बौद्ध साधनेच्या आपल्या जीवनातील उपयुक्ततेविषयीचा भ्रम दूर करणे
मला ‘शरणागतीचा दैनंदिन जीवनाशी संबंध’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी सांगण्यात आले आहे. यावेळी मला महान भारतीय गुरू अतिषा यांच्या उदाहरणाची आठवण होते आहे. ते दहाव्या शतकाच्या अंतिम टप्प्यात तिबेटला गेले होते. बौद्ध धर्माच्या प्राथमिक धर्मप्रसारानंतर भारतात धर्मप्रसाराला उतरती कळा लागली, त्यावेळी ज्या गुरूंनी तिबेटमध्ये बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन केले, त्या महान गुरूंपैकी अतिषा एक होते. त्यावेळी तिबेटमध्ये बौद्ध धर्मातील अनेक अद्ययावत शिकवणी आणि तंत्रांबाबत गैरसमज होते. तिथे चांगले प्रशिक्षित गुरूही नव्हते. वास्तविक तिथे असे गुरूच नव्हते, जे योग्य रीतीने शिकवण देऊ शकतील. तिथे अनेक भाषांतरित धर्मग्रंथ होते, पण अर्थातच अधिकाधिक लोकांना वाचता येतील इतक्या प्रती उपलब्ध नव्हत्या. ते वाचू शकले तरी त्याविषयी योग्य मार्गदर्शन करणारे गुरूही अवतीभोवती नव्हते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी, पश्चिमी तिबेटमधील एका राजाने काही शूर विद्यार्थ्यांना महान बौद्ध गुरूंच्या शोधार्थ भारतात पाठविले. त्यासाठी त्यांना पाटपीट करावी लागली, निरनिराळ्या भाषा शिकाव्या लागल्या आणि हवामानातल्या बदलांचा सामना करावा लागला. त्यातील काही प्रवासा दरम्यानच मरण पावले तर काही भारतात पोहोचल्यावर मरण पावले. पण तशा परिस्थितीतही ते महान गुरू अतिषाना भारतातून तिबेटाला परत आणण्यात यशस्वी झाले. ते अनेक वर्षे तिथे वास्तव्यास होते. त्या दरम्यान त्यांनी मुख्यतः शरणागती आणि कर्माविषयी शिकवण दिली. खरेतर ते ‘शरणागत आणि कर्म लामा’ म्हणूनच ओळखले जात होते. तिबेटी लोक त्यांना त्यात नावाने ओळखत होते.
अतिषा यांचे उदाहरण आजही प्रासंगिक आहे. आजही बौद्ध धर्माबद्दल आणि यातल्या दैनंदिन साधनांविषयी गोंधळाची स्थिती आहे. शिवाय बौद्ध धर्मातील अद्ययावत शिकवण आणि तंत्रांबाबतही अनेक गैरसमजुती आहेत. अनेकदा लोक बौद्ध शिकवणींच्या मूलभूत ज्ञानाशिवाय किंवा अगदी अल्प ज्ञानाच्या आधारे साधना करू लागतात. त्यांच्या मते, एखादी जादुई प्रार्थना करणे म्हणजेच बौद्ध साधना आहे. शरणागती किंवा आश्रय घेण्याच्या महत्त्वाला आणि त्याच्या दैनंदिन जीवनातील परिणामकारकतेला कमी लेखून ते साधनेतील महत्त्वपूर्ण मुद्दा विसरतात.
आपल्या जीवनातील परिस्थिती काहीही असो, बौद्ध साधनेत स्वतःवर काम करण्याला, स्वतःत सुधारणा करण्याला आणि चांगली व्यक्ती बनण्याला महत्त्व आहे. ते आपल्या छंदासारखं किंवा एखादा खेळ खेळल्यासारखं दिवसातला अर्धा तास, आठवड्यातून एकदा किंवा कंटाळा आला म्हणून वरवरचं करण्याजोगं नाही. उलट एखाद्या व्यावहारिक कार्यासारखं ते नित्यनेमाने करायला हवं - सतत स्वतःवर काम करत राहणं. याचा अर्थ आपल्यातील कमतरता आणि आपल्यातील गुण ओळखून कमतरतांचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि चांगले गुण विकसित करण्यासाठी योग्य पद्धतींचा अभ्यास करणे. यात आपल्या कमतरतांवर मात करून चांगल्या गुणांची जाणीव विकसित करण्याचे उद्दिष्ट असते. या साधनेतून जीवनातील खरे सुख गवसल्याने आपला फायदा होतोच, पण ते त्याचे एकमेव उद्दिष्ट नसते. ती इतरांच्या मदतीसाठीही परिणामकारक असल्याने इतरांच्या फायद्यासाठीही गरजेची असते. हाच बौद्ध साधनेचा उद्देश असतो. या साधनांना त्यात अंतर्भूत पद्धतींमुळे बौद्ध स्वरूप मिळते, ज्याचा उपयोग वरील उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी योग्य बनण्यासाठी केला जातो आणि शरणागत होण्याचा अर्थ आपण त्या पद्धतींचा स्वीकार करून आपल्या जीवनात त्या अंमलात आणतो.
