शारीरिक आणि मानसिक अशांती
तुम्ही पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर कुठेही राहत असा, शांतता प्रत्येकासाठी आवश्यक असते. गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकाला प्रामाणिकपणे शांतता हवी असते. आपण सर्व जण माणसे आहोत आणि सामान्यतः एकसमान गोष्टींशी जोडलेले असतो, जसे आनंदी राहणे आणि आनंदी जीवन जगणे. आणि आपणा सर्वांना आनंदी जीवन जगण्याचा अधिकार आहे. आपण इथे त्याच स्तरावर चर्चा करत आहोत. प्रत्येकात ‘मी’ किंवा ‘अहं’ असतो, पण प्रत्यक्षात ‘मी’ किंवा ‘अहं’ म्हणजे नक्की काय, याबाबत आपल्याला पूर्ण ज्ञान नसतं. तरीही आपल्यात ‘मी’पणाची तीव्र भावना असते. त्या भावनेतूनच आनंदप्राप्तीची आणि वेदनेपासून दूर राहण्याची भावना जन्म घेते. हा भाव आपोआप जन्मतो किंवा प्रकट होतो. त्या आधारे आपल्याला आनंदी होण्याचा हक्क आहे.
दरम्यान आपल्या आयुष्यात अप्रिय घटना आणि अडथळे येणे भाग आहे. यात दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार शारीरिक वा भौतिक वेदनेचा आहे, ज्यात आजारपण आणि वृद्धत्व असे घटक येतात. अगदी माझचं उदाहरण पाहा, मी या अनुभवातूनच जात आहे- मला ऐकायला,पाहायला आणि चालायला त्रास जाणवतो आहे. दुसरा प्रकार मुख्यतः मानसिक पातळीवरील आहे. जरी भौतिक पातळीवर सर्व प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध असतील, पण आपण तणाव आणि स्वतःविषयी साशंकता अनुभवत असू तर आपल्याला एकाकी वाटेल. आपल्यात असूया, भीती आणि तिरस्काराची भावना जन्म घेते आणि आपण दुःखी होतो. त्यामुळे भौतिक पातळीवर आरामदायी स्थिती असली तरी मानसिक पातळीवर अनेक प्रकारची दुःखे असू शकतात.
जिथे भौतिक पातळीवरील समस्या निगडित आहेत, आपण पैशाच्या मदतीने काही प्रमाणात दुःख कमी करून भौतिक समाधान मिळवू शकतो, हे खरं आहे. पण सत्ता, पत आणि प्रतिष्ठा अशा भौतिक स्तरावरील गोष्टी आपल्याला आत्मशांती देऊ शकत नाहीत. खरंतर काही वेळा, अतिरिक्त धनसंपत्तीमुळेच आपल्या चिंता अधिक वाढतात. आपण आपल्या पत-प्रतिष्ठेबाबत फार गंभीर असतो, ज्यातून ढोंगीपण, अशांती आणि तणाव उत्पन्न होतो. त्यामुळे मानसिक आनंद बाह्यगोष्टींवर अवलंबून नाही, तर आपल्या विचार करण्याच्या आंतरिक पद्धतींवर अवलंबून आहे.
आपण पाहू शकतो की काही गरीब लोक मानसिक पातळीवर खंबीर आणि आनंदी असतात. खरंतर आपल्याकडे मानसिक समाधान असेल, तर आपण कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास सहन करू शकतो आणि तो परावर्तित करू शकतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक वेदनेच्या तुलनेत मानसिक वेदना अधिक गंभीर असते, असे मला वाटते. कारण आत्मिक सुखातून शारीरिक वेदनेवर विजय मिळवता येऊ शकतो, पण भौतिक सुखातून मानसिक वेदना नष्ट करता येत नाही.
माणसाच्या मानसिक वेदना आणि समस्या प्राण्यांच्या तुलनेत अधिक गंभीर असतात. शारीर पातळीवर कदाचित दोघांच्या वेदना सारख्या असू शकतील, पण मानवाजवळ बुद्धी आणि विवेक असल्याने आपल्या मनात शंका, असुरक्षितता आणि तणावाच्या भावना उत्पन्न होतात. यातून मानसिक तणाव जन्मास येतो; आणि हे सर्व माणसाच्या उच्चतम बौद्धिक क्षमतांमुळे होते. त्यामुळे याचा सामना करण्यासाठीही आपण मानवी बुद्धिमत्तेचा वापर करणे गरजेचे आहे. भावनिक पातळीवर काही भावना जन्मताच आपली मनःशांती भंग पावते, तर दुसऱ्या बाजूला काही भावना आपल्याला मनोबल देतात. त्या आपले मनोबल आणि विश्वास यांचा आधार असतात आणि शांत व स्थिरचित्त मिळवण्यासाठी साहाय्यक ठरतात.
