प्राथमिक स्तरीय प्रेरणा

Initial level motivation

वास्तव/खऱ्या धर्मासाठी प्रेरणेचे तीन स्तर

लाम-रिममध्ये प्रेरणेचे तीन स्तर सांगितेलेले आहेत :

  • सुरुवातीचा स्तर : आपल्याला वाटतं की फक्त पुढच्या जन्मीच नाही तर येणार्‍या सर्व जन्मांमध्ये उत्तम असा पुनर्जन्म मिळावा.
  • मध्यवर्ती स्तर : आपली प्रेरणा ही अनियंत्रिपणे पुन्हा पुन्हा होणार्‍या पुनर्जन्माच्या फेर्‍यातून पूर्णपणे मुक्त होण्याकरता आहे, आपल्याला मुक्त व्हायचे आहे. 
  • प्रगत स्तर : आपल्याप्रमाणेच इतर सर्वांचीही पुनर्जन्माच्या फेर्‍यातून मुक्तता करण्याकरता आपण पूर्णपणे ज्ञानप्राप्ती झालेल्या बुद्धांची अवस्था प्राप्त करण्याचे ध्येय ठेवतो. 

हे अगदी स्पष्ट आहे की वरील प्रत्येक स्तर हा पुनर्जन्माच्या गृहितकावर आधारित आहे. तथापि, आपण अगोदर चर्चा केल्याप्रमाणे या तीन स्तरांसाठी साहित्यात सांगितलेली प्रत्येक पद्धत ही धर्म-लाइट स्तरासाठीदेखील उपयोजित केली जाऊ शकते. या प्रेरणा आपण थट्टा करण्यासारख्या नाहीत, कारण जर मनापासून आपण त्यांचे आचरण करू शकलो तर या खरोखरच अतिशय महत्त्वपूर्ण पद्धती आहेत.   

आपल्या बहुमूल्य मानवी जीवनाचे महत्त्व समजून घेऊन अपराधी भावनेवर मात करणे 

प्रेरणेच्या प्राथमिक स्तराच्या मदतीने सर्वात प्रथम आपल्याला आपल्या ‘बहुमूल्य मानवी जीवनाचे’ महत्त्व समजून घेता आले पाहिजे. अगदी धर्मा-लाइटच्या स्तरावरदेखील ‘बिचारा मी’ या भावनेवर  आणि त्यातून येणार्‍या नैराश्य भावनेवर विजय मिळवण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. आपण कोणत्या कोणत्या भयावह परिस्थितींमध्ये असू शकलो असतो याचा आपण विचार करतो आणि आपण त्या त्या परिस्थितीमध्ये नाही आहोत हे किती छान आहे याचे महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

प्रमाणित सादरीकरणामध्ये या भयावह परिस्थितींची एक मोठी यादी दिलेली आहे, परंतु त्या पूर्ण यादीमध्ये अधिक जाण्याची आवश्यकता नाही कारण आपण सामान्य संज्ञा वापरून त्या समजू शकतो. उदाहरणार्थ, आपण विचार करू शकतो की आपण सुदैवी आहोत की आपण युद्धक्षेत्रात राहत नाही आहोत किंवा आपण कोणत्याही दुष्काळी भागात नाही आहोत, जिथे आपण भुकेने व्याकुळ होऊन मरू शकतो आणि मुलाबाळांना खाऊपिऊही घालू शकत नाही. आपण विचार करतो की आपण किती सुदैवी आहोत की आपण एखाद्या क्रूर हुकूमशहाच्या दहशतीखाली असणार्‍या कुठल्या प्रतिबंधित समाजात राहत नाही. इथे रोमानियामध्ये राहणारे ज्येष्ठ नागरिक हे अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात. आपण मानसिक, शारीरिक किंवा भावनिक दुर्बल नाही, हेदेखील आपलं भाग्यच. स्वाभाविकपणे, बौद्ध विचारसरणीतून आपण विचार करतो की आपण किती भाग्यवान आहोत की आपण एखादे झुरळ नाही, जे प्रत्येक जण सहज आपल्या पायांखाली चिरडून टाकू इच्छितो.   

या विचारांचा अनेक प्रकारे विस्तार केला जाऊ शकतो आणि जेव्हा आपण तटस्थपणे आपल्याकडे पाहतो तेव्हा आपल्याला जाणीव होते की, आपण खरोखरच असामान्य आहोत कारण आपल्याकडे या प्रकारची स्वातंत्र्ये आहेत. केवळ या गोष्टींपासून आपल्याला स्वातंत्र्य आहे असे नाही, तर आपल्याला हे समजणेही गरजेचे आहे की हे स्वातंत्र्य आपण कधीही गमावू शकतो. उदाहरणार्थ, अल्झायमर्स आजाराने आपण ग्रस्त होऊ शकतो. सध्या अतिशय भयानक आर्थिक संकट सुरू आहे आणि सद्य परिस्थिती आहे त्यापेक्षाही अजून बिघडत जाऊ शकते. आता आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेला ‘अल्पविराम’ असं म्हटलेलं आहे, ज्याचा अर्थ आहे की ही अवस्था वाईट परिस्थितीपासून फक्त काही काळ विश्रांती मात्र आहे. हा अल्पविराम कधीही संपू शकतो. 

या स्वातंत्र्यांव्यतिरिक्त आपल्याला त्या अनेकविध घटकांकडेही लक्ष पुरविणे आवश्यक आहे, जे घटक आपले जीवन समृद्ध बनवतात. उदाहरणार्थ, आपल्यापैकी अधिकतर लोक हे तुलनेने तंदुरुस्त आहेत, निरोगी आहेत. अर्थातच, आपल्यापैकी काही जणांना भविष्यात आजार होऊ शकतात, पण सध्या आपण सक्रिय आहोत. बुद्धांनी उपदेश केला आणि ही शिकवण मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे चालत आलेली आहे आणि आपल्यासाठी आताही उपलब्ध आहे. अनेक शिक्षक आणि पुस्तके उपलब्ध आहेत, ज्यांच्याकडून आपण शिकू शकतो. स्पष्ट आहे की आपल्याला शिकण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीमध्ये, आपल्याला उपलब्ध असलेल्या स्वातंत्र्यांचे आणि समृद्धींचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला अतिशय भाग्यवान मानले पाहिजे.

