तणावमुक्तीच्या मदतीसाठी बौद्ध विश्लेषण

आज संध्याकाळी सर्वसंगपरित्यागाबद्दल बोलावं, असं मला सांगण्यात आलेलं आहे. आपल्या समस्यांपासून मुक्त व्हायचा निश्चय कसा करायचा आणि या मॉस्कोसारख्या एका मोठ्या शहरात राहत असताना तणावाच्या संदर्भात आपण हे कसं समजून घ्यायचं, याबद्दल मी बोलणं अपेक्षित आहे. पण मला वाटतं, या विषयाचं विश्लेषण करायला सुरुवात केल्यावर तुम्हाला असं आढळेल की, आपल्याला आधुनिक जगामध्ये सामोरं जावं लागणाऱ्या बहुतांश समस्या केवळ मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित नाहीत.

अतिउत्तेजना: तणावाचा एक स्त्रोत

मोठ्या शहरामध्ये अर्थातच प्रदूषण, वर्दळ यांसारख्या गोष्टी असतात, ज्या कदाचित गावात दिसणार नाहीत, पण आपल्या तणावाला केवळ हेच घटक कारणीभूत नसतात. आपण अधिक सखोल पाहायचा प्रयत्न केला, तर आपल्याला असं दिसतं की, कोणी कुठेही राहत असलं तरी, अधिकाधिक गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत, अधिकाधिक निवडीचे पर्याय आहेत, अधिक माहिती, अधिक टीव्ही चॅनल, अधिक चित्रपट, अधिक उत्पादनं, या अधिकाधिक उपलब्धतेमुळे आपल्या समस्या उद्भवतात, असं मला वाटतं. बहुतांश लोकांकडे मोबाइल फोन आहेत, त्यामुळे तुम्हाला ई-मेल येत राहतात, सतत संदेश, चॅट, एक-ना-अनेक गोष्टी येत राहतात. आणि आपण सगळं पाहायला हवं या भावनेचा एक ताण येतो. आपण तत्काळ उत्तर द्यायला हवं, कारण आपण तत्काळ उत्तर देऊ अशी इतर लोकांची अपेक्षा असेल, असं आपल्याला वाटत असतं. या सर्व गोष्टींचे काही लाभ निश्चितपणे आहेत, त्यातून आपण आवश्यक असतं तेव्हा इतरांसोबत जोडलेले राहतो, पण काही वेळा हे खूप जास्त होतं; सतत तेच सुरू राहतं आणि आपण त्यातून अतिशय असुरक्षित होतो. “मला काहीच निसटू द्यायचं नाहीये. ते कदाचित महत्त्वाचं असण्याची शक्यता आहे. मला एकटं पडायचं नाहीये,” ही मानसिकता यामागे असते, हे त्याचं कारण असावं.

त्यामुळे बाहेर काय घडतंय हे सतत तपासायची सक्ती आपण स्वतःवर करत असतो, पण अर्थातच यातून कधीच आपल्याला सुरक्षित असल्यासारखं वाटत नाही, कारण सतत काहीतरी नवीन घडतच असतं, एखादा नवीन संदेश आलेलाच असतो, एखादा नवीन चॅट येतच असतो. आपण काही पाहायचं ठरवलं- समजा, यूट्यबुवर किंवा टीव्हीवर काही पाहायचं ठरवलं- तर इथे मॉस्कोमध्ये किती वाहिन्या उपलब्ध आहेत याची मला कल्पना नाही, पण युरोप आणि अमेरिकेत, शेकडो वाहिन्या आहेत, त्यामुळे एखादी गोष्ट पाहत असताना आपण निवांत राहत नाही, “दुसरीकडे कुठेतरी याहून चांगला कार्यक्रम असेल” असं आपल्याला वाटत राहतं, त्यामुळे “काहीतरी अधिक चांगलं माझ्याकडून निसटत असेल” म्हणून ते पाहण्याची सक्ती सतत होत राहते.

आपल्या आभासी जगामध्ये संमती व स्वीकार मिळावा असा शोध

आपण कुठेही राहत असलो, मोठ्या शहरात किंवा गावात राहत असलो, तरी विशेषतः आपल्या आधुनिक जगामध्ये अशा प्रकारच्या गोष्टींमुळे आपल्यावरील ताण वाढतो, असं मला वाटतं. आपल्याला कोणत्यातरी समाजाचा, कोणत्यातरी मित्रसमूहाचा भाग असायचं असतं; त्यामुळे आपल्याला फेसबुकवर काहीही पोस्ट केलं तरी त्यावर ‘लाइक’ हवे असतात, असं घडल्यावर आपल्याला स्वीकारलं गेलंय आणि आपली दखल घेतली गेलेय असं आपल्याला वाटतं, पण याबद्दल आपण शांत राहू शकत नाही. ‘लाइक’च्या संख्येने आपण कधीच समाधानी होत नाही, आपल्याला सतत अधिक हवं असतं, किंवा “त्यांना खरोखरच हे करायचं होतं का?” ते निव्वळ बटण दाबून सोडून देत असतील, किंवा एखादं यंत्रच बटण दाबत असेल (पैसे देऊनही बरेच ‘लाइक’ मिळवता येतात). तर, एखादा संदेश आल्याचं आपलं फोन सुचवतो, तेव्हा आपण अपेक्षेने उत्तेजित होतो; कदाचित काहीतरी खास असेल असं आपल्याला वाटत राहतं.

आपण फेसबुकवरच्या आपल्या पानावर जातो तेव्हा ही अपेक्षेची उत्तेजना घेऊन जात असतो, आणि “आणखी काही ‘लाइक’ मिळालेत का?” हे पाहतो किंवा मी स्वतःचं वर्णन नेहमी ज्या शब्दाने करतो तो शब्द वापरायचा तर, आपण ‘बातम्यापिपासू’ होऊन जातो, मी सतत बातम्या पाहत राहतो, काही नवीन घडलंय का, काही रोचक घडतंय का, असं मला पाहायचं असतं, कारण मला काहीच हातचं निसटू द्यायचं नसतं.

आपण या प्रश्नाचं अधिक खोलवर विश्लेषण केलं, तर अर्थातच आपल्याला त्याखालील अंतःस्थ भावना सापडेल: “मी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे आजूबाजूला घडणारं सगळं काही मला माहीत असायला हवं. आणि प्रत्येकाला मी आवडायला हवं,” अशी ती भावना असते. मी खूप महत्त्वाचा आहे आणि मला सर्व माहीत असायला हवं, आणि माझी दखल घेतली जायला हवी, असं आपल्याला का वाटतं, याचं सखोल विश्लेषण बौद्ध दृष्टिकोनातून करता येतं. आपण इतके आत्ममग्न का असतो, याचं विश्लेषण करता येईल, पण आज संध्याकाळी मी तितकं खोलात जाऊ इच्छित नाही.

आपल्या परिस्थितीच्या वास्तवापासून पळ काढणं

दुसऱ्या बाजूला, आपल्या भोवतीच्या परिस्थितीने आपल्याला उचंबळून येतं, आणि आपण आपल्या मोबाइल उपकरणामध्ये बघत बसून, किंवा मेट्रोत असताना किंवा चालत असताना संगीत ऐकत राहून, आपण या परिस्थितीपासून पळून जाऊ पाहतो. आपण सतत इअरफोन लावून ठेवतो, आय-पॉड सोबत ठेवतो. तुम्ही विचार केलात, तर यात अतिशय रोचक अंतर्विरोध दिसून येतो. एका बाजूला, आपल्याला सामाजिक गटामध्ये स्वीकार हवा असतो, पण दुसऱ्या बाजूला आपण प्रत्यक्ष समाजामध्ये असतो, तरी आपण सर्वांपासून स्वतःला तोडून घेतो आणि स्वतःच्या फोनवर गेम खेळत राहतो किंवा प्रचंड आवाजात संगीत ऐकत राहतो.

यातून काय उद्भवतं? यातून एकाकीपणा उद्भवतो, नाही का? आपल्याला समाजमान्यता हवी असते; आपण एकाकी असतो, पण आपण स्वीकारले गेलोय, असं आपल्याला कधीच वाटत नाही. दुसऱ्या बाजूला, आपण स्वतःला आजूबाजूच्या परिस्थितीपासून तोडून घेतो आणि आभासी जगामध्ये पळ काढतो, तेही अतिशय एकाकीच असतं, नाही का?

