लाम-रिम श्रेणीबद्ध मार्गाचे पारंपरिक सादरीकरण त्सेनझाब सरकॉंग रिंपोछे

श्रेणीबद्ध मार्गावरून ज्ञानप्राप्तीच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीची सुरुवात या जाणिवेसह होते की, आपल्याला मनुष्य रूपात मिळालेला पुनर्जन्म ही एक अद्वितीय दुर्लभ संधी आहे. जर आपण याचा पुरेपूर लाभ घेऊ शकलो, तर आपण केवळ असे पुनर्जन्मच प्राप्त करू शकणार नाही, तर मुक्ती आणि ज्ञानप्राप्तीही साध्य करू शकतो. आणि हे सर्व आपली प्रेरणा व उद्दिष्टांची व्यापकता आणि बुद्धाने शिकवलेल्या साधनांचा अभ्यास आणि सरावावर अवलंबून असते.

मनुष्यरूपातील पुनर्जन्म अनमोल आहे 

मनुष्यरूपातील पुनर्जन्माला चिंतामणीसारखे अनमोल का समजले जाते

आपला हा मानवी देह इच्छापूर्ती करणाऱ्या चिंतामणीहून अधिक अनमोल आहे. तो आपल्या निवृत्तीचा आधार आहे, पण आपल्या शारीर पातळीवर जी निवृत्ती प्राप्त होते ती अमली पदार्थांच्या व्यसनात उन्मत्त होण्यासाठी नसते, तर आपण धार्मिक आचरण करावे, यासाठी असते. तर आपला हा मानवी देह इच्छा पूर्ण करणाऱ्या चिंतामणीहून अधिक अनमोल का आहे? कारण इच्छा पूर्ण करणारे रत्न आपल्या वर्तमान जीवनातील अन्नपाण्याची गरज भागवू शकते, पण आपल्या भविष्यातील जन्मांसाठी उपयोगी पडत नाही. आपल्याला जो मानवी देह मिळाला आहे, तो धार्मिक आचरणाची संधी प्राप्त करून देतो, म्हणूनच तो एखाद्या रत्नाहून अधिक अनमोल आहे. 

आपल्याला सदासर्वकाळ आणि शक्य असेल तितका वेळ सुखाची अपेक्षा असते. पण आपण सध्याच्या जीवनात कितीही सुख आणि आनंद मिळवला, तरी तो अल्पायुषी असतो, कारण तो या जन्मापुरता मर्यादित असतो. जर आपल्याला संतत दीर्घकालीन सुखाची आस असेल, तर आपल्याला भविष्यातील जन्मांचा विचार करावा लागेल. इच्छापूर्ती करणारे रत्न आपल्याला तीन निम्नस्तरीय क्षेत्रातील पुनर्जन्मापासून मुक्ती आणि अमरत्व मिळवून देत नाही. पण आपल्या मानवी देहाला आधारभूत मानून आपण निम्नस्तरीय पुनर्जन्मापासून स्वतःचे संरक्षण करू शकतो. आणि जेट्सन मिलरेपा यांच्याप्रमाणे त्याला धार्मिक आचरणाचा आधार मानून याच जन्मात ज्ञानप्राप्ती साध्य करू शकतो. त्यामुळे इच्छापूर्ती करणारे रत्न आपल्या अनमोल मानवी देहाकडून मिळणाऱ्या या गोष्टी देऊ शकत नसल्याने आपला देह इच्छापूर्ती करणाऱ्या चिंतामणीपेक्षा अधिक अनमोल आहे. 

त्यामुळे धार्मिक साधनेसाठी आपल्या या अनमोल मानवी देहाचा उपयोग करणे आवश्यक आहे. पण आपला कल विरूद्ध दिशेला अधिक असतो – हे इच्छापूर्ती करणाऱ्या चिंतामणीहून अधिक अनमोल असले तरी, आपण आपले शरीर अधिकाधिक संपत्ती मिळवण्यासाठी उपयोगात आणतो. या क्षणिक उद्दिष्टासाठी आपल्या जीवनाचे बलिदान देण्यासाठीही आपण तयार असतो. या जगात आपल्याहून श्रीमंत आणि बुद्धिमान असणारे असंख्य लोक असतात. पण आपल्या अनमोल देहाचा धार्मिक साधनेसाठी वापर करून आपण त्यांच्याहून कित्येक पटीने अधिक सकारात्मक ऊर्जा (गुण) विकसित करू शकतो. त्यामुळे हा मनुष्यरूपातला अनमोल पुनर्जन्म व्यर्थ न घालविता ज्या तीन उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी तो उपयुक्त आहे, त्यासाठी त्याचा वापर करावाः भविष्यातील चांगल्या पुनर्जन्मासाठी, मुक्तीसाठी आणि ज्ञानप्राप्तीसाठी.  

भलेही आपल्याकडे कितीही भौतिक सुखसुविधा असतील, पण त्या सुखसमाधान देत नाहीत. एखाद्या माणसाकडे जगातील सर्व भौतिक सुखे असली तरी तो समाधानी असू शकत नाही. त्यामुळे हे स्पष्टच आहे की अगदी सर्व इच्छापूर्ती करणारी रत्नेही माणसाला समाधान देऊ शकत नाहीत. माणसाला जितकी जास्त संपत्ती मिळत जाते, तितकीच त्याची दुःखे वाढत जातात. आपण हे सत्य स्वतः अनुभवू शकतो- आपण जर अवास्तव साहित्य घेऊन बस किंवा ट्रेनने प्रवास करायचा प्रयत्न केला, तर प्रवास करणे अशक्य होऊन जाते; पण आपल्याकडे असा साहित्याचा भरणा नसेल, तर प्रवास सहज होऊन जातो.   

म्हणूनच आपण धार्मिक साधनेसाठी प्रयत्न करायला हवेत. उदाहरणार्थ, जेट्सन मिलरेपा गुहेत राहत होते, तेव्हा त्यांच्या जवळ भौतिक साधनसुविधा नव्हत्या. जेट्सन मिलरेपा आणि शाक्यमुनी बुद्धांनी ओळखले होते की भौतिक साधनसुविधा किती तुच्छ आणि अनावश्यक असतात आणि धर्म साधनेसाठी त्यांनी या गोष्टींचा त्याग केला. आणि तुम्ही सुद्धा, जे जगातल्या अनेक श्रीमंत शहरांमध्ये राहिलेले आहात, तुम्हालाही जाणीव झाली आहे की भौतिक साधनसुविधा तितक्या महत्त्वाच्या नाहीत, म्हणून त्यांना मागे टाकून तुम्ही इथे धर्मसाधनेसाठी आला आहात. 