              

मृत्यू आणि नश्वरतेबद्दल विचार करणे, जेणेकरून उपलब्ध बहुमूल्य संधींचा अपव्यय होणार नाही 

सुरुवातीच्या स्तरामध्ये लक्षात घेण्यासारखा पुढचा मुद्दा म्हणजे आपल्याला जे बहुमूल्य आयुष्य लाभले आहे ते अनंत काळासाठी शाश्वत राहणार नाही. याचा अर्थ आपल्या आयुष्यात गोष्टी बदलत राहतात इतका मर्यादित नसून, याचा अर्थ आहे की आपण सर्वजण मर्त्य आहोत. म्हणूनच मृत्यूविषयक अनेक साधना आहेत. अनेक समाजांमध्ये अनेक लोक मृत्यूकडे दुर्लक्ष करतात, कारण तो नेहमी त्यांच्यासाठी वर्ज्य विषय असतो. आपण हे वास्तव स्वीकारत नाही की कधी ना कधी आपण मरणारच आहोत, आपला मृत्यू होणारच आहे. ज्यामध्ये आपली प्रिय मंडळी, आपल्याला परिचित प्रत्येक जण आणि आपणही येतो. हेच सत्य आहे. 

आपण निश्चितपणे मरण पावणार आहोत या गोष्टीला पाठिंबा देणारी अनेक कारणे उपलब्ध आहेत. ज्यांचा ज्यांचा यापूर्वी जन्म झाला आहे त्यांचा मृत्यूही झालेला आहे मग आपण त्यांच्यापेक्षा कसे विशेष किंवा वेगळे आहोत? मृत्यूचे मूळ कारण जन्म होणे हे आहे, त्यामुळे जर आपला जन्म झाला असेल, तर मृत्यूही अटळ आहे. शरीर नाशवंत आहे आणि जसे जसे आपले वय वाढत जाते तसे तसे ते अशक्त होत जाते. हे शरीर तेवढे सशक्त नाही, जेवढे आपण मानतो आणि त्यामुळे त्याला कधीही सहज जखम किंवा इजा होऊ शकते. आपल्याला तार्किकदृष्ट्या हे स्वत:ला पटवून दिले पाहिजे, जेणेकरून हळूहळू ते भावनिकदृष्ट्याही स्वीकारले जाऊ शकेल. 

आपल्या अटळ मृत्यूच्या वास्तविकतेव्यतिरिक्त अजून एक गोष्ट ही आहे की आपला मृत्यू कधी होणार आहे हे आपण कधीही जाणू शकत नाही. मृत्यूचे कारण फक्त वृद्धत्व किंवा आजारच असणे गरजेचे नसते, तर कित्येक तरुण आणि निरोगी व्यक्ती वृद्ध होण्याआधीच आणि आजारीही न पडता मरण पावतात. नुकतीच एक मोठी विमान दुर्घटना झाली, पण विमानात बसताना कुणालाही ते विमान दुर्घटनाग्रस्त होईल अशी अपेक्षा नव्हती. कधीही कोणतीही बस आपल्याला धडक देऊ शकते. माझा अतिशय जवळचा ५४ वर्षीय मित्र जो अतिशय निरोगी होता, त्याचा आताच दोन आठवड्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 

मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो हे सिद्ध करणारी अनेक कारणे आहेत. मृत्यू आपण जे करत आहोत ते पूर्ण होण्याची वाट बघत थांबणार नाही, मग ते जेवण असो की कोणतेही काम असो. आपण मृत्यूला म्हणू शकत नाही, “एकच मिनिट थांब, मला हे काम पूर्ण करू दे!” जेव्हा मृत्यू येतो, तो येतो आणि आपलं जीवन समाप्त होतं. जेव्हा आपली आयुर्मर्यादा संपते, तेव्हा ती वाढवण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही. तुम्ही मृत्यूला लाच देऊ शकत नाही. नाही म्हणायला आपण आपलं शरीर लाईफ सपोर्ट मशीनच्या सहाय्याने काही काळ टिकवून ठेवू शकतो, पण अशा अचल अवस्थेत जगण्याचा काय फायदा कारण कधी ना कधी ते जीवन संपणार तर आहेच. 

मृत्यूविषयक विचार करण्यासारखी तिसरी बाब म्हणजे आपण मरणाच्या दारात असताना आपल्याला कोणती वस्तू अधिक सहाय्यभूत होऊ शकते हे पडताळून पाहणे. आपण धन, मित्रमंडळी किंवा आपला परिवार आपल्यासोबत नेऊ शकत नाही. अगदी मृत्यूसमयी आपण एखादा पिरॅमिड बनवून त्या सर्वांना त्यात ठेवलं, तरीही ते आपल्या सोबत येऊ शकत नाहीत. बौद्ध विचारधारेनुसार मृत्यूसमयी आपल्या कामी येणार्‍या खर्‍या गोष्टी म्हणजे आपल्या सकारात्मक सवयी आहेत, ज्या आपण आपल्या मानसिक सातत्यामध्ये संचयित करून ठेवलेल्या असतात.   

कदाचित आपण भरपूर सकारात्मक कामे केली असतील किंवा इतरांना मदत केली असेल किंवा कदाचित आपला राग, स्वार्थ यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आध्यात्मिक मार्गामध्ये फार प्रगती केलेली असेल. आपल्या मानसिक सातत्यावर याचा सखोल परिणाम होईल. धर्म-लाईटच्या दृष्टीने आपण कोणत्याही पश्चात्तापाविना मृत्यूला सामोरे जाऊ शकतो आणि विशेषकरून जर आपण आपल्या प्रियजनांची खास काळजी घेतली असेल, समाजाप्रति ठोस योगदान दिलेलं असेल तर अनुभवू शकतो की आपण एक सकारात्मक, उपयुक्त आयुष्य जगलो. आपल्याला यामुळे मानसिक शांती लाभेल आणि मनात भावना असेल, “ मी एक चांगलं आयुष्य जगलो, उपयुक्त जीवन जगलो!” 

