चार आर्य-सत्यांचे सिंहावलोकन

प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात समस्याआणि दुःख अनुभवतो, दुःखाचा सामना करण्यासाठी विविध प्रकारच्या पद्धती सुचवल्या गेल्या आहेत. आजच्या जगात इंटरनेटच्या मदतीने विविध प्रकारच्या तत्त्वज्ञानाची माहिती त्वरित मिळवली जाऊ शकते. इथे आपण २५०० वर्षांपूर्वी बुद्धाने आचरणात आणलेल्या दृष्टिकोनाच्या दृष्टीतून हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, की आपल्याला दुःख का भोगावे लागते आणि आपण शांती व सुख कसे मिळवू शकतो.

प्रस्तावना

बुद्धाच्या शिकवणीकडे पाहताना प्रथम चार आर्य सत्यांकडे पाहायला हवे. तेच सयुक्तिक ठरेल  कारण बुद्धाने आपल्या शिकवणींची सुरुवातही अशीच केली होती. बुद्धाच्या काळातही अनेक धर्म आणि तात्त्विक विचारधारा अस्तित्वात होत्या आणि आज आपल्यासमोर तर त्याहूनही अधिक व्यापक आध्यात्मिक शिकवणी उपलब्ध आहेत.  त्यामुळे जेव्हा आपण बौद्ध धर्माबाबत चर्चा करतो, तेव्हा बौद्ध तत्त्वज्ञानातील वेगळेपण समजून घेणे आवश्यक आहे. अर्थातच इतर धर्मांमधील शिकवणींशी साधर्म्य सांगणाऱ्या अनेक समान शिकवण बौद्ध धर्मातही आहेतःदया, स्नेहभाव, इतरांना नुकसान न पोहचवणं, इत्यादी. या गोष्टी जवळपास सर्व धर्मांमध्ये आणि तत्त्वज्ञानात पाहायला मिळतात. म्हणून केवळ या गोष्टींच्या शिकवणीसाठी बौद्ध धर्माकडे वळण्याची गरज नाही, जरी बौद्ध धर्म दया, प्रेम आणि करुणाभाव विकसित करण्याच्या अनेक तंत्रांच्या दृष्टीने अधिक समृद्ध आहे. आपण बौद्ध शिकवणींमधून इतर काही ज्ञान घेतले किंवा नाही घेतले तरी केवळ या पद्धती निश्चितच लाभकारक आहेत. 

परंतु जर कुणी विचारलं की, ‘बौद्ध धर्माचं खास वैशिष्ट्य काय आहे?’ , तर आपल्याला चार आर्य सत्यांकडे वळावे लागेल. आणि या चार आर्य सत्यांच्या चर्चेत आपल्याला अशा अनेक गोष्टी मिळतील, ज्या दुसऱ्या पद्धतींमध्येसुद्धा समान रूपाने मिळतात.

आपण ‘आर्य सत्य’ संकल्पनेकडे पाहिल्यास, अनुबोधासाठी वापरण्यात आलेला हा आर्य सत्य शब्द थोडासा विचित्र वाटतो. आर्य या शब्दाची अर्थछटा मध्ययुगीन उमराव अशा अर्थाची वाटते, वास्तवात इथे तो शब्द सिद्धीप्राप्त या अर्थाने उपयोगात येतो. इथे चार आर्य सत्ये अशी चार तथ्ये आहेत जी, अशा व्यक्तींकडून खरी मानली गेलेली आहेत, ज्यांनी वास्तवाला तथाकथित संकल्पनात्मकतेच्या पलीकडे जाऊन पाहिले आहे. ही चार तथ्ये खरी असली तरी अनेकांना त्यांचे ज्ञान नसते किंवा अगदी त्यांच्या अस्तित्वाची जाणीवही नसते. 

पहिले आर्य सत्य :

पहिल्या सत्याला ‘दुःख’ म्हटले जाते.  बुध्दांनी सांगितले आहे की, आपले जीवन दुःखाने भरले आहे आणि आपण ज्याला साधारणपणे सुख समजतो, तेही अनेक दुःखांच्या मालिकेशी जोडले गेलेले असते. इंग्रजीतील ‘सफरिंग’ शब्दाला संस्कृतमध्ये ‘दुःख’ म्हटले जाते. ‘सुख’ म्हणजे इंग्रजीतील ‘हॅपिनेस’’ आणि ‘दुःख ’ म्हणजे ‘अनहॅपिनेस ’. भाषिक परिभाषेत पाहिल्यास दुःख शब्दातील ‘ख’ हा अवकाश आहे आणि ‘दु’ हा उपसर्ग आहे, जो असमाधान किंवा अप्रियता दर्शवतो. आपल्याला ‘वाईट’ असा टीकात्मक शब्दप्रयोग करायचा नाहीये, परंतु अर्थ तर तेच खुणावतोय. तर दुःखाचा अर्थ असा होतो की या अवकाशातच  काहीतरी समस्या आहे आणि या अवकाशाचा संबंध आपल्या मानसिक अवकाशाशी आहे, एकुणातच आपल्या जीवनातल्या अवकाशाशी आहे. ही एक अप्रिय स्थिती आहे.