भावनांचे दोन प्रकार
अशा प्रकारे भावनांचे दोन प्रकार पडतात. यातील एक भावनिक स्तर मनःशांतीसाठी फार घातक असतो, ज्यात क्रोध आणि तिरस्कारासारख्या विघातक भावनांचा समावेश असतो. त्या केवळ आपली मनःशांतीच नष्ट करत नाही, तर त्या आपली बोली आणि शरीरासाठीही नुकसानदायक असतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्या आपल्या स्वभावावर परिणाम करतात. आपल्याला हानिकारक मार्गांकडे ढकलतात, त्यामुळे त्या विघातक असतात. दुसरीकडे करुणेसारख्या भावना आपल्याला मनोबल आणि मनःशांती बहाल करतात. त्या आपल्याला क्षमाशील बनवतात. उदा. एखाद वेळी एखाद्या व्यक्तीमुळे आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागले, तरी क्षमाशीलता आपले चित्त स्थिर ठेवायला आणि मनःशांती मिळवायला साहाय्य करते. त्यामुळे ज्या व्यक्तीवर आपण प्रचंड रागावलेले होतो, तो आपला चांगला मित्रही बनू शकतो.
बाह्य शांती
जेव्हा आपण शांततेविषयी बोलतो, तेव्हा या भावना आणि आत्मशांतीविषयीही बोलायला हवे. त्यामुळे आपण आत्मशांतीकडे नेणाऱ्या भावनांचा शोध घ्यायला हवा. पण तत्पूर्वी मला बाह्य शांतीविषयी काही सांगायचे आहे.
केवळ हिंसा नसणे म्हणजे बाह्य शांती नव्हे. उलट शीतयुद्धावेळी वरवर पाहता शांतता होती, पण त्या शांततेमागे परमाणु विध्वंसाचे भय लपले होते. दोन्ही पक्ष एकमेकाकडून आण्विक हल्ले होण्याच्या भयाने ग्रासलेले होते, त्यामुळे ही खरी शांतता नव्हती. खरी शांतता आत्मशांतीतून उत्पन्न होते. जेव्हा जेव्हा अशी तणावाची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा मला वाटते की आपण शांततेच्या मार्गाने उत्तरे शोधायला हवीत, अर्थात संवादाच्या मार्गाने तंटे सोडवायला हवे. अशा प्रकारे शांतता ही दुसऱ्यांच्या जीवनाविषयी सन्मान आणि उदारता राखण्याशी, इतरांना इजा पोहचू नये याची काळजी घेण्याशी आणि इतरांचे जीवन आपल्याप्रमाणेच सन्माननीय असल्याच्या दृष्टिकोनाशी निगडित आहे. आपण त्याचा आदर राखायला हवा. आणि याच धर्तीवर आपल्याला इतरांना मदत करणे शक्य असल्यास तशी मदतही करायला हवी.
आपण अडचणीत असताना कुणी मदतीस आल्यास आपण त्याची प्रशंसा करतो. जर दुसरे कोणी त्रासात असेल, तर आपण केवळ मानवी सहानुभूती दर्शवली तरी समोरचा माणूस त्याबाबत समाधान व्यक्त करतो आणि आनंदी होतो. त्यामुळे आंतरिक करुणा आणि मनःशांतीमुळे सर्व कृती शांतिदायक होतात. आपण आत्मशांती प्रस्थापित करू शकलो तर आपण बाह्य शांतीही प्रस्थापित करू शकतो.
