‘सी’ शिक्षण: जागतिक नागरिक होताना

सामाजिक, भावनिक व नैतिक शिक्षण, एमोरी विद्यापीठ, संक्षिप्त चौकट

सामाजिक, भावनिक व नैतिक (Social, Emotional and Ethical: SEE / सी) शिक्षणाचा कार्यक्रम एमोरी विद्यापीठातील ‘सेंटर फॉर कन्टेम्प्लेटिव्ह सायन्स अँड कम्पॅशन-बेस्ड एथिक्स’ने विकसित केला आहे. भावनिकदृष्ट्या सुदृढ व नैतिकदृष्ट्या जबाबदार व्यक्ती, सामाजिक समूह व व्यापक समुदायांचं संगोपन करणं, हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. जग परस्परावलंबी कसं आहे, सर्व मानवांना सुखी होण्याची सामायिक इच्छा कशी असते, आणि जागतिक पातळीवर बदल घडवण्यासाठी आपण कसं योगदान देऊ शकतो, हे “‘सी’ शिक्षण: जागतिक निगरिक होताना” या तिसऱ्या व अंतिम भागामध्ये आपण समजून घेणार आहोत.

आपण जिथे राहत आहोत ते जग अधिकाधिक गुंतागुंतीचं, जागतिक व परस्परावलंबी होतं आहे. विद्यमान व भावी पिढ्यांसमोरची आव्हानं विस्तृत व दूरगामी स्वरूपाची आहेत. त्यांवर उपाय करण्यासाठी निश्चितपणे नवीन प्रकारे विचार करावा लागेल, समस्या सोडवणुकीचे सहकार्यावर आधारित, आंतरविद्याशाखीय, जागतिक कल असलेले मार्ग शोधावे लागतील. जगाच्या कामकाजात सहभागी होताना केवळ करुणा पुरेशी नाही. करुणेसोबतच जबाबदार निर्णयप्रक्रिया गरजेची आहे. आपण जगतो त्या व्यापक व्यवस्थांच्या आकलनावर ही निर्णयप्रक्रिया आधारलेली असायला हवी.

जागतिक अवकाश सुरुवातीला दडपणारा वाटू शकतो, पण तो वैयक्तिकसामाजिक अवकाशातील समान ज्ञानावर व कौशल्यांवर आधारलेला असतो, केवळ आपल्या समुदायांमध्ये, समाजांमध्ये व जागतिक समुदायामध्ये त्याचा विस्तार होतो. अशाच प्रकारे आपण स्वतःचं व इतरांचं वर्तन समजून घेऊ शकतो, व्यवस्था कशा कार्यरत असतात हे समजून घेण्याची क्षमताही अंगभूत असते. ही जागरूकता सखोल करून आणि गुंतागुंतीच्या परिस्थितींमध्ये चिकित्सक विचारांचं उपयोजन करून नैतिक सहभाग शक्य होतो. समस्या सोडवण्याची प्रक्रिया अधिक सर्वांगीण होते, विविध मुद्दे लहान, असंबद्ध तुकड्यांमध्ये विखंडित करायची आपली वृत्ती टाळता येते.

खालील विषयांनुसार जागतिक अवकाशाचा शोध घेतला आहे:

 • परस्परावलंबित्वाची दखल घेणं
 • सामायिक मानवता ओळखणं
 • समुदाय व जागतिक कामकाजातील सहभाग

परस्परावलंबित्वाची दखल घेणं

गोष्टी व घटना संदर्भाविना उद्भवत नाहीत, तर त्यांचं अस्तित्व विविध गोष्टी व घटनांवर अवलंबून असतं, असा परस्परावलंबित्व या संकल्पनेचा अर्थ आहे. उदाहरणार्थ, आपण साधं जेवतो, त्यातील घटकांचा काळाच्या संदर्भात व प्रदेशाच्या संदर्भात मागे जाऊन शोध घेतला तर, ते अन्न विविध स्त्रोतांवरून व व्यक्तींकडून आल्याचं लक्षात येतं. एका प्रदेशातील बदल इतरत्र होणाऱ्या बदलांना कारणीभूत ठरतात, असाही परस्परावलंबित्वाचा अर्थ आहे. कोणत्याही कार्य-परिणामांची कारणं असतात, किंबहुना विविध कारणं व परिस्थितींमुळे कार्य घडत असतं. 

