लाम-रिम काय आहे आणि बुद्धांच्या शिकवणीतून त्याची उत्पत्ती कशी झाली?
श्रेणीबद्ध मार्ग अथवा लाम-रिम हा बुद्धांची मूलभूत शिकवण समजून घेण्यासाठी तसेच त्यांना आपल्या जीवनात समाविष्ट करून घेण्यासाठीचा एक मार्ग आहे. २५०० वर्षांपुर्वी बुद्ध सुरुवातीला भिक्षुंसोबत व नंतर भिक्षुणींच्या समुदायासोबत राहिले. त्यांनी केवळ त्यांच्या साधकांच्या समुदायालाच उपदेश दिला असे नाही, तर अनेक सर्वसामान्य लोक त्यांना आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रित करत असत व नंतर बुद्ध त्या लोकांनाही उपदेश देत असत.
बुद्ध उपदेश देताना नेहमी ‘उपाय कौशल्य’ पद्धतीचा वापर करत. ज्यात ते समोरच्या व्यक्तीला समजेल अशा पध्दतीने, त्याच्या आकलन क्षमतांचा विचार करून उपदेश देत. असे करणे आवश्यक होते कारण त्या काळी लोकांच्या बौद्धिक आणि आध्यात्मिक विकासाची पातळी वेगवेगळी होती आणि आजही आहे. यामुळे बुद्धांची शिकवण विविध प्रकारच्या विषयांवर व वेगवेगळ्या स्तरांवर चर्चिली गेली.
बुद्धांच्या अनेक अनुयायांची स्मरणशक्ती विलक्षण होती. त्या काळी काहीही लिहून ठेवले जात नसे, भिक्षु शिकवण कंठस्थ करत असत आणि मौखिक परंपरेतून ही शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहचवत. कालांतराने ही शिकवण लिखित स्वरूपात जतन करण्यास सुरुवात झाली, यालाच ‘सूत्र’ असे संबोधले जाते. यानंतर अनेक शतकांनी अनेक भारतीय आचार्यांनी ही शिकवण एकत्रित करण्याचा प्रयत्न करून त्यावर समीक्षात्मक लेखन केले. अकराव्या शतकात अतिश नामक एक भारतीय आचार्य तिबेटमध्ये गेले व तिथे त्यांनी ‘लाम-रिम’ चे प्रारूप तयार केले.
अतिश यांनी एक असे प्रारूप तयार केले की ज्यामुळे कोणीही स्वतःला बुद्धत्वाच्या दिशेने विकसित करण्यासाठी प्रयत्न करू शकेल. आपल्याला केवळ सूत्रांचे वाचन केल्याने ज्ञानप्राप्ती कशी करावी अथवा आध्यात्मिक मार्गावर सुरुवात कशी करावी या गोष्टी कळत नाहीत. सर्व सामग्री उपलब्ध आहे, परंतु ती सर्व एकत्रित करणे अवघड आहे.
या सर्व सामग्रीला एकत्रित क्रमबद्ध करण्याचे काम लाम-रिम करते. अतिश यांच्या नंतर तिबेटमध्ये विविध प्रकारची, विस्तारित स्वरूपाची प्रारूपे लिहिण्यात आली. येथे आपण पंधराव्या शतकात त्सोंगखापा यांनी लिहिलेल्या आवृत्तीचा विचार करणार आहोत. कारण इतर कोणाहीपेक्षा त्सोंगखापा यांनी या सामग्रीविषयी अधिक विस्तृत विवेचन सादर केले आहे. त्सोंगखापा यांच्या कामातील विशेष गोष्ट म्हणजे यामध्ये सूत्र आणि भारतीय भाष्य यांची अवतरणे (उतारे)आहेत, ज्यामुळे त्यांनी या लिखाणात आपल्या मनाचे काही लिहिलेले नाही याविषयी खात्री पटते.
यातील आणखी एक महत्वाची बाब म्हणजे त्सोंगखापा यांनी सर्व मुद्द्यांवर विस्तृत तसेच तर्कशुद्ध मांडणी केली आहे, ज्याद्वारे आपल्याला या शिकवणी तर्क आणि विवेकाच्या कसोटीवर प्रमाणित करताना अधिक विश्वास येतो.
