संयमासंबंधी पारमिता: क्षांतिपारमिता

“संयम एक सद्गुण आहे,” अशी म्हण आहे. तर मग, आपण हसत हसत सर्व काही सहन करायला हवं का? बौद्ध धर्मात संयम ही एक प्रभावी साधना आहे, ज्याचा संबंध केवळ सर्व काही सहन करण्याची नाही. ती एक सक्रिय चित्तसाधना आहे, ज्यात आपण तणावदायी भावनांची शिकार होणार नाही, याबाबत ठाम असतो. संयम आपल्यासोबत इतरांचे भले करण्यासाठीचे सामर्थ्य बहाल करतो. तो आपल्याला ज्ञानप्राप्ती आणि मुक्तीच्या दिशेने नेणारा घटक आहे.

प्रस्तावना 

सहा व्यापक दृष्टिकोनांपैकी अर्थात पारमितांपैकी संयम ही तिसरी पारमिता आहे. ज्यात आपण क्रोधित होत नाही, तर विविध समस्या आणि कठीण परिस्थिती हाताळण्यास सक्षम होतो. कदाचित आपण इतरांकडून सर्व प्रकारच्या हानिकारक परिस्थितीतही अडकू, पण आपण त्या परिस्थितीमुळे चिंतीत होत नाही. याचा अर्थ आपल्याला नुकसान पोहचवणारे शत्रू शिल्लकच राहणार नाहीत, असा नाही. याचा अर्थ आपण क्रोधित, त्रस्त, निराश होत नाही आणि इतरांना मदत न करण्याची भूमिकाही बाळगत नाही. जर आपण सतत आपल्या रागावरचे नियंत्रण हरवत बसलो तर आपण इतरांची मदत कशी करू शकू? या दृष्टिकोनात तीन प्रकारच्या संयमांचा समावेश आहेः  

हानी पोहचवणाऱ्यांविषयी निराश न होणे 

पहिल्या प्रकारचा संयम हा हानी पोहचवणाऱ्याविषयी क्रोधित किंवा निराश न होण्याशी संबंधित आहे. केवळ आपल्यासोबत नकारात्मक व्यवहार करणाऱ्यांविषयीच नाही, तर जे शारीरिक आणि मानसिक स्तरावरही आपल्यासोबत वाईट वागतात. यात आपले आभार न मानणाऱ्या किंवा आपलं कौतुक नसणाऱ्या लोकांचाही समावेश होतो. विशेषतः आपण जर इतरांची मदत करत असू आणि ते आपला सल्ला ऐकत नसतील किंवा आपल्या सल्ल्याचा उपयोग होत नसेल, तर क्रोधित होता कामा नये. शिवाय असे अनेक लोक असतात, ज्यांना मदत करणे फारच कठीण असते, तेव्हा आपला संयम गमावता कामा नये. त्यांची मदत करताना येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याचा आपण स्वीकार करायला हवा. 

जर आपण शिक्षक असू, तर आपण विद्यार्थ्यांशी वागताना आपला संयम गमावता कामा नये. मग एखादा विद्यार्थी भलेही कितीही मंद किंवा मठ्ठ असला तरी. आपण धर्मविषयक शिकवण देत असू किंवा अन्य कोणती शिकवण असो, आपल्या संयम न गमावता हताश न होता शिकवत राहणे, सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. हे लहान बाळाला शिकवल्याप्रमाणे असतेः आपल्याकडे कौशल्यपूर्णता असायला हवी, आपण लहान बाळाकडून मोठ्यांसारख्या आकलनाची अपेक्षा करता कामा नये. 

दुःख सहन करणे 

संयमाचा दुसरा प्रकार म्हणजे स्वतःच्या दुःखाचा स्वीकार करून ते सहन करणे, ज्या विषयी शांतिदेवांनी अनेकदा चर्चा केली आहे. ते म्हणतात, जर आपली समस्या सोडवण्यासारखी असेल, तर त्याबाबत क्रोधित, उदास किंवा चिंतीत होण्याचा मुद्दाचा येत नाही. फक्त ती समस्या सोडवण्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते करावे. पण या परिस्थितीवर उपायच नसेल, तर क्रोधित कशासाठी व्हायचे? त्याने काहीच फायदा होणार नाही. जर हवेत गारठा असेल आणि आपल्याकडे उबदार कपडे असतील, तर तक्रारच कशाला करायची आणि आपण जर कपड्याचे ज्यादा थर अंगावर चढवू शकत असू, तर थंडी पडली आहे म्हणून क्रोधित तरी कशाला व्हायचे? जर आपल्याकडे उबदार कपडे नसले तरी क्रोधित होण्याचे किंवा हताश होण्याने आपल्याला उबदार वाटणार नाहीच. 

