भय : अस्वस्थकारक भावना हाताळताना

10:53
जीवनात काहीही सकारात्मक साध्य करण्यामधील एक सर्वांत मोठा अडथळा भयाचा असतो. मनाची ही गोंधळलेली स्थिती जागरूक नसण्यामुळे निर्माण होते, विशेषतः सुरक्षित वाटणं म्हणजे काय याबद्दलचा अजाणतेपणा याला कारणीभूत असतो. परंतु, विविध आकस्मिक व तात्कालिक पद्धतींद्वारे आपण भयाच्या विळख्यातून स्वतःची सुटका करून घेऊ शकतो.

भय हाताळण्याच्या आकस्मिक पद्धती

तिबेटी बौद्ध धर्मामध्ये तारा ही एक स्त्री बुद्ध प्रतिमा आहे. भयापासून आपलं संरक्षण करणाऱ्या बुद्ध धर्मातील पैलूचं प्रतिनिधित्व ही प्रतिमा करते. शरीरातील ऊर्जा-वायू व श्वास यांचं प्रतिनिधित्वही तारा करते. शुद्ध स्वरूपात तारा म्हणजे कृती करण्याची व आपली उद्दिष्टं साध्य करण्याची क्षमता असते. या प्रतीकात्मकतेमधून अनेक आकस्मिक पद्धती सुचवलेल्या आहेत, त्याद्वारे आपण भय हाताळण्यासाठी श्वास व सूक्ष्म ऊर्जा यांवर काम करू शकतो. 

साधना, अभ्यास किंवा शिकवण ऐकणं यांपूर्वी आपण करतो त्या प्रारंभिक (प्राथमिक) उपासनांमधून आकस्मिक पद्धतींचा उगम होतो. या पद्धतींमुळे व त्याद्वारे आपल्याला आकस्मिक प्रसंगात शांत व्हायला मदत होते- आपण अतिशय घाबरलेले असू किंवा भयग्रस्त होण्याची सुरुवात असेल तेव्हा या पद्धती मदतीला येतात. अधिक खोलवरच्या पद्धतींचं उपयोजन करण्यापूर्वीची पहिली पावलं म्हणूनही या पद्धती उपयोगी पडतात. आपण खालील पाचही पद्धती किंवा त्यांपैकी एकीचं उपयोजन करू शकतो:

 1. डोळे बंद करून श्वसनचक्रं मोजावीत, श्वास आत घेणं व सोडणं यांना एक चक्र मानून हा प्रयोग करावा, श्वास आता येतो, खाली जातो, ओटीपोटाचा भाग वर होतो, मग खाली जातो आणि श्वास बाहेर जातो.
 2. डोळे अर्धवट उघडे ठेवून श्वसनचक्रं मोजावीत, अंधुक लक्ष केंद्रित करावं, खाली जमिनीकडे पाहावं; श्वास आत घेणं, थांबणं व श्वास सोडणं हे एक चक्र मानावं. थोड्या वेळाने आपला पार्श्वभाग खुर्चीला किंवा जमिनीला स्पर्श करतो आहे, या संवेदनेबद्दलची जागरूकता आणावी.
 3. आपल्याला काय साध्य करायची इच्छा आहे आणि तशी इच्छा का आहे यामागील प्रेरणा किंवा उदिद्ष्ट (अधिक शांत होणं) यांची कल्पना करावी. 
 4. कॅमेऱ्याच्या लेन्सप्रमाणे मन व ऊर्जा स्वच्छपणे दिसतील अशी कल्पना करावी.
 5. श्वास न मोजता श्वासोच्छवासावेळी ओटीपोट वर-खाली होतं त्यावर आणि शरीरातील सर्व ऊर्जा एकतानतेने वाहत असल्याच्या जाणिवेवर लक्ष केंद्रित करावं.

भय म्हणजे काय?