बौद्ध धर्मात आपण मनाविषयी चर्चा करतो, तेव्हा अधिक खोलात न जाता आपण मानसिक कृतीवर लक्ष केंद्रित करतो. ही अगदी झोपेतही घडणारी एक व्यक्तीगत आणि घटनात्मक मानसिक कृती आहे. मानसिक कृतींच्या व्यक्तिनिष्ठ अनुभव घटकांशी मनाचा संदर्भ असतो. तर मस्तिष्क विज्ञान त्याला शरीर विज्ञानाच्या पातळीवर स्पष्ट करते. दोन्ही पैकी कोणत्याही प्रकारात मानसिक कृतीच्या मूलभूत नैसर्गिक स्वरूपात गोंधळाची स्थिती किंवा क्रोधासारख्या इतर भावना असतीलच असे नाही. मूलतः प्रत्येक क्षणी तात्कालीन स्थितीतून जे भाव उद्भवतात, त्याला आपण मानसिक होलोग्राम (प्रतिकृती) म्हणू शकतो. उदाहरणार्थ, शारीरिक दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास, डोळ्यामार्फत प्रकाशकिरण आत येतात आणि त्यांचे विद्युत रासायनिक संकेतांमध्ये रूपांतरण होते, तिथून ते चेतापेशींमार्फत मेंदूकडे पाठवले जातात आणि तिथे त्यांचा अर्थबोध करणारा अंतर्गत होलोग्राम (प्रतिकृती) तयार होतो. त्यालाच एखादी गोष्ट ‘पाहणे’ म्हणतात, हो ना? अर्थात ही क्रिया मानवी डोळ्यातून पाहण्याऐवजी कोळी वा माशीच्या डोळ्याने पाहिल्यास ती फारच वेगळी असेल. अशाच पद्धतीने ‘ध्वनी लहरीं’च्या कंपनातून आपल्याला जो अनुभव येतो, त्याला ऐकणे म्हणतात. मानसिक होलोग्राम हा कोणत्याही प्रकारच्या संवेदना किंवा विचारातून निर्माण होतो.
पाहण्याची प्रक्रिया एखाद्या कॅमेऱ्यासारखी तांत्रिक नसते. ज्यात प्रकाशकण आत येतात, रासायनिक संकेतांमार्फत रूपांतरित होतात आणि त्यातून चित्र तयार होते. ते एकसारखे नसते कारण मानसिक होलोग्रामला ‘संज्ञानात्मक संबंध’ही असतो. तुम्ही चेतनावस्थेत असा किंवा अचेतन अवस्थेत, तुमच्या जाणिवा जागृत असोत किंवा अजागृत, तरीही ते तुमच्या मनाचे संज्ञानात्मक वैशिष्ट्यच असते.
मानसिक कृती ही संगणकासारखीही नसते. तुम्ही संगणकाची बटणे दाबता आणि मशिनमध्ये रासायनिक संकेत जातात. ही माहिती मशिन रूपांतरित करून घेते आणि ती एखाद्या प्रतिकृतीच्या रूपात संगणकाच्या पडद्यावर किंवा स्पीकरवर ध्वनीच्या रूपात अवतरते. तरी संगणकाच्या बाबतीतही काही अंशी संज्ञानात्मक संबंध असतो, कारण कृत्रिम बुद्धीच्या साहाय्याने माहिती प्रसारित होते. तरीही संगणक सजीवांसारखा नसतो. पण नेमकी कोणती गोष्ट आपल्याला संगणकापासून भिन्न ठरवते, तर आपण मानसिक कृतीशी संबंधित आनंद किंवा दुःखाची भावनाही अनुभवत असतो, जी संगणकात नसते. संगणक कोणत्याही गोष्टीसाठी आनंद किंवा दुःखाची भावना अनुभवत नाही. संगणक काही असा विचार करत नाही की, ‘अरेरे, माझ्यात काही अंतर्गत दोष निर्माण झालेला आहे आणि मी जेव्हा रिबूट केले तेव्हा मी काम करत असलेल्या काही फाइल नष्ट झाल्या.’ आणि अशा विचाराने त्याला दुःख होते. हे असे नसते, हो ना? उलट आपल्या बाबतीत असे काही झाल्यास आपण फार दुःखी होतो.
