भारतामध्ये सुमारे २,५०० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या व शिकवण देऊन गेलेल्या महान आध्यात्मिक गुरूविषयी आपण सर्वांनीच ऐकलं आहे. पण शाक्यमुनी बुद्ध म्हणून ओळखला जाणारा ऐतिहासिक बुद्ध हा एकमेव बुद्ध नाही. बौद्ध धर्मात अगणित बुद्ध आहेत, किंबहुना विश्वातील प्रत्येक जीवामध्ये बुद्ध होण्याचं सामर्थ्य असतं, ही बौद्ध धर्मातील अत्यंत महत्त्वाची शिकवण आहे.
Who is buddha 01

ऐतिहासिक बुद्ध

बहुतांश पारंपरिक चरित्रांनुसार, कालांतराने बुद्ध झालेला मनुष्य सामायिक सनपूर्वी पाचव्या शतकात उत्तर भारतामधील उमराव असलेल्या शाक्य कुळात जन्मला. त्याचं नामकरण सिद्धार्थ  गौतम असं करण्यात आलं आणि त्याच्या जन्मसोहळ्यावेळी असित या एका ज्ञानी साधूने हे लहान मूल थोर राजा किंवा थोर धार्मिक गुरू होईल असं भविष्य वर्तवलं. सिद्धार्थचे वडील शुद्धोदन शाक्य कुळाचे प्रमुख होते आणि आपल्या मुलाने आपल्याच पावलावर पाऊल टाकावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती, त्यामुळे त्यांनी स्वतःच्या मुलाला महान राजा होण्याच्या मार्गापासून डळमळीत करतील अशा सर्व गोष्टींपासून संरक्षित ठेवलं. 

लहान सिद्धार्थला कौटुंबिक महालापासून दूर ठेवण्यात आलं आणि शक्य त्या सर्व सुखसोयी पुरवण्यात आल्या- अमूल्य दागदागिने व सुंदर स्त्रिया, कमळांनी भरलेले तलाव व वन्यपशुसंग्रह त्याला उपलब्ध होते. कोणत्याही प्रकारची दुर्दशा वा दुर्दैव यांपासून त्याचं संरक्षण करण्यात आलं होतं, कारण आजारी व वृद्ध लोकांना महालात प्रवेश करण्याला बंदी होती. कालांतराने सिद्धार्थाने अभ्यासात व खेळात चांगली प्रगती केली, आणि यशोधरेशी त्याचं लग्न झालं, आणि त्यांना राहुल हा मुलगा झाला.

जवळपास ३० वर्षं सिद्धार्थ सुखसोयींचं जीवन जगला, पण महालाच्या भिंतींबाहेर काय असेल याबद्दलचं त्याचं कुतूहल वाढत होतं. “हा प्रदेश माझा असेल, तर मी तो पाहायला हवा, इथले लोक पाहायला हवे,” असा विचार त्याने केला. अखेरीस शुद्धोधनाने त्याच्या मुलाला महालाबाहेर फेरी मारून आणण्याची तजवीज केली. तत्पूर्वी रस्ते साफसूफ करण्यात आले, आजारी व वृद्ध लोकांना लपवण्यात आलं, आणि सिद्धार्थला त्याचा सारथनी चन्ना घेऊन चालला. स्थानिक लोक हात हलवून स्मित करत होते. परंतु, या गर्दीतूनही रस्त्याकडेला बसलेली, पोक आलेली, सुरकुतलेली एक व्यक्ती सिद्धार्थने पाहिली. त्या गरीब व्यक्तीला काय झालं आहे, असं आश्चर्याचा धक्का बसून त्याने चन्नाला विचारलं. “ही वृद्ध व्यक्ती आहे, आपल्याला सर्वांचं भवितव्य असंच असणार आहे,” असं उत्तर चन्नाने दिलं. त्यानंतर सिद्धार्थला एक आजारी मनुष्य दिसला व एक प्रेत दिसलं. या दोन दृश्यांनी त्याचे डोळे आणखी उघडले- जीवनाच्या अपरिहार्य, तरीही पूर्णतः सर्वसाधारण भागांचा अखेरीस त्याला स्पर्श झाला.

शेवटी त्याला एक संन्यासी भेटला, तो दुःखापासून मुक्ती शोधत होता. या पहिल्या तीन दृश्यांनी बुद्धाला लक्षात आलं की, महालातील जगण्यामुळे त्याची फसगत झाली होती, त्याला सर्व दुःखांपासून संरक्षण पुरवण्यात आलं होतं. साधू पुरुषाला पाहिल्यावर त्याला दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याची शक्यता असल्याचं जाणवलं.

