सुखाचे स्रोत

सुखाचा स्रोत अंतःस्थ असतो. आपली मनं शांत असतील, आपला दृष्टिकोन सकारात्मक पण वास्तववादी असेल, आपले विचार दयेने इतरांकडे वळलेले असतील, तेव्हा आपल्याला सुखाचा अनुभव येतो आणि आपल्या समोर कोणत्याही अडचणी असतील तरी या सुखातून आपल्याला सामर्थ्य व धाडस मिळतं. बुद्धाने म्हटल्याप्रमाणे आपल्याला सुखी व्हायचं असेल, तर आपण आपली मनं नियंत्रणात आणणं गरजेचं आहे.

सर्वसामान्य सुख: बदलाचं दुःख

बौद्ध धर्म नकारात्मक आहे, त्यात सर्व अनुभव दुःखाशी जोडले जातात आणि सुखाची अजिबातच दखल घेतली जात नाही, असं चित्रण काही लोक करतात. परंतु, हे मत चुकीच्या माहितीवर आधारित आहे. आपलं सर्वसामान्य सुख म्हणजे बदलाचं दुःख असतं, अशी बौद्ध धर्मातील मांडणी आहे, हे खरंच आहे. अशा प्रकारचं सुख असमाधानकारक असतं, असा याचा अर्थ होतो: हे सुख टिकत नाही आणि आपल्याला ते कधीच पुरेसं वाटत नाही. हे खरं सुख नव्हे. उदाहरणार्थ, आइसक्रीम खाणं हे खरं सुख असेल, तर एका बैठकीत आपण जितकं अधिक आइसक्रीम खाऊ तितके आपण अधिक सुखी व्हायला हवं. पण काही वेळ गेल्यावर आइसक्रीम खाण्याचं सुख दुःखामध्ये बदलतो. उन्हात बसणं किंवा सावलीत जाणं, यासुद्धा अशाच कृती आहेत. बदलाचं दुःख म्हणजे हेच.

परंतु, आपल्या सर्वसामान्य सुखाच्या मर्यादांवर, बदलाच्या दुःखावर मात करून बुद्धासारखं चिरंतन आनंदी स्थितीपर्यंत पोचण्यासाठी बौद्ध धर्म आपल्याला अनेक पद्धती पुरवतो. सर्वसामान्य सुखामध्ये त्रुटी असल्या तरी त्या पद्धतीचं सुख साध्य करण्याचे स्रोतही बौद्ध धर्मामध्ये स्पष्ट करून सांगितले आहे. प्रत्येकाला सुखी व्हायचं असतं आणि कोणालाही दुःखी व्हायचं नसतं, हे बौद्ध धर्माचं एक मूलभूत स्वयंसिद्ध तत्त्व आहे, त्यामुळे बौद्ध धर्म ही शिकवण देतो. सर्वसामान्य जीव म्हणून प्रत्येक जण सुखाच्या शोधात असतो, आणि आपल्याला नेहमीच्या सर्वसामान्य सुखाव्यतिरिक्त इतर प्रकारचं सुख माहीत नसतं, त्यामुळे हे सुख साध्य कसं करायचं, हेसुद्धा बौद्ध धर्मात सांगितलेलं आहे. सर्वसामान्य सुखाच्या सर्वांत प्राथमिक पातळीवर सुखाची इच्छा व गरज पूर्ण झाल्यावरच आपण अधिक खोलवरच्या व अधिक समाधान देणाऱ्या पातळ्यांकडे जाऊ शकतो आणि त्यासाठी अधिक प्रगत आध्यात्मिक उपासना करू शकतो.

परंतु, महान भारतीय बौद्ध गुरू शांतिदेव यांनी बौधिचर्यावतार (तिबेटी: स्प्योद-जुग) १.२७ मध्ये लिहिल्यानुसार, दुर्दैवाने:

दुःख दूर लोटण्याची इच्छा असलेल्या मनासह ते घाईगडबडीने दुःखाकडेच धावत जातात. त्यांना सुख मिळवण्याची इच्छा असते, पण भाबडेपणामुळे स्वतःचा आनंदच शत्रू असल्याप्रमाणे नष्ट करून टाकतात.

निराळ्या शब्दांत सांगायचं तर, आपली इच्छा सुख मिळवण्याची असली, तरी त्याच्या स्त्रोतांबाबत आपण भाबडे असतो, त्यामुळे स्वतःसाठी अधिक सुख निर्माण करण्याऐवजी आपण केवळ अधिक दुःख आणि व्यथा निर्माण करतो.

सुख ही भावना आहे

सुखाचे विविध प्रकार असले, तरी इथे आपण सर्वसामान्य सुखावर लक्ष केंद्रित करणार आहोत. या सुखाचे स्रोत समजून घेण्यासाठी आपल्याला आधी “सुख” या शब्दाचा अर्थ काय याबद्दल स्पष्टता आणणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांना हवं असलेलं हे सुख (ब्दे-बा) म्हणजे काय असतं? बौद्ध विश्लेषणानुसार, सुख हा मानसिक घटक आहे- म्हणजे निराळ्या शब्दांत सांगायचं तर, ही खास मानसिक क्रिया आहे, त्याद्वारे आपण एखाद्या वस्तूविषयी विशिष्ट मार्गाने जागरूक होतो. “भावना” (त्शोर-बा; संस्कृत- वेदना) या एका व्यापक मानसिक घटकाचा हा एक घटक आहे. भावनेमध्ये पूर्ण सुखी इथपासून ते पूर्ण दुःखी इथपर्यंतचा मोठा पट सामावलेला असतो.

