नैतिकता म्हणजे काय?

Study buddhism what is ethics

नैतिकता अशा नैतिक मूल्यांनी बनलेली व्यवस्था आहे, जी सुखी जीवनाच्या प्राप्तीसाठी आपल्या स्वभावाला आकार देते. नैतिकमुळे आपण प्रामाणिकपणे जगू लागतो आणि आपल्या संपर्कातील लोकांप्रति विश्वासाची भावना दृढ करून मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करू शकतो. त्यामुळे नैतिकता सुखाची गुरुकिल्ली आहे.

बौद्ध धर्मातील नैतिकता

बौद्ध धर्मात नौतिकतेची संकल्पना विवेकी जागरूकतेवर आधारित आहेः आपण बुद्धीच्या वापरातून सुख देणाऱ्या गोष्टी आणि समस्या निर्माण करणाऱ्या गोष्टींमध्ये फरक करतो. इथे आंधळेपणाने नियमांचे पालन केले जात नाही, पण नैतिकतेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये तथ्य असल्याची खात्री पटवून घेण्याशी याचा संबंध आहे.

आपल्याला खरेच स्वतःची काळजी असेल, तर आपण बुद्धी जागरूक ठेवून कसे वागायला हवे, याबाबत निर्णय घेऊ. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा असते. आणि प्रत्येक जण सुखासाठी पात्रही असतो. त्यात आपलाही समावेश असतो [पाहाः सुख म्हणजे काय?]. आत्मसन्मानाच्या अभावामुळे नैतिकतेप्रति उदासिनता येऊ शकते. तर स्वजाणिवामुळे आत्मसन्मानाची जाणीव विकसित होते. या आत्मसन्मानामुळे आपल्यात स्वतःबद्दल सन्मानाची जाणीव निर्माण झाल्याने आपण कधीच अनैतिक आचरणाकडे झुकत नाही. आपल्याला ते योग्य वाटत नाही.

जशी एखादी मधमाशी मध गोळा करताना फुलाच्या रंग आणि गंधाला हानी पोहचवत नाही, ज्ञानी त्याप्रमाणेच जगात आचरण करत असतात-धम्मपदःपुफ्फवग्गो छंद 49

‘काही हो होवो’ अशा पद्धतीचा दृष्टिकोन अलिप्तता, एकाकीपण आणि तणावाची स्थिती निर्माण करतो. नैतिकतेच्या जाणिवेमुळे आपण अशा दृष्टिकोनावर मात करू शकतो. आपण आनंदी आणि यशस्वी जीवनाचा आधार असणारे विश्वासार्ह आणि मैत्रीपूर्ण संबंध विकसित करू शकतो.

विवेकशील नैतिकता आणि वचने

बौद्ध साधना सर्वसाधारण वैचारिकतेवर आधारित आहे. आपण जर स्वार्थी, रागीट आणि अहंभावी असू, तर आपण शांततामय आणि आनंदी जीवनाची अपेक्षा तरी कशी करणार?

बौद्ध धर्मात अनेक पातळ्यांवरील वचने आहेत. उदाहरणार्थ, तिबेटी पंरपरेतील दीक्षाप्राप्त भिक्खुंना २५३ वचने पाळावी लागतात. बहुतांश बौद्ध ‘पाच साधारण नियमां’चे पालन करतात. ते असेः

  • जीव-हत्येपासून दूर राहणे
  • जे दिले गेले नाही, ते घेण्यापासून दूर राहणे
  • अवैध लैंगिक संबंधांपासून दूर राहणे
  • खोटे बोलण्यापासून दूर राहणे
  • मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे

साधनेसाठी आपले जीवन उपयुक्त करण्याच्या दृष्टीने ही वचने बौद्ध साधकांकडून ऐच्छिकपणे घेतली जातात. हे नियम आपल्याला योग्य मार्गावर ठेवतात, आणि सुखी व यशस्वी जीवन विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

[पाहाः आश्रयःजीवनाची सुरक्षित आणि अर्थपूर्ण दिशा]

यशस्वी जीवनासाठी नैतिकता

काही लोकांसाठी यशस्वी जीवनाची व्याख्या अमर्याद भौतिक संपत्ती आणि सत्तेपुरती मर्यादित असते. जरी आपण या गोष्टी साध्य केल्या, तरी आपण कधीही समाधानी नसतो आणि त्या गमावण्याच्या भीतीने ग्रस्त असतो. आपल्याला जितके अधिक मिळत जाते, विशेषतः जे इतरांच्या जिवावर मिळते, तितक्याच प्रमाणात आपण शत्रू निर्माण करत जातो. आपण लोकांना आवडत नसू, तर त्याला कोणीच यशस्वी जीवन म्हणणार नाही. यशस्वी जीवन ते असेल, जिथे आपण भरपूर मित्र कमावलेले असतील आणि लोकांना आपल्या सोबतीत आनंद जाणवत असेल. तेव्हा आपल्याकडे किती पैसा आणि सत्ता आहे, याला काहीच अर्थ नसेलः आपल्याकडे भावनिक आधार असेल, जो संकटकाळी आपल्याला सामर्थ्य पुरवेल.

नौतिक मार्गदर्शक तत्त्वे दर्शवतात की कोणता स्वभाव आपल्याला सुखी जीवनाच्या दिशेने नेईल आणि कोणता स्वभाव समस्यांकडे नेईल. जेव्हा आपण प्रामाणिक असतो आणि इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची इच्छा ठेवतो, तेव्हा लोकांचा आपल्यावर विश्वास असतो की आपण त्यांना फसवणार नाही, त्यांच्यावर दमदाटी करणार नाही किंवा त्यांची छळवणूक करणार नाही. हा विश्वास आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येकासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणारा पाया ठरतो. ते आपल्यासोबत असताना भीतीचं काही कारण नसल्याच्या जाणिवेने आनंदी आणि तणावमुक्त असतात. बदल्यात, आपल्यालाही आनंदी वाटते. कोणाला वाटेल की आपण एखाद्याच्या समोर गेल्यावर त्याचा भीतीने थरकाप उठावा? प्रत्येकाला हसरा चेहराच स्वागतशील वाटतो.

माणूस सामाजिक प्राणी आहेः आपल्याला जिवंत राहण्यासाठी इतरांच्या आधाराची गरज असते. नवजात बालक आणि वृद्धाश्रमातल्या थकलेल्या म्हाताऱ्या माणसांनाच नाही, तर संपूर्ण जीवनभर आपल्याला इतरांच्या मदतीची आणि काळजीची आवश्यकता असते. सौहादर्यपूर्ण मैत्रीतून मिळणारा भावनिक आधार आयुष्य अर्थपूर्ण बनवतो. नौतिकतेची तीव्र जाणीव भेटणाऱ्या प्रत्येकासोबत आपल्याला मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास पात्र बनवते.


Top