ही स्थिती अप्रिय का आहे? सर्वप्रथम आपण स्थूल दुःख अनुभवतो:पीडा, अप्रसन्नता,शोक. आपल्या सर्वांना याची जाणीव असते आणि सर्वांनाच यातून स्वतःचा बचाव करायचा असतो, अगदी पशुंनासुद्धा. दुःख आणि वेदनेची स्थिती असंतोषजनक असते आणि त्यातून मुक्ती मिळवणं आवश्यक असल्याचं बौद्ध धर्म सांगत असेल तर त्यात काही विशेष नाही. दुसऱ्या प्रकारच्या दुःखाला परिवर्तनाचे दुःख म्हटले जाते आणि त्याचा संबंध आपल्या रोजच्या आनंदाशी आहे. तर मग यात काय समस्या आहे? हा आनंद जास्त काळ टिकत नाही, हीच समस्या आहे. हे परिवर्तनशील आहे. ज्याला आपण साधारण आनंद म्हणतो, तो जर का खरा असता,तर आपल्याकडे जेवढ्या अधिक गोष्टी असतील, तेवढे आपण आनंदित झालो असतो. जर आपल्याला चॉकलेट खाण्यात आनंद मिळत असेल तर, आपण जितकी जास्त चॉकलेट खाऊ, म्हणजे तासनतास खात राहिलो, तर आपण तेवढे आनंदित व्हायला हवंय; पण सगळ्यांना माहित्येय की असं होतं नाही. किंवा कल्पना करा की तुमची प्रिय व्यक्ती तासनतास तुमचा हात कुरवाळत आहे, पण लवकरच ती आल्हाददायक भावना वेदनेत किंवा विचित्र वाटण्याच्या भावनेत परिवर्तित होईल. हे सर्व केवळ सर्वसाधारण आनंदाच्या परिवर्तनशील स्वरूपामुळे होते. आणि अर्थातच आपल्याला ते कधीच पुरेसं होत नाहीः आपण कधीच समाधानी होत नाही. आपल्याला प्रत्येकवेळी अजून चॉकलेट हवं असतं, लगेच नाही मिळालं तर थोड्या वेळाने तरी हवं असतंच. 

‘आपला आवडता पदार्थ किती प्रमाणात सेवन केल्याने आपल्याला त्याचा आस्वाद घेता येईल?’ हा विचार गमतीशीर आहे. अगदी छोटासा घासही ते समाधान द्यायला पुरेसा असतो, पण आपल्याला कायम अधिक, अधिक आणि अधिकाची हाव असते. आता या समस्येचं निराकरण करण्याची इच्छा बाळगणे,आपल्या साधारण ऐहिक सुखाशी संबंधित समस्येवर तोडगा काढणे, हा काही एकट्या बौद्ध धर्माचा अनन्यसाधारण उद्देश नाही. असे खूप धर्म आहेत, जे ऐहिक सुखांच्या पलीकडे जाऊन एखाद्या नित्य आनंद देणाऱ्या स्वर्गाची प्राप्ती करण्याचा संदेश देतात.

दुःखाचा तिसरा प्रकारही आहे आणि ही विशेषतः बौद्ध धारणा आहे आणि यास ‘सर्वव्यापी दुःख’ अथवा ‘सर्वव्यापी समस्या’ असे म्हटले जाते. हे दुःख आपल्या सर्व अनुभूतींमध्ये व्याप्त आहे; याचा संबंध आपल्या नियंत्रणापलीकडे असणाऱ्या पुनर्जन्माच्या चक्राशी आहे, जो आपल्या रोजच्या जीवनातील चढउतारांचा पाया आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं, तर आपल्याला जसे आयुष्य प्राप्त झाले आहे, जसे शरीर आणि मन प्राप्त झाले आहे, त्यासोबत वारंवार पुनर्जन्माच्या फेऱ्यातून जाणे हाच पहिल्या दोन समस्यांचा पाया आहे. तर, हा विचारसुद्धा आपल्याला पुनर्जन्माच्या विषयाकडे घेऊन जात आहे, ज्या विषयी आपण नंतर चर्चा करू. अर्थात भारतीय तत्त्वज्ञानाच्या अनेक पद्धती आहेत ज्या पुनर्जन्माची शिकवण देतात. त्यामुळे पुन्हा पुनर्जन्म ही सुद्धा बुद्धांची अनन्यसाधारण शिकवण नाही. परंतु त्यांनी याची व्याख्या केली, समजून घेतले आणि या प्रक्रियेचे अधिक खोलात जाऊन आणि दुसऱ्या तत्त्वज्ञानाच्या आणि धर्मांच्या व्याख्येपेक्षा वेगळ्या दृष्टिकोनातून आकलन केले. बुद्धांनी पुनर्जन्माची कार्यपद्धती स्पष्ट केलीच, शिवाय आपले मन व शरीर अनुभवत असलेल्या दुःख, वेदना आणि सुखाच्या चढउतारांचीही यथासांग मांडणी केली.