आपलं मनोरंजन होणं गरजेचं आहे, याचीही आपल्याला सक्ती वाटत असते; काहीच घडत नाहीये असा क्षणही असू नयेसं आपल्याला वाटतं. हाही पुन्हा एक अंतर्विरोधच आहे- एका बाजूला, आपण शांततेसाठी आसुसलेले असतो, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पोकळीची, माहितीच्या अभावाची किंवा संगीताच्या अभावाची भीती वाटत असते.

मेट्रोमध्ये असताना किंवा इतरही कुठे असताना, आपल्याला काहीही करून बाह्य जगाच्या तणावापासून मुक्त व्हायचं असतं, त्यामुळे आपण स्वतःच्या फोनमधल्या इंटरनेटवरील छोट्याशा आभासी जगामध्ये पळून जातो, परंतु तिथेही आपण मित्रांच्या संमतीची वाट पाहत असतो, आपल्याला कधीही सुरक्षित वाटत नाही. याचा आपण विचार करणं गरजेचं आहे: मोबाइल फोनच्या अवकाशात पळून आसरा शोधणं हा तणावाच्या समस्येवरचा उपाय आहे का? आपण मोठ्या शहरात राहत असलो किंवा कुठेही राहत असलो, तरी हा उपाय आहे का?

नकारात्मक सवयी ओळखणं आणि मुक्त होण्यासाठीचा निश्चय विकसित करणं

आपण या सवयीचे गुलाम झालेले असतो तेव्हा अनुभवायला येणारं दुःख आपण ओळखणं गरजेचं आहे आणि त्याचे स्त्रोतही ओळखायला हवेत. आपण या सवयींमध्ये का अडकून पडलो?

त्यानंतर आपण या दुःखापासून मुक्त होण्याचा निश्चय विकसित करायला हवा. दुःखाच्या स्त्रोतापासून स्वतःला मुक्त करण्याच्या पद्धती जाणून घेऊन आणि त्यांच्या परिणामकारकतेबद्दल आत्मविश्वास बाळगून आपण हा निश्चय पुढे न्यायला हवा. पण हे दुःख दूर करणं याचा अर्थ असा नव्हे की, आपण काहीच न वाटण्याच्या स्थितीत जाऊन पडावं किंवा मृतावस्थेत शहरभर झोम्बीसारखं भटकावं. सुख म्हणजे केवळ दुःखाची अनुपस्थिती नव्हे; तटस्थतेमध्ये काहीतरी भर घालून सुख निर्माण होतं, ही एक शांत भावना असते. आपण भावनारहित होण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं नाही.

त्यामुळे आपल्याला अनुभवावं लागणारं दुःख व ताण यांचा स्त्रोत बाहेरच्या वस्तू व परिस्थिती यांमध्ये नाही, हे आपण ओळखणं गरजेचं आहे. तसं असतं, तर प्रत्येकाला सारखेच अनुभव यायला हवेत.

आणि इथली समस्या इंटरनेट ही नाही, किंवा मोबाइल उपकरणांचीदेखील ही समस्या नाही. योग्यरित्या वापर केल्यास या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अर्थातच अतिशय मदतीच्या ठरतात. पण त्याबद्दलची आपली प्रवृत्ती, आणि त्यातून उद्भवणाऱ्या व दृढमूल होणाऱ्या भावना ही समस्या आहे. इंटरनेटचं हे विलक्षण जग आपण प्रत्यक्षात कसं हाताळतो आणि आपल्या जीवनातील परिस्थिती कशा हाताळतो, याचा संबंध प्रस्तुत समस्येशी असतो.

आपल्याला अनेकानेक आत्मघातकी सवयी असतात, आणि त्यातील प्रत्येक सवय कोणत्यातरी अस्वस्थकारक मनोवस्थेतून निर्माण झालेली असते- असुरक्षितता असो, स्वीकार मिळत नसल्याची भीती असो, किंवा आपण एकटे पडू याची भीती असो, किंवा सक्ती असो- अशा विविध प्रकारच्या मनोवस्था याला कारणीभूत असतात. परंतु, यावर मात करण्यासाठी आपण ज्या व्यूहरचना अंमलात आणू पाहतो- उदाहरणार्थ, समाजमाध्यमांच्या विश्वात पळून जाणं, इत्यादी- त्या आपल्यावरचा तणाव वाढवतात; हे एक प्रतिक्रियांचं चक्र असतं. “लोकांना मी आवडेन का?” याबद्दल आपण चिंताग्रस्त होतो आणि कधीच सक्षम होत नाही.

पौगंडावयीन मुलांच्या बाबतीत ही परिस्थिती आणखी वाईट असते, आणि इंटरनेटवरील छळवणूकदेखील अशीच हीन पातळीवरची आहे. आपल्याला ‘लाइक’ मिळतात आणि प्रत्येक जण आपल्याला किती ‘लाइक’ मिळालेत ते बघतो, एवढंच हे नसतं, तर आपली छळवणूकदेखील होते, मग सगळे तेसुद्धा बघत राहतात. हे भयानक आहे, नाही का?

लोक समाजमाध्यमांवर छायाचित्र प्रसिद्ध करतात, चांगला वेळ घालवल्याचं दाखवणारी ही छायाचित्रं असतात, हो ना? कधी वेळ वाईट जातो त्याची छायाचित्रं ते प्रसिद्ध करत नाहीत. त्यामुळे तुमचे सर्व मित्रमैत्रिणी चांगला वेळ घालवत असल्याचं तुम्हाला दिसतं, आणि आपण बिचारे आपल्या खोलीत बसून फोनवर एकट्याने हे सगळं पाहत असतो. ही काही फारशी आनंदी मनस्थिती नसते, हो ना?

या सगळ्या समाजमाध्यमांचं काय चाललंय, त्याबद्दल आपण थोडी वास्तववादी प्रवृत्ती बाळगायला हवी. फेसबुकवरच्या तुमच्या पानावर अतिप्रचंड ‘लाइक’ आल्याने काही तुम्हाला सुरक्षित वाटणार नाही, ती क्षमता त्यामध्ये नसते. किंबहुना त्या उलट असतं. आपण भाबडे असतो, ‘लाइक’ने खूप फरक पडतो असं आपल्याला वाटतं, आणि अधिकाधिक ‘लाइक’ मिळावेत यासाठी आपण आसुसलेले असतो- हाव कधीच पुरेशी ठरत नाही- आणि अधिकाधिक ‘लाइक’ आलेत का हे सतत तपासण्यामुळे असुरक्षितता येते.

माझ्या संकेतस्थळाबाबत माझं असं होतं, हे मला कबूल करायला हवं; किती लोकांनी आज संकेतस्थळाला भेट दिली हे बघण्यासाठी मी सतत स्टॅटिस्टिक्स तपासत असतो. हे तसंच आहे. आपला किती तोटा झाला हे पाहण्यासाठी रोज चलन विनिमयाचा दर तपासत राहणं, हेही तसंच. आपल्याला कधीच मनःशांती लाभत नाही (हशा). किंवा कम्प्युटर गेमच्या आभासी जगामध्ये आपण पळून जाऊ शकतो आणि आपल्या समस्या निघून जातील, असा विचार आपण भाबडेपणाने करतो. बरीच व्होडका पिऊन समस्या निघून जातील, असा विचार करण्यासारखाच हा प्रकार आहे.

या विशिष्ट सवयीचा विचार केला, तर ती अतिशय आत्मघातकी असल्याचं आपल्या लक्षात येतं आणि जीवनातील दबाव व ताण हाताळण्याचे आपले प्रयत्न अधिक समस्याच निर्माण करत जातात.

आपली परिस्थिती परिणामकारकरित्या हाताळण्यासाठी भेदक्षम जागरूकतेची गरज

या सवयींवर मात करण्यासाठी आपल्याला परिस्थितींसंदर्भात भेदक्षम जागरूकता असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, एखादी जास्त कामाची नोकरी असेल, तर आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं, हे वास्तव आहे. आपल्याला ते वास्तव स्वीकारावं लागतं. आणि आपण शक्य तेवढी उत्तम कामगिरी करत राहायची. आपण ते वास्तव स्वीकारलं, तर त्यातून आपली नोकरी म्हणजे प्रचंड छळ आहे आणि “मी पुरेसा चांगला नाहीये”, असं वाटून घेणं आपल्याला थांबवता येतं.

