स्वहित विरुद्ध दुसऱ्याचे हित यावर आधारलेले नैतिक जीवन
बौध्द धर्माचे सार म्हणजे: जर आपल्याला इतरांना मदत करणे शक्य असेल, तर मदत केली पाहिजे. जर शक्य नसेल तर निदान इतरांचे नुकसान तरी करू नये. नैतिक जीवन जगण्याचे हेच सार आहे.
प्रत्येक कृती मागे एक प्रेरणा काम करत असते. इतरांचे नुकसान करण्यामागे प्रेरणा असते आणि इतरांना मदत करण्यामागे सुध्दा प्रेरणा काम करत असते. त्यामुळे इतरांना मदत करण्यासाठी, सेवा करण्यासाठी सुध्दा एखादी प्रेरणा असतेच. हे समजून घेण्यासाठी काही संकल्पना माहीत असणे आवश्यक आहे. आपण मदत का करतो? आपण नुकसान का करत नाही?
उदाहरणार्थ, आपण जेव्हा एखाद्याचे नुकसान करू इच्छितो तेव्हा आपल्याला तसे करण्यापासून रोखण्यासाठी आपल्या मनात एखादी जाणीव (चेतना) निर्माण व्हायला हवी. आपल्या मनात एक निश्चयाची भावना हवी, जेणेकरून आपण नुकसान करणार नाही. आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात एखाद्याला इजा पोहचवण्याचा विचार येतो. परंतु त्याचवेळी एखाद्या विशिष्ट मनस्थितीमुळे मनाची दुसरी बाजू आपल्याला सांगते की हे चूक आहे, असे करणे योग्य नाही. जेव्हा आपल्याला कळते की हे चूक आहे, तेव्हा आपल्यात इच्छाशक्ती निर्माण होते आणि आपण स्वतःला थांबवतो. काही गोष्टी केल्यामुळे होणाऱ्या दुरगामी परिणामांची आपल्याला जाणीव होणे आवश्यक आहे. माणूस म्हणून या दूरगामी परिणामांची कल्पना करण्याची बौद्धिक कुवत आपल्यात आहे. त्यामुळे जेव्हा आपल्याला ते परिणाम दिसतात तेव्हा आपण ताबडतोब स्वतःला थांबवू शकतो.
येथे आपण दोन निरनिराळे दृष्टिकोन विचारात घेऊ शकतो. पहिल्या दृष्टिकोनानुसार स्वहिताचा विचार आणि मदत करणे शक्य असल्यास , मदत करणे: जर मदत करणे शक्य नसेल तर [नुकसान करण्यापासून] स्वतःला रोखणे. दुसऱ्या दृष्टिकोनानुसार इतरांच्या हिताचा विचार करावा आणि शक्य असल्यास मदत करावी आणि शक्य नसल्यास स्वतःला [नुकसान करण्यापासून] रोखावे. दुसऱ्याचे नुकसान करण्यापासून स्वतःला थांबवताना ‘ मी हे केले तर मला इतर परिणामांप्रमाणे कायदेशीर परिणामांही सामोरे जावे लागेल ’ हा विचार करून थांबणे म्हणजे स्वहिताचा विचार करणे. इतरांचा विचार करून थांबताना येणारा विचार म्हणजे ‘ इतर माणसे सुद्धा माझ्यासारखीच आहेत. त्यांनाही त्रास आणि पीडा नको आहे, म्हणून मी त्यांचे नुकसान करणार नाही ’.
जेव्हा आपण आपल्या मनाला शिकवण देतो, तेव्हा आपण प्रथमतः स्वार्थाच्या संदर्भात विचार करतो आणि नंतर प्रकर्षाने इतरांचा विचार करतो. परिणामकारकतेच्या संदर्भात, इतरांविषयी प्रकर्षाने विचार करणे जास्त शक्तिशाली असते. प्रतिमोक्षाच्या - प्रतिज्ञा, विनय परंपरेतील वैराग्याची दीक्षा - संदर्भात स्वार्थविचार हा मूलाधार असतो, ज्यामुळे आपण हिंसा टाळतो. कारण आपल्यासमोर मुक्तीचे ध्येय असते. परंतु बोधिसत्वाच्या आचरणाच्या संदर्भात, परहितदक्षता हे हिंसा टाळण्यामागील मुख्य कारण असते. कदाचित हे दुसरे, परार्थदक्षतेच्या आधारावर हिंसा टाळणे आणि इतरांची मदत करणे, मी नेहमी ज्याविषयी बोलतो त्या वैश्विक दायित्वाशी निगडित आहे.