दुसरे आर्य सत्य :

दुसरे सत्य आपण अनुभवत असलेल्या दुःखांच्या कारणांशी संबंधित आहे. आपल्याला आत्ता याची पुनर्जन्माच्या दृष्टिकोनातून चर्चा करायची नाही. तर बुद्धाने साध्या तार्किक स्वरूपात जे स्पष्ट केले आहे, ते समजून घ्यायचे आहे. आपण दुःख आणि सर्वसाधारण सुखाविषयी बोलतो आणि त्यांच्या कारणांविषयी बोलतो, पण बुद्धांचा भर ‘यथार्थ कारणां’वर आहे. आपल्याला असं वाटू शकतं की आपली सुखदुःखे पुरस्कार किंवा दंड किंवा अशाच काही इतर कारणांमधून उत्पन्न होतात, पण बुद्धांनी यथार्थ कारणांची मांडणी विधायक आणि विघातक वर्तनाच्या संदर्भात केलेली आहे. विघातक किंवा विनाशकारी वर्तन म्हणजे काय? ते केवळ इतरांना नुकसान देण्याशी संबंधित आहे का? खरं म्हणजे, जेव्हा आपण नुकसान करण्याच्या वर्तनाबद्दल बोलतो, तेव्हा त्याचा संदर्भ दुसऱ्याचं किंवा स्वतःचं नुकसान करण्याशी असू शकतो. आपल्या वर्तनाचा इतरांवर काय परिणाम होईल, हे समजणे अवघड असते. उदाहरणार्थ, आपण कुणालातरी खूप पैसे दिले आणि त्याचा परिणाम म्हणून कुणीतरी दुसरा माणूस ते पैसे चोरण्यासाठी त्याची हत्या करेल. आपले उद्दिष्ट भलेही मदतीचे असेल, पण त्याची खात्री देता येत नाही. त्यामुळे खरी खात्रीशीर गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपले स्वतःला नुकसान पोहचवणारे वर्तन. बुद्धांना विनाशकारी किंवा विघातक वर्तन म्हणताना हेच अपेक्षित आहे- आत्मघातकी वर्तन.

याचाच संदर्भ तणावदायी भावनांच्या प्रभावात येऊन वर्तन करण्याशी, बोलण्याशी किंवा विचार करण्याशी आहे. या तणावदायी भावना आपल्याला अशांत, तणावग्रस्त करतात. यांच्यामुळे आपली मनःशांती भंग पावते आणि आपले स्वतःवरील नियंत्रण सुटते. अशा भावना म्हणजे क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार, भोळसटपणा आणि अशाच स्वरूपाच्या इतर भावना. अशा भावनांची एक मोठी यादी आहे. आणि जेव्हा आपले विचार यात अडकून जातात तेव्हा आपण यांच्या प्रभावात बोलतो, वर्तन करतो, आणि त्यातून दुःख निर्माण होते. कदाचित आपल्याला तात्काळ दुःख होणार नाही. पण कालांतराने होऊ शकते कारण त्यातून आपल्यात तसे वागण्याची प्रवृत्ती तयार होऊ शकते. असं असताना, दुसऱ्या बाजूस सकारात्मक वर्तन असे वर्तन आहे जे या अशांत भावनांच्या प्रभावात येत नाही, उलट हे  प्रेम,  करुणा किंवा धैर्य, यासारख्या अधिक सकारात्मक भावनांनी प्रभावित होऊ शकते. अशा प्रकारच्या सकारात्मक वर्तनामुळे आपल्याला जे सुख मिळते त्यात आपल्या अस्तित्वाबद्दल आणि वास्तविकतेबद्दल सामान्यतः एक सरळपणाचा अंतर्भाव असतो.

आता जर आपण आपल्या सामान्य आनंदाबद्दल किंवा दुःखाबद्दल बोललो, तर हा काही कुण्या न्यायकर्त्या किंवा कुण्या बाह्य शक्तीद्वारा देण्यात येणारा पुरस्कार किंवा शिक्षा नाही. ते भौतिक विज्ञानाच्या एखाद्या सिद्धांताप्रमाणेच काम करतात. आणि याचा पाया काय आहे? आपला भ्रम हा याचा पाया आहे. उदाहरणार्थ, आपल्याला आपल्या 'मी' चा भ्रम असतो. वाटतं की सगळं माझ्याच मर्जीने झालं पाहिजे. आपण विचार करतो, ‘मी सगळ्यात महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे; माझ्या इच्छेचा कायम सन्मान झाला पाहिजे आणि मला सुपरमार्केटच्या रांगेत सगळ्यात पुढे उभे राहण्याची संधी मिळायला पाहिजे’ आणि म्हणून आपल्याला स्वतःच्या पुढे असलेल्या व्यक्तींचा राग येतो; आपण त्यांना धक्का देतो. आपल्याला सगळ्यात पुढे असण्याचा लोभ असतो. हो ना? आपण हा विचार करून अधीर होतो की समोर उभा असलेला माणूस किती जास्त वेळ लावतोय आणि मग आपलं मन त्या व्यक्तीबद्दल वाईट विचारांनी भरून जातं, असं होतं नाही का? आणि जर आपण सकारात्मक पद्धतीने वर्तन केले, तरी त्या वर्तनाखाली 'मी' बद्दल खूप मोठा भ्रम असतो. आपण बऱ्याचदा लोकांची मदत यासाठी करतो; कारण आपल्याला वाटतं की लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं. आपल्याला वाटतं की लोकांनी आपल्यावर प्रेम करावं किंवा कमीतकमी आपल्याला धन्यवाद तरी द्यावेत.

