ध्यानधारणा म्हणजे काय?

Study buddhism what is meditation

ध्यानधारणा उपकारक मनोवस्था विकसित करणारी पद्धती आहे. यासाठी आपण विशिष्ट मनोवस्था सवयीच्या होत नाहीत, तोपर्यंत नित्यनेमाने त्यांचा सराव करतो. शारीरिक स्तरावर असे आढळून आले आहे की ध्यानधारणेमुळे मज्जासंस्थेचे नवे मार्ग विकसित होतात.

ध्यानधारणेचे फायदे

अशा अनेक उपकारक मनोवस्था आहेत, ज्या ध्यानधारणेच्या माध्यमातून विकसित करणे शक्य आहे.

  • तणावातून मुक्ती आणि अधिक आरामकारक स्थितीचा लाभ
  • अधिक लक्षकेंद्री आणि चंचलतेपासून मुक्ती
  • सततच्या चिंतांपासून मुक्ती, अधिक स्थिर चित्त
  • स्वतःचे, स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनाचे योग्य आकलन
  • प्रेम आणि करुणासारख्या सकारात्मक भावनांमध्ये वृद्धी

आपल्यातील बहुतांशी लोकांना शांत, आनंदी मनाची अपेक्षा असते. तणावात वा नकारात्मक स्थितीत आपण दुःखी होतो. त्याचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो आणि ही स्थिती आपले भविष्य, कौटुंबिक जीवन आणि मैत्रीपूर्ण नातेसंबंध नष्ट करते.

आपण तणावाला आणि शीघ्रकोपीपणाला कंटाळलेले असू तर आपण नव्या पद्धतींचा – ध्यानधारणेसारख्या – शोध घ्यायला हवा. ध्यानधारणा कोणत्याही नकारात्मक परिणामांशिवाय आपल्यातील कमतरतांवर मात करण्यास मदत करते.

[पाहाः ध्यानधारणा कशी करावी]

ध्यानधारणेप्रति आपल्याला वास्तववादी दृष्टिकोनाची गरज आहे. हे सकारात्मक परिणाम घडवणारे एक साधन जरूर आहे, पण जलद किंवा तात्काळ इलाज करणारे रामबाण औषध नाही. फक्त एका कृतीने परिणाम साधणे शक्य नाही, तर त्यासाठी कारण आणि स्थितीच्या एका समूहाची गरज आहे. उदाहरणार्थ उच्च रक्तदाबासारख्या समस्येत ध्यानधारणा उपयुक्त ठरू शकते, पण अधिक प्रभावी परिणामांसाठी आपल्याला आपल्या आहारात बदल करायला हवा, व्यायाम करायला हवा आणि योग्य औषधे घ्यायला हवीत.

बौद्ध ध्यानधारणेचे प्रकार

ध्यानधारणेचे अनेक प्रकार आहेत, आणि ते सर्वच मनःशांती देतात, पण ते काही अंतिम ध्येय नाही. तरीही सकारात्मक मनोवस्था प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यापूर्वी तणाव मुक्त होणे अर्थातच आवश्यक असते. त्यामुळे आपण श्वासावर लक्ष केंद्रित करून आपले चित्त स्थिर करतो आणि त्यानंतर आपण दोन प्रकारच्या – विवेकी आणि स्थिरतादायी – बौद्ध ध्यानधारणांचा अभ्यास करतो.

विवेकी ध्यानधारणांना सामान्यतः ‘चिकित्सात्मक’ संबोधले जाते. ज्यात आपण प्रेमासारख्या सकारात्मक भावना विकासित करण्याच्या प्रक्रियेला पायरी दर पायरी विवेकी विचारांची जोड देतो. ज्यात आपण परिस्थितीची योग्य चिकित्सा करून तिच्या क्षणिकतेचे योग्य आकलन करून घेतो. किंवा आपण बुद्धासारख्या सगुण प्रतिमेची कल्पना करून परिस्थितीच्या आकलनाचा प्रयत्न करतो.

स्थिरतादायी ध्यानधारणेत आपण सकारात्मक मनोवस्था कायम ठेवण्यासाठी सचेतनता, ध्यान आणि एकाग्रतेचा वापर करतो. किंवा आपण आपल्या मनात उभ्या केलेल्या विशिष्ट प्रतिमेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्या साधनांचा वापर करतो.

अशा प्रकारे आपण क्रमाक्रमाने या दोन्ही ध्यानधारणांचा अभ्यास करतो. जेव्हा आपण ती इच्छित मनोवस्था प्राप्त करतो, तेव्हा ती मनोवस्था स्थिर होते;  आणि जेव्हा आपले त्या मनस्थितीवरील नियंत्रण हरवते, आपण ती स्थिती पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो.

दैनंदिन जीवनासाठी ध्यानधारणा

ध्यानधारणेचा उद्देश फक्त आपण घरी असताना चित्त स्थिर आणि केंद्रित ठेवून प्रेमाचा अनुभव करण्यापुरता मर्यादीत नाही, तर त्याचा दैनंदिन जीवनात प्रभाव टाकण्याविषयी आहे. नियमित ध्यानधारणेमुळे आपण सकारात्मक भावना सवयीच्या करू शकतो आणि दिवसा-रात्री गरज पडेल तेव्हा त्यांचा वापर करू शकतो. परिणामतः तो आपला जैविक भाग होऊन जातो, ज्यामुळे आपण विनासायास अधिक प्रेमळ आणि शांत होतो.

जीवनात असे काही क्षण येतील जेव्हा आपल्याला क्रोध आणि तणाव जाणवेल, पण अशा वेळी आपण स्वतःला अधिक प्रेमपूर्वक वागण्याचे स्मरण करून देण्याची गरज असेल. कारण तोपर्यंत आपण नियमित ध्यानधारणेमुळे अशा मनोवस्थेला इतके सरावलेले असू की आपण ती तात्काळ सहजतेने उत्पन्न करू शकू.

[पाहाः  क्रोध नियंत्रित करण्याच्या ८ बौद्ध टिपा]

कोणीच परिपूर्ण नसते. आपल्या प्रत्येकात बदलाव्या वाटतील, अशा काही वाईट सवयी सापडू शकतात. सुदैवाने त्या सवयी काही बदलता न येण्याजोग्या दगडात कोरलेल्या नसतात.

या बदलासाठी इतर कशाही पेक्षा आपले स्वतःचे प्रयत्न अधिक महत्त्वाचे आहेत. आपल्यापैकी अनेक जण व्यायामशाळेत तासंतास खर्च करतात, पण आपले खरे धन असणाऱ्या मनाचा व्यायाम करायला विसरतात. हे सुरुवातीला थोडे कठीण वाटते, पण एकदा ध्यानधारणेमुळे आपल्या जीवनात मिळणारे लाभ पाहिले की आपल्याला मनस्वास्थ्यावर वेळ खर्च करण्यात आनंद गवसेल.

Top