त्सोंगखापा यांच्या आधीच्या लेखकांनी बुद्धांच्या शिकवणीतील अवघड मुद्द्यांवर भाष्य करणे टाळले, परंतु त्सोंगखापा यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी याच मुद्द्यांवर भर दिला.
तिबेटच्या चार बौद्ध परपरांपैकी गेलुग्पा परंपरेची सुरुवात त्सोंगखापा यांच्यापासून झाली.
आध्यात्मिक मार्गाचा अर्थ काय व हा कसा तयार करावा?
मुळात प्रश्न असा आहे की आध्यात्मिक मार्गाची निर्मिती कशा पद्धतीने करावी. यासाठी भारतात विविध पद्धती शिकवल्या जातात. उदाहरणार्थ, बौद्ध काळात इतर भारतीय परंपरांमध्ये एकाग्रता विकसित करण्यासाठीच्या पद्धती समान पद्धतीने शिकवल्या जात असत. ही गोष्ट त्याने स्वतः शोधलेली अथवा मनाने तयार केलेली नव्हती. प्रत्येकाने हे मान्य केले होते की आत्मविकासाच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या आध्यात्मिक मार्गावर एकाग्रता आणि त्याच्याशी संबंधित इतर घटक कसे समाविष्ट करू शकतो, यावर विचार करणे आवश्यक आहे.
आत्मविकासाच्या दृष्टिकोनातून विविध गोष्टी समजून घेण्याबाबतचा बुद्धांचा विचार वेगळा होता, परंतु आध्यात्मिक ध्येय समजून घेण्याविषयीचा त्यांचा दृष्टिकोन हा विशिष्ट असा होता. या आध्यात्मिक ध्येयांचा मुख्य सिद्धांत, ज्याला विविध श्रेणींमध्ये विभागले जाते, तीच आपली प्रेरणा आहे.
या साहित्याला लाम-रिम संबोधले जाते. यातील लाम चा अर्थ मार्ग असा होतो तर रिम म्हणजे या मार्गाचे श्रेणीबद्ध पद्धतीने केलेले टप्पे होय. हा मार्ग म्हणजे ध्येयप्राप्तीसाठी आपल्या मनाचे विविध टप्पे श्रेणीबद्ध पद्धतीने विकसित करणे होय. हे एखाद्या स्थळी पोहचण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रवासासारखे आहे. आपल्याला रोमानियातून भारतात रस्त्यामार्गे चालत जायचे असेल, तर भारत हे आपले अंतिम ध्येय असते. परंतु भारतात पोहचण्यापूर्वी आपल्याला तुर्कस्तान, इराण या देशांमधून प्रवास करावा लागेल.
आध्यात्मिक प्रेरणा : आपण आपले जीवन सार्थकी कसे लावावे
लाम-रिम मध्ये आपल्या प्रेरणेला श्रेणीबद्ध पद्धतीने विकसित केले जाते. बौद्ध सादरीकरणानुसार हे दोन भागात विभागले गेले आहे. प्रेरणा ही आपली ध्येयं, लक्ष्य यांच्याशी संबंधित भावना असते, तसेच ही एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी निर्माण होणारी भावना असते. अधिक स्पष्टपणे सांगायचे झाले, तर आपल्याला त्या ध्येयापर्यंत का पोहचायचे आहे याचे विशिष्ट कारण असते, तसेच त्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला प्रेरणा देणारी विशिष्ट मनोवस्था असते.
आपल्या दैनंदिन जीवनाच्या निरीक्षणातून ही गोष्ट सहज स्पष्ट होऊ शकते; आपल्या आयुष्याच्या विविध टप्प्यात आपली ध्येयं वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ, आपल्याला चांगले शिक्षण हवे असते, आपल्याला आयुष्याचा जोडीदार हवा असतो अथवा चांगली नोकरी मिळवायची असते इत्यादी. या ध्येयांसोबत सकारात्मक अथवा नकारात्मक भावना जोडल्या गेल्या असू शकतात आणि ही स्थिती वेगवेगळ्या माणसांसाठी वेगवेगळी असू शकते. कोणत्याही परिस्थितीत प्रेरणेचे श्रेणीबद्ध पध्दतीने केलेले सादरीकरण आपल्या सर्वसामान्य आयुष्यात लागू पडते.