कदाचित इतरांना मदत करण्याने आपल्याला आनंदही मिळत असेल, पण ते समाधानकारक असतेच असे नाही. आपण यथावकाश अनुभवत असलेला आनंदही फार काळ टिकेल, याची शाश्वती नसते. तो कोणत्या न कोणत्या असंतोषजनक स्थितीमध्ये परिवर्तित होतो. आणि हे निरंतर होत असते, जीवनभर होत असते, आणि बौद्ध दृष्टिकोनानुसार आपल्या पुढील जन्मातही सुरू राहते.

आपण अधिक खोलात जाऊन पाहिलं, तर आपल्याला कळेल की आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल भ्रम असतो. उदाहरणार्थ, आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात इतके आकंठ बुडालेले असतो, की त्याच्या चांगुलपणाचे कौतुक करताना थकत नाही. किंवा आपण कुण्या व्यक्तीची इतकी घृणा करू लागतो की त्याचा वाईटपणा अगदी तिखट मीठ लावून सांगतो. मग त्या व्यक्तीमध्ये आपल्याला काहीच चांगलं दिसत नाही.

आपण जेवढं अधिक पडताळून पाहू, तेवढं आपल्याला लक्षात येईल की, या सगळ्याला आपल्या मर्यादा आधारभूत आहेत. आपल्या मन किंवा शरीराचे जे स्वरूप आहे, त्याला मर्यादा आहेत. तुम्ही विचार करून बघा, की जेव्हा आपण आपले डोळे बंद करतो, तेव्हा असं वाटतं की बाकी जगाचं काही अस्तित्वच नाहीये आणि फक्त मीच आहे; आणि आपल्या मेंदूत एक स्वर ऐकू येत राहतो आणि असं वाटतं की हा तर ‘मी’ आहे, अरे पण कुणाच्या आत? माझ्या डोक्यात? माझ्या शरीरात? मी माझ्याच आत आहे - ही तर खूप विचित्र गोष्ट आहे. आणि आपण त्याला ओळखू शकतो कारण तोच तर कायम तक्रार करत असतो : ‘ मला पुढे जायचं आहे; मला हे करायचं आहे.’ तोच तर आहे, जो कायम चिंता करत असतो. आणि कुठेतरी असा आभास होऊ लागतो की ‘मी’ , आपल्या डोक्यात गुंजत राहणारा तो स्वर, मी विशेष आहे आणि माझं अस्तित्व दुसऱ्या लोकांपेक्षा स्वतंत्र आहे, कारण जेव्हा मी माझे डोळे बंद करतो, म्हणजे जेव्हा काहीच नसतं, तेव्हा फक्त ‘मी’ च असतो.

 हा एक खूपच भ्रामक विचार आहे कारण आपलं अस्तित्व दुसऱ्यांपेक्षा स्वतंत्र नाही; आणि हेसुद्धा खरं आहे की कुणीही दुसऱ्यांपेक्षा वेगळं किंवा विशेष नाही. आपण सर्व मनुष्य आहोत. मला अंटार्क्टिका मधल्या बर्फामध्ये उभ्या असलेल्या हजारो लाखो पेंग्विन पक्ष्यांचे दृश्य आठवते. यांच्यापैकी कोण दुसऱ्यांपेक्षा वेगळा किंवा विशेष आहे? सगळे तर एकसारखे आहेत. आपली म्हणजेच माणसांची देखील हीच स्थिती आहे. कदाचित पेंग्विन पक्ष्यांना आपण सर्व माणसे एकसारखी दिसत असू. पण आपल्या स्तरावर आपण असा विचार करतो की ‘ मी तर विशेष आहे आणि मी इतरांपेक्षा स्वतंत्र आणि वेगळा आहे’, तेव्हा आपल्याला वाटू लागतं, की सगळं माझ्या मर्जीने व्हायला हवं आणि जेव्हा असं होतं नाही तेव्हा आपण नाराज होतो.

मूलतः आपले मन, आपले शरीर, आदींचे स्थूल तत्त्व या भ्रमाला उपयुक्त असते. हे थोडं विचित्र वाटू शकतं, पण आपण जगाचा जो अनुभव घेत असतो, तो मुख्यतः आपल्या डोक्याच्या वरील भागावर असणाऱ्या दोन खाचांमधून घेत असतो. मी माझ्या पाठीमागे असलेल्या गोष्टी पाहत नाही. आता जे घडतंय तेच मी पाहू शकतो. या आधी काय घडलंय हेसुद्धा मी पाहू शकत नाही. नंतर काय घडेल हेसुद्धा मी पाहू शकत नाही; हे खूपच सीमित असते. आणि मग आपण म्हातारे होतो. आपल्याला नीट ऐकू येत नाही. कुणीतरी काहीतरी बोलते आणि ते आपल्याला ऐकू येत नाही. आपल्याला ते दुसरेच काहीतरी बोलले असल्यासारखे वाटते आणि आपल्याला राग येतो. तुम्ही या विषयी विचार करून पाहिलात तर ही अवस्था फारच दयनीय असते.

