जीवनातील समस्या
आपल्यातील प्रत्येक जण अनुभवत असतो की आपल्या जीवनात विशिष्ट प्रकारच्या समस्या असतात. आपल्याला आनंदी व्हायचं असतं. आपल्याला समस्या नको असतात, पण तरीही आपल्याला सातत्याने अनेक संकटांचा सामना करावा लागतो. काही वेळा आपण निराश होतो; आपल्यापुढे समस्या निर्माण होतात आणि आपण काम करताना त्रासून जातो, आपली सामाजिक पत, जीवन पद्धती, कौटुंबिक स्थिती अशा सर्वच गोष्टींबाबत त्रासून जातो. आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी साध्य न होण्याच्या समस्या असतात. आपल्याला यशस्वी व्हायचं असत. आपल्याला आपल्या कुटुंबात आणि व्यवसायात चांगल्या गोष्टी घडायला हव्या असतात, पण नेहमी तसे होत नाही. त्यामुळे अशा समस्यांमुळे आपण दुःखी होतो. काही वेळा आपल्याला जे घडू नये असे वाटत असते, तेच घडते, जसे वय वाढत जाताना आजारपण, अशक्तपणा येणे किंवा ऐकायला कमी येणे, दृष्टी गमावणे. अर्थातच कोणालाच असे घडायला नको असते.
आपल्या समोर कामासंबंधीच्या समस्या असतात. कधीकधी गोष्टी बिघडत जातात आणि आपला व्यवसाय उतरणीला लागतो. असे घडू नये, असे आपल्याला निश्चितपणे वाटत असते, तरीही ते घडते. काही वेळा आपल्याला इजा होते, आपण स्वतःला नुकसान पोहचवतो. आपले अपघात होतात, आपण आजारी पडतो. आपण अनुभवत असलेल्या समस्यांच्या रूपात अशा गोष्टी घडत राहतात.
याशिवाय, आपण अनेक प्रकारच्या भावनिक आणि मानसिक समस्याही अनुभवत असतो. यात अशा गोष्टी असू शकतात, ज्यासंबंधी आपल्याला इतरांशी चर्चा करावी वाटणार नाही. पण आपल्या आत कुठेतरी, आपल्याला माहीत असते की अशा काही गोष्टी असतात, ज्या आपल्याला निराश करत असतात, जसे आपल्या मुलांसंबंधीच्या अपेक्षा, आपल्या चिंता, भय आपल्यापुढे अनेक समस्या निर्माण करत असतात. यालाच आपण ‘अनियंत्रितपणे उद्भवणाऱ्या समस्या वा स्थिती’ म्हणतो, अर्थात संस्कृतमधील ‘संसार’ होय.
अनियंत्रितपणे उद्भवणाऱ्या समस्या म्हणजेच संसार
माझी पार्श्वभूमी भाषांतरकाराची आहे, ज्याचे मी प्रशिक्षण घेतले आहे. आणि एक भाषांतरकार म्हणून मी जगभरातील अनेक देशांमध्ये प्रवास करत बौद्ध धर्माबाबतची भाषांतरे केली आहेत, व्याख्याने दिली आहेत. बौद्ध धर्माबाबत अनेक गैरसमज असल्याचे मी पाहिले आहे. बौद्ध धर्माबाबतचे बहुतांश गैरसमज हे मूळ संज्ञांसाठी वापरण्यात आलेल्या चुकीच्या इंग्रजी शब्दांमुळे निर्माण झालेले आहेत. यातील अनेक शब्द मागील शतकातील व्हिक्टोरियन मिशनरींनी प्रचलित केलेले आहेत आणि त्याचे मथितार्थ फार तीव्र आहेत, जिथे मूळ आशियाई शब्द आणि त्यांचे अर्थ तितके तीव्र नाहीत. उदाहरणार्थ, आपण समस्यांविषयी बोलत आहोत. ज्याचे सर्वसाधारण भाषांतर ‘सफरिंग’ अर्थात ‘दुःख’ असे केले जाते. आपण दुःखाच्या संदर्भातून विचार केल्यास, अनेक लोक बौद्ध धर्माला फार निराशावादी धर्म समजतात कारण हा धर्म सांगतो की प्रत्येकाचे जीवन दुःखाने भरलेले आहे. यातून जणू असे अभिप्रेत होते की आपल्याला आनंदी होण्याचा हक्कच नाही. आपण एखाद्या श्रीमंत समाधानी माणसाशी बोलत असू आणि आपण त्याला म्हणालो की, ‘तुझे जीवन दुःखाने भरलेले आहे.’ तर ती व्यक्ती बचावात्मक पवित्रा घेईल. ती प्रतिवाद करेल की, ‘तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डर आहे. चांगली कार आहे, चांगले कुटुंब आहे. मला कोणतेच दुःख नाही.’
‘दुःख’ शब्दाच्या संदर्भातून त्यांची प्रतिक्रिया योग्य आहे कारण ‘दुःख’ हा फार जड शब्द आहे. जर त्याजागी आपण त्या बौद्ध संकल्पनेचे भाषांतर ‘समस्या’ असे केले आणि नंतर आपण एखाद्या व्यक्तीला म्हणालो की ‘तुम्ही कुणीही असा, कितीही श्रीमंत असा, तुम्हाला कितीही मुलं असोत, प्रत्येकाला काही विशिष्ट समस्या असतातच ’ ही गोष्ट अशी आहे, जी प्रत्येक जण सहजतेने स्वीकार करायला तयार असतो. त्यामुळे, मी तिबेटी परंपरेतील या बौद्ध स्पष्टीकरणांसाठी नेहमीपेक्षा निराळ्या शब्दांचा वापर करेन.
अनियंत्रितपणे वारंवार उद्भवणाऱ्या समस्या म्हणजेच संसार होय. वरवर पाहता ‘संसार’ शब्दाचा संबंध अशा परिस्थितींशी आहे, ज्यावर आपले नियंत्रण नसते आणि ज्या वारंवार घडत राहतात- जसे, सतत निराशा अनुभवत राहणे किंवा चिंताग्रस्त असणे. या स्थिती उत्पन्न करणारी यथार्थ कारणे कोणती आहेत? बुद्धाने सांगितले आहे की इथे आपण सामना करत असलेल्या फक्त यथार्थ समस्याच नसतात, तर त्या समस्यांमागे यथार्थ कारणेही असतात आणि त्यांचे निवारण करणेही शक्य असते. यथार्थ निवारण साध्य करण्यासाठी, समस्या थांबवण्याच्या मार्ग, अर्थात यथार्थ मार्गाचे अनुसरण आवश्यक असते, ज्याचा संबंध कारणांना समाप्त करणारा बोध अर्थात यथार्थ चित्तमार्ग विकसित करण्याशी आहे. एकदा आपण कारणांपासून मुक्ती मिळवली की आपण समस्यांपासून मुक्ती मिळवतो.
समस्यांचे मूळः एखाद्या मूर्त ओळखीची हाव
आपण जीवनात अनियंत्रितपणे वारंवार अनुभवत असलेल्या समस्यांचे यथार्थ कारण म्हणजे आपल्याला वास्तवाची जाणीव नसते. आपण नक्की कोण आहोत, इतर लोक कोण आहेत, जीवनाचा अर्थ काय, जगात नक्की काय चाललं आहे, याबाबत आपण अनभिज्ञ असतो. मी ‘अज्ञानी’ ऐवजी ‘अनभिज्ञ’ शब्द वापरतो. ‘अज्ञानी’ शब्दातून तुम्ही मूर्ख आहात आणि तुम्हाला काही समजत नाही, असे कुणीतरी म्हणत असल्यासारखे वाटते. त्यापेक्षा आपण निव्वळ अनभिज्ञ आहोत. आणि आपण अनभिज्ञ असल्यामुळे आपण मानसिक पातळीवर असुरक्षितता अनुभवतो. या असुरक्षिततेच्या भावनेमुळे आपल्याला एखाद्या मूर्त ओळखीची हाव असते, एखाद्या विशिष्ट पद्धतीचा ‘मी’: ‘मी कोण आहे ते मला माहीत नाही आणि मी कशा रीतीने अस्तित्वात आहे, तेही मला माहीत नाही. त्यामुळेच मी स्वतःच्या एखाद्या कदाचित खऱ्या असू शकणाऱ्या किंवा कल्पित प्रतिमेची हाव बाळगतो आणि म्हणतो की, हा मी आहे. हा वास्तवातील मी आहे.’
उदाहरणार्थ, आपण आपली पिता असण्याची ओळख धरून बसू शकतोः ‘हा मी आहे, मी पिता आहे, माझ्या कुटुंबाने माझा आदर करायला हवा. माझ्या मुलांमध्ये माझ्याप्रति आदर आणि आज्ञाधारकपणा असायला हवा.’ जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे आपण एका पित्याच्या नजरेने पाहू लागलो, तर अर्थातच त्यातून आपल्यासाठी काही समस्या उत्पन्न होऊ शकतात. कारण आपल्या मुलांनी आपला आदर राखला नाही, तर त्यातून समस्या निर्माण होऊ शकते. आपण कार्यालयात असू, तर तिथे लोक आपल्याला पितृतुल्य समजणार नाहीत. त्यातूनही निराशा येऊ शकते. शिवाय अशा स्थितीतही काय होईल, जेव्हा मी माझ्या कुटुंबात एका प्रशासकाच्या भूमिकेत असेन, पण कार्यालयात गेल्यावर तिथले लोक मला कमी लेखत असतील, मला दुय्यम समजत असतील आणि मला इतरांना आदर द्यावा लागेल? जर आपण आपल्या वडील असण्याच्या प्रतिमेला चिकटून राहिलो, ज्याच्याप्रति कुटुंबाला आदराची भावना जोपासावी लागत असेल, तर कार्यालयात जेव्हा लोक आपल्याला तसे सन्मानपूर्वक वागवणार नाहीत तेव्हा आपण फार दुःखी होऊ शकतो.
