एखाद्या घटनेमागची सत्यता शोधून काढण्याचे महत्त्व
आंतरिक शांतता ही मानसिक शांततेशी जोडली गेलेली असते. खरेतर शारीरिक अनुभव हा मानसिक शांततेसाठी आवश्यक नसतो. जर तुम्ही मानसिक दृष्ट्या शांत असाल तर तर तुमची शारीरिक पातळी फार महत्त्वाची नसते.
आता आपण आंतरिक शांतता प्रार्थनेमधून मिळवू शकतो का? तर, नाही. शारीरिक शिक्षणातून? नाही. फक्त ज्ञान मिळवण्यातून? नाही. आपल्या भावभावना मारून? नाही. आपण एखाद्या कठीण परिस्थितीला तोंड देताना, त्याच्यावर उपाय म्हणून केल्या जाणार्या कृतीच्या फायद्या - तोट्यांची आणि नंतरच्या परिणामांची पूर्ण जाणीव ठेवून त्या परिस्थितीला तोंड देतो, तेव्हा आपले मन अजिबात विचलित होत नाही, ती खरी आंतरिक शांतता!
इथे करूणा आणि व्यावहारिक दृष्टिकोन जास्त महत्त्वाचा आहे. जेव्हा आपल्यासमोर काही अनपेक्षित घटना उभ्या ठाकतात, तेव्हा आपण खूप घाबरून जातो, हे आपण अव्यवहारी असल्यामुळे होते. आपण खरे तर सगळ्या परिणामांकडे लक्ष दिलेले नसते. त्यामुळे ती घटना समजून घेण्याची आपली जागरुकता कमी पडलेली असते. योग्य तो शोध घेतलेला नसल्यामुळे आपल्याला भीती वाटत असते. त्यामुळे आपल्याला चारही दिशांना तसेच वर-खाली नीट पाहणे आवश्यक ठरते, तरच चित्र स्पष्ट होते. वास्तविकता आणि दिखावा यात नेहमी अंतर असते. त्यामुळे आपण सर्व दिशांतून शोध घेणे फार आवश्यक असते.
एखाद्या गोष्टीकडे फक्त बघून ती गोष्ट सकारात्मक आहे की नकारात्मक हे कळू शकत नाही. पण जेव्हा आपण त्याचा आरपार शोध घेतो आणि त्या गोष्टीतले सत्य आपल्याला समजते तेव्हाच आपण ती सकारात्मक आहे की नकारात्मक याचे मूल्यांकन करू शकतो. म्हणजेच आपल्याला परिस्थितीचे योग्य मूल्यांकन करणे आवश्यक असते. माझ्या शोधातून अमुक एक निष्कर्ष मला मिळाला पाहिजे असे मनात धरून जर शोध घ्यायला गेलो, तर तो शोध पूर्वग्रहदूषित होईल. भारतातील नालंदा परंपरा आपल्याला असे सांगते की धर्म आणि इतर कुठल्याही गोष्टीचा शोध घेताना तो अगदी संशयातीत आणि वस्तुनिष्ठपणे घेतला गेला पाहिजे.
आपल्या मनाचे दरवाजे दुसऱ्यांसाठी उघडे ठेवण्याचे महत्त्व
आता मनःशांतीचा अभाव आणि असमाधान जर असेल तर ते आत्यंतिक स्वयंकेंद्री स्वभावामुळे येते. दुःखांवर मात करून आनंद मिळवणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण आपण जर फक्त स्वतःचाच विचार करणार असू तर मन फार नकारात्मक बनते. मग एखादी छोटी समस्याही आपल्याला मोठी दिसायला लागते आणि आपण आपले संतुलन हरवून बसतो. जेव्हा आपण इतरांना स्वतः इतकंच प्रिय मानतो, तेव्हा आपण मनाने मोकळे होतो आणि मन मोठे करू शकतो. परिणामी एखादी गंभीर समस्या सुद्धा फारशी महत्त्वाची वाटत नाही. अशा तर्हेने आपल्या भावनांमधे फरक पडतो, जो तुम्ही एखादी गोष्ट कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहात त्यावर अवलंबून असतो- फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून की इतरांच्याही दृष्टिकोनातून?