ही मानसिक क्रिया अशी क्रिया आहे जी आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी सुरू असते. मनात एखादा होलोग्राम तयार होतो, त्याच्याशी संबंधित एखादी मानसिक गुंतवणूक असते आणि सुख किंवा दुःखाशी संबंधित भावना असतात. अगदी आपण निद्रितावस्थेत असलो तरी, अंधकारमय होलोग्राम असू शकतो आणि त्याच्याशी संबंधित अनभिज्ञतेची भावना असू शकते. पण तरीही त्यात थोडी तरी जाणीव असते, नाहीतर आपण कधीच गजर ऐकू शकलो नसतो. आपली मनोवस्था पूर्ण बंद नसते. आपण स्वप्नं पाहत नसलो तरी तिथे काहीतरी भावना हालचाली असतातच. भलेही त्या ना सुख, ना दुःख अशा तटस्थ भावना असतील. आपण स्वप्न पाहत असू तर अर्थातच क्रोध, लोभ आणि इतर भावनांच्या जोडीला सुखदुःखाच्या भावनाही आपल्यात असतातच. पण या त्रासदायक भावना प्रत्येक क्षणाच्या संपूर्ण प्रक्रियेचा भाग असतीलच, असे नाही.
अर्थात असे अनेक गुंतागुंतीचे विचारप्रवाह असतात, ज्यांच्या मदतीने आपण मानसिक क्रियांच्या मूलभूत शुद्धतेबाबत अधिकाधिक विश्वास बाळगू शकतो. पण त्यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. पण आपण याबाबत जितका अधिक विचार करू, मानसिक क्रियांशी संबंधित तणावदायी भावनांपासून मुक्त होणे शक्य असल्याचा विश्वास तितकाच दृढ होत जाईल.
सरतेशेवटी तणावदायी भावनांची व्याख्याच सांगते की त्या जेव्हा उद्भवतात, आपली मनःशांती आणि आत्मनियंत्रण दोनही संपवतात. परिणामी आपण क्रोध, लोभ आणि इतर तणावदायी भावनांच्या आहारी जाऊन बंधनकारक वागतो. त्यातून फक्त समस्याच निर्माण होतात. उदाहरणार्थ, आपण स्वतःवरील नियंत्रण हरवून बसतो आणि दुसऱ्यावर ओरडताना विचार न करता अशा गोष्टी बोलतो, ज्याचा आपल्याला नंतर पश्चाताप होतो. त्यातून ‘नकारात्मक क्षमता’ही विकसित होतात, ज्या दुःखाला कारणीभूत होतात.
जर आपल्याला भविष्यातील समस्या मनापासून दूर ठेवायच्या असतील, तर आपल्याला तणावदायी भावना आणि गोंधळाच्या स्थितीपासून मुक्ती मिळवायला हवी. त्यांच्यापासून मुक्ती मिळवणे शक्य असते कारण त्या मनाचा अंगभूत भाग नसतात किंवा मानसिक कृतीचा भाग नसतात. शिवाय आपण क्षणागणिक अनुभवत असलेल्या अशा प्रकारच्या मानसिक कृतीविषयी अधिक विचार केल्यास लक्षात येईल की मानसिक कृतींचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या समज वाढवणाऱ्या असतात. आपण गोष्टी समजू शकतो. आपण प्रेम आणि करुणेसारखे सकारात्मक गुण वाढवू शकतो. अशा सकारात्मक क्षमता अधिकाधिक विकसित केल्या जाऊ शकतात.
यात नक्की काय फरक असतो? तणावदायी आणि अस्वस्थ करणारे घटक गोंधळावर आधारलेले असतात. तर सकारात्मक घटक परिस्थितीच्या वास्तविक आकलनावर आधारित असतात. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाल्यासः गोंधळाची स्थिती म्हणजे असा विचार की, ‘मी विश्वाचा केंद्रबिंदू आहे. मी सर्वात महत्त्वाचा आहे. माझ्याकडे कायम माझा मार्ग असायला हवा. आणि सगळ्यांचे लक्ष माझ्याकडेच असायला हवे.’ इत्यादि. त्यामुळे जेव्हा सगळ्यांचे आपल्याकडे लक्ष नसते आणि गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होत नसतील, आपण क्रोधित होतो. एखाद्या कुत्र्याप्रमाणे आपण दुसऱ्यावर भुंकत बसतो किंवा गुरगुरत राहतो. ‘तू मला हवे तसे केले नाहीस.’ अशा पद्धतीचा विचार गोंधळावर आधारलेला असतो. वास्तव हे आहे की आपण सगळे इथे एकसारखे आहोत. प्रत्येकाला त्याच्या मर्जीप्रमाणे गोष्टी व्हायला हव्या असतात आणि ते शक्य नसते. वास्तव हे आहे की आपण कसेतरी इतरांसोबत जगायला शिकायला हवे.