मनुष्य रूपात अनमोल पुनर्जन्म मिळवण्यातील समस्या आणि कारणे

अनमोल मानवी देह मिळविणे इतके कठीण का आहे, याचा आपण विचार करायला हवा. हे कठीण आहे कारण त्यासाठी आवश्यक कारणे विकसित करणे कठीण आहे. त्यासाठी तीन महत्त्वाची कारणे आहेतः 

 • कठोर स्वयंशिस्तीचे पालन
 • सहा व्यापक दृष्टिकोनांचा (सहा परिमिती) अंगीकार
 • शुद्ध आकांशापूर्ण उपासना

कठोर नैतिक स्वयंशिस्तीचे पालन

कठोर नैतिक स्वयंशिस्तीचे पालन करणे फार कठीण आहे आणि आपल्याला याची जाणीव होणे आणि त्याचे मूल्यांकन करणेही कठीण आहे. या शिवाय नैतिक स्वयंशिस्तीच्या संदर्भात दहा विनाशकारी कृत्ये असतात आणि आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की जगातील बहुतांश लोकांना या विनाशकारी कृत्यांची जाणीव नसते. आणि अर्थात ज्यांना त्याची जाणीव असते, तेही ती विनाशकारी कृत्ये टाळण्यासाठी साधना करत नाहीत. 

देहासंबंधी तीन विनाशकारी कृत्ये असतातः

 • जीव घेणे/हत्या करणे -  उदाहरणार्थ आपण हत्या करू नये, याची आपल्याला जाणीव असू शकते, पण आपल्याला एखादा कीटक चावायला लागला की आपण तत्काळ हात  उगारतो आणि त्याला मारून टाकतो. 
 • जे दिले गेले नाही ते घेणे – जरी आपण बाहेर जाऊन उघड उघड चोरी करत नसलो तरी आपण चतुराईने इतरांकडून गोष्टी काढून घेतो, ते चोरीसमानच आहे. 
 • अवैध लैंगिक व्यवहार – आपण इतरांच्या सहचरासोबत लैंगिक संबंध ठेवण्याच्या इच्छेने घेरलेले असतो. 

शारीरिक स्तरावर दिवसागणिक आपण या विनाशकारी कृती स्वतःत साठवत जातो, जसे पावसातून जाताना अंगावर पावसाचे थेंब पडावे. 

वाणीच्या स्तरावरील चार विनाशकारी कृत्येः 

 • खोटे बोलणे – हे तर आपण सतत करत असतो. उदाहरणार्थ, आपण डोंगराच्या पायथ्याच्या दिशेने जाणार असतो आणि जर कुणी आपल्याला विचारले तर आपण डोंगरमाथ्यावर जाणार असल्याचे सांगतो. 
 • फूट पाडणारे बोलणे – मित्रांमध्ये फूट पाडणारे किंवा फार आधीच फार चांगले संबंध नसलेल्या लोकांमध्ये शत्रूत्व निर्माण करेल, असे बोलणे. इतरांशी वाईट पद्धतीने बोलून आपण हे कायमच करत असतो. 
 • अपमानकारक/कठोर बोलणे – आपण एखाद्या माणसाशी बोलतानाच असे बोलू असे काही गरजेचे नाही, उदाहरणार्थ, एखादा कुत्रा आपल्या खोलीत आला तर आपण त्याच्यावर खेकसू, ‘पळ..आधी जा इथून.’ अपमानकारक आणि कठोर भाषेचा वापर ही एक मोठी चूक आहे. कारण आपल्याला जाणीव आहे की कुणी आपल्याविरोधात अशी भाषा वापरली तर आपण कसे दुखावले जातो, त्यामुळे इतरांनाही, अगदी प्राण्यांनाही असेच दुःख होते. 
 • निरर्थक बडबड – व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्या तोंडातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्दच निरर्थक बडबड असतोः ‘मी त्या देशात जाऊन आलो आहे’ ‘मी हे केले आहे, मी ते केले आहे.’ जर तुम्ही फार बोलत राहिलात, तर वाणीसंदर्भातल्या विनाशकारी कृतींची शक्यता बळावते. जसे मला इंग्रजी येत नसल्याने मला इंग्रजीत बडबड करता येत नाहीत आणि मी फक्त तिबोटी भाषेत बकबक करू शकतो.      

मनासंबंधी तीन विनाशकारी कृत्येः 

 • लोभी विचार करणे – एखाद्याजवळ फार छान घरदार आहे आणि तुम्हाला ते स्वतःसाठी हवे आहे, तुम्ही पूर्ण वेळ त्याचा विचार करत राहता आणि ते मिळवण्यासाठी योजना आखत बसता. असा विचार चांगला नाही, पण आपल्या मनात असेच विचार सुरू असतात. 
 • द्वेष किंवा आकसाची भावना – एखाद्याचे वाईट चिंतने किंवा त्याची मान मुरगळण्याचा विचार करणे. असा विचार आपण फक्त शत्रुबाबतच करतो असे काही नाही, तर एखाद्या मित्राचा राग आल्यास, त्याच्याविषयीही असा द्वेषपूर्ण विचार करतो. 
 • दूषित, विरोधी विचार बाळगणे- उदाहरणार्थ, भविष्यातील पुनर्जन्मासारखे काही नाही किंवा शरणागतीची त्रिरत्ने कुणालाही लाभकारक नाहीत, असा विचार करणे किंवा पूजा करणे वेळेचा अपव्यय आहे असे समजणे, तुपाचे दिवे जाळणे तूप वाया घालविणे असल्याचा विचार करणे किंवा तोरमा अर्पण करणे त्साम्पा व्यर्थ घालविण्यासारखे आहे, असा विचार करणे.  

असा विचार करण्यापासून स्वतःला रोखने कठीण आहे. आणि तसे वागण्यापासून तुम्ही स्वतःला थांबवले नाही, तर तुम्ही मनुष्य रूपातला अनमोल पुनर्जन्म मिळवू शकत नाही. आत्ता या विषयात खोलात जाण्यासाठी पुरेसा वेळ नाही, पण तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला लाम-रिम शिकवणींचा अभ्यास करायला हवा. 

सहा व्यापक दृष्टिकोनांचा (सहा परिमिती) अंगीकार

मनुष्य रूपातील अनमोल पुनर्जन्म मिळवण्यासाठीचे तिसरे कारण सहा व्यापक दृष्टिकोनांचा (सहा परिमिती) अंगीकार करण्याशी संबंधित आहे. 