आपली एका यशस्वी उद्योजकाची प्रतिमा असू शकतेः ‘मी एक यशस्वी उद्योजक आहे. हीच माझी ओळख आहे; मी असेच असायला हवे.’ पण आपला व्यवसाय उतरणीला लागला किंवा व्यवसाय रसातळाला गेला, तर आपण पूर्णतः विस्कटून जातो. अशा स्थितीत काही लोक आत्महत्याही करू शकतात. किंवा व्यवसाय उतरणीला लागल्याने अशीच काही भयानक पावले उचलू शकतात कारण ते उद्योजकाच्या प्रतिमेला घट्ट धरून राहिल्याने ते त्या ओळखीव्यतिरिक्त जीवनाची कल्पना करू शकत नाहीत.
किंवा आपण स्वतःला मर्दानी पुरुषाच्या रूपात पाहत असू शकतोः ‘हाच मी आहे, मी मर्द, देखणा, आकर्षक पुरुष आहे.’ पण एकदा का आपलं वय वाढू लागलं आणि आपली मर्दानगी कमी होऊ लागली, की आपण वेडे होऊ शकतो. जर काही लोकांसाठी तीच स्वतःची ओळख असेल तर ते पूर्णतः उध्वस्त होऊ शकतात. जीवनात सर्व परिवर्तनशील असतं आणि आपली ओळख चिरंतन नसते, हे पाहण्याची त्यांची मानसिकताच नसते.
आपल्याला आपण पारंपरिक व्यक्ती आहोत आणि प्रत्येक गोष्ट पारंपरिक मार्गाने व्हायला हवी, असेही वाटू शकते. पण जेव्हा सामाजिक परिवर्तन होते आणि ज्या परंपरांवर आपली ओळख अवलंबून असते, त्या परंपरा युवा पिढी पाळत नाही, तेव्हा आपण फार क्रोधित, निराश होऊ शकतो, दुखावले जाऊ शकतो. आपण खरोखरच कल्पना करू शकत नाही की आपण अशा जगात कसे जगू शकतो, ज्यात पारंपरिक चिनी विधी आणि ज्या पारंपरिक मार्गाने आपल्याला वाढवले गेले आहे, त्यांचे पालन केले जात नाही.
तर दुसरीकडे, एक तरुण व्यक्ती म्हणून आपण आपली ओळख आधुनिक व्यक्तीच्या रूपात पाहू शकतोः ‘मी एक आधुनिक माणूस आहे; मला या पारंपरिक मूल्यांची गरज नाही.’ जर आपण या ओळखीशी फार तीव्रपणे चिकटून बसलो आणि आपले पालक आपण पारंपरिक मूल्ये जोपासावी व त्यांच्याशी पारंपरिक मार्गाने वागावे, असा हट्ट धरून बसले, तर पुन्हा एक आधुनिक व्यक्ती म्हणून आपण त्याचा तीव्र विरोध करू शकतो, आपल्याला फार क्रोध येऊ शकतो. आपण कदाचित उघडपणे ते व्यक्त करणार नाही, पण आपल्याला आतून असे वाटू शकते की आपण एक आधुनिक व्यक्ती असल्याने चायनीज नव वर्षाच्या दिवशी आपल्याला पालकांना भेटायचा सोपस्कार करण्याची आवश्यकता नाही, आपल्याला अशा पारंपरिक गोष्टी करण्याची आवश्यकता नाही आणि त्यातून पुन्हा मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.
आपण आपल्या व्यवसायाशी संबंधित ओळखीशीही जोडलेले असू शकतो. आणि जेव्हा आपला व्यवसाय बंद पडतो, तेव्हा आपण विचार करू शकतो की आपल्याला केवळ हाच व्यवसाय करायचा आहे, आपला दृष्टिकोन लवचिक असत नाही. आपण जो व्यवसाय पूर्वी करत होतो, तो परत करू शकलो नाही तर आपल्याला आपले जग उध्वस्त झाल्यासारखे वाटते. आपण असा विचार करत नाही, की दुसऱ्या एखाद्या व्यवसायात प्रवेश करणेही शक्य आहे आणि आपल्याला कायमस्वरूपी एकच व्यवसाय करत राहण्याची गरज नाही.
स्वतःला सुरक्षित वाटावे, यासाठी आपण अशा वेगवेगळ्या ओळखींशी स्वतःला जोडून घेते. आपण कोण आहोत, आपण कोणत्या प्रकारचे नियम पाळतो, आपल्याला जीवनात काय हवे आहे याबाबत आपण काही कल्पना बाळगतो. हे कायमस्वरूपी आहे, पक्के-मजबूत आहे आणि हाच खरा मी आहे, अशा विचारांकडे झुकतो. यानंतर काय घडते, तर या स्वतःविषयीच्या संकल्पनांमुळे, स्वप्रतिमेमुळे, आपल्यात त्या ओळखीच्या समर्थनार्थ सर्व प्रकारच्या तणावदायी भावना जन्मास येतात. याला आपल्या ओळखीबाबतची असुरक्षिततेची भावना कारणीभूत असते, त्यामुळे आपल्याला आपण स्वतःची ओळख सिद्ध करावी, असे वाटत असते.
उदाहरणार्थ, जर आपल्याला वाटत असेल की ‘मी या कुटुंबातील पिता आहे.’ तर अशा परिस्थितीत आपल्याला आपण त्या कुटुंबातील पिता आहोत, एवढीच भावना पुरेशी नसते, आपल्याला आपलं प्रभुत्व सिद्ध करणंही आवश्यक असतं. आपल्याला कुटुंबावर आपली सत्ता स्थापित करायची असते आणि याची खातरजमा करायची असते की कुटुंबातील प्रत्येक जण आपल्यासमोर झुकतो. कारण आपल्याला प्रत्येकाला सिद्ध करायचे असते की आपण कुटुंबाचा पिता आहोत. केवळ आपल्याला त्याची जाणीव असण्यापुरते ते पुरेसे होत नाहीत. जर आपल्याला ही ओळख धोक्यात असल्यासारखे वाटल्यास आपण बचावात्मक पवित्रा घेऊ शकतो, किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण फार आक्रमकही होऊ शकतो. ‘मी स्वतःला सिद्ध करायला हवे. मला मी अजूनही मर्द आणि आकर्षक असल्याचे सिद्ध करायला हवे.’ आणि म्हणून आपण दुसरे लग्न करतो किंवा आपण कोण आहोत, ते सिद्ध करण्यासाठी, आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी एखाद्या तरुण मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवतो.
आपल्या मनात उत्पन्न होणारा आवेग कर्माची अभिव्यक्ती असतो
जेव्हा आपले मन विविध प्रकारच्या तणावदायी भावनांनी व्यापलेले असते, तेव्हा मनात विविध प्रकारचे आवेग निर्माण होतात. कर्माचा संबंध याच आवेगांशी असतो. ‘कर्म’ म्हणजे नियती किंवा नशीब नव्हे. दुर्दैवाने, अनेक लोक लोकांना तसे वाटते. जर एखाद्याचा व्यवसाय उतरणीला लागला किंवा एखाद्याच्या कारला अपघात झाला, तर आपण असू म्हणू शकतो, ‘अरे, दुर्दैव, त्याचे कर्मच ते.’ हे असेच म्हणण्यासारखे आहे की ‘ही देवाचीच इच्छा.’
कर्माविषयी बोलताना आपण इथे देवेच्छेविषयी किंवा नियतीविषयी बोलत नाही. इथे आपण विविध प्रकारच्या आवेगांविषयी बोलत आहोत, ज्या आपल्याला कृती करण्यास प्रवृत्त करतात. उदाहरणार्थ, आपल्या व्यवसायासंबंधी एखादा निर्णय घेण्यासंबंधीचा आपला मानसिक आवेग, जो निर्णय व्यवसायासाठी वाईट ठरू शकतो. किंवा आपल्या मुलांनी आपला आदर राखायला हवा, अशी मागणी करायला लावणारा आवेग. किंवा आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या मताप्रमाणेच काम करावे आणि स्वतःच्या मनाप्रमाणे वागू नये, म्हणून त्यांच्यावर ओरडण्याचा आवेग. आणखी एक मानसिक आवेग असाही असू शकतो की भावनाशून्य चेहऱ्याने टीव्ही लावणे आणि दुसऱ्यांचे ऐकूनही न घेणे. अशा पद्धतीचे आवेग, कर्मं आपल्या मनात येतात, आपण त्यांच्या प्रभावाखाली बंधनकारक व्यवहार करतो आणि त्यातून अनियंत्रितपणे पुन्हा पुन्हा उत्पन्न होणाऱ्या समस्या निर्माण होतात. हीच ती पद्धत आहे.
