व्यापक बोधासंबंधी पारमिता: प्रज्ञापारमिता

यथार्थ आणि कल्पनेदरम्यानचा फरक ओळखण्याची आपल्यात क्षमता नसेल तर आपण आपल्या व इतरांच्या सांसारिक आणि सकारात्मक आध्यात्मिक उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक असलेल्या साधनांपासून वंचित असतो. अज्ञान आणि गोंधळाच्या स्थितीत आपण फक्त इतरांसाठी काय उपयुक्त असू शकते, याचा केवळ अंदाज बांधू शकतो आणि तो ही बहुतांश वेळा चुकीचा ठरतो. करुणा आणि बोधिचित्ताच्या जोडीला व्यापक विवेकी जागरूकता – प्रज्ञापारमिता – प्राप्त करून आपण स्वतः बुद्धत्व प्राप्त करू शकतो आणि प्रत्येक जीवाच्या भल्यासाठी सर्वाधिक प्रभावशाली व उपयुक्त पद्धतींचा संपूर्ण बोध प्राप्त करू शकतो.

व्यापक विवेकी जागरूकता – ज्याला बहुतांश लोक “प्रज्ञापारमिता,” संबोधतात – ती सहा पारमितांमधील अखेरची पारमिता आहे. या पारमिताच्या साहाय्याने आपण ज्ञानप्राप्तीसाठी व इतरांच्या भल्यासाठी आवश्यक असणाऱ्या बोधांचे नेमके व सखोल विश्लेषण करू शकतो, तसेच त्यांच्यातील फरकही नेमकेपणाने ओळखू शकतो. खाली दिलेल्या तथ्यांना नेमकेपणाने ओळखणाऱ्या विवेकी सचेतनतेचे तीन विभाग आहेत.  

१. गूढतम तथ्य – यथार्थाचे स्वरूप, अर्थात सर्व तथ्यांच्या स्वस्थापित स्वरूपाचा पूर्ण अभाव, ज्याचा बोध एकतर एखाद्या अर्थ श्रेणीच्या माध्यमातून वैचारिक आधारावर किंवा प्रकट रूपात निर्वैचारिक आधारावर प्राप्त केला जातो. 

२. वरवरचे परंपरागत तथ्य – ज्ञानाची पाच प्रमुख क्षेत्रे – हस्तकला व शिल्पकला, वैद्यकशास्त्र, भाषा व व्याकरण, तर्कशास्त्र व संपूर्ण बौद्ध शिकवण, विशेषतः बोधप्राप्तीच्या अवस्था आणि त्या प्राप्त करण्यासाठी आवश्यक पद्धती आणि त्यांच्या संकेतांचे गहन ज्ञान. 

३. सर्व मर्यादित क्षमता असणाऱ्या समस्याग्रस्त जीवांच्या कल्याणाचे मार्ग – ज्यांची मदत केली जाणे अपेक्षित आहे आणि ज्यांच्याविषयी व्यापक नैतिक स्वयंशिस्त, संयम आणि मानसिक स्थैर्याच्या संदर्भातून चर्चा केली गेली आहे असे ११ प्रकारचे लोक. 

प्रज्ञापारमितेच्या साहाय्याने आपण खालील गोष्टींसंदर्भात नेमकेपणाने व ठामपणे फरक करू शकतोः 

 • आपण साध्य करू इच्छित असलेली सकारात्मक उद्दिष्टे 
 • त्यांच्या प्राप्तीचे लाभ 
 • ते साध्य न झाल्यास होणारे तोटे किंवा नुकसान 
 • उद्दिष्टप्राप्तीसाठीच्या परिणामकारक पद्धती 
 • त्या साधनापद्धती साकारण्याचे योग्य ज्ञान 
 • साधनेदरम्यान त्रासदायक ठरू शकणाऱ्या संभाव्य अडथळ्यांचे ज्ञान 
 • त्या अडथळ्यांवर मात करण्याचे मार्ग.

व्यापक विवेकी सचेतनतेतून प्राप्त होणाऱ्या बोधाविना आपली स्थिती अशी होते, जसे आपण आंधळेपणाने बौद्ध साधनांचा अभ्यास करत आहोत. आणि आपल्याला आपले लक्ष्य नेमके काय आहे, ते आपल्याला का साध्य करायचे आहे आणि ते साध्य झाल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, याचीही जाणीव नाही. अशाने आपण आपली साधना स्वार्थीपणे आणि अज्ञानाने भ्रष्ट करू, तणावदायी मनोभावना व दृष्टिकोनांनी ती दुषित करू आणि सफलता मिळवण्याच्या आपल्या शक्यतांना स्वतःच धोका पोहचवू. 