 • औदार्य
 • नैतिक स्वयंशिस्त
 • संयम
 • चिकाटी
 • मानसिक स्थैर्य (एकाग्रता)
 • विवेकी जागरूकता (शहाणीव)

पण आपण औदार्यपूर्ण व्यवहार करण्याऐवजी कुजकटपणे वागतो आणि आपला कुजकट दृष्टिकोन वाढवत जातो. संयम बाळगण्याऐवजी आपण क्रोधाने भरलेले असतो. ज्यामुळे आपल्याला धार्मिक साधनेत अत्युच्च आनंद मिळू शकतो, अशी चिकाटी ठेवण्याऐवजी आपण आळशीपणाने वागतो आणि पूर्ण वेळ झोपून राहू इच्छितो. मानसिक स्थैर्य ठेवण्याऐवजी मानसिक चलबिचल अनुभवत राहतो- जसे मंत्रोच्चारावेळी आपले मन भरकटलेले असते – आणि आपण ते भरकटणे आणखी वाढेल, असे वागत राहतो. 

एक शिक्षक होते, ज्यांना आपल्या साधनेदरम्यानच आठवले की त्यांना आपल्या शिष्याला एक काम सोपवायचे होते, जे ते विसरून गेले. त्यांना ही गोष्ट आठवताच त्यांनी साधना मध्येच सोडून दिली आणि उठून त्या शिष्याला काम सांगून आले. हे त्यांच्या मनाचे भरकटणे होते. जेव्हा आपण मंत्रोच्चार करत असतो, आपले मन कुठेतरी दुसरीकडेच भरकटत असते. 

व्यापक विवेकी सचेतनतेच्या दृष्टिकोनातून आपल्याला शून्यतेचा बोध देणारी विवेकी सचेतनता विकसित करण्याची गरज असते. पण तसे करण्याऐवजी आपण चित्रकलेसारख्या सांसारिक विषयांच्या अभ्यासात मग्न होतो, त्यामुळे आपण उपयुक्त ज्ञान वा बोध विकसित करू शकत नाही. 

थोडक्यात सांगायचे तर मनुष्य रूपात पुनर्जन्म मिळवण्यासाठीचे निमित्त किंवा कारण निर्माण करणे फार कठीण आहे. मानवी जन्म किती दुर्लभ आहे, हे लक्षात घेऊन आपण विचार करायला हवा की, हा आपल्याला फक्त एकदा लाभला आहे आणि तो लवकरच नष्ट होऊ शकतो. आपल्याला मिळालेल्या या अनमोल मानवी शरीराचा सदुपयोग करून लाभ उठवू शकलो नाही, तर भविष्यात असा दुसरा जन्म मिळणे कठीण आहे. 

शुद्ध आकांशापूर्ण उपासना

मनुष्य रूपातल्या अनमोल पुनर्जन्माच्या प्राप्तीसाठी प्रामाणिक नैतिक स्वयंशिस्त आणि सहा परिमितींच्या अंगीकारास शुद्ध आकांशापूर्ण उपासनेची जोड देणेही आवश्यक आहे. पण त्या प्रार्थनेचा संबंध अशा स्वरूपाच्या प्रार्थनांशी नाही, जसे ‘हे बुद्धा, मी चांगली मुलगी आहे किंवा मी चांगला मुलगा आहे आणि मी सर्वकाळ तुझी प्रार्थना करतो, तेव्हा मला इच्छित फळ दे.’ उलट यात आपले उद्देश आणि सकारात्मक ऊर्जेला, मनुष्य रूपातील अनमोल पुनर्जन्मावरील खास निष्ठेसह तीव्र दिशा दिली जाते.    

पण ती निष्ठा विशिष्ट स्वरूपाची असणे महत्त्वाचे आहे. गान्डेन मठात गेलुग्पा परंपरेचे उच्च सिंहासन होते. तिबेटमध्ये प्रत्येक मठात प्राणी असत आणि एके दिवशी एक गाय मंदिरात चालत आली आणि सिंहासनावर जाऊन झोपली. मठातले भिक्षु या प्रकाराने आश्चर्यचकीत झाले. त्यांनी तिथल्या महान गुरूंना या प्रकाराबद्दल विचारले की, ‘या मागचे कारण काय?’ गुरूंनी सांगितले, ‘मागील जन्मात या जिवाने या गान्डेन सिंहासनावर बसण्यासाठी प्रार्थना केली होती. पण ती प्रार्थना विशिष्ट स्वरूपाची आणि स्पष्ट नव्हती.’ 

फुरसत नसण्याच्या आठ अवस्थांपासून मुक्ती 

मनुष्य रूपातील अनमोल पुनर्जन्माचे स्वरूप आठ विशेषाधिकारांशी संबंधित आहे. याचा अर्थ ते फुरसत नसण्याच्या आठ अस्थायी अवस्थांपासून मुक्त आहे. फुरसत नसण्याची अवस्था ती आहे, ज्यात धार्मिक साधनेसाठी फुरसत नसते. 

फुरसत नसण्याच्या चार अ-मानवी अवस्था आहेतः

 • आनंदविरहित नरकसदृश क्षेत्रात अडकून राहणे – जर आनंदविरहित नरकसदृश क्षेत्रात आपला पुनर्जन्म झाला तर आपण कायम आगीत होरपळत राहू आणि धर्मसाधनेसाठी फुरसतच मिळणार नाही. 
 • प्रेतात्मा, भूत – जर आपला प्रेतात्मा किंवा भुताच्या रूपात जन्म झाला, तर आपण कायम भुकेले असू आणि फक्त खाण्याचा विचार करत राहू.   

जर आपण सकाळी उठलो आणि आपल्याला नाश्ता मिळाला नाही, तर आपल्याला धर्म साधना करण्याची इच्छा होणार नाही. जर उठल्या क्षणी आपल्याला डोकेदुखी जाणवत असेल, तर आपल्याला धर्म साधना करावी वाटणार नाही. अशा प्रकारे आपल्या अनुभवाद्वारे सांगू शकतो की, जर आपण भुताच्या जन्माला आलो आणि ६० वर्षे भुकेले असू, तर आपल्याला धर्म साधनेत रस असणारच नाही. त्यामुळे आपण स्वतःला नशीबवान समजायला हवे की आपण आनंदविरहित नरकाच्या जाळ्यात किंवा अन्नासाठी भुकेले असलेल्या भुताच्या रूपात पुनर्जन्म घेतलेला नाही. 

 • प्राण्याचा जन्म – आपण अगदी परमपूज्य दलाई लामा यांच्या कुत्र्याच्या रूपात जन्म घेतला असता, तरी आपल्याला प्रार्थना करता आली नसती. त्यामुळे आपण तसे जन्मलो नाही याबाबत स्वतःला नशीबवान समजायला हवे. 
 • दीर्घायु दैवी अवतार – दीर्घायुषी दैवी अवतारांकडे इतके सांसारिक सुख असते की त्यामुळे त्यांनाही धर्म साधनेत रस नसतो. 

