे आपल्या सर्व मुलांकडे समान प्रेमाने पाहते तसाच भाव मग सृष्टीतील प्रत्येक जीवमात्राकडे पाहताना विकसित झालेला असतो. आपल्या या महाकरुणेच्या भावनेत प्रत्येक जीवाची आणि त्याला सर्व प्रकारच्या दु:खातून मुक्त करण्याची भावना विकसित होते. 

अद्वितीय संकल्प 

पुढच्या पावलावर आपल्याला अशी एक चित्तावस्था विकसित करावी लागते त्याला असाधारण संकल्प असे म्हटले जाते. यामध्ये आपण इतरांची केवळ वरवरची नाही तर अगदी खोलात जाऊन मदत करण्याची जबाबदारी स्वीकारायला तयार असतो आणि तसा आपण निश्चयही करतो. आपण इतरांनाही बुद्धत्वाची जागृत अवस्था प्राप्त करण्यासाठी मदत करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा मनोमन निश्चय करतो. ही आपली केवळ वरवरची इच्छा नसते तर आपण या संबंधात ठाम निश्चय करतो की आपण ठामपणे असे करण्याचा प्रयत्न करू. 

बोधिचित्त : इतर सर्व जीवमात्रांच्या भल्यासाठी ज्ञानोदय प्राप्तीचे ध्येय 

या सर्व गोष्टी क्रमाक्रमाने प्राप्त करीत असताना त्यातील सर्वांत शेवटचे महत्त्वाचे ध्येय म्हणजे बोधिचित्त ही अवस्था प्राप्त करणे हे आहे. ही अवस्था प्रेम, करुणा आणि अद्वितीय संकल्पावर आधारित असते. इतर सर्व जीवमात्रांची मदत करावयाची असेल तर त्यासाठी आपण स्वत: बुद्धत्व प्राप्त करणे आवश्यक आहे, हा बोध विकसित होणे आवश्यक आहे. परंतु आपली ही इच्छा व्यावहारिक असावी म्हणून आपल्याला अगोदर बुद्ध काय असतात हे समजून घ्यावे लागेल. एखादे बुद्ध कोणाची खरोखर मदत करू शकतात का अथवा करू शकत नाहीत, तसेच कोणकोणत्या प्रकारांनी मदत करू शकतात हे देखील समजून घेणे आवश्यक ठरते. 

लक्षात घ्या, बुद्ध म्हणजे जो चुटकी वाजवताक्षणी प्रत्येक जीवाचे दु:ख दूर करू शकेल असा कुणी सर्वशक्तीमान ईश्वर नाही. कोणतीही बुद्धत्वाला पोहोचलेली व्यक्ती दुसऱ्याला योग्य दिशा दाखवू शकेल आणि त्यांना प्रेरणा देऊ शकेल. परंतु पुढील सर्व गोष्टी प्रत्यक्षात आपल्या आपणालाच करावयाच्या असतात. आपल्या ऐवजी दुसरा कुणीतरी यथार्थविषयीचा बोध प्राप्त करू शकणारच नाही. तो बोध आपला आपल्यालाच प्राप्त करावा लागेल. 

अशाप्रकारे प्रेम आणि करुणेने प्रेरीत होऊन बोधिचित्त हे स्वत: ज्ञानोदयाच्या प्राप्तीवर केंद्रित होऊन जाते. हे आपले स्वत:चे ज्ञानोदय आहे. बुद्ध शाक्यमुनी किंवा अन्य कुणाही सर्वसाधारण व्यक्तीचे हे ज्ञानोदय नाही. अजूनपर्यंत आपले ज्ञानोदय प्रकट झालेले नाही. परंतु ते होऊ शकते. हे ज्ञानोदय आपल्या मानसिक सातत्याच्या बुद्ध धातू कारकांच्या आधारे प्रकट होणार असते. या कारकांमध्ये आपल्या मानसिक सातत्याची मूलभूत अशी निर्मळ प्रकृती आणि त्याच्या संपूर्ण क्षमता आणि शक्यता यांचा समावेश असतो. या प्रयोजनाच्या बरोबरीने अद्याप अस्तित्वात न आलेल्या ज्ञानोदयावर आपण ध्यान केंद्रित करतो. कारण त्याद्वारे आपल्याला इतरांचे भले करण्याची इच्छा असते. ज्ञानोदयाची प्राप्ती करण्याच्या प्रयत्नांमध्ये आपण इतरांचे भले करण्याची भावना अधिकाधिक प्रमाणात स्वत:मध्ये मुरवणे आवश्यक असते. 

