बौद्ध लोक ‘धर्म’ हा शब्द बुद्धाच्या शिकवणींच्या संदर्भात वापरतात. आपल्याला सध्याच्या संभ्रमाच्या व दुःखाच्या स्थितीतून बाहेर पडून जागरूकतेच्या व सुखाच्या स्थितीत आणण्यासाठी धर्म मदत करतो. इंग्रजीतील Religion हा शब्द ‘एकत्र जोडणं’ या अर्थाच्या लॅटिन संज्ञेतून उगम पावला, त्याप्रमाणे धर्म हा शब्द संस्कृतमधील ‘धृ’मधून निपजलेला आहे, ज्याचा अर्थ ‘घट्ट पकडून ठेवणं किंवा आधार देणं’ असा होतो. मूलतः धर्म आपल्याला अस्तित्वाच्या खालच्या, दुर्दैवी स्थितीत कोसळण्यापासून थोपवतो, अन्यथा त्या स्थितीमध्ये आपल्याला दीर्घ काळ अनियंत्रित दुःखाला सामोरं जावं लागतं.
What is dharma

बुद्धाने दिलेली धर्माची पहिली शिकवण

अडीच हजारहून अधिक वर्षांपूर्वी बुद्धाला बोधगया इथे साक्षात्कार झाला, तेव्हा सुरुवातीला तो धर्माची शिकवण देण्याबाबत अनुत्सुक होता. ही शिकवण खूप खोल व अगम्य होईल, किंवा ऐहिक सुखाची भुरळ पडलेल्या लोकांना त्यात काही रस नसेल, असं त्याला वाटत होतं. विश्वाचा निर्माता ब्रह्म बुद्धासमोर अवतरला आणि सर्व जीवांच्या लाभासाठी धर्माची शिकवण द्यावी, कारण साक्षात्कार प्राप्त करण्याची क्षमता असणारे काही लोक तरी नक्कीच आहेत असं ब्रह्माने त्याला सांगितलं, असं आरंभिक संहितांमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर बुद्धाने दीर उद्यानात चार आर्य सत्यांविषयी धर्माची पहिली शिकवण दिली. संपूर्ण बौद्ध मार्गाची चौकट त्यातून निश्चित झाली आणि आजही जगभरातील सर्व बौद्ध परंपरांच्या पायाशी हीच चौकट आहे.

जीवन कायमच असमाधानकारक असतं, हे बुद्धाने धर्माविषयी शिकवलेलं पहिलं आर्य सत्य आहे. आपल्याला विशिष्ट वेळी कितीही सुखी वाटलं, तरी ही सुखाची स्थिती अस्थिर व तात्कालिक असते. हे वैश्विक आहे- आपल्या सर्वांना जीवनामध्ये हा अनुभव येतो. आपल्याला जे काही सुख मिळत असेल ते चिरकाल टिकत नाही आणि आपण कोणत्याही क्षणी त्याचं रूपांतर दुःखात होऊ शकतं. आपलं दुःख आपल्या बाहेरून येत नाही, तर आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्याची ओढ आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सर्व गोष्टी कशा अस्तित्वात असतात याविषयीचा अजाणपणा, यातून दुःख उगम पावतं, हे दुसरं सत्य. सर्व दुःखांपासून व समस्यांपासून मुक्त होणं शक्य असतं, हे तिसरं सत्य. आणि सर्व समस्यांपासून कायमस्वरूपी मुक्तता मिळवण्यासाठी आपण कोणता मार्ग पत्करावा याची रूपरेषा चौथ्या सत्यातून मांडलेली आहे.

दुःखनिर्मूलन हा बुद्धाच्या शिकवणुकीचा उद्देश

बुद्धाच्या वेळी धर्माची सर्व शिकवण तोंडी दिली जात होती व ती स्मरणात ठेवली जात असे. पिढ्यानुपिढ्या ही शिकवण पुढे हस्तांतरित केली जात होती आणि मग कालांतराने हस्तलिखित स्वरूपात तिचे संकलन झाले. आज आपल्याला शेकडो सूत्रं उपलब्ध आहेत, बुद्धाने त्याच्या अनुयायांना या संहितांमधून नियम आखून दिले आहेत. त्याचप्रमाणे त्रिपिटकांच्या रूपात बौद्धिक संभाषितंही उपलब्ध आहेत. परंपरेनुसार असं म्हटलं जातं की, बुद्धाने एकूण ८४,००० धर्मविषयक शिकवणी दिल्या, ज्याद्वारे आपल्याला ८४,००० अस्वस्थकारक भावनांवर मात करायला मदत होते. ही संख्या कदाचित यादृच्छिक असेलही, पण आपल्याला किती समस्या, व्यथा व दुःख सहन करावी लागतात हे यातून दिसतं, आणि बुद्धाने या सर्वांचा प्रतिकार करण्यासाठी किती विभिन्न शिकवण्या दिल्या हेसुद्धा यातून सूचित होतं.