वास्तव किंवा खऱ्या धर्माच्या मते मग आपण या आत्मविश्वासाने मृत्यूला सामोरे जाऊ शकतो की आपल्या मानसिक सातत्यामधील सवयी, प्रवृत्ती आणि वृत्तींचा प्रभाव भविष्यातील जन्मांवरही सुरू राहील. आपण या भावनेसह मरू की, “ भविष्यातील जन्मामध्येही मला मनुष्याच्या रूपात बहुमूल्य पुनर्जन्म प्राप्त होईल. माझा जन्म अतिशय सकारात्मक वृत्ती असणार्‍या बालकाच्या रूपात होईल.” मुलांच्या बाबतीत आपण स्वत: या गोष्टी पाहू शकतो. काही मुलं ही रडकी आणि चिडखोर असतात तर काही मुलं मात्र शांत असतात आणि इतरांशी नम्रतेने वागतात. हा त्या बालकांद्वारे मागील जन्मामध्ये संचयित केलेल्या सकारात्मक सवयींच्या परिणामाचा भाग असतो. जेव्हा मृत्यूसमयी आपलं मन शांत असतं, तेव्हा ती अवस्था अतिशय महत्त्वपूर्ण असते. आपल्या बँक खात्यात जमा असलेली रक्कम आपल्याला समाधान देऊ शकणार नाही कारण मृत्यूसमयी ती फक्त संगणकाच्या पडद्यावर दिसणारी एक संख्या असेल. 

मृत्यूविषयक ध्यानधारणा  

वरील गोष्टींमुळेच आपण मृत्यूविषयक ध्यानधारणा करतो ज्यात आपण कल्पना करू शकतो की आज आपल्या जीवनाचा अखेरचा दिवस आहे. आपण स्वत:ला विचारतो की कोणत्याही क्षणी मरण्यासाठी आपण तयार आहोत का ? जर आज मला मृत्यू आला तर हे आयुष्य मी कशाप्रकारे व्यतीत केलं या गोष्टीचा मला पश्चात्ताप असेल का? हे सर्व विचारात घेण्याचा हेतू नैराश्य आणणे हा नसून आपल्याला आता मिळालेल्या बहुमूल्य मानवी जीवनाचा आणि सर्व संधींचा लाभ घेण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. या ध्यानधारणेचा हाच मुख्य उद्देश आहे. गोष्ट केवळ मी दिवसेंदिवस वृद्ध होत आहे एवढी नाही, तर मी दिवसेंदिवस सातत्याने मृत्यूच्या जवळ जात आहे ही आहे. जसा जसा एक एक दिवस संपतो तसा तसा आपल्या आयुष्यातील एक एक दिवस कमी होत जातो. वेळ संपत चालली आहे आणि आपल्याला कल्पना नाही की आपल्यापाशी किती वेळ बाकी आहे. म्हणूनच आपल्याला आपल्या आयुष्याचा उत्तम रीतीने विनियोग करायचा आहे आणि वेळ व्यर्थ घालवायची नाही. आपण आयुष्यात खूप काही करू शकलो असतो, पण करू शकलो नाही आणि आपण आयुष्य फुकट घालवले या भावनेसह मरणे हे अत्यंत क्लेशदायक आहे. 

“मी मला मिळालेल्या संधी वाया जाऊ देणार नाही,” या मानसिक स्थितीला आपल्याला संतुलित प्रकारे स्थापित करायचे आहे. आपण दुराग्रही तसेच भीतीच्या छायेत राहणारी व कार्य किंवा साधना थांबवण्यास फार घाबरणारी व्यक्ती होणे टाळले पाहिजे. आपल्याला विश्रांतीची गरज भासत असेल तर आपण विश्रांती घेतली पाहिजे, जेणेकरून त्यादरम्यान काम नंतर पुढे सुरू ठेवण्यासाठीची ऊर्जा आपण संचयित करू शकू. माझी आवडती झेन म्हण (कोआन) ही आहे की, “ मृत्यू केव्हाही येऊ शकतो, शांत रहा !”  जर तुम्ही यावर विचार केलात तर हे खूप अर्थपूर्ण आहे. मान्य आहे की आपल्याला कोणत्याही क्षणी मृत्यू येऊ शकतो, पण त्याने तणावग्रस्त राहणे आणि दुराग्रही होणे म्हणजे केवळ स्वत:लाच हानी पोहचवण्यासारखे आहे.   

मुख्य संदेश हा आहे की आपण आपल्याला लाभलेल्या बहुमूल्य मानवी जीवनाचा संतुलित मार्गाने फायदा घ्यावा. आपण खरोखर थकलेले असू आणि आपल्याला विश्रांती हवी असेल त्यावेळी विश्रांती जरूर घ्यावी, पण आपण थकलेलो नसू आणि आळस करत असू तर त्यावेळी आपल्याला प्रामाणिक राहणे गरजेचे आहे. आपण आपल्या प्रेरणेला ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

स्वाभाविकपणे, मृत्युविषयक ध्यानधारणा धर्म-लाईट आणि सत्य धर्म या दोन्हीसाठी उपयोजित केली जाऊ शकते. उदाहरणार्थ, तुमची काही कामं करायची राहिली असतील जसे की कुणावर तुमचं प्रेम असेल आणि ते व्यक्त करायचं राहून गेलं असेल, त्यांच्या योगदानाचं कौतुक करायचं असेल किंवा एखाद्याची माफी मागून मैत्री पुन्हा करायची असेल तर वेळ दवडू नका. होऊ शकतं की उद्या ती व्यक्ती आपल्यात नसेल किंवा आपणच नसू. मृत्युविषयक जागृतीपासून हा धर्म-लाईटचा धडा आपल्याला मिळू शकतो. तो अनेक पातळ्यांवर खूप फायदेशीर आणि सहाय्यकारी आहे; मृत्यूचं अस्तित्व अमान्य करू नका, तर त्यासाठी तयार राहा. आपण आपल्या मृत्यूची आणि अंत्यसंस्कारांचीही कल्पना करू शकतो, ज्यामुळे वास्तवाची अधिक जाणीव आपल्याला होऊ शकते. केवळ त्याचाच सतत विचार करून आपण दु:ख आणि नैराश्याने ग्रासले जाणार नाही ना याची फक्त खबरदारी घ्या !