“भावना” या शब्दाची व्याख्या काय? अनुभवाचं (म्योंग-बा) स्वरूप असलेला मानसिक घटक म्हणजे भावना. एखादी वस्तू किंवा परिस्थिती अनुभवताना त्यातून संबंधित वस्तू व परिस्थिती यांच्याशी निगडित अनुभव तयार होईल अशी मानसिक क्रिया म्हणजे भावना. सुख व दुःख यांदरम्यानच्या पटावरची एखादी भावना असल्याशिवाय आपल्याला कोणतीही वस्तू वा परिस्थिती प्रत्यक्षात अनुभवता येत नाही. संगणक डेटा स्वीकारून त्यावर प्रक्रिया करतो, पण संगणकाला हे सर्व करत असताना सुख व दुःख अशा भावना जाणवत नाहीत, त्यामुळे संगणकाला डेटाचा अनुभव येत नाही. संगणक व मन यांच्यात हा फरक आहे.

ज्ञानेंद्रियांना जाणवेल अशा वस्तूंचा बोध- दृष्टी, ध्वनी, गंध, चव, किंवा आनंद वा वेदना यांसारख्या शारीरिक संवेदना किंवा आपण कशाबद्दल तरी विचार करतो तेव्हासारखा मानसिक वस्तूंचा बोध, यांसोबत सुख वा दुःखाची पातळी जाणवत असते. ती नाट्यमय किंवा टोकाची असणं गरजेचं नसतं. ती अतिशय खालच्या पातळीवरची असू शकते. किंबहुना, आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणी आपल्याला काहीएका पातळीवर सुख वा दुःख यांची भावना जाणवत असते. अगदी आपण स्वप्नही न पडणाऱ्या गाढ झोपेत असलो, तरी आपल्याला तटस्थ भावनेचा अनुभव येत असतो.

सुखाची व्याख्या

बौद्ध धर्मामध्ये सुखाच्या दोन व्याख्या सांगितलेल्या आहेत. एक व्याख्या वस्तूशी असलेल्या आपल्या संबंधांसंदर्भातील आहे, तर दुसरी व्याख्या त्या भावनेच्या मनोवस्थेशी असलेल्या आपल्या संबंधांसदर्भातील आहे. 

  • कशाचा तरी समाधानकारक रितीने अनुभव येणं म्हणजे सुख, अशी पहिली व्याख्या आहे. हा अनुभव इतरांना लाभदायक आहे, अशा धारणेवर हे सुख आधारलेलं आहे. मग प्रत्यक्षात इतरांना त्याचा लाभ होतो की नाही, हा वेगळा भाग. कशाचा तरी असमाधानकारक, यातनादायक रितीने अनुभव येणं म्हणजे दुःख. आणि समाधानकारक वा यातनादायी यांपैकी कोणत्याही रितीने अनुभव आला नाही, तर तो अनुभव तटस्थ रितीने आलेला असतो.
  • एखादी भावना संपल्यानंतर ती पुन्हा अनुभवायला मिळावी अशी आपली इच्छा होते, त्याला सुख म्हणतात, ही दुसरी व्याख्या आहे. एखादी भावना आल्यावर तिच्यापासून दूर जावंसं वाटतं तेव्हा त्याला दुःख म्हणतात. तर, एखादी भावना आल्यावर किंवा गेल्यावर आपल्याला अशी कोणतीच इच्छा होत नाही, तेव्हा त्याला तटस्थ भावना म्हणतात.

या दोन व्याख्या परस्परांशी संबंधित आहेत. आपण कशाचा तरी समाधानकारक रितीने अनुभव घेतो, तेव्हा संबंधित वस्तूचा अनुभव आपण ज्या रितीने घेतो, त्यातून ती वस्तू शब्दशः, सुखद रितीने “आपल्या मनात येते” (यिद-दू ओञ्ग-बा, संस्कृत- मनप). आपण ती वस्तू स्वीकारतो आणि ती आरामदायकपणे आपलं लक्ष वेधून घेत राहते. संबंधित वस्तूविषयीचा आपला अनुभव आपल्याला लाभदायक आहे, असं आपल्याला वाटतं, असा याचा गर्भितार्थ आहे: त्यातून आपल्याला आनंदी वाटतं; बरं वाटतं. त्यामुळे या अनुभवातून मिळणारा लाभ कायम राहावा अशी आपली इच्छा असते, हा अनुभव संपला तर तो परत यावा अशी आपली इच्छा असते. ती वस्तू व तिचा अनुभव आपल्याला आनंददायक वाटतात, असं आपण नेहमीच्या भाषेत म्हणतो.