कामाच्या ठिकाणचे आपले स्थान किंवा आपल्या कुटुंबातील समस्या यांबद्दल आपण सतत चिंताग्रस्त किंवा भयभीत असण्याची शक्यता असते. “मी यशस्वी व्हायलाच हवं आणि यशस्वी होऊन माझ्या पालकांना व समाजाला संतुष्ट करायलाच हवं” अशा ठोस ओळखीच्या आधारावर आपण त्या ओळखीचा बचाव करू पाहतो, त्यासाठी चिंताग्रस्ततेची समस्या आहे हेदेखील नाकारतो. आपली मनं बंद होतं व हृदयं बंद होतात. आपल्या कुटुंबामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या अडचणी असतील, तरी त्या वरवरती राहतात आणि प्रत्येक जण चेहऱ्यावर आनंद दाखवतो. आतमध्ये मात्र सर्व चिंता व तणाव टिकून असतात, त्यांचा नंतर हिंसक प्रेरणांच्या रूपात स्फोट होण्याची शक्यता असते. बरेचदा आपल्या कुटुंबातल्या कोणाविरोधात किंवा कामाच्या ठिकाणी या मुद्द्याशी संबंधही नसलेल्या व्यक्तीविरोधात हा स्फोट होतो. यातून प्रचंड समस्या उद्भवतात.
या भिनन यंत्रणांमधून आपल्या अनियंत्रित समस्या निर्माण होत राहतात. हे आपल्या विविध भावना हाताळताना होत असल्याचं आपण पाहू शकतो आणि मग अर्थातच प्रश्न निर्माण होतो की, सर्व भावना त्रासदायक असतात का? सर्व भावना आपल्या समस्याच वाढवतात का?
रचनात्मक भावना
प्रेम, स्नेह, ममत्व, सहिष्णूता, संयम व दयाळूपणा यांसारख्या अतिशय सकारात्मक व रचनात्मक भावना आणि उत्कट ओढ, वैरभाव, संकुचितपणा, अभिमान, अहंकार, इत्यादींसारख्या नकारात्मक किंवा विध्वंसक भावना यांच्यात भेद करणं गरजेचं आहे. भावनांसाठी (इंग्रजीतील ‘इमोशन’) पाली, संस्कृत व तिबेटी भाषांमध्ये काहीच शब्द नाही. आपण सकारात्मक व नकारात्मक भावनांबद्दल बोलू शकतो, पण इंग्रजीत (‘इमोशन’ हा शब्द) आहे तसा एकंदर अर्थ सामावून घेणारा शब्द त्या भाषांमध्ये नाही.
आपल्याला अस्वस्थ करणाऱ्या विशिष्ट भावनांविषयी किंवा मनोवृत्तींविषयी आपण बोलतो, तेव्हा त्या अस्वस्थकारक भावना किंवा अस्वस्थकारक मनोवृत्ती असतात. उदाहरणार्थ, आपल्याला अतिशय अस्वस्थ करणाऱ्या एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला अतीव ओढ वाटू शकते. आपल्याला आदर मिळावा किंवा आपल्याला प्रेम मिळावं, आपल्याकडे इतरांनी आकर्षित व्हावं, आपल्याला पसंती द्यावी यासाठी आपण अत्यंत चिंताग्रस्त असण्याची शक्यता असते. आपण मूल्यवान आहोत, सुरक्षित आहोत, या भावनेसाठी आपल्याला ही चिंता वाटत राहते. उत्कट इच्छेच्या अस्वस्थकारक भावनेच्या संदर्भात या सर्व अडचणी येतात. आपण वैरभावी अवस्थेत असतो तेव्हा आपल्याला अतिशय अस्वस्थ वाटतं; किंवा आपण मनाची कवाडं बंद केली असतील, तर ती भावनाही अस्वस्थकारक असते. या सर्व मनोवृत्ती संकटकारक आहेत. त्यामुळे, आपण नकारात्मक भावना आणि सकारात्मक भावना- उदाहरणार्थ, प्रेम- यांच्यात भेद करायला हवा.
इतरांना सुख मिळावं व सुखाची कारणं मिळावीत अशी इच्छा करणारी सकारात्मक भावना म्हणजे प्रेम, असे बौद्ध परंपरेमध्ये मानतात. आपण सर्व समान आहोत आणि प्रत्येकाला सुखी व्हायची समान इच्छा असते, आणि कोणालाच कोणत्याच समस्या नको असतात, प्रत्येकाला सुखी होण्याचा समान अधिकार आहे, या तार्किकतेवर ही व्याख्या आधारलेली आहे. स्वतःइतकीच इतरांची काळजी करणं व स्वतःइतकंच इतरांना बहुमोल मानणं, याला प्रेम म्हणतात. इतरांनी सुखी व्हावं यासाठीही ही आस्था आहे आणि ते काय करतात यांवर ही आस्था आधारलेली नाही. हे आईच्या प्रेमासारखं असतं- बाळाने आईच्या कपड्यांवर शी केली किंवा उलटी केली, तरीही आईला बाळ आवडतच राहतं. बाळाने सुखी राहावं, हीच आईची आस्था व इच्छा असते. याउलट, आपण ज्याला सर्वसाधारणतः प्रेम म्हणतो ती अवलंबित्वाची किंवा गरजेची अभिव्यक्ती असते. “माझं तुझ्यावर प्रेम आहे” याचा अर्थ “मला तुझी गरज आहे, मला कधीही सोडून जाऊ नको, मी तुझ्याविना जगू शकत नाही, तू हे कर किंवा ते कर, चांगली पत्नी हो किंवा चांगला पती हो, व्हॅलेन्टाइन दिनाला मला कायम फुलं दे आणि मला संतोष वाटेल असंच काहीतरी कर. तसं केलं नाही, तर मला तुझा तिरस्कार वाटेल, कारण मला हवं तसं तू वागला/वागली नाहीस, मला गरज होती तेव्हा तू आला/आली नाहीस.”
अशा प्रकारची मनोवृत्ती ही अस्वस्थकारक भावना असते, आणि बौद्धविचारातील प्रेमाची संकल्पना याच्याशी जुळत नाही. कोणी आपल्याला फुलं दिली किंवा नाही दिली, आपलं ऐकलं किंवा नाही ऐकलं, आपल्याशी दयाळूपणे वागलं किंवा भयंकर वागलं आणि आपल्याला नाकारलं तरीही आपल्याला त्या व्यक्तीबद्दल वाटते ती आस्था म्हणजे प्रेम. त्या व्यक्तीने सुखी व्हावं, यासाठीची ही आस्था असते. आपण प्रेम व तत्सम भावनांबद्दल बोलतो, तेव्हा त्यात सकारात्मकताही असू शकते किंवा अस्वस्थकारक प्रकारही असू शकतो.
संताप ही कायमच अस्वस्थकारक भावना असते
आता आपण संतापाबद्दल बोलू. संतापाबाबत काय होतं? संताप कायमच अस्वस्थकारक असतो. संताप आल्याने कोणालाही आनंद होत नाही. संताप आल्याने आपल्याला बरं वाटतं, असंही नाही. त्याने आपल्या जेवण अधिक रुचकर होत नाही. आपण संतापलेले असतो व नाराज असतो, तेव्हा आपल्याला स्वस्थ वाटत नाही आणि झोप येत नाही. आपण गदारोळ केला नाही, किंचाळलो नाही व ओरडलो नाही, तरी आपल्या कार्यालयात व आपल्या कुटुंबामध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल आपण आतून अतिशय संतापलेले असलो, तर त्यातून आपली पचनप्रक्रिया बिघडते किंवा अल्सर होतो, किंवा आपल्याला रात्री झोपही लागत नाही. संताप रोखून धरला, तर त्यामुळे आपल्याला अनेक अडचणी अनुभवाव्या लागण्याची शक्यता असते, आणि आपण संताप व्यक्त केला व अतिशय वैरभावी मुद्रा केली तर अगदी कुत्रे-मांजरंही आपल्या आसपास फिरकत नाहीत. ती हळूहळू दूर जातात, कारण आपल्या संतापामुळे आपली उपस्थिती त्यांना अस्वस्थ करते.
संतापाने कोणाचाही खरोखरचा लाभ होत नाही. आपला संताप खूप तीव्र झाला किंवा आपण त्रस्त झालेलो असलो तर आपल्याला कसंही करून संताप बाहेर काढायचा असतो आणि आपला स्फोट होतो, आपण कोणाला तरी शिव्या घालतो किंवा कोणाचे वाईट व्हावे अशी प्रार्थना करतो, तर त्याने आपल्याला बरं वाटतं का? दुसरं कोणी दुखावलं व नाराज झालं, तर आपल्याला बरं वाटतं का? खूप संताप आल्यावर भिंतीवर ठोसा लगावावा असं आपल्याला वाटतं, अशा वेळी भिंतीवर खरोखर ठोसा लगावल्यावर आपल्याला चांगलं वाटतं का? नाही, अर्थातच नाही, असं केल्याने दुखतं. तर, संताप काही आपल्याला उपकारक ठरत नाही. आपण वाहतुकीत अडकलो असलो आणि आपण खूप संतापलो, तर आपण हॉर्न वाजवतो, ओरडतो आणि सगळ्यांना शिव्या घालतो, पण यातून काय होतं? आपल्याला बरं वाटतं का? याने कार अधिक वेगाने पुढे जातात का? नाही, आपण इतरांसमोर स्वतःची प्रतिष्ठा गमावून बसतो, कारण “हा कोण मूर्ख माणूस हॉर्न वाजवतोय?” असं इतर लोक म्हणतात. याने काही आपल्याला त्या परिस्थितीत मदतही होत नाही.