आपल्या दुःखांकडेही आपण आपले नकारात्मक अडथळे संपत असल्याच्या दृष्टिकोनातून पाहू शकतो आणि या भावनेने आनंदी होऊ शकतो की आपले नकारात्मक कर्म आत्ताच फळाला येत आहे, ते एका अर्थाने चांगलेच आहे, ते भविष्यात फळाला आले असते तर आणखी वाईट झाले असते. एका अर्थाने आपण स्वस्तात निसटलो. असे समजू की आपला पाय टेबलला आपटला आणि त्याला दुखापत झाली – तर ते चांगलेच आहे, कारण सुदैवाने आपला पाय मोडला नाही. अशा प्रकारची विचारपद्धती आपल्याला क्रोधापासून दूर ठेवते. आणि असेही शेवटी पायाला दुखापत झाली म्हणून दंगा करत उड्या मारण्याने काही आपल्याला कणभरही बरे वाटणार नसते. अगदी आपली आई येऊन आपल्याला कुरवाळू लागली, तरी तेवढ्याने आपल्याला बरे वाटणार नाही.  

इथे आणखी एक गोष्ट लागू होते, ती म्हणजे जेव्हा आपण एखाद्या अत्यंत सकारात्मक आणि रचनात्मक कामासाठी प्रयत्नशील असतो, जसे एखाद्या दीर्घ एकांतवासाचा शुभारंभ, दुसऱ्याची मदत करण्यासाठी दीर्घ यात्रेवर जाणे किंवा एखाद्या धार्मिक प्रकल्पावर काम करणे. जर त्या कामात प्रारंभी प्रचंड अडथळे आणि अडचणी असतील, तर वास्तवात ही फार उपयुक्त गोष्ट आहे. याचा अर्थ असा होईल की सर्व अडथळ्यांपासून सुरुवातीलाच सुटका होईल आणि पुढील प्रवास सुखकर होईल. आपण आनंदी असायला हवे की त्यातून भविष्यात मोठे प्रश्न निर्माण होण्याऐवजी ते याच क्षणी घडून जात आहे. 

शांतिदेवांनी सांगितले आहे की दुःख आणि समस्यांची काही चांगली लक्षणेही असतात. याचा अर्थ असा नाही की आपण बाहेर जाऊन सक्रियपणे आपल्याला त्रासदायक ठरणाऱ्या समस्या शोधाव्या, तर जेव्हा आपण दुःख भोगत असतो, तेव्हा त्यातही काही चांगल्या गोष्टी लपलेल्या असतात, ज्याचे मूल्य आपण समजून घ्यायला हवे. दुःख आपला अहंकार कमी करते आणि आपल्याला विनम्र बनवते. ते आपल्याप्रमाणेच दुःख भोगणाऱ्या लोकांप्रति करुणाभाव जागृत करते. आपल्याला वृद्धत्व येते, तेव्हा आपण वृद्धत्वाच्या समस्या समजू शकतो, सहसा आपल्याला वयाच्या सोळाव्या वर्षी वृद्धांप्रति करुणाभाव नसतो कारण आपल्यासाठी ७० वर्षांचे होण्याचा नक्की काय अर्थ आहे, हे समजून घेणे कठीण असते. पण जेव्हा आपण वृद्धत्वाकडे झुकतो आणि त्या सर्वाचा अनुभव घेतो, तेव्हा आपल्यात वृद्ध लोकांबद्दल अपार करुणा आणि संवेदना जागृत होते. 

याशिवाय आपल्याला वर्तनासंबंधीच्या कार्यकारणभावाचे – कर्म – आकलन असल्यास, जेव्हा आपण दुःख भोगत असतो, तेव्हा ती समज आपल्याला विनाशकारी वर्तनापासून दूर ठेवते. का? कारण, नकारात्मक कृत्यच दु-खाचे कारण असते. त्यामुळे ती समज आपल्याला सक्षम सकारात्मक कृतींसाठी प्रोत्साहन देईल, जी सुखाची कारणे असतात. 

