‘सी’ शिक्षण: वैश्विक मूल्यांमधील प्रशिक्षण कार्यक्रम

सामाजिक, भावनिक व नैतिक शिक्षण, एमोरी विद्यापीठ, संक्षिप्त चौकट मॅट लिंडेन

सामाजिक, भावनिक व नैतिक शिक्षण म्हणजे काय?

सामाजिक, भावनिक व नैतिक (Social, Emotional and Ethical: SEE / सी) शिक्षणाचा कार्यक्रम भावनिकदृष्ट्या सुदृढ व नैतिकदृष्ट्या जबाबदार व्यक्ती, सामाजिक समूह व व्यापक समुदायांची संगोपना करण्यासंबंधीचा आहे. मुख्यत्वे शाळांमध्ये व उच्चशिक्षण संस्थांमध्ये वापरण्यासाठी या कार्यक्रमाची निर्मिती केलेली असली, तरी इतर संदर्भांमध्येही तो प्रस्तुत ठरेल.

एमोरी विद्यापीठातील ‘सेंटर फॉर कन्टेम्प्लेटिव्ह सायन्स अँड कम्पॅशन-बेस्ड एथिक्स’ने विकसित केलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे पूर्ण लक्ष नीतिमत्तेवर केंद्रित आहे. यातील नीतिमत्ता कोणत्याही एका विशिष्ट संस्कृतीवर अथवा धर्मावर आधारित नाही, तर करुणा, सहिष्णूता व क्षमा यांसारख्या वैश्विक, प्राथमिक मानवी मूल्यांवर आधारलेली आहे. ‘सी’ शिक्षणामुळे व्यक्तींना स्वतःची व इतरांची अधिक कुशलतेने काळजी घ्यायची क्षमता प्राप्त होईल, अशी क्षमता शारीरिक व भावनिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. परस्परावलंबित्वाबद्दल जागरूकता वाढवणं आणि चिकित्सक विचारांची कौशल्यं विकसित करणं, अधिकाधिक व्यामिश्र होत जाणाऱ्या जगाचे जागतिक नागरिक होण्यासाठी लोकांना तयार करणं, यांवर देखील या प्रशिक्षणामध्ये लक्ष केंद्रित केले जाते.

हा कार्यक्रम “वैश्विक मूल्यां”वर आधारित आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच देशांमध्ये व संस्कृतींमध्ये तो वापरला जाऊ शकतो. सामायिक व्यवहारज्ञान, सामायिक अनुभव व विज्ञान यांवर आधारलेला हा कार्यक्रम एकतर आहे त्या प्रकारांनुसार व उपयोजनांनुसार वापरणं शक्य आहे, किंवा भिन्न लोकांच्या धार्मिक व सांस्कृतिक मूल्यांमधून प्रेरणा घेऊन त्यात बदलही करता येऊ शकतो. सर्व वयोगटांतील लोकांना सामाजिक, भावनिक व नैतिक क्षमता शिकवणं, हे या सर्वसमावेशक, सर्वांगीण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या संदर्भात, गणित, विज्ञान, परकीय भाषा किंवा इतर कोणताही अकादमिक विषय लोकांना शिकवणं आणि या कार्यक्रमातील शिक्षण यांमध्ये भेद नाही. व्यक्ती व व्यापक समाज या दोघांसाठीही अधिक सुख व सौहार्द मिळवून देणाऱ्या मूल्यांना व क्षमतांना चालना देईल अशा रितीने शिक्षणाचा विस्तार व्हायला हवा.

तीन आयाम, तीन क्षेत्रं

‘सी’ शिक्षणामध्ये तीन आयाम आहेत; या अभ्यासक्रमामध्ये कोणत्या क्षमतांना चालना द्यायचा मानस आहे, ते त्यातून स्पष्ट होते:

 • जागरूकता
 • करुणा
 • प्रतिबद्धता

शिवाय, हे तीन आयाम तीन भिन्न क्षेत्रांच्या दिशेने विस्तारतात:

 • वैयक्तिक
 • सामाजिक
 • जागतिक

तीन आयाम

जागरूकता- आपले विचार आणि भावभावना यांचं आकलन विकसित करणं. जागरूकतेमुळे आपल्याला स्वतःचं अंतर्गत जीवन, इतरांची उपस्थिती व गरजा, आणि आपल्या जगण्याचं व आपण अस्तित्त्वात आहोत त्या जगाचं वैशिष्ट्य असणारं परस्परावलंबित्व यांचे आकलन करून घेण्यासाठी आपल्याला जागरूकतेची मदत होते. हे विकसित करण्यासाठी सराव आणि लक्ष देण्याच्या क्षमतेमध्ये सुधारणा करणं गरजेचं असतं.

