प्राचीन भारतीय मूल्यांचं पुनरुज्जीवन

प्राचीन भारतीय मूल्यांच्या पुनरुज्जीवनाविषयी बोलण्याची सूचना मला करण्यात आली आहे. परम पूजनीय दलाई लामांनी वचनबद्धता व्यक्त केलेल्या चार प्रमुख विषयांपैकी हा एक आहे. या विषयात अनेक मुद्दे येतात-

 • एक, प्राचीन भारतीय मूल्यं कोणती आहेत?
 • दोन, त्यांच्या पुनरुज्जीवनाचं उद्दिष्ट व उद्देश काय?
 • तीन, त्यांचं पुनरुज्जीवन करणं म्हणजे काय?
 • चार, त्यांच्या पुनरुज्जीवनासाठीच्या काही व्यावहारिक व परिणामकारक पद्धती कोणत्या?

यातील प्रत्येक मुद्द्याची क्रमाक्रमाने तपासणी करू.

प्राचीन भारतीय मूल्यं कोणती?

प्राचीन भारतीय मूल्यं कोणती, याचा शोध घेताना आपल्याला दोन दिशांनी जाता येतं:

 • अहिंसा व करुणा यांची एक दिशा आहे. परम पूजनीय दलाई लामा नियमितपणे या दोन प्राचीन भारतीय मूल्यांची पाठराखण करतात. भारतीय धार्मिक परंपरांमध्ये शिकवली जाणारी ही मूल्यं आधुनिक काळातील इहवादी नीतिमत्तेचा, वैश्विक मूल्यांचा आणि इमोरी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘SEE’ (Social, Emotional and Ethical Learning: सामाजिक, भावनिक व नैतिक अध्यापन) अध्यापन कार्यक्रमाचा पाया आहेत. सध्या भारतातील अनेक शाळांमध्ये आणि जगभरातील इतर अनेक देशांमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी होते आहे.
 • दुसरी दिशा भावनिक आरोग्याची आहे. परम पूजनीय दलाई लामा या प्राचीन भारतीय मूल्याचीही पाठराखण करतात. मुख्यत्वे मन, भावना, जाणून घेण्याचे मार्ग, तर्कविवेकाचे मार्ग यांच्याशी निगडीत प्राचीन भारतीय तत्त्वप्रणालींच्या शिकवणुकींमध्ये हे मूल्य सापडतं.

इथे मी प्राचीन भारतीय मूल्यांच्या या दुसऱ्या- भावनिक आरोग्याविषयीच्या- पैलूचं पुनरुज्जीवन करण्यावर लक्ष केंद्रित करू इच्छितो. परम पूजनीय दलाई लामा अनेक बौद्ध शिकवणुकींच्या संदर्भात भारतीय विज्ञान, तत्त्वज्ञान व धर्म यांविषयी बोलतात, तर या विषयावर आपण बोलत असू तर भावनिक आरोग्य बहुतांशाने भारतीय विज्ञानाच्या अवकाशात येते. परंतु, स्व, सत्य व वास्तव असे मुद्दे हाताळताना हा विषय भारतीय तत्त्वज्ञानामध्येदेखील येतो. आपण स्वतःला व इतरांना काय मानतो आणि वास्तव व सत्य यांचा विचार आपण कसा करतो, याचा आपल्या भावनिक कल्याणावर स्पष्ट परिणाम होत असतो.

प्राचीन भारतीय तत्त्वप्रणालींमध्ये चार बौद्ध व आठ बौद्धेतर तत्त्वप्रणालींचा समावेश आहे, त्यातील अनेकांचे उप-पंथ आहेत. परंतु, प्रत्येक तत्त्वप्रणाली ही संपूर्ण व्यवस्था असते, आणि भावनिक आरोग्याच्या सर्व पैलूंबाबत तिची स्वतःची अनन्य प्रतिपादनं असतात. प्रत्येक प्रणाली मनाचा व भावनांचा स्वतःचा नकाशा मांडते, मन व स्वत्व यांच्यातील संबंधांविषयीचं स्वतःचं प्रतिपादन करते, तिचा स्वतःचा बोध सिद्धान्त असतो आणि तार्किक पुराव्यांची तिची स्वतःची रचना असते. शिवाय, स्वत्व, सत्य व वास्तव या तात्त्विक विषयांशी संबंधित त्या सर्वांची मतं भिन्न आहेत. 

यातील चार्वाकांचा अपवाद वगळता सर्वांनी भारतीय धर्मांच्या प्रमुख विषयांच्या संदर्भात स्वतःची वैज्ञानिक व तात्त्विक प्रतिपादनं मांडली आहेत. कर्म, अनिवार्य पुनर्जन्म (किंवा, संसार), संसारातील दुःख, स्वत्वाविषयीचा अजाणपणा व संसाराचं कारण असलेलं वास्तव, आणि संसारातून मुक्त होण्यासाठीचं साधन म्हणून स्वत्व व वास्तव यांच्याबद्दल अचूक आकलन ठेवणं, यांचा यात समावेश होतो. आपल्या भावनिक स्थितींवर अजाणपणाचा परिणाम होत असतो, आणि पर्यायाने आपल्या कर्मजन्य वर्तनावरही त्यांचा परिणाम होतो, त्यातून आपल्याला सांसारिक पुनर्जन्माचं दुःख सहन करावं लागतं. अजाणपणावर आधारित या मानसिक स्थितींमधून स्वतःची सुटका करण्याच्या सर्व पद्धती सांसारिक पुनर्जन्मातून मुक्ती होण्याच्या दिशेने जाणाऱ्या आहेत. तर, भावनिक आरोग्याचे भारतीय विज्ञान भारतीय तत्त्वज्ञानाच्या व धर्माच्या मूलभूत प्रतिपादनांपासून वेगळे काढणे सोपे नाही.

प्राचीन भारतीय विज्ञान, तत्त्वज्ञान व धर्म यांच्यात सामायिक असलेल्या या मूलभूत प्रतिपादनांशी निगडीत मतांचं वैविध्य लक्षात घेता, भावनिक आरोग्याची प्राचीन भारतीय मूल्यं नक्की कोणती आहेत? ही मूल्यं अशी:

 • वस्तुस्थिती व कल्पित यांच्यातील भेद जाणण्यासाठी बुद्धिप्रामाण्यवादी, विश्लेषणात्मक विचार वापरण्याचं मूल्य
 • आपण स्वतःसाठी व पर्यायाने इतरांसाठी निर्माण करतो त्या दुःखांवर मात करण्यासाठी आपलं मन व भावना कशा रितीने कार्यरत असतात, हे जाणून घेण्याचं मूल्यं.