धर्मसाधनेसाठी कष्ट सहन करणे 

तिसऱ्या प्रकारचा संयम हा धर्माभ्यास आणि साधनेदरम्यान येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासंदर्भातील आहे. ज्ञानप्राप्तीसाठी अत्यंत परिश्रम आणि प्रयत्नांची गरज असते. आणि आपण निराश होऊ नये यासाठी आपला दृष्टिकोन वास्तववादी असणे आवश्यक आहेः आपण स्वतःविषयीही संयमी विचार करायला हवा. 

संसाराचे स्वरूप हे चढउताराचे आहे, हे समजणे आणि स्वीकारणे आवश्यक आहे. तेही केवळ उच्चतम किंवा निचतम पुनर्जन्माबाबत नाही, तर सर्वसाधारणतः सदासर्वकाळ ते तसे आहे. कधीतरी आपल्याला साधना करावी वाटेल, तर कधीकधी करावी वाटणार नाही. एखाद्या वेळी आपली साधना फलद्रुप होईल, तर एखाद्या वेळी होणार नाही. आपण याहून वेगळी काय अपेक्षा ठेवू शकतो? शेवटी हा संसार आहे. दिवसेंदिवस स्थिती सुधारत जाणार नाही, त्यामुळे आपण संयम बाळगायला हवा. एखादा दिवस आपल्या नियोजनाप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत, तर लगेच निराश होऊ नये. आपण रागावर नियंत्रण मिळवले आहे आणि आपण पुन्हा क्रोधित होणार नाही, असे आपल्याला वाटत असले तरी अचानक एखादा दिवस असे काहीतरी घडते की आपण आपल्या रागावरचे नियंत्रण हरवून बसतो. तर, असे होते. आपण जोपर्यंत पूर्णतः मुक्त जीव असलेले अर्हत होत नाही, तोपर्यंत आपण आपल्या रागावर पूर्ण नियंत्रण मिळवू शकत नाही. त्यामुळे संयम हीच गुरुकिल्ली आहे. 

संयम विकसित करण्याविषयीची शांतिदेव यांची मते 

बोधिसत्वचर्यावतार  ग्रंथात शांतिदेव यांनी संयम विकसित करण्याचे विविध मार्ग सांगितले आहेत. त्यातील काही उदाहरणे पाहूः 

जर आपला हात आगीत किंवा स्टोव्हमुळे भाजला तर आपण आगीवर ती उष्ण का आहे, म्हणून क्रोधित होऊ शकत नाही. ते अग्नीचे स्वरूप आहे. तसेच आपण संसाराकडून काय अपेक्षा ठेवू शकतो? अर्थातच लोक आपली साथ सोडून जातील, आपल्याला हानी पोहचवतील आणि गोष्टी आणखी कठीण होऊन बसतील. जर आपण एखाद्या व्यक्तीकडून एखादी गोष्ट करण्याची अपेक्षा ठेवत असू, तर आपण त्याने ती चुकीच्या पद्धतीने करावी, अशी अपेक्षा ठेवावी. आणि मग जर त्याने ती गोष्ट आपल्याला हवी तशी केली नाही, तर दोष कुणाचा? त्या परिस्थितीत दोष आपलाच असेल कारण आपण स्वतः ती गोष्ट करण्याचा आळशीपणा केला आणि ती त्यांना करायला सांगितली. जर आपल्याला कोणावर रागवायचेच असेल तर आपण स्वतःच्या आळशीपणावर रागवायला हवे. 

“आपण संसाराकडून काय अपेक्षा करू शकतो” ही विविध प्रकारची संयम विकसित करण्याच्या दृष्टीने उपयुक्त उक्ती आहे. आपल्याला असे वाटते का, की जीवन नेहमी आणि कायमस्वरूपी सहजसोपे असेल आणि सगळ्या गोष्टी सुरळीतच होतील? आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण संसार आहे – आणि तो अनियंत्रित रूपाने वारंवार उत्पन्न होणाऱ्या समस्यांसारखाच आहे. त्यामुळे जेव्हा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत, किंवा लोक आपल्याला हानी पोहचवतात वा निराश करतात, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटता कामा नये. याहून वेगळे आपण काय अपेक्षित करू शकतो? हेच नमके कारण आहे की ज्यामुळे आपण त्यातून मुक्त होऊ इच्छितो. 

हे हिवाळा थंड आणि गडद का आहे, अशी तक्रार करण्यासारखे आहे. तर मग आपण हिवाळ्यात आणखी काय अपेक्षा करू शकतो – तो उबदार व छान असावा आणि आपल्याला सूर्यस्नान घेता यावे? जसे अग्नीचे स्वरूप उष्ण आहे आणि आपण आगीत हात घातला तर तो भाजणार हे नक्की आहे, तसेच हिवाळा थंड आणि गडदच असणार आहे. त्यामुळे क्रोधित होण्यात काहीच अर्थ नाही. 

