नैतिक मार्गाने आनंदी राहण्याचा शोध

Studybuddhism universal values 01

आज मी धर्मनिरपेक्ष मार्गांनी आनंद मिळवण्याबद्दल बोलणार आहे. इथे मोठ्या प्रमाणात जमलेल्या लोकांसमोर बोलण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. माझे एक खूप चांगले मित्र, अमेरिकन शास्त्रज्ञ, डेव्हिड लिविंगस्टोन जे आता आपल्यात नाहीत ते म्हणाले होते की जेव्हा एखादा प्रेमळ माणूस इतर लोकांना भेटतो तेव्हा त्याचे डोळे विस्फारतात. ते मला म्हणाले की जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा सुद्धा त्यांचे डोळे असेच विस्फारले आणि हे त्यांच्या आयुष्यात फक्त दोन व्यक्तींच्या बाबतीतच घडले आहे, एकतर जेव्हा ते मला भेटले तेव्हा आणि जेव्हा ते  त्यांच्या बायकोकडे पाहतात तेव्हा. परंतु आता ज्या ज्या ठिकाणी मी जातो स्थानिक लोक माझ्यावर मनापासून प्रेम करतात आणि मी त्याचा स्वीकार करतो. ह्या गोष्टीसाठी मी आभार व्यक्त करतो.

'धर्मनिरपेक्षता' म्हणजे काय?' भारतीय पद्धतीनुसार मी या शब्दाचा वापर करतो. मात्र माझ्या काही मुस्लिम आणि ख्रिश्चन मित्रांना असे वाटते की 'धर्मनिरपेक्षता' ही संकल्पना थोडी धर्माच्या विरोधात जाणारी आहे. त्यामुळे त्यांना मी या शब्दाचा वापर केलेला आवडत नाही. आणि काही लोकांच्या मतानुसार 'नैतिकता' ही धर्मावर आधारित असणे गरजेचे आहे, परंतु भारतीय संविधान धर्मनिरपेक्षतेवर आधारित आहे; ते धर्मविरोधी नाही. भारतामध्ये धर्म या संकल्पनेला खूप महत्त्व आहे. भारतीय संविधान लिहिणारे गांधी आणि इतर लोक अतिशय धार्मिक होते. या संदर्भात 'धर्मनिरपेक्षता' म्हणजे सर्व धर्मांप्रति समान आदर असणे. कुठलाही एक धर्म दुसर्‍यापेक्षा श्रेष्ठ आहे अशी कल्पना न करणे. हजारो वर्षांपासून या धर्मनिरपेक्षतेने नास्तिक लोकांच्या अधिकारांचासुद्धा आदर केला आहे. त्यामुळे मी जेव्हा 'धर्मनिरपेक्षता' हा शब्द वापरतो तेव्हा तो या अनुषंगाने वापरतो.

आपण माणसेच काय तर प्राणी, कीटक यांना सुद्धा अधिक शांतता हवी असते. कुणालाच कटकटी नको असतात आणि प्रत्येकाला आनंद मिळवण्याचा आणि अडचणी, दु:खे यातून मुक्ती मिळवण्याचा अधिकार असतो. हे तर्काच्या किंवा कुठल्या प्रयोगाच्या आधारे सिद्ध करण्याची गरज नाही. हे अगदी नैसर्गिक आहे आणि सर्व संवेदनक्षम माणसे, पशु-पक्षी सर्वजण हे ध्येय प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थात हे ध्येय प्राप्त करण्यासाठी कोणकोणत्या मार्गाचा वापर केला जातो हे अधिक महत्त्वाचे आहे. तो मार्ग वास्तववादी असला पाहिजे. तो जर तसा नसेल तर आपल्याला ध्येय प्राप्त होणार नाही. उदाहरणार्थ, काही वेळा आपण पाहतो की प्राणी घाबरल्यामुळे चुकीच्या दिशेने पळत सुटतात. धोक्यापासून लांब पळण्याऐवजी धोक्याच्या दिशेला जातात. परंतु आपण मनुष्य असल्याने आपल्याकडे उत्तम बुद्धी आहे. त्यामुळे कारणमीमांसा आणि बुद्धिमत्तेच्या मदतीने वास्तववादी दृष्टिकोन अंगीकरण्याची क्षमता आपल्यापाशी आहे. त्यामुळे आपण जास्त यशस्वी आहोत. आपल्याकडे दूरदृष्टी असल्यामुळे कधीकधी आपण स्वेच्छेने भविष्यातील यशासाठी तात्कालिक फायद्याचा त्याग करतो. प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धिमत्ता आपल्याकडे असण्याचे हे एक लक्षण आहे. आणि त्यामुळेच आपण भविष्यातील फायद्यासाठी प्रयत्न करतो.