माणूस म्हणून आपल्या इतरांसोबत होणाऱ्या संवादात वेगवेगळे दृष्टिकोन समाविष्ट असतात. पण ते ‘मी’ आणि ‘ते’ या संकल्पनेसोबतच ‘स्वहित’ आणि ‘इतरांचे हित’ अशा संकल्पनांवर आधारित असतात. अशा विचारांमुळे युद्धे होऊ शकतात. आपण विचार करत असतो की शत्रुला संपवून आपण विजय साध्य करू शकतो. पण आता परिस्थिती बदलत आहे. आर्थिक आणि पर्यावरणीय कारणांमुळे आपण एकमेकांवर अवलंबून आहोत. त्यामुळे ‘मी’ आणि ‘ते’ सारख्या संकल्पना कालबाह्य झाल्या आहेत. ज्यांना आपण ‘ते’ समजत होतो, ते आता ‘आम्ही’चा भाग झाले आहेत. अशा प्रकारे करुणा हे मनःशक्ती साध्य करण्याचे मुख्य माध्यम आहे, जे या ग्रहावरील सहा बिलियन लोकांना आनंदी होण्याचा समान हक्क आहे या तथ्यावर आधारित आहे. या विचारांच्या आधारे आपण इतरांचा सहज मनाने स्वीकार करतो आणि त्या आधारे बाह्य शांती प्रस्थापित करू शकतो.
लहान स्तरावरून सुरुवात करू
जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला आधी स्वतःपासून, मग आपल्या कुटुंबापासून आणि नंतर आपल्या समूहापासून सुरुवात करायला हवी. उदाहरणार्थ, मॅक्सिकोमध्ये एका मित्राने आपल्या समूहासाठी ‘शांती क्षेत्र’ उभारले आहे. त्यासाठी त्याने समूहातील प्रत्येकाची सहमती घेतली. प्रत्येकाने मान्य केले की ते शांती क्षेत्रामध्ये हिंसा होणार नाही, याची दक्षता घेतील. त्यांना एखाद्या गोष्टीवरून वादविवाद वा भांडण करावेच लागणार असेल तर संबंधित लोक विवादासाठी शांती क्षेत्राच्या सीमेपार जातील. ही फारच आनंदाची बाब आहे.
विश्व शांतीची अपेक्षा करणे कदाचित फार मोठी गोष्ट होईल, पण वैश्विक स्तरावर अखेर तेच योग्य असेल. पण लहान स्तरावर आधी स्वतःपासून सुरुवात करून मग कुटुंब, समूह, जिल्हा आदी स्तरांवर शांती क्षेत्रांची स्थापना करणे अधिक व्यावहारिक ठरेल. अशा प्रकारे मनःशांतीचा करुणेशी घनिष्ट संबंध आहे.
जग सध्या मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. मला आठवते आहे की काही वर्षांपूर्वी माझे जर्मन मित्र, स्वर्गीय फ्रेड्रिक वोन वाइझॅकर, ज्यांना मी माझे गुरू मानतो, सांगत होते की ते तरुण होते तेव्हा प्रत्येक जर्मन माणसाच्या दृष्टीने सगळे फ्रेंच लोक शत्रू होते. आणि फ्रेंच लोकांच्या दृष्टिकोनातून सर्व जर्मन शत्रू होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता आपल्याकडे युरोपीय संघाची संयुक्त शक्ती आहे, ही फार समाधानकारक बाब आहे. पूर्वी प्रत्येक देशाच्या दृष्टीने त्यांचे स्वतःचे सार्वभौमत्व मोलाचे होते. पण आता युरोपात एक नवे वास्तव आकाराला आले आहे, आता संघातील देशांचे सामाईक हित स्वतंत्र देशांच्या वैयक्तिक हितापेक्षा महत्त्वाचे मानले जाते. अर्थव्यवस्था सुधारल्यास त्याचा प्रत्येक सदस्य राष्ट्राला लाभ होतो. त्यामुळे आता हा विचार आपल्या सहा बिलियन ग्रहवासियांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. आपण प्रत्येक व्यक्तीचा एका मोठ्या कुटुंबाचा सदस्य म्हणून विचार करायला हवा.