भावनिक आरोग्य राखण्यासाठी या प्राचीन भारतीय तत्त्वप्रणालींमध्ये आढळणाऱ्या सामायिक पद्धती आणखी काही सामायिक मूल्यं उघड करतात:

 • शिक्षणाचं मूल्य पहिल्यांदा येतं. अजाणपणावर मात करण्यासाठी या सर्व प्रणाली त्यांच्या शिकवणुकी ऐकून किंवा वाचून मनाचं प्रशिक्षण करावं असं सांगतात आणि त्यानंतर त्याबद्दल चिकित्सक विचार करून अचूक आकलन प्राप्त करावं आणि या प्रणाली सत्य व उपकारक आहेत हा निर्धार पक्का करावा. अभ्यास व चिकित्सक विचार हा योग्य शिक्षणाचा पाया आहे.
 • आपण जे काही शिकलो, समजून घेतलं आणि ज्याबद्दलचा निर्धार केला ते आपल्या जीवनाशी एकात्म करणं, हे दुसरं मूल्य आहे. हे करण्याची पद्धती म्हणून सर्व भारतीय प्रणाली साधना शिकवतात आणि त्याद्वारे उपकारक सवयी लावून घेण्याची शिकवण दिली जाते.
 • नैतिक स्वयंशिस्त, एकाग्रता व मर्मदृष्टी ही तिसरी मूल्यं आहेत. आपल्या मनाच्या प्रशिक्षणासाठी आपण स्वतःच्या शरीराला व वाचेला नैतिक वर्तनाची शिस्त लावून घ्यायला हवी, अशी शिकवण सर्व प्रणाली देतात. त्यानंतर आपल्या मनांच्या प्रशिक्षणासाठी एकाग्रता वाढवण्याच्या उद्देशाने या सर्व प्रणालींमध्ये शमथ साधनापद्धती वापरली जाते आणि अजाणपणा दूर करणारी मर्मदृष्टी विकसित करण्यासाठी विपश्यना केली जाते. शमथ म्हणजे सर्व मानसिक भरकटलेपण व कंटाळलेपण थांबवणारी मनस्थिती होय. एकाच वस्तूवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही साधना केली जाते. स्वतःच्या उद्दिष्टाकडे अचूक रितीने पाहून ही साधना केली जाते. उद्दिष्ट अशाश्वत आहे हे विचारात घेतलं जातं, किंवा त्याबद्दल करुणेसारखी उपकारक मनोवृत्ती अंगीकारली जाते. विपश्यना ही अपवादात्मक मूलगामी मनस्थिती आहे, त्यात शमथ साधनेची स्थिती कायम ठेवून सखोल विश्लेषणाची क्षमता विकसित केली जाते आणि या आकलनाचा सर्व तपशील व परिणाम किंवा उद्दिष्टाकडे पाहण्याची मनोवृत्ती यांचीही काळजी घेतली जाते. 

थोडक्यात, भावनिक आरोग्याची प्राचीन भारतीय मूल्यं म्हणजे:

 • शिक्षण
 • बुद्धिप्रामाण्यवादी, विश्लेषक विचार
 • मन व भावना समजून घेणं
 • नैतिक वर्तन
 • एकाग्रता व मर्मदृष्टी विकसित करण्यासाठी साधना

भावनिक आरोग्याची प्राचीन भारतीय मूल्यं पुनरुज्जीवित करण्याचं उद्दिष्ट व उद्देश काय?

सकारात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोष्टींना ‘मूल्यं’ संबोधले जाते. शारीरिक आरोग्य स्वच्छता, सुदृढ आहार, व्यायाम व सुरक्षित वर्तन या मूल्यांवर आधारित असतं. ही सर्वच मूल्यं महत्त्वाची असतात, कारण त्याद्वारे आजाराला प्रतिबंध व्हायला मदत होते आणि आपण व समाज या दोघांच्याही कल्याणामध्ये योगदान दिलं जातं. त्याचप्रमाणे भावनिक आरोग्य शिक्षण, बुद्धिप्रामाण्यवादी विचार, अचूक आकलन, भावनिक समतोल, रचनात्मक वर्तन, एकाग्रता व मर्मदृष्टी यांसारख्या मूल्यांवर आधारलेलं असतं. ही सर्व मूल्यं अविवेकी विचाराला, भावनिक अशांततेला आणि स्वतःला व समाजाला विध्वंसक ठरेल अशा अनिवार्य वर्तनाचा प्रतिबंध करण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरतात.

लोकांना स्वतःच्या दुःखावर मात करण्यासाठी मदत करणं, हेच भावनिक आरोग्याविषयीच्या प्राचीन भारतीय शिकवणुकींचं उद्दिष्ट व उद्देश राहिला आहे. अनियंत्रित पुनर्जन्म थांबवणं, म्हणजेच सांसारिक दुःखावर मात करणं हे अंतिम उद्दिष्ट असलं, तरी या शिकवणुकी दैनंदिन जीवनातील अडचणी व दुःख यांवर मात करण्यासाठी मदतीच्या ठरतात. आपली मनं व भावना कशा कार्यरत असतात, आपल्या भावनांचा आपल्या वर्तनावर कसा परिणाम होतो, आपल्या मनांमधील व भावनांमधील त्रासदायक घटक कसे ओळखायचे आणि वैध बोधप्रक्रिया, तर्कपद्धती व विवेक, शिस्त व साधना यांचा वापर करून या त्रासदायक घटकांपासून स्वतःला मुक्त कसं करवून घ्यायचं, याची विश्लेषणात्मक योजना लोकांना पुरवण्याचं काम यात केलं जातं. 