यालाच बोधिचित्त म्हणतात.  ही एक व्यापक अशी चित्ताची अवस्था असते. केवळ भ्रमातून त्याला प्रेम आणि करुणेची ध्यानधारणा समजण्याची चूक कधीही करू नये. कारण हे इतक्यापुरतेच मर्यादित नाही. प्रेम आणि करुणा तर त्याचे मुलभूत आधार आहेत. परंतु बोधिचित्त हे त्यापेक्षा कितीतरी व्यापक आहे. 

सहा व्यापक दृष्टिकोन (सहा परिमिती)

आपण हे पाहिले की उन्नत स्तराचा उद्देश बुद्धत्व प्राप्त करणे हा आहे. कारण त्याद्वारे आपल्याला इतरांची अधिकाधिक मदत करता येणार आहे. या स्तरावर आपण प्रेम, करुणा आणि अद्वितीय अशा संकल्पांनी प्रेरित होतो. परंतु हे ज्ञानोदय कशा रीतीने प्राप्त करता येऊ शकेल?  या प्रश्नाच्या उत्तराचा शोध आपल्याला सहा परिमितींच्या जवळ घेऊन जातो. त्याचाच अनुवाद मी सहा व्यापक दृष्टिकोन असा करतो. मी या पद्धतीने त्याचा अन्वयार्थ लावतो कारण या आयामांचा पैस तसा बराच व्यापक आणि विस्तारलेला आहे. तो आपल्याला बुद्धत्वाच्या ज्ञानोदीप्त अवस्थेपर्यंत घेऊन जाऊ शकतो. काही लोक असे मानतात की परिमिती या शब्दातून असा आभास होतो की त्यासाठी आपण पूर्णपणे दोषमुक्त असणे आवश्यक आहे. परंतु वास्तवात ते तसे नसतातच. त्यामुळे त्यांच्या मनात अशी भावना घर करते की या सगळ्यासाठी ते पात्र नाहीत. या अभिव्यक्तीच्या प्रयोगातून त्यांच्या मनामध्ये हा भाव उत्पन्न होऊ नये. 

दानशूरपणा 

पहिला गुण असतो दानशुरतेचा. तो गुण आपल्याला स्वत:मध्ये विकसित करावा लागतो. त्यामध्ये आपण केवळ भौतिक वस्तुंबाबतच नाही तर परामर्श,  शिकवण आणि भयापासून मुक्ती यांचेही दान करीत असतो. आपल्याकडे देण्यासाठी एखादी भौतिक वस्तू नसेल तरीही आपण दुसऱ्याला आवश्यकता असेल अशी कोणतीही गोष्ट देण्यासाठी कायम तत्पर असतो. आपला दृष्टिकोनच तसा विकसित झालेला असतो. इतरांच्या संदर्भात आपण कसे वागतो, आपला व्यवहार कसा आहे ही सुद्धा गोष्ट आपण वेगळ्या अर्थाने दुसऱ्यांना देतच असतो. कारण त्या अवस्थेमध्ये आपण समवृत्तीची भावना विकसित केलेली असते. त्यामुळे इतरांना आपली भीती वाटण्याचे काहीही कारण नसते. आपण इतरांवर रागावणार नाही. त्यांच्यावर भावनात्मक पातळीवर अवलंबून राहणार नाही. काही मिळवण्याची अपेक्षाही ठेवणार नाही आणि ते नावडतेही होणार नाहीत. याशिवाय आपण अगदी मनापासून खऱ्या अर्थाने आणि प्रामाणिकपणे त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेऊ. खरं तर ही एक अतिशय अविश्वसनीय वाटावी अशी भेट आहे जी आपण इतरांना देऊ शकतो. एक अशी भेट जी आपल्या उदार भावनेतून दिली जाते. 

नैतिक आत्मानुशासन (नैतिक स्वयंशिस्त) 

विकसित करता येऊ शकणारा असा आणखी एक व्यापक दृष्टिकोन म्हणजे,  नैतिक आत्मानुशासन होय. ज्यामध्ये आपण ज्यातून विनाश घडून येईल असे न वागण्याचा आणि जितके शक्य आहे तितके सकारात्मक वागण्याचा अभ्यास करीत असतो. आपण शिकण्यावर भर देतो. ध्यानधारणा करतो. इतरांना मदत करण्यासाठी अनुशासनाचे पालन करतो. आपण इतरांची मदत करताना थकत नाही. केवळ आपली इतरांना मदत करण्याची इच्छा नाही म्हणून आपण इतरांची उपेक्षा अजिबात करीत नाही. 