एखादी वस्तू आपण यातनादायक रितीने अनुभवतो, तेव्हा त्या वस्तूचा हा दुःखी अनुभव शब्दशः, सुखी रितीने “आपल्या मनात येत नाही” (यिद-दु मा ओञ्ग-बा, संस्कृत- अमनप). आपण ती वस्तू स्वीकारत नाही आणि ती वस्तू आरामदायकपणे आपलं लक्ष वेधून घेत नाही. त्या वस्तूचा आपला अनुभव अजिबात लाभदायक नाही, किंबहुना तो आपल्याला बाधाच पोचवतो आहे, असं आपल्याला वाटतं. आपल्याला ते संपावंसं वाटतं. संबंधित वस्तू किंवा तिचा अनुभव आपल्याला आनंददायी वाटत नाही, असं आपण नेहमीच्या भाषेत म्हणतो.

वस्तूच्या गुणांची अतिशयोक्ती

एखाद्या वस्तूबाबत आरामदायक वाटणं म्हणजे काय? एखाद्या वस्तूबाबत आपल्याला आरामदायक वाटतं, तेव्हा आपण ती आहे तशी स्वीकारतो, त्याबाबत भाबडेपणा दाखवत नाही, आणि तिचे गुण किंवा त्रुटी यांबाबत अतिशयोक्ती करत नाही किंवा ते नाकारातही नाही. अस्वस्थकारक भावना (न्योंग-मोंग्स, संस्कृत- क्लेश) आणि एखादी वस्तू आपण सुखाने अनुभवतो की दुःखाने याच्याशी असलेला या भावनांचा संबंध, या चर्चेकडे आता आपण येऊ.

अभिलाषा, ओढ व हाव, हा अस्वस्थकारक भावनांचा एक संच आहे. या तीनही भावनांसंदर्भात आपण संबंधित वस्तूच्या गुणांची अतिशयोक्ती करत असतो. एखादी वस्तू आपल्याकडे नसेल, तर ती हवीशी वाटणं म्हणजे अभिलाषा. एखादी वस्तू आपल्याकडे असेल तेव्हा ती आपल्याला गमवायची नसते, याला ओढ म्हणतात; आणि आपल्याकडे वस्तू असेल तरी आपल्याला ती अधिकाधिक हवी असते, याला हाव म्हणतात. या अस्वस्थकारक भावनांमुळे आपण संबंधित वस्तूच्या त्रुटींकडे दुर्लक्ष करतो. या सुखी मनोवस्था नसतात, कारण आपल्याला ती वस्तू समाधानकारक वाटत नाही. म्हणजे आपण त्या वस्तूबाबत समाधानी नसतो. ती आहे तशी आपण स्वीकारत नाही. उदाहरणार्थ, आपल्या प्रेयसीविषयी किंवा प्रियकराविषयी आपल्याला अतिशय ओढ वाटत असते, म्हणजे तिथे आपण थोडंसं सुख अनुभवत असण्याची शक्यता आहे. ती व्यक्ती पाहिल्यानंतर आपल्याला समाधानी वाटतं; ते आपल्याला समाधानकारक वाटतं. पण त्या व्यक्तीच्या आणि तिच्यासोबत किंवा त्याच्यासोबत असतानाच्या जगण्यातील गुणांची आपण अतिशयोक्ती करतो त्या क्षणी ओढ निर्माण होते. त्या व्यक्तीशिवायच्या आपल्या जगण्यातील अवगुणांची अतिशयोक्ती केल्यावर आपल्याला असमाधानी व दुःखी वाटतं. त्या व्यक्तीला आत्ता पाहता येतंय ही परिस्थिती स्वीकारून त्या क्षणाचा आनंद आपण उपभोगत नाही, तर आपल्याला अधिकाधिक हवं असतं आणि तो किंवा ती दूर जातील याची भीती आपल्या मनात असते. परिणामी, अचानक आपल्या प्रिय व्यक्तीकडे आपण असमाधानाने, अस्वस्थपणे व दुःखाने पाहू लागतो.

तिटकारा, संताप व द्वेष, हा अस्वस्थकारक भावनांचा दुसरा संच आहे. या भावनांद्वारे आपण संबंधित वस्तूच्या त्रुटी किंवा अवगुण यांची अतिशयोक्ती करतो आणि आपल्याकडे ती वस्तू नसेल तर तिला टाळू पाहतो; ती आपल्याकडे असेल तर तिच्यापासून दूर जाऊ पाहतो; आणि ती संपुष्टात येते, तेव्हा ती परत येऊ नये अशी आपली इच्छा असते. या तीन अस्वस्थकारक भावना सर्वसाधारणतः भयामध्ये मिसळलेल्या असतात. याही सुखी मनोवस्था नाहीत, कारण आपण त्या वस्तूबाबत समाधानी नसतो. आपण ती वस्तू आहे तशी स्वीकारत नाही.