ही एक सर्वव्यापी समस्या आहे ज्यामुळे आपण या प्रकारचे शरीर, या प्रकारच्या मनासोबत वारंवार पुनर्जन्माच्या चक्रातून जात आहोत, जे या भ्रमाला अविरत सुरू ठेवत आहे. आणि मग या भ्रमामुळे आपण विनाशकारी वर्तन करतो किंवा साधारण सकारात्मक वर्तन करतो, ज्यामुळे दुःख आणि त्रास आणि साधारण आनंदच उत्पन्न होतो जो परिवर्तनशील आहे.

खरं पाहता जर आपण अजून खोलात जाऊन पाहिलं तर - हा विषय जटिल आहे आणि आत्ता या वेळी त्यावर चर्चा करण्याची गरज नाही, हा भ्रमच वारंवार पुनर्जन्माचे चक्र चालवतो ज्यावर आपले नियंत्रण नाही. आपल्या वास्तविक समस्या आणि वास्तविक दुःखाचे यथार्थ कारण हेच आहे. या भ्रम आणि जाणिवांच्या अभावालाच ‘अज्ञान’ म्हंटलं जातं. पण मला हा शब्द वापरावा वाटत नाही कारण त्याचा मतितार्थ आपण मूर्ख आहोत असा होतो. हा याचा वास्तविक अर्थ नाहीये, याउलट ‘अनभिज्ञते’चा अर्थ असा होतो, की आपल्या अस्तित्वाचा पाया काय आहे, किंवा सगळ्या गोष्टींचा पाया काय आहे हे माहीत नसणे , या अर्थाने आपण अनभिज्ञ आहोत. इथे जाणिवांचा अभाव म्हणजे स्वतःला अति महत्त्व देत- स्वतःला जगाचा केंद्रबिंदू समजणं- जे वास्तवाच्या विरुद्ध असतं. वास्तव हे आहे की आपण सर्व एकसारखे आणि एकसाथ आहोत. याचा अर्थ आपण मूर्ख आहोत, असा होत नाही, तर ज्या रीतीने आपले मन किंवा शरीर कृती आणि विचार करते, याच्याशी त्याचा संबंध असतो. म्हणूनच आपण त्यांना ‘आर्य सत्ये’ म्हणतो. ज्यांना वास्तवाचे योग्य आकलन असते, ते या गोष्टीकडे इतरांहून भिन्न दृष्टिकोनातून पाहतात. आपला ठाम विश्वास असतो की आपले भ्रम आणि कल्पना वास्तवाला धरून आहेत आणि म्हणून आपण त्यांनाच सत्य समजतो. आपण त्यावर खोलात जाऊन विचारही करत नाही कारण आपले अंतर्मन सांगत असते की- ‘मी सर्वात महत्त्वाचा आहे. सर्व गोष्टी माझ्या म्हणण्यानुसार व्हायला हव्या. सर्वांनी माझ्यावर प्रेम करायला हवे.’ किंवा एखादा या उलटही विचार करेल की ‘मी चांगला नाही, सगळयांनी माझा तिरस्कार करायला हवा.’ या दोनही एकसारख्याच स्थिती असतात. फक्त नाण्याची दुसरी बाजू असल्यासारख्या. आणि हेच दुःखाचे खरे, यथार्थ कारण असते.

तिसरे आर्य सत्य :

तिसरे आर्य सत्य आहे, ज्याला आपण ‘यथार्थ निरोध किंवा निर्मुलन’ म्हणतो. सामान्यतः याचा अनुवाद ‘यथार्थ समाप्ती’ असा केला जातो, आणि याचा अर्थ हा आहे की भ्रम संपवून त्याच्यापासून मुक्ती मिळवणे, जेणेकरून त्याची पुनरावृत्ती होऊ नये. जर आपण या भ्रमातून मुक्ती मिळवली, जे खरंतर वास्तविक कारण आहे, तर आपल्याला वास्तविक समस्यांपासून मुक्ती मिळेल: हे चढउतार आणि आपल्या नियंत्रणाबाहेर असणाऱ्या या वारंवार होणाऱ्या पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्ती मिळेल. अशा प्रकारे आपल्याला ‘मुक्ती’ मिळेल. मला खात्री आहे तुम्ही संस्कृतमधील हे दोन शब्द ऐकले असतील, ज्यात पुनर्जन्माच्या चक्राला संसार संबोधले जाते आणि निर्वाण म्हणजे मुक्ती होय.