माणूस म्हणून आपला मूळ स्वभाव
साधारणपणे आपण माणसे सामाजिक प्राणी आहोत. स्त्री किंवा पुरुष (ती किंवा तो) कुणीही असो त्याचे जीवन संपूर्ण मानव जातीवर अवलंबून असते. प्रत्येकाचे आयुष्य आणि कल्याण संपूर्ण समाजावर अवलंबून असल्या कारणाने दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करण्याची गरज आणि त्याबद्दल काळजी असणे ही आपल्या स्वतःच्या मूळ स्वभावधर्मातून आलेली गोष्ट आहे. उदाहरणार्थ, आपण बबून या वानरांच्या समूहाकडे पाहिले असता समूहातील ज्येष्ठ वानर संपूर्ण समूहाची जबाबदारी घेते. जेव्हा इतर बबून खात असतात तेव्हा एक जण नेहमी बाजूला थांबून लक्ष ठेवत असतो. सर्वात शक्तिशाली असलेला बबून समाजाच्या हितासाठी आपल्या समुहाची काळजी घेण्यासाठी मदत करतो.
प्रागैतिहासिक काळात माणसाकडे ना शिक्षण होते ना तंत्रज्ञानाची माहिती होती. सामान्यतः मानवी समाजजीवन अतिशय साधे होते. सर्वजण एकत्र काम करत आणि जे मिळेल ते वाटून घेत. समाजवाद्यांच्या म्हणण्यानुसार हे समाजवादाचे मूळ स्वरूप होते. सर्वांनी एकत्र काम करणे आणि सर्वांनी आनंदाने जगणे. कालांतराने, शैक्षणिक विकास झाला आणि सभ्यतेचा उगम झाला. माणसाचे मन सुसंस्कृत झाले आणि त्यामुळे मोह वाढला. नंतर मत्सर आणि द्वेष उत्पन्न झाले आणि जास्तच फोफावत गेले.
आज २१ व्या शतकात (मानव समाजात) अनेक बदल झाले आहेत. आपल्यातील मतभिन्नता वाढली आहे. शिक्षण क्षेत्रात, नोकरी आणि सामाजिक पार्श्वभूमीच्या बाबतीत इतकेच नाही, तर वय आणि जातीच्या बाबतीत देखील मतांतरे आहेत. पण या सर्वांना दुय्यम स्थान आहे. मूळ पातळीवर आपण सर्व माणसे आहोत आणि सर्व जण समान आहोत. शेकडो हजारो वर्षांपूर्वी हीच परिस्थिती होती.
लहान मुलांचा दृष्टिकोन अशाच प्रकारचा असतो. इतर मुलांची सामाजिक पार्श्वभूमी, धर्म, जात, रंग, आर्थिक स्थिती या कशाचीही त्यांना पर्वा नसते. ते एकत्र खेळतात. ते खरेखुरे सवंगडी असतात. त्यामुळे एकमेकांबद्दल त्यांच्यात फक्त मैत्रीभाव असतो. आपण प्रौढ लोक जास्त बुद्धिमान आणि स्वतःला पुढारलेले म्हणवतो, पण इतरांची त्यांच्या सामाजिक स्थानावरून पारख करतो. ‘ मी जर हसून पाहिले तर मला हवे ते मिळेल का? मी जर तोंड वाकडे केले तर माझे नुकसान होईल का? ’ याचा आपण हिशोब करत असतो.
सार्वभौमिक उत्तरदायित्व
सार्वभौमिक किंवा वैश्विक उत्तरदायित्वाची भावना मानवी स्तरावर काम करते. आपण इतर माणसांची काळजी करतो कारण: ‘ मी ही त्यांच्यापैकी एक आहे. कितीही मतभिन्नता असली तरी माझे कल्याण त्यांच्यावर अवलंबून आहे. ’ मतभिन्नता ही असणारच, पण त्यांची मदतही होते.
शतकानुशतके, या ग्रहावरची लोकसंख्या फक्त १ अब्ज होती. आता ६ अब्जांपेक्षाही जास्त झाली आहे. लोकसंख्या वाढीमुळे एखादा देश आपल्याच नागरिकांना अन्न आणि इतर साधने पुरवू शकत नाही. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था जागतिक आहे. आजच्या सत्यपरिस्थिती प्रमाणे जग जवळ येत आहे आणि ते मोठ्या प्रमाणात परस्परावलंबी आहे. हेच वास्तव आहे. याच बरोबर पर्यावरणाशी संबधित एक समस्या आहे. जागतिक स्तरावर होणारी तापमान वाढ ही एक दोन देशांपुरती मर्यादित समस्या नसून पृथ्वीवरील ६ अब्ज लोकांसाठी चिंतेचा विषय आहे. या नवीन सत्याशी सामना करण्यासाठी वैश्विक उत्तरदायित्वाची गरज आहे.
