पुनर्जन्म कसा समजून घ्यावा?
कोणतीही गोष्ट सत्य आहे हे आपल्याला वैधरित्या कसं समजेल? बौद्ध शिकवणुकीनुसार गोष्टी वैधरित्या जाणून घेण्याचे दोन मार्ग आहेत: सरळसोट आकलनाद्वारे आणि अनुमानाद्वारे. प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून आपल्याला सरळसोट आकलनाद्वारे कशाचं तरी अस्तित्व वैधरित्या तपासता येतं. उदाहरणार्थ, सूक्ष्मदर्शकयंत्रामधून पाहिल्यावर, केवळ ज्ञानेंद्रियांद्वारे आपल्याला सत्य कळतं की, तलावातील पाण्याच्या थेंबातले अनेक सूक्ष्मजंतू तिथे आहेत.
पण काही गोष्टी सरळसोट आकलनाद्वारे जाणून घेता येत नाही. त्यासाठी आपल्याला तर्क, विवेक व अनुमान यांवर विसंबून राहावं लागतं. उदाहरणार्थ, लोहचुंबक आणि लोखंडाची सुई यांच्या वर्तनावरून चुंबकत्वाच्या अस्तित्वाचं अनुमान बांधता येतं. सरळसोट ज्ञानेंद्रियांच्या आकलनाद्वारे पुनर्जन्म सिद्ध करणं अतिशय अवघड आहे. परंतु, आपली गतजीवनं आठवणाऱ्या लोकांची अनेक उदाहरणं आहेत. त्यांना वैयक्तिक ऋणानुबंध किंवा त्यांची आधीपासून ओळख असलेले लोक आठवत असतात. यावरून आपल्याला पुनर्जन्माच्या अस्तित्वाचं अनुमान बांधता येतं, पण काही लोकांना या निष्कर्षाबाबत शंका वाटणं शक्य आहे आणि ही क्लृप्ती आहे अशीही शंका त्यांना येऊ शकते.
गतजीवनातील स्मृतींची ही उदाहरणं बाजूला ठेवून आपण पुनर्जन्म समजून घेण्यासाठी तर्काकडे वळू. काही मुद्दे वास्तवाशी जुळत नसतील, तर ते बौद्ध धर्मातून काढून टाकायची आपली तयारी आहे, असं परम पूजनीय दलाई लामा म्हणाले आहेत. हे पुनर्जन्मालाही लागू होतं. किंबहुना, त्यांनी मुळात याच संदर्भात प्रस्तुत विधान केलं होतं. पुनर्जन्म अस्तित्वात नाही असं वैज्ञानकांना सिद्ध करता आलं, तर त्यावर सत्य म्हणून विश्वास ठेवणं आपणं सोडून द्यायलाच हवं. परंतु, वैज्ञानिकांना हे असत्य असल्याचं सिद्ध करता आलं नाही, तर पुनर्जन्म अस्तित्वात असतो का याचा तपास त्यांनी करायला हवा, कारण ते तर्क व वैज्ञानिक पद्धती अनुसरत असतात, त्यामुळे नवीन गोष्टी समजून घ्यायला ते खुले असतात. पुनर्जन्म अस्तित्वात नाही, हे सिद्ध करायला त्यांना पुनर्जन्माचं अस्तित्वात नसणं शोधावं लागेल. “मला पुनर्जन्म माझ्या डोळ्यांनी दिसत नाही त्यामुळे तो अस्तित्वात नाही” एवढंच म्हणणं म्हणजे पुनर्जन्माचं अस्तित्वात नसणं शोधणं नव्हे. आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या अनेक गोष्टी, उदाहरणार्थ- चुंबकत्व व गुरुत्वाकर्षण, अस्तित्वात असतात.
पुनर्जन्म असतो का हे तपासण्यासाठीच्या तर्कपद्धती
पुनर्जन्म अस्तित्वात नसतो हे वैज्ञानिकांना सिद्ध करता आलं नाही, तर पुनर्जन्म खरोखरच अस्तित्वात असतो का याचा तपास त्यांनी करणं योग्य ठरेल. विशिष्ट माहितीवर आधारित सिद्धान्त मांडण्यासाठी आणि मग त्याची वैधता तपासण्यासाठी वैज्ञानिक पद्धत वापरली जाते. त्यामुळे आपण माहितीकडे लक्ष देतो. उदाहरणार्थ, बाळं जन्मतात तेव्हा कोऱ्या कॅसेटसारखे नसतात. अगदी लहान असतानाही त्यांच्यात काही विशिष्ट सवयी व व्यक्तिमत्त्वाची काही वैशिष्ट्यं असल्याचं आपल्याला निरीक्षणाद्वारे कळतं. हे कुठून येतं?