परस्परावलंबित्वावर चिंतन करण्यामागचा उद्देश जागतिक व्यवस्थांच्या कामकाजाविषयी कोरडं आकलन करून घेणं हा नाही, तर स्वतःविषयीच्या, इतरांविषयीच्या व या पृथ्वीविषयीच्या आपल्या आस्थेशी हे ज्ञान जोडून घेणं हा यामागचा उद्देश आहे. परस्परावलंबित्वाचा शोध दोन परिप्रेक्ष्यांतून घेता येईल:

 • परस्परावलंबी व्यवस्था समजून घेणं
 • व्यवस्थेच्या संदर्भांतर्गत व्यक्ती

परस्परावलंबी व्यवस्था समजून घेणं म्हणजे ‘अंतर्गत’ व ‘परका’ यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी व्यापक व्यवस्थांवर ‘बहिर्गत’ लक्ष केंद्रित करणं. स्वतःच्या जागरूकतेद्वारे आपण परस्परावलंबित्व व जागतिक व्यवस्था यांच्या संदर्भातील कार्यकारणसंबंधांसारखी तत्त्वं समजून घेतो. व्यवस्थेमधील व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपलं अस्तित्व, आणि आपल्या भोवतीच्या इतरांचंही अस्तित्व, जगभरातील विविध घटनांशी, कार्यकारणसंबंधांशी सूक्ष्मरित्या निगडीत असतं, हे आपण लक्षात घेतो.

परस्परावलंबी व्यवस्था समजून घेताना

परस्परावलंबित्व हा निसर्गनियम आहे आणि मानवी जीवनाचं मूलभूत वास्तवदेखील आहे. अन्न, पाणी व निवारा यांसारख्या प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी, त्याचप्रमाणे शिक्षण, कायद्याची अंमलबजावणी, सरकार, शेती, वाहतूक, आरोग्यसेवा इत्यादींच्या पायाभूत रचना सुरू ठेवण्यासाठी काम करणाऱ्या इतर अगणित लोकांच्या पाठबळाविना कोणीही जगू शकत नाही, संपन्न होणं तर दूरच. मोठी व प्रसिद्ध पावलेली संकटं (उदाहरणार्थ, २००७-२००९मधील आर्थिक मंदी) आणि हवामानबदल व जागतिक हिंसक संघर्ष यांसारख्या गोष्टींबाबत वाढणारी चिंता पाहता जागतिक पातळीवरील आर्थिक व पर्यावरणीय परस्परावलंबित्व दिसून येतं. 

पारंपरिक समाजांमध्ये इतरांसोबतच्या संबंधांची जाणीव दैनंदिन जीवनामध्ये अधिक खोलवर रुजलेली असते. संसाधने वाटून घेणे व देवाणघेवाण करणे यांवर आणि इतर प्रकारच्या सामाजिक सहकार्यावर जीवन अवलंबून असते. यांमध्ये पीक घेण्यापासून ते बांधकामांपर्यंत आणि शत्रूंशी लढण्यापर्यंत विविध घडामोडींचा समावेश होतो. औद्योगिक क्रांतीपासून, आर्थिक दर्जा सुधारण्याच्या इच्छेने, आपण अधिक गतिशील झालो आहोत आणि समुदायापासून तुटत चाललो आहोत. याने स्वातंत्र्याचा भ्रम वाढू लागला, प्रौढ झाल्यावर आपल्याला इतरांची गरज नसते असा समज सहजपणे होऊ लागला. या स्वावलंबाच्या भ्रामक जाणिवेमुळे मानसिक व सामाजिक तुटलेपणाची भावना वाढू लागते. आपण उत्कट सामाजिक प्राणी आहोत, आपलं जगणं आणि मानसिक आरोग्यही इतरांसोबतच्या संबंधांवर अवलंबून असतं.