उदाहरणार्थ, आपण रूट कॅनाल करवून घेत आहोत. अशा वेळी त्या वेदनेची शारीरिक संवेदना ही आपल्या अनुभवाची वस्तू असते. पण ती आहे तशी आपण स्वीकारली, त्यातील अवगुणांची अतिशयोक्ती केली नाही, तर त्या प्रक्रियेदरम्यान आपल्याला दुःखी वाटणार नाही. वेदनेचा अनुभव आपण ज्या तऱ्हेने घेतो त्याबद्दल आपल्याला तटस्थ भावना ठेवणं शक्य आहे: ती प्रक्रिया जितका काळ सुरू तितका काळ सुरू राहू द्यावी, त्यामुळे आपण ती लवकर संपण्यासाठी प्रार्थना करत नाही; आणि दंतवैद्य ड्रिलिंग थांबवतो, तेव्हा त्याने आणखी ड्रिल करावं अशीही इच्छा आपण ठेवत नाही. ड्रिलिंगमुळे निर्माण होणाऱ्या वेदनेबाबत आपण समवृत्ती ठेवतो- तिचा तिटकाराही करत नाही किंवा तिच्याकडे आकर्षितही होत नाही किंवा भाबडेपणाही ठेवत नाही. किंबहुना, या प्रक्रियेदरम्यान भविष्यात आणखी दातदुखी होण्याच्या शक्यता मी थोपवतो आहे, या विचारावर लक्ष केंद्रित करून आपल्याला सुख अनुभवता येतं.

कशाबद्दलही सुखी वा समाधानी वाटणं याचा अर्थ, ती गोष्ट गरजेनुसार अधिक किंवा कमी हवी असणं असा होत नाही, हे लक्षात घ्यावं. गोष्टी सुधारण्यासाठी किंवा स्वतःला सुधारण्यासाठी किंवा जीवनातील परिस्थिती सुधारण्यासाठी आपण कधीच प्रयत्न करू नये अशी निष्क्रियता आणणारी ही पद्धत नाही. उदाहरणार्थ, कामाच्या ठिकाणी एखादा प्रकल्प पूर्ण केल्यावर किंवा शस्त्रक्रियेतून पुन्हा पूर्वावस्थेत आल्यावर ती परिस्थिथी आपण स्वीकारावी आणि त्या प्रगतीबद्दल आपल्याला सुखही वाटणं शक्य असतं. पण आपण आत्तापर्यंत जे काही साध्य केलंय त्याबद्दल दुःखी न वाटता आपल्याला आणखी प्रगती करावीशी वाटणं शक्य आहे. आपल्या ताटात किती अन्न आहे किंवा आपल्या बँक-खात्यात किती रक्कम आहे, या संदर्भातही हे लागू होतं. आपल्याकडे पुरेसं नसेल आणि अधिक काही गरजेचं असेल, तरीही ही वस्तुस्थिती असते. खाण्यासाठी पुरेसं अन्न नसणं किंवा बँकेत पुरेसे पैसे नसणं, किंवा अधिक काही असण्याचे लाभ नाकारणं, यांसारख्या गोष्टींचे नकारात्मक पैलू अतिशयोक्तीने न ताणता, आणि दुःखी न होता आपण अधिक अन्न मिळवण्यासाठी किंवा पैसा मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. यात आपल्याला यश आलं, तर ठीक; आपण अपयशी ठरलो, तरीही ठीक- यातून आपण कसातरी मार्ग काढूच. पण आपण प्रयत्न करायला हवा. यशाची अपेक्षा ठेवून किंवा अपयशाची चिंता करून आपण मन भरकटू देऊ नये आणि अधिक मिळवण्याचा प्रयत्न करावा, हे सर्वांत महत्त्वाचं आहे.

शांतिदेव यांनी संयमावरील प्रकरणामध्ये (VI. १०) हे अतिशय सुंदररित्या मांडलं आहे:

एखाद्या गोष्टीवर उपाय करणं शक्य असेल, तर मग त्यावरून स्वतःची मनस्थिती का बिघडवायची? आणि उपाय करणं शक्य नसेल, तर मनस्थिती बिघडवून काय उपयोग?

रचनात्मक वर्तन- सुखाचा प्रमुख स्रोत

दीर्घकालीन विचार करता, सुखाचं मुख्य कारण रचनात्मक वर्तन हे असल्याचं लक्षात येतं. अभिलाषा, ओढ, हाव, तिटकारा, संताप, भाबडेपणा, इत्यादींसारख्या अस्वस्थकारक भावनांच्या प्रभावाखाली येऊन कृती करणं, बोलणं किंवा विचार करणं, आणि आपल्या वर्तनाचा आपल्यावर व इतरांवर कोणता दीर्घकालीन परिणाम होतो याची चिंता न करणं- हे टाळायला हवं, असा याचा अर्थ होतो. दुःखाचं मुख्य कारण असलेलं विध्वंसक वर्तन म्हणजे आधी उल्लेख केलेल्या प्रकारातील वर्तनापासून दूर राहणं नव्हे, तर त्याला सामोरं जाणं होय. उदाहरणार्थ, उत्कट इच्छेपोटी आपण एखाद्या दुकानातल्या एखाद्या गोष्टीच्या गुणांची अतिशयोक्ती करतो आणि कायदेशीर परिणामांकडे दुर्लक्ष करून ती गोष्ट चोरतो. आपल्या जोडीदाराच्या कोणत्यातरी बोलण्यातील अवगुणांकडे आपण अतिशयोक्तीने पाहतो आणि याचे आपल्या संबंधांवर कोणते परिणाम होतील याकडे दुर्लक्ष करून आपण त्याच्यावर किंवा तिच्यावर ओरडतो आणि निष्ठूर शब्द वापरतो.