शारिपुत्रांचे एक शिष्य होते, ज्यांना गुरूप्रति प्रचंड भक्तीभाव होता. शिष्याच्या मृत्युनंतर त्यांचा देवलोकात पुनर्जन्म झाला. शारीपुत्रांनी आपल्या अतिसंवेदी शक्तींच्या माध्यमातून पाहिले की आपल्या विश्वासू शिष्याने देवलोकात पुनर्जन्म घेतला आहे. त्यानंतर त्यांनी त्यांची भेट घ्यायचा विचार केला. जेव्हा शारिपुत्र देवलोकात गेले, तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना फक्त नमस्कार केला. पण ते इतके सुख अनुभवत होते की त्यांना धर्म साधनेत बिलकूल रस नव्हता.   

आपण हे स्वतःच्या अनुभवातूनही पाहू शकतो. जर एखादा गरीब असेल, तो धर्म साधनेसाठी तयार असतो. पण तो श्रीमंत आणि सुखी झाला, तर त्याला साधनेत रस नसतो. त्यामुळे आपण दीर्घायुषी दैवी अवतारात जन्मलेलो नाही, याबद्दलही स्वतःला नशीबवान समजायला हवे. 

पुनर्जन्माच्या संदर्भातून फुरसत नसण्याच्या चार मानवी अवस्था आहेतः

 • जिथे बुद्धवाणीच अस्तित्वात नसते – उदाहरणार्थ, काही लोकांचा जन्म अशा देशात आणि काळात होतो, जिथे धर्म हा शब्दही त्यांच्या कानावर पडत नाही. आपण त्या अवस्थेत नाही.
 • रानटी अवस्थेत  – अशा जागांवर जिथे लोकांना फक्त अन्न आणि वस्त्र या दोनच गोष्टीत रस असतो. 

तिबेटात त्सारी नावाचा पर्वत आहे. तिबेटी लोक दर बारा वर्षांनी त्या पर्वतावर जातात. तिथे असणारी लोबा जमात फार रानटी आहे आणि त्यांच्या प्रदेशातून जाताना कर भरावा लागतो. या कराच्या रूपात त्यांना एक याक द्यावा लागतो. आणि ज्या क्षणी लोबा लोकांना याक मिळतो, त्याच क्षणी त्याची हत्या करून ते त्याचे रक्त पितात आणि त्याचे मांस खातात. त्यामुळे मानवी पुनर्जन्मात आपण अशा स्वरूपाचा जन्म घेतला नाही, त्याबद्दल समाधान मानायला हवे. 

 • विकलांग अवस्था  – जर आपण आंधळे, मूकबधिर किंवा शारीरिक,मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या विक्षिप्त जन्माला आलो असतो तर आपल्याला धर्माभ्यासात आणि साधनेत फार अडथळे आले असते. 
 • अध्यात्म विरोधी दृष्टिकोन असलेले स्थळ – अशा जागा जिथे लोक कोणीही आध्यात्मिक साधना, विशेषतः बौद्ध धर्माची साधना करणे वेडसरपणा समजतात आणि त्यांच्यासाठी पैसा कमावण्यासारख्या गोष्टी फक्त महत्त्वाच्या असतात. 

अशा प्रकारे जर आपल्याला फुरसत नसण्याच्या या सर्व आठ अवस्थांपासून मुक्त असणारा मानवी पुनर्जन्म प्राप्त झाला आहे आणि त्यातही, आपल्याला फुरसत नसण्याची काय कारणे आहेत, याची जाणीव असेल, तर आपण दुहेरी भाग्यवान आहोत. मनुष्य रूपात असा अनमोल पुनर्जन्म प्राप्त झाल्यानंतरही अनेक लोकांना हे समजत नाही की पुन्हा-पुन्हा पुनर्जन्म प्राप्त करण्याची कारणे कोणती आहेत. 

उपमा

मानवी रूपातील अनमोल पुनर्जन्माचे महत्त्व ओळखण्यासाठी आपण उपमांचा वापर करू शकतो. उदाहरणार्थ, मानवी रूपातील पुनर्जन्म तितकाच दुर्मिळ आहे, जसे आरशावर वाळूचे कण टाकले, तर ते आरशावर टिकून राहणे दुर्मिळ आहे. 

जर आपण या गोष्टींचा विचार केला, तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेला मनुष्य रूपातला पुनर्जन्म किती अनमोल सिद्धी आहे आणि आपण हा विचार करायला हवा की आपल्याला हा फक्त एकदाच लाभला आहे. आपल्याला विचार करायला हवा की भारतात करोडो लोक आहेत आणि त्यातील खूप थोडे लोक धर्म साधना करतात. त्यामुळे आपण हे समजू शकतो की हे किती दुर्मिळ आहे. 

एकदा एक लामा मनुष्य रूपातील पुनर्जन्माच्या प्राप्तीतील अडथळ्यांबाबत उपदेश देत होते. तर श्रोत्यांमधील एक मंगोलियन व्यक्ती म्हणाला, ‘जर तुम्हाला मानवी पुनर्जन्म इतका कठीण आहे असे वाटत असेल, तर तुम्ही चीनला जाऊन तिथे किती लोक आहेत, ते पाहायला हवे.’ हे मला सोव्हियत युनियनला जायला सांगण्यासारखे आहे. 

ध्यानधारणेवेळी चिंतन करण्यासाठी हे फार चांगले विषय आहेत. 

आपल्या अनमोल मानवी देहाचा अर्थपूर्ण जीवनासाठी उपयोग करणे

जर आपण विचार केला की आपण अनमोल मानवी शरीर मिळवण्यासाठी मागील जन्मी किती कठोर श्रम केले असतील, तर आपल्यात हा जन्मही सार्थकी लावण्याची आणि अर्थपूर्ण करण्याची उत्कट इच्छा निर्माण होईल. उदाहरणार्थ, तुम्ही एखादी जड वस्तू परिश्रमपूर्वक अर्ध्या डोंगरापर्यंत घेऊन गेला आहात आणि तिला तिथेच सोडून दिले, तर ती घसरत सरळ खाली जाईल. मनुष्य रूपातील दुर्लभ पुनर्जन्म प्राप्त करण्यासाठी आपण जे श्रम घेतले आहेत, ते एखादी जड वस्तू अर्ध्या डोंगरावर नेण्यासारखेच आहे, आणि आपण ते तिथेच सोडून दिले, तर आपले सर्व श्रम वाया जातील.  