ज्ञात किंवा अज्ञात गोष्टीबद्दल वाटणारी शारीरिक व भावनिक अस्वस्थता म्हणजे भय. ही अस्वस्थता नियंत्रणात आणण्याची, हाताळण्याची किंवा त्यावर आपल्या इच्छेनुसार परिणाम साधेल अशी काही क्षमता आपल्यामध्ये नाही, असं आपल्याला वाटतं. आपल्याला ज्या गोष्टीचं भय वाटतं त्यापासून आपल्याला दूर जायचं असतं आणि अशा गोष्टीबद्दल तीव्र तिटकारा वाटतो. सर्वसाधारण चिंतेच्या रूपातील भय असेल, विशिष्ट वस्तूच्या संदर्भातील भय नसेल, तरीही त्या अनिश्चित ‘कशापासून’ तरी दूर जाण्याची तीव्र इच्छा आपल्या मनात असते.

भय म्हणजे केवळ संताप नव्हे. तरीही, संतापाप्रमाणे इथेही आपल्याला ज्या वस्तूविषयी भय वाटतं आहे त्याच्या नकारात्मक वैशिष्ट्यांना अवाजवी महत्त्व दिलं जातं आणि “मी”पणाही वाढलेला असतो. आपल्याला संबंधित परिस्थिती नियंत्रणात आणता येत नाही किंवा हाताळता येत नाही हा भेद जाणणाऱ्या (ओळखणाऱ्या) मानसिक घटकाची भर संतापामध्ये घालण्याचं काम भय करतं. मग आपल्याला कशाचं भय वाटतं याकडे आपण लक्ष देतो आणि भेद जाणण्याचा मार्ग म्हणून स्वतःकडेही लक्ष देतो. भेद जाणण्याचा व लक्ष देण्याचा हा मार्ग अचूक किंवा चुकीचा असू शकतो.

भयासोबत अजाणपणा असतो

भयासोबत कायमच वास्तवाच्या कोणत्यातरी वस्तुस्थितीविषयीचा अजाणपणा (गोंधळ) असतो- एकतर ती वस्तुस्थिती आपल्याला माहीत नसते किंवा वास्तवाचा विपर्यास होईल अशा रितीने माहीत असते. या संदर्भातील सहा संभाव्य तऱ्हा पाहू.

(१) एखादी परिस्थिती आपल्याला नियंत्रणात आणता येत नसेल किंवा हाताळता येत नसेल, तेव्हा आपल्याला भय वाटतं, आपल्या भयाला कार्यकारणसंबंधांविषयीचा व गोष्टी कशा अस्तित्वात आहेत यासंबंधीचा अजाणपणा कारणीभूत असू शकतो. स्वतःकडे आणि आपल्याला कशाचं भय वाटतं याकडे लक्ष देण्याच्या भयग्रस्त मार्गाची सांकल्पनिक उद्दिष्टे अशी:

 • ठोस अस्तित्वात असलेला “मी”- केवळ स्वतःच्या ताकदीवर सर्व काही (उदाहरणार्थ, मुलाला दुखापत होऊ न देणं) नियंत्रणात आणण्याची क्षमता राखून असलेला किंवा असलेली.
 • ठोस अस्तित्त्वात असलेली “गोष्ट”- इतर कशाचा प्रभाव नसलेल्या अवस्थेत स्वतःहून अस्तित्वात असलेली गोष्ट, जी केवळ आपल्याच प्रयत्नांनी नियंत्रणात आणणं शक्य असतं, पण काही वैयक्तिक अपुरेपणामुळे आपल्याला ते शक्य होत नाही.

अस्तित्वात असण्याचे आणि कार्यकारणसंबंधांच्या परिणामांचे हे अशक्य मार्ग असतात.

(२) एखादी परिस्थिती हाताळणं शक्य नसल्याचं भय आपल्याला वाटतं, तेव्हा त्यासोबत येणारा अजाणपणा मनाच्या स्वरूपाचा व अशाश्वत असू शकतो. आपल्याला स्वतःच्या भावना किंवा आपली प्रिय व्यक्ती गमावण्याची स्थिती हाताळता येणार नाही असं भय आपल्याला वाटतं. आपले वेदनेचे व दुःखाचे अनुभव केवळ दृश्य घटकांमधून उद्भवतात व त्यातूनच जाणवतात याबद्दल आपण अजाण असतो. हे घटक अशाश्वत असतात व ते निघून जातात- आपल्या दातामध्ये ड्रिलिंग करणाऱ्या डेन्टिस्टकडून मिळणाऱ्या वेदनेसारखा हा प्रकार असतो.