किंबहुना, बुद्धाच्या सर्व शिकवण्या दुःखावर मात करण्यासंबंधीच्याच आहेत. बुद्धाला आधिभौतिक अनुमानामध्ये रस नव्हता, आणि स्व व विश्व यासंबंधीच्या काही प्रश्नांना उत्तर द्यायलाही त्याने नकार दिला, कारण या प्रश्नांवर विचार केल्याने आपण मुक्तीच्या निकट जात नाही. बुद्धाने मानवी स्थितीचा विचार केला आणि आपण सर्व दुःखात आहोत हे त्याच्या लक्षात आलं, त्यानंतर त्याने यावर उपाय शोधला. त्यामुळे बुद्धाची तुलना कायम डॉक्टरशी केली जाते आणि धर्माच्या शिकवण्या औषधासारख्या मानल्या जातात. धर्माचं हे औषध आपल्या सर्व समस्या कायमस्वरूपी सोडवायला मदत करतं. 

आश्रयस्थानाची तीन रत्नं आहेत- बुद्ध, धर्म आणि संघ. त्यातील धर्म हे खरं आश्रयस्थान आहे. बुद्ध धर्म शिकवत असले, तरी ते टिचकी मारून चमत्काराने आपलं दुःख नष्ट करू शकत नाहीत. संघांमुळे आपल्याला आधार व प्रोत्साहन मिळतं, पण ते आपल्याला धर्माचरणाची सक्ती करू शकत नाहीत. धर्म आपल्याला प्रत्यक्ष अभ्यासावा लागतो व त्याच्याशी संवाद साधावा लागतो- दुःखातून बाहेर येण्याचा हा एकमेव मार्ग आहे. अर्थात, आपणच स्वतःचं रक्षण करू शकतो.

धर्माचे गुण

धर्माचे अगणित गुण असतात, पण मुख्य गुण असे-

  1. विविध व विभिन्न स्वभावांना धर्म अनुकूल असतो. थायलंड, तिबेट, श्रीलंका, जपान व इतर विविध ठिकाणी बौद्ध धर्माने लक्षणीयरित्या भिन्न रूपे घेतली असली, तरी सर्वत्र या परंपरांचा गाभा बौद्ध शिकवणींचा राहिला आहे आणि मुक्ती हेच त्यांचे उद्दिष्ट राहिले आहे.
  2. धर्म तर्कावर आधारित आहे. आपल्या मनांकडे व आपल्या सर्व अनुभवांकडेतो वास्तवदर्शी पद्धतीने पाहायला सांगतो. तो पोथनिष्ठ नाही, त्यात ईश्वरावर किंवा ईश्वरांवर श्रद्धेची आवश्यकता नाही, उलट प्रत्येक गोष्टीला तर्काच्या आधारे प्रश्न विचारावा असं हा धर्म शिकवतो. परम पूजनीय दलाई लामा अनेक वर्षँ जाणीव व मन यांसारख्या महत्त्वाच्या बौद्ध संकल्पनांच्या संदर्भात शोध घेण्यासाठी वैज्ञानिकांसोबत काम करत आहेत आणि बौद्ध गुरू व वैज्ञानिक एकमेकांकडून शिकत आहेत.
  3. धर्म केवळ एकाच समस्येवर केंद्रित नसतो, सर्व समस्यांच्या मुळांवर त्याचं लक्ष असतं. आपल्याला दर दिवशी न चुकता भयंकर डोकेदुखी होत असेल, तर आपण ऍस्परीन गोळी घेऊ शकतो. अर्थातच त्याचा परिणाम थोड्या काळासाठी होईल, पण डोकेदुखी परत येईलच. आपल्या डोकेदुखीपासून कायमस्वरूपी सुटका करणारी गोळी असती, तर आपण निश्चितपणे ती घेतली असती. धर्माचं यासारखंच आहे. अर्थात, यात केवळ डोकेदुखीतून नव्हे, तर समस्यांमधून व दुःखांमधून कायमस्वरूपी सुटका केली जाते. 

सारांश

बुद्ध अतिशय कुशल डॉक्टरसारखा आहे, ज्याने दुःखाचं निदान केलं आणि आपल्याला धर्माच्या रूपातील सर्वोत्तम संभाव्य औषध सांगितलं. पण औषध घ्यायचं का- म्हणजे धर्माचरण करायचं का- हे आपल्यावरच असतं. त्यासाठी कोणी आपल्यावर सक्ती करू शकत नाही, पण आपल्याला याचे लाभ दिसले व धर्मातून मनाला शांतता लाभली, किंवा आपल्या सर्व समस्या, व्यथा व दुःख नष्ट करायला त्याची कशी मदत होते हे आपल्याला खरोखरचं कळलं की, आपण स्वतःच्या व इतर सर्वांच्या लाभासाठी आनंदाने धर्माचरण करू.

Top