त्यामुळे जेव्हा आपल्याला हा दुर्मिळ मानवी देह मिळाला आहे, तर भविष्यात पुन्हा केवळ असाच मानवी देह मिळण्याची इच्छा बाळगता कामा नये, तर आपल्याला मानवी देह लाभलाच आहे, तर त्याचा उपयोग बुद्धत्वप्राप्तीसाठी करायला हवा. जर आपण तसा प्रयत्न केला नाही, तर ते तांदळाचे पोते सोबत असूनही ते खाण्याऐवजी दुसऱ्या तांदळाच्या पोत्यासाठी प्रार्थना केल्यासारखे होईल. आपल्याला मानवी पुनर्जन्माचा पूर्ण लाभ उठवता यायला हवा. 

मृत्युप्रति सचेतन राहणे 

मृत्यू अटळ आहे

जर आपण विचार केला की आपला अनमोल मानवी देह कसा आहे, तर आपल्याला लक्षात येईल की तो एखाद्या दगड किंवा धातुतून निर्माण झालेला नाही. जर तसे असते तर त्याचे अस्तित्व दीर्घकाळ राहिले असते. जर आपण आपल्या शरीराला छेद देऊन त्याचे आतून निरीक्षण केले, तर आपण पाहू शकू की आपल्या शरीरात खूप रक्त आणि आतडी आहेत, अगदी त्या प्राण्यांसारखीच, ज्यांचे मांस खरेदी केल्यानंतर लोक ते आपल्या घरात टांगून ठेवतात. आपल्या शरीरातील आतील भाग घड्याळाच्या आतल्या भागासारखाच नाजूक आहे. 

जर आपण मृत्युबाबत आणि किती लोक मरण पावले आहेत, याबाबत विचार केला, तर आपण प्रत्येक मण्यासोबत एका मृत्युची नोंद करून आपली जपमाळ अनेक वेळा फिरवत बसू. मी असा विचार केला की मी धर्मशाळेला आल्यापासून किती तिबेटी लोकांचा मृत्यू झाला आहे, तर मी आयुष्यभर माझ्या जपमाळेवर मोजतच राहीन. 

असे कोणीच नाही जो मनुष्य रूपात जन्माला आला आहे, पण त्याचा मृत्यू झालेला नाही. आणि जर तुम्ही झाडेझुडपे कशी नष्ट होतात, याचा विचार केला, तर तुमच्या लक्षात येईल की ती नष्ट होणारच असतात. जन्माचा नैसर्गिक निष्कर्ष मृत्यूच आहे. त्याशिवाय पर्यायच नाही. इथे आपल्या एकत्र येण्याचा अंतिम परिणाम इथून उठून विभक्त होणेच आहे, तर वर जाण्याचा अंतिम परिणाम खाली येणे हाच आहे. मृत्यु निश्चित असल्याची जाणीव होऊन आपण मृत्यू येण्यापूर्वी शक्य तितका धर्म साधनेचा प्रयत्न करण्याची गरज आहे. 

त्यामुळे आपण विचार करायला हवा की आपला मृत्यू कसा होईल. कल्पना करा की तुम्ही फार आजारी आहात आणि तुमच्या शरीराचा रंग खराब होत चालला आहे, तुम्ही फार अशक्त झाले आहात. तुमचे सर्व नातलग रडत आहेत आणि इतके वाईट कसे घडले, असे बोलले जात आहे. डॉक्टर येऊन तुम्हाला औषध देतात, पण ते ही तुमची परिस्थिती फारच गंभीर असल्याचे हताशपणे सांगतात. 

कोणत्याही क्षणी आपला मृत्यू होऊ शकतो

शिवाय हे ही निश्चित नाही की आपला मृत्यू केव्हा होईल. अनेकदा असे पाहायला मिळते की केस पिकलेल्या वृद्ध मातापित्यांना आपल्या मुलांचे अंत्यसंस्कार करावे लागतात. आणि अनेक लोक तर जेवता जेवता श्वास घुसमटून मृत्यू पावतात. 

उदाहरणादाखल, तुम्ही तिबेटमधील एका घटनेचा विचार करू शकता. एका माणसाने मांसाचे काही तुकडे सकाळी खाण्यासाठी बाजूला काढून ठेवले, पण त्या माणसापेक्षा ते मांसाचे तुकडेच अधिक काळ टिकले. आणखी एक उदाहरण, मला शिमल्यातील एक बटाट्याची शेती करणारा शेतकरी माहीत आहे, जो दुपारच्या जेवणासाठी पराठे बनवणार होता, पण ते पराठे भाजले जात असतानाच तो वारला. 

त्यामुळे मृत्यू आणि नश्वरतेसंबंधी बोध मिळवण्यासाठी ग्रंथ वाचत बसण्यापेक्षा आपल्या माहितीतल्या मृत लोकांचा विचार करणे अधिक चांगले आहे. 

मृत्युसमयी फक्त धर्म आपली मदत करू शकतो

मृत्युविषयक ध्यानधारणेचे महत्त्व काय आहे? त्यातून हे स्पष्ट होते की धर्म साधना हे एकमात्र सार्थक काम आहे. 

आपण भौतिक गोष्टींच्या संदर्भातून विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की मृत्युवेळी आपण काहीही सोबत घेऊन जात नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही भरपूर पैसा कमावणारा श्रीमंत व्यापारी असाल, तर मृत्युवेळी तुमच्या जवळ तुमचा मृतदेह झाकण्यासाठी फारफार तर महागडे कापड असेल. ही संपत्ती मिळवण्यासाठी देशोदेशी प्रवास करून त्या व्यापाऱ्याने अगणित विनाशकारी कृत्ये केलेली असू शकतात. 

तुमच्याकडे अनेक नोकरचाकर असतील किंवा एखाद्या सेनाधिकारीच्या हाताखाली लाखभर सैनिक असतील, पण मृत्युवेळी कोणीच तुमच्या सोबत येऊ शकत नाही. अगदी अख्ख्या देशभर तुमचे नातलग असतील, तरी फायदा होत नाहीः तुम्ही मरत असताना फक्त ते तुमच्या अवतीभोवती उभे राहू शकतील आणि उलट तुमच्या शांततापूर्ण मृत्यू व पुनर्जन्माच्या प्रक्रियेत बाधकच ठरतील. 

मृत्युसमयी फक्त धर्म साधनाच माणसाच्या उपयोगी पडू शकते, कारण जर तुम्ही तुमच्या सकारात्मक कर्मांच्या फलस्वरूप पर्याप्त सकारात्मक शक्ती संचित केली असेल, तर ती तुमच्या भविष्यातील पुनर्जन्मांसाठी उपयुक्त ठरू शकते, पण नकारात्मक कार्मिक ऊर्जा पुनर्जन्माच्या प्रक्रियेत बाधा निर्माण करेल. हे सर्व तुम्ही मृत्युचा विचार न करताही समजून घेऊ शकता. तिबेटमधील अनेक तिबेटी प्रचंड श्रीमंत होते, पण त्यांना फक्त आपले ज्ञान आणि वैयक्तिक गुणांसह स्वतःचा देश सोडावा लागला. त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनकाळात निर्मल मनाने धर्म साधना करणे आवश्यक आहे आणि सांसारिक गोष्टींमध्ये वेळ व्यर्थ घालवता कामा नये. 