(३) एखादी परिस्थिती हाताळण्याची क्षमता आपल्यात नाही, याचं भय आपल्याला वाटतं. ती परिस्थिती आपल्याला एकट्याने हाताळता येत नाही, हे भय त्यामागे असू शकतं. एकटं असण्याचं व एकाकीपणाचं भय त्यात अध्याहृत असू शकतं. ही परिस्थिती निवारण्यासाठी आपल्याला दुसरं कोणीतरी सापडेल, असा विचार आपण करतो. इथे सांकल्पनिक उद्दिष्टं पुढीलप्रमाणे असतात-

 • ठोस अस्तित्वात असलेला “मी”- अकार्यक्षम, अपुरा, पुरेसा चांगला नसलेला आणि कधीही काही शिकू न शकणारा कोणीतरी.
 • ठोस अस्तित्वात असलेला “कोणीतरी दुसरं”- माझ्याहून चांगलं असणारं व मला वाचवू शकेल असं कोणीतरी.

इतर लोक व आपण कसे अस्तित्वात असतो यांबद्दलच्या अजाणपणाचं व कार्यकारणसंबंधांच्या अजाणपणाचं हे आणखी निराळं रूप आहे. एखादी गोष्ट हाताळण्याची क्षमता येण्यासाठी पुरेसं ज्ञान आपल्याकडे नसणं शक्य आहे- उदाहरणार्थ, आपली कार बंद पडली, तर तिथे आपली मदत करण्यासाठी आवश्यक ज्ञान असलेली सक्षम व्यक्ती दुसरी कोणीतरी असू शकते. परंतु, आपल्या कार्यकारणसंबंधांद्वारे आपण शिकू शकत नाही, असा याचा अर्थ नव्हे.

(४) आपल्याला कोणाचं तरी, उदाहरणार्थ- आपल्या रोजगारदात्याचं, भय वाटतं, तेव्हा आपण त्यांच्या प्रचलित स्वभावांविषयी अजाण असतो. आपले रोजगारदाते मानव आहेत, आपल्यासारख्याच भावभावना त्यांना आहेत. त्यांना सुखी व्हायचं असतं, दुःखी व्हायचं नसतं, आणि ते इतरांना प्रिय असावेत, अप्रिय होऊ नयेत असंच त्यांना वाटत असतं. कार्यालयाबाहेरही त्यांचं जीवन असतं आणि त्याचा त्यांच्या मनस्थितीवर परिणाम होतो. आपण आपल्या रोजगारदात्यांशी मानवी पातळीवर संबंध जोडू शकतो, आणि आपल्या परस्परांच्या स्थानांविषयी सजग राहिलो, तर आपल्याला कमी भय वाटेल.

(५) त्याचप्रमाणे आपल्याला सापांचं वा कीड्यांचं भय वाटतं, तेव्हा तेही आपल्याप्रमाणे बोधक्षम जीव आहेत आणि त्यांनाही सुखी व्हायचं असतं, दुःखी व्हायचं नसतं याबद्दल आपण अजाण असतो. एखादी प्रजाती म्हणून अंगभूत ओळख नसलेल्या व्यक्तिगत मानसिक सातत्याचा वर्तमान आविष्कार एवढंच त्यांचं अस्तित्व आहे, याबद्दल आपण अजाण असणं शक्य असतं, असं बौद्ध दृष्टिकोनानुसार म्हणता येतं. हे जीव गतजन्मांमध्ये आपल्या माता राहिलेले असू शकतात, याबद्दल आपण अजाण असतो.