अस्वस्थकारक भावनांच्या प्रभावाखाली येणं टाळून कृती करणं, बोलणं व विचार करणं- याद्वारे भविष्यात अशा प्रभावाखाली न येण्याची सवय आपल्याला लागते. परिणामी, भविष्यात एखादी अस्वस्थकारक भावना उद्भवली, तरी त्याच्या आधारे आपण कृती करत नाही आणि अखेरीस त्या अस्वस्थकारक भावनेचं सामर्थ्य कमकुवत होतं, शेवटी अस्वस्थकारक भावना निर्माण होणंच थांबून जातं. दुसऱ्या बाजूला, आपण अस्वस्थकारक भावनांच्या आधारेच कृती करत राहिलो, तर भविष्यातही तशा अधिकाधिक भावना निर्माण होतात आणि त्या अधिक सामर्थ्यवानही होतात. 

एखादी वस्तू आपण सुखाने अनुभवतो, तेव्हा भाबडेपणा, अभिलाषा, ओढ, हाव, तिटकारा किंवा संताप यांसारख्या अस्वस्थकारक भावनांविना आपण तो अनुभव घेत असतो. वस्तूचं प्रत्यक्षातील स्वरूप जसं आहे तसं स्वीकारण्यावर आपला अनुभव आधारलेला असतो, त्यात संबंधित वस्तूचे सकारात्मक किंवा नकारात्मक घटक अतिशयोक्तीने पाहिले जात नाहीत किंवा नाकारलेही जात नाहीत.

सुख परिपक्व होण्यासाठीची संभाव्यता निर्माण करणारी परिस्थिती

सुखाने अथवा दुःखाने वस्तू वा विचारांचा अनुभव घेण्याचा आपला मार्ग त्या वस्तूने किंवा विचाराने निश्चित केलेला नसतो. आपल्या भूतकाळातील दीर्घकालीन वर्तनामुळे आपण त्या वस्तूंच्या सकारात्मक वा नकारात्मक पैलूंची अतिशयोक्ती करणं किंवा त्यांना नाकारणं टाळण्याची सवय स्वतःला लावली असेल, तर रूट कॅनाल करतानाची वेदनाही आपण सुखी मनोवस्थेमध्ये अनुभवू शकतो. सुखाच्या व्याख्येकडे परत जाऊन असं म्हणता येईल की, ही प्रक्रिया आपण समाधानकारक रितीने, आणि ती इतरांना लाभदायक आहे या धारणेच्या आधाराने अनुभवतो.

अस्वस्थकारक भावनांच्या प्रभावाखाली कृती करणं, बोलणं किंवा विचार करणं टाळण्याची सवय आपण लावून घेतली असेल आणि त्यामुळे वस्तू व विचार सुखाने अनुभवण्याची संभाव्यता आपण निर्माण केली असेल, तरी ती संभाव्यता सुखाच्या अनुभवामध्ये परिपक्व होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती गरजेची असते. आधी नमूद केल्याप्रमाणे, आपला एखादा अनुभव सुखी असेल की दुःखी, हे त्या अनुभवातील वस्तू निश्चित करत नसते. तर, संबंधित वस्तू सुखाने अनुभवली जाईल का, हे बरंचसं आपल्या मनोवृत्तीवर अवलंबून असतं. ती वस्तू प्रत्यक्षात कोणत्या वास्तवात आहे ते जसंच्या तसं स्वीकारणं त्यासाठी आवश्यक आहे. मग ती वस्तू म्हणजे रूट कॅनालवेळी जाणवणारी वेदनादायी शारीरिक संवेदना असो किंवा प्रिय व्यक्ती दृष्टीस पडणं असो. तर, आपण कोणती वस्तू पाहतोय, ऐकतोय, कोणत्या वस्तूचा वास घेतोय, किंवा कोणत्या वस्तूची चव घेतोय, किंवा कोणती वस्तू आपल्याला शारीरिकदृष्ट्या जाणवतेय किंवा कोणत्या वस्तूविषयी आपण विचार करतोय, याच्या अलाहिदा आपली मनोवृत्ती, आपली मनोवस्था कशी आहे, हे आपल्या सुखी किंवा दुःखी असण्यासंदर्भात अतिशय महत्त्वाचं असतं.

वस्तू कशी आहे त्याचं वास्तव आपण स्वीकारलं आणि त्याबद्दल भाबडेपणा दाखवला नाही, तर आपण त्या वस्तूचे गुण किंवा अवगुण यांची अतिशयोक्ती करत नाही किंवा ते नाकारतही नाही आणि ती वस्तू अभिलाषेने, हावेने किंवा ओढीने किंवा तिटकाऱ्याने वा संतापाने आपण तिचा अनुभव घेत नाही. त्यामुळे कोणत्याही विशिष्ट क्षणी सुख परिपक्व होण्यासाठी आपल्याला भाबडेपणापासून मुक्त व्हावं लागतं.

भाबडेपणा

दुःखाच्या कोणत्याही विशिष्ट क्षणी आपला भाबडेपणा (ग्ती-मुग, संस्कृत- मोह) केवळ आपल्या अनुभवातील वस्तूपुरता मर्यादित असतोच असं नाही. भाबडेपणाची व्याप्ती खूप मोठी आहे. तो आपल्यावरही केंद्रित असू शकतो. आपण एखादी समस्या अतिशय दुःखाने अनुभवत असू, तर भाबडेपणामुळे आपण केवळ स्वतःशीच खिळून राहतो आणि ही समस्या अनुभवणारे आपण एकमेव आहोत, असाही विचार आपल्या मनात येऊ शकतो.