मग प्रश्न असा आहे की कुठल्या स्तरावरील अनुभव आपल्याला सर्वात जास्त फायदेशीर आहे? ज्ञानेंद्रियांशी संबंधित अनुभव हे प्रामुख्याने क्षणिक असतात. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या खेळाशी संबंधित चित्र पाहता किंवा एखादा प्रवासी वेगवेगळी ठिकाणे, देखावे, माणसे, पोशाख इत्यादी पाहतो. अर्थात, यामुळे तुम्हाला एक प्रकारचा आनंद मिळेल. उदाहरणार्थ, तुमच्या डोळ्यांच्या मार्फत मिळणारा आनंद. माझ्या दिल्लीमधील भारतीय ड्रायव्हरला क्रिकेटची आवड आहे. आदल्या रात्री मॅच बघितल्यामुळे तुझी किती तासांची झोप अपूर्ण राहिली हे विचारताच त्याने ४ तास असे उत्तर दिले. मग मी त्याला रागावलो. मी म्हटले की शांत झोप घेणे हे मॅच पाहण्यापेक्षा आपल्या मेंदुसाठी जास्त महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे संगीत, सुगंध, खाद्य पदार्थ आणि शारीरिक सुखे सुद्धा उपलब्ध आहेत. ही भौतिक पातळीवरील सुखे क्षणिक काळासाठी असतात. त्यांचा अनुभव घेऊन झाल्यानंतर फक्त त्यांच्या आठवणी उरतात.

दुसर्‍या बाजूने विचार केला तर काही अनुभव मानसिक पातळीवरचे असतात आणि इंद्रियांशी निगडीत अनुभवांवर अवलंबून नसतात. त्यांच्यापासून मिळणारा आनंद हा जास्त काळ टिकणारा असतो. आनंद किंवा दु:ख अनुभवण्याचे दोन स्तर आहेत हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. एक म्हणजे भौतिक स्तरावरील जे तात्पुरता असतो आणि दुसरा (बौद्धिक) मानसिक स्तर जो सखोल असतो.

आजच्या प्रगत जगात लोक भौतिक स्तरावर जास्त गुंततात कारण त्यांना तो जास्त महत्वाचा वाटतो. त्यामुळे ते आनंद मिळवण्यासाठी बाह्य भौतिक वस्तू शोधत असतात. आणि आंतरिक, खोलवरचा स्तर दुर्लक्षित करतात. फार वर्षापूर्वी एकदा बर्लिनमध्ये असताना मी उतरलेल्या हॉटेल समोरच एक नाईटक्लब होता. रात्री ७:३० - ८ च्या सुमारास झोपायला जाताना मी बाहेर पाहिले असता मला रंगबिरंगी प्रकाश दिसला. लाल, निळे, झगमगणारे दिवे आणि हादरे देणारा आवाज ऐकू येत होता. मी झोपलो, मध्यरात्री मला जाग आली तेव्हा ही आवाज येत होता आणि पहाटे ४च्या आसपास जेव्हा मी उठलो त्यावेळी सुद्धा ते सगळे सुरूच होते. तिथल्या सर्व लोकांची ऊर्जा इंद्रियांच्या पातळीवरच शोषली जात होती. मला वाटते की पुढच्या दिवशी सर्वजण पूर्णपणे थकलेले असणार. इतक्यातच मी एका भारतीय कुटुंबाला भेटलो. आईवडील, मुले, आजीआजोबा असे सर्वच जण होते. आम्ही सर्व गप्पा मारत बसलो होतो. मी म्हणालो की मागील दोन किंवा तीन वर्षांपासून मी टीव्ही बघितलेला नाही, मी फक्त रेडिओवर बी.बी.सी.च्या बातम्या ऐकतो. त्यावर त्या कुटुंबातील तरुण मुले म्हणाली की, 'तुम्हाला टीव्ही नसल्यामुळे फार कंटाळा येत असणार.' याचा अर्थ ते लोक खूप जास्त टीव्ही पाहतात. विशेषत: अमेरिका आणि युरोपमधील मुले खूप जास्त टीव्ही पाहतात. हे फार उपयोगी नाही कारण त्यामुळे मेंदूची तीक्ष्ण बुद्धीच्या मदतीने विश्लेषण करण्याची कुवत बदलून जाते. म्हणून आनंद मिळवण्यासाठी फक्त भौतिक पातळीवरच नव्हे तर मानसिक पातळीवर काम करणे आवश्यक आहे.