आपण संताप अनुभवणं गरजेचं असतं का?
संतापासारख्या अस्वस्थकारक भावना आणि कोणावर तरी किंचाळणं व ओरडणं असं त्या भावनेवर आधारित वर्तन, किंवा कोणालातरी आपल्यापासून वैरभावाने तोडून टाकणं किंवा नाकारणं, ही सर्व आपल्या समस्यांची कारणं असतील, तर त्याबद्दल आपण कायम त्रस्त असतो का? आपल्याला हे कायम अनुभवायला मिळतं का? नाही, तसं होत नाही, कारण अस्वस्थकारक भावना आपल्या मनाच्या स्वरूपाचा भाग नसतात. त्या तशा मनाचा भाग असत्या, तर आपली मनंही कायम अस्वस्थ राहिली असती. अतिशय गंभीर परिस्थितींमध्येही काही क्षण असे असतात जेव्हा आपण संतापाने अस्वस्थ होत नाही. उदाहरणार्थ, आपण झोपतो तेव्हा आपण संताप अनुभवत नसतो.
तर, संताप, वैरभाव व रोष यांसारख्या अस्वस्थकारक भावना अस्तित्वात नसणारे विशिष्ट क्षणही असणं शक्य आहे. या विध्वंसक भावना कायमस्वरूपी नसतात, हे यातून सिद्ध होतं; त्या आपल्या मनांच्या स्वरूपाचा भाग नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून सुटका करून घेणं शक्य असतं. आपण आपल्या संतापाची कारणं थांबवली, आणि केवळ वरवर नव्हे, तर सखोल नष्ट केली, तर रोषावर मात करून मनःशांती प्राप्त करणं निश्चितपणे शक्य आहे.
आपण सर्वच भावभावनांपासून दूर जाऊन स्टार ट्रेकमधल्या स्पोकसारखं, रोबोटसारखं किंवा भावनारहित संगणकासारखं व्हावं, असा याचा अर्थ नव्हे. उलट, आपल्याला स्वतःच्या अस्वस्थकारक भावनांपासून, गोंधळावर आधारित अस्वस्थकारक मनोवृत्तीपासून आणि आपण कोण आहोत या वास्तवाबद्दलच्या अजाणपासून सुटका करून घ्यायची असते. हे करण्यासाठीच्या अनेक पद्धती बौद्ध शिकवणुकींमध्ये आहेत.
मुक्त होण्याचा निश्चय
मी ज्याला “मुक्त होण्याचा निश्चय” असं म्हणतो, त्यासाठी सर्वसाधारणत: “सर्वसंगपरित्याग” हा शब्द वापरला जातो. आपण सगळं सोडून एखाद्या गुहेत जायला हवं, असं त्यातून सुचवलं जातं. पण इथे त्या अर्थाने हा शब्द वापरलेला नाही. आपण स्वतःच्या समस्यांकडे प्रामाणिकपणे व धाडसीपणे पाहावं, आणि त्यांच्यासह राहणं किती हास्यास्पद आहे हे समजून घ्यावं आणि मग ठरवावं की: “मला असंच सगळं सुरू ठेवायचं नाहीये. आता पुरे झालं. मला याचा कंटाळा आलाय; हे नकोसं झालंय. मी यातून बाहेर पडायलाच हवं”, असा इथल्या चर्चेचा मुद्दा आहे.
मुक्त होण्याचा निश्चय विकसित करायला हवा आणि त्यासह आपल्या जुन्या, अस्वस्थकारक विचारांचा, अभिव्यक्तीचा व वर्तनाचा आकृतिबंध सोडून द्यायला हवा. हे सर्वांत महत्त्वाचं आहे. आपण मनातून पक्कं ठरवत नाही तोवर आपण सर्व ऊर्जा त्यासाठी वापरत नाही. आणि आपण आपली सर्व ऊर्जा त्यासाठी वापरत नाही, तोवर आपले प्रयत्न अर्धेमुर्धे राहतात आणि आपण दिशाहीन काम करत राहतो. आपल्याला सुख प्राप्त करायचं असतं, पण त्यासाठी काही सोडायची तयारी नसते, म्हणजे नकारात्मक सवयी व भावना सोडायच्या नसतात. त्यामुळे अशा प्रयत्नाला कधी यश येत नाही. त्यामुळे स्वतःचा निश्चय पक्का करणं अतिशय महत्त्वाचं आहे, आपण आपल्या समस्या थांबवायला हव्यात, त्या सोडायची व त्यांची कारणं सोडायची इच्छा राखायला हवी.
याहून उच्च पातळीवर आपण असा विचार करायला हवा की: “मी केवळ स्वतःच्या सुखासाठी नव्हे, तर माझ्या आजूबाजूच्या प्रत्येकासाठी स्वतःच्या संतापापासून सुटका करून घ्यायला हवी. माझ्या कुटुंबासाठी, मित्रमंडळींसाठी, सहकाऱ्यांसाठी व समाजासाठी, मी संतापापासून मुक्त व्हायला हवं. इतरांचा विचार करून मी संतापावर मात करायला हवी. मला त्यांना त्रास द्यायचा नाहीये, त्यांना दुःखी करायचं नाहीये. मी माझा संताप व्यक्त केला, तर त्याने माझी नामुष्की होईलच, शिवाय माझ्या संपूर्ण कुटुंबाची लाज जाईल. माझ्या सर्व सहकाऱ्यांचीही लाज माझ्या वर्तनाने जाईल. त्यामुळे त्यांचा विचार करून मी स्वतःवर नियंत्रण ठेवणं आणि स्वतःचा राग हाताळून त्यापासून सुटका करून घेणं शिकायला हवं.”
त्याहून तीव्र प्रेरणेसाठी असा विचार करावा की: “मला इतरांना मदत करण्यापासून रोखण्याचं काम संताप करतो, त्यामुळे त्यापासून मी सुटका करून घ्यायला हवी. माझी मुलं किंवा कामाच्या ठिकाणचे लोक किंवा माझे पालक यांसारख्या इतरांना माझ्या मदतीची गरज असेल, आणि मी संतापामुळे किंवा वैरभावामुळे पूर्णतः नाराज असेन वा अस्वस्थ असेन, तर मी त्यांना मदत कशी करू शकेन? हा एक मोठा अडथळा असतो, त्यामुळे या विविध पातळ्यांवरची प्रेरणा प्रामाणिकपणे विकसित करण्यासाठी स्वतःवर काम करणं अतिशय महत्त्वाचं असतं.”
संताप हाताळण्याची पद्धत कितीही प्रगत असली, तरी आपल्याला त्या पद्धतीच्या उपयोजनाची तीव्र प्रेरणा नसेल, तर आपण तसं काही करणार नाही. आणि आपण शिकलेल्या पद्धतींचं उपयोजन केलं नाही, तर मग काय अर्थ उरतो? त्यामुळे, प्रेरणेच्या संदर्भात विचार करणं, हे पहिलं पाऊल असतं.
संतापावर मात करण्याच्या पद्धती
संतापावर मात करण्यासाठी आपण प्रत्यक्षात कोणत्या पद्धती वापरू शकतो? कशाविरोधात तरी सचेतन अथवा अचेतन हिंसा निर्माण करू पाहणारी त्रस्त मनोवस्था म्हणजे संताप. आपल्याला एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या प्राण्यावर, एखाद्या परिस्थितीवर किंवा एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्रित करून ते आपल्याला आवडले नाहीत, तर आपल्याला त्याबद्दल काही हिंसा व त्रस्तता व्यक्त करावीशी वाटते, हिंसक पद्धतीने बदल करावासा वाटतो, याला संताप असं म्हणतात. तर, संताप म्हणजे असहिष्णूतेची स्थिती व संयमाचा अभाव, त्याचप्रमाणे आपल्याला सहन न होणाऱ्या गोष्टीचं अहित व्हावं अशी आपली इच्छा असते. एका बाजूला, असहिष्णूतेच्या विरुद्धार्थी टोकावरचा संयम असतो, तर दुसऱ्या बाजूला प्रेम असतं. दुसऱ्या कोणीतरी सुखी व्हावं अशी इच्छा प्रेमात सामावलेली असते, त्यामुळे त्यांची हानी व्हावी अशा इच्छेच्या उलट जाणारी भावना प्रेमाची असते.
आपल्याला आवडणार नाही असं काहीतरी घडतं त्या परिस्थितीवर आपण संतापतो. आपल्याला हवं तसं लोक वागत नसतात. उदाहरणार्थ, ते आपल्याला आदर दाखवत नाही, ते कामाच्या ठिकाणी आपल्या आदेशांचं पालन करत नाहीत, किंवा व्यवसायामध्ये त्यांनी आपल्याला काही आश्वासन दिलेलं असतं पण त्यानुसार वर्तन ते करत नाहीत. आपल्या अपेक्षेप्रमाणे ते काम करत नसल्यामुळे आपण त्यांच्यावर अतिशय संतापतो. दुसरं उदाहरण- कोणीतरी आपल्या पावलावर पाय दिला, तर आपण त्याच्यावर संतापतो, कारण असं काही घडलेलं आपल्याला आवडत नाही. पण न संतापता अशी परिस्थिती हाताळण्याचेही विविध मार्ग असतात.