(६) आपल्याला अपयशाचं किंवा आजाराचं भय वाटतं, तेव्हा आपण स्वतःच्या मर्यादित सांसारिक जीव प्रचलित स्वभावाबाबत अजाण असतो. आपण परिपूर्ण नसतो आणि अर्थातच आपण चुका करतो, काही वेळा अपयशी होतो व आजारी पडतो. “संसाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?”

सुरक्षित वाटणं

बौद्ध परिप्रेक्ष्यानुसार सुरक्षित वाटण्यामध्ये खालील गोष्टी अंतर्भूत नाहीत-

 • सर्वशक्तिमानत्व अशक्य असल्यामुळे आपल्या रक्षणासाठी अशा एखाद्या सर्वशक्तिमान जीवाकडे वळणं.
 • शक्तिमान जीव एखाद्या मार्गाने आपल्याला मदत करू शकणार असेल, तरी संरक्षण अथवा मदत मिळवण्यासाठी त्या जीवाला प्रसन्न ठेवण्याची किंवा त्याला दक्षिणा देण्याची किंवा बळी देण्याची गरज.
 • स्वतःच सर्वशक्तिमान होणं.

सुरक्षित वाटण्यासाठी आपल्याला खालील गोष्टी गरजेच्या आहेत-

 1. आपल्याला कशाचं भय वाटतं हे जाणून घ्यावं आणि त्यामधील गोंधळ व अजाणपणा लक्षात घ्यावं.
 2. आपल्याला ज्या गोष्टीचं भय वाटतं ती हाताळणं म्हणजे काय याची वास्तववादी कल्पना असावी, विशेषतः त्यामधील गोंधळापासून स्वतःला मुक्त करण्यासाठी अशी कल्पना आवश्यक आहे.
 3. एका विशिष्ट क्षणी व दीर्घकालीन परिस्थितीमध्ये भय हाताळण्याच्या आपल्या क्षमतांचं मूल्यांकन करावं, त्यात स्वतःला कमी किंवा जास्त मूल्य देऊ नये, आणि आपल्या विकासाचा विद्यमान टप्पा स्वीकारावा.
 4. आपल्याला आत्ता जे करणं शक्य असेल त्याची अंमलबजावणी करावी- आपण ते करत असू, तर त्याचा आनंद घ्यावा; आणि आपण ते करत नसू, तर आपल्या विद्यमान क्षमतांचा सर्वोत्तम वापर करून ते सोडवावं व ते करण्याचा प्रयत्न करावा.
 5. आत्ता आपल्याला ते पूर्णतः हाताळणं शक्य नसेल, तर ते पूर्णतः हाताळता येईल अशा बिंदूपर्यंत त्याचा विकास कसा साधायचा हे जाणून घ्यावं.
 6. विकासाचा तो टप्पा गाठण्याचं उद्दिष्टा ठेवून त्या दिशेने काम करावं.
 7. आपण सुरक्षित दिशेने जात आहोत, याची जाणीव ठेवावी.

बौद्ध धर्मात ज्याला “सुरक्षित दिशेने जाणं” (आश्रय घेणं) म्हणतात त्याचं वर्णन वरच्या सात टप्प्यांमध्ये आलं आहे. ही निष्क्रिय स्थिती नाही, तर आपल्या जीवनामध्ये सुरक्षित दिशा यावी यासाठी सक्रिय करणारी स्थिती आहे- वास्तववादी रितीने कृती करण्याची ही दिशा आहे, आपल्याला स्वतःच्या भीतीपासून मुक्त करणारी ही दिशा आहे. परिणामी, आपल्याला सुरक्षित व संरक्षित वाटतं, कारण आपण जीवनातील सकारात्मक व अचूक दिशेने जात आहोत हे आपल्याला माहीत असतं. अखेरीस सर्व समस्या व अडचणी यांपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला यातून बळ मिळतं.