आपल्याला या जीवनातील सर्व सांसारिक कार्यांना गव्हाच्या भुश्श्यासमान क्षुल्लक समजायला हवे. सांसारिक कार्ये अर्थहीन असतात. सांसारिक कार्यांना आपण लहान मुलांनी केलेल्या वाळूच्या किल्ल्याप्रमाणे समजायला हवे. त्यांचा खेळ पूर्ण झाला की ते तो तसाच टाकून निघून जातात. सांसारिक कार्यांकडे आपण असेच पाहायला हवे. 

तुम्ही हा सर्व विचार केला, तर ते धर्म साधनेसाठी साहाय्यक ठरेल.  

प्रेरणेचे निम्न स्तर 

आरंभिक स्तर

जर आपण समस्त सांसारिक कार्यव्यवहार अनावश्यक आणि महत्त्वहीन समजला, तर आपल्याला जाणीव होईल की धर्म साधना हीच केवळ सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. धर्म साधना ही अशी गोष्ट आहे, जी आपल्या भविष्यातील पुनर्जन्मासाठी लाभकारक ठरेल. उदाहरणार्थ, असा दृष्टिकोन बाळगणे, ‘आता मला मनुष्य रूपातला अनमोल पुनर्जन्म मिळाला आहे, मी त्याचा अशा प्रकारे उपयोग करेन की मला भविष्यातही निम्न स्तरावर जन्म घ्यावा लागू नये.’ हा आपल्या दुर्मिळ जीवनाचा निम्न स्तरीय लाभ आहे. 

तीन निम्नस्तरीय लोकांमध्ये जाण्यापासून, अर्थात निम्नस्तरीय पुनर्जन्मांपासून, तुम्हाला फक्त तुमची कठोर नैतिक स्वयंशिस्त वाचवू शकते. पण जरी आपण नैतिक स्वयंशिस्ती कायम ठेवण्याची तीव्र इच्छा बाळगली तरी ती कालांतराने क्षीण होत जाते. त्यामुळे निम्नस्तरीय पुनर्जन्मापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी, आपल्याला आपल्या तणावदायी भावनांपासून मुक्ती मिळवणे आवश्यक असते. हे एखादा खूप मळलेला कपडा धुण्यासारखे आहे- सुरुवातीला तुम्ही थोडीशी ऊर्जा लावता आणि हळूहळू तुम्ही शक्ती वाढवत नेता. तणावदायी भावनांपासून मुक्तीसाठी तुम्ही हळूहळू आणि संयतपणे स्वतःवर काम सुरू करता आणि नंतर यथाशक्ती तुमचे प्रयत्न वाढवत नेता. त्यामुळे नैतिक स्वयंशिस्त कायम ठेवण्यासाठी, तुम्हाला ते हळूवार लागू करावे लागेल आणि नंतर उत्तरोत्तर अभ्यासातून तुम्ही तणावदायी भावनांपासून मुक्ती मिळवू शकता, नाहीतर तुमचे प्रयत्न लवकरच क्षीण होऊन संपून जाऊ शकतात. 

जर तुम्ही तीन निम्नस्तरीय पुनर्जन्मांपासून बचावासाठी नैतिक स्वयंशिस्त लागू करत असाल, तर ही किमान धर्म साधना आहे. 

मध्यवर्ती स्तर 

जर आपण तीन निम्नस्तरीय लोकांमधील जन्म रोखू शकलो आणि आपण देवलोकातील आनंद आणि सुखाच्या वातावरणात पुनर्जन्म घेतला किंवा मनुष्य रूपात पुनर्जन्म घेतला, तरी आपण समजून घ्यायला हवे की सर्व सांसारिक पुनर्जन्म दुःखदायी आहेत. लाम-रिम शिकवणींमध्ये याची विस्तारपूर्ण चर्चा करण्यात आली आहे. याला एका उदाहरणाच्या माध्यमातूनही समजून घेतले जाऊ शकते, जर तुम्ही ऊनात उभे आहात आणि ऊन फारच प्रखर झाले, तर तुम्ही आत जाता. पण त्या परिस्थितीत तुम्ही उकाड्यापासून वाचला तरी थंडीत अडकता. त्यामुळे अशी सांसारिक स्थितीच अस्तित्वात नाही, जी दुःखापासून मुक्त आहे.   

तणावदायी भावना आपल्याला अनियंत्रित पुनर्जन्मांच्या सांसारिक चक्रात गुरफटून ठेवतात. एखाद्या वृक्षाच्या मूळांप्रमाणे, याचे मूळ स्वतःची स्वतंत्र ओळख समजून घेण्याशी आहे. आपले सांसारिक चक्रात गुरफटत राहणे, एखाद्या मेरी-रो-राऊंडवर गोल गोल फिरत राहण्यासारखे आणि कुठेच न पोहचण्यासारखे आहे. यातून बाहेर पडण्याचा एकमेव उपाय म्हणजे स्वतःला एका उंचीवर पोहचवणे, जी त्या चक्राहून मोठी आहे. हे साध्य करण्यासाठी, आपण आर्य, अर्थात सिद्धीप्राप्त जीव होणे आवश्यक आहे, ज्याच्याकडे ओळखशून्य, अशक्य ‘आत्म्या’चा अभाव ओळखणारी विवेकी जागरूकता आहे. हीच शून्यतेसंबंधीची विवेकी जागरूकता आहे. 

आपल्या मानसिक सातत्यासंबंधीच्या शून्यतेचा बोध विकसित करण्यासाठी मानसिक शांती आणि स्थिरतेची शमथ अवस्था साध्य करणे आवश्यक आहे. आणि हे साध्य करण्यासाठी आपल्याला नैतिक स्वयंशिस्त आवश्यक आहे. त्यामुळे तीन उच्चस्तरीय साधना – नैतिक स्वयंशिस्त, एकाग्रता आणि विवेकी जागरूकता – आपल्याला अनियंत्रित पुनर्जन्माच्या सांसारिक चक्रातून मुक्त होण्यासाठी साहाय्य करतात. जर आपण ही साधना करू शकलो, तर आपण सांसारिक चक्रातून मुक्ती मिळवू शकतो. 

भावचक्रातून स्वतःला वर उचलणाऱ्या आर्यांचे तीन वर्ग आहेतः 

 • ज्यांनी दर्शन मार्ग चित्तावस्था प्राप्त केली आहे. 
 • ज्यांनी भावना मार्ग चित्तावस्था प्राप्त केली आहे. 
 • ज्यांनी साधनेचा टप्पा पूर्ण केला असून त्यांना पुढील अभ्यासाची आवश्यकता राहिलेली नाही. 