त्यामुळे मानसिक शांतीसाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पहिली म्हणजे वास्तवबद्दल जागरुकता. जर आपण घटना वास्तविक प्रकारे समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर नंतरचे परिणाम अनपेक्षित नसतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे करुणा की जी आपल्या अंतराचे दार उघडते. भीती आणि संशय आपल्याला इतरांपासून दूर करतात.
आपल्या बाह्यस्वरूपाबाबत फार चिंता न करणे
आणखी एक गोष्ट की ज्यामुळे आपली मनःशांती हरवते ती म्हणजे आपण आपल्या बाह्यस्वरूपाबाबत उगाच काळजी करणे. उदाहरणार्थ, मी जेव्हा पहिल्यांदा बीजिंगला भेट दिली तेव्हा मला काहीच अनुभव नव्हता. मी थोडासा घाबरून गेलो होतो आणि थोडासा उत्तेजितही झालो होतो. पण नंतर मी काही अशी माणसे पाहिली की ज्यांना त्यांच्या बाह्यस्वरूपाबाबत फार काळजी होती. काही चुकीची गोष्ट घडली की त्यांचा चेहरा लाल होत असे. पण ते जर मनमोकळे असते आणि काही चुकीचं झालं तरी काळजी करत नसते तर काहीच प्रश्न आला नसता.
उदाहरणार्थ, 1954 मध्ये मी जेव्हा बीजिंगला होतो तेव्हा एक भारतीय राजदूत मला भेटायला माझ्या खोलीत आले. चिनी लोकांनी तिथे फळांची फुलांची तयारी करून ठेवली होती. त्यांनी आम्ही चिनी दुभाष्या घ्यावा असा आग्रह धरला. त्यामुळे संभाषण तिबेटीतून चिनी भाषेत आणि चिनीतून इंग्रजीत असे सुरू झाले, जरी माझ्याबरोबरच्या अधिकाऱ्यांना इंग्रजी येत होते तरी. मधेच एका क्षणी फळांची एक टोपली उपडी झाली. आणि मग ते चिनी अधिकारी जे आधी एकदम कडक आणि औपचारिक वागत होते, ते गुडघ्यांवर रांगत जमिनीवरची फळे गोळा करायला लागले. त्यांना ते फारच लाजिरवाणे वाटत होते. जर ते आधीच आपल्या स्वरूपाबाबत फार काळजी करत बसले नसते, तर कसलाच प्रश्न आला नसता.
एकदा मेक्सिकोमधे एक आंतरधर्मीय सभा होती. त्यात एका जपानी साधूच्या हातात एक मण्यांची जपमाळ होती, तिचा दोर तुटला. ते सगळे मणी जमिनीवर घरंगळले तरी तो तशीच दोऱ्यावरूनच बोटे फिरवत राहिला. त्याला ते मणी गोळा करणे फार लाजिरवाणे वाटत होते. त्याला त्याच्या बाह्यस्वरूपामुळे फार संकोच वाटत होता.
असो, करूणा, परोपकार, सत्यवान, प्रामाणिकपणा या गोष्टी आंतरिक शांतीसाठी महत्त्वाच्या आहेत, तुमच्या बाह्यरूपाची चिंता महत्त्वाची नाही. मी कधीच म्हणत नाही की मी कोणी विशेष व्यक्ती आहे, पण माझ्या स्वतःच्या अनुभवावरून हे नक्की सांगेन की हजारो लोक जरी समोर असले तरी त्यांच्यासमोर वावरताना मला कसलीच चिंता नसते. मी हजारो लोकांसमोर सभेत बोलतो जसे की आत्ता बोलतोय, पण मला ते अगदी थोड्या लोकांसमोर बोलतोय असेच वाटत असते. जर काही चुका झाल्या तर मी त्या नंतर विसरून जातो, मग कसलाच प्रश्न उरत नाही. आणि दुसऱ्यांच्या चुका झाल्या तर फक्त हसून सोडून देतो.
आंतरिक बदल
आंतरिक बदलाविषयी बोलणे म्हणजे भावनिक पातळीबद्दल बोलणे. आंतरिक बदलाचा एक प्रकार म्हणजे वयानुसार स्वाभाविकपणे होणारा बदल आणि एक बदल म्हणजे बाहेरील परिस्थितीमुळे होणारा. पहिल्या प्रकारचा बदल हा आपोआप होतो. दुसरा बदल प्रयत्नपूर्वक करावा लागतो आणि तोच मुख्यत्वे करून आपल्याला घडवायचा आहे. आपल्या इच्छेनुसार आंतरिक बदल हीच महत्त्वाची गोष्ट आहे.