उदाहरणार्थ, जुन्या काळात इंग्रजांनी फक्त स्वतःचा विचार केला आणि कधीकधी जगातील इतर देशांचे (भागांचे) शोषण केले. इतर लोकांच्या भावनांचा त्यांनी विचार केला नाही. ठीक आहे! पण तो भूतकाळ झाला आता गोष्टी बदलल्या आहेत, वेगळ्या आहेत. आता आपण इतर देशांचीही काळजी घेतली पाहिजे.
वास्तविकता पाहता, साम्राज्यवादी इंग्रजांनी काही चांगली कामे केली. त्यांनी भारतात इंग्रजी भाषेच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे शिक्षण आणले. भारताने ही गोष्ट मान्य केली पाहिजे. त्याचप्रमाणे इंग्रजांनी तंत्रज्ञान आणले, रेल्वे वाहतूक व्यवस्था आणली. मी जेव्हा भारतामध्ये आलो, त्यावेळी काही गांधीवादी जिवंत होते. त्यांनी मला गांधीजींच्या अहिंसेच्या पद्धती अवलंबण्याचा सल्ला दिला. ब्रिटिश साम्राज्यवादी अतिशय वाईट आहेत असे मला त्यावेळी वाटले होते. पण नंतर मला दिसून आले की भारतात स्वतंत्र न्यायव्यवस्था, मुक्त पत्रकारिता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इतरही गोष्टी आहेत. त्यामुळे नीट विचार केल्यावर माझ्या असे लक्षात आले की या अतिशय चांगल्या गोष्टी आहेत.
आजच्या काळात देशा-देशांमध्ये आणि खंडा-खंडांमध्ये खूप जास्त परस्परावलंबित्व आहे. या सत्य परिस्थिती नुसार आपल्याला वैश्विक उत्तरदायित्वाची गरज आहे. आपले हित इतरांच्या विकासावर आणि हितावर अवलंबून आहे. त्यामुळे स्वतःच्या हितासाठी तुम्हाला दुसऱ्याच्या हिताची काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक क्षेत्रात ही संकल्पना पूर्वीपासून आहेच. जरी विचारसरणी भिन्न असली किंवा एकमेकांवर विश्वास नसला तरीदेखील आपल्याला जागतिक परस्परावलंबी अर्थव्यवस्थेमुळे परस्परात संवाद ठेवावा लागेल. त्यामुळे इतरांच्या हिताच्या आधारावर वैश्विक उत्तरदायित्व अतिशय महत्त्वाचे आहे.
दुसऱ्यांना आपले भाऊ बहिण मानून त्यांच्याबद्दल आत्मीयतेची भावना ठेवली पाहिजे. याचा धर्माशी काहीही संबंध नाही. आपल्याला खरेच याची गरज आहे. ‘मी आणि ते’ हा विचार एका मर्यादेपर्यंत बरोबर असला तरी संपूर्ण विश्वाने स्वतःला ‘आम्ही’ म्हणून संबोधले पाहिजे. आपल्या शेजाऱ्यांचे हित हेच आपले हित!
समाधान
एक व्यक्ती म्हणून नैतिकतेच्या मार्गाने आयुष्य व्यतीत करणे म्हणजे इतरांचे नुकसान न करणे आणि शक्य असल्यास मदत करणे. (हे करताना) आपण इतरांचे कल्याण हा आपल्या नैतिकतेचा आधार मानला तर तो नैतिकतेचा व्यापक दृष्टिकोन ठरेल, आपल्या जीवनशैलीमध्ये या घटकांचा विचार केला पाहिजे.