आपण परिपूर्ण असायला हवं, असं आपल्याला वाटत असतं, ही समस्या आहे. आपण बुद्ध होत नाही तोवर आपल्यापैकी कोणीच परिपूर्ण नसतं. आणि आपण परिपूर्ण असायला हवं, असं आपल्या वरिष्ठांना वाटत असलं, आणि तो आपल्यावर परिपूर्ण असण्यासाठी दबाव आणत असला, तरी असं परिपूर्ण होणं अशक्य असतं हे वास्तव आहे. ते अशक्य असेल, तर मग आपण भिंतीवर डोकं आपटून का घेत आहोत, अशक्य असलेलं काहीतरी करता न आल्याबद्दल अपराधी वाटून का घेत आहोत?

आपण आपल्याला शक्य असेल तितकी उत्तम कामगिरी करावी, प्राधान्यक्रम ठरवावा आणि परिस्थितीचं वास्तव स्वीकारावं. आणि त्यानंतर आपण एकाग्रता टिकवायचा प्रयत्न करावा; आपल्या समोरच्या परिस्थितीच्या वास्तवाविषयी सजग राहावं, त्याबद्दल अवाजवी अंदाज बांधू नये- “ते अशक्य आहे”- किंवा त्याला कमीही लेखू नये- “मी माझ्या फोनमध्ये आसरा घेतो आणि गेम खेळतो किंवा सर्फिंग करतो, म्हणजे परिस्थिती निघून जाईल.”

आपण त्या परिस्थितीला सामोरं जायला हवं. आपण कामाला सामोरं जायला हवं. आपण तिला कमी लेखलं, तर आपण तिला सामोरं जायची गरज नाही, असं आपल्याला वाटतं. उदाहरणार्थ, तुम्हाला एक काम दिलेलं असेल आणि तुम्हाला ते करावंसं वाटत नसेल, तर तुम्ही काय करता? ते करून टाकावं अशी शिस्त तुमच्यात आहे का? की, तुम्ही चटकन फोन सुरू करून सर्फिंग करायला लागता, आणि “बहुतेक काहीतरी नवीन मेसेज आलाय, किंवा कोणीतरी काहीतरी इंटरेस्टिंग पोस्ट केलं असेल” असं म्हणता? आपल्याला विशिष्ट काम दिलेलं आहे, या वास्तवाला कमी लेखण्याचा हा प्रकार आहे. मुक्त होण्याच्या निश्चयाशी या सगळ्याचा संबंध असतो. आपल्याला नक्की कशामुळे समस्यांना सामोरं जावं लागतं आहे, हे ओळखण्याचा प्रयत्न करावा लागतो.

याला कसं सामोरं जायचं?

पल्या संप्रेरकांच्या प्रतिसादांवर कृतींचा परिणाम कसा होतो, हे समजून घेणं

आपण स्वयंशिस्तीने सुरुवात करावी, आणि छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरू करावं. आपण तणाव ज्या रितीने हाताळतोय ते कशा प्रकारे पुढे जातंय हे आपण समजून घेऊ शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तरी संप्रेरकांच्या (हार्मोन) संदर्भात हे तपासता येतं. यातून आपल्याला पूर्णतः निराळी मर्मदृष्टी मिळते, आणि बौद्ध धर्मात जे काही सांगितलंय त्याला चांगल्यापैकी वैज्ञानिक आधार लाभतो.

कॉर्टिसॉल व डोपमाइन संप्रेरकं

तुम्हाला तणावाखाली असल्यासारखं वाटतं तेव्हा संप्रेरकांच्या पातळीवर काय होतं असतं, तर आपली कॉर्टिसॉल संप्रेरकाची पातळी वाढलेली असते. कॉर्टिसॉल हे तणावाचं संप्रेरक आहे, त्यामुळे आपण काही आराम मिळवायचा प्रयत्न करतो. यावरची आपली व्यूहरचना काय असते, आपल्या शरीरातलं कॉर्टिसॉल बाहेर गेलं की आपल्याला सुख लाभेल असा विचार आपण करतो. मी सिगरेट पितो, त्याने आराम पडेल; किंवा मी इंटरनेटवर सर्फिंग करतो, समाजमाध्यमांवर फेरफटका मारतो, तिथे काहीतरी रोचक सापडलं तर हा तणाव कमी होईल, असं आपल्याला वाटतं. पण यातून आपल्याला चांगलं वाटेल या अपेक्षेच्या उत्तेजनेमुळे व आनंदामुळे आपल्या शरीरातील डोपमाइन संप्रेरकाची पातळी वाढते. डोपमाइन हे काहीतरी लाभदायक होणार आहे या अपेक्षेशी निगडीत संप्रेरक आहे; एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्याचा पाठलाग करतो तेव्हा त्या प्राण्याची भावना हीच असते; तो एका अपेक्षेने धावत असतो. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटायला जाता तेव्हा असंच काहीसं होत असतं, हे चटकन ओळखता येईल. ही भेट किती सुंदर होईल, या अपेक्षेने डोपमाइनची पातळी खूप वाढलेली असते. पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीसोबत असतानाचा अनुभव अजिबातच चांगला नसण्याचीही शक्यता असते, पण अपेक्षेमुळे आपल्या शरीरातील डोपमाइनवर आधारित सुखाची पातळी वाढलेली असते; हीच संप्रेरकांची कामगिरी असते.

आपण अतिशय जैविक जीव आहोत. पण सिगरेट ओढल्यावर, किंवा इंटरनेटवर फेरफटका मारल्यावर, त्यातून समाधान मिळत नाही, त्यामुळे आपला तणाव परत येतो. ही फारशी चांगली व्यूहरचना नाही.

त्यामुळे सिगरेटने समस्या सुटेल या आपल्या गैरसमजुतीवर विश्वास ठेवण्यातील तोटे वेगळे काढणं गरजेचं असतं. बातम्यांमध्ये काहीतरी रोचक शोधत राहणं, किंवा फेसबुक पानावर काहीतरी रोचक शोधत राहणं, याने माझी तणावाची समस्या सुटणार नाही, हे भेदजन्य जागरूकतेद्वारे समजून घ्यायला हवं.

पुढील नकारात्मक सवयींच्या प्रतिसादांपासून दूर राहावं

तर, आपण सिगारेटींमध्ये आसरा शोधणं थांबवतो. आणि सिगरेट ओढणं हा एक निराळाच प्रांत आहे: म्हणजे सिगरेट ओढल्याने काही फायदा होतो का? नाही, काहीच नाही. पण इंटरनेट वापरासंबंधी, व समाजमाध्यमांच्या वापरासंबंधी, सतत संदेश तपासत राहण्यावर आपण नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, ते सतत उघडत राहायला नको. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, इंटरनेटला आपण आसरा असल्याप्रमाणे वापरू नये. आपल्याला तिकडे पळ काढता येईल, असं मानणं थांबवायला हवं. लाभदायक उद्देशाने त्याचा वापर करावा, इंटरनेटला पूर्ण करणं शक्यच नाही अशा उद्देशांसाठी त्याचा वापर करू नये.

आणि हे अर्थातच खूप खूप अवघड असतं. आपल्याला कंटाळा आलेला असतो, तेव्हा कामाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये आपल्याला न आवडणारं काहीतरी आपल्या समोर असतं, अशा वेळी फोनमध्ये काहीतरी पाहण्याची अनिवार्य ओढ निर्माण होते. पण शारीरिक लठ्ठपणा कमी करण्यासाठी अन्नाविषयी पथ्य पाळणं गरजेचं असतं, तसंच मानसिक लठ्ठपणापासून मुक्ततेसाठी माहितीविषयक पथ्य पाळणं गरजेचं असतं. आपण किती माहिती, संदेश, संगीत, इत्यादी ग्रहण करतोय, यावर अन्नग्रहणासारखीच मर्यादा घालणं आवश्यक आहे.

आपल्या जुन्या आत्मघातकी सवयी सोडून देताना सुरुवातीला आपल्या तणावाशी निगडीत कॉर्टिसॉलची पातळी वाढेल. कारण, जुन्या सवयी, खूप, खूप बळकट असतात. त्यामुळे सिगरेट सोडताना किंवा दारू किंवा अंमली पदार्थ ग्रहण करण्याचं सोडताना ज्याप्रमाणे भयंकर लक्षणं दिसतात- कॉर्टिसॉल तणाव संप्रेरक- तसंच इंटरनेट किंवा समाजमाध्यमं किंवा संगीत यापासून तुम्ही विराम घेत असाल, तर त्या सोडण्याचाही ताण येतो. हे निर्विषीकरणासारखं (डिटॉक्स) असतं; सतत आय-पॉडला जोडलेले इअरफोन लावून ठेवलेल्या अवस्थेचं व्यसन जडलेल्या लोकांनी संगीताच्या संदर्भात निर्विषीकरणाची प्रक्रिया कशी सुरू केली याचं वर्णन दिलं आहे. आधी त्यांच्या डोक्यात सतत संगीत वाजत असायचं. ते शांत होण्यासाठी दीर्घ काळ जावा लागतो. ही खूप चांगली प्रतिमा आहे, असं मला वाटतं; डोक्यातील संगीताने लठ्ठपणा येत जाणं... अरे, हां, हेच, असं आपल्या लक्षात येतं.