इथे आपण आपला पुढचा जन्म, स्वर्ग, मुक्ती याबद्दल बोलत नसून कठीण परिस्थिती आणि अडचणी असतानासुद्धा जीवन अधिक आनंदी आणि शांततामय कसे बनवावे हे समजून घ्यायचे आहे. यासाठी ज्या प्रमुख घटकांकडे लक्ष द्यावे लागेल, त्यामध्ये क्रोध, घृणा, भीती, मत्सर, संशय, एकटेपणा, तणाव इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. या सर्वांचा संबंध आपल्या मूळ मानसिकतेशी आहे. खूप जास्त आत्मकेंद्रित असल्यामुळे हे भाव उत्पन्न होतात. जेव्हा आपण या गोष्टींच्या अनुभव घेतो, तेव्हा आपल्यासाठी अहं सर्वात जास्त महत्त्वाचा असतो आणि तोच मत्सराची भावना निर्माण करतो. जेव्हा आपण स्वत:ला खूप महत्त्व देतो, तेव्हा त्रास देणारी एखादी लहानशी गोष्टसुद्धा रागाला जन्म देते आणि त्या रागामुळे भीती उत्पन्न होते. आपण इतरांची अजिबात पर्वा करत नाही. आपण फक्त स्वत:ची काळजी करतो आणि आपल्याला वाटते की इतर लोक देखील फक्त स्वत:चा विचार करतात. त्यांना आपली काहीच पर्वा नसते. यामुळेच आपल्याला एकटेपणा जाणवतो. आपण दुसऱ्यांवर विश्वास ठेवू शकत नाही असे आपल्याला वाटते आणि म्हणूनच आपण समोरच्यांकडे, जवळच्यांकडे आणि सगळ्यात जास्त आपल्या मागे राहणाऱ्यांकडे संशयाने पाहतो.
मुळात बघितले तर मनुष्यस्वभावानुसार मित्रत्वाच्या भावनेचे प्रत्येकाला कौतुकच वाटते (आकर्षण असते.) जर आपण मैत्रीचा हात पुढे केला तर बहुतेक लोक त्या भावनेला सकारात्मकतेने घेतात. चिंता वगैरे निर्माण करणाऱ्या नकारात्मक भावनांना दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावे लागतील. उदाहरणार्थ, आपल्याला उकडत असेल तर आपल्याला (ए.सीचे) तापमान कमी करावे लागेल किंवा आपल्याला जर अंधार दूर करायचा असेल तर प्रकाश निर्माण करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. भौतिक पातळीवर हेच सत्य आहे. प्रतिरोधक(विरोधी) शक्तीचा वापर करूनच बदल घडवला जातो. हे नैसर्गिक आहे. पण हे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक पातळीवरसुद्धा सत्य आहे. म्हणूनच आपल्याला आपल्या या दृष्टिकोनाचा किंवा मताचा विरोधी दृष्टिकोनातून प्रतिकार करायला हवा. (जसे की दुसऱ्यांची काळजी करून किंवा मैत्रीच्या भावनेच्या माध्यमातून आत्मकेंद्रित आणि संशयी प्रवृत्तीचा विरोध करणे.)
एखाद्या पिवळ्या फुलाचे उदाहरण घ्या. जर मी काही कारणाने म्हटले की ‘हे पांढरे फुल आहे’ आणि नंतर ते पिवळे आहे हे मान्य केले तर हे दोन अतिशय विरोधाभासी दृष्टिकोन ठरतील. एकाच वेळी या दोन्ही गोष्टी खऱ्या मानता येणार नाहीत. ज्या क्षणी पिवळ्या रंगाची अनुभूती होते, त्या क्षणी पांढऱ्या रंगाची अनुभूती नष्ट होते. हे अगदी विरोधाभासी आहे. म्हणून आंतरिक बदलासाठी पूर्णपणे विरोधी मानसिकता तयार करणे हा एक मार्ग आहे.
