चार आर्य सत्ये कोणती?

What are four noble truths

चार आर्य सत्ये म्हणजे असे मूलभूत घटक आहेत, जे आपल्या समस्यांपासून मुक्ती मिळवून देणाऱ्या मार्गाची रूपरेषा स्पष्ट करतात. ही बुद्धाची पहिली शिकवण आहे, जी संपूर्ण बौद्ध शिकवणीच्या संरचनेचा आधार आहे.

पहिले आर्य सत्यः खरे दुःख

पहिले आर्यसत्य आहे ते म्हणजे सर्वसाधारणतः जीवन असंतोषजनक असते. जन्मापासून मृत्युपर्यंत आनंदाचे अनेक क्षण येतात, पण ते दीर्घकाळ टिकत नाहीत. आणि जीवनात अनेक कटु प्रसंगही असतात.

  • दुःख- आजार, निराशा, एकाकीपण, चिंता आणि असमाधान सहज ओळखता आणि समजता येतात. अनेकदा ते आपल्या भोवतालाशी संबंधितही नसतात- अगदी आपण आपल्या मित्रासोबत आपल्या आवडीचे जेवण घेत असू, पण तरीही दुःखी असू शकतो.
  • क्षणिक सुख- आपण कोणत्याही गोष्टीचा आनंद घेत असलो तरी तो कधीच शाश्वत किंवा समाधान देणारा नसतो. आणि तो अल्पावधितच दुःखात परिवर्तित होतो. जेव्हा आपल्याला बोचरी थंडी वाजत असते, आपण गरम वाटावे म्हणून ऊबदार खोलीत जातो. पण काही वेळाने ती गर्मीही असह्य होऊ लागते आणि आपल्याला पुन्हा ताजी हवा हवी होते. तो आनंद शाश्वत असता तर बरे झाले असते, पण तसे होत नाही, हीच समस्या आहे. 
  • वारंवार निर्माण होणाऱ्या समस्या- सर्वात वाईट म्हणजे जीवनातील चढउतारांचा सामना करण्याची आपली पद्धतच अधिक समस्या निर्माण करते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीसोबतचे आपले नातेसंबंध बिघडलेले असतील, तर आपल्या त्याच्याशी वागण्याच्या पद्धतीमुळे ते संबंध आणखी बिघडू शकतात. पर्यायाने आपण ते नाते संपवू, पण आपल्या वाईट सवयीला खतपाणी घातले गेल्याने पुढील नात्यातही आपण तसाच व्यवहार करू. आणि त्याही नात्याची गत तशीच होईल.

दुसरे आर्य सत्यः दुःखाचे मूळ कारण

आपले दुःख आणि क्षणिक आनंद अकारण निर्माण होत नाहीत, तर अनेक प्रकारची कारणे आणि परिस्थितीतून निर्माण झालेले असतात. आपल्या भोवतालच्या समाजासारखे बाह्य घटक समस्या निर्माण करणारी परिस्थिती निर्माण करतात;  पण बुद्ध आपल्याला दुःखाचे मूळ स्वतःच्या मनात शोधायला सांगतो. आपल्या स्वतःच्या तणाव निर्माण करणाऱ्या भावना- तिरस्कार, असुया, लोभ आणि इतर- आपल्याला विनाशकारी पद्धतीने विचार करायला आणि व्यक्त व्हायला भाग पाडतात.

बुद्धाने याहून अधिक गहन विचार करत या मनस्थितीला जबाबदार असणाऱ्या मूळ कारणांवरील पडदा दूर केला आहेः ते म्हणजे आपली वास्तवाकडे पाहण्याची पद्धत. यात आपल्या स्वभावासोबतच स्वतःच्या, इतरांच्या आणि जगाच्या अस्तित्वाबद्दलच्या तीव्र मिथ्या धारणांमुळे होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांबाबतचे आपले अज्ञान आणि गोंधळ यांचाही समावेश आहे. प्रत्येकातील परस्परसंबंध न पाहताच, आपण समजतो की प्रत्येकाचे अस्तित्व स्वतंत्र आहे, आणि ते इतर बाह्य घटकांवर अवलंबून आहे.