आपल्याला कशाचा विचार करता येत नाही, त्यामुळे कृती करता येत नाही, कारण सगळीकडे संगीतच सुरू असतं. विशेषतः विशिष्टच गाणी परत-परत ऐकली जात असतील, तर त्यातून आपल्याला वेड लागण्याची वेळ येते. हे सोडताना तणावाची पातळी वाढत असली, तरी नंतर ती निवळते, आणि मग मनःशांतीचा अनुभव येतो. त्यानंतर आपण नकारात्मक सवयी बदलून सकारात्मक लावण्याच्या अवस्थेत येतो.

इथे आपल्याला काही खरोखरच चांगल्या बौद्ध पद्धती उपयोगी पडतात, त्या केवळ बौद्धांपुरत्याच मर्यादित नाहीत: उदाहरणार्थ, आपण सर्व मानवतेचा भाग आहोत आणि आपण परस्परांशी संबंधित आहोत, आपलं कल्याण इतर प्रत्येकावर अवलंबून आहे, हे समजून घेतलं तर इतरांशी जोडून घेण्याच्या किंवा त्यांच्याशी अनुबंध जोडण्याच्या आपल्या गरजेची पूर्तता करण्याचे अधिक स्थिर मार्ग आपल्याला शोधता येतात; असं इंटरनेटवरच्या सामाजिक जाळ्यातून होतंच नाही.

ऑक्सिटॉसिन संप्रेरक

यासाठीचं संप्रेरक ऑक्सिटॉसिन म्हणून ओळखलं जातं. ऑक्सिटॉसिन हे अनुबंधाचं संप्रेरक आहे- आईचे बालकांसोबत असलेले अनुबंध, इत्यादी. एकमेकांसोबत अनुबंध निर्माण करण्याच्या, कोणत्या तरी गटाचा भाग असल्याची आश्वस्तता मिळवण्याच्या आपल्या गरजेला हे संप्रेरक चालना देतं. आपण एका मानवतेचा भाग आहोत, आपण सर्व समान आहोत, प्रत्येकाला सुखी व्हायचं आहे, कोणालाही दुःखी व्हायचं नाही, हे जाणवून घेऊन सकारात्मक रितीने या गरजेची पूर्तता करता येते. अशा प्रकारचा मार्ग समाजमाध्यमांमध्ये सहभागी होण्यापेक्षा, तिथल्या ‘लाइक’वर अवलंबून राहण्यापेक्षा अधिक स्थिर आहे.

संप्रेरकांविषयीची ही माहिती मी विशिष्ट कारणासाठी नोंदवली हे. परम पूजनीय दलाई लामा अनेकदा म्हणतात की, आपल्याला एकविसाव्या शतकातील बौद्धांची गरज आहे, त्याचा अर्थ असा की, बौद्ध शिकवणूक व विज्ञान यांच्यात पूल बांधला जायला हवा, जेणेकरून बौद्ध शिकवणुकींमधील अनेक गोष्टी विज्ञानाशी सुसंवादी असल्याचे स्पष्ट होईल. त्यामुळे दलाई लामा अनेकदा मन व जीवन अशा सूत्रावर परिषदा घेत असतात, तिथे ते वैज्ञानिकांना भेटतात, या दोन प्रवाहांमधल्या सामायिक समजुतीच्या गोष्टी कोणत्या याचा विचार करतात, आणि जीवनाचं अधिक पूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी दोन्ही बाजू एकमेकांना कशी मदत करू शकतील यावरही चर्चा करतात.

आपल्याला अतिशय शारीरिक जैविक पातळीवर सुखी वाटतं, बरं वाटतं. हे वाटणं आपल्या शरीरातल्या विशिष्ट संप्रेरकांवर आधारलेलं असतं, हे आपण समजून घेतलं, तर आपल्या इच्छांच्या पूर्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यूहरचनांचं विश्लेषण आपल्याला करता येईल, आणि ते परिणामकारक ठरलं नाही, तर त्यावर सकारात्मक, विना-आत्मघातकी रितीने उपकारक ठरणाऱ्या व्यूहरचना शोधता येतील.

डोपमाइन, अपेक्षेचं संप्रेरक आणि रचनात्मक ध्येय ठेवणं

आपण डोपमाइनबद्दल बोलत होतो. हे संप्रेरक लाभाची अपेक्षा धरणारं आहे. त्याने आपण अतिशय उत्तेजित होतो, हरीण खाण्यासाठी त्याचा पाठलाग करणाऱ्या सिंहासारखी आपली स्थिती होते. तर, या डोपमाइनच्या आविष्काराचा लाभ घेण्यासाठी काही विघातक मार्ग आपल्याकडे आहेत, उदाहरणार्थ, आपल्या फेसबुक पानावर अधिकाधिक ‘लाइक’ मिळतील अशी अपेक्षा ठेवत राहायचं- पण याचा काही परिणाम होत नाही.

किंवा या संप्रेरकाचं समाधान करण्याचे तटस्थ मार्ग शोधायचा प्रयत्न आपण करू शकतो. माझा एक मित्र वेटलिफ्टर आहे. तर, तो १८० किलो वजन उचलू शकेल अशी त्याची अपेक्षा असते, आणि मग २०० किलो वजन उचलता येईल अशी त्याची अपेक्षा असते. तो खूप उत्साहात असतो, या लाभाच्या अपेक्षेने तो अतिशय सुखी होतो. पण तरीही, त्याला २०० किलो वजन उचलता आलं, तरी आपण बौद्ध म्हणून, अतिशय दोषैकदृष्टीने असं म्हणू की, याने त्याला चांगला पुनर्जन्म मिळणार आहे का? दोनशे किलो वजन उचलल्याने त्याला चांगला पुनर्जन्म मिळणार आहे का; त्याचं याने समाधान होणार नाही, त्याला २१० किलो वजन उचलावंसं वाटू लागेल.

पण आपण डोपमाइन संप्रेरकाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला, त्यातून शमथ, परिपूर्ण एकाग्रता, किंवा संयम साधण्याचा प्रयत्न केला, आपल्या संतापावर मात करण्याचा प्रयत्न केला, तर हे खूप उत्साहवर्धक होतं. व्यथित होण्याऐवजी, “मी पुरेशी चांगली नाही, मला हे करता येणार नाही” असं वाटून घेण्यापेक्षा, तुम्ही प्रयत्न सुरू करू शकता, आणि “हे एक आव्हान आहे, या आव्हानाला सामोरं जाण्यात मला अतिशय सुख लाभतं” असं मानून तुम्ही कामाला लागू शकता.

कोणतीही अपेक्षा किंवा निराशा मनात न आणता हे करायचा प्रयत्न व्हायला हवा- हे साधनेविषयीच्या सूचनांमध्ये लिहिलेलं असतं. आपल्याला तत्काळ परिणाम दिसेल अशी अपेक्षा ठेवली की आपण नक्कीच निराश होतो. त्यामुळे अपेक्षेविना आपण ध्येयाच्या दिशेने काम करत राहावे. आणि ध्येयाच्या, विशेषतः अर्थपूर्ण ध्येयाच्या दिशेने काम करत राहणं हा सुखाचा स्त्रोत ठरतो. आपल्याला अशा वेळी वाटणाऱ्या सुखाचा आधार जिवक इसतो, त्यामुळे वैज्ञानिक पद्धतींशी हे अगदी तंतोतंत सुसंगत असतं: हाच एकविसाव्या शतकातला बौद्ध धर्म. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, बौद्ध पद्धती कशा व का परिणामकारक आहेत हे वैज्ञानिकांना स्वीकारता येतील अशा रितीने स्पष्ट करून सांगावं. हा यामागचा उद्देश आहे.

