परमपूज्य दलाई लामा यांचा सव्विसाव्या हवामानबदल परिषदेला संदेश

Uv hhdl cop message

आज आपल्या समोर असलेल्या हवामानविषयक आणीबाणीच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी ग्लास्गो, स्कॉटलंड इथे हवामानबदल परिषदेचं (COP26) आयोजन केलं, याचा मला आनंद वाटतो.

जागतिक तापमानवाढ हे एक निकडीचे वास्तव आहे. आपल्यापैकी कोणालाही भूतकाळ बदलता येणं शक्य नाही. पण चांगल्या भवितव्यासाठी योगदान देणं मात्र आपल्यापैकी सर्वांना शक्य आहे. स्वतःची आणि आज हयात असलेल्या सात अब्जांहून अधिक मानवांची जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपण सर्वांनी शांततेने व सुरक्षितपणे राहावे, याची तजवीज आपल्याला करावी लागणार आहे. आशा व निश्चय यांद्वारे आपण स्वतःच्या आणि आपल्या आसपासच्या लोकांच्या आयुष्याची काळजी घ्यायला हवी.

पृथ्वी संपन्न आणि विपुल आहे, असं आपले पूर्वज मानत होते. पण मुळात हे आपलं एकमेव घर आहे. केवळ स्वतःसाठी नव्हे, तर भावी पिढ्यांसाठी आणि आपल्या सोबत पृथ्वीवर राहणाऱ्या असंख्य प्रजातींसाठीसुद्धा आपण पृथ्वीचं रक्षण करायला हवं.

उत्तर धृव व दक्षिण धृव यांच्या व्यतिरिक्त बर्फाचा सर्वांत मोठा साठा तिबेटच्या पठारावर आहे, आणि अनेकदा या प्रदेशाला ‘तिसरा धृव’ असं संबोधलं जातं. ब्रह्मपुत्रा, गंगा, सिंधू, मेकाँग, सलवीन, यलो व यांगत्से अशा जगातील काही मोठ्या नद्यांचा उगम तिबेटमध्ये होतो. या नद्या आशियातील जवळपास दोन अब्ज लोकांना पिण्याचं पाणी, शेतीसाठी सिंचन आणि जलविद्युत पुरवतात, त्यामुळे त्या जीवनस्त्रोत ठरतात. तिबेटमधील अनेक हिमनद्या वितळत आहेत, नद्यांवर धरणं उभारली जात आहेत व त्यांचे प्रवाह वळवले जात आहेत, आणि मोठ्या प्रमाणात वृक्षतोडही होते आहे. एका भागातील पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्याचा दुसऱ्या भागावर कोणता परिणाम होतो, हे यातून दिसून येतं.

आज आपण भयग्रस्ततेने प्रार्थना करून नव्हे, तर वैज्ञानिक आकलनावर आधारित वास्तविक कृती करून भविष्यातील प्रश्न सोडवण्याची गरज आहे. पृथ्वीवरील रहिवासी कधी नव्हे एवढे आता परस्परांवर अवलंबून आहेत. आपल्या प्रत्येक कृतीचा आपल्या मानवी सोबत्यांवर परिणाम होत असतो, तसेच अगणित प्राणी व वनस्पतींवरसुद्धा हा परिणाम होत असतो.

पृथ्वी नष्ट करण्याची ताकद असणारा जीव केवळ मानव हाच आहे, पण पृथ्वीचं रक्षण करण्याची सर्वाधिक क्षमताही आपल्याच प्रजातीमध्ये आहे. हवामानबदलाच्या प्रश्नाला आपण जागतिक पातळीवरील सहकार्याद्वारे सामोरे गेलो, तर त्यातून प्रत्येकाचा लाभ होईल. पण आपण वैयक्तिक पातळीवरही जे शक्य आहे ते करायला हवं. आपण पाणी कसं वापरतो आणि आपल्याला गरजेच्या नसणाऱ्या वस्तूंची विल्हेवाट कशी लावतो, यांसारख्या दैनंदिन छोट्या कृतींचेही परिणाम होत असतात. आपल्या नैसर्गिक पर्यावरणाची काळजी घेणं, हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हायला हवा आणि विज्ञान आपल्याला काय शिकवते आहे ते शिकायला हवं.

तरुण पिढी हवामानबदलाविषयी ठोस कृतीची मागणी करते आहे, यामुळे मला भविष्याविषयी आशा वाटते. विज्ञानाकडे लक्ष देऊन त्यानुसार कृती करण्याची गरज आहे, याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न ग्रेटा थनबर्गसारखे तरुण कार्यकर्ते करत आहेत, ही महत्त्वाची बाब आहे. त्यांची भूमिका वास्तववादी आहे, त्यामुळे आपण त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं.

मानवतेमध्ये एकात्मभाव राखावा, प्रत्येक मानव आपला भाग आहे ही कल्पना समजून घ्यावी, याचं महत्त्व मी नियमितपणे नमूद करत असतो. जागतिक तापमानवाढ व हवामानबदल यांचा धोका केवळ राष्ट्रीय सीमांनी मर्यादित नाही, तर आपल्या सर्वांवर त्याचा परिणाम होतो आहे.

आपण एकत्र या संकटाला सामोरे जात असताना ऐक्याच्या व सहकार्याच्या प्रेरणेने कृती करणं आवश्यक आहे, जेणेकरून या संकटाचे परिणाम मर्यादित राहतील. या आणीबाणीच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आणि बदलाचं वेळापत्रक निश्चित करण्यासाठी सामूहिक कृती करण्याचं सामर्थ्य आपल्या नेत्यांमध्ये येईल, अशी मला आशा आहे आणि त्यासाठी मी प्रार्थना करतो. जग अधिक सुरक्षित, अधिक हिरवं, अधिक आनंदी करण्यासाठी आपण कृती करायला हवी.

यासाठी मी प्रार्थना करेन आणि माझ्या यासाठी सदिच्छाही आहेत.

दलाई लामा

३१ ऑक्टोबर २०२१

Top