बुद्धांच्या काळातल्या इतर भारतीय पद्धतींमध्येही संसाराच्या चक्रातून मुक्तीचा उल्लेख केला जात असे. भारतामध्ये ही संकल्पना त्या वेळी फारच सामान्यतः वापरली जात होती. पण बुद्धांनी पाहिले की तत्कालीन पद्धतींनी यथार्थ कारणांचा खोलात जाऊन विचार केलेला नाही. तुम्हाला कदाचित वारंवार उत्पन्न होणा्ऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते, जसे एखाद्या अशा स्वर्गीय प्रदेशात तुमचा पुनर्जन्म होऊ शकतो, जिथे युगानुयुगे तुम्ही स्थिर चित्त अनुभवाल, पण त्यालाही अंत असेल. त्यामुळे अशा पद्धतींमध्ये खरी मुक्ती मिळण्याची शक्यताच नाही.

बुद्धाने ‘यथार्थ निरोध किंवा निर्मुलना’ची शिकवण दिली. त्यामुळे हे समजून घेणे आणि असा विश्वास बाळगणे आवश्यक आहे की तुमच्या भ्रमापासून आणि त्याच्या पुनरावृत्तीपासून मुक्ती मिळवणे शक्य आहे. नाहीतर तुम्ही मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न तरी का कराल? तुम्हाला भ्रमापासून मुक्ती मिळवण्याची चिंताच नसेल तर तुम्ही प्रयत्नही न करता परिस्थितीचा स्वीकार कराल आणि त्या परिस्थितीत शक्य असेल तसे वागाल. अनेक चिकित्सा पद्धतींचे हेच अंतिम ध्येय असते. ‘हे सहन करायला शिका; किंवा, एखादं औषध घ्या.’

चौथे आर्य सत्य :

चौथे आर्य सत्य आहे, ‘सत्य मार्ग’. चौथे आर्य सत्य आपल्याला तिसरे आर्य सत्य समजून घेण्यास मदत करते. इथे अशा मनःस्थितीचा संदर्भ आहे, जी आपल्याला मुक्तीच्या दिशेने मार्गस्थ करू शकते. याला आपण ‘चित्त मार्ग’ असेही म्हणू शकतो. परंतु अधिकांश इतर भाषांमध्ये याचा अनुवाद करणे खूप कठीण आहे.

आपले मन अनेक प्रकारच्या कल्पना करते, ज्या अतिशय निरर्थक असतात. पण या मूर्खपणालाही एक सीमा असते. याची सर्वोच्च सीमा म्हणजे स्क्रिझोफेनियासारखा एखादा आजार, ज्यात आपण प्रत्येकाला आपला शत्रू समजत असतो. या कल्पनांची तीव्रता कमीसुद्धा असू शकते जसे : ‘मी यापेक्षा चांगला चॉकलेट केक कधीच नाही पाहिला. जर मी हा केक खाल्ला, तर खरंच मला खूप आनंद मिळेल. मला हेच तर पाहिजे.’  मला याचा अनुभव बुखारेस्टला जात असताना विमानतळावर आला. या प्रवासा दरम्यान व्हिएन्नाला थांबा होता. मी विचार केला, ‘व्हिएन्नाचं एप्पल स्ट्रूडल, जगात सगळ्यात चांगलं मानलं जातं.’  मी माझ्यासाठी एक एप्पल स्ट्रूडल मागवलं. मला तर ते जगातलं सगळ्यात चांगलं एप्पल स्ट्रूडल वाटलं नाही. तर माझी त्या बद्दलची कल्पना निरर्थक ठरली. एप्पल स्ट्रूटल तिथे होतं ; ती काही माझ्या मनाची कल्पना नव्हती. पण त्याच्या चवीबद्दलचं माझं अनुमान ही निव्वळ कल्पना होती. ती खूपच मौल्यवान खाण्याची गोष्ट आहे आणि ती खाऊन मी खरोखरच तृप्त होऊन जाईन, ही मानसिक कल्पना होती.

याच प्रकारे, माझे आणि तुमचे अस्तित्व आहे. बौद्ध धर्म हे म्हणत नाही की आपलं अस्तित्व नाही. पण आपण आपल्या अस्तित्वाची अशा प्रकारे कल्पना करतो की जी वास्तवापासून खूप दूर असते. वस्तूंचं स्वतंत्र अस्तित्व असतं, अशी आपली कल्पना असते, जो अस्तित्वाचा अशक्यप्राय मार्ग आहे. कारणे आणि परिस्थितीतून गोष्टी निर्माण होतात आणि त्या निरंतर बदलत असतात, परिवर्तनशील असतात. पण आपण हे पाहू शकत नाही, आपण फक्त आपल्या नजरेसमोर घडणाऱ्या गोष्टी पाहतो. उदाहरणार्थ, आपण एखाद्याला भेटणार असतो, पण तो भेटतच नाही. आपल्याला वाटू शकते की ती व्यक्तीच वाईट आहे, कायम आपल्याशी अशी वागते. कदाचित आपण तिला पूर्वीसारखे आवडत नसू. आपण असा विचार करतो की वाहतुकीच्या समस्या, कार्यालयातली कामं अशा गोष्टींपेक्षा त्या व्यक्तीला स्वतंत्र अस्तित्व आहे. पण प्रत्येक गोष्ट कारण आणि परिस्थितीतून उत्पन्न होत असल्याने इतर गोष्टी स्वतंत्र ठेवणं कदाचित त्या व्यक्तीला अशक्य होत असेल. तरीही आपलं मन अशा पद्धतीच्या कल्पना करते, आणि त्यावर हटवादी भूमिका घेऊन अडून बसते व रागासारख्या विनाशकारी, तणावदायी भावना निर्माण करते. आणि जेव्हा ती व्यक्ती आपल्या समोर येते, तेव्हा आपण त्यांना वेगळ्या दृष्टीने पाहतो. त्यांना स्पष्टीकरण देण्याची संधीही न देता त्यांच्यावर ओरडतो. आणि या सगळ्या प्रकरणात खरेतर आपणच भयंकर आणि दुःखी व्यक्ती असतो, हो ना?