तीन उच्च शिकवण्या: स्वयंशिस्त, एकाग्रता व भेदक्षम जागरूकता

थोडक्यात, मुक्त होण्याचा निश्चय आपण विकसित करणं गरजेचं आहे, याला बौद्ध धर्मात सर्वसंगपरित्याग असं म्हणतात. आपल्या जुनाट नकारात्मक सवयींपासून स्वतःला मुक्त करण्यासाठी आपण स्वयंशिस्त, एकाग्रता व भेदक्षम जागरूकता यांमध्ये स्वतःला प्रशिक्षित करायला हवं. काय उपकारक आहे व काय अपायकारक आहे, काय परिणामकारक आहे व काय अपरिणामकारक आहे, यांमध्ये भेद करून त्यावर लक्ष एकाग्र करणं, आणि त्यानुसार आपल्या वर्तनामध्ये दुरुस्ती करण्यासाठी स्वयंशिस्त बाळगणं, यासाठीचं हे प्रशिक्षण असेल.

स्वयंशिस्तीमधील अडथळा: खेद

या तीन गोष्टी एकमेकांशी सुसंवादी रितीने कार्यरत होणं गरजेचं असतं, पण त्यांचा योग्य विकास होण्यासाठी त्यामध्ये अडथळे आणणारे घटक आपल्याला दूर करावे लागतात. खेदामुळे आपल्या स्वयंशिस्तीला बाधा येते. उदाहरणार्थ, आपण इंटरनेटवर फेरफटका मारला नाही किंवा एखाद्या मेसेजला अथवा ई-मेलला तत्काळ उत्तर दिलं नाही, याचा आपल्याला खेद वाटतो. त्यामुळे दिवसाचे ठरावीक तासच इंटरनेट वापरण्याच्या आपल्या स्वयंशिस्तीला अशा खेदामुळे बाधा पोचते.

आपल्या संगणकावरील किंवा मोबाइलवरील नोटिफिकेशनचा- “यू हॅव गॉट मेल”- गजर किंवा संकेताची खूण बंदच करून ठेवणं आणि दिवसाच्या ठरावीक वेळांमध्येच इंटरनेटवर जाणं, ही मदतीला येणारी व्यूहरचना आहे. केवळ महत्त्वाच्या संदेशांना वाचल्याक्षणी उत्तर द्यावं, तर आपल्याला स्वयंशिस्त गरजेची असते. ज्या संदेशांना नंतर उत्तर देऊन चालेल त्यांना नंतर उत्तर द्यावं, आपण कमी कामात असू तेव्हासाठीचे प्रश्न प्रलंबित ठेवावेत, किंवा दिवसाचा विशिष्ट वेळ तुम्ही संदेशांना उत्तर देण्यासाठी राखून ठेवू शकता, यासाठी स्वयंशिस्त गरजेची आहे.

या संदर्भात मीदेखील बऱ्यापैकी अपराधी आहे, हे मला कबूल करायला हवं. त्यामुळे मी ई-मेलचा प्रवाह हाताळण्याबाबत एक व्यूहरचना स्वीकारली आहे. मी समाजमाध्यमं वापरत नाही, त्यामुळे तसे काही संदेश मला मिळत नाहीत, पण दिवसाला माझ्याकडे किमान तीस किंवा अधिक ई-मेल येतात. त्यांना तत्काळ उत्तर देण्याच्या नादात काहीच काम होणार नाही, असं होऊ नये यासाठी मी ई-मेल चेक करतो, पण खरोखरच्या महत्त्वाच्या असतील त्यांनाच उत्तरं देतो, आणि इतरांना खुणा करून ठेवतो. संध्याकाळी माझं मन स्वच्छ असेल, अधिक महत्त्वाच्या गोष्टी लिहिणं किंवा करणं शक्य असेल, तेव्हा मी त्या ई-मेलना उत्तरं देतो. तर, अशा प्रकारे विशिष्ट वेळ राखून ठेवावा. अन्यथा आपली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते.

एकाग्रतेमधील अडथळे: झोपाळूपणा, मानसिक औदासिन्य व चंचलपणा

झोपाळूपणा, मानसिक औदासिन्य व चंचलपणा याने आपल्या एकाग्रतेमध्ये अडथळा निर्माण होतो. सतत संदेश तपासण्यापासून दूर राहिल्याने आपले जीवन कमी गुंतागुंतीचे होईल, या वस्तुस्थितीसंदर्भातील आपली जागरूकता या घटकांमुळे गमावली जाते. लक्ष एकाग्र करण्यासाठी आपण जागरूकता म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे.

उदाहरणार्थ, बहुतांश संदेशांना संध्याकाळी- किंवा मी त्यासाठी राखीव ठेवलेल्या वेळी- उत्तर दिलं जाणार आहे, ही वस्तुस्थिती मी स्वीकारली, तर मला कमी तणावग्रस्त, कमी दबावग्रस्त असल्यासारखं वाटेल, हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. अशा वेळी आपल्याला झोप येते, आपण थकलेलो असतो आणि विसरून जातो, असे अडथळे निर्माण हातात. आपण सहजपणे फेसबुक पानावर जातो. किंवा आपल्याला औदासिन्य आलं असेल, तर पाणी किंवा दुसरं काही पिऊन येण्याऐवजी आपण इंटरनेटवर जातो. किंवा चंचलपणा असेल, तर माझं मन सर्वत्र भटकत राहतं, हे होतंय, ते होतंय, असं सुरू राहतं, आणि विचारही न करता आपण संदेशाला उत्तर देतो. “मला काहीच निसटू द्यायचं नसतं”, असा याचा अर्थ आपण काढतो.

भेदक्षम जागरूकतेमधील अडथळे: अनिर्णितावस्थेत हेलकावणं व साशंकता

अनिर्णित हेलकावे खात राहिल्याने आपल्या भेदक्षम जागरूकतेमध्ये अडथळा येतो. एका विशिष्ट वेळीच आपले संदेश तपासण्याबाबत आपण सतत हेलकावत राहतो- “हा निर्णय योग्य होता का?”. स्वतःविषयी आपल्याला अनिश्चिती, साशंकता वाटते.

संदेश तपासण्यापासून दूर राहणं अवघड व तणावदायक असतं, त्यामुळे साशंकता उद्भवतात. या साशंकता हाताळण्यासाठी आपण स्वतःच्या सवयी बदलण्याचे लाभ कोणते आहेत याची आठवण स्वतःला करून देणं गरजेचं आहे. याने आपलं जीवन कमी विखंडीत होईल. मी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं आणि योग्य क्रमाने गोष्टी हाताळत गेलो, तर त्याला एक योग्य रचना राहील. अन्यथा अनागोंदी निर्माण होईल, आणि अनागोंदी तणावदायक असते.

समतोलता व सहानुभूती

आपलं जीवन अधिक सुखी करण्यासाठी आपण इतरही काही व्यूहरचना स्वीकारू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या गर्दीने भरलेल्या मेट्रो ट्रेनमध्ये असण्याची स्थिती कशी हाताळायची. आपण स्वतःवर जितकं अधिक लक्ष केंद्रित करू तितकं आपल्याला स्वतःचं संरक्षण करायची गरज वाटत जाते आणि आपण स्वतःच्या मोबाइल फोनमध्ये पळ काढतो, आपल्याला अधिक बंदिस्त वाटू लागतं. मेट्रोमधून दूरवरचा प्रवास करत असताना एखादं पुस्तक वाचून स्वतःचा वेळ शांतपणे वापरला जातो, अशा परिस्थितीबद्दल मी बोलत नाहीये. आपण स्वतःचा मोबाइल, त्यातलं संगीत किंवा गेम यांमध्ये आसरा शोधतो, त्याबद्दल मी बोलतो आहे. आपण स्वतःवर जितकं अधिकाधिक लक्ष केंद्रित करू तितकी आपल्याला स्वतःच्या संरक्षणाची गरज भासेल, आणि आपण मोबाइल फोनमध्ये पळ काढू, आपल्याला अधिक बंदिस्त वाटेल, त्याने आपली ऊर्जा दाबली जाते आणि आपल्याला आणखी तणावग्रस्त वाटतं. आपण निवांत राहत नाही, कारण आपल्याला धोक्याची टांगती तलवार जाणवत असते, विशेषतः इथे मॉस्कोमध्ये मेट्रो प्रचंड गर्दीने भरलेल्या असतात. बर्लिनमध्ये इतकी गर्दी नसते.