करुणा- इतरांचं सुख व दुःख याबद्दल सहानुभूती व आस्था राखून स्वतःशी, इतरांशी व एकंदर मानवतेशी जोडून घेणं, असा या प्रशिक्षणाचा मार्ग आहे. यामधील क्षमता वाढवण्यासाठी चिकित्सक विचार, स्वतःच्या गरजांविषयीचं आकलन, आणि दीर्घकालीन कल्याण कशाने साधेल याची समज, यांची आवश्यकता आहे. मग ही व्याप्ती इतरांच्या गरजांना सामावून घेण्याइतकी विस्तारते आणि अखेरीस एकंदर मानवतेच्या सामायिक गरजा लक्षात घेतल्या जातात.

प्रतिबद्धता- जागरूकता व करुणा यांच्या प्रशिक्षणातून प्राप्त झालेल्या पद्धतींचं उपयोजन करणं. वैयक्तिक, सामाजिक व सामुदायिक कल्याणाशी सुसंगत असतील अशा वर्तनाचं व मनोवृत्तींच्या प्रकारांचं शिक्षण यात समाविष्ट आहे. यासाठी स्वनियमन, सामाजिक कौशल्य व जागतिक नागरिक म्हणून प्रतिबद्धता पाळणारी कृती गरजेची असते.

हे तीन आयाम प्राथमिक मूल्यं म्हणून विकसित करण्यासाठी केवळ ज्ञान प्राप्त करून भागत नाही, तर वैयक्तिक पातळीवर त्यांची प्रस्तुतता लक्षात घ्यावी लागते आणि मग ती सखोल अंगीकारावी लागतात. याच्या अनेक पायऱ्या आहेत:

 • सुरुवातीला, आपण ऐकून, वाचून व अनुभवून शिकतो, प्राथमिक माहिती आपल्यासमोर येते आणि आपण प्रत्येक मूल्याविषयीचं आकलन विकसित करतो.
 • चिकित्सक विचाराचा वापर करून मग आपण भिन्न दृष्टिकोनांद्वारे मूल्यांचा तपास करतो आणि त्यांचं आपल्या परिस्थितींमध्ये उपयोजन करतो, त्यातून “चिकित्सक मर्मदृष्टी” प्राप्त होते. वैयक्तिक मर्मदृष्टी प्राप्त झाल्यावर आपल्याला साक्षात्कारसदृश क्षण अनुभवायला मिळतो आणि ज्ञानाची पहिली पातळी आपल्या जीवनाशी जोडली जाते.
 • वारंवार परिचय झाल्याने ही मूल्यं स्वभावसामर्थ्यामध्ये व वैयक्तिक गुणांमध्ये रूपांतरित होतात. सातत्यपूर्ण सराव, चर्चा व वाद यांमुळे ही मूल्यं उत्स्फूर्त होत जातात.

तीन क्षेत्रं

वैयक्तिक- इतरांच्या व व्यापक समुदायाच्या गरजा लक्षात घेण्यासाठी आपण आधी स्वतःच्या गरजा व अंतर्गत जीवन लक्षात घेणं शिकायला हवं. भावनिक साक्षरता विकसित करून हे साधता येतं, तिथे आपल्याला भावना ओळखता येतात व त्यांचे परिणाम समजून घेता येतात, त्यामुळे इतरांना व आपल्याला हानिकारक ठरेल असं आवेगपूर्ण वर्तन टाळणं आपल्याला शक्य होतं.

सामाजिक- मानव प्राणी म्हणून आपण स्वभावाने सामाजिक आहोत, आणि इतरांशी चांगल्या तऱ्हेने जुळवून घेतो हे अतिशय महत्त्वाचं आहे. शिकून, चिंतन करून व प्रतिबद्धतेसह उपयोजन करून आपण सामाजिक गुण विकसित करू शकतो.

जागतिक- अधिकाधिक व्यामिश्र होणाऱ्या जगामध्ये केवळ करुणा पुरेशी नाही. आपण जगत असलेल्या परस्परावलंबी जागतिक व्यवस्थांचं सखोल ज्ञानही गरजेचं आहे. विविध परिप्रेक्ष्यांतून परिस्थितींकडे कसं पाहायचं हे कळल्याने समस्येची सोडवणूक करणारी प्रक्रिया अधिक व्यापक होते, त्यात केवळ छोटे व विखंडित तुकडे करणं टाळलं जातं.