उर्वरित पाच व्यापक दृष्टिकोन – औदार्य, नैतिक स्वयंशिस्त, संयम, धैर्य आणि मानसिक स्थैर्य किंवा एकाग्रतेच्या सम्यक अभ्यासासाठी व्यापक विवेकी सचेतनतेचा बोध आवश्यक आहे. या प्रज्ञापारमितेच्या साहाय्याने आपण नेमकेपणाने आणि ठामपणे खालील गोष्टींमधील फरक ओळखू शकतोः

 • काय दिले जाणे आणि कोणास दिले जाणे योग्य आहे आणि पुढे जाऊन स्वतः आपल्याविषयी, ज्याला दिले गेले आहे त्याच्याविषयी आणि जे दिले गेले आहे, त्याचे शून्य स्वरूप ओळखणे, जेणेकरून आपण केलेल्या उपयुक्त दानाप्रति आपण अहंकार, आसक्ती किंवा पश्चातापाची भावना बाळगणार नाही. 
 • स्वतःसाठी आणि इतरांसाठी काय लाभकारक आणि काय हानिकारक आहे, शिवाय सांसारिक दुःख व एक शांत, उदासीन निर्वाणावस्थेत राहण्यातील दोष यासंबंधीची जाणीव असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण इतरांच्या भल्यासाठी व स्वार्थाने प्रेरित न होता नैतिक स्वयंशिस्तीची साधना करू शकू. 
 • चंचलतेचे दोष आणि संयमाचे फायदे ओळखणे, जेणेकरून दुसऱ्यांची मदत करण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांवरील इतरांच्या नकारात्मक व शत्रुतापूर्ण प्रतिक्रिया आपण प्रेम व करुणाभावाने सहन करू शकू आणि धर्मसाधनेत येणाऱ्या अडथळ्यांना क्रोधित न होता सहन करू शकू.    
 • आपले आध्यात्मिक उद्दिष्टप्राप्तीचे ध्येय आणि त्यांना साध्य करणाऱ्या साधनापद्धतींची कारणमीमांसा करणे, जेणेकरून आपण आळशी, निराश न होता किंवा अर्ध्यातूनच प्रयत्न सोडून न देता धैर्यपूर्वक आपली साधना करत राहू.  
 • काय यथार्थ आहे आणि काय असंभाव्य अस्तित्वाचे प्रक्षेपण आहे हे ओळखणे, जेणेकरून यथार्थाच्या वास्तव स्वरूपावर केंद्रित मानसिक स्थैर्यासोबतची एकाग्रता आपल्याला मुक्ती आणि ज्ञानप्राप्तीपर्यंत पोहचवेल. शिवाय जेव्हा विवेकी सचेतनतेचे आपले लक्ष्य असते तेव्हा आपण ध्यानधारणेतून प्राप्त केलेल्या शांत आणि सुखकारक अवस्थेला इतरांचे साहाय्य करण्याच्या आपल्या लक्ष्याला विचलित करू देत नाही. 

दहा पारमिता 

जेव्हा दहा पारमिता नमूद केल्या जातात, तेव्हा अखेरच्या चार पारमिता या व्यापक विवेकी जागरूकतेचाच भाग असतातः 

 • साधनांसंबंधी व्यापक कौशल्य – धर्म शिकवणींना कार्यान्वित करण्यासाठी आंतरिक प्रभावकारी व उपयुक्त पद्धती आणि मुक्ती व ज्ञानप्राप्तीसाठी इतरांची मदत करण्यासाठीच्या बाह्य साधनापद्धती.
 • व्यापक आकांक्षापूर्ण प्रार्थना – आपली आकांक्षा, अर्थात आपण कोणत्याही जन्मात बोधिचित्ताच्या लक्ष्यापासून विचलित होऊ नये आणि इतरांच्या भल्यासाठीचे आपले काम विनासायास निरंतर चालू राहावे, याविषयीची आपली विवेकी सचेतनता. 
 • व्यापक सुदृढीकरण – आपल्या व्यापक सचेतनतेचा विस्तार करण्यासाठी आणि ती आसक्तीसारख्या प्रतिकारक शक्तींच्या ओझ्याखाली दबली जाऊ नये म्हणून वापरात आणलेले विश्लेषण आणि स्थिरतादायी ध्यानध्यारणेतून लाभलेली विशेष विवेकी सचेतनता. 
 • व्यापक गहन बोध – सर्व गोष्टींविषयक शून्यतेच्या बोधाच्या परिपूर्ण आकलनासाठी उपयोगात आणलेला विशेष विवेकी बोध, जेणेकरून आपण सर्व गोष्टींचे पृष्ठस्तरीय वास्तव आणि गहन यथार्थतेचा बोध प्राप्त करू शकू. 

सारांश 

आपण करत असलेल्या साधना आणि त्या साधनांमुळे ज्या दोषांवर आपण विजय मिळवला आहे, त्या दोषांसह जगत राहिल्याने होणारे नुकसान यासंबंधीचा स्पष्ट आणि निर्णायक बोध व्यापक विवेकी सचेतनतेमुळे शक्य होतो. या दृढ बोध आणि धारणेसोबत व प्रेम, करुणा व बोधिचित्त लक्ष्याशी संबंधित अविचल प्रेरणेसोबत, आपण कोणतीही धर्मसाधना केली, तरी ती आपल्या ज्ञानप्राप्तीसाठी आणि सर्व संभाव्य मार्गांनी इतरांसाठी लाभदायी होण्यासाठी सक्षम ठरण्यास परिणामकारक ठरते. 

Top