धैर्य 

कोणत्याही परिस्थितीत न रागावता दु:ख आणि आव्हानांना सहन करण्याची क्षमता म्हणजे धैर्य होय. स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणणे आणि इतरांना मदत करण्यासाठी प्रयत्न करणे इतके सोपे नसते. अनेक लोक असे असतात ज्यांची मदत करणेही तितकेसे सोपे नसते. ते आपल्यासमोरच अडचणींचा डोंगर उभा करतात. आपल्याला अशा परिस्थितीत आपण रागावू नये म्हणून अतिशय धीराने काम पूर्ण करावे लागते. अन्य सर्व व्यापक दृष्टिकोनांप्रमाणेच धैर्य विकसित करण्यासाठीदेखील अनेक प्रकारच्या पद्धती आहेत. 

कटिबद्धता 

पुढचा दृष्टिकोन आहे कटिबद्धतेचा! त्यामध्ये आपल्यासमोर कितीही आव्हाने आली तरीही आपण त्यामध्ये हार मानून मागे हटत नाही. या दृष्टीने हा व्यापक दृष्टिकोन एखाद्या वीरतापूर्ण धाडसासारखा असतो. आपण काही झाले तरी मागे तर हटत नाहीच, पण इतरांची मदत करताना आपल्याला आनंदही मिळत असतो. इतरांची मदत करण्याची संधी मिळाल्यानंतर आपण खरोखर आंतरिक प्रसन्नतेचा अनुभव घेतो. हा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अनेक प्रकारचे उपदेश आहेत. त्यामध्ये आपण केव्हा आराम करावा आणि केव्हा काही काळासाठी थांबावे हे त्यात सांगितलेले आहे. जर आपण आपल्यावरच अधिकाधिक दबाव आणला आणि तरीही काम करीत राहिलो तर आपण इतरांची मदत करू शकणार नाही. या दृष्टीने आत्मसुधारणा कशी करायची आणि आपल्याला इतरांची मदत करण्यापासून रोखणाऱ्या आळसाला दूर कसे करायचे या संबंधातील अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत. 

मानसिक स्थिरता 

या अभ्यासामध्ये मानसिक स्थिरता कशी प्राप्त करायची याविषयीही अभ्यास सांगितले जातात. याचा संबंध केवळ एकाग्रतेशी नाही. त्यामध्ये भावनिक एकाग्रतासुद्धा तितकीच महत्त्वाची ठरते व विचारात घ्यावी लागते. मानसिक अवस्था भरकटू नये यासाठी स्थिर चित्तावस्था विकसित करावी,  आपल्याला ज्या गोष्टी आकर्षित करतात त्यांच्याकडे आकृष्ट होऊन भरकटू नये किंवा त्याची गती हळू अथवा सुस्त होऊन जाऊ नये. चित्ताची अशी अवस्था इच्छित विषयावर मनाला केंद्रित ठेवू शकते. उदाहरणासाठी सांगायचे झाले तर,  जेव्हा एखादी दुसरी व्यक्ती आपल्याशी बोलत असेल तेव्हा आपले चित्त दुसऱ्याच गोष्टींच्या विचारांत कधीही भरकटत नाही. स्थिरता नष्ट करणाऱ्या व असंतुलन वाढवणाऱ्या ज्या मानसिक अवस्था असतात त्यांच्याही प्रभावाखाली आपण येत नाही. अशीही एक वेगळ्या पातळीवरची स्थिरता आपल्याला प्राप्त होते. आपले चित्त अस्थिर होत नाही. याचा अर्थ आपण आवश्यकतेपेक्षा अधिक संवेदनशील नाही किंवा अगदी संवेदनाशून्यही नाही. या उलट आपले वागणे हे अधिक योग्य असे संतुलित आणि स्थिर आहे. 