व्यवस्थांतर्गत संदर्भात व्यक्ती

परस्परावलंबी व्यवस्थांचं आपलं आकलन अर्थपूर्ण करण्यासाठी आपण व्यापक चित्रात सर्व जण कसे सुसंगत ठरतात याचा विचार करणं गरजेचं असतं. आपण इतरांपासून तुटलेले आहोत किंवा व्यापक व्यवस्थेपासून स्वतंत्र आहोत, अशी गैरसमजुतीची वृत्ती दुरुस्त करण्यासाठी याची मदत होते. इथे आपण इतर मानवांसोबतच्या आपल्या संबंधांचा आणि या संबंधांच्या व्यामिश्रतेचा शोध घेतो. याची निष्पत्ती तिहेरी प्रकारची असते:

 • व्यवस्थात्मक पातळीवर इतरांबद्दल प्रामाणिकपणे वाटणारी कृतज्ञता
 • इतरांच्या जीवनाला आकार देण्याच्या आपल्या सामर्थ्याविषयीची सखोल जागरूकता
 • व्यापक कल्याण साधणाऱ्या कृतीसाठीची वाढती इच्छा

आपलं वर्तन इतरांवर कसं परिणाम करतं आणि इतरांचं वर्तन आपल्यावर कसं परिणाम करतं, याचा विचार करून आपण सुरुवात करू. त्यानंतर इतर लोक आपल्या कल्याणामध्ये किती भिन्न मार्गांनी योगदान देतात याचा आपण शोध घेऊ. एक यादी तयार करून आणि वारंवार ती वाचून आपण हे करू शकतो. आपल्याला सामाजिक अवकाशात परिचित असलेल्या लोकांवरच लक्ष केंद्रित करण्याऐवजी इथे व्यापक अवकाशातील व्यक्ती, समुदाय व व्यवस्थांचा समावेश करावा, ज्यांच्याशी आपला व्यक्तीशः परिचयही नसेल. तर, इतरांची प्रामाणिक दखल घेण्यासाठी हे समजून घेणं गरजेचं आहे की इतर अगणित व्यक्तींच्या पाठबळाविना आपली वृद्धी होऊ शकत नाही, इतकंच नव्हे तर आपण जगूही शकत नाही.

आपल्या जीवनाला पाठबळ पुरवणाऱ्या लोकांच्या विस्तृत जाळ्यामध्ये प्रत्येक जण काहीएक भूमिका निभावत असतो. हे आपल्या लक्षात येतं तेव्हा आपल्यात परस्परसहकार्याची भावना विकसित होते. मग इतर लोक आपल्याला कसे उपकारक ठरतील याचा विचार आपल्याला गरजेचा वाटत नाही, त्याआधीच आपण कोणत्या तरी मार्गाने तिथे उपकारक काही घडतं आहे हे स्वीकारतो. ही जागरूकता वाढते, तसतसं हे परस्परसहकार्याच्या, परस्परांना उपकारक ठरणाऱ्या संबंधांचं स्वरूप संकुचित आत्मकेंद्री व स्पर्धात्मक दृष्टिकोनापेक्षा वरचढ ठरतं. इतरांशी जोडलेलं असण्याची ही वाढीव जाणीव सहानुभूतीपूर्ण आनंदाची क्षमता वाढवतो आणि थेट आपल्या एकाकीपणावर उतारा साधला जातो. इतरांच्या यशानेही आपल्याला संतोष वाटतो आणि असूया व मत्सर यांवरही उतारा पडतो, त्याचप्रमाणे कठोर आत्मटीका व इतरांशी अवास्ववादी तुलना करणंही थांबतं.

सामायिक मानवता ओळखणं

परस्परावलंबित्वाचं संपन्न आकलन आणि विशेषतः सहानुभूतीच्या सामाजिक अवकाशात विकसित झालेल्या कौशल्यांचा संयोग होतो, तेव्हा त्यातून इतरांविषयी अधिक आस्था वाटू लागते आणि आपण सर्व परस्परांशी कसे संबंधित आहोत याचे मार्ग ओळखता येतात. सामायिक मानवता ओळखून हे अधिक उघडपणे बळकट करता येते, विस्तारता येते व दृढमूल करता येते. सर्व मानवांमध्ये इतरांच्या अंतर्गत जीवनासंदर्भात व त्यांच्या जीवनाच्या परिस्थितींसंदर्भात काही सामायिकता असतात, हे मूलभूत पातळीवरून ओळखण्यासाठीचा चिकित्सक विचार यातून आपण करू लागतो. अशा प्रकारे आपण कुठेही असलेल्या कोणत्याही व्यक्तीची दखल घेण्याची, तिच्याबद्दल सहानुभूती व करुणा राखण्याची क्षमता विकसित करू शकतो, अगदी दूर असलेले किंवा आपल्याहून अतिशय भिन्न असलेले लोकही यात येतात. आपण दोन विषयांद्वारे आपल्या सामायिक मानवतेचा शोध घेऊ.