दर्शन मार्ग चित्तावस्था प्राप्त जीवधारी शून्यतेला निर्वैचारिक सरल अनुभूतीच्या दृष्टीतून पाहतात. भावना मार्ग चित्तावस्था प्राप्त जीव, उत्तरोत्तर ध्यानधारणेच्या माध्यमातून शून्यतेच्या निर्वैचारिक अनुभूतीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहतात. जेव्हा तुम्ही ध्यानधारणा करत करत आपल्या मनाला शून्यतेच्या अनुभूतीसाठी तयार करता आणि मुक्ती आड येणाऱ्या भावनिक आंदोलनांना तुमच्या मनातून हद्दपार करता, तेव्हा तुम्ही एक विमुक्त योगी, अर्थात अर्हत होता.

प्रेरणेचा उच्च स्तर 

प्रेम आणि करुणा 

पण फक्त स्वतःपुरती मुक्ती प्राप्त करणे पुरेसे नाही, कारण सर्व सीमित जीव (संवेदनाक्षम जीव) या कठीण परिस्थितीत आहेत. सर्व सचेतन जीव समदुःखी आहेत आणि त्यांना दुःखापासून मुक्ती हवी आहे. जर आपण सर्व जिवांना दुःखांपासून मुक्त करण्याची इच्छा बाळगणारी मनोवस्था विकसित केली, तर त्यालाच ‘करुणा’ म्हणतात. पण सर्व सचेतन जिवांना दुःखापासून मुक्त करण्याचा भाव विकसित करण्यासाठी आपल्याला स्वतःच्या दुःखांबाबत दीर्घकालीन चिंतन आणि त्याची भयावहता लक्षात घेऊन त्यापासून मुक्त होण्याच्या इच्छेचा दृढ संकल्प विकसित करणे आवश्यक आहे. एकदा तुम्ही दुःखाची भयावहता ओळखली आणि त्यातून बाहेर पडण्याची कामना करता, तेव्हा तुम्ही तो विचार सर्व जिवांना लागू करू शकता. ती करुणा आहे.  

अशा प्रकारे विरक्ती स्वतःची दुःखापासून मुक्तीची कामना आहे, तर करुणेत सर्व जीवमात्रांची दुःखातून मुक्तता व्हावी, ही कामना आहे. प्रेम आणि करुणेतील फरक हा आहे की करुणेमध्ये आपण असा विचार करतो की, ‘सर्व जीव वेदनेतून आणि ती निर्माण करणाऱ्या कारणांपासून मुक्त झाले तर किती छान होईल.’ तर प्रेम म्हणजे सर्व जिवांसाठी आनंद आणि आनंद निर्माण करणाऱ्या कारणांच्या प्राप्तीची कामना आहे. 

समभाव आणि बोधिचित्त कसे विकसित करावे

आपण प्रेम आणि करुणाभावापासून वंचित असण्याचे कारण काय आहे? सर्व जण दुःखातून मुक्त व्हावेत आणि सुखी व्हावेत, अशी कामना आपण का करू शकत नाही? कारण आपले चित्त समतल नाही – आपले चित्त ओबडधोबड आहे, त्यात उतार-चढाव आहे. तर चित्तविषयक असमतोल नक्की काय आहे? असे होण्याचे कारण, आपली आपल्या नातलग आणि मित्रांबाबतची आसक्ती आणि जेव्हा आपण आपले शत्रू किंवा नावडत्या लोकांना पाहतो, आपल्यात घृणा निर्माण होते. 

तर आपल्याला या खड्ड्यांनी भरलेल्या मार्गाला समतल कसे करता येईल? एका उदाहरणातून आपण ही गोष्ट समजून घेऊ शकतोः समजा एखाद्या माणसाने काल तुम्हाला १०० रुपये दिले आहेत आणि आणखी एका व्यक्तीने तुम्हाला आज १०० रुपये दिले आहेत. काल १०० रुपये दिलेल्या माणसाने तुमच्या थोबाडीत मारली आणि आज १०० रुपये दिलेल्या माणसाने काल तुमच्या थोबाडीत मारली होती, तर दोघांपैकी कोणती व्यक्ती तुम्हाला आवडेल आणि कोणती व्यक्ती आवडणार नाही? 

त्यामुळे आपल्याला समजून घ्यायला हवे की आपले शत्रू कशा प्रकारे आपल्या मदतीला आले आहेत आणि कदाचित भविष्यातही उपयोगी पडू शकतात. तसेच आपल्या मित्रांनी कसे आपल्याला नुकसान पोहचवले आहे आणि भविष्यातही नुकसान पोहचवू शकतात. हे सर्व कालसापेक्ष आहे. 

आणखी एक उदाहरण पाहूः अनेक लोक असतात, जे नरभक्षी किंवा पिशाच्च असतात. आपल्याला ते आकर्षक वाटू शकतात आणि कदाचित आपण त्यांच्यापैकी कुणाशी लग्नही करू, पण एखाद्या रात्री त्यांचे खुनशी दात बाहेर पडतील आणि आपण भक्ष्य होऊ. 

जेव्हा तुम्ही कुत्र्याला मारता, तो भुंकतो आणि तुम्हाला चावतो. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या शत्रूवर रागावतो, आपण त्या कुत्र्याप्रमाणेच व्यवहार करत असतो. आपल्याला मनाचा हा असमतोल संपवण्याची गरज असते. आसक्ती आणि तिटकाऱ्याची भावना संपवून समभाव विकसित करण्याची गरज असते. आणि त्या समभावाच्याही वरचढ, आपण प्रेम आणि करुणाभाव विकसित करू शकतो- जसे एखाद्या खड्डयांनी भरलेल्या रस्त्याला कार चालवण्यासाठी समतल करावे. 

आपले विचार तितकेच शक्तिशाली असायला हवेत, जसे डायनामाइट विस्फोट एखादा रस्ता समतल करतो. तर हे विचार कसे असावेत? आपण इतर जिवांचा करुणामयी विचार करावा. उदाहरणार्थ, आपण दूध पितो. ते गाय किंवा म्हशीपासून मिळते. त्या बाहेर जातात, गवत खातात, पाणी पितात आणि आपण फक्त त्यांचे दूध काढण्याचे काम करतो. वैद्यकीय प्रयोगांसाठी ससे आणि उंदरांचा वापर केला जातो, त्यामुळे आपल्याला जी औषधे मिळतात, ती त्यासाठी बलिदान दिलेल्या ससे आणि उंदरांमुळे मिळतात.  