आपली नोकरी गमावण्याचं उदाहरण घ्या. जगभरात लाखो लोकांना त्यांची नोकरी गमवावी लागली आहे आणि ते आता बेरोजगार आहेत. आपण तात्पुरत्या गोष्टींबाबत भाबडेपणा न दाखवता परिस्थितीविषयी विचार करू शकतो. कारणं व परिस्थिती यांमधून उद्भवणारं प्रत्येक घटित पुढील कारणं व परिस्थितींनी प्रभावित होणार आहे, आणि अखेरीस समाप्त होणार आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवं. ते अतिशय मदतीचं होऊ शकतं. याहून परिणामकारकतेसाठी आपल्या विचारप्रक्रियेची व्याप्ती आणखी वाढवावी आणि त्यात आपल्याप्रमाणेच नोकऱ्या गमावलेल्या इतरांच्याही समस्यांचा समावेश करावा. “ही फक्त माझी समस्या नाही; बऱ्याच मोठ्या जनसमुदायाला ही समस्या भेडसावते आहे. यावरचा उपाय फक्त मलाच हवाय असं नाही; इतरही सर्वांना यावर उपाय झालेला हवा आहे. अशा समस्यांवर व दुःखावर मात करण्याची गरज प्रत्येकालाच भासते,” असा विचार करणं गरजेचं आहे. किंबहुना, वास्तव असंच असतं.

भाबडेपणा नसलेल्या अशा तऱ्हेने विचार केल्यामुळे आपण स्वानुकंपेत लोळण्याचं थांबवतो आणि आपल्या मनात इतरांविषयी करुणा (स्यिंग-र्जे) निर्माण होते. आपलं मन संकुचितरित्या केवळ स्वतःवर केंद्रित राहत नाही, तर आपल्यासारख्याच परिस्थितीत असलेल्या इतर अनेकांबद्दलचा विचार करण्याइतकं मन खुलं होतं. त्या लोकांनाही समस्यांवर मात करण्यासाठी मदत करायला हवी, अशी इच्छा आपल्याला वाटते, त्यामुळे आपल्या व्यक्तिगत समस्यांचं महत्त्व खालावतं आणि वस्तुनिष्ठ रितीने आपण त्यांना सामोरं जाण्यासाठीचं धाडस व सामर्थ्य कमावतो. आपल्याला अर्थातच नोकरी गमावण्याची इच्छा नव्हती, पण समवृत्तीने आपण परिस्थितीमधील वास्तव स्वीकारतो आणि इतरांबद्दल विचार करून कदाचित आपल्याला आनंदीही वाटण्याची शक्यता असते, कारण आता इतर लोकांना मदत करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे.

करुणा व सुख यांच्यातील संबंध

तर, एखादी वस्तू किंवा परिस्थिती सुखाने अनुभवण्याच्या आपल्या संभाव्यता जाग्या करण्यामध्ये करुणा हा एक कळीचा घटक असल्याचं दिसतं. पण तो कार्यरत कसा होतो? आपल्याप्रमाणेच इतरांनी दुःखामधून व दुःखाच्या कारणांमूधन मुक्त व्हावं, अशी इच्छा वाटणं म्हणजे करुणा. पण आपण इतरांच्या दुःखावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा स्वाभाविकपणे आपण त्याबद्दल व्यथित होतो, आनंदी होत नाही. किंवा आपण आपल्या भावना थोपवलेल्या असतील तर आपल्याला काहीच जाणवत नाही. काहीही असेल तरी आपल्याला त्यांच्या दुःखाबद्दल सुख वाटत नसतं. तर, करुणेमधून सुखी मनोवस्था कशी निर्माण होते?

हे समजून घेण्यासाठी आपण भावना अस्थिर होणं (झांग-झिंग) आणि भावना स्थिर राहणं (झांग-धिंग मेद-पा) यांच्यामध्ये भेद करणं गरजेचं आहे. इथे मी या संज्ञा काटेकोर व्याख्येनुसार वापरत नसून नेहमीच्या बिगरतांत्रिक पद्धतीने वापरतो आहे. सुख, दुःख वा तटस्थता या भावना मुळात त्या भावनेविषयीच्या भाबडेपणामध्ये व गोंधळलेपणामध्ये मिसळलेल्या आहेत की नाही, हा भेद असतो. एकंदरच सुखापासून आपण दुःख वेगळं केलं, तेव्हा आपण अनुभवत असलेल्या वस्तूविषयी आपण भाबडे आहोत की नाही, हा चल घटक होता. इथेही पुन्हा आपण दुःखाने अनुभवत असलेल्या वस्तूच्या गुणांची अतिशयोक्ती केली नाही किंवा ते नाकारले नाहीत, तर आपल्या दुःखी भावनेला आपण विशिष्ट प्रकारच्या घनरूप व खरोखरच्या अस्तित्त्वरूप “गोष्टी”मध्ये रूपांतरित करण्याची शक्यता असते- उदाहरणार्थ, आपल्या डोक्यावर एखादा काळाकुट्ट अवजड ढग घोंघावायला लागू शकतो. मग आपण त्या भावनेच्या अवगुणांची अतिशयोक्ती करतो आणि ही “भयंकर निराशा” असल्याची कल्पना करतो आणि त्यात अडकल्यासारखं आपल्याला वाटतं. या संदर्भात भाबडेपणामुळे संबंधित दुःखाची भावना आहे तशी स्वीकारली जात नाही. शेवटी, दुःखाची भावना तीव्रतेच्या भिन्नतेनुसार क्षणोक्षणी बदलत असते: ती काही स्वतःची स्वतः अस्तित्वात असणारी आणि बाकी कशाचा परिणाम न होणारी एकसंध घनरूप वस्तू नसते.

