बौद्ध व्यक्तीचा दिनक्रम

Day%20in%20the%20life%20of%20a%20buddhist

बौद्ध शिकवण दैनंदिन जीवनाची दिशा ठरवण्यासाठी अनेक पर्याय सुचवते. यातील काही पर्याय खालीलप्रमाणे आहेत.

जेव्हा आपण सकाळी उठतो

सकाळी जाग आल्यानंतर आणि उठून तयार होण्यापूर्वी आपण आनंदी व्हायला हवे आणि आपण जिवंत आहोत, याबद्दल आभार मानायला हवेत. इथे काही सूचना दिल्या आहेत.

१. आपला दिवस अर्थपूर्ण करायचा आहे.

२. स्वतःवर काम करण्याची आणि इतरांना मदतगार ठरण्याची अमूल्य संधी चुकवायची नाही.

जर आपल्याला कामावर जायचे असेल, तर आपण आपले लक्ष अधिक केंद्रित ठेवून अधिक उत्पादनशील होण्यासाठी सज्ज असावे. आपण आपल्या सहकाऱ्यांशी क्रोध, उतावीळपणा आणि चिडखोरवृत्तीने व्यवहार करू नये. आपल्या सहकाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे, पण निरर्थक बडबड आणि अनावश्यक गप्पांमध्ये लोकांचा वेळ वाया घालवू नये. आपल्यावर कौटुंबिक जबाबदारी असल्यास आपला संयम सुटू न देता शक्य होईल तितकी सगळ्यांच्या शारीरिक आणि भावनिक गरजांची प्रेमपूर्वक काळजी घेण्याचा संकल्प करावा.

प्रातःकालीन ध्यानधारणा

सामान्यतः आपण सकाळच्या नाश्त्यापूर्वी ध्यानधारणा करू शकतो. पाच ते दहा मिनिटे शांत बसून श्वासांवर लक्ष केंद्रित करणे आणि चित्त केंद्रित करणे लाभदायी ठरते.

आपले जीवन आपल्या भोवतालातील लोकांशी कशा रीतीने जोडले गेलेले आहे, याबाबत आपण चिंतन करतो. त्यांच्या वर्तन आणि कृतीचा आपल्यावर व इतरांवर प्रभाव पडतो आणि त्यातून आपण स्नेहभाव विकसित करतो. ‘ते सर्व सुखी असोत’ अशी प्रार्थना करत करुणा विकसित करतो. ‘ते सर्व दुःखातून आणि तणावातून मुक्त होवोत’ अशी प्रार्थना करतो. आपण संकल्प करतो की आपण शक्य होईल तितकी इतरांना मदत करू आणि ते शक्य नसेल तर किमान आपल्यामुळे इतरांना इजा पोहचणार नाही, याची दक्षता घेऊ.

दिवसभरासाठी सचेतन अवस्था

संपूर्ण दिवसभर आपण आपले बोलणे, वागणे, विचार आणि भावना याबाबत सचेतन, जागरुक राहायचा प्रयत्न करतो. क्रोध, लोभ, इर्ष्या, अहंकार आणि अशा स्वरूपाच्या नकारात्मक भावना उद्भवल्यास आपण त्यावर विशेष लक्ष केंद्रित करतो. आपण एखाद्या क्षणी स्वार्थी आणि असंवेदनशील किंवा स्वसहानुभूतीने व पूर्वग्रहदुषित वागलो, तर आपल्याला त्याची जाणीव होते. एका अतिसूक्ष्म स्तरावर आपले उद्दिष्ट असते की आपण स्वतःबाबत, इतरांबाबत आणि एकूणच परिस्थितीबाबत अविवेकी विचार करू नये यासाठी सजग व्हावे. आपण अशा क्षणांची काळजी घेऊ लागतो जेव्हा आपण इतर कोणी आपल्या इतके प्रेमळ असू शकत नाही आणि आपणच अगदी ‘गरीब बिचारे’ आहोत, अशा पद्धतीच्या कपोलकल्पनांमध्ये अडकलेले असू.

