आज वेसाक अर्थात बुद्ध पौर्णिमा साजरी करत असलेल्या जगभरच्या बौद्ध बंधुभगिनींना शुभेच्छा देताना मला अतीव आनंद होत आहे. शाक्यमुनी बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला. बोधगया येथे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, तर २६०० वर्षांपूर्वी कुशीनगर येथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले. तरीही मला खात्री आहे की त्यांची शिकवण वैश्विक असून आजही ती तितकीच समयोचित आहे. परोपकाराच्या खोल जाणिवेसह आणि ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर मार्गस्थ होत बुद्धांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य संन्यस्तपणे व्यतीत केले. ज्यांना त्यांच्या अनुभवांमध्ये रस होता, त्यांच्याशी आपले अनुभव वाटून घेतले. परस्परावलंबी उत्पत्ती आणि इतरांना इजा न पोहचवण्याचा सल्ला, हे त्यांचे दोनही दृष्टिकोन अहिंसेच्या तत्त्वावर भर देतात. जे आजही जगातील चांगल्या शक्तींच्या रूपात कायम आहेत. करुणेद्वारा प्रेरित अहिंसेचे तत्त्व आपल्या सहजीवी प्राणिमात्रांसाठी उपयुक्त आहे.
परस्परावलंबन वाढत असलेल्या आजच्या जगात, आपले कल्याण आणि आनंद इतर लोकांवर अवलंबून आहे. आज, आपल्यासमोरील आव्हाने पेलण्यासाठी मानवतावादाचे एकतेचे तत्त्व स्वीकारणे गरजेचे आहे. आपल्यात वरवर तफावत असली तरी प्रत्येक जण त्याच्या शांतता आणि आनंदाच्या मूलभूत इच्छांच्या बाबतीत एकसमान आहे. बौद्ध शिकवणीत ध्यानधारणेच्या माध्यमातून चित्त स्थिर करण्यासंबंधीच्या प्रशिक्षणाचा अंतर्भाव आहे. चित्त स्थिर करण्याच्या प्रशिक्षणासाठी प्रेम, करुणा, औदार्य आणि संयम या सारखे गुण विकसित करणे आणि अधिक परिणामकारकतेसाठी दैनंदिन जीवनात त्यांचा वापर करणे गरजेचे आहे.
अगदी अलीकडेपर्यंत, जगव्याप्त बौद्ध समुदायात फक्त परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव होती आणि परस्परातील समान दुव्यांबाबतची समज नव्हती. आज विविध भागात उत्क्रांत झालेली बौद्ध धर्माची संपूर्ण मालिका त्यात रूची असणाऱ्या प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. शिवाय आपल्यासारखे बौद्ध साधना करणारे आणि प्रशिक्षण देणारे परस्परांना भेटू शकतात आणि ज्ञानाचे आदानप्रदान करू शकतात.
तिबेटी बौद्ध साधू या नात्याने मी स्वतःला नालंदा परंपरेचा वारस समजतो. नालंदा विश्वविद्यापीठात ज्या रीतीने बौद्ध धर्माची शिकवण दिली जाते किंवा अभ्यासली जाते, त्याची मूळे तर्कशास्त्र आणि कारणमिमांसेत रुजलेली आहेत. आणि हा भारतातील त्याच्या प्रसाराचा कळसाध्याय आहे. जर आपण २१व्या शतकातील बौद्ध असू तर आपणही केवळ श्रद्धेवर निर्भर न राहता इतर अनेक लोकांप्रमाणे अशा संस्थेत बौद्ध शिकवणीचा अभ्यास करायला हवा, तिचे विवेचन करायला हवे.
बुद्ध काळापासून जगात आमूलाग्र बदल झाला आहे. आधुनिक विज्ञानाने शरीरशास्त्र क्षेत्रातील ज्ञान अत्याधुनिकपणे विकसित केले आहे. तर दुसरीकडे बौद्ध विज्ञानाने मन आणि भावनांसंबंधीच्या क्षेत्रातील प्राथमिक ज्ञान संपादित केले आहे, आधुनिक विज्ञानासाठी हे क्षेत्र अजूनही नवे आहे. त्यामुळे दोनही पक्षांकडे परस्परपूरक ठरेल, असे अत्यंत महत्त्वाचे ज्ञान आहे. मला खात्री आहे की या दोन दृष्टिकोनांच्या एकत्रित अविष्कारात आपल्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक कल्याणाच्या समृद्धीसाठी साहाय्यक ठरणाऱ्या शोधांच्या क्षमता आहेत.
बौद्ध म्हणून आपल्याकडे बुद्धाच्या शिकवणींचा वारसा आहे, पण हा संदेश मानवी समुदायातील उर्वरित घटकांशी व्यापक संवाद साधण्यासाठीही समयोचित आहे. सर्वच धर्म सर्व लोकांच्या सुखाला प्राधान्य देतात हे अधोरेखित करत आंतरधर्मीय जाणिवा वृद्धिंगत करण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. जगासमोर उद्भवलेल्या या गंभीर संकटाच्या काळात, आपले आरोग्य धोक्यात असताना आणि आपले आप्त व मित्रपरिवाराला गमावल्याचे दुःख झाकोळले असताना, आपण मानवी कुटुंबाचा सदस्य म्हणून सर्वांना एकत्रित आणणाऱ्या घटकांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यानुसार परस्पराबद्दल करुणाभाव बाळगायला हवा, कारण केवळ एकत्रित येऊन संघटित रीत्या जागतिक प्रयत्न केल्यास आपण या अभूतपूर्व संकटाचा सामना करू शकतो.
दलाई लामा, ७ मे, २०२०