इतरांच्या दुःखाचा विचार करताना आपण काहीच न वाटण्याची भावना अनुभवतो, तेव्हादेखील हेच विश्लेषण लागू होतं. या संदर्भात दुःखी भावनेच्या अवगुणाची अतिशयोक्ती करतो, या भावनेबद्दल आपल्याला भीती वाटते, त्यामुळे आपण ती रोखू पाहतो. मग तटस्थ भावना आपल्याला अनुभवायला मिळते, सुखी नाही आणि दुःखीही नाही. पण या तटस्थ भावनेबाबतही आपण अतिशयोक्ती करतो, ती मोठ्या घनरूप “शून्यत्वा”च्या रूपात आपल्या शेजारी बसलेली आहे अशी कल्पना करतो, परिणामी कोणतीही भावना प्रामाणिकपणे अनुभवण्यापासून ती आपल्याला प्रतिबंध करते.

आपल्याप्रमाणे इतरांना सामोरं जावं लागणारी अवघड परिस्थितीसुद्धा दुःखदायक असते, हे न नाकारणं करुणा विकसित करण्यासाठी महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ, आपण नोकरी गमावतो तेव्हा नोकरी गमावलेल्या इतरांचा विचार करावा. हे दुःख जाणवून घ्यायची भीती वाटणं किंवा ते रोखणं किंवा दडपून टाकणं, हे रोगट होईल. हे दुःख आपण जाणवून घेणं गरजेचं आहे, पण इतरांच्या दुःखाबाबत सहानुभूती वाटण्यासाठी, इतरांनी त्यातून मुक्त व्हावं अशी खोलवरची प्रामाणिक इच्छा वाटण्यासाठी आणि त्यावर मात करण्याकरिता त्यांना जबाबदारीने मदतीचा हात देण्यासाठी आपण हे दुःख स्थिर रितीने जाणवून घ्यायला हवं. थोडक्यात, “दुःखी भावनेतून घनरूप ‘गोष्ट’ निर्माण करू नका; त्याला अवाजवी महत्त्व देऊ नका,” असा बौद्धविचारातील सल्ला आहे.

मन शांत करणं

दुःखाची भावना स्थिर रितीने अनुभवण्यासाठी आपली मनं शांत होणं गरजेचं आहे, सर्व प्रकारचं मानसिक भरकटणं व नीरसपणा दूर करायला हवा. मानसिक भरकटलेपणामुळे आपलं लक्ष चिंता, साशंकता, भीती यांसारख्या अस्वस्थकारक विचारांकडे जातं किंवा अधिक सुखदायक वाटणाऱ्या गोष्टींच्या अपेक्षांनी भरलेल्या विचारांकडे जातं. मानसिक नीरसपणामुळे आपण मानसिक धुक्यात अडकतो आणि प्रत्येक गोष्टीवरून आपलं लक्ष उडतं.

आपली मनोवस्था मानसिक भरकटलेपणातून व नीरसपणातून बाहेर काढण्याच्या अनेक पद्धती बौद्ध धर्मामध्ये आहेत. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून शांत होणं, ही एक सर्वांत प्राथमिक पद्धत आहे. कमीतकमी मानसिक भरकटलेपणा व नीरसपणा असेल, तर आपलं मन निश्चल व शांत होतं. अशा स्थितीमध्ये आपण कोणतीही अतिशयोक्ती किंवा तिटकारा किंवा इतरांच्या समस्यांविषयीची व दुःखाविषयीची अलिप्तता आणि त्यांच्याबद्दलच्या आपल्या भावना सहजपणे शांत करू शकतो. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला दुःखी वाटलं तरी ते अस्थिर करणारं नसतं.

अखेरीस, आपलं मन आणखी निवांत व शांत होतं, तेव्हा आपल्याला स्वाभाविकपणे सुखाची कमी पातळी जाणवते. निश्चल मानसिक व भावनिक स्थितीमध्ये मनाची नैसर्गिक ऊब व सुखीपणा आविष्कृत होतो. रचनात्मक वर्तन करून सुख अनुभवण्याच्या पुरेशा ठाम संभाव्यता आपण विकसित केल्या असतील, तर त्या परिपक्व होण्यासाठी आपली निश्चल मनोवस्था मदत करते.