मृत्यूपश्चात जीवनांतर्गत अतिशय वाईट रूपात पुनर्जन्म होऊ शकतो या अनुभूतीची तयारी करणे 

पुढे जाऊन आपण विचार करतो की आपल्या मृत्यूपश्चात काय होते. इथे, मृत्यूपश्चात जीवनात आपला पुनर्जन्म किती वाईट अवस्थांमध्ये होऊ शकतो याचे सादरीकरण दिले आहे आणि ते गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. हेदेखील इतकं सोपं असणार नाही कारण बौद्ध विचारसरणीनुसार पुनर्जन्म हा केवळ आपल्यापेक्षा कमी पातळीवर असणार्‍या पशूच्या स्वरूपातच होणार नाही, तर अशा स्वरूपात देखील होईल ज्यांना आपण बघूदेखील शकत नाही. 

जेव्हा आपण प्राण्याच्या रूपात पुनर्जन्माचा विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात घेतले पाहिजे की त्यामध्ये सर्व प्रकारचे कीडे, मासे आणि इतकेच नाही, तर उपलब्ध सर्व प्राणी प्रजाती आणि त्यांचे प्रकार येतात. प्राणी म्हणून पुनर्जन्म होणे किती दु:खदायक असू शकते हे त्यांचे त्रास आणि वेदना यासह दर्शवणारी अनेक उदाहरणे आहेत. जेव्हा आपण प्राणीरूप पुनर्जन्माचा विचार करतो, तेव्हा आपण आलिशान बंगल्यामधील लाडाकोडात वाढलेल्या व नेलपॉलिश वगैरे लावून सजवलेल्या पूडल जातीच्या कुत्र्याबद्दल बोलत नसतो. तर आपण झुरळे आणि उंदीर ज्यांची अनेक लोकांना घृणा असते अशांचा विचार करतो, तसेच छोटे किडे व मासे ज्यांना त्यांच्याहून मोठे प्राणी जिवंत खातात आणि अर्थातच औद्योगिक स्तरावर ज्यांचे पालन केले जाते व ज्यांची कत्तल करून मनुष्य त्यांना खातो अशा प्राण्यांचाही विचार आपण करतो.

भविष्यात उत्पन्न होऊ शकणार्‍या अशा शक्यतांबद्दल येणार्‍या भावनांना “भय” असे म्हटले जाते, पण मला वाटत नाही की हा ते सांगणारा उत्तम शब्द असेल, कारण यातून असहाय्यता ध्वनित होते, जणू की आपण ही स्थिती सुधारण्यासाठी काहीच करू शकत नाही.  तथापि, आपण ते टाळण्यासाठी काहीतरी नक्कीच करू शकतो, म्हणून मी ‘धास्ती’ शब्द उत्तम मानतो, ज्याचा अर्थ आपल्याला अतिशय तीव्रतेने वाटतं की असं घडू नये. 

उदाहरणादाखल समजा की आपल्याला अतिशय कंटाळवाण्या अशा व्यावसायिक बैठकीला उपस्थित राहायचं आहे. बैठकीत जाण्याबाबत आपल्याला धास्ती असते. बैठक खूप कंटाळवाणी आणि भयानक होणार आहे, पण आपल्याला तिथे उपस्थित राहण्याची भीती वाटत नाही. हीच भावना आहे जी आपण मनात रुजवली पाहिजे. आपल्याला हे बहुमूल्य असे मानवी जीवन मिळालेले आहे, जे कोणत्याही क्षणी नाश पावू शकते, म्हणून त्याचा आपल्याला लाभ उठवायचा आहे, जेणेकरून आपण असे काहीतरी करू शकू ज्यामुळे आपला पुढील जन्म झुरळ म्हणून होणार नाही. झुरळ म्हणून जन्माला येणे ही अतिशय दु:खदायक बाब असेल आणि आपल्याला तसं व्हावं असं मुळीच वाटणार नाही म्हणूनच ते टाळण्यासाठी आपल्याला काहीतरी करणे आवश्यक आहे. 

वास्तव धर्मामध्ये आपण केवळ प्राणीरूप आणि कीटकरूप पुनर्जन्माचा विचार करत नाही तर भूतप्रेत आणि नरकातील पुनर्जन्माबाबतही विचार करतो. या गोष्टींनाही सामाविष्ट करण्यात आपल्याला कमीपणा वाटता कामा नये, कारण या वर्णंनांना कप्प्यांमध्ये लपवून ठेवणे हे बौद्ध विचारसरणीवर अन्याय करणारे असेल. उलट, आपण उदार मनाने हे मान्य करावे की, “मला खरंचं त्या गोष्टीचं ज्ञान नाही.”

गैर-मानवी पुनर्जन्माच्या अवस्था कशा समजून घ्याल

या गोष्टीला आपण मानसिक सक्रियतेच्या किंवा दुसर्‍या शब्दात प्रत्येक क्षणी काही ना काही अनुभवण्याच्या प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून समजून घेऊ शकतो. प्रत्येक क्षणी आपण काहीतरी पाहतो, जाणून घेतो किंवा त्याबद्दल विचार करतो वगैरे अनेक गोष्टी करत असतो, ज्यामधून मानसिक होलोग्राम उदय पावतो. अनुभवाच्या प्रत्येक क्षणासोबत कोणतं तरी सुख किंवा दु:ख निगडीत असतं. कदाचित, हीच गोष्ट आपल्याला कोणत्याही संगणकापेक्षा वेगळी ठरवत असावी. संगणकामध्ये माहिती असते आणि तिचा वापर संगणक करतो आणि ती माहिती अर्थातच जाणून घेतो, पण संगणकाला आनंद किंवा दु:ख होत नाही किंवा ती माहिती तो अनुभवू शकत नाही. आपल्यामध्ये असणारे सुख आणि दु:ख हे भाव अनुभूतीला परिभाषित करतात आणि या  सुख-दु:खाची व्याप्ती  अतिशय विशाल आहे. या व्याप्तीचा किती भाग आपण अनुभवू शकतो हे आपल्या हार्डवेयरवर म्हणजेच आपले शरीर कोणत्या प्रकारचे आहे त्यावर अवलंबून असते.  