केवळ पालकांच्या शारीरिक पदार्थांमधील, शुक्रजंतू व बीजांडं, आधीच्या सातत्यामधूनच हे येतं, असं म्हणण्याला काही अर्थ नाही. एकत्र येणारा शुक्रजंतू व बीजांडं गर्भाशयात अर्भक म्हणून विकसित होत नाही. त्यांच्यातून कधी बालक निर्माण होतं, तर कधी बालक निर्माण होत नाही, हा फरक कशामुळे असतो? मुलामधील विविध सवयी व प्रेरणांचं प्रत्यक्षातील कारण काय? हे गुणसूत्रांमुळे व जनुकांमुळे होतं, असं आपण म्हणू शकतो. ही शारीरिक बाजू झाली. एखादं मूल अस्तित्वात कसं येतं, त्याचा हा शारीरिक पैलू कोणीही नाकारत नाही. तरीही, अनुभवात्मक बाजूचं काय? मनाबाबत आपण कोणतं स्पष्टीकरण देऊ शकतो?
इंग्रजीत ‘माइंड’ असा शब्द वापरला जातो, मूळ संस्कृत व तिबेटी संज्ञांचं भाषांतर म्हणून हा शब्द वापरला जात असला, तरी त्या मूळ संज्ञांचा अर्थ त्यातून समोर येत नाही. मूळ भाषांमध्ये मानसिक कृती किंवा मानसिक घटनांना मन असं संबोधलं जातं, त्या कृती करणाऱ्या घटकाला हे संबोधन सर्वसाधारणतः लावलं जात नाही. विशिष्ट गोष्टींचं- विचार, दृश्यं, ध्वनी, भावना, जाणिवा, इत्यादी- संज्ञानात्मक आकलन आणि त्यांच्यामध्ये संज्ञानात्मक सहभाग घेणं- त्या गोष्टी पाहणं, ऐकणं, समजून घेणं किंवा न समजून घेणं, म्हणजे ती कृती किंवा घटना होय.
व्यक्तिगत जीवामध्ये संज्ञानात्मक गोष्टींसोबत उत्पन्न होणारी व त्यांत सहभागी होणारी ही मानसिक कृतिशीलता कुठून येते? संबंधित शरीर कुठून आलं हे आपण इथे बोलत नाही आहोत, शरीर तर अर्थातच पालकांकडून आलं. इथे आपण बुद्धिमत्ता इत्यादींबाबतही बोलत नाही आहोत, कारण त्याला जनुकीय आधार आहे असा युक्तिवाद आपल्याला करता येईल. परंतु, एखादी व्यक्ती चॉकलेट आइसक्रीमला पसंती देते, हेसुद्धा त्या व्यक्तीच्या जनुकांमधून आलेलं असतं, असं म्हणणं खूपच अतिशयोक्तीचं होईल.
आपल्या काही रुचींवर आपल्या कुटुंबांचा किंवा आपण ज्या आर्थिक व सामाजिक परिस्थितींमध्ये असतो त्यांचा प्रभाव राहतो, असं आपल्याला म्हणता येईल. या घटकांचा निश्चितपणे प्रभाव पडतो, पण आपल्या प्रत्येक कृतीचं परिपूर्ण स्पष्टीकरण याद्वारे करता येणं अवघड आहे. उदाहरणार्थ, मला लहान असतानाच योगामध्ये रुची का वाटू लागली? माझ्या कुटुंबातील किंवा समाजातील कोणालाही अशी रुची नव्हती. मी राहत होतो त्या भागात काही पुस्तकं उपलब्ध होती, त्यामुळे समाजाकडून काही प्रभाव पडला असं तुम्ही म्हणू शकता, पण हटयोगावरच्या विशिष्ट पुस्तकामध्ये मला रुची का वाटली? मी तेच पुस्तक का उचललं? हा आणखी एक वेगळा प्रश्न. गोष्टी केवळ योगायोगाने होतात आणि नशिबाचा त्यात हात असतो, की सगळ्याचं स्पष्टीकरण देणं शक्य असतं?
व्यक्तिगत मानसिक कृतिशीलता कुठून येते?