 • सर्वांच्या मूलभूत समतेची दखल घेणं
 • कल्याणावर व्यवस्थांचा परिणाम कसा होतो याची दखल घेणं

सर्वांच्या मूलभूत समतेची दखल घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की, सगळे जण- आपल्या मित्रमंडळींपासून व कुटुंबापासून ते इतर ठिकाणच्या अपरिचित लोकांपर्यंत- सुख व कल्याणाच्या आकांक्षांबाबतीत आणि दुःख टाळण्याच्या इच्छेबाबत मूलतः समान आहोत. जागतिक व्यवस्था सकारात्मक मूल्यं स्वीकारून किंवा नकारात्मक धारणा कायम ठेवून कल्याणाला चालना देऊ शकतात किंवा बाधा पोचवू शकतात, हे लक्षात घेणं म्हणजे व्यवस्थांची दखल घेणं.

सर्वांच्या मूलभूत समतेची दखल घेणं

आपल्या निकटवर्तीय समुदायाबाहेरच्यांपर्यंत आपण मानवतेच्या मूलभूत समतेची कक्षा रुंदावतो. अखेरीस संपूर्ण जगापर्यंत आपण ही समज वाढवतो. आपल्या सर्वांमध्ये माणूस म्हणून जे काही सामायिक आहे त्यावर लक्ष केंद्रित करून आपण हे साधत असतो. उदाहरणार्थ, वृद्धी साधण्याची इच्छा आणि त्रास व असमाधान टाळण्याची इच्छा. यातून पूर्वग्रह आणि इतरांच्या गरजा कमी लेखणारी प्रवृत्ती कमी लेखायला मदत होते.

अशा प्रकारे इतरांना समतेने समजून घेतलं जातं, त्यातून आपला ‘आंतर-गट’ विभिन्न राष्ट्रीयत्वाच्या, वांशिकतेच्या, धार्मिकतेच्या लोकांना समाविष्ट करण्याइतका विस्तारणं शक्य होतं. व्यक्तीने केलेलं रक्तदान, नैसर्गिक आपत्तीनंतर मोठ्या प्रमाणात दिल्या जाणाऱ्या देणग्या, आपण ज्या गटाचा भाग नाही त्या गटांविरोधात अन्याय झाल्यास त्याचा विरोध करणं- अशा विविध मार्गांनी समाजात ही क्षमता दिसून येते. परस्परावलंबित्वाची दखल घेणं आणि इतरांविषयी सहानुभूती राखणं, यांमुळे इतरांशी जोडून घेताना वाटेत येणाऱ्या अनेक अडथळ्यांवर मात करता येते. उदाहरणार्थ, पूर्वग्रह, दुराव्याची भावना, आपल्या निकटवर्तीय वर्तुळापलीकडच्या समस्यांविषयी आस्थेचा अभाव- यांवर उतारा शोधता येतो.

आपण स्वतःवरच लक्ष केंद्रित करतो, तेव्हा जग लहान वाटतं आणि आपल्या अडचणी व पूर्वग्रह मोठे वाटू लागतात. पण आपण इतर लोकांवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा जग विस्तारतं. आपल्या अडचणी मनाच्या परिघावर निघून जातात, त्या लहान वाटू लागतात आणि आपण इतरांशी जोडून घेण्याची व सहानुभूतीपूर्ण कृती करण्याची क्षमता वाढवतो.