करुणा-एक जैविक तत्त्व
जिथे करुणेचा संबंध आहे, मानव, सस्तन प्राणी आणि पक्ष्यांसारख्या आईने जन्म दिलेल्या सस्तन घटकांचा विकास त्यांना मिळणारे प्रेम आणि काळजी यावर अवलंबून आहे. काही प्रजाती सोडून सर्व जिवांना ते लागू आहे. समुद्री कासव, फुलपाखरे, आणि सामन सारख्या माशांच्या प्रजाती, ज्या अंडी घालून मरून जातात, त्या या नियमाला अपवाद आहेत. उदाहरण म्हणून समुद्री कासवांकडेच पाहा ना. समुद्री कासवांची आई काठावरील रेतीत अंडी घालून निघून जाते, त्यामुळे पिल्लांना जिवंत राहण्यासाठी स्वतःच संघर्ष करावा लागतो. त्यांना आईच्या ममतेची गरज नसते, तरी ते जिवंत राहतात. त्यामुळे कधी कधी मी माझ्या श्रोत्यांना सांगतो की, असा एखादा वैज्ञानिक प्रयोग करणे गमतीशीर ठरेल की अंड्यातून कासव बाहेर आल्यानंतर त्याला त्याच्या आईसोबत ठेवावे आणि त्यांच्यातील भावनिक बंध तपासावेत. मला नाही वाटत की, ते एकमेकांप्रती तसे भावबंध व्यक्त करतील. निसर्गाने त्यांची रचनाच तशी केली आहे. त्यामुळे त्यांना प्रेमाची आवश्यकता नाही. पण सस्तन प्राणी विशेषतः आपण मानव आईच्या ममत्वाशिवाय जगू शकत नाही.
लहान बाळाचे संगोपन करण्यासाठी करुणा, प्रेम, काळजी आणि सेवा भाव आवश्यक असतो. शास्त्रज्ञ सांगतात की बाळाच्या जन्मानंतरचे काही आठवडे त्याच्या मेंदूच्या विकासासाठी आईचा स्पर्श अत्यंत आवश्यक असतो. आपण पाहू शकतो की ज्या कुटुंबांमध्ये प्रेम, स्नेह आणि उबदार वातावरण असते, त्या कुटुंबातील मुले आनंदी असतात. त्यांचे शारीरिक स्वास्थ्यही चांगले असते. पण लहानपणी पुरेसे प्रेम न लाभलेल्या मुलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
काही शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला होता. त्यांनी काही छोट्या माकडांना त्यांच्या आईपासून दूर ठेवले. त्यांना आढळून आले की आईपासून दुरावलेल्या माकडांचा स्वभाव चिडखोर झाला होता. पण जी माकडे त्यांच्या आईसोबत होती, ती आनंदी आणि खेळकर होती. विशेषतः माणसांच्या मुलांना अपेक्षित प्रेम नाही लाभले तर त्यांचा स्वभाव रूक्ष होतो. त्यांना इतरांप्रति प्रेम व्यक्त करताना अडचणी येतात. प्रसंगी ते हिंसकही बनतात. अशा प्रकारे प्रेम हे जैव विज्ञानावर आधारित एक जैविक तत्त्व आहे.
याशिवाय मला असेही वाटते की करुणा आणि भावना जैविक भौतिक स्तराशी जोडलेल्या आहेत. काही शास्त्रज्ञांच्या मते, आपण कायम राग, क्रोध आणि घृणेच्या भावनेने ग्रासलेले असू तर आपल्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो आणि ती कमजोर होतो. पण करुणामय मनामुळे रोगप्रतिकारशक्ती सक्षम होते.
आता आपण वैद्यकीय क्षेत्रातील एक उदाहरण पाहू. एकीकडे नर्स आणि वैद्यकीय चिकित्सकांमध्ये एकमेकांप्रति दृढ विश्वास असेल आणि दुसरीकडे रुग्णाचाही त्यांच्यावर विश्वास असेल तर ते रुग्णाच्या आरोग्य सुधारणेसाठी लाभदायी असते. तर विश्वासाचा आधार काय आहे? वैद्यकीय चिकित्सक आणि नर्सच्या पातळीवर ते दोघेही रुग्णाच्या आरोग्याची मनापासून काळजी घेत असतील, तर त्यातून विश्वास उत्पन्न होतो. पण दुसऱ्या बाजूला वैद्यकीय चिकित्सक कितीही निष्णात असेल आणि तो रुग्णाला एखाद्या मशीनप्रमाणे यंत्रवत वागवत असेल तर रुग्णाला त्याच्याबद्दल फार कमी विश्वास वाटेल. वैद्यकीय चिकित्सक फार अनुभवी असेल तर थोडा विश्वास जाणवेल, पण तो करुणाशील असेल तर अधिक विश्वास वाटेल. तेव्हा रुग्णांना तणावमुक्त वाटेल आणि त्यांना शांत झोप लागेल. पण ते मनातून अस्वस्थ असतील तर त्यांना त्रास जाणवेल आणि त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होईल.