हीच गोष्ट आपल्या आध्यात्मिक प्रेरणेबाबतही खरी ठरते. या अशा मनोवस्था आहेत, ज्या पूर्णतः आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत. आपण आपल्या जीवनाला कशा प्रकारे हाताळत आहोत? एक ‘सांसारिक स्तर’ असतो, त्या सांसारिक स्तरावर आपला परिवार, नोकरी या गोष्टी असतात. पण आध्यात्मिक पातळीवर आपण काय करत आहोत? याचा परीणाम आपण आपले आयुष्य कशा पद्धतीने जगतो यावरही होतो. आपल्या जीवनातील हे दोन पैलू एकमेकांपासून वेगळे अथवा प्रतिकूल असता कामा नयेत उलट या दोन्ही घटकात तारतम्य असायला हवे.
या दोन पैलुंमध्ये तारतम्यासोबतच ते एकमेकांसाठी पूरक असायला हवेत. आपल्या आध्यात्मिक आयुष्याने आपल्याला सांसारिक आयुष्य जगण्यासाठीचे बळ दिले पाहिजे, तसेच सांसारिक आयुष्याने अशी संसाधने पुरवली पाहिजेत की ज्यामुळे आपण आध्यात्मिक आयुष्याचा अभ्यास करू शकू. लाम-रिमच्या या श्रेणीबद्ध टप्प्यांतून आपण जे काही शिकलो आहे ते सर्व आपल्या आयुष्यात लागू करणे आवश्यक आहे.
चांगली व्यक्ती बनण्याच्या मार्गावर
तर मग इथे सांगितल्या गेलेल्या बौद्ध साधनेचा आपण काय उपयोग करू? साधारणतः बौद्ध साधनेचे सार अगदी मोजक्या शब्दात सांगता येते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपण एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी स्वतःमध्ये सुधारणा करत असतो. येथे कदाचित ‘चांगली व्यक्ती’ ही संकल्पना न्यायचिकित्सक स्वरूपाची वाटेल, पण ते तसे नाही आहे. याचा आशय तो नाही. आपण येथे राग, लोभ, मोह, स्वार्थीपणा यांसारख्या वाईट प्रवृत्तींवर तसेच नकारात्मक भावनांवर नियंत्रण प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो.
अशा रीतीने लक्ष्य प्राप्तीचे ध्येय बाळगण्यास सांगणारा बौद्ध धर्म किंवा तत्त्वज्ञान हे एकमात्र नाही, तर इस्लाम, इसाई, यहुदी, हिंदू आदी धर्मात तसेच मानवतावादातही असा अभ्यास केला जातो. हे सर्वत्र केले जाते. बौद्ध पद्धती या इतरत्र वापरल्या जाणाऱ्या पद्धतींप्रमाणेच आपल्याला श्रेणीबद्ध मार्गानुसार चांगली व्यक्ती बनण्याच्या ध्येयात मदत करतात.
चांगली व्यक्ती बनण्यासाठी आपण सर्वप्रथम दुसऱ्याला त्रास होईल अशा विनाशकारी मार्गांनी वागणे बंद करायला हवे. यासाठी आपण आत्मनियंत्रणाचा वापर करायला हवा. जेव्हा आपण सखोल पातळीवर हे नियंत्रण मिळवू, तेव्हा आपल्यामध्ये राग, लोभ, मत्सर, द्वेष अशा प्रकारच्या विध्वंसक भावना का तयार होतात याचे आकलन होईल. हे करण्यासाठी या नकारात्मक भावना कशा उत्पन्न होतात व त्या कशाप्रकारे काम करतात हे समजून घेतले पाहिजे. अशा रीतीने आपल्या एक विशिष्ट समज विकसित होते, ज्यामुळे विनाशकारी तणावदायी भावना कमी होण्यास किंवा नष्ट होण्यास मदत होते.