अमेरिकेत सुद्धा गरीब आणि श्रीमंतांमध्ये मोठी दरी आहे. आपण अमेरिकेकडे सर्वात सधन देश म्हणून पाहत असलो तरी तिथेही काही भागात गरिबी आढळते. मी एकदा वॉशिंग्टन डी.सी. अर्थात या सर्वात श्रीमंत देशाच्या राजधानीत असताना अनेक गरीब वस्त्या पाहिल्या. तेथील लोकांच्या प्राथमिक गरजा देखील नीट पूर्ण होत नव्हत्या. त्याचप्रमाणे जागतिक स्तरावर, जगाचा उद्योगप्रधान उत्तर भाग (जगाच्या उरलेल्या भागापेक्षा) जास्त प्रमाणात पुढारलेला आणि सधन आहे. उलटपक्षी, पृथ्वीच्या दक्षिण भागातील अनेक देशात उपासमारीची समस्या आहे. हे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. त्याचबरोबर हा मोठ्या संकटांचा स्रोत आहे. त्यामुळे ठरावीक श्रीमंत देशांनी आपल्या जीवनशैलीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यांनी समाधानी वृत्ती अंगीकारली पाहिजे.
पंधरावर्षांपूर्वी एकदा जपानमध्ये मी तिथल्या लोकांना म्हणालो की, प्रत्येक वर्षी अर्थव्यवस्थेचा विकास झाला पाहिजे आणि भौतिक प्रगती झाली पाहिजे, ही समजूत फार चुकीची आहे. एक दिवस कदाचित तुमची अर्थव्यवस्था अतिशय संकुचित होताना दिसेल. त्यासाठी तुम्हाला तयारीत राहावे लागेल अन्यथा तुमच्या मानसिक स्थितीवर विपरीत परिणाम होईल. काही वर्षानंतर, जपानमध्ये वास्तवात तशी परिस्थिती निर्माण झाली.
काही जणांची जीवनशैली अतिशय विलासी असते. चोरी, शोषण, फसवणूक असे काहीही न करता देखील त्यांच्याकडे भरपूर संपत्ती असते. त्यांच्या स्वहिताच्या दृष्टिकोनातून जर त्यांनी अनैतिक मार्गाने हे धन मिळवले नसेल तर त्यात काहीच गैर नाही. परंतु इतरांच्या हिताच्या दृष्टीने हे चुकीचे नसले तरी नैतिकदृष्ट्या योग्य नाही. कारण त्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. जर सर्वांचेच तसे उच्च राहणीमान असेल तर ठीक आहे, पण तशी वेळ येईपर्यंत समाधानी वृत्ती अंगीकारण्याची जीवनशैलीच योग्य आहे. जपान, युनायटेड स्टेट्स आणि इतर काही संपन्न देशात मला आलेल्या अनुभवानुसार जीवनशैलीत काही बदल होणे गरजेचे आहे.
अनेक देशांमध्ये एकाच कुटुंबासाठी दोन गाड्या, कधीकधी तीन गाड्या असतात. कल्पना करा भारत आणि चीन या दोन देशांची लोकसंख्या एकत्र केली, तर दोन अब्जांपेक्षा जास्त आहे. जर दोन अब्ज लोकांकडे दोन अब्ज गाड्या किंवा त्याहून अधिक गाड्या असतील तर अतिशय कठीण परिस्थिती निर्माण होईल. ती एक मोठी समस्या असेल आणि इतरही अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतील.
पर्यावरणाचा विचार
म्हणूनच नैतिक आयुष्याचा अजून एक पैलू म्हणजे पर्यावरणाचा विचार करणे. उदाहरणार्थ, आपण करत असलेला पाण्याचा वापर! या विषयामध्ये माझेच स्वतःचे अगदी क्षुल्लक का असेना योगदान म्हणजे अनेक वर्षांपासून मी आंघोळीसाठी बाथटबचा वापर न करता शॉवरचा वापर करतो. माझे म्हणणे मूर्खपणाचे वाटू शकते, पण मी दोनवेळा आंघोळ करतो, त्यामुळे दोन्हीवेळी वापरले जाणारे पाण्याचे प्रमाण एकसारखेच असते. विजेच्या वापराबद्दल बोलायचे झाले, तर जेव्हा मी एखाद्या खोलीतून बाहेर जातो तेव्हा आतील दिवे नेहमी बंद करतो. असे करून माझ्यातर्फे पर्यावरणासाठी मी एक छोटेसे योगदान देतो. अशा वेळी वैश्विक उत्तरदायित्वाच्या भावनेमुळे जीवनात एक प्रकारची नैतिकता निर्माण होते.
इतरांची मदत कशी करावी?