आपण स्वतःच्या मोबाइलवर खेळत असलेल्या गेममध्ये पूर्णतः गुंतून गेलो, किंवा आयपॉडवर आपण मोठ्यांदा संगीत ऐकत असलो, तर त्याने आपल्या भोवती आपण स्वतःच एक भिंत उभारल्यासारखं होतं. आपल्याला अडथळा नको असतो, त्यामुळे आपण बचावात्मक होतो. हे मनोरंजनाचे प्रयत्न असले, तरी हा अतिशय अप्रिय अनुभव असतो. आपण शांत राहत नाही.

दुसऱ्या बाजूला, मेट्रोमधील लोकांच्या संपूर्ण गर्दीचा भाग म्हणून आपण स्वतःकडे पाहिलं, आणि आपल्यासारख्याच परिस्थितीत असलेल्या प्रत्येकाबद्दल आस्था व सहानुभूती विकसित केली, तर आपली मनं व हृदयं खुली होतात. आपण धोक्याबाबत सतर्क राहावंच, पण केवळ स्वतःवर लक्ष केंद्रित करून भयग्रस्त होऊ नये. प्रत्येकाने सुरक्षित राहावं अशी आपली इच्छा असते. संगीताने किंवा गेममध्ये पळ काढून इतरांना बुडवून टाकण्याचा प्रयत्न आपण करत नाही. यातून आपणच दुरावतो. आपल्याला स्वतःला दुरावायचं नसतं.

प्रत्येकाबाबत खुलेपणा वाटणं

प्रत्येकाबाबत खुलेपणा वाटणं अतिशय उपकारक ठरतं, पण खुलं राहणंही अतिशय नाजूक असतं. स्वतःच्या आत असलेल्या ठोस मीपणाला धरूनच तुम्ही खुले झालात, तर खुलं होण्याने असुरक्षिताही येते, आपल्याला इजा होऊ शकते, ही भावनादेखील कायम राहते. अशा प्रकारे हे प्रयत्न करू नयेत. प्रत्येकाविषयी विचार करण्याइतका खुलेपणा आला, तर एका बाजूला, एखाद्या कळपाचा भाग असण्याच्या प्राणी-प्रवृत्तीचं समाधान होतं. कळपापासून स्वतःला तोडून घेण्यापेक्षा कळपाचा भाग असल्याने आपल्याला सुरक्षित वाटतं. त्यामुळे प्राण्यांच्या पातळीवर हे परिणामकारक ठरतं. पण माझ्या आत भिंतीआड असलेल्या या घनरूप मीपणाची विरचना करण्याबाबतही आपण काळजी बाळगायला हवी.. “आता प्रत्येक जण माझ्यावर हल्ला करणार आहे.”

ही अतिशय नाजूक प्रक्रिया असते, पण ती केल्यास आपल्याला अतिशय उपकारक ठरते. हे करण्यासाठी आपण स्वयंशिस्त, एकाग्रता व भेदक्षम जागरूकतेचा संयोग करण्याची गरज आहे.

अतिकामातून परिणामकारक विराम घेणं

आपल्या जीवनातील तणाव हाताळण्याच्या प्रयत्नात आपण इतर अनेक सोप्या व्यूहरचना स्वीकारू शकतो. आपल्याला अतिकामातून विराम हवा असेल, तर इंटरनेटचा वापर करण्याऐवजी उभं राहावं, पाणी प्यावं, खिडकीबाहेर पाहावं- अशा प्रकारचं काही करावं. निराळ्या शब्दांता सांगायचं तर, अधिक उत्तेजनेऐवजी कमी उत्तेजना मिळू द्यावी. अति उत्तेजनेमुळे तणाव येतो. अधिक उत्तेजना मिळाल्याने तणावावर उपाय होत नाही. कमी उत्तेजना चांगली.

मुक्त होण्याच्या या निश्चयाद्वारे आपण स्वयंशिस्त, एकाग्रता व भेदक्षम जागरूकतेची तीन प्रशिक्षणं अंमलात आणली, तर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातील तणाव व आत्मघातकी सवयी कमी करणं शक्य होतं. शिवाय, काम, कुटुंब, आर्थिक परिस्थिती, इत्यादींचा दबाव हाताळण्यासाठी आपल्याला अधिक शांत मन लाभेल. इंटरनेट, समाजमाध्यमं, संगीत, इत्यादींसारख्या इतक्या विपुल गोष्टी उपलब्ध असलेल्या आपल्या आधुनिक परिस्थितीला सामोरं जाताना हे विशेष परिणामकारक ठरतं. आपण इंटरनेट सोडून द्यावं, मोबाइल उपकरणं फेकून द्यावी, कधीच संगीत ऐकू नये, असा याचा अर्थ नाही. तर, आपण या सगळ्याचा निरोगी व उपकारक रितीने वापर करण्यासाठी अधिक चांगली व्यूहरचना व अधिक चांगल्या सवयी विकसित करायला हव्यात, एवढाच याचा अर्थ आहे. धन्यवाद.

प्रश्न

आधुनिक जीवनामध्ये आपल्याला गोष्टींवर प्रतिक्रिया द्यावी लागते, ही समस्या आहे. उदाहरणार्थ, आपण बातम्या पाहिल्या, तर आपण केवळ स्वतःपुरत्या त्या पाहत नाही, तर आपण यावर काय करायला हवं, आपण या गोष्टींवर कशी प्रतिक्रिया द्यायला हवी, हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं. उदाहरणार्थ, एखादा दर असेल, तर तो कसा बदलतोय हे ऑनलाइन आपल्याला दिसतं आणि त्यावर प्रतिक्रिया द्यायची गरज आपल्याला भासू शकते. किंवा, एखादी व्यक्ती आजारी आहे आणि तिला मदतीची गरज आहे, असा संदेश कोणी तुम्हाला पाठवू शकतं. किंवा, आपले सहकारी आपल्याला काही संदेश पाठवतात आणि त्यांना आपल्याला काहीतरी विचारायचं असतं, आणि आपण तो संदेश पाहिला नाही, तर त्यांना हवं असेल ते सापडत नाही. किंवा, हवामानाचे वृत्तान्त आपण पाहतो. सकाळी आपण हवामानाचा वृत्तान्त पाहिला नाही आणि आपण बाहेर गेलो, तर बाहेर थंडी पडल्याचं लक्षात येऊ शकतं, पण आपल्याला त्याची माहिती नसते, मग आपण आजारी पडू शकतो. अशा सर्व बाबतीत, आपली कार्यक्षमता कमी होते आणि आपण आपला वेळ किंवा आरोग्य किंवा आणखी काही वाया घालवतो.

म्हणूनच मी म्हटलं की, इंटरनेट कसं वापरायचं याची निरोगी व्यूहरचना, बुद्धिमान व्यूहरचना आपल्याला आखावी लागेल. आपण शारीरिकदृष्ट्या लठ्ठ असलो, तर आपण आहाराचं पथ्य पाळू लागतो, याचा अर्थ आपण खाणं पूर्ण थांबवतो असं नव्हे. आपण खाणं मर्यादेत आणतो. त्याचप्रमाणे आपण माहितीच्याबाबतीत लठ्ठ झालो, तर आपण काय बघतो यावर मर्यादा आणायला हवी आणि आवश्यक असेल, मदतीचं असेल त्याकडेच पाहावं, आणि मगाशी म्हणालो त्याप्रमाणे एक व्यूहरचना म्हणून ई-मेलच्या बाबतीत तरी काही ई-मेल नंतर बघण्यासाठी खुणा करून ठेवाव्यात.

पण या व्यूहरचनेतून असं ध्वनित होतंय की, आपण सर्व माहिती स्वीकारावी आणि मग कशाला उत्तर द्यायचं, कशाला उत्तर द्यायचं नाही, त्याची निवड करावी, पण तरीही आपण आपले सर्व संदेश वाचणारच आहोत, आणि सर्व बातम्या वाचणारच आहोत की.

इथे पुन्हा तुम्ही दोन भिन्न व्यूहरचना स्वीकारायला हव्यात. सकाळी उठल्यावर हवामानाचा वृत्तान्त पाहणं आणि रात्रभरात किती ‘लाइक’ मिळाले हे तपासणं यात चांगल्यापैकी फरक आहे. ‘लाइक’ किती मिळाले हे तपासण्याची गरज नाही. आणि तुम्हाला येणाऱ्या संदेशांपैकी काही संदेश जाहिरातींचे असतात, काही संदेश तुमच्या कामासंदर्भात फारशा महत्त्वाच्या नसणाऱ्या लोकांकडून आलेले नसतात, इत्यादी; काही गोष्टी नंतर बघून चालणार असतं. माझ्या एका मित्राला तो तयार करत असलेल्या नाश्त्याची छायाचित्रं काढून लोकांना पाठवायला आवडतं. मी अर्थातच ते पाहायची गरज नाही.