कल्याणावर व्यवस्थांचा कसा परिणाम होतो याची दखल घेणं

सकारात्मक मूल्यांना चालना देऊन किंवा नकारात्मक धारणा व विषमता टिकवून व्यवस्था सांस्कृतिक व संरचनात्मक पातळ्यांवरील कल्याणाला अनुक्रमे चालना देऊ शकतात किंवा बाधा आणू शकतात. आपल्याला विषमता, पूर्वग्रह किंवा पक्षपातीपणा यांना सामोरं जावं लागलं तर आणि लागतं तेव्हा आपल्याला कसं वाटतं, याचा जरा थांबून विचार करावा. अशा समस्याग्रस्त व्यवस्थांच्या परिणामांचं विवरण करण्यासाठी आपण इतिहासातील व वर्तमान घडामोडींमधील दाखलेही वापरू शकतो. शेवटी, पूर्वग्रह व पक्षपातीपणा यांचं खरोखर समर्थन होतं का, किंवा सर्व मानवांना सुखाचा पाठपुरावा करण्याचा समान अधिकार आहे का, याचाही शोध आपण घेऊ शकतो.

व्यापक सहानुभूती विकसित करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण मानव म्हणून आपल्यात सहानुभूतीची जन्मजात क्षमता असली, तरी ती आपोआप व्यापक पातळीवरच्या दुःखाला किंवा जागतिक पातळीवरील समस्यांना सामावून घेताना दिसत नाही. उदाहरणार्थ, आपल्यापैकी बहुतेकांची प्रवृत्ती मोठ्या संख्येच्या पीडितांऐवजी एकट्या पीडित व्यक्तीविषयी सहानुभूती राखण्याकडे कललेली असते. परंतु, संरचनात्मक व सांस्कृतिक प्रश्न कळल्यावर आपण दुःखाची अधिक मार्मिक दखल घेऊ शकतो, त्याचप्रमाणे दुःखाला आपण देत असलेले प्रतिसादही अधिक परिष्कृत होत जातात. 

सामायिक मानवता लक्षात घेऊन आपण इतरांविषयी अधिक वास्तववादी आकलन ठेवून व तशाच अपेक्षा ठेवून सर्व वांशिक व सामाजिक गटांशी संवाद साधू शकतो व त्यांच्याशी सहकार्य करू शकतो. इतरांच्यात व आपल्यात काय सामायिक आहे, याची अधिक जागरूकता आल्याने आपण वरवरच्या भेदांवर अविश्वास दाखवण्याऐवजी त्यांची दखल घ्यायला शिकतो, त्यातून पूर्वग्रह व विलगपणा कमी होत जातो. व्यक्तींच्या कल्याणाला व्यवस्था आकार देतात, हे समजून घएतल्याने आपली सहानुभूती अधिक सखोल होते व अधिक व्यापक होते, त्याचप्रमाणे मानवी दुःखावरील संभाव्य उपायांचा आपण अधिक चिकित्स विचारही करू लागतो.

समुदाय व जागतिक कामकाजामध्ये सहभागी होणं

परस्परावलंबित्वाची दखल घेणं, इतरांच्या आपल्याला उपकारकर असलेल्या कृती जाणून घेणं आणि सामायिक मानवता लक्षात घेणं, यातून जबाबदारीची जाणीव आणि कृतीची इच्छा निर्माण होते. मग स्वाभाविकपणे आपण समाजाकडून मिळालेला दयाळूपणा परत करायची इच्छा राखू लागतो, आणि संघर्षग्रस्त व गरजू लोकांच्या बाजूने कृतीही करू पाहतो. पण व्यामिश्र व्यवस्थांच्या कामकाजात किंवा सामुदायिक वा जागतिक पातळीवर आपण परिणामकारकरित्या कसे सहभागी होऊ शकतो?

सहानुभूती राखणारे जागतिक नागरिक म्हणून आपण स्वतःचं सामर्थ्य ओळखावं आणि त्याचा वापर करावा, यासाठी आपल्याला लक्षम करणं, हाच ‘सी’ शिक्षणामागचा उद्देश आहे. हे साध्य करण्यासाठी दोन पायऱ्या आहेत:

 • समुदायामध्ये व जगामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचं आपलं सामर्थ्य
 • सामुदायिक व जागतिक उपाय शोधण्याच्या कामात सहभागी होणं

हे दोन मुद्दे सारखे आहेत: पण आपल्या क्षमता व संधी यांच्यावर आधारित सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपण स्वतः काय करू शकतो, हे ओळखण्यासाठी पहिला मुद्दा आपल्याला मदत करतो. तर, आपल्या समुदायावर आणि जगावर परिणाम करणाऱ्या प्रश्नांवर सर्जनशील उपाय शोधण्यासाठी दुसरा मुद्दा मदत करतो.