भयग्रस्त परिस्थिती कशी हाताळायची याचा वास्तववादी दृष्टिकोन

आपण पुढील गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात:

 • आपल्या प्रियजनांबाबत किंवा आपल्याबाबत जे काही घडतं ते व्यक्तिगत कर्मजन्य शक्तींच्या प्रचंड जाळ्याच्या परिपक्वतेतून झालेलं असतं, त्याचप्रमाणे त्यात ऐतिहासिक, सामाजिक व आर्थिक शक्तींचाही हातभार असतो. अपघात व इतर अवांछित गोष्टी होणार आणि आपण आपल्या प्रियजनांना त्यापासून वाचवू शकणार नाही, मग आपण कितीही काळजी घेतली व त्यांना कितीही काळजी घेण्याचा सल्ला दिला तरी ते घडतंच. आपण केवळ त्यांना सुज्ञ सल्ला देऊन शुभेच्छा देऊ शकतो.
 • अपघात व भय यांवर मात करण्यासाठी आपण भावशून्यतेचा असांकल्पनिक बोध प्राप्त करणं गरजेचं आहे. परंतु, भावशून्यतेमध्ये पूर्णतः बुडून जाणं, याचा अर्थ आपली मस्तकं जमिनीमध्ये गाडून घेणं नव्हे. भयापासून दूर पळणं, असाही याचा अर्थ नाही. तर, आपलं कर्म अवांच्छित गोष्टींमध्ये परिपक्व होतं आणि आपल्यामध्ये भय उत्पन्न करतं, याबाबतीतला अजाणपणा व गोंधळ नष्ट करण्याची ही पद्धत आहे.
 • आपल्याला स्वतःच्या कर्मापासून शुद्ध करण्यासाठी भावशून्यतेच्या असांकल्पनिक बोधावर काम करावं लागतं, तसं करत असताना आपल्याला सर्व टप्प्यांवर आणि संसारातून मुक्तीच्या टप्प्यावरही (अरहत) अपघात व भय यांचा अनुभव येतो. चढ-उतार हा संसाराचा स्वभाव आहे. प्रगती एकरेषीय नसते; काही वेळा गोष्टी धड होतात आणि काही वेळा धड होत नाहीत.
 • अरहत म्हणून मुक्ती प्राप्त झाल्यानंतरही आपल्याला अपघात व आपल्याला नको असलेल्या गोष्टी अनुभवाव्या लागतात. परंतु, वेदना व दुःख यांच्याविना आपल्याला ते अनुभव येतात, कारण भयाविना सर्व अस्वस्थकारक भावना व मनोवृत्तींपासून आपण मुक्त असतो. अरहत झाल्याच्या टप्प्यावरच आपल्याला स्वतःचं सर्व भय खोलवर पद्धतीने हाताळणं शक्य होतं.
 • साक्षात्कार झाल्यानंतरच आपल्याला अपघात व अवांछित घटना अनुभवाव्या लागत नाहीत. बुद्ध निर्भीडपणे जाहीर करतो की:
 • सर्व गुण व कौशल्य यांच्यासह त्याला किंवा तिला स्वतःला झालेली जाणीव.
 • मुक्त व साक्षात्कार यांना प्रतिबंध करणाऱ्या सर्व अडथळ्यांना त्याने किंवा तिने स्वतः थोपवणं.
 • मुक्ती व साक्षात्कार यांसाठी इतरांना ज्या अडथळ्यांपासून मुक्त व्हायची गरज आहे, ते अडथळे.
 • स्वतःला अडथळ्यांपासून मुक्त करण्यासाठी इतरांना ज्यांवर अवलंबून राहावं लागतं त्या विरोधीक शक्ती.