संयम विकसित करण्यासाठी शांतिदेव यांनी दिलेला सल्ला
आठव्या शतकातील एक महान भारतीय बौद्ध गुरू शांतिदेव यांनी या संदर्भात मदतीला येतील अशा अनेक ओळी लिहिलेल्या आहेत. त्यांचाच मुद्दा वेगळ्या भाषेत नोंदवायचा तर- ते म्हणाले होते: “एखाद्या अवघड परिस्थितीमध्ये बदल घडवण्यासाठी आपल्याला काही करायचं असेल, तर चिंता करू नये व संतापू नये, केवळ परिस्थिती बदलावी. आपल्याला काहीच करता येत नसेल, तर चिंता करण्यात व संतापण्यात तरी काय हशील? परिस्थिती बदलणं शक्य नसेल, तर संतापाचाही काही उपयोग नाही.”
उदाहरणार्थ, आपल्याला इथून पेनांगमधून सिंगापूरकडे विमानाने जायचं आहे, पण आपण विमानतळावर येतो तेव्हा विमानतील सर्व जागा भरल्या गेल्याचं आपल्याला कळतं. अशा वेळी संतापण्यात काही अर्थ नसतो. संतापल्याने काही आपल्याला विमानात जागा मिळणार नाही. परंतु, ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काहीतरी करू शकतो- आपण नंतरच्या विमानात बसू शकतो. संतापून काय होईल? त्यापेक्षा पुढच्या विमानाचं तिकीट काढावं, सिंगापूरमधील मित्रांना फोन करावा आणि आपण उशिराने पोचणार असल्याचं कळवावं; मग परिस्थिती निवळते. समस्या हाताळण्यासाठी आपल्याला इतपत काही करणं शक्य असतं. आपला टीव्ही सुरू होत नसेल, तर आपण संतापून त्याला लाथा मारून किंवा शिव्या देऊन काय होईल? त्यापेक्षा टीव्ही दुरुस्त करावा. हे अगदी स्वाभाविक आहे. आपल्याला बदलता येणं शक्य असेल अशा परिस्थितीमध्ये संतापण्याची गरज नाही, त्यापेक्षा परिस्थिती बदलावी.
परिस्थिती बदलण्यासाठी काही करणं आपल्याला शक्य नसेल, तर ते स्वीकारून टाकावं. उदाहरणार्थ, आपण गर्दीच्या वेळी वाहतूककोंडीत अडकलो, तर त्यावर काही उपाय नसतो. कोणत्यातरी जपानी कार्टूनप्रमाणे आपल्या कारच्या पुढे लेझर बीम गन लावलेली नसते, त्यामुळे आपली कार समोरच्या सर्व कारना टाळून उडत पुढे जाण्याची काहीही शक्यता नाही. त्यामुळे आहे ती परिस्थिती खिलाडू वृत्तीने स्वीकारावी. “बरं, मी वाहतूककोंडीत अडकलोय, तर रेडिओ सुरू करतो, किंवा कॅसेट-रेकॉर्डर सुरू करतो आणि थोड्या बौद्ध शिकवणुकी ऐकतो, किंवा काही सुंदर संगीत ऐकतो,” असा विचार करावा. वाहतूककोंडीची वेळ कोणती असेल, हे बहुतांशाने आपल्याला माहीत असतं, त्यामुळे ऐकण्यासाठी अशी टेप सोबत घेऊन जावं. आपल्याला अशा वाहतूककोडींमधून कार चालवायची आहे, हे माहीत असेल, तर आपण त्या वेळेचा अधिकाधिक सदुपयोग करू शकतो. आपल्या कार्यालयातील किंवा आपल्या कुटुंबातील कोणत्या तरी समस्येचा विचार करावा आणि त्यावर चांगला उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा.
एखादी अवघड परिस्थिती बदलण्यासाठी काहीच करणं आपल्याला शक्य नसेल, तर आहे त्या परिस्थितीचा शक्य तितका चांगला विनियोग करायचा प्रयत्न करावा. अंधारात आपल्या पायाच्या बोटांना इजा झाली, तर आपण उड्या मारत किंचाळतो, त्याने आपल्याला बरं वाटणार असतं का? अमेरिकी बोलीभाषेत याला “डुईंग अ हर्ट डान्स” असं म्हणतात. तर, आपल्याला इतकं दुखतं की आपण उड्या मारायला लागतो, नाचायला लागतो; पण त्याने आपल्याला बरं वाटत नाही. या परिस्थितीत आपल्याला फारसं काही करत येत नाही. अशा वेळी आपण जे काही करत असू ते सुरू ठेवायचं. वेदना क्षणिक असते. ती निघून जाते. ती चिरकाल टिकणार नाही आणि उड्या मारून व ओरडून आपल्याला चांगलं वाटण्याचीही शक्यता नसते. मग आपल्याला काय हवं असतं? प्रत्येकाने आपल्यापाशी यावं आणि “अरेरे, बिचारा, तुझ्या पायाला लागलं की रे” असं म्हणावं, अशी आपली इच्छा असते का? एखाद्या बाळाला दुखापत झाली, तर त्याची आई जवळ येऊन त्याची पापी घेते आणि त्या बाळाला बरं वाटतं. तर, लोकांनी आपल्यालाही बाळाप्रमाणे वागवावं, अशी आपली अपेक्षा असते का?
एखाद्या रांगेत आपला क्रमांक येण्याची वाट पाहत असताना किंवा बसची वाट पाहत असताना, आपल्याला क्षणिकतेचा विचार करावा- मी कायम एखाद्या रांगेत बत्तिसाव्या किंवा नवव्या क्रमांकावर असणार नाही, पण अखेरीस माझी पाळी येईल. असा विचार केल्याने आपल्याला परिस्थिती सहन करता येते आणि तो वेळ आपण निराळ्या पद्धतीने वापरू शकतो. भारतात एक म्हण आहे: “वाट बघण्यातही सुख असतं”. हे खरंच आहे, कारण रांगेत किंवा बससाठी उभं असताना आपण स्वतःची पाळी येण्याची वाट बघत असताना आपण तो वेळ रांगेतील किंवा बससाठी वाट बघणाऱ्या लोकांबद्दल, कार्यालयातल्या कामकाजाबाबत, किंवा इतर कशाहीबाबत जागरूक होण्यासाठी वापरू शकतो. इतरांविषयी आस्था व करुणा बाळगण्यासाठी याची आपल्याला मदत होते. आपण तिथे असलो, तर अर्धा तास शिव्या देत घालवण्यापेक्षा आपण तो वेळ रचनात्मकरित्या वापरू शकतो.
शांतिदेवाचा आणखी एक सल्ला असा: “कोणी तुम्हाला काठीने मारलं, तर तुम्ही कशाबद्दल संतापता? आपण त्या व्यक्तीवर संतापतो की त्या काठीवर संतापतो?” याबद्दल तार्किकरित्या विचार केला, तर आपण काठीबद्दल संतापायला हवं, कारण काठीने आपल्याला दुखावतं! पण हे मूर्खपणाचं होईल. कोणीही काठीवर संतापत नाही; आपण त्या व्यक्तीवर संतापतो. त्या व्यक्तीवर आपण का संतापतो? त्या व्यक्तीने काठीचा दुरुपयोग केल्यामुळे संतापतो. त्याचप्रमाणे पुढे जाऊन विचार केला तर असं लक्षात येतं की त्या व्यक्तीचा तिच्या अस्वस्थकारक भावनांनी दुरुपयोग केलेला असतो. त्यामुळे आपण संतापणार असलोच, तर त्या व्यक्तीने आपल्याला काठीने मारण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या तिच्यामधील अस्वस्थकारक भावनांवर संतापावं.
मग आपण विचार करतो: “ही अस्वस्थकारक भावना आली कुठून? ती अचानक कुठून उद्भवलेली नाही. मी त्यासाठी काहीतरी चेतावणारं काम केलं असावं. दुसरी व्यक्ती माझ्यावर संतापली व तिने मला काठीने मारलं म्हणजे त्या व्यक्तीने संतापावं असं काहीतरी मी वागलो असणार. मी काही मदतीची विचारणा केली असेल, आणि तिने नाकारल्यानंतर मी संतापलो. तिच्या नकाराने मी दुखावलो. त्याबद्दल विचार केला, तर मला वाटतं की यात माझीही चूक होती. मी खूप आळशी होतो त्यामुळे मी स्वतः ते काम केलं नाही. माझ्यासाठी काहीएक काम करायची विनंती मी एका व्यक्तीला केली आणि तिने ती विनंती नाकारल्यावर मी संतापलो. मी स्वतः आळशी नसतो, तर मी त्या व्यक्तीला अशी विनंती कधीच केली नसती आणि ही समस्याच मुळात उद्भवली नसती. मी संतापणारच असेन, तर स्वतःवर संतापायला हवं, कारण त्या व्यक्तीकडे मदत मागण्याइतका मी मूर्ख व आळशी आहे.”