हे केवळ सुख-दु:खाच्या नाही, तर आपल्या प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या दृष्टिकोनातून समजून घेता येऊ शकते. काही व्यक्ती इतरांपेक्षा पुढचं पाहू शकतात, काही व्यक्ती इतरांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे ऐकू शकतात, तर काही व्यक्तींची गर्मी आणि थंडी सोसण्याची सहनशक्ती इतरांहून अधिक असते. प्राण्यांचा विचार करता कुत्रा माणसांपेक्षा अधिक वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकतो कारण त्याचं शरीर वेगळ्या प्रकारचं आहे आणि अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचं हार्डवेअरही. गरुड पक्षी त्याच्या तीक्ष्ण डोळ्यांमुळे माणसांच्या डोळ्यांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे दूरवरचं पाहू शकतो. विविध इंद्रियांबाबत जर असं असू शकतं, तर मग सुख आणि दु:खाच्या व्याप्तीबद्दलही का खरं असू शकणार नाही ?

जरी भावनांशी त्यांचं फार साम्य नसलं तरी आपण या चर्चेत आराम आणि वेदना या गोष्टींनाही समाविष्ट करू शकतो. सुख आणि दु:ख या भावना मानसिकरित्या अनुभवल्या जातात, तर आराम आणि वेदना या भावना, इंग्रजी शब्दार्थानुसार तरी बव्हंशी शारीरिकरीत्या अनुभवल्या जातात. आपल्या मानवी हार्डवेअरचा विचार करता जेव्हा शारीरिक दु:खे तीव्र असतात, तेव्हा आपण बेशुद्ध पडतो. भावनिक वेदनेमुळे आपल्याला धक्का बसतो आणि आपले शरीर काम करणे बंद करू शकते. 

त्याचवेळी, आराम हा मजेदार असतो. जर तुम्ही खाजेचे विश्लेषण केले, तर ते खरोखर अत्याधिक आनंददायी असते. ती भावना वेदनादायक मुळीच नसून अतिशय आनंददायकच असते म्हणूनच हेतूपुरस्सरपणे आपण ती खाजवून खाजवून मिटवून टाकतो. अत्याधिक जुन्या त्वचेच्या आजारांना संपवण्याची ही एक पद्धत आहे, ज्यामध्ये खाजेकडे एक आनंददायी अनुभूती म्हणून पाहिले जाते. ही एक प्रगत आणि अतिशय कठीण अवस्था आहे, ज्यामध्ये खाजवून खाजवून त्या खाजेचा आनंद घ्यायचा असतो कारण त्यामुळे शरीराला इजाही होऊ शकते. तरीही, असे करणे शक्य आहे. अगदी आपण संभोगाच्या दृष्टीने पाहिल्यास जितका तीव्र तितक्या जलद आपल्याला त्या सर्वोच्च बिंदूपाशी, परमोच्च सुखापाशी पोहचायचे असते आणि अशा प्रकारे ते संपवायचे असते. 

अशा प्रकारे आपण समजू शकतो की मानवी हार्डवेअर हे सुख-दु:ख, आराम-वेदना यांच्या व्याप्तीच्या काही भागालाच अनुभवू शकते. आपण हेदेखील सिद्ध केले आहे की दृष्टी आणि ध्वनी सारख्या वेगवेगळ्या ऐंद्रिय पातळीवर पशू आपल्यापेक्षा अधिक अनुभूती मिळवू शकतात. त्यामुळे तार्किकदृष्ट्या हे शक्य आहे की काही अन्य प्रकारचीही अशी हार्डवेअर्स असू शकतात जी सुख-दु:ख, आराम-वेदना यांच्या व्याप्तीची आपल्याहुन अधिक उत्तम प्रकारे अनुभूती घेऊ शकत असतील. का असू शकत नाहीत ? 

एका जन्माकडून दुसर्‍या जन्माकडे जाणार्‍या सातत्याच्या या मानसिक सक्रियतेबद्दल आपण बोलतो. असं काही कारणच नाही ज्यामुळे हे सातत्य अत्यंत तीव्र दु:ख आणि व्याधी यापासून ते अत्यंत गहन आनंद आणि सुख अनुभवू शकणार नाही. गोष्ट फक्त इतकीच आहे की प्रत्येक जन्मात आपण कोणत्या प्रकारचं हार्डवेअर किंवा शरीर धारण करतो. बौद्ध धर्मामध्ये सांगितलेल्या त्या सर्व जिवांच्याबद्दल, ज्यांना आपण पाहूदेखील शकत नाही, विचार करण्यासाठी आणि कमीत कमी त्यांच्याप्रति उदार दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने हा एक तर्कदृष्ट्या महत्त्वपूर्ण मार्ग आहे. आपण अमिबा पाहू शकत नाही, पण विज्ञानाने सूक्ष्मदर्शकाच्या लावलेल्या शोधामुळे आपण त्यांना पाहू शकतो आणि जीव म्हणून स्वीकारूही शकतो. त्याचप्रमाणे आपण भुतांनाही पाहू शकत नाही, पण कदाचित मनाचा विकास करून तसं पाहणंदेखील शक्य होऊ शकेल.     