यापूर्वी सिद्धार्थला कधीच वृद्ध वा आजारी लोक दिसले नसतील, हे शक्य वाटत नाही. पण तो- आणि खरं तर आपण सर्वच- सर्वसाधारणतः दुःखाकडे दुर्लक्ष करून जीवन कसं जगत होता, हे यातून प्रतीकात्मकरित्या दिसतं. महालात परतल्यावर सिद्धार्थ अतिशय अस्वस्थ झाला. तो प्रिय जनांच्या सहवासात निवांतपणे आयुष्य जगला होता, पण तो आणि सर्वच जण कधीतरी वृद्ध होऊन, आजारी पडून मरण पावणार आहेत, हे ज्ञान झाल्यावरही त्याने आनंदात राहणं कसं शक्य होतं? प्रत्येकाला यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळावा, या ध्यासापोटी तो एके रात्री महालातून बाहेर पडला आणि त्याने भटकत्या संन्यासाचं जीवन स्वीकारलं. 

सिद्धार्थला अनेक महान गुरू भेटले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने साधना करून एकाग्रतेची सर्वोच्च पातळी गाठली. तरीही तो असमाधानी होता, कारण या साधना करूनही दुःख संपत नव्हतं. त्याने संन्यस्त आचरण सुरू केलं, शरीराला अन्न व सर्व शारीरिक सुखांपासून वंचित केलं आणि बहुतांश वेळ साधनेमध्ये घालवू लागला. सहा वर्षं अशा रितीने साधना केल्यावर त्याचं शरीर इतकं कृश झालं की एखाद्या सांगड्यावर त्वचेचा पातळ थर बसला असावा असा तो दिसू लागला.

एके दिवशी तो नदीपाशी बसला होता. तेव्हा त्याला एक शिक्षक लहान मुलाला एक वाद्य कसं वाजवायचं ते सांगत असल्याचं ऐकायला मिळालं. शिक्षक म्हणत होता, “या तारा खूप ढिल्या असून चालत नाही, तसं झालं तर वाद्य वाजवता येणार नाही. तसंच या तारा जास्त घट्ट असूनही चालत नाहीत, तसं झालं तर त्या तुटतील.” यातून सिद्धार्थच्या लक्षात आलं की संन्यस्त आचरणामध्ये त्याने घालवलेली वर्षं उपयोगाची नव्हती. महालातील त्याच्या सुखासीन आयुष्याप्रमाणेच संन्यस्त आचरणसुद्धा टोकाचं होतं आणि यातून दुःखावर मात करणं शक्य नव्हतं. या टोकांच्या मधून जाणारा मध्यम मार्ग हे उत्तर आहे, असा त्याने विचार केला.

त्या क्षणी सुजाता नावाची एक लहान मुलगी तिथे आली आणि तिने सिद्धार्थला दूध-भात दिला. सहा वर्षांमध्ये पहिल्यांदाच त्याच्या समोर असं पूर्ण अन्न आलं होतं. त्याने हे अन्न खाल्लं आणि त्याच्या सहसंन्याशांना धक्का बसला. त्यानंतर तो एका अंजिराच्या झाडाखाली जाऊन बसला. तिथे त्याने ठरवलं की, “मला संपूर्ण साक्षात्कार होईपर्यंत मी या स्थानावरून हलणार नाही.” या झाडाखाली- आता हे झाड बोधी वृक्ष म्हणून परिचित आहे, सिद्धार्थाला संपूर्ण साक्षात्कार झाला आणि तो बुद्ध म्हणून ओळखला जाऊ लागला.

साक्षात्कारानंतर लगेचच बुद्धाने चार आर्य सत्यांविषयी व अष्टांग मार्गाविषयी शिकवण दिली. पुढील ४० वर्षं तो उत्तर भारतीय प्रदेशांमध्ये प्रवास करत होता आणि त्याला झालेल्या साक्षात्कारातील शिकवण इतरांना सांगत होता. त्याने संघाची स्थापना केली आणि भारतभरात व कालांतराने आशियात व जगभरात बुद्धाची शिकवण पोचवण्याचं काम संघांनी केलं.

बुद्ध कुशीनगर इथे वयाच्या ऐंशीव्या वर्षी मरण पावला. महापरिनिर्वाणापूर्वी त्याने संघातील सदस्यांना काही शंका आहेत का किंवा काही शिकवणींवर स्पष्टीकरणाची गरज आहे का, असं विचारलं. आपल्या अनुयायांनी धर्माचरण करावं आणि नैतिक संयम पाळावा, असा सल्ला त्याने दिला. त्याचे अखेरचे शब्द होते, “हे भिक्खूंनो, लक्ष द्या, माझं तुम्हाला शेवटचं सांगणं इतकंच आहे- जगातील सर्व घटक अनित्य असतात. ते शाश्वत नाहीत. तुमच्या मुक्तीसाठी कष्ट करा.”  त्यानंतर तो उजव्या कुशीवर वळला आणि त्याचं निधन झालं.

बुद्ध कोण आहेत?

ऐतिहासिक बुद्ध कोण होता हे आपण पाहिलं, पण बुद्ध असणं म्हणजे नक्की काय?