तुम्ही त्याचे संदेश वाचत नाही, हे त्याला माहीत आहे का?

मी नंतर ते बघेनही, पण ते बघण्यासाठी माझ्या कामात अडथळा येऊ देणार नाही.

अशा प्रकारे संप्रेरकांद्वारे “चांगलं वाटण्या”ची भावना मिळवून देणाऱ्या पद्धती इतर धर्मांतही सांगितलेल्या आहेत. त्या पद्धती आणि बौद्ध धर्मातील पद्धती यांत काय फरक आहे?

इतर धर्मांतही निश्चितपणे हे सांगितलेलं आहे. “येशूचं माझ्यावर प्रेम आहे” आणि “ईश्वराचं माझ्यावर प्रेम आहे”, इत्यादींमधून स्वीकारलं जाणं आणि ध्येयाच्या दिशेने कार्यरत असणं, हे सांगितलं जातं. या गोष्टी निश्चितपणे आहेत, हे खरंच. मी ज्या पद्धतींबद्दल बोलत होतो त्या अगदी बौद्ध धर्मापुरत्या खास आहेत असं नाही, कोणत्याही धार्मिक संदर्भाशिवायही त्या आढळतील; त्या सर्वांना उपयुक्त ठरतील अशा सर्वसाधारण व्यूहरचना आहेत. मी जे काही सांगत होतो त्यात अनन्यतः बौद्ध असं काही नव्हतं. 

अनन्यरित्या बौद्ध काय आहे, असं आपण विचारतो, तेव्हा असं म्हणता येतं की, बौद्ध धर्मातील वास्तवाविषयीची दृष्टी अतिशय सूक्ष्म पातळीवरची आहे. आणि वैज्ञानिकांसोबतच्या संभाषणांमधून हेही स्पष्ट होतं की, यातही अनन्य असं काही नाही, कारण वास्तवाविषयीची ही दृष्टी क्वान्टम विश्वाशी बरीच सुसंगत आहे. विश्वाच्या रचनेसंदर्भात क्वान्टम सिद्धान्ताचा तार्किक निष्कर्ष काढला, तर शून्यता व त्यावर आधारित उदयाविषयीची बौद्ध शिकवणूक हाती लागते.

एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटण्यासाठी आपण तयारी केली असेल आणि आपण त्या व्यक्तीला भेटल्यावर ती व्यक्ती केवळ स्वतःच्या मोबाइल फोनमध्येच बघत बसली असेल व आपल्याकडे फारसं लक्ष देत नसेल, तर अशा परिस्थितीत स्पष्टपणे त्या व्यक्तीला हे योग्य नसल्याचं सांगावं का? आपण वास्तवात भेटत असल्यामुळे असं योग्य वाटत नाही.

त्या व्यक्तीला हे सांगावं, असं मला व्यक्तीशः वाटतं. “नमस्कार! मी इथे समोर आहे!” असं त्या व्यक्तीला सांगणं उचित आहे, असं मला वाटतं. मोबाइल फोनसंबंधीचे शिष्टाचार अशी काहीएक गोष्ट आहे, ती अतिशय महत्त्वाची असते. विशेषतः तुम्ही पालक असाल आणि तुम्हाला लहान मुलं असतील, तर जेवताना मोबाइलवर संदेश पाठवत बसू नये किंवा फोनवर बोलू नये, ही शिस्त लावण्यासाठी आपण हे शिष्टाचार पाळायला हवेत. तर, होय, असं करता कामा नये, असं तुम्ही सांगावं, आणि त्यांना फोन खाली ठेवायला लावावं. माझी एक मैत्रीण एका अमेरिकी विद्यापीठात शिकवते, आणि लेक्चरच्या वेळी ती तिच्या विद्यार्थ्यांना त्यांचे सेलफोन टेबलावरच ठेवायला सांगते. फोन स्वतःच्या बसायच्या जागेपाशी ठेवायची मुभा विद्यार्थ्यांना नसते. मला हे अगदीच योग्य वाटतं. विशेष म्हणजे तिला लोकांना फोनवर बोलण्यासाठी मधली सुट्टी द्यावी लागते. तीन तासांचा सेमिनार असतो, त्यामुळे ४५ मिनिटांनी ही सुट्टी दिली जाते की एका तासाने दिली जाते, हे मला पक्कं लक्षात नाही. त्यांना टॉयलेटला जायचं असतंच असं नाही, पण स्वतःचा फोन बघायचा त्यांच्यावर इतका ताण आलेला असतो, त्यामुळे ते धावत जातात आणि स्वतःचे फोन पकडून मधल्या वेळात फोनकडे बघत बसतात. हे सामाजिकदृष्ट्या खूपच रोचक आहे.

लोकांना स्वतःच्या फोनचं आत्यंतिक व्यसन लागलेलं आहे आणि लोकांना काहीएक प्रकारची सामाजिक शिस्त लावण्यासाठी मदत करावी लागते इतकं हे व्यसन वाढलेलं आहे. त्यामुळे त्यांना याची नम्रपणे जाणीव करून दिली तर हे योग्य आहे, असं मला वाटतं. इथेही पुन्हा काही भेद समजून घ्यावे लागतात- त्यांना कुठल्या आपत्तीविषयी जाणून घ्यायचं आहे की फारसं महत्त्वाच्या नसलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल ते नुसतं चॅटिंग करतायंत, हे समजून घ्यायला हवं. आणि आपण वास्तववादी असावं- मुळात आपल्याला आपत्तींविषयीचे फोन किती वेळा येतात? समजा, आपण कुणाला भेटलो आणि आपलं मूल घरी सुरक्षितरित्या पोचलं हे कळवणारा फोन आपल्याला येणार असेल, अशा फोनची आपण वाट पाहत असू, तर तसं त्या व्यक्तीला सांगावं. नम्रपणे सांगावं: “मला एक कॉल येणार आहे. माझं मूल सुरक्षितरित्या घरी पोचल्याचं कन्फर्म कळवणार आहेत, त्याचीच मी वाट बघतेय.” मग त्यांना सगळं स्पष्ट होतं आणि ते समजून घेतात.

मेट्रोमधून किंवा सबवेमधून जाताना, मी कायम संगीत ऐकते, पण अधिक उत्तेजना मिळावी म्हणून मी हे करत नाही, तर नकारात्मक उत्तेजनेचं प्रमाण कमी करण्यासाठी असं करते. माझ्या आजूबाजूचे लोक कशाबद्दल तरी बोलत असतात आणि काही वेळा मला ते ऐकायचं नसतं, अशा गप्पांमध्ये बरीच नकारात्मकता असते, म्हणून मी असं करते. शिवाय, मेट्रोमध्ये जाहिराती असतात, आपल्याला पाठ असलेल्या गोष्टीच त्यात परत सांगितल्या जातात. त्यामुळे या सगळ्या नकारात्मक उत्तेजनांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी मी संगीत ऐकते. यात मी पळ काढत असते का? की, मी नकारात्मक व अतिशय उत्कट उत्तेजनांना कमी उत्कट व कमी विघात उत्तेजनांमध्ये बदलते आहे?

हा अतिशय रोचक प्रश्न आहे. या संदर्भात पहिल्यांदा माझ्या मनात भारतीय उत्तर येतंय, ते कदाचित सर्वाधिक योग्य उत्तर नसेलही: तुम्ही भारतात व्हिडिओ-कोच असलेल्या बसमधून रात्रीचा प्रवास करत असाल, तर तिथे व्हिडिओ रात्रभर सुरू असतो. एकच चित्रपट वारंवार दिसत राहतो, आवाजही मोठ्यातमोठा करून ठेवलेला असतो. “आवाज जरा कमी कराल का” असं किंवा इतरही काही तुम्ही ड्रायव्हरला विचारलंत, तर भारतीय उत्तर असं असतं: “तुम्ही ऐकू नका.”