जेव्हा आपण एखाद्या बंधनकारक मनोवस्थेतून वागतो, बोलतो आणि विचार करू लागतो, तेव्हा आपण एका वेगळ्या स्तरावरील सचेतनतेचा अंगीकार करतो. प्रथमतः आपण नंतर पश्चाताप करावा लागेल, अशा पद्धतीच्या वागण्या-बोलण्यावर नियंत्रण मिळवतो. आपण आधीच तसे वागलो-बोललो असेल तर आपण अधिक वाईट वागण्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो. आपण नकारात्मक भावनांच्या साखळीत अडकल्यावरही हीच पद्धत अंगीकारतो. आपल्याला शांत करणाऱ्या आणि आपला मानसिक व भावनिक तणाव दूर करणाऱ्या उपायांची मनोमन पडताळणी करतो. आणि आपले संतुलन पुन्हा प्राप्त करेपर्यंत त्या उपायांचा वापर करतो.

आपल्यातील बहुतांश व्यक्तींनी अनुभव घेतलेला असतो की आपल्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी एखादी अशी व्यक्ती असते, जी आपल्या रागास कारणीभूत असते. अशा वेळी खालील उपाय करावेतः

१. कायम लक्षात ठेवा की त्या व्यक्तीवर रागावण्याने चिडण्याने काहीच फायदा होणार नाही, त्यापेक्षा आपण आपले चित्त शांत ठेवून आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायला हवे, जसे आपण सकाळी केले होते.

२. स्वतःला आठवण करून द्यावी की प्रत्येकाला आनंदी व्हायचे असते आणि कोणालाच दुःख नको असते. पण बहुतांश लोक समस्या निर्माण करण्याजोगे वागत असतात.

३. त्यांना सुख-समाधान लाभावे आणि अवतीभोवती तशी कारणे असावीत, अशी आशा करा.

४. ते सल्ला घ्यायला तयार असतील, तर त्यांना त्यांच्या नकारात्मक स्वभावाची जाणीव करून द्या आणि त्यांना थांबायला सांगा.

५. ते अजिबात प्रतिसाद देत नसतील तर शांत राहावे आणि ही घटना संयम पाहणारा धडा होता, असे समजावे. पण तरीही तणाव दूर करण्याची संधी उपलब्ध असेल तर तटस्थ राहू नये.

आपल्यावर टीका होत असताना बचावात्मक भूमिका घेण्याचा पवित्रा नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. आपण शांत राहू शकतो आणि त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे का, हे तपासून पाहू शकतो- आणि तसे असेल तर आपण क्षमा मागून आपले वर्तन बदलू शकतो. ते सांगत असतील ते मूर्खपणाचे असेल तर तो बिनमहत्त्वाचा विषय समजून सोडून देऊ शकतो. जर तो विषय खरेच महत्त्वाचा असेल तर आपल्यात अहंकाराची किंवा आक्रमकतेची भावना न आणता समोरच्या माणसाला त्याच्या विचारातील त्रुटी जाणवून देऊ शकतो.

सायंकालीन ध्यानधारणा

दैनंदिन कामाच्या तणावाचा निचरा करण्यासाठी आपण झोपण्यापूर्वी श्वासांवर लक्ष केंद्रित करून छोटीशी ध्यानधारणा करू शकतो. आपण दिवसभरातल्या घटनांचे परीक्षण करून आपण त्या कशा हाताळल्या याची पडताळणी करू शकतो. आपले आपल्या रागावरचे नियंत्रण हरवले का किंवा आपण काही मूर्खासारखे बोललो का? तसे असल्यास आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवल्यामुळे थोडासा खेद करतो. आणि पश्चातापाची भावना आणू न देता पुढील वेळी चूक सुधारण्याचा संकल्प करतो. आपण जेव्हा परिस्थिती चांगली हाताळतो, तेव्हा त्याचीही नोंद ठेवतो. आपल्याला त्याचा आनंद होतो आणि असे वागणे कायम ठेवण्याचे ठरवतो. नंतर आपण झोपी जातो आणि उद्याच्या दिवसाकडे पाहताना स्वतःवर काम करून इतरांना मदत करण्याच्या विचारावर ठाम राहू शकतो. आपले जीवन अधिक अर्थपूर्ण होत असल्याच्या भावनेतून आपण खरे समाधान अनुभवू शकतो. 

Top