काही असे सचेतन जीव असतात, जे आपल्याला नुकसान पोहचवतात आणि त्यांना आपण आपले शत्रू समजतो. पण आपण त्यांच्यामुळे झालेल्या नुकसानीचा विचार करताना त्यांच्या करुणेच्या दृष्टीने विचार केला तर त्यांची करुणा त्यांच्याद्वारे पोहचवण्यात आलेल्या हानीच्या तुलनेत अधिक असेल. आणि त्यांच्यामुळे झालेली हानीही आपल्यासाठी उपयुक्त असू शकते. बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी, आपल्याला संयम विकसित करण्याची आवश्यकता असते आणि त्यासाठी आपल्या भोवती अप्रिय व्यक्तींचा वावर असायला हवा. जर प्रत्येक जण चांगलाच असेल, तर आपण संयम विकसित करू शकणार नाही. जे आपल्यावर क्रोधित होतात, ते सीमित क्षमता असणारे जीव असतात, बुद्ध नसतात; त्यामुळे हे तेच लोक असतात, जे आपल्याला संयम शिकवतात. उदाहरणारथ, अतिशा जेव्हा भारतात आले, तेव्हा त्यांनी आपल्यासोबत एका बोलभांड भारतीय माणसाला घेऊन आले, जो सतत त्यांच्या संयमाची परीक्षा पाहत असायचा. त्यांना जेव्हा विचारण्यात आले की त्यांनी त्याला का सोबत आणले, तर आतिशांनी सांगितले की संयमाची साधना करण्यासाठी त्यांनी त्याला सोबत आणले. त्यामुळे सीमित क्षमता असलेले लोक आणि बुद्ध आपल्याप्रति समान करुणामय असतात. शान्तिदेव यांच्या बोधिचर्यावतार, बोधिसत्व आचरणाचे अनुशीलन ग्रंथात याला पुष्टी देण्यात आली आहे. 

बुद्धजन क्रोधित होत नाहीत, यामागे कारण आहे. कारण बुद्धत्व प्राप्त झालेल्या व्यक्तीमध्ये एकचित्त एकाग्रता असते आणि समस्य प्रकारच्या तणावदायी भावनांपासून तो मुक्त असतो. आपल्या एकचित्त एकाग्रतेमुळे बुद्धजनांना क्रोध येत नाही. त्यामुळे आपल्याला अशी एकाग्रती विकसित करायला हवी. सकाळी आपण या दोन विचारांसह जागे व्हायला हवेः

 • आज मी इतरांना क्रोधित करेल, असे कोणतेही काम करणार नाही
 •  मी इतरांना रागवण्याची संधी देणार नाही. 

जर आपण स्वतःला असे वागण्यासाठी तयार करू शकलो, तर आपण आपल्या तणावदायी भावना कमी करू शकू. आणि कालांतराने तणावदायी भावनांपासून कायमचे मुक्त होऊन बुद्धत्व प्राप्त करू शकू. 

जर असा प्रश्न उपस्थित झाला की बुद्धजन कोणत्या गोष्टीने प्रसन्न होतील, तर त्याचे उत्तर सीमित क्षमतांच्या जिवांबाबत दयाभाव आणि मदतभाव बाळगणे हे असेल. बुद्धजन खरोखरच अशा गोष्टींमुळे प्रसन्न होतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या पालकांसोबत त्यांची मुले असतील, तर फक्त पालकांशी प्रेमाने वागून आपण त्यांना तितके आनंदी करू शकत नाही, जेवढे ते मुलांशी प्रेमाने वागल्याने आनंदी होतील. तशाच रीतीने बुद्धजनांसोबतच इतरांशीही प्रेमाने वागल्याने बुदधजन आनंदी होतात. त्यामुळे या आधारावर आपण बोधिचित्ताचे उद्दिष्ट विकसित करायला हवेः ‘मी सर्व सीमित क्षमतांच्या जिवांच्या कल्याणासाठी बुद्धत्व प्राप्त करणार आहे.’

या जीवनात ज्ञानप्राप्ती साध्य करणे 

या जन्मात, अगदी याच क्षणी सर्व सचेतन जिवांच्या कल्याणासाठी बुद्धत्व प्राप्त करण्याची अधिकच तीव्र मनोकामना ठेवायला हवी. बुद्धाने सांगितले आहे की या जीवनात ज्ञानप्राप्ती साध्य करण्याचा मार्ग आहे. आणि तो मार्ग काय आहे? तांत्रिक मार्गाच्या माध्यमातून ते शक्य आहे. तो मार्ग अवलंबल्यास या जन्मातच ज्ञानप्राप्ती संभव आहे. 

भलेही वर्तमान जीवनात ज्ञानप्राप्ती मिळवण्याचा आपला इरादा पक्का असेल, पण आपण ते सहजसाध्य समजू नये कारण अनादी काळापासून आपली भरपूर विनाशकारी कर्मं साठलेली आहेत. तंत्र हा जलद मार्ग असेल, पण तो फार कठीण मार्ग आहे. आपण असा विचार करता कामा नये की तंत्र मार्ग हा विमान पकडण्यासारखा जलद मार्ग आहे. हे तेवढेही सोपे नाही. उदाहरणार्थ, जेट्सन मिलरेपांना आपल्या गुरुंसोबत मिनार उभे करण्यापासून मार खाण्यापर्यंत अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळेच ते त्यांच्या वर्तमान जीवनात ज्ञानप्राप्ती साध्य करू शकले. पण आपण मिलरेपा यांनी सहन केलेल्या त्रासाचा एखादा अंशही सहन करण्यास तयार नाही. 

जर आपल्याला ज्ञानप्राप्तीची प्रबळ मनोकामना असेल आणि आपल्यात मोठ्यातले मोठे संकट पेलण्याची तयारी असेल, तर संयत साधनेच्या माध्यमातून आपण बुद्धत्व प्राप्त करण्याची शक्यता आहे. 

सारांश

एका अनमोल मानवी देहाचा जन्म लाभल्याने, आपण त्याचा उपयोग धर्म साधनेसाठी आणि चांगला पुनर्जन्म, मुक्ती आणि ज्ञानप्राप्तीसाठी करू शकतो. त्यासाठी आपल्याला श्रेणीबद्ध मार्ग अवलंबायला हवा. त्यासाठी दहा विनाशकारी कृत्यांपासून स्वतःचा बचाव करायला हवा, तणावदायी भावनांपासून स्वतःला मुक्त करायला हवे, संसारापासून मुक्ती व बोधिचित्ताच्या उद्दिष्टाप्रति दृढ विश्वास बाळगायला हवा, एकचित्त एकाग्रता आणि शून्यतेसंबंधी निर्वैचारिक बोध प्राप्त करायला हवा. 

Top