दुसऱ्यांची मदत करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. बरेच काही परिस्थितीवर अवलंबून असते. मी जेव्हा सात किंवा आठ वर्षांचा होतो आणि शिकत होतो तेव्हा माझे शिक्षक लिंग रिंपोछे नेहमी एक चाबूक जवळ ठेवत. त्यावेळी मी आणि माझा मोठा भाऊ एकत्र अभ्यास करायचो. खरं म्हणजे दोन चाबूक होते. त्यातला एक पिवळ्या रंगाचा होता. पवित्र चाबूक, परमपूज्य दलाई लामासाठी पवित्र चाबूक! अर्थात पवित्र चाबूक वापरल्याने पवित्र दुखते असे मला अजिबात वाटत नाही. हा उपाय थोडा कठोर वाटू शकतो, पण वास्तविक पाहता तो फारच फायदेशीर आहे.
खरे पाहता एखादे काम फायदेशीर आहे किंवा अपायकारक (हानिकारक) आहे हे त्याच्या प्रेरणेवर अवलंबून असते. इतरांचे दूरगामी कल्याण व्हावे या हेतूने केलेले उपाय हे कधी कठोर असू शकतात तर कधी मृदू असू शकतात. कधीतरी थोडेसे खोटे बोलणेसुद्धा मदत करते. उदाहरणार्थ, एखाद्याचा जवळचा मित्र किंवा आईवडील अतिशय आजारी आहेत किंवा मृत्युच्या दारात आहेत आणि तुम्हाला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, पण तुम्हाला हे देखील माहीत आहे की ही बातमी कळताच तो व्यक्ती अस्वस्थ होऊ शकते आणि परिणामी बेशुद्ध पडू शकते. म्हणून तुम्ही ते बरे आहेत असे त्याला सांगता. तुम्ही जर शंभर टक्के त्याला दुःख होऊ नये या विचाराने असे सांगत असाल, तर ती गोष्ट तुमच्या दृष्टीने अनैतिक असली तरी त्याच्या हिताच्या दृष्टीने अतिशय योग्य आहे.
हिंसात्मक विरुद्ध अहिंसात्मक पद्धती
इतरांना मदत करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? हे सांगणे कठीण आहे. आपल्याकडे परिपक्व विचार हवा, परिस्थितीची व्यवस्थित माहिती हवी आणि वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये वेगवेगळ्या पद्धती वापरण्याची लवचिकता हवी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वयंप्रेरणा : इतरांचे हित व्हावे अशी प्रामाणिक भावना हवी.
उदाहरणार्थ, एखादी पद्धत हिंसात्मक आहे की अहिंसात्मक हे त्यामागील प्रेरणेवर अवलंबून आहे. धादांत खोटे बोलणे जरी हिंसात्मक असेल, पण प्रेरणेच्या दृष्टीने ती इतरांना मदत करण्याची एक पद्धत असू शकते. त्यामुळे त्या दृष्टिकोनानुसार ती अहिंसात्मक पद्धत असेल. उलटपक्षी, एखाद्याचे शोषण करण्याच्या हेतूने आपण त्याला एखादी भेट (वस्तू) दिली तर दिसताना ते अहिंसात्मक वाटेल, पण अखेरीस आपण त्याला फसवून त्याचे शोषण करणार असल्याने ती हिंसात्मक पद्धत ठरणार आहे. म्हणून हिंसात्मक किंवा अहिंसात्मक हे प्रेरणेवर अवलंबून असते. सर्व मानवी कार्ये प्रेरणेवर अवलंबून असतात. अर्थात ती थोड्याफार प्रमाणात एखाद्याचे ध्येय काय आहे यावरसुध्दा अवलंबून असतात. पण आपला उद्देश फक्त आपले ध्येय मिळवण्याचा असेल आणि राग ही आपली प्रेरणा असेल तर मग हे कठीण आहे. त्यामुळे अंतिमतः प्रेरणा ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
धर्मांमधील सुसंवाद
आपल्या चर्चेनंतर तुम्ही इथून काय घेऊन जाणार याबद्दल बोलायचे झाल्यास आंतरिक शांतीचा विकास करण्याचा प्रयत्न हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याचा आपल्याला स्वतःला विचार करायचा आहे आणि कृतीही स्वतःच करायची आहे. याशिवाय श्रोत्यांमध्ये कुणी असे असतील जे एखाद्या धर्माचे पालन करत असतील आणि आस्तिक असतील तर मी नेहमीच धर्मांमधील सुसंवादावर भर देतो. मला वाटते सर्वच महत्त्वाचे धर्म काही गौण धर्म वगळता सूर्य आणि चंद्र यांची पूजा करतात. त्यांचे असे काही विशिष्ट तत्त्वज्ञान नाही, पण अधिक करून सर्व महत्त्वाच्या धर्मांचे तत्त्वज्ञान किंवा ब्रम्हज्ञान समान आहे. त्यांचा धर्म विशिष्ट तत्त्वज्ञानावर आधारलेला असल्यामुळे हजारो वर्षांपासून टिकून आहे. पण तत्त्वज्ञान वेगवेगळे असून देखील सर्व धर्म प्रेम आणि करुणा या गोष्टींचे पालन करण्याला सर्वात जास्त महत्त्व देतात.