भय हाताळण्यासाठीच्या तात्कालिक पद्धती

 1. वर उल्लेख केलेल्या सात टप्प्यांद्वारे जीवनात सुरक्षित दिशेला जात आहोत ना, याची खातरजमा करणं.
 2. कॅन्सरची चाचणी किंवा तत्सम भयग्रस्त परिस्थितीला सामोरं जात असताना त्या क्षणी घडू शकणाऱ्या सर्वांत वाईट प्रसंगाची कल्पना करावी आणि आपण तो प्रसंग कसा हाताळला असता याचीही कल्पना करावी. याने आपल्याला अज्ञाताचं भय घालवायला मदत होते. 
 3. कोणतीही गोष्ट हातात घेण्यापूर्वी, उदाहरणार्थ- विमानात बसण्यासाठी विमानतळावर जायचं असेल, तर अपयश आल्यास त्यावरील अनेक उपाय तयार असावेत, जेणेकरून आपलं उदिद्ष्ट साध्य करण्याचा इतर काहीच मार्ग नाही अशा भयग्रस्त परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागू नये.
 4. शांतिदेव यांनी शिकवल्यानुसार, भयकारक परिस्थिती निर्माण झाली आणि आपल्याला त्याबाबत काही करणं शक्य असेल, तर चिंता का करावी, जे करणं शक्य आहे ते करावं. आपल्याला काहीच करता येणार नसेल, तरीही चिंता का करावी, त्याचाही काही उपयोग होणार नाही.
 5. मुक्तीच्या मार्गावरही भय व दुःख अनुभवावं लागतंच, त्यामुळे आपण स्वतःची मनं महासागराइतकी खोल व विस्तृत असल्याचं जाणून त्यावर लक्ष केंद्रित करावं, आणि आपल्याला भय वाटतं किंवा दुःख होतं, तेव्हा समुद्रातील लाटेप्रमाणे ते ओसरू द्यावं. लाटेने काही समुद्राची शांतता व खोली यांना बाधा येत नाही.
 6. आपण स्वतःच्या रचनात्मक कृतींद्वारे पुरेशी सकारात्मक कर्मजन्य शक्ती (पुण्य) कमावली असेल, तर भावी जीवनांमध्येही अमूल्य मानवी शरीरच मिळेल याबद्दल आपण खात्री बाळगू शकतो. भयापासूनचं सर्वोत्तम संरक्षण म्हणजे आपलं सकारात्मक कर्म. परंतु, चढ-उतार हा संसाराचा स्वभाव आहे, हेदेखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे.
 7. भयंकर परिस्थितीला सामोरं जाताना आपण तारा किंवा वैद्यक बुद्ध यांसारख्या धर्मसंरक्षक किंवा बुद्धप्रतिमांच्या मदतीची विनंती करणारा विधी करवून घेऊ शकतो किंवा स्वतः करू शकतो. आपला बचाव करतील असे हे सर्वशक्तिमान जीव नसतात. आपण त्यांच्या साक्षात्कारी प्रभावाची विनंती करतो व प्रभाव स्वीकारतो, जेणेकरून आपल्या गतकालीन रचनात्मक कृतींमधील कर्मजन्य शक्तींना परिपक्व करणारी परिस्थिती म्हणून ते सक्रिय व्हावेत. आपल्या गतकालीन विध्वंसक कृती यशाला प्रतिबंध करणाऱ्या गंभीर अडथळ्यांमध्ये परिपक्व होऊ शकतात, त्यामुळे आपल्या अशा कृतींना क्षुल्लक गैरसोयींपुरती परिपक्वता देणाऱ्या परिस्थितींच्या रूपात या साक्षात्कारी प्रभावांनी कृती केली, तर तो अधिक सुरक्षित परिणाम असतो. तर, अडचणींनी घाबरून जाण्याऐवजी आपण त्यांना नकारात्मक कर्मजन्य शक्ती “संपवणारा” घटक मानून त्यांचं स्वागत करतो.