मेंदूच्या कामकाजासंबंधीचं वर्तमानकालीन वैज्ञानिक ज्ञान व मानसशास्त्रीय सिद्धान्त यांना पूरक जोड मिळावी आणि लोकांना उपलब्ध असलेल्या पद्धतींचा विस्तार व्हावा, हे या शिकवणुकींचं पुनरुज्जीवन करण्यामागील उद्दिष्ट व उद्देश आहे. गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना उपचारांसाठी नेणं, एवढाच लोकांची मदत करण्याचा अर्थ नाही, तर सर्वसामान्य लोकांना दैनंदिन जीवनात चांगल्या रितीने जगता यावं यासाठी मदत करण्याचाही समावेश यात आहे. सर्व जीवांना दुःखावर मात करण्यासाठी मदत करणं, ही परम पूजनीय दलाई लामांची बहुधा सर्वांत मध्यवर्ती वचनबद्धता आहे.

भावनिक आरोग्याविषयीच्या प्राचीन भारतीय मूल्यांचं पुनरुज्जीवन करणं आपल्या वर्तमान काळासाठी विशेष महत्त्वाचं आहे. अनेकदा आपण सध्याच्या काळाचं वर्णन ‘सत्योत्तर युग’ असं केलं जात असल्याचं ऐकतो. चुकीची माहिती व तथाकथित ‘बनावट बातमी’ यांचा फैलाव झाला आहे. पडताळता येतील अशा तथ्यांऐवजी आपल्याला भावनिकदृष्ट्या सत्य वाटेल त्याच गोष्टींवर सत्य आधारलेलं असतं, असं अनेकांना वाटतं. यातून अविवेकी वर्तन केलं जातं व सामाजिक विसंवाद, बिघाड व संघर्ष निर्माण होतो. थोडक्यात, यातून अनेक समस्या व बरंच दुःख निर्माण होतं. भावनिक आरोग्याच्या प्राचीन भारतीय मूल्यांचं पुनरुज्जीवन केल्याने वास्तवाविषयीच्या गैरसमजुती, अस्वस्थकारक भावना आणि त्यातून उद्भवणारं दुःखकारक अनिवार्य, विध्वंसक वर्तन या गोष्टींना प्रतिकार करणं व त्या नष्ट करणं शक्य होईल.

एक उदाहरण देतो. बौद्धविचारातील चित्तमात्र दृष्टिकोन आणि क्वान्टम मेकॅनिक्सचा परिणाम यांच्यातील साधर्म्यावर परम पूजनीय दलाई लामा अनेकदा बोलतात. वस्तुनिष्ठ वास्तव असा काही प्रकार नाही, तर निरीक्षकाचं मन निरीक्षित वस्तूंच्या स्थितीवर परिणाम करतं, असाच निष्कर्ष दोन्ही दृष्टिकोनांमधून निघतो. तर, निरनिराळे दृष्टिकोन, निरनिराळ्या स्थिती, हे सत्य आहे- प्रकाशकण (फोटॉन) हा कण आहे की ऊर्जा लहर, हे निरीक्षकावर आणि मोजमापासाठी वापरलेल्या सांकल्पनिक चौकटीवर अवलंबून असतं. मानवांना ज्याचा अनुभव पाणी म्हणून येतो, ते देवांसाठी अमृत असतं, पिशाच्चांसाठी पू असतं, हे या संदर्भातील अभिजात बौद्ध उदाहरण आहे. प्रकाशकण हा कण आहे की ऊर्जा लहर हे दोन्ही सापेक्षरित्या सत्य असतं, त्याचप्रमाणे प्रत्येक जीव जे अनुभवतो ते सापेक्षरित्या सत्य असतं आणि कार्यकारणसंबंधानुसार ते कार्यरत होतं. पाण्यामुळे लोकांची तहान भागते, अमृतामुळे देवांना अतीव सुख लाभतं आणि पू पिशाच्चांना तीव्र वेदना देतो.

परंतु, ही दृष्टिकोनांची व अनुभवांची सापेक्षता केवळ प्रचलित सत्यांना लागू होते, सखोल सत्यांना नाही. परंतु, सापेक्ष, प्रचलित सत्यांबाबतही वैध प्रचलित सत्य व अवैध प्रचलित सत्य असा भेद असतो. कोणी काहीही विचार केला तरी ते सत्य असतं, किंबहुना आपल्याला अमुकएक सत्य वाटतं म्हणूनच ते सत्य आहे, असा याचा अर्थ नाही. आगीत तेल टाकल्याने ज्वाळा शांत होतील, असा विश्वास कोणाला वाटत असेल, तरी त्यामुळे वास्तवात काही आग शमत नाही. तर्क व विवेक यांवर आधारित चिकित्सक विचाराची प्राचीन भारतीय मूल्यं पुनरुज्जीवित करण्याचा एक लाभ असा की, लोकांना सत्योत्तर युगातील आव्हानं व गोंधळातून मार्ग काढायला त्याची मदत होते.

भावनिक आरोग्याची ही प्राचीन भारतीय मूल्यं पुनरुज्जीवित करणं म्हणजे काय?

या विभिन्न बौद्ध व बौद्धेतर तत्त्वप्रणाली एकमेकांपासून अलगपणे विकसित झालेल्या नाहीत. नालंदासारख्या महान भारतीय विद्यापीठांमध्ये या तत्त्वप्रणालींची एकमेकांसोबत वादचर्चा झाल्याचा प्रदीर्घ इतिहास आहे. परम पूजनीय दलाई लामांनी ज्ञान व सर्व परंपरांविषयीचा आदर यांवर आधारित धार्मिक सौहार्दाशीही वचनबद्धता राखली आहे. या वचनबद्धतेच्या दृष्टिकोनातून आणि परम पूजनीय दलाई लामांना आदरस्थानी असलेल्या नालंदेच्या परंपरेनुसार, प्राचीन भारतीय मूल्यांचं पुनरुज्जीवन म्हणजे बौद्ध व  बौद्धेतर अशा सर्व भारतीय तत्त्वप्रणालींमध्ये सापडणाऱ्या भावनिक आरोग्याविषयीच्या शिकवणुकींचं पुनरुज्जीवन होय.