आपला अंशतः दोष नसेल तेव्हाही दुसऱ्या व्यक्तीचा दुरुपयोग करणाऱ्या या अस्वस्थकारक भावनेपासून आपण मुक्त आहोत का याचा विचार करणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ, स्वार्थ: “त्यांनी माझी मदत करायला नकार दिला. मी नेहमी इतरांची मदत करतो का? इतरांना मदत करायला मी नेहमी तयार असतो का, आणि तत्काळ मदत करतो का? तसं मी करत नसेन, तर इतरांनी मुद्दाम वाकडी वाट करून माझी मदत करावी, अशी अपेक्षा मी कशी ठेवू शकतो?” संताप हाताळण्याचा हा आणखी एक मार्ग आहे.
संतापाची अभिव्यक्ती कायम किंचाळून, ओरडून किंवा दुसऱ्या व्यक्तीला मारूनच करायला हवी असं नाही, हे मी आधी नमूद केलंच आहे. संताप ही अस्वस्थकारक भावना आहे, त्यामुळे मुळात ती उद्भवते तेव्हा आपण स्वस्थ राहतच नाही. आपण संताप मनातल्यामनात ठेवला आणि कधीही तो व्यक्त केला नाही, तरी संताप आपल्या आतमध्ये अतिशय विध्वंसक कृत्य करेल आणि आपल्याला अतिशय नाराज करेल. नंतर ते टोकाच्या विध्वंसक रितीने बाहेर येतं. आपल्या मनात अव्यक्त रितीने असलेला संताप हाताळण्यासाठी मी वर उल्लेख केलेल्या पद्धतींचंच उपयोजन करणं गरजेचं आहे. आपण आपली मनोवृत्ती बदलायला हवी. आपण संयम बाळगायला हवा.
संयमाचे विविध प्रकार
संयमाचा लक्ष्य प्रकार
संयमाचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला आहे संयमाचा लक्ष्य प्रकार. तुम्ही लक्ष्य उपलब्ध करून दिलं नसतं, तर कोणीच त्यावर बाण मारला नसता, अशी यामागची संकल्पना आहे. अमेरिकेत मुलांसाठीचा एक छोटा खेळ आहे. ते त्यांच्या मित्राच्या पँटला मागच्या बाजूने एक कागदाचा तुकडा चिकटवतात किंवा पिनेने अडकवतात. त्या पेपरावर “मला लाथ मारा” असं ते लिहितात आणि याला “मला लाथ मारा” अशी खूण म्हटलं जातं. मग त्या लहान मुलाच्या पाठीमागे “मला लाथ मारा” असं ज्या कुणाला दिसेल ते लोक त्या मुलाला लाथा मारतील. अशा प्रकारच्या संयमाद्वारे आपण विचार करतो की, आपण स्वतःच्या गतकालीन नकारात्मक व विध्वंसक कृतींद्वारे मागच्या बाजूला “मला लाथ मारा” अशी खूणच लावून ठेवली असावी, आणि त्यातून सध्या आपल्याला समस्यांना सामोरं जावं लागत असावं.
उदाहरणार्थ, रस्त्यात कोणी आपल्याला बंदूक दाखवून लुबाटलं. तर आपण विचार करतो, “गतकाळात व गतजन्मात नकारात्मक व विध्वंसक वागून मी लक्ष्य तयार ठेवलं नसतं, तर मला लुटण्यासाठी वाट पाहत थांबलेल्या लुटारूच्या दिशेने त्या अंधाऱ्या रस्त्यावरून जाण्याचा विचार माझ्या मनात आला नसता. सर्वसाधारणतः मी त्या बाजूने जात नाही, पण त्या रात्री मी तिथल्या अंधाऱ्या रस्त्याने जाण्याचा विचार केला. सर्वसाधारणतः मी घरी त्याहून आधी पोचतो, पण त्या रात्री मित्रासोबत थोडा अधिक वेळ घालवायची उत्कट इच्छा मला झाली. शिवाय, कोणीतरी येईल याची वाट पाहत लुटारू थांबला होता, नेमका त्याच वेळी मी त्या रस्त्याने गेलो. अचानक मला अशी प्रेरणा का झाली? गतकाळात त्या व्यक्तीला दुखावणारं काहीतरी मी केलं असणार, त्यामुळे कार्यकारणसंबंधांनुसार आता ते परिपक्व होऊन माझ्या समोर आलं.”
कर्माची अभिव्यक्ती म्हणून अंतःप्रेरणा आपल्या मनात येतात. मग आपल्याला वाटतं: “मी माझं गतकालीन नकारात्मक कर्म कमी करतो आहे. इतक्या कमी त्रासात माझी सुटका होतेय याचा मला आनंद वाटायला हवा, कारण परिस्थिती याहून वाईट असणं शक्य होतं. या व्यक्तीने केवळ मला लुटलं, पण तो मला गोळीही मारू शकत होता. त्यामुळे मी आश्वस्त राहायला हवं की, आता ही नकारात्मकता तुलनेने माफक पद्धतीने परिपक्व झालं आणि माझा तिच्याशी असलेला संबंध संपला. त्याचा परिणाम तितकाही वाईट झालेला नाही, आणि तिच्यापासून मुक्तता होणं चांगलं आहे, आता तिचं ओझं माझ्या खांद्यावरून उतरलेलं आहे. आता हे कर्मजन्य दायित्व माझ्या अंगावर नाही.”
अशा प्रकारचा विचार अतिशय मदतीला येतो. एकदा मी आठवड्याअखेरीला सुट्टी घालवण्यासाठी मित्रासोबत समुद्रकिनाऱ्यावर गेलो होतो. आम्ही अनेक तास गाडी चालवत होतो. शहरापासून गाडीने बरंच दूरपर्यंत जावं लागणार होतं. सुमारे दीड तास गाडी चालवल्यानंतर आम्हाला कारमध्ये एक गंमतीशीर आवाज ऐकू आला. आम्ही रस्त्याशेजारच्या एका मेकॅनिककडे गेलो. त्याने कार पाहिली आणि चाकाच्या आसामध्ये तडा गेल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे आम्हाला पुढचा प्रवास करता येणार नव्हता. ट्रकच्या मागे गाडी बांधून परत शहराकडे जाणं, एवढाच पर्याय होता. माझ्या मित्राचा व माझा खूप संताप होणं शक्य होतं आणि आम्ही नाराज होणंही शक्य होतं, कारण आम्हाला आठवड्याअखेरीला विश्रांतीसाठी सुंदर बीच रिसॉर्टमध्ये जायचं होतं. पण निराळ्या मनोवृत्तीमुळे आम्ही त्याकडे पूर्णतः निराळ्या पद्धतीने पाहिलं: “अरे वा, हे मस्त झालं! हे आत्ताच झालं ते उत्तम, नाहीतर आम्ही तसेच पुढे गेलो असतो, आणि पुढे जाऊन मग आस तुटलं असतं. गाडी सुरू असताना हे झालं असतं, तर आमचा भयंकर अपघात झाला असता आणि दोघेही मेलो असतो. आता हे अशा रितीने पक्व झालंय, हे किती चांगलं आहे. आम्ही सहज त्यातून बाहेर आलो.” तर आम्ही शांत मनाने ट्रकच्या मागे गाडी बांधून शहरात परतलो, आणि मग तिथे पोचल्यावर दुसरी एक कार तात्पुरती घेतली व दुसऱ्या ठिकाणी गेलो.
अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला निरनिराळ्या प्रकारे अनुभवायला मिळणं शक्य आहे. संतापणं व नाराज होणं उपयोगी ठरत नाही. “याने माझं नकारात्मक कर्म कमी होतं आहे. कर्मजन्य दायित्व यातून परिपक्व झालंय. छान, आता हे संपलं. याहून वाईट होण्याची शक्यता होती,” अशा प्रकारे विचार केला, तर ते हाताळणं बरंच शांतपणे करता येतं.
प्रेम व करुणा प्रकारचा संयम
“प्रेम व करुणा या प्रकारातील संयम” असाही एक प्रकार असतो. अशा संयमाने आपण आपल्यावर संतापणाऱ्या किंवा किंचाळणाऱ्या कोणालाही वेडा मानतो, मानसिकदृष्ट्या अस्थिर मानतो. इतरांसमोर आपल्यावर टीका करणाऱ्या किंवा आपल्याला लाज येईल किंवा संताप येईल असं वागणाऱ्या कोणालाही अशा प्रकारच्या संयमाने वागवता येतं. उदाहरणार्थ, एखाद्या पोपटाने आपल्याला इतरांसमोर नावं ठेवली, तर त्याने आपली लाज जाते का? त्या पक्ष्यावर संतापायचं काहीच कारण नसतं. तशी प्रतिक्रिया मूर्खपणाची ठरेल. त्याचप्रमाणे एकादा वेडा माणूस आपल्यावर ओरडायला लागला व किंचाळायला लागला, तर त्याने आपली अवस्था लाजीरवाणी होत नाही. लहान मुलं अधूनमधून लहरीपणा करतात, हे सर्वज्ञात आहे. एखादा रुग्ण संतापतो तेव्हा मानसोपचारतज्ज्ञ त्याच्यावर संतापत नाही, उलट त्या रुग्णाविषयी त्याला करुणा वाटतो.