धर्म-लाइट इतर सर्व प्रकारांना मानवी अनुभवांमध्ये समाविष्ट करून पाहतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती मानसिकरित्या इतकी अशांत असेल की तिला वाटेल की ती नरकयातना भोगत आहे. यामुळेदेखील आपल्याला त्याच्याविषयी दयाभाव वाटू शकतो आणि ही आशा करू शकतो की भविष्यात आपण तसे बनायला नको. धर्म-लाईट स्तरावर एका कार्याच्या रूपात तर हे ठीक आहे. तथापि, वास्तव-धर्मा फक्त मानवाच्या अनुभवांविषयीच बोलत नाही, तर तो आपल्या मानसिक सातत्यावर आधारित त्या अनुभवांबद्दल बोलतो जे आपल्याला किंवा अन्य कुणालाही येऊ शकतात. या मानसिक सक्रियतेमध्ये सुखी असण्यापासून ते दु:खी होण्यापर्यंत आणि आराम मिळण्यापासून ते वेदना मिळण्यापर्यंतच्या व्याप्तीतील कोणतीही अवस्था सामील होऊ शकते. आपल्याला असा कोणताही पाया नको आहे, जो मर्यादित असेल आणि भविष्यामधील केवळ त्रासदायक अनुभवांनाच प्रोत्साहन देणारा असेल. हे स्पष्ट आहे. 

या अवस्थेपासून बचावाचा काही मार्ग आहे का? हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम तर आपल्याला आपल्या जन्माला अशी एक सकारात्मक दिशा देणे गरजेचे आहे, जी आपल्याला वाईट, दु:खद पुनर्जन्मापासून वाचवेल. वास्तविकपणे, ते केवळ एवढंच करणार नाही, तर ते आपल्याला मुक्ती आणि ज्ञानप्राप्तीकडे नेईल. 

आपल्या जीवनाला सुरक्षित दिशा देणे: आश्रय घेणे/ शरणागत होणे  

‘आश्रय’ या शब्दाबद्दल मी फार आग्रही नाही कारण हा शब्द थोडा संभ्रमित करणारा आहे ज्यातून निष्क्रिय असण्याचा भाव व्यक्त होतो, जणू आपण बुद्धांकडे एक उद्धारक म्हणून पाहत आहोत आणि म्हणत आहोत, “बुद्धा, मला वाचव!” आपण पशू आहोत आणि आपल्याला अभयारण्यात आणलं जात आहे, ते असंही नाही. आपण सक्रिय अवस्थेबद्दल बोलत आहोत जी मुळीच निष्क्रिय नाही. मी याला आपल्या जीवनाला “सुरक्षित दिशेकडे” नेणे असं म्हणतो; जर आपण या दिशेने मार्गक्रमण करत राहिलो, तर आपण आपल्याला अनियंत्रितपणे पुन्हा पुन्हा होत राहणार्‍या निकृष्ट पुनर्जन्माच्या फेर्‍यातून वाचवू शकतो, त्याचबरोबर अधिकाधिक प्रभावीपणे इतरांची मदत न करण्याच्या असमर्थतेपासूनही आपल्याला वाचवू शकतो. 

बुद्धांची शिकवण सांगण्यासाठी ज्या “धर्म” नावाच्या शब्दाचा प्रयोग केला जातो तो खरे तर एक निवारक उपाय आहे. भविष्यातील अडचणी आणि समस्यांपासून वाचण्यासाठी आपण तो आत्मसात करतो. आपण निकृष्ट पुनर्जन्मापासून, सततच्या पुनर्जन्माच्या फेर्‍यातून आणि इतरांची मदत न करण्याच्या असमर्थतेपासून वाचण्यासाठी हा उपाय आपल्या आयुष्यात लागू करतो.  

बुद्धांनी निर्देशित केलेली ती दिशा कोणती? दिशा अर्थात तीच आहे जी बुद्धांनी स्वत: अवलंबली होती, ज्यात सर्व समस्या, अडचणी, उणिवा आणि अस्वस्थ करणार्‍या भावनांचा अंत होतो. त्याचवेळी मनाच्या सर्व सकारात्मक शक्तींचाही बुद्धांना बोध झाला. आपण त्याच दिशेविषयी बोलत आहोत. आपल्याला हेच म्हणायचं असतं जेव्हा आपण बुद्धांच्या बुद्ध, धर्म आणि संघ या सुरक्षित आणि बहुमूल्य रत्नांबद्दल बोलतो. धर्म म्हणजे बुद्धांनी ही दिशा कशी प्राप्त केली आणि आपण सारेदेखील ती दिशा कशी प्राप्त करू शकतो याविषयीची शिकवण आहे. बुद्ध म्हणजे ज्याने ही सिद्धी पूर्णत: प्राप्त केली आहे अशी व्यक्ती. संघ म्हणजे केवळ मठात राहणारे किंवा बौद्ध केंद्रांमध्ये राहणारे इतकेच नाही, तर पूर्ण मठीय समुदाय आहे. खरं तर हीदेखील आपली सुरक्षित दिशा नाही. तीन रत्नांपैकी एक म्हणून संघ त्या उच्च सिदधीप्राप्त जिवांकडे निर्देश करतो, ज्यांनी त्या उच्च सिद्धीचा काही भाग जाणला आहे, जी सिद्धी बुद्धांनी पूर्णपणे प्राप्त केलेली आहे. 

त्याप्रमाणे, सर्वप्रथम आपल्याला हे केले पाहिजे. आपल्याला आपल्या जीवनाला एक सुरक्षित दिशा देणे गरजेचे आहे; ज्या दिशेनेच आपण प्रयत्नशील आहोत. आपण ते प्राप्त करू इच्छितो जे बुद्धांनी प्राप्त केले आहे आणि ज्या पद्धतीने बुद्धांनी प्राप्त केले आहे आणि जे संघाने काही अंशी साध्य केले आहे. आपल्या जीवनाला ही दिशा देण्याने आपल्या जीवनात प्रत्येक स्तरावर एक मोठं परिवर्तन घडून येतं, कारण आपल्या आयुष्याला आता एक अर्थ आणि एक दिशा आहे. आपण आपल्यातील उणिवा दूर करण्यासाठी आणि आपल्यातील सामर्थ्य जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जर आपण असं केलं तर भावनिक पातळीवर आपण अधिक आनंदी होऊ कारण मग आपण असा कधीही विचार करणार नाही की, “मला नाही माहिती की जीवन म्हणजे काय आहे. मला नाही माहिती की मी इथे काय करत आहे; माझं जीवन व्यर्थ आहे.”  ही मानसिक अवस्था फार वाईट असते आणि जेव्हा लोक या मानसिक अवस्थेत असतात, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्यांचं जीवन हे केवळ पैशाच्या अवतीभोवती फिरत असतं. जरी हे अनेकदा वापरलेलं वाक्य असलं तरी सत्य हेच आहे की, “आपण पैशाने सुख विकत घेऊ शकत नाही!” 

