जेव्हा आपण आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतो, तेव्हा बुद्ध म्हणून इतरांना मदत करण्यासाठी आवश्यक अशा चांगल्या गुणांच्या परिपक्वतेसाठी आपण सहा दूरगामी परिणाम करणारी तत्वे जोपासतो, पण इतरांच्याही चांगल्या गुणांची परिपक्वता गाठण्यात त्यांना मदत करण्यासाठी प्रथम त्यांना आपल्या सकारात्मक प्रभावाखाली एकत्रित करणे गरजेचे आहे. हे साध्य कसं करावं याची बुद्धांनी चार टप्प्यात शिकवण दिली :
१. उदार असणे(उदार स्वभाव)
जिथे जिथे शक्य असेल तिथे आपण इतरांशी उदारपणे वागलं पाहिजे. जर कुणी आपल्याला भेटायला आले तर आपण त्यांना चहापाणी देतो; त्याचबरोबर आपण जर बाहेर जेवायला गेलो तर आपल्याला त्यांना मेजवानी द्यावी लागू शकते आणि त्याचं बिल द्यावं लागू शकतं. उदार होणे म्हणजे फक्त काहीतरी वस्तूरूपातच दिलं पाहिजे असं काही नाही. एखाद्याला वेळ देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कुणालातरी वेळ देऊन त्याच्याविषयी जाणून घेणं, त्याच्या समस्या तळमळीने आणि मनापासून समजून घेणं आणि त्याचं आयुष्य गांभीर्याने घेणं हीदेखील कुणासाठीतरी एक मोठी भेट असू शकते हे आपण कधीही विसरता कामा नये. अशाने लोक मोकळे होतात आणि खुल्या मनाने आपल्याशी हितगुज करतात परिणामी ते आनंदी होतात आणि आपल्यासोबत अधिक मोकळेपणाने वावरतात. आपल्या सकारात्मक प्रभावाला अनुकूलता मिळण्याची ही पहिली पायरी आहे.
२. मधुर भाषेत बोलणे
लोक आपल्याशी अजून मोकळेपणाने वागावेत यासाठी आपण त्यांच्याशी नम्र आणि मधुर भाषेत बोललं पाहिजे. याचा अर्थ असा की आपण त्यांच्या भाषेत, त्यांना समजेल अशा भाषेत बोललं पाहिजे आणि त्यांच्या आवडीच्या गोष्टींबद्दल बोललं पाहिजे. आपण त्यांच्या तब्येतीची चौकशी करतो आणि त्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे ते जाणून घेण्यात रस दाखवतो. एखाद्याला जर फुटबॉल खेळ आवडत असेल तर आपण असं म्हणत नाही की “ काही अर्थ नाही त्या खेळात! उगाच वेळ फुकट घालवत आहेस!” हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आपण जर असं म्हणालो, तर ते आपलं पुढे काहीही ऐकणार नाहीत. त्यांना फक्त असं वाटेल की आपण त्यांना तुच्छ लेखत आहोत. कुणी सामना जिंकला वगैरे खोलात जाण्याची गरज नाही. पण थोडंफार त्या खेळाबद्दल आपण बोललो तर त्यांना सुखावह आणि मोकळं वाटेल. आपल्याला इतरांना मदत करण्याची इच्छा असेल तर आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्याबद्दल माहिती ठेवावी लागेल आणि अर्थातच त्यांना कोणत्या गोष्टी आवडतात हेही जाणून घ्यावं लागेल. जर हे आपण केलं नाही तर आपण त्यांच्या जवळ कसे जाऊ शकणार आहोत? जाणून कसे घेऊ शकणार आहोत?
एकदा का त्यांना तुमच्याबद्दल खात्री पटली आणि ते मोकळे झाले की मग तुमच्या मधुर बोलण्यामुळे अनेक अर्थपूर्ण गोष्टींना चालना मिळू शकेल. योग्य वेळी आणि योग्य परिस्थिती पाहून व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण ठरू शकणार्या आणि सहाय्यकारी ठरणार्या बौद्ध शिकवणीच्या विविध पैलूंबद्दल आपण बोलू शकतो. असे करण्याने त्याला होणार्या फायद्यांकडे निर्देश करणे आपण विसरता कामा नये.