प्रेम प्राप्त करणं

त्यानंतर आपण प्रेमाच्या (ब्याम्स-पा, संस्कृत- मैत्री) विचारांनी सुख वृद्धिंगत करतो. इतरांनीही सुखी व्हावं आणि त्यांना सुखाची कारणं लाभावीत अशी इच्छा असणं म्हणजे प्रेम. करुणामय सहानुभूतीमधून स्वाभाविकपणे अशी इच्छा निर्माण होते. कोणाच्या तरी वेदनेने व व्यथेने आपल्याला दुःखी वाटत असलं, तरी त्या व्यक्तीने सुखी व्हावं अशी सक्रिय इच्छा राखत असताना त्या पद्धतीने भावना अनुभवणं अवघड असतं. आपण स्वतःविषयी विचार करणं थांबवतो आणि इतर कोणाच्या तरी सुखावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपलं मन स्वाभाविकपणे इशारा देतं. यामुळे आपण आपोआपच आनंदाच्या सौम्य भावनेकडे येतो आणि आपल्या रचनात्मक वर्तनामुळे दीर्घ काळात विकसित झालेल्या सुखी वाटण्याच्या संभाव्यतांना उत्तेजना मिळते. तर, प्रेम निःस्वार्थी व प्रामाणिक असेल, तेव्हा त्यासोबत अस्थिर नसलेलं सौम्य सुख येतं आणि आपलं दुःख नाहीसं होतं. डोकेदुखी होणाऱ्या एखाद्या पालकाने स्वतःच्या आजारी बाळाला आराम पडावा यासाठीचे प्रयत्न करताना स्वतःची वेदना विसरून जावं, तशाच प्रकारे आपण प्रेमाचे विचार वाढवू लागलो की इतर कोणाच्या तरी दुर्दैवाबद्दल आपल्याला वाटणारं दुःख विरून जातं. 

सारांश

थोडक्यात, भाबडेपणामध्ये रुजणाऱ्या अभिलाषा, हाव, ओढ, तिटकारा व संताप यांसारख्या अस्वस्थकारक भावना व मनोवृत्तींच्या प्रभावाखाली विध्वंसक कृती करणं, बोलणं किंवा विचार करणं टाळण्याची सवय विकसित करणं- हा सुखाचा दीर्घकालीन व सर्वांत प्राथमिक स्रोत आहे, असं बौद्ध धर्म मानतो. अशा प्रकारच्या रचनात्मक वर्तनामुळे भविष्यात सुख अनुभवण्यासाठीच्या आपल्या मानसिक सातत्याच्या संभाव्यता निर्माण होतात. आपण अनुभवत असलेल्या कोणत्याही वस्तूच्या किंवा परिस्थितीच्या गुणावगुणांची, अथवा वस्तू वा परिस्थिती कोणतीही असली तरी ती ज्या सुखी वा दुःखी पातळीद्वारे आपण अनुभवतो त्याची अतिशयोक्ती न करून किंवा ते न नाकारून आपण या संभाव्यता परिपक्व होण्यासाठी उत्तेजना देत असतो. भाबडेपणाविना, त्यामुळेच ओढ, तिटकारा व अलिप्तता यांच्याविना आपण स्वतःचं मन मानसिक भरकटलेपणापासून व नीरसपणापासून दूर ठेवून शांत करायला हवं. विशेषतः आपल्या मनातून चिंता व अपेक्षा दूर करायला हव्यात. अशा शांत व निश्चल मनोवस्थेमध्ये आपल्याला सुखाची अतिशय कमी पातळी जाणवेल आणि अधिक सुख जाणवण्यासाठीच्या संभाव्यताना उत्तेजना मिळेल अशीही शक्यता असते.

त्यानंतर आपण इतरांच्या समस्यांकडे आणि आपल्यापेक्षा त्यांची परिस्थिती किती खालावलेली असेल याकडे लक्ष वळून आपली मनं विस्तारतो. आपण केवळ स्वतःचा विचार करणं थांबवतो. इतर सर्व जण त्यांच्या दुःखापासून मुक्त झाले तर किती विलक्षण होईल आणि हे साध्य करणअयात आपण त्यांना मदत करू शकलो, तर ते किती भारी असेल, असा विचार आपण करतो. या सक्षम करुणेमधून निसर्गतः प्रेमाची भावना निपजते- इतरांनी सुखी असावं अशी इच्छा होते. त्यांच्या सुखाचा विचार केल्यामुळे आपल्या भविष्यातील सुखाच्या परिपक्वतेसाठीच्या संभाव्यतांना उत्तेजना मिळते. 

करुणा व प्रेम यांच्या या विचारांद्वारे आपण आपले विचार बुद्धांकडे किंवा इतर कोणत्याही महान मानवतावादी व्यक्तिमत्वांकडे वळवू शकतो. त्यांच्या दाखल्यांचा विचार करून आपल्याला प्रेरणा मिळते (ब्यन-ग्यिस र्लाब्स, संस्कृत- अधिस्थान) की, इतरांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपणही थोडी जबाबदारी घ्यायला हवी. याद्वारे आपल्याला इतरांसोबतच स्वतःच्याही समस्या हाताळण्यासाठीचं सामर्थ्य व धाडस कमवायला मदत होते- पण पुन्हा, याची अतिशयोक्ती न करता भविष्यातील चिंता किंवा यशाच्या अपेक्षा यांची चिंता न करता हे साधायला हवं.

Top