अधिक सखोल विचार केल्यावर आपल्याला स्वतःमधील स्वार्थीपणा, स्वकेंद्रीपणा आणि केवळ स्वतः विषयी विचार करण्याची आपली वृत्ती समजून घेऊन या घातक भावनांच्या मुळाशी नेमके काय आहे यावर काम करता येते. आपण सामान्यतः ‘मला स्वतःचा असा एखादा मार्ग असलाच पाहिजे’ असा विचार करत असतो. आपल्याला जेव्हा आपला मार्ग मिळत नाही, तेव्हा आपण क्रोधित होतो. आपल्याला जरी सर्व गोष्टी आपल्या पद्धतीनेच व्हायला हव्यात असे वाटत असले, तरी तसे का वाटते? याला काही विशिष्ट कारण नाही. ते फक्त आपल्याला तसेच हवे असते, हेच त्यामागचे कारण आहे. प्रत्येक जण अशा पध्दतीने विचार करतो आणि आपण सर्वच जण बरोबर असू शकत नाही.
आपण हळूहळू, टप्प्या टप्प्याने याबाबत विचार करून आपल्यातील या मूलभूत त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टींवर काम करू. जेव्हा आपण याचे विश्लेषण करू तेव्हा आपल्याला समजेल की आपल्यातील स्वार्थीपणा हा ‘मी’ आणि ‘माझे स्वत्व’ याविषयीच्या आपल्या संकल्पनांवर आधारित असतो. दुसऱ्या भाषेत सांगायचे तर आपली आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची संकल्पना ही ‘मी कोणीतरी वेगळा आहे’ यावर बेतलेली असते. जणू काही या जगाच्या केंद्र स्थानी आपणच आहोत, या जगातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आपणच असून इतर सर्वांपासून स्वतंत्र आहोत. आपल्या या आकलनाचे आपण बारकाईने निरीक्षण करायला हवे कारण यामध्ये नक्कीच काहीतरी चुकीचे आणि विकृत आहे. आणि श्रेणीबद्ध मार्ग याच बाबत मार्गदर्शन करतो.
प्रेरणेची प्रगतशील पातळी : धर्म लाईट अशा पद्धतीची ध्येयं गाठण्यासाठी बुद्धांनी शिकवलेल्या पद्धती अतिशय उपयुक्त आहेत. मूलतः आपल्या क्रोध आणि स्वार्थीपणा सारख्या नकारात्मक भावना आणि विनाशकारी वर्तन टाळण्याच्या इच्छेमागे काही कारणे असतात. आणि हे कारण कदाचित आपल्याला झालेली जाणीव असू शकते की नकारात्मक भावनांच्या प्रभावाखाली केलेले वर्तन आनंददायी नसते आणि आपल्यासोबत इतरांनाही त्रासदायक ठरू शकते. आपल्याला अशा समस्या नको असतात.
आपण या त्रासदायक भावनांकडेही श्रेणीबद्ध मार्गाच्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. मी विशिष्ट पद्धतीने वागलो, तर त्यातून या क्षणी समस्या आणि अडचणी निर्माण होतात. उदाहरणार्थ, आपण कोणासोबत मोठे भांडण करून त्याला जखमी केले, तर त्यामध्ये आपल्यालाही इजा होऊ शकते अथवा तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. सखोल पातळीवर विचार केल्यास आपण आपल्या विनाशकारी वर्तनाचे दीर्घकालीन परिणाम देखील पाहू शकतो, कारण आपल्याला केवळ आत्ताचा नाही तर भविष्यात होणारा त्रास देखील टाळायचा आहे. हे करत असताना आपल्याला आपल्या कुटुंबीयांना, जवळच्या व्यक्तींना, मित्रांना, समाजाला त्रास देणे अथवा संकटात टाकणे टाळायचे आहे. हे सर्व या जन्मापुरते सीमित आहे. पुढे जाऊन विचार केल्यास आपण अधिक व्यापक दृष्टिकोन ठेवू शकतो, जसे की पुढील पिढीसाठी त्रासदायक ठरू शकणाऱ्या जागतिक तापमानवाढीसारख्या गोष्टी टाळण्याची इच्छा बाळगणे.