करुणेबरोबर क्षमाशील वृत्ती आपोआप येते. त्यापाठोपाठ सहनशीलता आणि समाधानसुद्धा! या तीन गोष्टींमुळे संतोषाची भावना निर्माण होते. या भावना सर्व धर्मांमध्ये समान आहेत. ज्या मानवी मूल्यांबाबत आपण बोलत आहोत, त्यांचा प्रसार होण्यासाठी हे आवश्यक आहे. अशाप्रकारे, सर्वच धर्म नैतिकतेच्या आधारे जगण्यास अर्थात आनंदी जीवन जगण्यासाठी प्रेरणा देऊन मदत करतात. म्हणूनच ज्याअर्थी सर्व धर्म एकच संदेश देतात, त्याअर्थी सर्व धर्मांमध्ये मानवतेची मदत करण्याची समान क्षमता आहे.
वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रकारच्या पद्धती उदयाला आल्या आणि ते आवश्यकसुद्धा होते. या वेगवेगळ्या वेळा, ठिकाणे आणि जगण्याच्या पद्धती पर्यावरणातील फरकांमुळे बदलत गेल्या. त्यामुळे धर्मातही बदल झाले. त्या त्या काळात काही विशिष्ट धार्मिक संकल्पना योग्य होत्या (त्यामुळे त्या राबवल्या गेल्या). त्यामुळेच हजारो वर्षांपासून चालत आलेल्या प्रत्येक धर्माला स्वतःच्या परंपरा आहेत. आपल्याला या संपन्न परंपरांची आवश्यकता आहे. त्या वेगवेगळ्या लोकांच्या गरजा पूर्ण करतात. एकच धर्म सर्वांना लागू होऊ शकत नाही.
बुद्धाच्या काळात भारतामध्ये पूर्वीपासून अनेक परंपरा प्रचलित होत्या, ज्या बौद्ध धर्मापेक्षा वेगळ्या होत्या. (गौतम) बुद्धाने सर्वच भारतीयांचे बौद्ध धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला नाही. इतर धर्म आपापल्या जागी योग्य होते. कधीतरी त्यांच्यात वाद होत असत. विशेषतः बुद्धाच्या पश्चात अनेक शतके वेगवेगळे गुरूंचे एकमेकांशी तार्किक वादविवाद चालत. अशाप्रकारे वादविवाद विशेषतः ज्ञानमीमांसेसाठी अतिशय आवश्यक आहेत. एका परंपरेतील विद्वान दुसऱ्या धर्माच्या तत्त्वज्ञानाचा टीकात्मक अभ्यास करतो यामुळे प्रत्येकजण आपल्या धर्माबद्दल आणि परंपरांबद्दल विचार करतो आणि त्याबद्दल चर्चा करू लागतो. त्यामुळे साहजिकच प्रगती होते. काही घटनांमध्ये अशा चर्चेच्या वेळी हिंसा घडून आली, जे दुर्भाग्यपूर्ण होते. परंतु सामान्यतः हा एक पोषक विकास होता.
अशाप्रकारे भारत धार्मिक सहनशीलतेचे अतिशय चांगले उदाहरण आहे. जिथे ही सहनशीलता एका परंपरेच्या रूपात हजारो वर्षांपासून चालत आली आहे आणि अजूनही जिवंत आहे. इतर देशांसाठी हा एक आदर्श आहे.
पुरातन काळात, माणसे विखुरलेली होती. त्यामुळे सर्व ठीक होते, पण आज परिस्थिती वेगळी आहे. उदाहरणार्थ, लंडन हा आता जवळजवळ बहुधर्मीय समाज आहे, त्यामुळे धार्मिक सहनशीलता अतिशय महत्त्वाची ठरते. त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांची धर्मावर श्रद्धा आहे, त्यांच्यासाठी सद्भावना आणि सहनशीलता आवश्यक आहे. जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा या विषयांत योगदान द्या.