विध्वंसक वर्तनापासून दूर राहणे 

आता आपण आपले जीवन सुरक्षित दिशेच्या मार्गावर आणले आहे. या आधारे आपल्याकडे निकृष्ट पुनर्जन्मापासून वाचण्याचा काय उपाय आहे? तर याचा उपाय हा आहे की आपण मानसिक, शाब्दिक किंवा शारीरिक मार्गाने विध्वंसक कृती करण्याचे विचार काढून टाकायला हवेत. याचा अर्थ असा आहे की आपण राग, लोभ, आसक्ती, अज्ञान, ईर्ष्या, अहंकार आणि अशाच अनेक अस्वस्थ करणार्‍या भावनांच्या आहारी जाऊन वरील तीनपैकी एक तरी कृती करण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतो. आपल्या बहुमूल्य मानवी जीवनाचा लाभ उठवण्याचा उत्तम मार्ग अगदी आता, सुरुवातीच्या स्तरावर, हा आहे की आपण विध्वंसक वृत्तीने वागणे, बोलणे किंवा विचार करणे टाळले पाहिजे. 

तथापि, हे आपल्याला बौद्ध विचारसरणीच्या कक्षेत राहूनच केले पाहिजे. सामान्यत: सर्वच धर्म विध्वंसंक कृत्ये जसे की चोरी किंवा हत्या करू नका अशी शिकवण देतात, परंतु बौद्ध धर्माला वेगळी बनवणारी गोष्ट ही आहे की इथे हा कायदा नाही. इथे कुणा दैवी शक्तीने किंवा विधानपरिषदेने किंवा सरकारने कायदा बनवलेला नाही. “कायदा पाळा, नाहीतर तुम्हाला शासन केले जाईल” असे म्हणणार्‍या कोणत्याही कायद्याच्या पालनावर बौद्ध नीतीमत्ता अवलंबून नाही. नागरी कायद्याबद्दल बोलायचं झाल्यास आपण शिक्षेपासून सुटका करून घेण्यासाठी लाच देऊ शकतो किंवा चांगला वकील नेमून आपली बाजू मांडू शकतो. शिवाय, आपण कायद्याचे पालन करतो म्हणून आपण सद्गुणाचे पुतळे आहोत आणि इतर कुणी पालन करत नाही म्हणून तो वाईट आहे असं मुळीच नाही. असा आज्ञाधारकपणा हा बौद्ध नीतिशास्त्राचा आधार नाही.  

विधायक वर्तन करणे

बौद्ध विचारसरणीनुसार विधायक वर्तन म्हणजे काय हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. विध्वंसक वर्तनाच्या संदर्भाने आपण हे उत्तम पद्धतीने जाणून घेऊ शकतो. उदाहरणार्थ, हत्या करण्याचा किंवा जीव घेण्याचा एक मार्ग म्हणजे शिकार, पण आपण कधीही शिकार केली नसेल किंवा शिकार करण्याची आपल्याला मुळीच इच्छा वा आवड नसेल तर ‘शिकार न करणे’ ही अतिशय चांगली बाब असली तरी ते विधायक वर्तन असा अर्थ होत नाही. विधायक वर्तन म्हणजे डास पाहिल्यावर झटक्यात त्याला मारून टाकण्याची इच्छा होऊनही तसे न करणे हे आहे. आपल्याला समजतं की जर ती कृती आपण केली तर ती रागाच्या भरात आणि केवळ आपल्या, आपल्या आणि आपल्याचविषयी विचार करत केलेली क्रिया असेल. याशिवाय आपल्याला उमजतं की डासाला मारल्यामुळे ती एक वाईट सवय बनून जाईल, इतकी की जेव्हा कधी आपल्याला एखादी गोष्ट रूचणार नाही, तेव्हा आपण ती गोष्ट संपवून, मारूनच तिच्यावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीनेच प्रयत्न करू. म्हणूनच डासावर  प्रहार करून ठार मारण्यापेक्षा त्याला एखाद्या कपात पकडून बाहेर नेऊन सोडण्यासारख्या शांततामय मार्गाचा आपण विचार करू. विधायक वर्तन ते आहे जेव्हा एखाद्या जिवाला ठार मारण्याची कितीही प्रबळ इच्छा झाली तरी तसं करण्यापासून स्वत:ला रोखणे. आपण परावृत्त होतो कारण आपल्याला त्याचे कारण आणि परिणाम माहिती असतात. अशा प्रकारचं विधायक वर्तन आपल्या मनात प्रचंड सकारात्मक संभाव्यता निर्माण करतं. 

विधायक वर्तनाची याहून उच्च पातळीही असते, जिथे आपण डासाला मारण्यापासून केवळ स्वत:ला परावृत्तच करत नाही तर खाणंही देतो. आपण त्याला आपलं थोडंसं रक्तही चाखायला देतो. तसं तर आपल्या शरीरात फार रक्त असतं. असं करू शकणार्‍या काही लोकांना मी भेटलेलो आहे. केवळ शिकार न करणे हे तितकं विधायक वर्तन नाही जेवढं आपण समजतो. 