या प्रेरणा विकसित केल्यावर आपल्या आधीच्या प्रेरणा विसरतात असे नाही. याउलट या प्रेरणा एकत्रित होऊन एकमेकांमध्ये मिसळतात. श्रेणीबद्ध मार्गाचे हे मूलभूत तत्त्व आहे. वर जे काही नमूद केले आहे, त्यालाच मी ‘धर्म –लाईट’ असे संबोधतो. यामध्ये बुद्धांच्या शिकवणीला अथवा धर्माला केवळ याच वर्तमान जीवनाच्या संदर्भात सांगितले गेले आहे, यात पुनर्जन्माविषयी उल्लेख नाही. मी ‘धर्म –लाईट’ आणि ‘अस्सल धर्म’ या संकल्पना अनुक्रमे कोका-कोला लाईट आणि साखरयुक्त कोका-कोला या संकल्पनांच्या आधारे तयार केल्या आहेत.
या जन्मीचे आयुष्य सुधारण्याचा विचार करताना पुनर्जन्माची संकल्पना मान्य करणे
‘धर्म’ हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ बुद्धांच्या शिकवणींशी सबंधित आहे. आणि ‘लाईट’ संकल्पनेचा अर्थ यात काहीतरी गैर आहे, असा होत नाही, तर ‘लाईट’ म्हणजे अस्सल धर्मापेक्षा कमी ताकदीची, अवास्तविक आवृत्ती होय. लाम-रिमचे तिबेटी परंपरेत असलेले सादरीकरण हे वास्तविक स्वरूपाचे (खरे) आहे, परंतु आपल्यातील अनेक जणांना प्रारंभिक अभ्यासात हे समजणे कठीण जाईल. याचे मुख्य कारण म्हणजे यात गृहीत धरले जाते की आपला पुनर्जन्मावर पूर्ण विश्वास आहे, आणि यातील सर्व विषय समजवताना, पुनर्जन्म आहे हे गृहीत धरूनच शिकवले जाते. हा दृष्टिकोन ठेवून आपण आपल्या भविष्यातील जन्मांमध्ये होणारे त्रास टाळण्यासाठी आणि भविष्यातील जन्म सुधारण्यासाठी प्रयत्न करतो.
जर आपला भविष्यातील जन्मांवर विश्वास नसेल तर ते सुधारण्यासाठीच्या आपल्या प्रेरणेबाबत आपण प्रामाणिक असणार नाही. हे तर अशक्यच आहे. जेव्हा आपल्याला पूर्व तसेच भविष्यातील जन्मांविषयी प्रश्न असतात, ज्यावेळेस आपल्याला त्याविषयी काही समजत नसते, खात्री नसते, त्यावेळी धर्म-लाईट पासून सुरुवात करणे आवश्यक ठरते. आपण आपल्या आध्यात्मिक साधनांमध्ये कोणत्या गोष्टी साध्य करू इच्छितो? याविषयी स्वतःसोबत प्रामाणिक असले पाहिजे.
आपल्यातील बहुतेक जण वर्तमान किंवा आत्ताचा जन्म अधिक चांगला बनविण्यासाठी प्रयत्नशील असतील. आणि असे ध्येय असणे हे योग्यच आहे. ही सुरुवातीची व अत्यंत गरजेची अशी पायरी आहे. आपण जेव्हा धर्म-लाईटच्या या स्तरावर असतो, त्यावेळी हे लक्षात घेणे जरूरी आहे की हा अस्सल धर्म नसून केवळ धर्म-लाईट आहे. या दोन्हीमधील फरक समजून न घेतल्याने आपण बौद्ध धर्माला इतर सर्वसामान्य उपचारपद्धतीच्या स्तरावर आणून ठेवतो. हे धर्माच्या संकल्पनेला संकुचित करणारे ठरेल आणि बौद्ध धर्मावर अन्याय करणारे ठरेल.