त्याचप्रमाणे आपल्याला नाराज करणाऱ्या, आपल्यावर संतापणाऱ्या किंवा आपल्याला लाजीरवाण्या अवस्थेत टाकणाऱ्या कोणाहीबद्दल आपल्याला करुणा वाटावी असा प्रयत्न असायला हवा. लाजीरवाणी अवस्था त्यांची होते आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, नाही का? आपली अवस्था लाजीरवाणी होत नाही. ती व्यक्ती पूर्ण बिनडोकासारखं वागत आहे, हे सर्वांना कळतं. त्या व्यक्तीवर संतापण्याऐवजी आपल्याला त्याच्याबद्दल करुणा वाटायला हवी.
कोणी आपल्याला मारायचा प्रयत्न करत असेल, तर त्याला थांबवायचं नाही, असा याचा अर्थ नव्हे. आपलं मूल किंचाळत असेल, तर आपण त्याला किंवा तिला शांत करायचा प्रयत्न करतो. त्याने आपल्याला किंवा इतरांना किंवा स्वतःला इजा पोचवू नये, यासाठी आपण त्याला थांबवू पाहतो. हे सगळं संतापाने करू नये, असा मुद्दा आहे. आपलं बाळ खोडसाळ वागत असेल, तर आपण त्याला किंवा तिला शिस्त लावतो, पण ते संतापाने केलेलं नसतं, तर बाळाच्या हितासाठीचे केलेलं असतं. बाळ लाजीरवाण्या परिस्थितीत जाऊ नये, लोकांनी त्याच्याबद्दल नकारात्मक मत करून घेऊ नये, अशी आपली इच्छा असते. आपण संतापून नव्हे तर आस्थेपोटी बाळाला शिस्त लावू पाहतो.
गुरू-शिष्य प्रकारचा संयम
मग एक “गुरू-शिष्य प्रकारचा संयम” असतो. शिष्याला शिक्षकाशिवाय शिकणं शक्य नाही, या वस्तुस्थितीवर हा प्रकार आधारलेला आहे. कोणीच आपली परीक्षा घेतली नसती, तर आपल्यामध्ये संयम निर्माण झाला नसता. दहाव्या शतकातील एक महान भारतीय गुरू आतिष यांना तिबेटमध्ये बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाला सहकार्य करण्यासाठी बोलावण्यात आलं. या भारतीय गुरूने त्याच्यासोबत एक भारतीय आचारी नेला. भारतीय आचारी कधीच काही अचूकपणे व आदराने करत नसे; तो अगदी घृणास्पद व अप्रिय वाटावा असा होता. तिबेटी लोक आतिष यांचा अतिशय आदर करत, त्यामुळे त्यांना लोकांनी विचारलं: “गुरूजी, तुम्ही भारतावरून या घृणास्पद आचाऱ्याला का आणलं? त्याला तुम्ही परत का पाठवत नाही? आम्ही तुम्हाला जेवण करून देऊ; आम्ही चांगलं जेवण करतो.” त्यावर आतिष म्हणाले: “तो माझा केवळ आचारी नाहीये. तो मला संयम शिकवणारा शिक्षक आहे, म्हणून मी त्याला सोबत आणलं!”
तर आपल्या कार्यालयात कोणी असं घृणास्पद असेल, जो सतत आपल्याला त्रास होईल असं बोलत असेल, तर त्या व्यक्तीला आपण संयम शिकवणारा शिक्षक मानावं. काही लोकांच्या सवयी अतिशय त्रासदायक असतात, उदाहरणार्थ- काही जण सतत बोटांनी आवाज करत असतात. पण कोणीच आपली परीक्षा घेतली नाही, तर आपला विकास कसा होणार? विमानतळावर किंवा बसस्टँडवर बराच वेळ वाट पाहावी लागणं, किंवा तत्सम अवघड परिस्थिती आपल्या समोर आली, तर आपण ती संयमाचा सराव करण्यासाठीची सुवर्णसंधी मानावी: “अरे! मी यासाठी प्रशिक्षण घेतच होतो. संयम विकसित करण्यासाठी मी प्रशिक्षण घेत होतो आणि आता मला ते प्रत्यक्षात करण्याची संधी मिळाली.” एखाद्या कार्यालयात आपल्याला प्रशासकीय अर्ज मिळण्यात अडचणी येत असतील, तर ते आपण आव्हान म्हणून स्वीकारावं. “मी काही काळ मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घेत होतो आणि आता मला माझी कौशल्यं वापरायची संधी आल्यामुळे मी अत्यानंदात आहे, असं ते असतं.” त्याचप्रमाणे आपण स्वतःला संयमी व सहिष्णू होण्यासाठी प्रशिक्षित करत असलो, तर आपल्या समोर अशी घृणास्पद परिस्थिती आल्यानंतर आपण त्याकडे अतिशय आनंदाने पाहतो: “अरे वा! हे आव्हान आहे. मला ते न संतापता, मनातून वाईट न वाटता हाताळता येतं का पाहूया.”
मार्शल आर्ट्स वापरण्यापेक्षा संयम न सुटणं हे जास्त मोठं आव्हान आहे. संयम ठेवताना आपल्याला केवळ शारीरिक नियंत्रण पुरेसं नसतं, तर आपल्याला स्वतःचं मन, स्वतःच्या भावना यांच्याबाबतीतच्या आव्हानाला सामोरं जावं लागतं. इतरांनी आपल्यावर टीका केली, तर आपण त्या टीकेकडे संधी म्हणून पाहायला हवं आणि त्यातून आपला विकास साधायला हवा, त्यावर संतापू नये. “माझ्यावर टीका करणारी ही व्यक्ती मला काही व्यक्ती दाखवू पाहत असेल आणि मी त्या गोष्टी शिकण्याची गरज असेल.” या अर्थाने आपण टीका सहन करायला हवी आणि आपली मनोवृत्ती बदलून ती हाताळायला हवी. आपण अतिशय नाराज झालो, तर आपल्यावर कोणी टीका करतं किंवा किंचाळतं त्या वेळेपेक्षाही आपली परिस्थिती आणखी लाजीरवाणी होऊ शकते.
गोष्टींच्या स्वभावाबाबत संयम
संताप हाताळण्याची व संयम विकसित करण्याची आणखी एक रीत म्हणजे “गोष्टींच्या स्वभावाविषयीचा संयम”. चुकीचं व निष्ठूरपणे वागणं, हा लोकांच्या बालिश स्वभावाचा प्रकार असतो. समजा एका ठिकाणी आग असेल, तर तप्त असणं व जळणं हा तिचा स्वभाव असतो. आपण आपला हात या आगीत ठेवला, तर तो जळतो, याहून आपली कोणती निराळी अपेक्षा असते? आग तापलेली असते; त्यामुळे त्यातून चटका बसतो. आपण जेवणाच्या वेळात शहरात फेरफटका मारला, तर आपली कोणती अपेक्षा असते? ही जेवणाची वेळ आहे आणि अशा वेळी वाहतूक जोरात असेल, हा गोष्टींचा स्वभाव आहे. आपण लहान बाळाला गरम चहाचे कप ठेवलेला ट्रे घेऊन जायला सांगितलं आणि त्याने ते सांडलं, तर त्यात आपली कोणती अपेक्षा असते? कोणी बाळ असेल तेव्हा त्याने काही सांडू नये अशी अपेक्षा करता येत नाही. त्याचप्रमाणे आपण लोकांकडे मदत मागितली किंवा आपलं काही काम करायची विनंती केली, तर आपण एक सहमतीचा करार करत असतो, अशा वेळी त्यांनी आपली निराशा केली, तर आपण कोणती अपेक्षा ठेवत असतो? लोक बालिश आहे; त्यांच्यावर आपल्याला विसंबून राहता येणार नाही. महान भारतीय गुरू शांतिदेव म्हणाले होते: “तुम्हाला काही सकारात्मक व रचनात्मक करायचं असेल, तर स्वतः करा. कोणावर विसंबून राहू नका. तुम्ही कोणावर विसंबून राहिलात, तर ती व्यक्ती तुम्हाला निराश करणार नाही याची काहीच हमी नाही.” अशा प्रकारे आपण संबंधित परिस्थितीकडे पाहतो: “बरं, मी कोणती अपेक्षा केली होती? मला निराश करणं हा लोकांचा स्वभाव असेल, तर त्यात मी संतापायचं काही कारण नाही.”
वास्तवाचा अवकाश असलेला संयम
संतापाविरोधात वापरायची शेवटची पद्धत म्हणजे “वास्तवाचा अवकाश असलेला संयम”. आपण स्वतःवर, इतरांवर आणि ठोस ओळख असलेल्या वस्तूंवर शिक्के मारत असतो. स्वतःविषयीच्या एखाद्या पैलूभोवती ठळक रेषा आखण्यासारखा हा प्रकार असतो आणि त्यात आपण तो पैलू हीच आपली ठोस ओळख आहे असं दाखवतो: “मी असा आहे; मी कायम असंच असायला हवं.” उदाहरणार्थ, “मी ईश्वराने जगाला दिलेली भेट आहे,” किंवा “मी पराभूत आहे, अपयशी आहे.” किंवा दुसऱ्या कोणाभोवती तरी ठळक रेषा आखतो आणि म्हणतो: “तो घृणास्पद आहे. तो चांगला नाहीये, तो त्रासदायक आहे.” परंतु, तीच त्या व्यक्तीची खरी, ठोस ओळख असेल, तर तो कायम तशाच तऱ्हेने अस्तित्वात असणार. लहान बाळ म्हणून तो तसाच अस्तित्वात राहिला असेल. तो सगळ्यांबाबतीतच- त्याची पत्नी, त्याचा कुत्रा, त्याचं मांजर, त्याचे पालक या सगळ्यांबाबतच- घृणास्पद असायला हवा, कारण तो खरोखरचा घृणास्पद व्यक्ती असतो.