या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपण मुख्य प्रश्नाकडे येऊ: संज्ञानात्मक वस्तू व त्यांमधील संज्ञानात्मक सहभाग, यांमधून उद्भवणारी कृतिशीलता कुठून येते? आकलन करून घेण्याची ही क्षमता कुठून येते? जीवनाची ठिणगी कुठून पडते? शुक्रजंतू व बीजांडं यांच्यातील संयोगामधून प्रत्यक्षात जीवन कसं निर्माण होतं? त्यातून मानव कसा निर्माण होतो? विचार व दृश्य कशामुळे उत्पन्न होतात, आणि त्यांमध्ये संज्ञानात्मक सहभाग का घेतला जातो, मेंदूच्या रासायनिक व इलेक्ट्रिकल कृतिशीलतेची ही अनुभवात्मक बाजू कुठून येते?
बालकांची मानसिक कृतिशीलता त्यांच्या पालकांकडून येते असं म्हणणं अवघड आहे, कारण तसं असेल तर पालकांमध्ये ती कुठून येते? त्यांमध्ये काहीएक यंत्रणा असावी लागेल. पालकांमध्ये शुक्रजंतू व बीजांडं असतात त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनाची ठिणगी असते का- गोष्टींबद्दलच्या जागरूकतेतून ती येते का? ती समागमातील सर्वोच्च उत्कटतेमधून येते का? अंडमोचनातून येते का? शुक्रजंतूमध्ये ती असते का? बीजांडात असते का? पालकांमध्ये ती कुठून येते याचं तार्किक, वैज्ञानिक सूचन आपल्याला करता येत नसेल, तर आपल्याला दुसरा उपाय शोधावा लागेल.
निव्वळ तर्कदृष्टीने पाहिलं तर आपल्याला दिसतं की, सर्व कार्यरत घटितं आपापल्या सातत्यामधूनच येतात, त्याच घटिताच्या कोटीमधील साधर्म्य असणाऱ्या पूर्वीच्या कोणत्या तरी गोष्टीतून ती उद्भवतात. उदाहरणार्थ, पदार्थ किंवा ऊर्जा यांसारखं भौतिक घटित असेल, तर ते त्या पदार्थाच्या वा ऊर्जेच्या गतक्षणामधून आलेलं असतं. ते सातत्य असतं.
संतापाचं उदाहरणं घ्या. आपण संतापलेले असतो, तेव्हा आपल्याला शारीरिक ऊर्जा जाणवत असल्याचं आपण बोलू शकतो, हा एक भाग झाला. परंतु, संताप अनुभवण्याच्या मानसिक कृतिशीलतेचा विचार करा- भावना उद्भवण्याचा अनुभव घेणं आणि त्याबद्दल जाणिवेच्या किंवा नेणिवेच्या पातळीवर जागरूकता असणं. एखादी व्यक्ती संतापाचा अनुभव घेते, तेव्हा त्या जीवनकाळातील सातत्याचे काही गतक्षण त्याला कारणीभूत असतात, पण त्याहीआधीपासून हे सातत्य आलेलं आहे का? एकतर ते पालकांकडून आलं असेल, आणि हे कसं घडतं याचं स्पष्टीकरण देणारी काही यंत्रणा असल्याचं दिसतं, किंवा ती निर्मिक देवाकडून आलेली असेल. परंतु, एखादं सर्वशक्तिमान अस्तित्व निर्मिती करतं, या स्पष्टीकरणामध्ये तार्किक विसंगती असल्यामुळे समस्या निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी पर्यायी मांडणी अशी करता येते की, कोणाच्याही आयुष्यातील संतापाचा पहिला क्षण स्वतःच्याच सातत्यातील गतक्षणामधून आलेला असतो. पुनर्जन्माचा सिद्धान्त हेच स्पष्टीकरण देतो.
चित्रपटाशी असलेली सादृश्यता
चित्रपटाचं उदाहरण घेऊन आपण पुनर्जन्म समजून घ्यायला प्रयत्न करू शकतो. चित्रपटामध्ये काही चौकटींचं सातत्य असतं, त्याचप्रमाणे एका जीवनातील आणि एका जीवनातून पुढील जीवनामधील घटितांबद्दलच्या सतत बदलणाऱ्या जागरूक क्षणांचं सातत्य म्हणजे आपलं मानसिक सातत्य किंवा मनोप्रवाह होय. यात एखादा घनरूप, शोधता येईल असा, म्हणजे ‘मी’ किंवा ‘माझं मन’ असा, घटक पुनर्जन्म घेत नसतो. वाहकपट्ट्यावर बसून या जन्मातून पुढच्या जन्मात जाणाऱ्या लहानशा मूर्तीसारखं हे उदाहरण नाही. याउलट, पुनर्जन्म चित्रपटासारखा असतो, सतत बदलणारा असतो. प्रत्येक चौकट वेगळी असते, पण त्यात सातत्य असतं. एक चौकट दुसऱ्या चौकटीशी संबंधित असते. त्याचप्रमाणे घटितांबद्दलच्या जागरूक क्षणांचं सातत्य सतत बदलतं असतं, त्यातील काही क्षण नेणिवेतीलही असतात. शिवाय, सर्व चित्रपट हे चित्रपटच असले तरी ते एकसारखेच नसतात, त्याप्रमाणे सर्व मानसिक सातत्यं किंवा ‘मनं’ एकसारखी नसतात. घटितांबदद्लच्या जागरूकतेच्या सातत्याचे अगणित व्यक्तिगत प्रवाह असतात आणि त्यातील प्रत्येकाला आपापल्या परिप्रेक्ष्यातून ‘मी’ असं संबोधन लावता येतं.