दुसरा मुद्दा असा की खरा भावनिक गोंधळ हा मानसिक स्तरावर होतो त्यामुळे आनंदी जीवनासाठी चित्त शांत असणे गरजेचे आहे. जर त्रासाचा उगम हा मानसिक पातळीवर आहे तर आपल्याला मानसिक पातळीवरच त्याचा सामना करावा लागेल. त्यामुळे प्रथमत: आपल्याला आपल्या आंतरिक जगाकडे, तत्त्वांकडे जास्त लक्ष द्यावे लागेल.

आपल्या मेंदूच्या लहान कक्षेत आपण आपल्या मनाच्या अमर्याद विस्ताराचा शोध घेऊ शकतो. परंतु खरेतर आपल्याला या विस्ताराबद्दल फारच कमी माहिती असते. म्हणून आपल्याला आपल्या भावनांचा अभ्यास केला पाहिजे. जेव्हा प्रबळ भावना निर्माण होतात तेव्हा आपल्या मनाच्या क्षमतेच्या मदतीने त्यांची चिकिस्ता केली पाहिजे आणि असे करतानाच त्यांचा आवेग हळूहळू कमी होत असल्याचे आपल्या लक्षात येईल. आपल्या मनावर क्रोधाने मिळवलेला ताबा अनुभवण्याची क्षमता आपल्यामध्ये असते. ज्या क्षणी आपण त्याची चिकिस्ता करतो त्याची तीव्रता कमी होऊ लागते. मनाच्या आत खोल डोकावणे अतिशय रंजक असते.

आपण सध्या २१व्या शतकात आहोत. विसावे शतक हे मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वाचे शतक होते असे दिसून येते. कारण त्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक सुधारणा झाल्या. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडली. राहणीमानाचा स्तर उंचावला, परंतु त्याच शतकात रक्तपात देखील खूप झाला. तुमच्या आईवडिलांनी आणि आजी आजोबांनी खूप कष्ट केले आहेत आणि त्रास भोगला आहे. लक्षावधी लोक मारले गेले. त्यातील अनेक आण्विक शस्त्रांमुळे बळी गेले. इतक्या मोठ्या प्रमाणातील हिंसेनंतर एखादी नवीन व्यवस्था अस्तित्वात आली असती तर त्या हिंसेचे समर्थन करता आले असते परंतु तसे झाले नाही. अजूनही, २१व्या शतकाच्या सुरुवातीला इराक, इराण आणि अफगाणिस्तानमध्ये दहशतवादाशी निगडीत अनेक समस्या आहेत. या सर्व समस्या भूतकाळातील चुका आणि दुर्लक्ष केल्याचा परिणाम आहे. बाहेरील गोष्टींवरच जास्त भर दिला गेला. आता मात्र आपण बाह्य परिस्थिती प्रमाणेच आंतरिक तत्त्वांचाही अधिक विचार केला पाहिजे.

जरी भौतिक प्रगती सामान्यपणे ठिकठाक असली तरी गरीब आणि श्रीमंत यातील दरी ही सुद्धा एक मोठी समस्या आहे. इथे ऑस्ट्रिया मध्ये समानतेचा स्तर खूप समाधानकारक आहे. परंतु मागच्या वर्षी मी मॅक्सिको, अर्जेंटिना आणि ब्राझिलला गेलो होतो. आणि मी गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील फरकाबद्दल विचारल्यावर कळले की त्यात खूप तफावत आहे. ऑस्ट्रियात ही तफावत बहुतेक कमी आहे.

मी हे सुद्धा विचारले, "भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे की थोड्या प्रमाणात?" ज्या देशांमध्ये बोलण्याचे स्वातंत्र्य आहे आणि पत्रकारितेवर सुद्धा बंधने नाहीत तेथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होऊ शकतो. हे स्वअनुशासन आणि नैतिक तत्त्वांच्या अभावामुळे घडते. उदाहरणार्थ, भारत हा धार्मिक लोकांचा देश आहे. परंतु तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. अनेक भारतीय आपल्या घरांमध्ये देवी देवतांच्या मूर्ती ठेवतात, त्यांना फुले वाहतात, धूप लावतात, प्रार्थना करतात. मी चेष्टेने कधीकधी म्हणतो की त्यांची प्रार्थना असते, "माझा भ्रष्टाचार कुणाला समजू नये." ही खूप दु:खाची गोष्ट आहे. धार्मिक वृत्ती असूनही कितीतरी लोक भ्रष्टाचार करतात. ते आस्तिक म्हणवतात पण इतक्या प्रमाणात आस्तिक नसतात की आपापल्या धर्मांच्या तत्त्वांचे पालन करतील आणि धर्मपरायण होतील.