मेट्रोमध्ये इतर सर्व जण काय बोलतायंत ते आपण ऐकायलाच हवं असं नाही. लक्ष कुठे द्यायचं याचा हा मुद्दा आहे. तुम्ही कशावर लक्ष केंद्रित करताय? तुमचं लक्ष सर्व लोकांवर असेल, आणि, समजा, तुम्ही त्यांच्या चेहऱ्यांवरचे भाव पाहत असाल, आणि ते खूप सुखी नसतील, तर सहानुभूतीने त्यांचं दुःख दूर व्हावं अशी इच्छा तुम्ही राखू शकता, ते सुखी होऊ दे असं म्हणू शकता, मग तुमचं लक्ष ते काय बोलतायंत यावर केंद्रित राहणार नाही; तुम्ही जाहिरातींकडेही पाहणार नाही. तुमचं लक्ष दुसऱ्या कशावर तरी जाईल. 

हे करणं तुम्हाला शक्य नसेल, तर संगीत ठीक आहे. पण संगीत ऐकणं हे लोकांकडे दुर्लक्ष करण्यासाठीचं समर्थन असू नये. सहानुभूतीचं उपयोजन करण्याची ही उत्तम संधी असते.

तांग्लेम या तत्त्वाबद्दल विचार करा. देवाणघेवाणीची ही अतिशय प्रगत बौद्ध आचरणपद्धती आहे. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्याऐवजी इतर लोक काय बोलत आहेत याभोवती भिंती उभाराव्यात, ते स्वीकारावं, त्याबद्दल खुलं राहावं, आणि ते कोणत्यातरी क्षुल्लक गोष्टींबद्दल किंवा नकारात्मक गोष्टींबद्दल बोलत आहेत हे तुम्ही स्वीकारावं, आणि मग त्यांना अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींवर त्यांना मात करता यावी, अशी इच्छा बाळगावी. ते अधिक अर्थपूर्ण सकारात्मक गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकतात. तर ही तांग्लेम आचरणाची मोठी संधी असते.

अनेकदा मुक्त होण्याचा निश्चय आपण पहिल्यांदा करतो तेव्हा, एका क्षणी तो निश्चय कमी होतो, आणि कदाचित आळशीपणामुळे किंवा इतर गोष्टींमुळे आपल्याला तसं वाटेनासं होतं, आणि असं घडल्यास निश्चय पूर्ववत होण्यासाठी काय करावं?

आपल्याला ज्या कशापासून मुक्त होण्याचा निश्चय करायचा आहे, त्या गोष्टीच्या तोट्यांची आठवण स्वतःला करून द्यावी; जी काही दुःखद स्थिती आहे, त्यातून मुक्त होण्याचे फायदे कोणते याची आठवण करून द्यावी, हा मुख्य सल्ला सर्वसाधारणतः देता येतो. यापासून मुक्त होण्याच्या पद्धती कोणत्या याची आठवण स्वतःला करून द्यावी आणि ही पद्धत परिणामकारक आहे याबद्दल आत्मविश्वास बाळगावा, आपण हे करण्यासाठी सक्षम आहोत, असाही आत्मविश्वास असावा. मुक्त होण्याच्या निश्चयामध्ये या सगळ्यांचा अतिशय महत्त्वाचा सहभाग असतो. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, “मी अधिक कष्ट केले तर मी यातून मुक्त होऊ शकतो” याची आठवण स्वतःला करून द्यावी. अन्यथा आपल्याला निराश वाटतं, आणि आपण काहीच करत नाही, प्रयत्न सोडून देतो.

आपण साधना करत असलो, तर त्यातून आपण अधिक स्थिर होतो, आणि हे आपण साध्य करू शकतो. पण अधिक स्थिर होण्यासाठी आपण औषधं घेत असलो, तर हे आपल्याला फारशा प्रयत्नांविना मिळतं, आणि त्यातून आपण बदलत नाही. एखादी व्यक्ती आजारी असेल, तर औषधं घेणं आवश्यक असतं. पण आपली मनस्थिती सुधारण्यासाठी, ताण व मनावरील इतर नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आपण दैनंदिन जीवनात काही घेऊ लागलो, तर?

बौद्ध पद्धतींबद्दल आपण वास्तववादी असणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. प्रगल्भतेची व स्थैर्याची विशिष्ट पातळी आधीच गाठलेल्या लोकांसाठी बौद्ध पद्धती परिणामकारक असतात. तुम्ही गंभीररित्या अस्वस्थ असाल, तर भावनिक, मानसिकरित्या आपण बौद्ध पद्धतींचं उपयोजन करण्यासाठी सक्षम झालेले नसतो. काही प्रमाणात स्थैर्य येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी औषधोपचार अतिशय मदतीचे ठरू शकतात- यात चित्तशांतीसाठीची औषधं असतील, निराशा दूर करणारी औषधं असतील, काहीही असेल. आपल्या मदतीसाठी काहीतरी गरजेचं असतं. सक्षम नसलेल्या व्यक्तींना “चला, आता साधना करू” असं नुसतं म्हणून चालत नाही. पण एकदा का आपण स्थिर झालो, की आपण औषधोपचारांच्या व्यसनावर मात करायला हवी. तुम्ही अधिक स्थिर झाला, तर त्या मनस्थितीमध्ये तुम्ही प्रत्यक्ष साधनेचे आचरण करू शकता. त्या आधी तुम्ही खूप अस्वस्थ असाल, त्यामुळे एकाग्रता नसते.

ब्रह्मदेशात हेडफोन घातलेली बौद्ध प्रतिमा उपहारगृहाच्या जाहिरातीमध्ये दाखवल्याबद्दल तीन लोकांना तुरुंगवास ठोठावण्यात आला. या घटनेवर बौद्ध दृष्टिकोनातून तुम्ही काय भाष्य कराल.

बुद्धाचा मत्सरी चुलत भाऊ देवदत्त सतत बुद्धाला इजा पोचवण्याचा प्रयत्न करत असे, पण बुद्धाला कधीच इजा होत नसे, आणि याबद्दल तो अर्थातच नाराजही होत नसे. त्यामुळे हेडफोन घातलेल्या फोटोने बुद्धाचा अपमान झाला नसता. पण बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी, किंवा कोणत्याही धर्माच्या अनुयायांसाठी, आपल्या मुख्य प्रतिमेबद्दल लोक अनादर दाखवत असतील, तर ती बाब अतिशय अपमानकारक असते. लोकांना अपमानित करण्यासाठी काही कारण लागत नाही; हे अतिशय निष्ठूर असतं. त्यांना तुरुंगात डांबणं, किंवा अतिशय जास्त दंड लावणं, हे कदाचित अजिबातच योग्य नसेल. परंतु, त्यांनीही तसं करायला नको होतं. अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे लोकांना अपमानित करण्याचं स्वातंत्र्य असतंच असं नाही. विशेषतः एका समूहाला संताप येईल हे माहीत असताना तशी कृती करणं योग्य नाही. काय अपमानित करणारं आहे आणि काय नाही, हे कोण ठरवणार, यावर हे अवलंबून असतं आणि त्यात फेरफार शक्य असतो. पण धर्माच्या प्रांतामध्ये येशू किंवा मोहम्मद किंवा बुद्ध यांचा अनादर होईल असं काहीतरी करणं अयोग्य असतं, हे पुरेसं स्पष्ट आहे. नवीन आय-पॉडची जाहिरात करताना सुळावर चढवलेल्या येशूच्या कनाला हेडफोन लावलेले आहेत, अशी जाहिरात आली तर त्यावर ख्रिस्ती लोक कशी प्रतिक्रिया देतील? कट्टर ख्रिस्ती श्रद्धाळूंना हे पटेल असं मला वाटत नाही.

आपण एकतर ऐहिक ध्येये गाठण्याचा प्रयत्न करू शकतो, किंवा आध्यात्मिक ध्येये गाठण्याचा. दोन टोकं असू शकतात, असं माझ्या लक्षात आलं आहे. ऐहिक ध्येयांवर अधिक लक्ष केंद्रित करणं, हे एक टोक. पण हे अंतहीन असतं- एक ध्येय गाठल्यावर दुसरं ध्येय समोर येतं. दुसरं टोक, उदाहरणार्थ, बौद्ध समुदायांमध्ये दिसतं. ते अध्यात्मिक ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतात, पण ते ऐहिक ध्येये विसरून जातात. हा प्रश्न सोडवण्याच्या व समतोल साधण्याच्या काही पद्धती किंवा मार्ग आहेत का?

यात ५०/५० टक्के शक्यता असतात, असं परम पूजनीय दलाई लामा यावर म्हणतात. आपल्या जीवनातील वास्तव काय आहे, आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, हे आपण पाहायला हवं: आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, आपल्यावर कोणी अवलंबून आहे का? तर, आपण वास्तववादी असावं.

Top