शांतिदेव आणखी एक सल्ला देतात, तो म्हणजे इतर लोकांना वेडसर किंवा लहान बाळाप्रमाणे समजावे. जर वेडसर लोक नशेत आपल्यावर ओरडत असतील, आणि आपण त्याच्यावर उलट ओरडलो, तर आपणही तितकेच वेडसर ठरू, हो ना? जर आपण टेलीव्हिजन बंद करून आपल्या मुलांना झोपायला पाठवू लागलो आणि आपले दोन वर्षाचे मूल आपल्यावर ‘तुम्ही मला आवडत नाही’ असे ओरडले, तर आपण ते गांभीर्याने घेतो का आणि आपले दोन वर्षाचे मूल आपला तिरस्कार करते म्हणून निराश किंवा क्रोधित होतो का? अर्थातच नाही. कारण ते एक लहान मूल आहे. तशाच रीतीने जर वाईट वागणाऱ्या लोकांकडे वेडसर किंवा हट्टी लहान मुलाप्रमाणे पाहिले तर आपण क्रोधित होऊ नये, यासाठी ते नक्कीच उपयुक्त ठरते. 

शिवाय, जर कुणी आपल्यासाठी समस्या निर्माण करत असेल, तर त्यांना आपल्या शिक्षकांप्रमाणे पाहणे फायदेशीर ठरू शकते. आपल्या सर्वांच्या जीवनात अशी एक व्यक्ती नक्की असते, ज्याचा आपल्याला प्रचंड राग येत असतो, हो ना? तर आपण जेव्हा अशा व्यक्तीसोबत असतो, तेव्हा आपण असा विचार करायला हवा की, ‘ही व्यक्ती मला संयम शिकवणारा शिक्षक आहे.’ खरेतर लोकांनी आपल्याला चीड आणली नाही किंवा समस्या निर्माण केल्या नाहीत, तर आपल्याला कधीच संयमाचा सराव करता येणार नाही. आपल्यापुढे कधीच आव्हान असणार नाही आणि त्यामुळे हे लोक फार दयाळू आहेत, जे आपल्याला आपला संयम आजमावण्याची संधी देतात. परमपूज्य दलाई लामा नेहमी सांगतात की चिनी नेते त्यांचे शिक्षक आहे आणि माओ झेदांग त्यांचे सर्वात मोठे संयम शिकवणारे शिक्षक होते. 

सारांश 

जोपर्यंत आपण संसाराच्या चक्रात अडकलेले आहोत, प्रत्येक दिवस आपल्याला समस्या आणि निराशेचा सामना करावा लागणार आहे. कधीतरी गोष्टी अगदी आपल्याला हव्या तशा घडतील आणि कधीतरी गोष्टी हाताबाहेर जातील. आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट बिघडण्याची शक्यता असते. आपण बनवलेला प्रत्येक मित्र आपला शत्रूही होऊ शकतो. आपण आपल्या प्रिय मित्राला कितीही मदत केली असली तरी ते आपल्या पाठीमागे आपल्याविषयी वाईट गोष्टी बोलू शकतात. 

अशा स्थितीत क्रोधित होणे स्वाभाविक आहे. परिणामी आपल्या शत्रूला संपवल्याने आपल्याला अपेक्षित असलेली शांती मिळेल, असे आपल्याला वाटू शकते. पण दुर्दैवाने आपण आपल्या शत्रूंचा आज, उद्या आणि त्यानंतरही नाश केला, तरी भविष्यात नवे शत्रू निर्माण होतातच. शांतिदेवा सल्ला देतात की संपूर्ण भूमंडल चामड्यात लपेटण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा फक्त स्वतःच्या पायावर चामडे घाला. निराळ्या शब्दात सांगायचे तर आपल्या सर्व बाह्य शत्रूंनी पराजित करण्यात काहीच अर्थ नाही, तर केवळ आपल्या आंतरिक शत्रूंनी नष्ट करण्याची आवश्यकता आहे. इथे चामडयाचा संदर्भ संयमाशी आहे. ते एक प्रवेशद्वार आहे, जे आपल्याला इतरांनी निर्माण केलेला त्रास, जो आपल्या मुक्तीच्या मार्गावर आड येत राहतो, तो सहन करण्याच्या दिशेने सक्षम करते.

Top