तिसरे आर्य सत्यः दुःखाचे समूळ उच्चाटन/निरोध

बुद्धाने सांगितले आहे की हे आपल्याला सहन करत राहण्याची गरज नाही, कारण आपण दुःखाच्या कारणाचे समूळ उच्चाटन करू शकतो. तेव्हा त्याचा परिणामही उत्पन्न होणार नाही. एकदा आपला वास्तवाबाबतचा भ्रम मिटला की, समस्या पुन्हा निर्माणच होणार नाही. त्यांनी फक्त एक-दोन समस्यांविषयी सांगितलेले नाही- तर कोणतीच नवी समस्या निर्माण होऊ नये, यासंबंधी सांगितले आहे. 

चौथे आर्य सत्यः दुःख निरोधाचा/मनाचा मार्ग

आपले अजाणतेपण आणि अज्ञान संपवण्यासाठी, आपल्याला त्यातील खरा अडसर समजून घ्यायला हवाः

  • तात्काळ मिळणाऱ्या सुखाच्या मागे उड्या मारण्यापेक्षा दीर्घकालीन नियोजन करा.
  • जीवनाच्या लघुत्तम घटकांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा व्यापक चित्राकडे पाहा.
  • आजच्या क्षणी एखादी गोष्ट सहज वाटते म्हणून कृती करण्यापेक्षा आपल्या कृतीचा आपल्या उर्वरीत जीवनावर व पुढील पिढ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन कृती करा.

काही वेळा जीवनातील निराशाजनक स्थितीत आपल्याला वाटते की मद्यपान आणि जंकफुडसारख्या सवयींकडे वळून दुःखापासून लक्ष हटवावे, आणि दीर्घकालीन विचारच करू नये. पण अशा गोष्टींची सवय जडली की आपले जीवन आणि परिणामी आपले कुटुंबही उध्वस्त करणारे गंभीर शारीरिक आजार उद्भवू शकतात. यामागे आपण अनुभवत असलेले परिणाम आपल्या कृतीपासून पूर्ण वेगळे असल्याची कल्पना काम करते. त्यामुळे आपला गोंधळ संपवणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजेः

  • आपल्याला जाणीव असायला हवी की आपला मानवजात आणि संपूर्ण ग्रहाशी परस्परसंबंध आहे. आणि आपल्या अस्तित्वासंबंधीच्या कल्पना वास्तवाशी मेळ साधत नाहीत.

आपण निरंतर ध्यानधारणा करून अशा प्रकारच्या विचाराला प्रोत्साहन दिल्यास, कालांतराने आपल्या निरर्थक कल्पनांचा आधार असणारा गोंधळ संपवू शकतो.

आपण सर्व जण सुखी होऊ इच्छितो, पण काही कारणांनी सुख आपल्या कक्षेत येत नाही. बुद्धाचा सुखाच्या शोधाबाबतचा दृष्टिकोन- वरील चार आर्य सत्यात रेखित केलेला- सर्वांगीण आहे आणि बुद्धाच्या या पहिल्या शिकवणीला २५०० वर्षे उलटली असली तरी ती आजही लागू होते.

चार आर्य सत्यांच्या उपयोगातून आपल्या दैनंदिन समस्यांचा सामना करण्यासाठी तुम्ही बौद्ध असण्याची गरज नाही. आपल्याला हव्या तशाच गोष्टी घडणे शक्य नाही, पण म्हणून चिंताकुल होऊन आशा हरवून बसण्याचीही गरज नाही. खऱ्या आनंदाची प्राप्ती आणि जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारे सर्व घटक चार आर्य सत्यात अंतर्भूत आहेत.

थोडक्यात, आपल्याला खरे दुःख ओळखायला हवे, दुःखाच्या मूळ कारणांपासून मुक्ती मिळवायला हवी, दुःखापासून खऱ्या अर्थाने मुक्ती मिळवायला हवी आणि चित्तशांतीचा खरा मार्ग ओळखायला हवा.


Top