काही वर्षांपूर्वी माझी एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या जाणकाराबरोबर चर्चा झाली, की त्यांचा नफ्यासंदर्भातला व्यवहार कसा पारदर्शी नसतो. आम्ही या विषयावर चर्चा केली आणि मग मी म्हटले की या कंपन्या चालवणारी माणसे जर पापभीरू असतील तर त्यांनी या बाबतीतली शिस्त पाळली पाहिजे. तेव्हा तो म्हणाला की हा अठराव्या शतकातील विचार आहे. म्हणजे जर ही माणसे देवाची प्रार्थना जरी करत असतील तरी ती तितक्या गंभीरपणे करत नसतील. जर ते खरेच गंभीर असतील तर त्यांनी देवाने सांगितलेले प्रामाणिकपणा,  नैतिकता आणि काळजी घेणे हे उपदेश पाळले पाहिजेत,  म्हणजेच आपण इतरांची आणि पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आपण नैतिकतेवर अधिक भर दिला पाहिजे. म्हणजेच स्वयंशिस्तीवर अधिक भर दिला पाहिजे. स्वयंशिस्त ही कर्तव्याच्या भीतीपोटी न येता मनापासून आली पाहिजे. 'जर मी एखाद्या कृतीत अडकलो तर ते नैतिकतेच्या विरुद्ध होईल ' अशा भावनेतून आली पाहिजे. आपल्याला यापुढे नैतिकतेसाठी अधिकाधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण वाढत्या लोकसंख्येमुळे आणि कमी होत जाणाऱ्या विकासाच्या साधनसंपत्तीमुळे अधिकाधिक प्रश्न निर्माण होणार आहेत. त्यासाठी हे एकविसावे शतक आपल्याला करुणामयी शतक बनवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. हे नैतिकता आणि धर्मनिरपेक्षतेचे मूळ तत्त्व आहे.

नैतिकतेचा प्रेमळ वागण्याशी खूप जवळचा संबंध आहे. याचा अर्थ दुसऱ्या मनुष्य प्राण्याविषयी अधिकाधिक जवळीक वाटणे. ते सर्व आनंदी राहू इच्छितात, त्यांना दुःख नको असते आणि आपण सर्व एकमेकांशी संबंधित असतो. त्यांचा आनंद हा आपल्या आनंदाचेही मूळ असतो,  हे जेव्हा आपण समजून घेऊ आणि त्यांचा आदर करू तेव्हा खोटेपणा, फसवणूक, एकमेकांना धमकावणे किंवा शोषण करणे या सगळ्यांना जागाच उरणार नाही. याचा अर्थ प्रेमळपणा हा आनंदाचे मूळ आहे आणि तो जैविक दृष्टया आपल्याला आईपासून मिळतो. तिच्या दुधातून मिळणाऱ्या प्रेमामुळे, स्नेहामुळे आपण सुरक्षितपणे जगतो. हा अनुभव आपल्या रक्तात आणि जनुकांमध्ये शोषला जातो. प्रश्न असा आहे की, लहान मुले इतरांकडून मिळणाऱ्या पैशांपेक्षा किंवा सांस्कृतिक गोष्टींपेक्षा त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रेमाची भुकेली असतात. पण ती जेव्हा मोठी होतात पण शहाणी समजूतदार होत नाहीत तेव्हा त्यांच्या जीवनमूल्यांचा ऱ्हास होत जातो. असे का होते?  तर ती स्वयंकेंद्री होत जातात. जरी त्यांनी दुसऱ्यांना मदत केली तरी 'माझा त्यातून काय फायदा होणार आहे ' या भावनेतून ती असते. म्हणजेच स्वयंकेंद्रीपणा हा मीपणाला पाठिंबा देतो आणि मोठे प्रश्न निर्माण करतो. आपल्याला आपला समाज माणुसकीच्या दृष्टीने 'आम्ही ' म्हणून समजून घ्यायला हवा. आणि आपण स्वतःला युरोपियन संघाचा किंवा पूर्ण विश्वाचा एक भाग समजलं पाहिजे. त्यामुळे फक्त ‘मी’चा विचार न करता, जगभरातल्या सात कोटी माणसांना आपण 'आम्ही ' म्हणून समजून घेतले पाहिजे. आणि आपण या ‘आम्ही’चाच एक भाग आहोत.  म्हणजेच आपण गरीब असो वा श्रीमंत, एकमेकांना आदर देण्याची गरज आहे. प्रत्येकाला समान अधिकार मिळण्याची गरज आहे. आर्थिक क्षेत्रात आणि इतर क्षेत्रातसुद्धा. हा आदर तेव्हाच निर्माण होईल जेव्हा आपण इतरांचे भले होण्याचा विचार करू.