परंतु, भावनिक आरोग्याची प्राचीन भारतीय मूल्यं पुनरुज्जीवित करणं याचा अर्थ, केवळ संस्कृत संहिता आधुनिक भाषांमध्ये भाषांतरित करणं असा नाही. पण भाषांतर हा अर्थातच यातील एक महत्त्वाचा भाग आहे. मूळ संहिता व त्यांवरील भारतीय भाष्यं, आणि अगती भारतीय बौद्ध संहितांवरील तिबेटी भाष्यं समजून घेणं खूप अवघड आहे. ही भाष्यं अतिशय प्रगत आहेत आणि ते समजून घेण्यासाठी बराच गृहपाठ व शिक्षण गरजेचं असतं. या संहितांमध्ये सामावलेलं ज्ञान पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यातील सामग्रीच्या स्पष्टीकरणाच्या विशिष्ट श्रेणी निश्चित कराव्या लागतील, प्राथमिक श्रेणीपासून ही सुरुवात करावी लागेल. अशा श्रेणीबद्ध सामग्रीद्वारेच हे ज्ञान पारंपरिक भारतीय विचारांची पार्श्वभूमी नसलेल्यांपर्यंत पोचू शकेल.

परंतु, या शिकवणुकी श्रेणींद्वारे शिकवणं म्हणजे केवळ विशिष्ट उतरंडीमध्ये त्यांची रचना करून अभ्यास करणं नव्हे, श्रेणीनुसार ते ज्ञान अधिक अचूक व वैध होत जातं असं मानून हे करू नये. एक प्रणाली दुसरीहून श्रेष्ठ आहे, असं त्यातून सूचित होईल आणि ‘कनिष्ठ प्रणाली’ मानल्या जातील त्यांचा अभ्यास टाळून अधिक वरच्या व श्रेष्ठ प्रणालींचा अभ्यास करण्याकडे ओढा निर्माण होईल. अनेक अभ्यासक बौद्ध तत्त्वप्रणालींचा अभ्यास अशा श्रेणीरचनेमध्ये मांडतात, परंतु बौद्ध व बौद्धेतर तत्त्वप्रणालींचा अभ्यास करताना हा दृष्टिकोन आंतरधर्मीय सौहार्दाच्या मूल्यांविरोधात जाणारा ठरतो. अशा सौहार्दाचा पाठपुरावा परम पूजनीय दलाई लामा करतात. पण बौद्ध व बौद्धेतर शिकवणुकी श्रेणीबद्ध रचनेतून सादर केल्या, तर व्यामिश्रतेच्या श्रेणींमधून या तत्त्वप्रणाली सादर केल्यासारखं होईल.

बौद्ध विज्ञान व तत्त्वज्ञान यांवरील शिकवणुकी धर्माच्या अलाहिदा अकादमिक विषयांमधूनही अभ्यासणं शक्य आहे, असं परम पूजनीय दलाई लामा अनेकदा सांगतात. हे भारतीय विज्ञान व तत्त्वज्ञान यांनाही लागू होतं. पण या प्राचीन ज्ञानाचं पुनरुज्जीवन करणं म्हणजे केवळ अकादमिक संस्थांच्या संग्रहालयातील सामग्रीचा अभ्यास केल्यासारखं असू नये, तेवढ्यापुरतंच ते जतन केलं जाऊ नये. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये दक्षिण आशियाई अभ्यास केंद्र आहेत, त्यामध्ये प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक्रम चालवले जातात. नवीन नालंदा विद्यापीठ सुरू करून असे अभ्यासक्रम भारतातही चालवणं, त्यामध्ये विशेष पदवी संपादित करता येणं, हे एक महत्त्वाचं पाऊल ठरेल, पण ते पुरेसं नाही.

परम पूजनीय दलाई लामा नेहमी म्हणतात त्याप्रमाणे, भावनिक आरोग्याचं महत्त्व व मूल्य लहान मुलांपर्यंतही न्यायला हवं, त्यासाठी ही मूल्यं सर्व पातळ्यांवरील शालेय अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करायला हवीत, बालवाडीपासून विद्यापीठापर्यंत याचा समावेश व्हायला हवा. समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मुलांच्या शिक्षणापासून सुरुवात करणं होय, अशी परम पूजनीय दलाई लामांची ठाम धारणा आहे. त्यामुळे अहिंसा व करुणा यांसोबतच भावनिक आरोग्यासारखी प्राचीन भारतीय मूल्यंही मुलांच्या शिक्षणातील सध्याच्या भौतिकतावादी दृष्टिकोनाला पूरक म्हणून शिकवायला हवीत, अशी मांडणी परम पूजनीय दलाई लामा करतात.

समाजावर सर्वांगीण सकारात्मक परिणाम करण्यासाठी सर्वांत स्थिर मार्ग म्हणजे इहवादी शिक्षणव्यवस्थेमध्ये प्राचीन भारतीय मूल्यं समाविष्ट करणं. या मूल्यांना चालना देणाऱ्या शिकवणुकी भारतीय स्त्रोतांमधून उगम पावलेल्या आहेत आणि त्यांची मूलभूत गृहितकं सर्व भारतीय विचारांमध्ये सापडतात, त्यामुळे या मूल्यांचं पुनरुज्जीवन पहिल्यांदा भारतात व्हावं, असं परम पूजनीय दलाई लामा म्हणतात. या कार्यक्रमाच्या परिणामांवरून ही मूल्यं जागतिक पातळीवर अशी पार्श्वभूमी नसलेल्यांपर्यंत नेण्यासाठीच्या व्यूहरचना तयार करता येतील.

या शिकवणुकींचं व मूल्यांचं खऱ्या अर्थाने पुनरुज्जीवन करण्यासाठी वर्तमानकालीन जीवनातील अडचणींमध्ये लोकांना याचं उपयोजन कसं करायचं याची स्पष्टीकरणं व व्यावहारिक मार्गदर्शन देणंही आवश्यक आहे. यासाठी या शिकवणुकी, भारतातही, इहवादी चौकटीमध्ये मांडाव्या लागतील. कर्म, पुनर्जन्म व मुक्ती यांसारखे मूळ धार्मिक पैलू टाळून ही मांडणी करावी लागेल. अनेक बौद्ध व बौद्धेतर तत्त्वप्रणाली अनेकदा या विषयांचं स्पष्टीकरण परस्परविरोधी रितीने करतात, त्यामुळे हे विशेष महत्त्वाचं ठरतं. परंतु, सामायिक भूमी शोधणं जास्त गुंतागुंतीचं आहे, कारण स्वत्व, सत्य व वास्तव यांविषयीच्या या विविध बौद्ध व बौद्धेतर तत्त्वप्रणालींची तात्त्विक प्रतिपादनंदेखील परस्परांच्या विरोधात जाणारी असतात. धर्म व तत्त्वज्ञानाच्या प्रांतातील ही भिन्न प्रतिपादनं भावनिक आरोग्याच्या विविध बाजू मांडताना अडचणीची ठरतात.