सल्ला देत असताना आपल्या आवाजातील चढउतार फार महत्त्वाचा असणार आहे. शिष्ट, दुराग्रही किंवा तुच्छ लेखणारा असा भाव आपल्या बोलण्यात डोकावणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. यालाच मधुर भाषेत बोलणे म्हणतात. आपलं बोलणं अशा पद्धतीचं असलं पाहिजे की ऐकणार्याला सल्ला अनावश्यक वाटणार नाही किंवा सल्ल्याचा विनाकारण भडिमार वाटणार नाही. याकरता अतीव संवेदशीलता आणि सल्ला देण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत ओळखण्याचं कसब अंगी असणं आवश्यक आहे. जर आपण अतिरेक करत असू आणि नेहमी फक्त सखोल आणि अर्थपूर्ण संभाषणच करण्याचा आग्रह धरत असू तर लोकांना आपल्याबरोबर राहणं कंटाळवाणं वाटेल आणि जे आपण सांगू इच्छित असू ते ऐकण्याच्या मनस्थितीत ते नसतील. हेच कारण आहे की आपल्या संभाषणादरम्यान हलकेफुलके किस्से पेरून वेळप्रसंगी विनोद सांगून एकूण संभाषणाचं वातावरण खेळकर ठेवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. विशेषत: जेव्हा समोरची व्यक्ती आपण सल्ला देत असताना बचावात्मक पवित्रा घेत असेल त्यावेळी तर हे फार महत्त्वाचं आहे.
शिकवण समजावून सांगत असताना आपण वापरलेल्या नम्र, मधुर पण अर्थपूर्ण बोलण्यामुळे, ते आपण दिलेल्या सल्ल्यातील लक्ष्य गाठण्यास इच्छुक बनतात. याचं कारण हे आहे की त्यांना सल्ला स्पष्टपणे समजलेला असेल तसेच त्यावर पूर्ण विश्वास बसलेला असेल आणि त्याचे फायदे समजून घेतल्यामुळे त्यांना त्याचं मूल्यही समजलेलं असेल.
३. इतरांना त्यांचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रोत्साहित करणे
आपण दिलेला कोणताही सल्ला आपण फक्त बौद्ध सिद्धांतापुरताच मर्यादित ठेवत नाही, तर लोकांना तो वैयक्तिक आयुष्यात कसा आचरणात आणायचा याबद्दलही आपण समजावून सांगतो. अशा प्रकारे आपण लोकांना दिलेला सल्ला प्रत्यक्षात आणून शिकवणीत सांगितलेलं लक्ष्य गाठण्यासाठी प्रोत्साहित करतो. जेव्हा त्यांना ती शिकवण अंमलात कशी आणायची ते कळतं – टप्प्याटप्प्याने नक्की काय करायचं हे कळतं – तेव्हाच ते प्रयत्न करून बघण्यासाठी उत्साहित होतात.
इतरांना शिकवण आयुष्यात आचरणात आणण्यासाठी प्रोत्साहन देत असतानाच आपण त्यांना ते आचरण सोपं होईल अशा प्रकारचं वातावरणही देण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना बौद्ध धर्माचा काहीही अनुभव नाही अशांसाठी प्रथम गोष्टी सहजसोप्या ठेवणे हा त्याचाच एक भाग. त्यांना आपण केवळ टप्प्याटप्प्याने गुंतागुंतीच्या, अद्ययावत तंत्राकडे नेतो. परिणामत: टिकून राहण्यासाठी आणि त्याच पद्धतीने पुढे जाण्यासाठी त्यांना आत्मविश्वास मिळतो. त्यांच्या सध्याच्या पातळीपासून कितीतरी दूर असणार्या शिकवणीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतानाही ते नाउमेद होणार नाहीत.