खऱ्या धर्माच्या वास्तविकतेचा मुद्दा राहू दे, पण आपल्याला अस्सल किंवा खरा धर्म नक्की काय आहे, याची जाणीव नसेल, तर आपण तसे मान्य करायला हवे. आपण खुल्या मनाने विचार केला पाहिजे की "भविष्यातील जन्म आणि मुक्तीबाबत ते जे काही सांगत आहेत, ते खरे आहे की खोटे याबाबत मला खात्री नाही, परंतु सध्या मी धर्म-लाईटच्या पातळीवर काम करणार आहे. जस जसे मी स्वतःला अधिक विकसित करत नेईन, अधिक ध्यानधारणा करेन, कदाचित त्यावेळी मला खरा अथवा अस्सल धर्म अधिक चांगल्या पद्धतीने समजेल". हा पूर्णतः योग्य व मान्य असलेला दृष्टिकोन आहे, जो की बुद्धांप्रति आदर तसेच या विश्वासावर आधारित आहे की त्यांची या गोष्टींची शिकवण ही अर्थहीन बडबड नव्हती.
आपल्याला हे देखील मानून चालले पाहिजे की आपल्या मनात भविष्यातील जन्म आणि मुक्तीबाबत काही विचार असतील जे की पूर्णपणे चुकीचे असू शकतात आणि बौद्ध धर्मसुद्धा अशा पूर्वकल्पीत व्याख्यांना आणि स्पष्टीकरणांना स्वीकारणार नाही. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा अर्थ काय असेल अथवा एखादी गोष्ट आपल्याला हास्यास्पद वाटत असेल तर बुद्धांनाही ती गोष्ट हास्यास्पदच वाटेल कारण ती योग्य प्रकारे समजून घेतलेली नसेल. उदाहरणार्थ, बुद्धांनीही हे मान्य केले नसते की आपण एखादा पंख असलेला आत्मा आहोत जो एका शरीरातून उडत जाऊन दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. आपण स्वतः सर्वशक्तिमान देव बनू शकतो हा विचार देखील बुद्धांनी स्वीकारला नसता.
अनादि पुनर्जन्माच्या बाबतीत विचार करण्याचे फायदे
या श्रेणीबद्ध मार्गात सांगितलेल्या बहुतेक पध्दती ह्या धर्म-लाईट अथवा खरोखरच्या धर्माच्या साधनेत लागू होऊ शकतात. परंतु अशा काही विधी अथवा पद्धती आहेत, ज्या भविष्यातील जन्मांच्या समजुतीवर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ, सर्वांप्रति समान प्रेम उत्पन्न करण्यासाठी अशी एक पद्धत आहे की ज्यात असे मानले जाते की प्रत्येक जिवाला अनादी पुनर्जन्म आहेत आणि जिवांची संख्या निश्चित आहे. येथून सुरुवात करून आपण या तर्कावर पोहोचतो की प्रत्येक जीव आधीच्या जन्मात आपली तसेच इतर सर्वांची आई होता. आणि आपणही इतर सर्वांची आई होतो. अनादी परंतु निश्चित संख्या असलेल्या जिवांच्या या तर्काला गणितीय पुराव्यांच्या आधारे प्रमाणित करता येऊ शकते. जर वेळ आणि जीव हे दोन्हीही असंख्य असते, तर ही गोष्ट अशा पद्धतीने काम करते, हे आपण सिद्ध करू शकलो नसतो.