त्यामुळे आपलं अस्तित्व असतं - पण आपल्या अस्तित्वाबद्दलचा आपला जो विचार असतो - की इतरांपासून स्वतंत्र आणि खास व्यक्ती - ती पूर्णतः कल्पना असते. अगदी निरर्थक असते. याचा वास्तवाशी काही संबंध नसतो. बौद्ध धर्मात आपण याला ‘शून्यता’ म्हणतो. यालाच रिक्तता असेही म्हंटले जाते. संस्कृत भाषेत यासाठी शून्य हा शब्द आहे; याचा अर्थ ‘काहीच नाही’ असा आहे. खऱ्या वास्तवाचा पूर्ण अभाव. जसे आपण कल्पना करतो की आपला नवा जोडीदार एखाद्या परिकथेतल्या शुभ्र घोड्यावरच्या राजकुमारासारखा आहे- जे अगदी अशक्य असते. अशी व्यक्ती अस्तित्वातच असू शकत नाही, पण तरीही आपण अशी कल्पना करतो आणि त्याची वाट पाहतो. आणि आपला जोडीदार जेव्हा त्या अपेक्षांवर खरा उतरत नाही, आपण निराश होतो आणि नव्या व्यक्तीचा शोध घ्यायला लागतो. तिथेही आपण कुणाचाही शोध घेत असलो तरी ते अशक्यच असते.

म्हणूनच मनाचा यथार्थ मार्ग, यथार्थ बोध आहे, की आपण हे समजलं पाहिजे की हे सर्व निरर्थक आहे. याचा वास्तवाशी काही संबंध नाही. आता जर तुम्ही वास्तविक कारणाकडे पाहिलं, तर दुःखाचे यथार्थ कारण हे आहे की आपण विश्वास ठेवतो की याचा वास्तवाशी संबंध आहे. पण याचा वास्तवाशी काहीच संबंध नाही, याची जाणीव म्हणजेच सत्य मार्ग आहे. आपल्या कल्पना आणि वास्तव या दोन्ही गोष्टी अनन्यसाधारण आहेत. मी हे परत सांगतो. पण आपल्या कल्पनेचा वास्तवाशी संबंध आहे, असा विचार करणे भ्रम आहे. खरा बोध हा आहे की असं काही नाहीये. याचा वास्तवाशी संबंधच नाहीये. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, असं काही आहे किंवा असं काही नाहीये, ज्याचा वास्तवाशी संंबंध आहे. एक तर हे बरोबर असेल किंवा चूक असेल. दोन्ही गोष्टी एकाच वेळी योग्य असू शकणार नाहीत.

आता आपण समीक्षा करून पाहू की कोणती गोष्ट अधिक सक्षम आहेः ‘हो’  की ‘नाही’?  जर आपण तर्काच्या आधाराने विचार केला तर जाहीर आहे की ‘नाही’च अधिक प्रबळ असेल. ‘हो’ तर्काच्या परीक्षेत उत्तीर्ण होत नाही. जर मी माझे डोळे बंद केले, तर इतर लोकांचे अस्तित्व नष्ट होते का? नाही. कदापि नाही. कायम माझीच मर्जी चालावी, मीच महत्वपूर्ण माणूस आहे, असा कायम विचार करणे उचित आहे का? नाही, हे तर मूर्खपणाचे ठरेल. आपण जितकं अधिक पडताळून पाहू, आपण आपल्या मेंदूतल्या ‘मी’बाबत साशंक होऊ. प्रश्नांकित होऊ. आपण आपल्या मेंदूचे विश्लेषण केले की मेंदूच्या नक्की कोणत्या भागात हा ‘मी’ आहे, जो सर्व निर्णयप्रक्रिया संचलित करतो? नक्की काय चालले आहे? विश्लेषणानंतर आपल्याला हा ‘मी’ कुठेच सापडणार नाही. अर्थात मी चालतो फिरतो, मी कामकाज करतो, मी बोलतो, या गोष्टी आपण नाकारत नाही. पण आपण ‘मी’पणाची ही स्थूल भावना नाकारतो आहोत की माझीच मर्जी चालायला हवी, हे तार्किक दृष्ट्या सुसंगत नाही. कारणे आणि संशोधनातून आपण अनुभवू शकतो की अशी गोष्ट अस्तित्वात नाही. त्यामुळे त्याचा वास्तवाशी संबंध आहे, या भ्रमाला कसलाही आधार नाही. 