४. या लक्ष्यांप्रमाणे सतत आचरण करणे
आपण सल्ला देत असलेल्या व्यक्तीला निराश करू शकणार्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे त्यांना आपण ढोंगी, पाखंडी वाटणे. त्यांना शिकवणीपासून दूर जाण्यापासून रोखण्यासाठी आपण स्वत: त्यांच्यासमोर आपल्या वागण्यातून एक उत्तम उदाहरण प्रस्तुत करणं गरजेचं आहे. आपण जो सल्ला देतो त्याचं पालन करून ते आपण देऊ शकतो. उदाहरणार्थ, जर आपण कुणाला क्रोधावर मात कराची बौद्ध पद्धत शिकवली, पण नंतर आपण जेव्हा त्यांच्यासोबत उपाहारगृहामध्ये गेलो आणि आपलं जेवण यायला अर्धा तास उशीर झाल्यावर लगेच अकांडतांडव केला, तर क्रोध व्यवस्थापनाच्या बौद्ध शिकवणीबद्दल त्यांना काय वाटेल? त्यांना वाटेल की या पद्धती प्रभावहीन आहेत आणि ते शिकवणीपासून दूर जातील आणि निश्चितच आपण देऊ इच्छित असलेला कोणताही सल्ला ते पुढे ऐकणार नाहीत, मान्य करणार नाहीत. म्हणूनच, आपलं वागणं आपण देत असलेल्या शिकवणुकीशी सुसंगत असलंच पाहिजे. केवळ त्या आधारावरच लोक आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवतील.
आता, अर्थातच आपण अजून बुद्ध झालो नाही आहोत आणि आपण कुणासाठीही आदर्श प्रतिकृती असू शकत नाही. तरीही, आपण आपले उत्तम देण्याचा प्रयत्न करतो. पाखंडी नसण्याचा अर्थ हा नाही की तुमच्याबरोबर तुम्ही मदत करू इच्छित असणारी कुणी व्यक्ती असताना तुम्ही सर्व शिकवणूकीचे अनुसरण कराल, तसा देखावा कराल, पण जेव्हा एकटे असाल किंवा कुटुंबासोबत असाल तेव्हा मात्र याविरुद्ध वागाल. धर्माच्या लक्ष्यानुसार केलेलं सुसंगत आचरण हे पूर्ण वेळ आणि प्रामाणिक असणं गरजेचं आहे.
सारांश
बौद्ध शिकवणूकीच्या माध्यमातून लोकांना एकत्र करण्याचे आणि मदत करण्यासाठी परिपक्वता गाठण्याचे चार टप्पे हे केवळ आपल्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्येच नाही तर व्यापक प्रमाणात धर्म जागतिक स्तरावर नेण्यासाठीही उपयुक्त आहेत.
- उदार असणे(उदार स्वभाव) : मोफत शिकवण देणे
- मधुर भाषेत बोलणे : सर्वांना कळणार्या अशा समजण्यास सोप्या भाषेत शिकवण उपलब्ध करणे आणि विविध प्रसारमाध्यमांद्वारे जसे की पुस्तके, संकेतस्थळे, पॉडकास्ट, ध्वनीचित्रफीत, समाज माध्यमे आणि इतर अनेक माध्यमातून शिकवण उपलब्ध करणे
- इतरांना त्यांचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रोत्साहित करणे : टप्प्याटप्प्याने अभ्यास कसा करावा, तो मनात कसा बिंबवून घ्यावा आणि त्याचं उपयोजन दैनंदिन जीवनात कसं करावं या गोष्टी स्पष्टपणे समजावून सांगणे
- या लक्ष्यांप्रमाणे सतत आचरण करणे : आपल्या आयुष्यात बौद्ध तत्त्वे कशी आचरणात आणतो ते सोदाहरण दाखवणे आणि धार्मिक संघटना म्हणून संघटना या तत्त्वांचं उपयोजन कसं करते ते सोदाहरण दाखवणे
प्रामाणिक परोपकारी भावनेने प्रेरित हे चार टप्पे, ज्ञानप्राप्तीचे संपूर्ण बोधिचित्त लक्ष्य नसले तरी, इतरांना आपल्या सकारात्मक प्रभावाखाली आणण्यासाठी ग्रहणक्षम बनवण्याचे सर्वोत्तम मार्ग आहेत.