समुदायामध्ये व जगामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचं आपलं सामर्थ्य

समुदायाच्या व जगाच्या कामकाजामध्ये आपण सहभागी होणार असू आणि आपल्याला व इतरांना उपकारक ठरेल अशा रितीने त्यांच्या गरजांवर उपाय शोधणार असू, निराश न होता वास्तववादी व परिणामकारक उपाय शोधणार असू, तर आपण स्वतःच्या मर्यादा व स्वतःच्या क्षमता ओळखायला हव्यात. सर्व काही आपल्या ताकदीने तत्काळ साधता येणं शक्य नसतं, आणि खोलवर रुजलेल्या समस्या दूर होण्यासाठी वेळ घेतात, हे समजून घेणं महत्त्वाचं असतं. अवघड प्रश्नांना सामोरं जाताना आपल्याला शक्तिहीन वाटत असेल, तर त्यातून इतरांविषयी व स्वतःविषयी करुणा विकसित करणं आणखी अवघड होऊन जातं. कारण, करुणा- दुःखा दूर करण्याची इच्छा वा हेतू- आशेवर अवलंबून असते- दुःख नष्ट करता येईल, या धारणेवर अवलंबून असते.

संपूर्ण व्यवस्था बदलणं आपल्याला कदाचित शक्य होणारही नाही, पण व्यवस्थेतील कळीच्या घटकांवर लक्ष केंद्रित करून बदल विस्तृत करण्यासाठी आपण कृती करू शकतो. जागतिक व व्यवस्थात्मक पातळीवरच्या प्रश्नांच्या व्याप्तीचा दाब न येता आपल्याला यातून सबलीकरणाची भावना प्राप्त होऊ शकते. कोणत्याही व्यवस्थेतील बहुतांश परिणामांना कारणीभूत ठरणाऱ्या मोजक्या कळीच्या घटकांचा आपण शोध घेतला, तर त्या घटकांवर उपाय करण्यावर लक्ष केंद्रित करून आपण लक्षणीय परिणाम साधू शकतो. आपल्याला मोठ्या व्याप्तीचा बदल तत्काळ घडवता येत नसेल, तरीही आपण घडवत असलेले लहान बदलही मूल्यवान असू शकतात, ही वस्तुस्थिती विचारात घेण्याजोगी आहे. आत्ता लहान व्याप्तीचे असणारे बदल कालांतराने मोठ्या व्याप्तीपर्यंत जाऊ शकतात. एका जमिनीच्या तुकड्यावर टाकून दिलेल्या कचऱ्यातून पुनर्वापरक्षम गोष्टी वेगळ्या काढणं, यांसारख्या छोट्या कृती सामूहिकरित्या केल्यास त्यातून एकत्रित मोठे बदल घडणं शक्य असतं. परस्परावलंबी व्यवस्थांच्या सखोल आकलनाद्वारे आपल्याला विश्वास प्राप्त होतो की, लहान पातळीवरी कृती व वर्तनांनी भविष्यात मोठ्या परिणामांसाठी पार्श्वभूमी तयार होते. आपल्याला त्याचे परिणाम थेट दिसणार नाहीत कदाचित.

व्यामिश्र सामाजिक व जागतिक प्रश्नांचे छोटे खंड करणं गरजेचं असतं, मग त्यांचं विश्लेषण करून त्यांवर काम करता येतं. समस्यांच्या लहान घटकांवर आपल्या कृतींद्वारे उपाय करता येतो, आणि हे घटक व्यापक व्यवस्थांमध्ये परस्परावलंबी रितीने संबंधित असतात, हे लक्षात आल्यावर आपल्याला आत्मविश्वास वाटतो आणि कर्तेपणाची व सबलीकरणाची भावना निर्माण होते. यासाठी आपल्याकडे चिकित्सक विचाराची कौशल्यं असायला हवीत. पायाभूत मानवी मूल्यांविषयी समज दाखवून व्यामिश्र प्रश्नांचा विचार करण्याचा सराव, असा चिकित्सक विचारप्रक्रियेचा इथला अर्थ आहे. अशा विचाराने केल्या जाणाऱ्या कृती इतरांसाठी उपकारक मानल्या जातीलच याची हमी देता येत नसली, तरी चिकित्सक विचारप्रक्रियेमुळे रचनात्मक परिणामाची संभाव्यता वाढते.