खरे तर ही गोष्ट धर्माचा भाग असण्याची गरज नाहीये, धर्म ही ज्याची त्याची खाजगी गोष्ट आहे. या गोष्टी मानवतेशी संबंधित आहेत. जर आपण सगळ्यांना आदर देत असू तर शोषणाचा प्रश्नच उद्भवणार नाही. तसेच प्रेमळ असणे हे सुदृढ तब्येतीसाठी सुद्धा उपकारक असते. काही शास्त्रज्ञ म्हणतात की सततचा धोका आणि भीती यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. म्हणूनच आपण जेव्हा आत्मकेंद्रित असतो तेव्हा आपण आपल्या बाबतीत भीतीचा अनुभव घेतो आणि दुसऱ्यांचा विचार केला तर त्यांच्याबद्दल आपल्याला अविश्वास वाटतो. यामुळे आपला एकटेपणा आणि भीती वाढीस लागते. आणि त्यातूनच आपण नैराश्य आणि रागाच्या गर्तेत ढकलले जातो. पण आपण जर आपले अंतरंग उघडे केले आणि इतरांची काळजी वाहू लागलो तर आपला आत्मविश्वास वाढीस लागतो. त्यातूनच आपण उघडपणे आणि पारदर्शी वागू शकतो. मग आपण कोणाला भेटतो,  कोणाला बघतो याचा प्रश्नच येत नाही. आपल्या भोवतालच्या सर्वांना आपण आपले भाऊ,  बहिण समजू लागतो. आणि जेव्हा आपण प्रेमळपणे इतरांची काळजी घेऊ लागतो तेव्हा अनेक माणसे आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देतात. अर्थात प्रत्येक वेळी असेच घडते असे नाही. जेव्हा जेव्हा  मला गाडीतून आजूबाजूला फिरवण्यात येते तेव्हा नेहमी मी रस्त्यावरून जाणाऱ्या इतर लोकांकडे बघून स्मितहास्य करतो. एकदा मी जर्मनीत असताना बाजूने जाणाऱ्या एका महिलेकडे बघून स्मित केले तर तिला ते शंकास्पद वाटले. म्हणजेच माझ्या स्मितामुळे तिला आनंद वाटण्याऐवजी ती घाबरली. त्यामुळे लगेच मी माझे तोंड दुसरीकडे वळवले. अर्थात असेही नेहमी घडते असे नाही.

प्रेमळपणा ही अशी गोष्ट आहे की जी आपण आपल्या आईकडून शिकतो,  त्यामुळे ती गोष्ट आयुष्यभर आपण आपल्याबरोबर बाळगणे आवश्यक ठरते. वैज्ञानिक बैठकीत आपण नेहमी एक घोषवाक्य ऐकतो, 'मन सुदृढ तर शरीर सुदृढ'.  यासाठी आपल्याला काही वास्तविक गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे,  तसेच आपले मन शांत असणेही आवश्यक आहे. आपण जेव्हा विचलित अवस्थेत असतो तेव्हा काही पूर्वग्रहांनी ग्रासलेले असतो आणि तेव्हा आपण सत्यता पडताळून बघू शकत नाही. मग बरेच सारे प्रश्न निर्माण होतात. यासाठी प्रेमळपणा हा मनःशांती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो.

जर आपले मन शांत नसेल तर आपल्या शिक्षणातसुद्धा समस्या येऊ शकतात. जर मन शांत, आनंदी नसेल तर एखादी गोष्ट शिकून घेणे कठीण होऊन बसते. म्हणजेच कुठलेही कार्य किंवा  व्यवसाय,  अगदी राजकारण सुद्धा व्यवस्थितपणे यशस्वी करण्यासाठी मनःशांतीच मदत करते. थोडक्यात मनःशांती आपल्याला आत्मविश्वासाकडे नेते आणि आत्मविश्वासामुळे आपण वास्तविकता जास्त स्पष्टपणे पाहू शकतो आणि त्याच आधारावर आपला प्रेमळपणा अधिकाधिक वाढवू शकतो.

हे सर्व धर्मनिरपेक्ष नैतिकतेचे मूळ सिद्धांत आहेत आणि आनंदी राहण्याची गुरुकिल्लीही. माझ्यापुरते बोलायचे तर हे सिद्धांत मला अतिशय उपयुक्त वाटले. तुम्हाला जर यात काही अर्थ आहे असे वाटले तर त्यांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करा आणि जर काहीच अर्थ नाही वाटला तर सरळ विसरून जा. धन्यवाद.

Top