पण जीवनात समस्या अपरिहार्य असतात. महान बौद्ध गुरू शांतिदेव यांचा सल्ला आहे की आपल्यासमोर समस्या आल्या की त्यांचे विश्लेषण करायला हवे. त्या समस्यांचे समाधान शक्य असेल तर चिंतेचे काहीच कारण नाही. फक्त ते समाधान अमलात आणायला हवे. पण त्या समस्यांचे समाधान शक्यच नसेल तेव्हाही चिंता करण्यात अर्थ नाही, कारण चिंता करूनही काहीच लाभ होणार नाही. या दृष्टिकोनातून विचार करणे फार लाभकारक आहे. आपल्या समोर एखादी मोठी समस्या आली तरी अशा दृष्टिकोनामुळे आपण त्या समस्येचा प्रभाव कमी करू शकतो.
जोपर्यंत आपल्याला इतरांच्या काळजीची आवश्यकता आहे, जसे आपले बालपण, तोपर्यंत आपल्यात प्रेम आणि करुणेची भावना टिकून राहते. पण आपण जसजसे अधिक स्वतंत्र, स्वावलंबी होत जातो आपल्याला इच्छित गोष्ट साध्य करण्यासाठी करुणेपेक्षा आक्रमकता अधिक गरजेची वाटू लागते. पण या ग्रहावर राहणारे सहा बिलियन लोक आईपासून जन्माला आलेले आहेत. प्रत्येकाने आपल्या आईची काळजी अनुभवली आहे. आई नसल्यास दुसऱ्या व्यक्तीकडून आईचे ममत्व अनुभवले आहे. पण आपण जसजसे मोठे होत जातो, आपल्यातील प्रेम आणि करुणेचा भाव कमी होत जातो, आपण आक्रमक होत इतरांना भीती दाखवायला सुरुवात करतो. आणि त्यातून नव्या समस्यांना जन्म देतो.
वास्तव जाणून घेण्याची गरज
जेव्हा आपल्या मनात क्रोधाची भावना जन्मते, तेव्हा ती आपल्या मेंदूलाही वश करते. स्वीडनमधील एका शास्त्रज्ञाने मला सांगितले की, आपण ज्या व्यक्तीवर रागावलेले असतो, त्याची आपल्या मनातील प्रतिमा ९० टक्के काल्पनिक असते. याचाच अर्थ ९० टक्के नकारात्मक भाव काल्पनिक असतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीबाबत आपल्याला तीव्र ओढ आणि आकर्षण वाटते तेव्हाही अशीच स्थिती असते. आपल्याला ती व्यक्ती १०० टक्के सुंदर आणि चांगली वाटत असते. पण या भावनेतील बहुतांश भागही काल्पनिकच असतो. आपण वास्तव पाहू शकत नाही. म्हणूनच वास्तव समजून घेणे खूप आवश्यक आहे.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुणालाच समस्या नको असतात. तरी समस्या का उद्भवतात? समस्या आपला साधेपणा, अज्ञान आणि दृष्टिकोनामुळे उद्भवतातः आपण वास्तव पाहत नाही. आपल्या संकुचित दृष्टिकोनामुळे आपण वास्तवाचे मूळ रूप पाहू शकत नाही. आपण फक्त दोन पैलू पाहतो. जे पुरेसे नसतात. आपण तीन, चार, सहा पैलू पाहण्याची गरज असते. कोणत्याही परिस्थितीच्या तटस्थ आकलनासाठी आपले चित्त स्थिर असणे आवश्यक असते.
इथेही सर्व पैलू समजून घेण्यासाठी विधायक आणि विघातक भावनांमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे असते. जसजसे आपण मोठे होत जातो, करुणेचे जैविक तत्त्व संपुष्टात येऊ लागते, ते पुन्हा सक्षम करण्यासाठी आपल्याला करुणेची शिकवण आणि प्रशिक्षणाची आवश्यकता असते. पण जैविक प्रकारातील करुणा पक्षपाती असते. ती इतरांकडून मिळणाऱ्या प्रेम आणि स्नेहावर आधारलेली असते. याच करुणेला आधारभूत ठेवत आणि त्याला वैज्ञानिक तर्क आणि तत्त्वांचा आधार देत आपण जैविक करुणा संतुलित ठेवू शकतोच, पण ती वृद्धिंगतही करू शकतो. अशा प्रकारे शिकवण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून संकुचित आणि पक्षपाती करुणा असीम निष्पक्ष करुणेत परावर्तित होऊ शकते, जी सहा बिलियन ग्रहवासी आणि त्याही पलीकडे विस्तारू शकते.
