जग अनेकदा विचित्र वाटतं. तुम्ही बातम्या सुरू करायचा अवकाशः दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असतात, अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असते, आणि पर्यावरण – त्याविषयी तर विचारूच नका. तुम्हाला आठवडाभर अंथरूणाला खिळवून टाकण्यासाठी एवढं पुरेसं आहे.
आणि ते तर केवळ बाह्य जग आहे. आपल्याला आपल्या जीवनाकडेही पाहायचं असतं. आपल्या पुढील सुट्टीमध्ये कुठे जायचं? आपल्याला हवी असलेली बढती आपल्या सहकाऱ्याला मिळाली तर ते कसं सहन करायचं? आपल्या आयुष्याचं नेमकं काय करायचं?
आपण लहान असताना आपल्याला सांगितले जाते की आपण आपल्याला हवे ते बनू शकतो. आपल्याला शिकवले जाते, ‘तुमची स्वप्ने पूर्ण करा’. पण आपल्यातले किती जण स्वप्ने पूर्ण करू शकतात? आपल्यातले किती जण असे आहेत जे सोशल मीडियाच्या फीड्समध्ये इतरांना आपली स्वप्ने साकार करताना पाहतात आणि त्यांच्याबद्दल असूया ठेवतात? त्या समुद्र किनाऱ्यावरच्या सफरी आणि शुभ्र खळाळते दात – जणू त्यांना जीवनातील सुखाची चावी मिळाली आहे, पण आपण मात्र कंटाळवाण्या ऑफिसमध्येच अडकून पडलो आहोत.
‘सुखा’ची कल्पना एखाद्या परीकथेसारखी किंवा एखाद्या जाहिरातीच्या घोषवाक्यासारखी वाटते – जसे आपण भविष्यातल्या अनिश्चित वेळी मिळणाऱ्या आनंदासाठी आज काम करत आहोत. पण आपण कितीही कष्ट घेवो, सुखाची खात्री नाही. काही लोक पीएचडी करूनही मॅनडोनल्डमधील एखादी किरकोळ नोकर करत राहू शकतात, तर काही लोक प्रचंड श्रीमंत होऊनही शेवटी तणावग्रस्त होत आत्महत्येचा मार्ग निवडू शकतात. हे सर्व आपल्याला जीवनाबाबत चिंताग्रस्त करू शकते, ही चिंता सामाजिक चिंतेत परिवर्तित होते, जिथे आपण कायम स्वतःची इतरांशी तुलना करू लागतो. जेव्हा आपली एखाद्या व्यक्तीसोबत नजरभेट होते, आपण अस्वस्थ होतो आणि आपल्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून स्वतःला लपवायचा प्रयत्न करतो.
ही आपल्या काळाची आपत्ती आहे. हे कदाचित एड्स, कॅन्सर किंवा तणावासारखे गंभीर वाटणार नाही, पण चिंता आपली ऊर्जा गिळून टाकते आणि सतत अस्वस्थतेची स्थिती निर्माण करते. त्यातूनच आपण स्वतःचं ध्यान वळवण्यासाठी नव्या टीव्ही मालिका आणि फेसबुकचे न्यूज फीड स्क्रोल करत राहतो, कारण आपल्याला आपल्या विचारांसोबत एकटे राहणे असह्य वाटते. गोष्टी सहन करण्यासाठी आपल्याला कानात इअरफोन अडकवून सतत संगीताची मदत हवी वाटते.
हे असे असता कामा नये. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला जीवनात जे काही मिळाले आहे, त्याबद्दल आपण कृतज्ञ असायला हवे. आणि आपण कधीच स्वतःची इतरांसोबत तुलना करू नये. पण हे नक्की कसे साध्य करायचे? आपण चिंतामुक्त कसे व्हायचे?
एक पाऊल मागे जाणे
आपण एक पाऊल मागे जाऊन, आपल्या जीवनाचे विश्लेषण करायला हवे. हे कंटाळवाणे वाटू शकते, पण तरी ते टाळता येणारे नाही. आपल्याला जीवनाकडून काय अपेक्षा आहेत ? प्रत्येकाला लागू होणारा प्रत्येक गोष्टीचा एखादाच योग्य मार्ग नसतो, पण आपल्या आधी काही लोक या मार्गावरून गेलेले आहेत. आपल्याला कदाचित रॉक स्टार व्हावेसे वाटेल, पण आठवडाभर चोवीस तास छायाचित्रकार आपला पाठलाग करत राहतील तर, त्यातून आपल्याला सुख मिळेल का? किती रॉक स्टार पुढे जाऊन सुखी होतात? किती जण दारू आणि नशेच्या आहारी जातात? त्यामुळे त्यात ऊर्जा आणि वेळ गुंतवण्याची इच्छा बाळगण्यापूर्वी, या गोष्टींचाही विचार करायला हवा.
