प्रेम कसे विकसित करावे

How to develop love derek thomson unsplash

वैश्विक प्रेम – प्रत्येक जण सुखी व्हावा अशी आशा आणि प्रत्येकाच्या सुखाचे कारण होण्याचा प्रयत्न – आपले जीवन इतरांशी कशा रीतीने जोडले गेलेले आहे, याच्या जाणिवेतून उत्पन्न होते. आपण प्रत्येक जण मानवतेचा अंश आहोत, आणि आपले हित संपूर्ण जागतिक समुदायाशी जोडले गेलेले आहे – आपल्या पैकी कोणीही आर्थिक संकट किंवा हवामान बदलाच्या परिणामांपासून दूर राहू शकत नाही. मानवतावादाशी आपला परस्परसंबंध असल्याने, प्रत्येकाप्रति प्रेमभाव बाळगणे उचित आहे.

इतरांप्रति प्रेमभावाची मशागत आपले मन स्थिर ठेवते. हाच जीवनातील यशाचा अंतिम स्रोत आहे. – १४वे दलाई लामा

प्रेमभाव विकसित करण्यासाठी आपल्याला एकमेकातील परस्परसंबंध समजून घेणे आवश्यक आहे. जे काही आपण खातो, वापरतो किंवा ज्या गोष्टींचा आनंद घेतो ते इतरांच्या कष्टातून आलेले असते. अगदी आत्ता ज्या इलेक्ट्रॉनिक उपकरणावर तुम्ही हे वाचत आहात, त्याचाच विचार करा, जगाच्या कानाकोपऱ्यातल्या हजारो लोकांच्या प्रयत्नातून ते साकारले गेलेले आहे. यावर गहन विचार केल्यास आपल्यात इतरांशी जोडले असल्याचा आणि प्रत्येकाप्रति कृतज्ञतेचा भाव उत्पन्न होतो, ज्यातून आपल्या खोल अंतर्मनात आनंदाच्या अनुभूतीची जाणीव होते. यातून आपल्यात इतरांप्रति आत्मीयतेची आणि काळजीची नैसर्गिक भावना उत्पन्न होते; या भावना वैश्विक प्रेमाचा आधार आहेत.

दयाळू प्रेमभाव विकसित करण्यासाठी लघु ध्यानधारणा

सर्वप्रथम आपल्याला स्वतःप्रति दयाळू प्रेमभाव विकसित करणे गरजेचे आहे. आपण स्वतः सुखी होण्याची इच्छा बाळगली नाही, तर आपण इतरांच्या सुखाची इच्छा कशी बाळगणार?

अशा एका खोल भावनेतून आपली सुरुवात होतेः

  • मी सुखी असतो आणि माझ्याजवळ सुखी असण्याची कारणे असती, तर किती छान झाले असते.
  • माझी इच्छा आहे की मी सुखी असावे.
  • कदाचित मी स्वतःसाठी सुख निर्माण करू शकतो.

एकदा आपण स्वतःच्या सुखाची तीव्र मनोकामना केली की आपण त्या भावनेचा विस्तार करून तो विचार एका व्यापक गटाला लागू करू शकतोः

  1. प्रथम आपण आपले प्रियजन आणि मित्रांप्रति प्रेमाभाव बाळगण्याचे उद्दिष्ट ठेवतो.
  2. त्यानंतर आपल्याला दररोज भेटणाऱ्या तटस्थ व्यक्तींसाठी त्या प्रेमभावनेचा विस्तार करतो.
  3. नंतर आपल्याला बिलकूल न आवडणाऱ्या लोकांसाठी आपण प्रेमभाव विकसित करतो.
  4. कालांतराने आपण संपूर्ण जग आणि सर्व सजिवांबद्दल प्रेमभाव बाळगण्याचे उद्दिष्ट ठेवतो.

या प्रकारे आपण केवळ स्वतःबद्दल आणि आपल्या भोवतालाबद्दलच नव्हे, तर संपूर्ण जीवसृष्टीविषयी प्रेमभाव विकसित करतो.

इतरांना सुखी करण्यासाठी जर आपण काही करू शकत असू, तर ते आपण करायला हवे. ते शक्य नसेल तर त्यांना ज्या गोष्टीतून अल्पकालीन नाही, तर दीर्घकालीन सुखाच्या दिशेने मार्गक्रमण करता येईल, अशी गोष्ट उपलब्ध करून देण्याची कल्पना करायला हवी. हे फक्त अनाथांना अन्न, वस्त्र आणि निवारा पुरवण्यापुरते मर्यादित नाही – सरतेशेवटी अनेक श्रीमंत आणि यशस्वी लोकही दुःखी अवस्थेत आहेत आणि त्यांनाही आपल्या प्रार्थनेत सामावून घ्यायला हवे. हळूहळू आपले कुटुंब, मित्रपरिवार आणि आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येकाप्रति निसर्गतः प्रामाणिक प्रेमभाव उत्पन्न होईल, ज्यातून आपल्यासोबतच इतरांनाही सुखप्राप्ती होईल.  

Top