सामुदायिक व जागतिक उपाय शोधण्याच्या कामात सहभागी होणं

उपाय पूर्णत्वास नेणं कदाचित आपल्या ताकदीमध्ये शक्य नसेलही, तरी समस्यांचा आणि त्यांवरील संभाव्य उपायांचा विचार करू शकतो. आपल्या समोरच्या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी आपण पुढील रूपरेषा वापरू शकतो:

 • व्यवस्था आणि त्यांची व्यामिश्रता लक्षात घेणं
 • कृतींच्या अल्पकालीन व दीर्घकालीन परिणामांचं मूल्यमापन करणं
 • पायाभूत मानवी मूल्यांच्या संदर्भांतर्गत परिस्थितींचं मूल्यमापन करणं
 • नकारात्मक भावना व पक्षपात यांचा प्रभाव कमी करणं
 • मोकळेपणाची, सहकार्यावर आधारित व बौद्धिकदृष्ट्या नम्र मनोवृत्ती विकसित करणं
 • विशिष्ट कृतीच्या बऱ्या-वाईट परिणामांचा विचार करणं

अनेकदा अल्पकालीन व दीर्घकालीन परिणामांचं योग्य मूल्यमापन न करता कृती केल्या जातात. आपण एखाद्या विशिष्ट प्रश्नाची तपासणी करत असतो, तेव्हा त्या संदर्भातील कृतीचा परिणाम ज्या विविध लोकांवर होणार आहे त्यांचाही विचार करावा लागतो. आपण ही प्रक्रिया अनुसरली व तिच्याशी परिचय करू घेतला, तर आपण स्वाभाविकपणे कृतींच्या व्यापक पडसादांचा आणि लोकांवर त्याचा कसा परिणाम होईल, याचा विचार करू लागतो. सकृत्दर्शनी हे मुख्य प्रश्नापासून दूरचं असल्यासारखं वाटू शकतं. हे प्रश्न पायाभूत मानवी मूल्यांशी कसे संबंधित असतात आणि उपायांमुळे व्यक्तिगत, सामाजिक व जागतिक भरभराटीला चालना कशी मिळते, याचाही विचार करणं गरजेचं असतं.

इतरांशी सहकार्य करायला उत्सुक असणाऱ्या आणि इतरांच्या परिप्रेक्ष्यांमधून, मतांमधून, ज्ञानामधून व अनुभवांमधून शिकण्याची व त्यांचा आदर करण्याची तयारी असणाऱ्या खुल्या मनोवृत्तीचं मोठं पाठबळ समुदायांच्या व जागतिक कामकाजातील सहभागाला असतं. इतर लोक काही भूमिका मांडतात तेव्हा त्यांनी त्यांचा विवेक व अनुभव वापरलेला असतो, हे आपण मान्य केलं तरच सुदृढ चर्चा शक्य होते, मग आपल्यापेक्षा त्यांची भूमिका भिन्न असली तरी चालतं. बौद्धिक नम्रता व मोकळेपणा नसेल, तर चर्चा व परस्पर सहमती अशक्य होते आणि संवाद घसरून अनुत्पादक संघर्ष व सत्तासंघर्ष उद्भवू शकतात.

इतरांशी सहकार्य न करता आपण व्यक्ती म्हणूनच सोडवू शकतो अशा काही मोजक्या गंभीर समस्या असतात. त्या सोडवण्यासाठी आपल्याकडे स्वतःच्या संकल्पनांबाबत व मूल्यांबाबत स्पष्ट संवाद साधण्याची क्षमता गरजेची असते. तर, आपली भूमिका मांडणं, प्रश्न विचारणं, इतरांकडून शिकणं, आणि रचनात्मक रितीने चर्चेमध्ये सहभागी होणं, यांचा मोठा आधार सामुदायिक व जागतिक घडामोडींमधील सहभागाला असतो. आपल्या चिकित्स विचारप्रक्रियेद्वारे आणि खोलवर रुजलेल्या मूल्यांच्या आधारे स्पष्टपणे मांडणी करता येणं, सबलीकरण करणाऱ्या व प्रेरणादायी असणाऱ्या रितीने बोलण्याची क्षमता असणं, स्वतःचा आवाज नसलेल्यांच्या वतीने हे सर्व करता येणं, हे जागतिक नागरिक व परिवर्तनकारी नेते बनण्यासाठी आवश्यक असं शक्तिशाली कौशल्यं आहे.