आपण याआधी जर असंख्य पुनर्जन्माच्या दृष्टीतून विचार केला नसेल, तर हा विषय समजणे खूप अवघड आहे. असंख्य पुनर्जन्माच्या आधारे आपण असा विचार करू शकतो की सर्व जिवांनी कोणत्या ना कोणत्या जन्मात आपल्यावर आईसारखे प्रेम केले आहे आणि याचा आपण आदर करून, त्यांच्या प्रति आदर ठेवून त्या प्रेमाची परतफेड करण्याचा विचार करू शकतो. पूर्ण विकास यावरच आधारित आहे. या प्रक्रियेत आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो की कोणत्या ना कोणत्या काळात कोणी ना कोणी व्यक्ती ही आपली आई होती. आपण जरी आपल्या आईला दहा मिनिटे, दहा दिवस अथवा दहा वर्षे बघितले नाही, तरी देखील ती आपली आई असते. त्याचप्रमाणे आपण तिला दहा जन्मात जरी नाही बघितले तरी देखील ती आपली आई असते. जर आपला पुनर्जन्मावर विश्वास असेल, तर अशा पद्धतीने विचार करणे अतिशय उपयुक्त ठरू शकते. विश्वास नसेल तर हे सर्व अर्थहीन आहे.
आपण केवळ माणसांचा विचार न करता डासांचा विचार केला, तर ही गोष्ट विशेषतः लागू पडते. हा डास कोणत्यातरी पूर्वजन्मात आपली आई होता, कारण पुनर्जन्म हा कोणत्याही मानसिकरीत्या कार्य करू शकणाऱ्या जिवात होऊ शकतो. याची धर्म-लाईट आवृत्तीही आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की कोणीही आपल्याला घरी आणू शकते, कोणीही आपली काळजी घेऊ शकते, आपल्याला जेवण भरवू शकते. हे करण्यासाठी सर्वजण सक्षम आहेत; आपण प्रवास करताना आपल्याला नेहमी अशा अनोळखी व्यक्ती भेटतात, ज्या आपल्या सोबत चांगले वागतात, तसेच आपल्याला मदत करतात. ती व्यक्ती पुरुष असो वा स्त्री प्रत्येकजण आपल्यासोबत आपल्या आईसारखं वागू शकतो. एखादे लहान मूल मोठे होऊन आपली काळजी घेऊ शकते. अशा पद्धतीने विचार करणे खूप उपयुक्त असले तरी याला काही मर्यादाही आहेत. कारण आपल्याला दिसणारा तो डास आपल्याला घरी घेऊन जाऊ शकतो आणि आपल्या आईप्रमाणे काळजी घेऊ शकतो, असा विचार करणे कठीण आहे.
विविध प्रकारच्या पद्धतींना धर्म-लाईट आणि खऱ्या धर्माच्या पातळीवर कसे लागू करता येते हे यावरून समजते. हे दोन्हीही आपापल्या पातळीवर चांगले आहेत, परंतु धर्म-लाईट आवृत्तीला काही मर्यादा आहेत. खऱ्या वा अस्सल धर्मातील विधी या व्यापक स्वरूपाच्या अनेक शक्यतांना जन्म देतात. आपण आपल्या आयुष्यात कोणत्या स्तरावर त्याचा वापर करतो हे महत्त्वाचे नसून आपल्या जीवनात त्याचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण रहदारीत अडकतो किंवा मोठ्या रांगेत उभे असतो, तेव्हा आपण इतरांचा राग राग करतो अथवा संयम गमावून बसतो, तेव्हा आपण त्या सर्वांना आपल्या आईच्या नजरेने पाहू शकतो. आपण त्यांना आपल्या या जन्मातील अथवा पूर्वजन्मातील आई म्हणून पाहिल्यास आपला राग शांत होण्यास, संयम वाढण्यास मदत होईल. जर रांगेत खरोखरच आपली आई असेल तर तिला आपल्या आधी सेवा मिळण्यास आपली काहीच हरकत असणार नाही. याउलट आपल्या आधी तिला सेवा मिळाली म्हणून आपण आनंदित होऊ. आपल्याला समजलेल्या गोष्टींचा उपयोग आपण अशा प्रकारे करू शकतो. केवळ ध्यानधारणा करतानाच अशाप्रकारे आपल्या मनाला विकसित करायचे असते असे काही नाही, तर ते आपल्या दैनंदिन आयुष्यातही लागू करायचे असते.