आदर्श शोधा
आपल्याला जीवन सुखी आणि अर्थपूर्ण करण्याचा मार्ग मिळाला, तर त्याचा पुढचा टप्पा असेल की ते प्रत्यक्षात उतरवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणे. थोर संगीतकार व्हायचं असेल तर सरावाला पर्याय नाही. चांगला फुटबॉलपटु व्हायचे असले, तरी सराव लागतोच. आपल्याला आता विसर पडला असला तरी, अगदी नुसते चालण्यासाठीही आपल्याला सराव लागलाच होता. इथे हाच संदेश आहे की कारणाशिवाय परिणाम शक्य नाही. जीवनात एखादी गोष्ट मिळवण्यासाठी समर्पण गरजेचे असते. आदर्श व्यक्ती यासाठी आपल्याला टीप देऊ शकतो आणि प्रेरणेचा चांगला स्रोत होऊ शकतो.
इतरांना मदत करा
आपण आपल्या विचार आणि इच्छांमध्ये हरवून जाणे सहज वृत्ती आहे. आपण मुख्यतः आपल्याला काय हवे आणि आपल्या आयुष्याकडून काय अपेक्षा आहेत, याचाच सतत विचार करत असतो, आणि यात एखादा अडसर आला की तो उडवून लावतो. चिंतेचा बहुतांशी भाग एकटे पडण्याच्या भीतीशी निगडित आहे, पण इतरांशी जोडले जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे इतरांची प्रामाणिकपणे काळजी घेणे. आपण फक्त आपलाच विचार करत राहिलो, तर अनिवार्यपणे वाईट परिस्थिती अनुभवू, पण वैज्ञानिक संशोधनातून ही गोष्ट सिद्ध झाली आहे की इतरांची मोकळ्या मनाने मदत केल्याने चिंता संपतात आणि सुखात वाढ होते.
यासाठी एखादं मोठं कार्य करण्याची गरज नसते. एखाद्या उदास दिवशी एखाद्याकडे पाहून स्मित करणे किंवा एखाद्याकडे कृतज्ञता व्यक्त करणेही दोन्ही पक्षांना उभारी देणारे असते. हे बंधनकारक भावनेतून करू नका, तर एखाद्याचा दिवस उजळवण्याच्या प्रामाणिक इच्छेतून करा. आणि नंतर तुमची मनोवस्था कशी बदलते ते पाहा.
आपले वास्तविक रूप ओळखा
आपल्या सर्वांनांच आपण इतरांहून वेगळे आहोत, असा विचार करायला आवडते, पण त्यामुळेच आपण सर्वसामान्य ठरतो. जेव्हा आपण ‘आपले वास्तविक रूप ओळखा’ असे म्हणतो, त्याचा अर्थ आपण खरेच कोण आहोत, हे समजून घेण्याशी असतो. आपल्या प्रत्येकालाच समस्या असतात, आणि आदर्श जीवन खरेच अस्तित्वात नसते. तुम्ही विचार करता त्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका.
ज्या प्रकारे आपण ज्या छायाचित्रांमध्ये वाईट दिसतो, अशी चित्रे आपल्याला दुसऱ्यांना दाखवावी वाटत नाहीत. आपण सार्वजनिकरित्या थट्टेचा विषय होऊ, असे वाटते, तसेच दुसऱ्याचेही असते. वास्तविक आपण एका अशा काळात जगत आहोत, जिथं आपल्यावर आदर्श जीवनाच्या उदाहरणांचा भडिमार होतो, आपण त्या जाळ्यात अडकता कामा नये. या मुद्द्यांवर आपण सजग असू, मनमोकळेपणाने इतरांच्या सुखासाठी प्रयत्नशील असू आणि आपले जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी कष्ट घेत असू, तर हळूहळू चिंता नष्ट होऊ लागते.