सारांश

पहिल्या दोन भागांमध्ये आपण आपल्या भावनांमधून वाट काढून स्वतःच्या कुटुंबियांशी, मित्रमंडळींशी व सहकाऱ्यांशी सौहार्दाने संवाद कसा साधायचा ते शिकलो. जग परस्परावलंबी आहे, सर्वा मानवांमध्ये सुखाची सामायिक आकांक्षा असते व दुःख टाळायची इच्छा असते, आणि आपल्या कृतींद्वारे व्यापक जागतिक बदलांमध्ये योगदान देता येतं, हे जाणून घ्यायची सुरुवात आपण तिसऱ्या व अंतिम भागात केली.

आपण जगतो ते जग व्यामिश्र आहे. पौढ व्यक्ती म्हणून आपल्याला काही वेळा असं वाटू शकतं की, आपल्याला स्वतःच्या बळावर जगता येईल, कोणाचीही मदत लागणार नाही. जगातील सहमानवांची फिकीर करायची गरज नाही, असंही वाटू शकतं- शेवटी ते आपल्याहून किती भिन्न आहेत. आणि अनेकदा जगामध्ये कोणताही वास्तव बदल घडवणं अशक्य किंवा खूप अवघड वाटू शकतं. आपण स्वतःच्या परिस्थितीचं वास्तव समजून घेतो- आपण खातो ते सर्व अन्न, आपण घातलेले कपडे, आपण चालवतो त्या कार, हे सगळं इतरांच्या कामातून आलेलं असतं, हे समजून घेतो- तेव्हा स्वाभाविकपणे आपण इतरांची दखल घेऊ लागतो. हे सहमानवदेखील आपल्याप्रमाणेच सुखी व्हायची इच्छा राखून आहेत, हे लक्षात आल्यावर आपण त्यांच्या सुखाचीही इच्छा बाळगू लागतो. अखेरीस, छोट्या कृती व्यापक परिणाम घडवतात, या ज्ञानामुळे आपल्याला आत्मविश्वास येतो की, आपण कितीही छोटीही का असेना पण रचनात्मक कृती केली, तर त्यातून जगाचं भलं होईल.

हा प्रशिक्षण कार्यक्रम केवळ वाचून विसरण्यासाठी नाही; आपण त्याचा दर मुद्द्यानुसार सराव करायला हवा. आपण माणसं सर्व वेगवेगळी आहोत, पण अगणित व्यक्तिगत भेटी व सामाजिक परिस्थितींमधून वाट काढताना आपल्याला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतो. जीवनातील चढ-उतारांचं व्यवस्थापन करण्याचा प्रश्न येतो तेव्हा स्वहिताने प्रेरित झालेल्या कृती आणि इतरांच्या हितासाठी केलेल्या कृती यांच्यात स्पष्ट भेद दिसून येईल. आपल्या अंतःप्रेरणा व पक्षपात यांच्याबद्दल तीव्र जागरूकता, आणि स्वतःच्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवण्याची व परिस्थिती चिकित्सकपणे तपासण्याची क्षमता, यांमुळे आपण जगातील कोणत्याही गोष्टीला सामोरं जाऊ शकतो, असं आपल्याला वाटू लागतं. आपण पुढे जाऊन स्वतःचं पूर्ण सामर्थ्य वापरून हिताच्या बाजूची शक्ती होऊ शकतो: यातून स्वतःचं हित, इतरांचं हित व व्यापक जगाचंही हित साधलं जातं.


याहून सखोल जायची इच्छा असल्यास ‘सी’ शिक्षणाच्या चौकटीचा पूर्ण परिचय वाचावा आणि ‘सेंटर फॉर कन्टेम्प्लेटिव्ह सायन्स अँड कम्पॅशन-बेस्ड एथिक्स’च्या इतर कार्यक्रमांबद्दलही माहिती घ्यावी.

Top