 8. आपल्या बुद्धस्वरूपांवर शिक्कामोर्तब करणं. अवघड व भयग्रस्त परिस्थिती समजून घेण्यासाठी (आरशासारखी सखोल जागरूकता), आकृतिबंध ओळखण्यासाठी (सखोल जागरूकतेचं समकरण), परिस्थितीमधील व्यक्तिगतता जाणून घेण्यासाठी (सखोल जागरूकतेचं व्यक्तिकरण), आणि कृती कशी करावी हे कळून घेण्यासाठी (आपल्याला काहीच करता येणार नाही हे लक्षात येण्याचाही यात समावेश होतो) (सखोल जागरूकता साध्य करणं) सखोल जागरूकतेच्या पायाभूत पातळ्या आपल्याकडे असतात. कृती करण्यासाठी प्रत्यक्ष ऊर्जेची पायाभूत पातळीही आपल्याकडे असते.
 9. बुद्धस्वरूप असणं म्हणजे आपल्यामध्ये सर्व गुण पूर्ण स्वरूपात अस्तित्वात आहेत यावर शिक्कामोर्तब करणं. पाश्चात्त्य मानसशास्त्रीय संज्ञांनुसार, हे गुण जाणिवेच्या पातळीवर असतील किंवा नेणिवेच्या पातळीवर असतील (आपण त्यांच्याविषयी सजग असू किंवा नसू, आणि त्यांचा विविध तीव्रतेने विकास झालेला असू शकेल). अनेकदा आपण नेणिवेतील गुणांना “छाया” असं संबोधतो. कारण, नेणीव अज्ञात असते, तिच्याबाबतीत अजाण असण्यातून निर्माण झालेला ताण अज्ञाताच्या भयावाटे आविष्कृत होतो आणि आपल्याला अज्ञात नेणिवेतील गुणांची भीती वाटते. तर, आपण आपल्या जाणिवेतील बौद्धिक बाजूशी परिचय करून घेऊ शकतो आणि आपल्या अज्ञातामधील, नेणिवेतील भावनिक बाजू दुर्लक्षू शकतो किंवा नाकारू शकतो. भावनिक बाजूला आपण छाया मानू शकतो आणि अतिशय भावनिक असलेल्यांबद्दल भय बाळगू शकतो. आपल्याला स्वतःच्या भावनिक बाजूबद्दलही भय वाटू शकतं आणि आपल्या भावनांशी आपला संपर्क तुटेल अशी चिंताही वाटू शकते. आपण स्वतःच्या जाणिवेतील भावनिक बाजूशी परिचय करून घेतला आणि नेणिवेतील बुद्धिजीवी बाजू नाकारली, तर आपण बुद्धिजीवी बाजूला छाया मानू शकतो आणि बुद्धिजीवी असलेल्यांची धास्ती बाळगू शकतो. आपल्याला कोणतीही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करायचं भय वाटू शकतं आणि बौद्धिकदृष्ट्या नीरस होण्याबाबत चिंता वाटू शकते. तर, आपण दोन्ही बाजू आपल्या आत पूर्ण होतात, आणि ते आपल्या बुद्धस्वरूपाचे पैलू आहेत, हे समजून घेणं गरजेचं आहे. या दोन्ही बाजू जोडप्याप्रमाणे एकमेकांना आलिंगन देत आहेत, असं तंत्राधारित कल्पनाचित्र आपण रंगवू शकतो आणि आपण स्वतः पूर्ण जोडपं आहोत, केवळ त्या जोडीतील एकच सदस्य नाही, हे लक्षात घेऊ शकतो.
 10. आपल्या बुद्धस्वरूपाविषयीचा आणखी एक पैलू समजून घ्यायला हवा- मनाचं स्वरूप हे निसर्गतः सर्व भयापासून मुक्त असतं, त्यामुळे भय अनुभवणं म्हणजे वरवरच्या घटनांपासून दूर पळणं असतं.
 11. भयग्रस्त परिस्थितींना सामोरं जाण्यासाठीचं धाडस इतरांमध्येही असावं यासाठीची प्रेरणा आपण देऊ शकतो, हा बुद्धस्वरूपाचा आणखी एक पैलू समजून घ्यायला हवा.

सारांश

आपण भयाने भारून गेलेलो असतो तेव्हा आपल्याला भय हाताळण्याच्या या पद्धती लक्षात आल्या, तर आपण शांत होऊ शकतो आणि भयंकर वाटणारी कोणतीही परिस्थिती वास्तववादी मार्गाने हाताळू शकतो.

Top