वर्तनविषयक परिणाम आणि कारण समजून घेणे हाच बौद्ध नीतिशास्त्राचा पाया आहे 

अशा प्रकारे, विशिष्ट वर्तन केल्याने विशिष्ट परिणाम होतात हे समजणे आणि काय करणे चूक आहे व काय करणे बरोबर आहे यातील भेद समजून घेणे हा बौद्ध धर्माचा पाया आहे. उदाहरणार्थ, आपण विध्वंसक मार्गाने वागलो तर त्याचा परिणाम नैराश्य येण्यात आणि आपलं मन अस्थिर होण्यात होईल. आपण असे वागतो कारण आपल्या मनात मूलभूत गोंधळ असतो. प्रथमत: आपल्याला माहिती नसावं की विध्वंसक मार्ग अवलंबणे म्हणजे आत्मघात आहे जसे की दारू किंवा अंमली पदार्थांचे व्यसन सुरू करणे. याव्यतिरिक्त, आपल्याला उलट पद्धतीने असं वाटत असावं की जर आपण नशेत बुडालो तर आपण आपल्या समस्या टाळू शकू. 

म्हणून, नीतिशास्त्र आधाराच्या आकलनाने आपल्याला हे समजतं की आपण जेव्हा विध्वंसक कृती करतो तेव्हा आपण वाईट नसतो, तर आपण संभ्रमित असतो म्हणून तसे करतो. जेव्हा इतर अशी विध्वंसक कृती करतात तेव्हा ते वाईट आणि शिक्षा करण्यास पात्र नसतात, तर ते संभ्रमित आणि अस्वस्थ असतात. ते आपल्या सहानुभूतीस पात्र असतात, ज्याद्वारे आपण त्यांना भ्रमित अवस्थेमधून बाहेर येण्यास मदत करतो. हो, जर पुढे जाऊन त्यांच्याकडून अनेक लोकांना इजा होण्याची शक्यता असेल तर मात्र आपल्याला त्यांना कुलूपबंद करण्याची आवश्यकता भासू शकते, पण हे करण्यामागे वेगळा विचार असणे आवश्यक आहे. आपल्याला त्यांना इजा करायची किंवा शिक्षा करायची गरज नाही, तर त्यांना मदत करायची गरज आहे. त्यांचं एक मानसिक सातत्य आहे, जे नेहमी सुरू राहील आणि जर आताच आपण त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला नाही, तर भविष्यात ते अधिक विध्वंसक वर्तन करतील. 

तथापि, या सुरुवातीच्या स्तरामध्ये आपलं अधिक लक्ष स्वत:वर केंद्रित असेल आणि आपली धर्म-लाइटनुसार या जन्मभरात किंवा वास्तव धर्मानुसार भविष्यात येणार्‍या अनेक जन्मकाळात येणार्‍या किंवा येऊ घातलेल्या भयावह परिस्थितीपासून वाचण्याची अपेक्षा असेल. या स्तरावर अशा प्रकारे एक सुरक्षित दिशा शोधून आपण आपल्या बहुमूल्य मानवी जीवनाचा उपयोग करतो. आपण आपल्या जीवनाला महत्त्व देऊ लागतो, कारण आपल्याला कळतं की ते संपणार आहे आणि आपण हे निश्चित करू इच्छितो की भविष्यातही आपल्याला बहुमूल्य मानवी जीवनाचा लाभ होत राहिला पाहिजे. आपल्याला हे मानवजन्म हवे आहेत कारण मोक्ष आणि ज्ञानप्राप्ती या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागणार आहे. ज्याप्रमाणे धर्म-लाईट ही वास्तव धर्माकडे जाण्यासाठी असणारी एक पायरी आहे त्याचप्रमाणे सुरुवातीचा स्तर ही मध्यवर्ती आणि प्रगत स्तराकडे नेणारी एक पायरी आहे.

सारांश      

आपल्याला लाभलेल्या अतिशय बहुमूल्य अशा मानवी जीवनाचे महत्त्व समजण्यापासून आरंभिक प्रेरणा सुरू होते. आपल्याकडे शरीर आहे, आपल्याकडे संधी आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे आपली मानवी बुद्धिमत्ता आहे, याचा अर्थ असा आहे की जर आपण फक्त मन लावून कोणतेही कार्य करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अशक्य असे जवळजवळ काहीच नाही.

आपण असलेली ही अद्भुत अवस्था अनंत काळासाठी टिकून राहणार नाही कारण काहीच तसे राहत नाही. आपण किती श्रीमंत आहोत, आपण किती प्रसिद्ध आहोत किंवा आपल्याला किती मित्र आहेत किंवा आपलं शरीर किती तंदुरुस्त आहे या गोष्टीने काहीही फरक पडत नाही, आपण एके दिवशी नक्की मरणारच आहोत. हे कुणीही रोखू शकत नाही हे जितकं खरं आहे तितकंच खरं हे आहे की आपली वेळ कधी संपणार आहे हेदेखील कुणीही जाणू शकत नाही. असं म्हटलेलंच आहे की जर आपल्याला मृत्यूची खर्‍या अर्थाने ओळख झालेली असेल, तर आपण कमी दर्जाचं जीवन जगणं अशक्य आहे. 

जेव्हा आपल्याला कळतं की हे आयुष्य नश्वर आहे आणि कधीही नाश पावू शकतं, आपण मृत्यूच्या पलीकडचं पाहू लागतो. मृत्युपश्चात जीवनाच्या असंख्य शक्यता असून त्यापैकी काही या भयावह पुनर्जन्माच्याही असू शकत असल्याने आपण आपलं आयुष्य सुरक्षित दिशेने न्यायला सुरुवात करतो. 

ही सुरक्षित दिशा आपल्याला ज्यामुळे भविष्यात दु:खद अवस्था येऊ शकते अशा विनाशकारी वर्तनापासून दूर राहण्याची प्रेरणा देते आणि विधायक वर्तनासाठी प्रवृत्त करते, ज्यामुळे भविष्यात आनंदी क्षण येण्याची शक्यता असते. अशा प्रकारे आपण आपल्या उत्तम स्थितीमधील पुनर्जन्मांची खात्रीने व्यवस्था करतो. 

Top