शिक्षणातील धागे

वरील तीन मूल्यांचं शोधन, मूल्यमापन व अंगीकार हे मार्ग म्हणजे शिक्षणाचे धागे होत. यातून आपलं ज्ञान व आकलन ठोस पायावर उभारलं जातं व सखोल होत जातं. अशा प्रकारचे चार धागे आहेत:

 • चिकित्सक विचार- तार्किक कारणमीमांसा, बहुविध परिप्रेक्ष्यं, संवाद व वाद यांद्वारे विषय आणि अनुभवांचा शोध घेऊन सखोल आकलनापर्यंत पोचणं.
 • चिंतनाचा सराव- कौशल्यांचा अंगीकार करण्यासाठी संरचनात्मक मार्गाने वैयक्तिक अनुभवांकडे लक्ष वळवणं.
 • वैज्ञानिक परिप्रेक्ष्यं- आपल्या भावनांचा व जगाचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेणं, जेणेकरून संस्कृती व धर्म यांच्याबाबतीत निःपक्षपाती असणारा दृष्टिकोन पुरवता येईल.
 • प्रतिबद्ध शिक्षण- सर्जनशील अभिव्यक्ती (कला, संगीत, लेखन) किंवा पर्यावरणीय शिक्षण (थेट नैसर्गिक जगाशी प्रतिबद्ध असणं), यांसारख्या सहभागाधारित शिक्षणाच्या व्यूहरचना स्वीकारल्याने चिंतन करता येतं.

शिक्षणाचे हे चारही धागे करुणेच्या तत्त्वामध्ये रुजलेले आहेत आणि उपरोक्त तीन आयामांमध्ये करुणा मध्यवर्ती आहे. अनेकदा करुणेला कमकुवतपणा मानलं जातं- आपला तोटा करून इतरांना हवं ते घेऊ देणं, किंवा त्यांना दबाव आणू देणं किंवा इतर नकारात्मक वर्तनाला वाव देणं, असे अर्थ घेतले जातात. ‘सी’ शिक्षणामध्ये करुणा म्हणजे धाडसी करुणा अभिप्रेत आहे, त्यात अंतर्गत सामर्थ्यातून इतरांविषयी करुणा व आस्था वाटणारी भूमिका अनुस्यूत आहे.

सारांश

‘सी’ शिक्षणामध्ये सहभागी झाल्याने आपल्याला स्वतःचे व इतरांचे विचार व भावना आणि त्यांचे मानसिक जीवन यांबद्दल अधिक जागरूकता येते. भावनिक आरोग्य व स्वतःची काळजी घेणं यासाठीची कौशल्यं आपल्यामध्ये विकसित होतात, इतरांबद्दलची धाडसी करुणा आपण अंगीकारतो आणि सगळीकडच्या सर्व लोकांना मूल्यवान मानणाऱ्या सामायिक मानवतेची ओळख पटते. अखेरीस, विध्वंसक वर्तन व उपकारक वर्तन यांच्यात भेद करण्याची क्षमता प्राप्त करून आपण इतरांशी उत्पादकतेने व काळजीभावी वृत्तीने जोडून घेऊ शकतो, व्यापक सामाजिक लाभासाठी जागतिक पातळीवर प्रतिबद्ध राहण्यासाठी याची मदत होते. तर, स्वाभिमानाची आरोग्यदायी भावना विकसित करण्यासाठी, आपल्या भोवतीच्या इतर लोकांशी चांगल्या तऱ्हेने जोडून घेण्यासाठी आणि जबाबदार जागतिक नागरिक होण्यासाठी आवश्यक असलेली मूल्यं व कौशल्यं आपल्याला शिकवणारा हा ‘सी’ शिक्षणाचा सर्वांगीण कार्यक्रम आहे.

याहून सखोल जायची इच्छा असल्यास ‘सी’ शिक्षणाच्या चौकटीचा पूर्ण परिचय वाचावा आणि ‘सेंटर फॉर कन्टेम्प्लेटिव्ह सायन्स अँड कम्पॅशन-बेस्ड एथिक्स’च्या इतर कार्यक्रमांबद्दलही माहिती घ्यावी.

Top