उदाहरणार्थ, वास्तवाविषयीचा अजाणपणा हे दुःखाचं कारण आहे, असं प्रतिपादन सर्व भारतीय तत्त्वप्रणालींमध्ये केलं जातं. विध्वंसक व रचनात्मक अशा सर्व भावनांमध्ये, त्याचप्रमाणेच सुख व दुःखाच्या भावनांमध्येही असा अजाणपणा अंतर्भूत असतो, असेही सामायिक प्रतिपादन या तत्त्वप्रणाली करतात. हा अजाणपणा दूर करून दुःख संपवण्यासाठी आपण खालील मार्ग अनुसरू शकतो, यावर या तत्त्वप्रणालींमध्ये सहमती आहे-

 • मनाला गोष्टी कशा कळतात हे जाणून घ्यावं,
 • जाणून घेण्याचे वैध व अवैध मार्ग यांच्यात भेद करावा, आणि
 • तर्क व विवेक यांचा वापर करावा.

इथे या तत्त्वप्रणालींमधील साधर्म्य संपतं. स्वत्व ही न बदलणारी गोष्ट आहे, दुःख व पुनर्जन्म यांपासून मुक्ती मिळाल्यावरही शरीर व मनाच्या अलाहिदा स्वत्व स्वतंत्रपणे अस्तित्वात राहतं, असं बौद्धेतर प्रणालींचं प्रतिपादन आहे. या प्रतिपादनानुसार, अजाणपणापासून मुक्त होणं म्हणजे सर्व भावभावनांपासून मुक्त होणं. त्यामुळे अशी मुक्ती मिळवण्यासाठी आपण रचनात्मक व विध्वंसक आणि सुख व दुःख अशा सर्व भावनांवर मात करायला हवी. अशा रितीने शरीर, मन, भावना इत्यादींच्या अलाहिदा स्वत्व अस्तित्वात राहू लागतं.

याउलट, स्वत्व शरीर व मन यांवरच अवलंबून अस्तित्वात असतो, मुक्ती मिळाल्यावरही त्याचं अस्तित्व असंच असतं, असं बौद्ध प्रणालींमध्ये शिकवलं जातं. अजाणपणा दूर केल्यानंतर, आपल्यात रचनात्मक भावना उरतात, त्यांना अजाणपणा व सुखाच्या भावनांची बाधा झालेली नसते. असं मुक्त स्वत्व या अबाधित भावनांच्या आधारे अस्तित्वात असतं, अजाणपणापासून अबाधित शरीर व मन यांच्याद्वारे त्याचा अनुभव घेतला जातो. तर, वास्तवाविषयीच्या अजाणपणापासून स्वतःला मुक्त करण्यावर भावनिक आरोग्य अवलंबून असतं, यावर बौद्धेतर व बौद्ध प्रणालींमध्ये सहमती असली, तरी यातून निष्पन्न होणारी अवस्था दोन्ही प्रणालींनुसार बरीच भिन्न आहे. सुखाच्या कोणत्याही भावभावना नसणं, ही भावनिक आरोग्याची आदर्श स्थिती आहे, असं बौद्धेतर तत्त्वप्रणालींमध्ये मानलं जातं, तर प्रेम व करुण यांसारख्या अबाधित रचनात्मक भावना व अबाधित सुख असावं, ही बौद्ध प्रणालीमधील आदर्श स्थिती आहे. अशा प्रकारे विविध प्राचीन भारतीय तत्त्वप्रणालींमधील तात्त्विक व धार्मिक प्रतिपादनांचा आदर्श भावनिक आरोग्याविषयीच्या प्रतिपादनांवर मोठा परिणाम होतो.

विद्यापीठांमधील अकादमिक विषय म्हणून भावनिक आरोग्याविषयीच्या प्राचीन भारतीय शिकवणुकींचं पुनरुज्जीवन करताना मन, बोधविषयक सिद्धान्त, जाणून घेण्याचे मार्ग व तर्कविवेकाचे मार्ग यांच्या भावनिक नकाशाची मांडणी विविध तत्त्वप्रणालींमध्ये कशी केली आहे, हे विचारात घ्यावं लागेल. त्यानुसार निखळ वैज्ञानिक पैलूंनुसार त्यांचे धार्मिक व तात्त्विक संदर्भ शिकवावे लागतील. हे भेद हाताळण्याइतकी बौद्धिक प्रगल्भता विद्यार्थ्यांमध्ये असायला हवी. परंतु, भिन्न दृष्टिकोन असलेल्या धार्मिक व तात्त्विक शिकवणुकी शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाठी खूप जास्त गुंतागुंतीच्या व गोँधळवणाऱ्या ठरू शकतात.

मग शिक्षणव्यवस्थेमध्ये समाविष्ट करता येतील अशी भावनिक आरोग्याविषयीची कोणती प्राचीन भारतीय मूल्यं सार्वत्रिक स्वरूपाची आहेत? ही मूल्यं अशी-

 • आपलं मन कसं काम करतं हे जाणून घेण्याचं मूल्य व महत्त्व
 • आपल्या भावनांचं विश्लेषण करणं आणि आपल्या मनोवृत्तीने व आपण कसा विचार करतो याने त्यावर परिणाम कसा होतो हे जाणून घेणं यातील मूल्य व महत्त्व
 • आपल्या भावना व मनोवृत्ती यांचा आपल्या वर्तनावर व कल्याणावर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यातील मूल्य व महत्त्व
 • तर्काधारित चिकित्सक व बुद्धिप्रामाण्यवादी वागण्यातील मूल्य व महत्त्व

यात आपण पुढील गोष्टीचाही समावेश करू शकतो-

 • एकाग्रता व मर्मदृष्टी विकसित करण्यासाठी नैतिक शिस्त व साधान यांची मूल्यं

या मूल्यांच्या संदर्भातील तात्त्विक व धार्मिक मतभेद शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दुय्यम महत्त्वाचे आहेत.