लोकांभोवती अशी कोणतीही ठळक मोठी रेषा नाही, त्यांचा असा काही ठोस स्वभाव नाही, हे आपल्या लक्षात आलं तर आपण जरा निवांत होतो आणि त्यांच्यावर जास्त संतापत नाही. अमुक व्यक्ती घृणास्पद वागली, तो केवळ एक प्रसंग होता- तसा प्रसंग वारंवार होत असला तरी- ती व्यक्ती कायम तशीच असेल असं नाही.
उपकारक सवयी विकसित करणं
अवघड परिस्थितीमध्ये हे सर्व मुद्दे उपयोगात आणणं सोपं नसेलही कदाचित. या सर्व प्रकारांना “प्रतिबंधात्मक उपाय” असं म्हणतात. “धर्मा”चा अर्थ मी असा लावतो. समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी आपण करतो तो उपाय म्हणजे “धर्म”. आपल्याला उपकारक सवयी म्हणून संयमाचे भिन्न प्रकार विकसित करायचे असतात, जेणेकरून आपण संतापू नये. याला “साधना” म्हणतात. साधनेसाठीचा तिबेटी शब्द “सवय करून घेणं” याच्याशी संबंधित आहे, उपकारक अशा कशाची तरी स्वतःला सवय लावून घेणं.
एक, संयमाच्या या भिन्न प्रकारांबद्दलची विविध स्पष्टीकरणं आपण ऐकून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण त्यांच्यावर विचार करायला हवा, ते समजून घ्यायला हवं आणि त्यातून आपल्याला काही अर्थ लागतो का ते पाहायला हवं. आपल्याला त्याचा अर्थ लागत असेल, ते समजत असेल, तर आपल्याला ते उपयोगात आणायची प्रेरणाही होते, मग आपण सरावाने या उपकारक सवयी विकसित करायचा प्रयत्न करतो.
यासाठी सुरुवातीला या मुद्द्यांची पडताळणी करावी. या मुद्द्यांची पडताळणी केल्यावर आपण या गोष्टींकडे तशा तऱ्हेने पाहायचा प्रयत्न करावा. कल्पनाशक्ती वापरून आपण या परिस्थिती स्वतःच्या मनात तयार करायला हव्या. आपण सर्वसाधारणतः संतापतो व नाराज होतो अशा परिस्थितीची कल्पना करावी. उदाहरणार्थ, आपल्या कार्यालयात कोणीतरी आपल्याला आवडणार नाही असं वागत असेल. अशा वेळी आधी आपण त्या व्यक्तीला ती जशी आहे तसं पाहावं, सुखी होऊ इच्छिणारा तो एक माणूस असतो. तो सर्वतोपरी प्रयत्न करतो, पण तो बाळासारखा आहे आणि तो काय करतोय हे त्यालाही नीटसं कळत नाही. आपण त्याच्याबद्दल अशी भावना ठेवायचा प्रयत्न केला आणि घरी शांतपणे बसून मनात असा सराव केला, तर कार्यालयात असताना आपण त्या व्यक्तीच्या घृणास्पद कृत्यांना अधिक सहजतेने व अधिक सकारात्मकतेने प्रतिसाद देऊ शकतो. त्याच्यावर संतापण्याच्या अंतःप्रेरणेपेक्षा आपल्याला अधिक संयमी राहण्याची, अधिक सहिष्णू राहण्याची नवीन अंतःप्रेरणा होते.
ती व्यक्ती बाळ आहे, अशा रितीने त्याच्याकडे पाहण्याचा सराव केल्यामुळे आपल्याला त्याच्या खोडसाळ वर्तनाबद्दल संयम विकसित करता येतो, मग आपण एक पाऊल पुढे टाकू शकतो. ती व्यक्ती अशा घृणास्पद रितीने कृती करत असेल, तेव्हा ती लाजीरवाण्या अवस्थेला जात असते. त्यामुळे आपण तिच्याबद्दल करुणा ठेवावी. साधनेद्वारे आपण लोकांकडे अशा रितीने पाहण्याची व त्यांच्याबद्दल अशा भावना विकसित करायची सवय लावून घेतो. संयमाने पाहणं व जाणवणं ही उपकारक सवय लागल्यावर ती आपला अधिकाधिक भाग होत जाते. आपल्या समोर आलेल्या अवघड परिस्थितींना प्रतिसाद देण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग होतो. संतापण्याची अंतःप्रेरणा आपल्या मनात येते, तेव्हा एक अवकाश तयार असतो. आपण त्यावर तत्काळ कृती करत नाही आणि अधिक उपकारक रितीने कृती व्हावी यासाठी अधिक सकारात्मक अंतःप्रेरणेची वाट पाहतो.
बौद्ध धर्मावरील व्याख्यानांमध्ये आपण सर्वसाधारणतः श्वासाच्या संवेदनेवर लक्ष केंद्रित करतो आणि प्रत्येक व्याख्यानाच्या सुरुवातीला एकवीस वेळा श्वास घेतो. आपण संतापत असल्याचं पहिल्यांदा लक्षात आल्यावर असं करणं अतिशय उपकारक ठरतं. यातून काहीएक अवकाश निर्माण होतो, त्यामुळे आपण क्रौर्यासारख्या नकारात्मक अंतःप्रेरणेने तत्काळ कृती करत नाही, त्याऐवजी थोडा अवकाश घेऊन आपल्या संतापण्याचा व नाराज होण्याचा पुनर्विचार करतो. “मला खरोखरच इथे गदारोळ करायचा आहे का, की ही परिस्थिती हाताळण्याचा काही अधिक चांगला मार्ग आहे?” साधनेमुळे व अधिक उपकारक सवयी लावून घेतल्यामुळे आपण परिस्थितींकडे अधिक संयमाने पाहू शकतो आणि त्याबद्दल अधिक सहिष्णू राहतो. अधिक सकारात्मक पर्या आपल्या डोक्यात येतात आणि आपण स्वाभाविकपणे त्यातून निवड करतो, कारण आपल्याला सुखी व्हायचं असतं आणि या पर्यायी मार्गांनी आपल्याला परिणाम दिसेल हे आपल्याला माहीत असतं.
हे करण्यासाठी आपल्याकडे एकाग्रता असणं गरजेचं आहे. त्यामुळे एकाग्रता विकसित करण्यासाठी बौद्ध धर्मात अनेक भिन्न साधना पद्धती आहेत. या पद्धती केवळ अमूर्त उपक्रम म्हणून शिकायच्या नसतात; त्यांचा वापर व उपयोजन करण्यासाठी त्या शिकवल्या जातात. आपण त्यांचा वापर कधी करावा? आपण त्यांचा वापर अवघड परिस्थितींमध्ये, घृणास्पद लोक हाताळताना किंवा घृणास्पद परिस्थितींमध्ये करावा. आपली मनं संयमी ठेवण्यासाठी एकाग्रता साधायला हे लोक मदत करतात.
सारांश
आपण स्वतःच्या नकारात्मक, विध्वंसक वर्तनाला केवळ आत्मनियंत्रणाने व शिस्तीनेच आळा घालतो असं नाही. आपण ते आत्मनियंत्रणाने व शिस्तीने सहजतेने केलं, तर संताप आपल्या आत राहतो. आपण बाहेरून अगदी सक्षम असल्यासारखं दाखवू, पण आतून संताप पेटत असतो आणि त्यातून आपल्या आत अल्सर होतो. याउलट, आपण उपरोक्त पद्धती योग्यरित्या वापरल्या की संताप उद्भवतच नाही. यात संतापावर नियंत्रण ठेवून तो आत ठेवण्याचा मुद्दा येत नाही; आपल्या डोक्यात येणाऱ्या अंतःप्रेरणा बदलण्याचा हा मुद्दा आहे. आपल्याला आतल्या आत हाताळाव्या लागतील अशा नकारात्मक अंतःप्रेरणांऐवजी सकारात्मक अंतःप्रेरणा येतील.
आपल्याला एकदा हे जमलं की आपण आपल्या प्रेरणेनुसार आपण आत्ता समस्यांपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकतो आणि भविष्यात गोष्टी बिघडणार नाहीत अशी तजवीज करू शकतो. किंवा, आपल्याला कोणत्याही समस्याच येणार नाहीत, किंवा अतिशय सक्षम व अतिशय प्रगत प्रेरणेद्वारे आपण, आपल्या कुटुंबाला, आपल्या मित्रांना, आपल्या अवतीभवतीच्या लोकांना समस्यांना सामोरं जायला लागणार नाही आणि त्यांना आपण सर्वतोपरी मदत करू शकू. आपण केवळ स्वतःच्या अस्वस्थकारक भावना व समस्या यांपुरतेच मर्यादित न राहिल्याने हे करू शकतो. तर, अशा रितीने आपण स्वतःचं पूर्ण सामर्थ्य प्राप्त करू शकतो.