स्पष्टीकरण
काळजी करणारी, वास्तववादी मनोवृत्ती विकसित केल्यावर पुढचं पाऊल म्हणजे इतरांविषयी करुणा विकसित करणं. करुणा म्हणजे इतरांकडे सहानुभूतीवर आधारित अनुकंपेने पाहणं नव्हे. इतरांनी आपल्यासारखंच दुःखापासून व दुःखाच्या कारणापासून मुक्त व्हावं अशी इच्छा म्हणजे करुणा. यात काही आशेला जागा नाही, असं मानून केवळ इच्छा राखून ठेवण्याचा हा प्रकार नसतो; उलट दुःख व दुःखाची कारणं यांपासून मुक्त होणं शक्य आहे, या आत्मविश्वासावर ही भावना आधारलेली असते. आपल्याला शक्य असेल त्या मार्गाने मदत करण्याच्या इच्छेचाही समावेश करुणेमध्ये होतो. यात केवळ तटस्थता अपेक्षित नाही. आपण भौतिक मार्गाने मदत करतो किंवा गरज पडल्यास मानसिकदृष्ट्या इतरांना त्यांच्या समस्यांवर मात करण्यासाठीची मनोवस्था निर्माण करायला मदत करतो.
ध्यानधारणा
- शांतचित्ताने श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा.
- तुमचं घर व तुमची सर्व मालमत्ता भूकंपात गमवावी लागली आहे, आणि तुम्हाला उघड्यावर झोपावं लागतं आहे, अन्नपाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे, आणि तुमचं जीवन पुन्हा उभारण्यासाठी तुमच्या पैसा नाहीये, अशी कल्पना करा. अशा वेळी तुम्हाला पूर्णतः निराश व खिन्न वाटतं.
- अशा परिस्थितीतून सुटका व्हावी असं तुम्हाला वाटेल, त्यासंबंधी कल्पना करा, आणि तुमच्या दुःखाचं कारण तुमच्या खिन्नतेमध्ये आहे, हे समजून घ्या. या खिन्नतेपासून मुक्त व्हायचा आणि जीवन पुन्हा उभारण्यासाठीचे मार्ग शोधण्याचा निर्धार करा.
- मग तुमची आई अशाच परिस्थितीत आहे अशी कल्पना करा आणि मुक्त होण्याचा निर्धार तुमच्या आईकडे द्या व करुणा विकसित करा- तिची अशा परिस्थितीतून सुटका व्हावी असा निर्धार विकसित होऊ द्या.
- तिने आशा गमावू नये आणि धाडसाने व समर्थपणे जीवन पुन्हा उभारावं, अशी इच्छा ठेवा.
- त्यानंतर सध्या अशा परिस्थिती असलेल्या लाखो नेपाळी लोकांविषयी अशीच कल्पना करा आणि त्यांच्याबद्दल करुणा विकसित करा.
- भावनिक असमतोलासाठी अशीच प्रक्रिया पार पाडा. तुम्ही भावनिकदृष्ट्या असमतोल अवस्थेत होतात तो काळ आठवा आणि मन शांत व स्पष्ट ठेवून भावनिक समतोल परत मिळवायचा प्रयत्न तुम्ही केलात हे लक्षात घ्या, आणि इतरांनीही असमतोलाच्या परिस्थितीतून मुक्त व्हावं यासाठी निर्धार करा.
- त्यानंतर हा निर्धार तुमच्या आईकडे द्या, आणि मग इतर सर्व जीवांपर्यंत तो पोचू द्या.
सारांश
आपल्याला सुखी व्हायचं असतं, कधीच दुःखी व्हायचं नसतं, तसंच प्रत्येकाच्या बाबतीत होतं. आपल्याप्रमाणे प्रत्येकाला त्यांच्या दुःखापासून व समस्यांपासून मुक्त व्हायचं असतं. त्यांच्यासाठी करुणा विकसित करण्याकरिता- त्यांनी दुःखापासून मुक्त व्हावं अशी इच्छा राखण्याकरिता- पहिल्यांदा आपल्याला स्वतःच्या समस्या कबूल करायला हवं, त्यांना सामोरं जायला हवं आणि त्यांपासून मुक्त होण्याची तीव्र इच्छा विकसित करायला हवी. स्वतःचं दुःख दूर करण्याचा आपला निर्धार जितका तीव्र असेल तितके आपण इतरांच्या दुःखाबाबत सहभाव राखू शकतो आणि त्यांना त्यांच्या दुःखावर मात करण्यासाठी मदतीचा निर्धार करू शकतो. इतरांविषयी असा निर्धार राखण्याला आपण ‘करुणा’ असं म्हणतो.