या प्राचीन भारतीय मूल्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठीच्या काही व्यावहारिक, परिणामकारक पद्धती कोणत्या?

भावनिक आरोग्यावरील बौद्ध शिकवणुकींच्या पुनरुज्जीवनासाठी गरजेचं पहिलं पाऊल परम पूजनीय दलाई लामांनी आधीच टाकलं आहे. बुद्धाच्या उक्तीवर भारतीय गुरूंनी केलेल्या भाष्यांची तिबेटी भाषांतरं तेंग्यूर या नावाने संकलित झाली आहेत, त्यातून बौद्ध विज्ञान व तत्त्वज्ञानाची सामग्री जमवण्याचं काम दलाई लामांनी काही तिबेटी अभ्यासकांवर सोपवलं आहे. हे महाकाय कार्य आता पूर्ण झालं असून तिबेटी भाषेमध्ये प्रकाशित झालं आहे. सायन्स अँड फिलॉसॉफी इन द इंडियन बुद्धिस्ट क्लासिक्स या नावाने ते इंग्रजीतही अंशतः भाषांतरित झालं आहे. इतर आधुनिक भाषांमध्ये याचं भाषांतर करण्याचीही योजना आहे. या कामाचा दुसरा खंड, माइंड, इंग्रजीत उपलब्ध झाला असून भावनिक आरोग्याविषयीची सामग्री त्यात आली आहे. प्राचीन भारतीय मूल्यांचं पुनरुज्जीवन करायच्या परम पूजनीय दलाई लामांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेने टाकलेलं हे मोठं पाऊल आहे.

अशा प्रकारे बौद्धेतर भारतीय तत्त्वप्रणालींमध्ये सापडणारी मूल्यं शिकवण्यासाठी तशाच प्रकारची अभिजात संहितामधील संकलनं व भाषांतरं गरजेची आहेत. 

तेंग्यूरमधून जमवून भाषांतरित करण्यात आलेली भावनिक आरोग्याविषयीची सामग्रीही आधुनिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी अनेक आव्हानं पार करावी लागतात. भारतीय संहिता, त्यांच्या भारतीय भाष्यांसह वाचल्या तरी त्या समजून घ्यायला खूप अवघड आहेत. त्यासाठी आणखी स्पष्टीकरण द्यावं लागतं. त्यातील शिकवणुकींचं पुनरुज्जीवन करणं अधिक गुंतागुंतीचं होतं, याचं एक कारण असंही आहे की, नालंदा परंपरेचे वारस असलेल्या विविध तिबेटी गुरूंनी या भारती संहितांचं अर्थनिर्णयन अतिशय वेगळं आणि अनेकदा अंतर्विरोधी रितीने केलं आहे. बोधविषयक सिद्धान्तांच्या आणि आकलन मार्गांच्या विश्लेषणामध्ये हे विशेषत्वाने दिसून येतं.

उदाहरणार्थ, शाक्य पंडितांच्या (सा-पान) भाष्यांचे अनुयायी शाक्य, कग्यू व न्यिंग्मा यांनी असं प्रतिपादन केलं आहे की, दृश्य बोध असांकल्पनिक असतो आणि त्यात एका वेळी रंगीत आकारांचा एकच क्षण लक्षात येतो, उदाहरणार्थ एखाद्या संत्र्याचा रंगीत आकार एका क्षणी कळू शकतो. दृश्य बोध या रंगीत आकारांना व्यवहारातील वस्तू म्हणून लक्षात घेत नाही. ध्वनी, वास, चव व शारीरिक संवेदनेसारखी एक व्यवहारातील वस्तू म्हणून आणि काही काळ राहणारी वस्तू म्हणून संत्र्याचा बोध होण्यासाठी सांकल्पनिक बोधक्षमता गरजेची असते. केवळ अशा सांकल्पनि बोधाद्वारे ती वस्तू संत्रं असल्याचं निश्चित करता येतं.

याउलट, चापाचे (फ्यावा-पा) गेलुग अनुयायी असं प्रतिपादन करतात की, दृश्य बोधक्षमता संत्र्याच्या रंगीत आकारांचं केवळ क्षणभर आकलन करून घेत नाही, तर संत्र्याचंही आकलन तिला होतं, आणि ही एक व्यवहारातील वस्तू आहे हेदेखील त्याद्वारे लक्षात येतं. या दोन परस्परविरोधी दृष्टिकोनुंळे भावनिक आरोग्याच्या इतर अनेक पैलूंच्या अर्थनिर्णयनांवर परिणाम होतो- उदाहरणार्थ, वैध बोध म्हणजे काय आणि वास्तव काय असतं?

भारतीय बौद्ध स्त्रोतांमधील शिकवणुकींचं सुस्पष्ट आकलन होण्यासाठी अशा तिबेटी स्पष्टीकरणांची पूरक जोड गरजेची आहे. पण अशा प्रकारच्या वैविध्यपूर्ण स्पष्टीकरणांची भर भावनिक आरोग्याच्या केवळ विद्यापीठीय स्तरावरील अकादमिक अभ्यासामध्येच घालावी की विद्यापीठापूर्वीच्या किमान सार्वजनिक शिक्षणाच्या उच्चस्तरांवरही ही भर घालता येईल, हा प्रश्न विचारात घेणंही गरजेचं आहे.

भावनिक आरोग्याच्या प्राचीन भारतीय मूल्यांचं पुनरुज्जीवन करण्यामागील एक मुख्य उद्दिष्ट बुद्धिप्रामाण्यवादी विचारप्रक्रियेला चालना देणं हे असतं. विद्यापीठीय व विद्यापीठपूर्व अशा दोन्ही स्तरांवर या प्रश्नाचं संभाव्य उत्तर असं असू शकतं की, विद्यार्थ्यांना प्राचीन भारतीय तर्काची उपकरणं उपलब्ध करून द्यावीत आणि विविध सिद्धान्तांच्या गुणावगुणांबद्दल त्यांना वादचर्चा करून द्यावी. विविध बौद्ध व बौद्धेतर तत्त्वप्रणालींमध्ये ज्या मुद्द्यांवर- उदाहरणार्थ आदर्श भावनिक आरोग्य म्हणजे काय- मतभेद होतात, तिथेही ही प्रक्रिया वापरता येईल.