सविवेक बोध

याचा अनुवाद सामान्यत: विवेक या रूपातच केला जातो. संस्कृतमध्ये त्याला प्रज्ञापारमिता असे म्हटले जाते. सहा दृष्टिकोनांचा समुच्चय असलेल्या समूहातील हा शेवटचा दृष्टिकोन आहे. विवेकामध्येही भेद करण्याची क्षमता यातून  प्रदर्शित होते. वस्तुंच्या अस्तित्वाचा आधार काय आहे आणि कोणकोणत्या प्रकारचे अस्तित्व असणेच शक्य नाही यातील भेद या दृष्टिकोनाचा विकास झाल्याने स्पष्ट होतो. हा एक विशिष्ट प्रकारचा बोध आहे. आणि हेच कारण आहे की, यासाठी विवेक शब्दाचा वापर केल्याने त्याचा अर्थ थोडा अस्पष्ट राहून जातो. या ठिकाणी आपण स्पष्टपणे जाणणाऱ्या एका विशिष्ट बोधाची चर्चा करीत आहोत. त्याद्वारे कोणत्या गोष्टी शक्यच नाहीत हे आपल्याला समजते. याचा संबंध शून्यतेच्या बोधाशी असतो. त्यामुळे भेद केल्यानंतरच आपल्या लक्षात येते की, काही गोष्टी निरर्थक आहेत. असंभव आहेत आणि त्या गोष्टींतून कशाचाही बोध होत नाही. 

या सहा व्यापक दृष्टिकोनांच्या सहाय्याने आपले लक्ष्य, प्रेरणा, संकल्प आणि बोधिचित्त विकसित करण्यासाठी या साधनांचा व विधींचा आपण अभ्यास करतो. या सर्व गोष्टी प्रेरणेच्या उन्नत स्तरामध्ये येतात. 

सारांश 

प्रारंभिक पातळीवरच्या साधनेचा विकास करून पुढे जाऊन मध्यवर्ती स्तरावर आपल्याला हा बोध प्राप्त होतो की आपण चांगल्या अवस्थांमध्येही पुनर्जन्म प्राप्त करू शकलो तरीही आपल्या दु:खांचा शेवट होणार नाही. आपल्याला तरीही समस्यांना सामोरे जावेच लागेल. आपण आजारी पडणार, आपला मृत्यू होणार. मग पुन्हा एकदा त्याच प्रक्रियेतून आपल्याला जावे लागणार. आणि मग हीच प्रक्रिया पुन:पुन्हा होत राहणार. या क्रमाने चालणाऱ्या गोष्टींचा उबग येतो आणि मग लक्षात येते की वारंवार अनियंत्रित पद्धतीने होत राहणाऱ्या पुनर्जन्मांतून काहीही प्राप्त होणार नाही. त्यामुळे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण मोक्ष मिळवण्याचे ध्येय ठेवतो. 

यानंतर आपण उन्नत स्तरावर पोहोचतो. तिथे आपल्याला काही गोष्टी अधिक चांगल्या रीतीने समजतात. आपण एकटेच महत्त्वाचे व्यक्ती आहोत असे नाही. या ब्रह्मांडाचा केंद्रबिंदू आपण नाही. आपल्याला याचाही बोध होतो की, सुखाची इच्छा करणे आणि दु:खापासून वाचण्याची मनोकामना प्रत्येक जिवामध्ये समान अशीच आहे. इतकेच नाही तर आपल्याला हा बोधसुद्धा होतो की, सर्व जीवांचे वागणे पूर्वीच्या जन्मात आणि या जन्मातसुद्धा दयाळूपणाने भरलेले होते. जर ते नसते तर आपल्याला खायला प्यायला काहीही मिळाले नसते. आपण काही वाचू-लिहू शकलो नसतो. ना दुकानांतून काही गोष्टी खरेदी करू शकलो असतो. ना चित्रपट पाहण्याचा आनंद लुटू शकलो असतो. ना आपल्याला करता येईल असे काहीही राहिले असते. त्यामुळे ही गोष्ट एकदा ध्यानात आल्यानंतर इतरांच्या उदारतेला कमी लेखणे आपल्या दृष्टीने लज्जास्पद आहे. आपण त्यांच्या संदर्भात प्रेम आणि करुणेच्या भावनेने प्रेरित होऊन बोधिचित्ताचा विकास करतो. यात आपण इतरांचे अधिकाधिक भले व्हावे या उद्देशाने आपल्या स्वत:ला ज्ञानोदयाची प्राप्ती व्हावी अशी मनोकामना करतो. 

Top