शिक्षेचे महत्त्व
या सर्वाची गुरुकिल्ली म्हणजे शिक्षा. आधुनिक शिक्षा प्रणाली मेंदू आणि बुद्धीच्या विकासावर अधिक भर देते, पण ते पुरेसे नाही. आपल्याला आपल्या शिक्षा प्रणालीत स्नेहशीलता विकसित करायला हवी. आणि हे शिशुवर्गापासून विद्यापीठापर्यंत सर्व स्तरांवर व्हायला हवे.
अमेरिकेत काही शास्त्रज्ञांनी मुलांमध्ये करुणा आणि चैतन्य भाव विकसित करणारे शैक्षणिक उपक्रम तयार केले आहेत. आणि हे उपक्रम मुलांना त्यांचा पुढील जन्म सुधारण्यासाठी आणि निर्वाणासाठी विकसित केलेले नाहीत, तर हाच जन्म सफल करण्यासाठी विकसित केले आहेत. काही विद्यापीठांमध्येसुद्धा पूर्वीपासूनच असे शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत, ज्यांचा उद्देश करुणा आणि स्नेहशीलता विकसित करणे हा आहे. अशा प्रकारची निष्पक्ष करुणा इतरांच्या दृष्टिकोनावर अवलंबून नसते, तर मानवतावादाच्या प्रामाणिक विचारावर अवलंबून असते. आपण सर्व सहा बिलियन ग्रहवासी लोकसंख्येचा हिस्सा आहोत, आणि प्रत्येक जण समतेच्या सिद्धांतावर आधारित करुणामय आयुष्यासाठी पात्र आहोत.
आंतरिक आणि बाह्य निःशस्त्रीकरण
अशा प्रकारे आपल्याला आत्मशांती आणि विश्वशांतीसाठी, आंतरिक आणि बाह्य निःशस्त्रीकरणाची आवश्यकता आहे. याचा अर्थ आंतरिक पातळीवर करुणा विकसित करून हळूहळू त्या आधारे आपण सर्व देशांमध्ये बाह्य पातळीवर निःशस्त्रीकरण करू शकू. हे फ्रेंच-जर्मन युरोपीय संघटित सेना उभे करण्यासारखे आहे. जर संपूर्ण युरोपीय संघासाठी संघटित सैन्यबल असेल तर संघातील सदस्य राष्ट्रांमध्ये कोणताही शस्त्रसंघर्ष निर्माण होणार नाही.
एकदा ब्रसल्समध्ये विदेशी मंत्र्यांची बैठक होती. त्या बैठकीत मी सांगितले होते की, भविष्यात युरोपीय संघाचे मुख्यालय पूर्वेकडील युरोपातील पोलंडसारख्या देशात स्थलांतरित केल्यास ते अधिक लाभदायी होईल. त्यानंतर संघाचा विस्तार करून रूसचाही समावेश करावा आणि ‘नाटो’चे मुख्यालय मॅक्सोला स्थलांतरित करावे. आणि हे शक्य झाले तर खऱ्या अर्थाने शांतता प्रस्थापित होईल आणि युरोपला युद्धाचे संकट राहणार नाही. सध्या रूस आणि जॉर्जिया दरम्यान काही वाद आहेत, पण आपण आशा सोडता कामा नये.
शांततावादाच्या या बाह्य विस्ताराच्या आधारे, फ्रान्समधील शस्त्रनिर्मिती उद्योग बंद करून अर्थव्यवस्था अधिक उत्पादक कार्यांशी जोडली जायला हवी. उदाहरणार्थ कारखान्यांमध्ये टॅंक निर्माण करण्याएवजी बुल्डोजर निर्माण करता येऊ शकतात.
अफ्रिकी देशांनाही आपल्या मदतीची आवश्यकता आहे. श्रीमंत आणि गरिबांमधील दरी ही जागतिक पातळीवरच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरीलही मोठी समस्या आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर इथे फ्रान्समध्येही श्रीमंत आणि गरिबांमध्ये मोठी दरी आहे. काही लोक अगदी भूकबळीची शिकार झाले आहेत. पण शेवटी आपण मनुष्य आहोत. आपल्या आशा, गरजा आणि समस्या सारख्या आहेत. आत्मशांतीच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला या सर्व बाबींचा विचार करायला हवा.