सुरुवात कुठून करायची?

रिक्वेस्ट्स टू द सेव्हन्टीन ग्लोरियस नालंदा मास्टर्स या संहितेमध्ये परम पूजनीय दलाई लामांनी नालंदातील गुरूंच्या बौद्ध शिकवणुकींचा अभ्यास करण्यासंबंधी आधुनिक मानसिकतेला अधिक सुसंगत असा दृष्टिकोन सुचवला आहे. याची सुरुवात दोन सत्यं जाणून घेऊन करावी, मग दोनावरून चार सत्यं जाणण्याच्या टप्प्याकडे जावं, आणि मग चारावरून तीन आश्रयांकडे जावं. इहवादी रितीने भावनिक आरोग्य शिकवण्याची सुरुवात करण्यासाठीही हा क्रम उपयुक्त ठरू शकतो. परंतु, तिसरा मुद्दा आश्रयाच्या तीन बौद्ध रत्नांच्या संदर्भातच निश्चित करण्याची गरज नाही. दुःखापासून संरक्षणासाठी आपल्या जीवनात अंगीकारायची सुरक्षित दिशा, या संदर्भात त्या मुद्द्याची मांडणी करता येईल.

परम पूजनीय दलाई लामांच्या शिफारशीचा विचार करू. अगदी सर्वसाधारण शब्दांमध्ये सांगायचं तर, एका बाजूला आपण भ्रामक देखाव्यांना सत्य मानतो, तर दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष वास्तव, अशी दोन सत्यं असतात. गोष्टी आपल्याला भावनिकरित्या सत्य असल्याप्रमाणे जाणवतात, म्हणून आपण त्या सत्य असल्याचं मानतो, तेच वास्तव आहे असंही आपण अचिकित्सकपणे स्वीकारतो. पण हा फसवा देखावा तपासला, तर तो भ्रम असल्याचं दिसतं; ते वास्तव नसतं. प्रत्यक्ष वास्तव तथ्यांवर आधारित असतं आणि त्याची पडताळणी करता येते; सूक्ष्म तपासणी केली असता भ्रम खोटा असल्याचं दिसतं. आपल्या पलंगामध्ये सैतान आहे अशी कल्पना करून, नंतर मग वास्तवाकडे पाहून तसं काहीच नसल्याचं दिसतं, या संदर्भात हा भेद प्रत्येक लहान मुलामुलीला लक्षात येऊ शकतो.

दोन सत्यांमधील भेद मुलांच्या लक्षात आला की चार सत्यांच्या अधिक सार्वत्रिक संकल्पनेची ओळख त्यांना करून देता येते. त्यांच्या कल्पनाच सत्य आहेत असं त्यांना वाटू लागलं तर ते घाबरतात व त्यांना झोप लागत नाही. त्यांना दुःख होतं. आपण वास्तव म्हणून ज्याची कल्पना केली ते खरं म्हणजे वास्तव नाही, हे माहीत नसल्यामुळे त्यांना दुःख सहन करावं लागतं. परंतु, त्यांच्या पलंगात असा कोणी सैतान नसल्याचं त्यांनी लक्षात घेतलं तर त्यांची भीती व दुःख निघून जाईल.

दुःखाची चार सत्यं, त्याचं कारण असलेला वास्तवाविषयीचा अजाणपणा आणि वास्तव जाणून घेऊन दुःखापासून मुक्त होणं, हे आकलन करून घेतल्यावर त्या आधारे मुलांना पुढील विचार करणं शिकवता येतं: “पुन्हा कधी भीती न वाटणं किंवा दुःखी न होणं किती छान असेल. गोष्टी स्पष्टपणे समजून घेणं किती छान असेल. माझ्या मनाचं शिक्षण व प्रशिक्ष करून मी त्या स्थितीपर्यंत पोचू शकतो. मला त्या दिशेने जायचं आहे; त्या सुरक्षित दिशेने जाऊन मी स्वतःचं भयापासून व दुःखापासून संरक्षण करू शकेन.”

अशा प्रकारे दोन सत्यांपासून चार सत्यांपर्यंत जाण्याची सुरक्षित दिशा जीवनामध्ये स्वीकारली, तर केवळ मुलांनाच नव्हे, तर सर्व वयाच्या लोकांना लक्षात येईल की, त्यांच्या भयाचा व दुःखाचा मुख्य स्त्रोत प्रत्यक्षात त्यांचं मन व अस्वस्थकारक भावना हाच आहे आणि या समस्यांवर मात करण्यासाठी भावनिक आरोग्य कमावणं अतिशय मूल्यवान आहे. भावनिक आरोग्याचे लाभ व मूल्य लक्षात घेणं आणि ते साध्य करण्याची इच्छा विकसित करणं, हा पुढील सर्व प्रशिक्षाचा आवश्यक पाया आहे. 

फसवा देखावा व वास्तव यांच्यातील भेद समजून घेण्याचा हा पाया पक्का झाला की पुढची पायरी म्हणून भावनिक आरोग्याच्या साधनांची ओळख करून द्यावी. प्रत्येक बौद्ध व बौद्धेतर तत्त्वप्रणालीमध्ये या प्रत्येक साधनाबाबत भिन्न प्रतिपादनं असल्यामुळे सुरुवात म्हणून आपण साधनांच्या संपूर्ण साधनांची ओळख करून घ्यायला हवी, त्यांचे स्पष्टीकरण ढोबळ मानाने व्हायला हवं, जेणेकरून सर्व प्रणालींमध्ये स्वीकारार्ह असणारी साधनं समजतील. त्यानंतर अधिक प्रगत विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रणालीमधील साधनांच्या संपूर्ण संचाचं स्पष्टीकरण तपशिलामध्ये करून द्यावं. एका वेळी एकच प्रणाली अभ्यासाला घ्यावी. सर्व प्रणाली एकत्र करून स्पष्टीकरण करणं अन्याय्य ठरेल.