पुनर्जन्म कशाचा होतो?
बौद्ध धर्मानुसार, पुनर्जन्म म्हणजे एखाद्या वाहकपट्ट्यावरून या जीवनातून दुसऱ्या जीवनात जाणारी छोटी मूर्ती किंवा व्यक्ती नव्हे. वाहकपट्टी काळाचं प्रतिनिधित्व करते आणि त्यातून सूचित होणारी प्रतिमा मूर्त वस्तूची आहे, ‘मी’ असं संबोधलं जाणारं निश्चित व्यक्तिमत्त्व किंवा अंतरात्मा काळातून प्रवास करत असल्याची सादृश्यता यात मांडलेली आहे: “आता मी तरुण आहे, आता मी वृद्ध आहे; आता मी या जीवनात आहे, आता मी त्या जीवनात आहे.” ही पुनर्जन्माची बौद्ध संकल्पना नाही. उलट, बौद्धविचारातील पुनर्जन्माची संकल्पना चित्रपटाच्या उदाहरणाशी सादृश्यता राखणारी आहे. चित्रपटाच्याबाबतीत चौकटींमधून सातत्य राखलं जातं, तसंच पुनर्जन्माबाबत असतं.
मी तुम्ही होतो किंवा आपण सर्व एक आहोत, असं बौद्ध धर्म म्हणत नाही. आपण सर्व एकच असू आणि मी तुम्ही असेन, तर अशा वेळी आपल्या दोघांनाही भूक लागल्यावर तुम्ही कारमध्ये वाट बघत बसलात तरी चालेल, मी खाऊन येऊ शकतो. पण हे तसं नसतं. आपल्या प्रत्येकामध्ये सातत्याचा व्यक्तिगत प्रवाह असतो. माझ्या चित्रपटातील दृश्यमालिका तुमच्या चित्रपटामध्ये रूपांतरित होणार नाही, पण आपली जीवनं चित्रपटांसारखी पुढे जातात म्हणजे ती ठोस व निश्चित नसतात. आयुष्य एका चौकटीतून पुढच्या चौकटीत जातं. त्यात कर्मानुसार काहीएक क्रम अनुसरलेला असतो, आणि त्यातून सातत्य घडतं.
प्रत्येक सातत्य म्हणजे कोणी तरी असतं, त्याला ‘मी’ असं संबोधता येईल; प्रत्येक सातत्य कोणीच नसतं असं नाही. चित्रपटाच्या शीर्षकामधून संपूर्ण चित्रपटाचा व त्यातील प्रत्येक चौकटीचा निर्देश केलेला असतो, पण प्रत्येक चौकटीमध्ये आपल्याला काही ठोस सापडेलच असं नाही, त्याप्रमाणे ‘मी’ म्हणजे व्यक्तिगत मानसिक सातत्य व त्यातील प्रत्येक क्षण असतो, पण कोणत्याही क्षणात आपल्याला ठोस काही सापडेलच असं नाही. तरीही, रूढ आकलनानुसार एक ‘मी’, ‘स्व’ असतो. बौद्ध धर्म ही काही शून्यवादी (निहिलिस्ट) व्यवस्था नाही.
सारांश
पुनर्जन्माबाबतची बौद्ध मांडणी आपण विवेकाच्या आधारे तपासतो, तेव्हा आपल्याला व्यक्तिगत मानसिक सातत्यं कायम ठेवणाऱ्या कारणभावाची प्रक्रिया तपासावी लागते. मानसिक कृतिशीलतेमधील व्यक्तिगत सातत्य कधीच नष्ट होत नाही. यातून आपण आरंभहीन पुनर्जन्माच्या निष्कर्षावर येतो. प्रत्येक जीवनकाळाला त्यातील वर्तनविषयक सवयी आकार देत असतात.