आपल्या अस्तित्वाबद्दल असा असंभव विचार करण्याचा काय परिणाम होतो? आपण स्वतःलाच भयंकर त्रास देतो. तर दुसऱ्या बाजूला अशी गोष्ट अस्तित्वातच नाही, अशा स्वरूपाच्या विचाराने काय परिणाम होईल? तर आपण स्वतःची अशा समस्यांमधून मुक्ती करतो. जेव्हा मी विचार करतो की ‘अशी कोणती गोष्ट अस्तित्वातच नाही, तो सर्व मूर्खपणा आहे.’ त्यामुळे त्याच वेळी आपण त्याचा वास्तवाशी काही संबंध असल्याचा विचार करणेही अशक्य असते. योग्य आकलन परिणामकारक असते आणि अयोग्य आकलनाला ते परिवर्तित करू शकते. आपण योग्य आकलनावर निरंतर लक्ष केंद्रित करू शकलो तर आपल्यात पुन्हा भ्रमितावस्था निर्माण होणार नाही.

इथेही वास्तवाचे योग्य आकलन अयोग्य आकलनाला परिवर्तित करू शकते आणि मुक्ती मिळवून देऊ शकते, ही बुद्धाची शिकवण अनन्यसाधारण नाही. अन्य भारतीय विचारधारांमध्येही याचा उल्लेख आढळून येतो. पण बौद्ध विचारधारेतली अनन्यसाधारण गोष्ट म्हणजे असे विशिष्ट आकलन जे वास्तवाबाबतच्या भ्रमाच्या स्थितीला कायमचे नाहीसे करते. भ्रमाचे यथार्थ निर्मुलन करण्यासाठी आणि मनातील योग्य आकलनाच्या मशागतीसाठी आवश्यक ध्यानधारणेतून लाभणाऱ्या सम्यक एकाग्रतेसाठी बुद्धांनी भारतीय पद्धतींशी साधर्म्य सांगणाऱ्या पद्धतींचा अवलंब केला आहे. त्यांच्या माध्यमातून आपण कारणांचे यथार्थ निर्मुलन करू शकतो. आणि म्हणूनच वेदना आणि समस्यांचे निर्मुलनही करू शकतो. ज्यातून आपल्या मनाला वास्तवाच्या योग्य आकलनाचे आणि विनाशकारी भावना संपवण्याचे सामर्थ्य लाभते, तीच प्रेरणा असते. आणि इथेच प्रेम, करुणा आणि इतर सकारात्मक गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. कारण आपण पाहू शकतो की आपण परस्परांवर अवलंबून असतो, प्रत्येकाची सुख प्राप्तीच्या इच्छा समान असते. आपण इतरांची मदत करण्यायोग्य ठरण्यासाठी आपल्याला आपल्या भ्रमांमधून मुक्त होणे आवश्यक असते.  

तर, ही चार आर्य सत्यांबद्दल आधारभूत प्रस्तुती आहे. त्यांना अधिक खोलात जाऊन समजून घ्यायचे असेल तर आपल्याला बौद्ध धर्मातील कर्म आणि मनाच्या संकल्पनांचा अभ्यास करावा लागेल.

सारांश :

खरंतर बौद्ध धर्म आणि इतर अनेक प्रमुख धर्म व तात्त्विक विचारधारा यांच्यामध्ये समान दुवे आहेत. पण बुद्धांची पहिली मूलभूत शिकवण असलेल्या चार आर्य सत्यांमध्ये आपले अस्तित्व, आपण अनुभवत असलेली दुःखे आणि त्यांच्या निर्मुलनाचे मार्ग याविषयी विस्तृत सादरीकरण करण्यात आलेले आहे.

बऱ्याचदा बुद्धांची तुलना एखाद्या चिकित्सकासोबत केली जाते. ज्याप्रमाणे एखादा चिकित्सक आपण आजारी आहोत याची खात्री करतो, त्याप्रमाणे बुध्दांनी सांगितलं की जीव सगळ्या स्थानी अनेक प्रकारच्या दुःखांनी ग्रासलेला आहे. जसे चिकित्सक रोगाच्या कारणांचा शोध घेतो तसं बुध्दांनी आपल्याला सांगितलं की दुःखाचे वास्तविक कारण म्हणजे आपल्या अस्तित्वाबद्दलचा मिथ्या बोध आहे. मग चिकित्सक आपल्याला सांगतो, की आपल्या रोगावर उपचार आहे की नाही, आणि जर संभव असेल तर तो आपल्याला औषध देतो. त्याच रीतीने बुध्दांनी दुःख निरोधाचा मार्ग सुचवला. जर आपल्याला आपल्या दुःखावर विजय मिळवायचा असेल, तर अंततः औषध घेणं किंवा सुचवलेल्या मार्गावर चालणं, आपल्यावर अवलंबून आहे.

Top