मन व भावना समजून घेण्यासाठी व त्यांच्या प्रशिक्षणासाठी आधी मन व भावना म्हणजे काय, हे समजून घेणं गरजेचं आहे. सांख्य व वैशैषिक यांसारख्या काही बौद्धेतर प्रणाली मन व भावना यांना भौतिक अस्तित्व मानतात. मन व भावना यांना मेंदूच्या शारीरिक प्रक्रियांपुरतंच सीमित ठेवणाऱ्या पाश्चात्त्य वैज्ञानिक विचारांशी साधर्म्य सांगणारा हा दृष्टिकोन आहे. बौद्धेतर न्याय पंथ वैशेषिकांचं भौतिकतावादी प्रतिपादन स्वीकारतो, पण मन व भावना यांना स्वतंत्र अस्तित्व म्हणून जाणण्याचे वैध मार्गही नमूद करतो. याउलट बौद्ध प्रणालींमध्ये मनाला निखळ शारीरिक अस्तित्व किंवा शारीरिक प्रक्रिया मानलं जात नाही, तर मन म्हणजे स्पष्टता व जागरूकता असं मानलं जातं. परम पूजनीय दलाई लामा यांनी स्पष्ट केल्यानुसार, स्पष्टता म्हणजे आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे वस्तूचा बोधात्मक पैलू समोर आणण्याची कृती; र, त्या वस्तूशी काही ना काही प्रकारे बोधात्मकदृष्ट्या संपर्क साधण्याची क्रिया म्हणजे जागरूकता. तर, स्पष्टता व जागरूकता एकाच मानसिक घटनेचं स्पष्टीकरण देतात.

बोधक्षमतेला भावनेसोबतच मन कशा रितीने समोर आणतं, हे मांडताना सर्व बौद्ध व बौद्धेतर प्रातील स्वत्वाची भूमिका अधोरेखित करतात. पण स्वत्व आणि मन व भावनेशी असलेले त्याचे संबंध याबाबतीत या प्रणालींचे दृष्टिकोन परस्परविरोधी असल्याचं मांडल्याशिवाय, हे विभिन्न दृष्टिकोन भावनिक आरोग्याच्या उद्देशाने भावनेसोबतची बोधक्षमता स्वीकारतात- वस्तूंच्या व्यक्तिनिष्ठ अनुभवाचा संदर्भ या क्षमतेला असतो. ही व्याख्या कशाचे सूचन करते, हे साध्या पाठांनी ओळखता येतं.

यानंतर सामायिक भूमी म्हणून मनाचा व भावनांचा नकाशा आखणं, हे पुढचं पाऊल असेल. सर्वाधिक सार्वत्रिक स्वरूपाच्या नकाशामध्ये ज्ञानेंद्रियांच्या पातळीवरील व मानसिक पातळीवरील बोधांच्या प्रकारांचा आणि रुची, लक्ष, एकाग्रता, सुख वा दुःखाच्या भावपातळ्या अशा प्राथमिक मानसिक घटकांचा समावेश करणं गरजेचं आहे. शिवाय, प्रेमापासून संतापापर्यंतच्या विविध भावनांचाही समावेश करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे विचार, बोलणं व वागणं यांच्या विविध प्रकारांवर त्यांचा परिणाम कसा होतो, हेही समजून घ्यायला हवं. सर्व प्राचीन भारतीय प्रणालींमध्ये सामायिकरित्या येणारे प्राथमिक मानसिक घटक व भावना यांची यादी संकलित करण्यासाठी अधिक संशोधन गरजेचं आहे, पण उत्कट अभिलाषा, संताप व अजाणपणा हे प्राथमिक त्रासदायक घटक असल्याचं या सर्वच प्रणालींमध्ये नमूद केलेलं आहे.

असांकल्पनिक व सांकल्पनिक बोधकार्य कशा रितीने चालतं, याबद्दलची मांडणी त्यानंतर करावी. यामध्ये दोन्ही प्रकारच्या वस्तूंची चर्चा होईल. त्यानंतर या मांडणीचा विस्तार करून वस्तू जाणून घेण्याचे, विशेषतः निखळ बोध व अनुमान करण्याचे विविध वैध व अवैध मार्ग सांगता येतील. अनुमानाविषयीची चर्चा स्वाभाविकपणे वादचर्चेकडे जाते आणि युक्तिवादाच्या वैध व अवैध मार्गांकडे जाते. अखेरीस, या सार्वत्रिक अभ्यासाला पूरक जोड म्हणून प्राथमिक साधनापद्धतींची ओळख करून देता येते, एकाग्रता व मर्मदृष्टी विकसित करण्यासाठी ही साधना गरजेची असते.

सर्व प्राचीन भारतीय तत्त्वप्रणालींमध्ये सामायिक असलेल्या या भावनिक आरोग्याच्या साधनांचा सार्वत्रिक आढावा घेऊन झाल्यावर विद्यार्थ्यांना त्यांचा अंगभूत कल, क्षमता व रुची यांनुसार एकेक करून प्रत्येक प्रणालीचा सखोल अभ्यास करता येईल, किंवा एकाच प्रणालीमध्ये विशेष ज्ञान मिळवता येईल. पण प्रशिक्षणाच्या प्रत्येक पातळीवर पाठ द्यावेत जेणेकरून विद्यार्थी काय शिकतायंत ते ओळखू शकतात व त्याचं उपयोजन करू शकतात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील दाखल्यांवरून त्यांना अभ्यास करणं शक्य होतं. आमच्या studybuddhism.com या संकेतस्थळावर, बर्झिन अर्काइव्ह्जच्या चमून असे अनेक पाठ आधीच विकसित केलेले आहेत.

इथे नमूद केलेले असे प्रशिक्षणाचे कार्यक्रम पुढे जाऊन भावनिक आरोग्यासंदर्भातील प्राचीन भारतीय मूल्यांच्या पुनरुज्जीवनाची परम पूजनीय दलाई लामांची वचनबद्धता पूर्ण करू शकतात. ते नेहमी म्हणतात त्याप्रमाणेत, “मानव प्राणी म्हणून आपल्याकडे बुद्धिमत्ता असते आणि गोष्टींचा विचार आपल्याला करता येतो. सुख जोपासण्यासाठी व दुःख कमी करण्यासाठी आपण आपल्या मनाचा वापर करून विचार बदलू शकतो.” धन्यवाद.

Top