कोणाला सक्षात्कार झाला, तर त्याला बुद्ध म्हणतात. बुद्धांना गाढ निद्रेतून जाग आलेली असते. रात्र भर पार्टीत सहभागी झाल्यानंतर येणारी ही गाढ झोप नसते, तर आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाला व्यापणाऱ्या संभ्रमातील गाढ निद्रा असते- आपण खरोखर कसे अस्तित्वात आहोत आणि सर्व गोष्टी खरोखरच्या कशा अस्तित्वात आहेत, याबद्दलचा संभ्रम.

बुद्ध म्हणजे ईश्वर नव्हे, आणि ते निर्मिकही नसतात. सर्व बुद्धांची सुरुवात आपल्यासारखीच असते, ते संभ्रमाने, अस्वस्थकारक भावनांनी व अनेक समस्यांनी वेढलेले असतात. पण हळूहळू करुणा व ज्ञानाच्या मार्गावरून चालून आणि हे दोन सकारात्मक गुण आत्मसात करण्यासाठी कष्ट करून साक्षात्कार प्राप्त करणं शक्य आहे.

बुद्धांचे तीन प्रमुख गुण असतात-

  1. ज्ञान- बुद्धाच्या मनात कोणतेही किंतु नसतात, त्यामुळे त्याला सर्व गोष्टी- विशेषतः इतरांना कशी मदत करायची ते, पूर्णतः, अचूकरित्या समजतं.
  2. करुणा- वरील ज्ञानामुळे आपण सर्व एकमेकांशी जोडलेले आहोत हे बुद्धाला कळतं आणि त्यामुळे त्याच्यात आत्यंतिक करुणा असते. प्रत्येकाची मदत करण्याची क्षमता आपल्यालात आहे हे त्यांना माहीत असतं. करुणेविना ज्ञान मनुष्याला उच्चशिक्षित करू शकतं, पण त्यांचा समाजाला फारसा उपयोग नाही. करुणेने त्यांना प्रत्येकाच्या हितासाठी काम करायची प्रेरणा मिळते. त्यातून बुद्धामध्ये दुसरा गुण निर्माण होतो- आपल्या सर्वांशी जोडून घेणं, हा तो गुण होय.
  3. क्षमता- दुःख नष्ट कसं करायचं यासंबंधीचे दोन गुण आणि इतरांना मदत करायची तीव्र इच्छा, यांद्वारे बुद्धांकडे इतरांचं खरंखुरं हित साधण्याची प्रत्यक्ष ताकद व क्षमता असते, त्यासाठी विविध कुशल मार्गांनी ते आपल्याला प्रबुद्ध होण्याचे मार्ग शिकवतात.

आपल्याला दुःख नको असतं, तसं इतरही कोणाला समस्या नको असतात, हे बुद्धांना कळतं. प्रत्येकाला सुखी व्हायचं असतं. त्यामुळे बुद्ध केवळ स्वतःसाठी काम करत नाहीत, तर विश्वातील प्रत्येक जीवासाठी काम करतात. ते स्वतःइतकीच इतरांचीही काळजी करतात.

अविश्वसनीय वाटावं इतक्या उत्कट करुणेतून प्रेरणा घेऊन ते सर्व दुःख नष्ट करण्याचे उपाय शिकवतात. याला ज्ञान म्हणतात- वास्तव व कल्पित यांच्यात अचूकरित्या भेद करण्यासाठी आवश्यक मनाची स्पष्टता. या ज्ञानाद्वारे आपल्याला सर्व नकारात्मक गोष्टी- सर्व संभ्रम, स्वार्थ व नकारात्मक भावना यांच्यापासून मुक्त होता येतं. आपणसुद्धा परिपूर्ण बुद्ध होऊ शकतो, आणि पूर्ण आंतरिक शांतता आपल्यालाही अनुभवायला मिळू शकते.

सारांश

बुद्ध हे परिपूर्ण गुरू असतात, त्यांना कुशल पद्धतींनी दुसऱ्यांना मदत कशी करायची हे योग्यरित्या माहीत असतं. ते करुणामय असतात आणि आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी आपली मदत करायला कायम तयार व इच्छुक असतात. सिद्धार्थाप्रमाणे आपणसुद्धा जगातील दुःखाविषयी आंधळे असतो. पण आपण ते टाळण्याचा व त्याकडे दुर्लक्ष करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी वृद्धत्व आणि मृत्यू आपल्या सर्वांनाच गाठतात. बुद्धाप्रमाणे दुःखाच्या वास्तवाला सामोरं जाऊन व ते समजून घेऊन आपणसुद्धा स्वतःला जीवनात अनुभवायला मिळणाऱ्या व्यथांपासून मुक्त करू शकतो, याची स्फूर्ती बुद्धाच्या जीवनकहाणीतून मिळते. आपल्या विध्वंसक भावना व संभ्रम यांच्यावर मात करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत, जेणेकरून बुद्धाप्रमाणे आपणही सर्व जीवांच्या हिताचे ठरू शकतो, याची आठवण बुद्धाच्या जीवनावरून व शिकवणीवरून आपल्याला होते. 

Top