निव्वळ अज्ञान हे सुद्धा समस्येचे कारण असू शकते. अभ्यास, विश्लेषण आणि परीक्षण या त्याच्या विरोधी शक्ती आहेत. वास्तव (सत्य परिस्थिती) कडे न बघण्यामुळे अज्ञान उत्पन्न होते. म्हणूनच विश्लेषण ही त्यावरची परस्परविरोधी शक्ती आहे. त्याचप्रमाणे, आत्मकेंद्रित वृत्तीला प्रतिरोधक शक्ती म्हणून इतरांचा विचार करायला हवा आणि त्यासाठी मनाला प्रशिक्षित करण्याची (किंवा आपल्या प्रवृत्तींच्या शुद्धीकरणाची) आवश्यकता आहे.
धर्मनिरपेक्ष नैतिकता
आपल्या मनाला कसे प्रशिक्षित करावे (किंवा प्रवृत्तींचे शुद्धीकरण कसे करावे) याचा विचार करता असा प्रश्न उपस्थित होतो की हा मुद्दा धर्माशी निगडीत असावा की अध्यात्माशी. आणि मला असे वाटते की मुळात याचा धर्माशी काहीही संबंध नाही.
अध्यात्माविषयी बोलायचे म्हटले तर त्याचे दोन प्रकार आहेत: एक धर्म आणि विश्वास यांच्या सहित आणि दुसरा यांच्या शिवाय! जो या दोन्हीशिवाय आहे, त्यालाच मी धर्मनिरपेक्ष नैतिकता म्हणतो. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ धर्माला बाजूला करणे नसून खरे म्हणजे सर्व धर्मांना समान वागणूक आणि सन्मान देणे असा आहे. उदाहरणार्थ, भारतीय संविधानामध्ये सर्व धर्मांच्या सन्मानाबद्दल उल्लेख केलेला आहे. ते एक धर्मनिरपेक्ष संविधान आहे. म्हणूनच पारशी किंवा झोराष्ट्रीयन समाज अतिशय मर्यादित असूनसुद्धा – भारताच्या एक अब्जापेक्षा जास्त लोकांमध्ये एक लाख पारशी लोक आहेत – तरीसुद्धा त्यांना लष्करी आणि राजकारणाच्या क्षेत्रात समान स्थान मिळते.
जेव्हा आपण धर्मनिरपेक्ष नैतिकतेबद्दल बोलतो, तेव्हा त्यात नास्तिक लोकांची नैतिकतासुद्धा समाविष्ट असते. धर्मनिरपेक्ष नैतिकतेच्या आधारावर आपण आपल्या नैतिक भावनेचा विस्तार करू शकतो आणि प्राणिमात्रांबद्दलही नैतिक आणि आदराची भावना जोपासू शकतो. त्याचबरोबर धर्मनिरपेक्ष आध्यात्मिकता किंवा नैतिकतेची दुसरी बाजू म्हणजे पर्यावरणाची काळजी घेणे. म्हणूनच आपल्याला धर्मनिरपेक्षतेच्या आधारे आपल्या बुद्धीचा विकास करायचा आहे. आपल्याला धर्मनिरपेक्षतेचा विकास करायचा आहे. या ग्रहावरील सहा अब्ज लोकांनी हे करण्याची आवश्यकता आहे. धार्मिक पद्धती (प्रणाली) धर्मनिरपेक्षतेचा वैश्विक पातळीवर विकास करण्यासाठी मदत करतात. धर्मनिरपेक्ष नैतिकतेच्या विकासात बाधा आणण्यासाठी निश्चितच नाही.
म्हणूनच जेव्हा आपण धर्मनिरपेक्ष नैतिकतेबद्दल बोलतो, तेव्हा आपला दृष्टिकोन संप्रदायाशी निगडीत नसतो. जर एखादी धार्मिक व्यक्ती एखाद्या धर्माचे पालन करत असताना धर्म निरपेक्षतेला पुढे नेण्याचे काम करत असेल तर ती खऱ्या अर्थाने धर्माचे पालन करत आहे. जर ती असे करत नसेल तर मग ती चर्च, मश्चिद किंवा अग्यारीत नियमित जाणारी असली तरीसुद्धा तिच्या खरोखर धार्मिक असण्याबद्दल मला शंका आहे.