आत्मसुधारणेसाठीची पद्धत म्हणून ध्यानधारणेचा वापर
जेव्हा आपण धर्म प्रक्रियेला आत्मसुधारणेची प्रक्रिया असे म्हणतो, तेव्हा त्यातून तोच अर्थ अभिप्रेत आहे. जेव्हा आपण आपल्या खोलीतील शांत, नियंत्रित वातावरणात ध्यान करतो तेव्हा आपण अशा प्रकारची समज आणि मनाची सकारात्मक स्थिती निर्माण करण्याचा सराव करतो. आपण आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून इतर लोकांविषयी विचार करतो, तसेच त्यांच्याविषयी विधायक दृष्टिकोन विकसित करतो. जरी ही पारंपरिक पद्धत नसली तरी माझ्यामते ध्यानधारणेवेळी लोकांची चित्रे पाहण्याचा विधी सर्वत्र मान्य आहे. २५०० वर्षांपूर्वी लोकांची चित्रे उपलब्ध नव्हती आणि या प्रक्रियेमध्ये आपले आधुनिक तंत्रज्ञान सामील करून घेण्यात मला काहीच चुकीचे वाटत नाही.
आपण विशिष्ट सकारात्मक मानसिकतेबाबत सखोल अभ्यास केल्यानंतर त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यात वापर करण्याचा प्रयत्न करतो. हाच याचा मुख्य हेतू आहे. एखादया जागी बसून ध्यानधारणा करताना तुमच्या मनात दुसऱ्या विषयी चांगले विचार असतील, पण तिथून उठल्यावर तुम्ही तुमच्या घरातल्यांवर, सहकाऱ्यांवर रागावत असाल, तर याचा असा परिणाम अपेक्षित नाही आहे. त्यामुळे आपण आपली ध्यानधारणा केवळ शांततेचे काही क्षण देणारी अथवा आयुष्यापासूनची एक पळवाट आहे असे समजू नये. आपण जर ध्यानधारणेतून काल्पनिक विश्वात जात असू अथवा अदभुत गोष्टींचा विचार करत असू, तर तो देखील एक पलायनवाद आहे. ध्यानधारणेचा सराव हा वेगळा असला पाहिजे यातून आपल्याला आयुष्यातील संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळाली पाहिजे. हे कठीण कार्य आहे हे समजून घेतले पाहिजे. आपण स्वतःला फसवू नये, तसेच हे खूप सोपे आणि लगेच साध्य होणारे आहे, अशा चुकीच्या जाहिरातीना बळी पडू नये. स्वार्थीपणा आणि विनाशकारी भावनांवर नियंत्रण मिळवणे हे एवढे सोपे नसते, कारण या भावनांची कारणे आपल्या स्वभावात खोलवर रुजलेली असतात. यावर नियंत्रण ठेवण्याचा एकमेव उपाय म्हणजे गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे, असे केल्यास आपल्या मनात या विनाशकारी भावनांमुळे निर्माण होणारा गोंधळ दूर होतो.
सारांश
बौद्ध धर्माचा अभ्यास धर्म-लाईट आणि खरा धर्म अशा दोन पद्धतीने करता येतो. धर्म-लाईटच्या अभ्यासाने आपण अशा प्रकारचे मानसिक साधन तयार करू शकतो की ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीना सामोरे जाऊ शकू, असे करून आपण आपल्या या जन्माचा दर्जा सुधारू इच्छितो. धर्म-लाईट मध्ये चुकीचे असे काही नाही, परंतु तो कोका कोला लाईट सारखा आहे, त्याला असली कोका कोला सारखी चांगली चव येणार नाही.
आपण धर्म-लाईटच्या संदर्भात ज्या संकल्पनांची चर्चा केली, त्यांचा उल्लेख पारंपरिक लाम-रिमच्या शिकवणीत येत नाही, कारण यात गतजन्म आणि भविष्यातील जन्माबाबतच्या पूर्वधारणा मानल्या जातात. तरीही आपले जीवन सुधारण्याची इच्छा असणे आणि एक चांगली व्यक्ती बनणे ही गोष्ट खऱ्या खुऱ्या धर्माच्या अभ्यासातील पहिली पायरी आहे.