पहिलं आर्य सत्य: खरं दुःख

प्रत्येकाला सुखी व्हायचं असतं आणि कोणालाही दुःखी व्हायचं नसतं, हे जीवनातील एक प्राथमिक तथ्य आहे. कोणालाही समस्या व दुःख नको असतात, हे आपल्या स्वतःच्या अनुभवांवरून सहजपणे लक्षात येतं. तरीही आपल्या जीवनात कायमच सर्व प्रकारच्या समस्या समोर येत राहतात. किंबहुना, आपण समस्या टाळण्याचा कितीही खटाटोप केला, तरीही त्या येतच राहतात. आपल्याला दैनंदिन जीवनात एखादी समस्या सामोरी येते तेव्हा सर्वसाधारणतः आपण त्यावर तोडगा काढायचा प्रयत्न करतो. पण एक-एक करून समोर येणाऱ्या समस्यांवर तोडगा काढत राहणे, हे अथक कार्य असते. बुद्धाला साक्षात्कार झाला, तेव्हा जीवनातील अनेक तथ्यं सर्वांसाठी, सर्वत्र सत्य असतात, हे त्याच्या लक्षात आलं. याला आपण चार आर्य सत्यं असं म्हणतो. आपण समस्यांना स्वतःच चिरस्थायी करत असतो, हे आपल्या सर्वांचं खरं दुःख आहे, हीच खरी समस्या आहे, असं बुद्धाच्या लक्षात आलं आणि त्याने त्याची शिकवण दिली. आपण स्वतःसाठी अधिकाधिक समस्या निर्माण करणं थांबवलं नाही, तर त्या कधीच यायचं थांबवणार नाहीत. त्यामुळे खरं दुःख म्हणजे काय, हे अचूकरित्या ओळखणं, हे पहिलं पाऊल असतं.

सुख व दुःख यांचे चढ-उतार

आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना व दुःखांना सामोरं जावं लागतं. जगणं हताश करणारं व तणावदायक असू शकतं. आपण स्वतःसाठी सुखी जगणं निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, पण अनेकदा आपल्याला आशा वाटते तशा रितीने गोष्टी घडत नाहीत. आपल्याला कधीच नको असलेल्या गोष्टी घडतात, उदाहरणार्थ- आपले नातेसंबंध बिघडतात, लोक आपल्याला वाईट वागवतात, आपण आजारी पडतो, आपली नोकरी जाते, इत्यादी. हे प्रसंग टाळण्याचा आपण कितीही प्रयत्न केला, तरी ते घडतातच. अनेकदा आपण त्यामुळे निराश होतो किंवा या सगळ्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो, पण त्याने परिस्थिती आणखी बिघडते. आपण आणखी दुःखी होतो.

आपल्याला काही सुख अनुभवायला मिळालं, तरी त्या सुखामध्येही एक समस्या असते- हे सुख टिकत नाही. त्याने आपलं कधीच समाधान होत नाही आणि आपल्याला अधिकाधिक सुख हवंसं वाटतं. किंबहुना, आपण बराच वेळ व ऊर्जा ‘अधिक’ काहीतरी मिळवण्यावर खर्च करतो. आपण समाजमाध्यमांवर एखाचा सेल्फी प्रसिद्ध करतो, तेव्हाच्या आपल्या मनस्थितीचा विचार करा. प्रत्येक वेळी आपल्याला ‘लाइक’ मिळालं की, सुखाचा डोपामाइन वेगाने वाहू लागतो, पण हे किती वेळ टिकेल? आपल्याला आणखी किती ‘लाइक’ मिळालेत, हे आपण लगेच तपासायला जातो ना? पण ‘लाइक’ची संख्या फारशी वाढलेली नसेल, तर आपल्याला किती भयंकर वाटतं? हेच दुःख असतं ना?

आपण ज्या शरीरासह व मनासह चढ-उतार अनुभवतो, त्यांना चिरस्थायी करत राहतो

तर, जीवनात सतत चढ-उतार सुरू असतात- काही वेळा आपल्याला सुखी वाटतं आणि खूप आनंदी वाटतं, काही वेळा आपल्याला दुःखी वाटतं. अनेकदा आपण ‘काय करणार, असंच असतं जगणं’ असं म्हणून गोष्टी सोडून देतो, खोलात जात नाही. आपण आपल्याला आपलं आयुष्य असं हवं असतं का- पुढच्या क्षणी काय वाटेल हे माहीत नसलेल्या स्थितीत असणं आपल्याला हवं असतं का? सुदैवाने बुद्ध याच्या खोलात गेला आणि या सर्व गोष्टींमधील आंतरिक खरी समस्या त्याने शोधली. आपल्याकडील शरीरांचे व मनांचे प्रकार ही खरी समस्या आहे, खरं दुःख आहे. आपण स्वतःचं शरीर व मन यांसह चढ-उतार अनुभवतो, शरीर व मन या चढ-उतारांना लोहचुंबकाप्रमाणे आकर्षित करतात. याहून खोलात विचार केला, तर असं लक्षात येतं की, शरीर व मन असल्यामुळे आपण केवळ आत्ताच्या क्षणी व पुढच्या आठवड्यापुरतंच चढ-उतारांना टिकवतो असं नाही, तर आपण मरण पावेपर्यंत आपण हे करत राहतो. बुद्ध तर असं म्हणतो की, आपण केवळ याच आयुष्यात नव्हे, तर पुनर्जन्म होऊन पुढील आयुष्यांमध्येसुद्धा या समस्या घेऊन जातो. तरीही आपण पुनर्जन्माचं अस्तित्व समजून घेतलं नाही व स्वीकारलं नाही, तर या समस्या पुढील पिढ्यांपर्यंतही टिकवण्यासाठी आपली खटपट सुरू राहते. सध्याच्या हवामानविषयक संकटाच्या काळात आपल्या कृतींमुळे समस्या कशा टिकून राहतात आणि पृथ्वीवरील आपल्या अस्तित्वानंतरही त्या चिरस्थायी कशा राहतात, हे स्पष्टपणे कळू शकते.

तर, आपल्या शरीरांबाबत व मनांबाबत प्रत्यक्षातील समस्या कोणती असते? यांना मर्यादा असते, ही समस्या आहे. आपलं शरीर आजारी पडतं आणि आपण वृद्ध होत जातो त्यानुसार ते झिजत जातं, त्यामुळे शरीर मर्यादित असतं. दुधाच्या पिशवीप्रमाणे शरीरही नाश पावतं, पण दुधासारखी त्याची स्पष्ट अंतिम तारीख कळत नाही ही आणखी अडचणीची बाब आहे. आपल्या शरीराची अंतिम तारीख कोणती आहे, याची आपल्याला काहीच कल्पना नसते. आपलं शरीर टिकून राहतं तोवर आपण त्याची काळजी घेण्यात किती वेळ घालवतो याचा विचार करा. आपल्याला शरीर स्वच्छ ठेवावं लागतं, त्यावर पोशाख चढवावा लागतो, त्याचं भरणपोषण करावं लागतं, ते घेऊन संडासला जावं लागतं, व्यायाम करावा लागतो, विश्रांती घ्यावी लागते व झोपावं लागतं आणि त्याला इजा झाली किंवा ते आजारी पडलं, तर त्याची काळजी घ्यावी लागते. या सगळ्यांत किती मजा येते? एका थोर भारतीय बौद्ध गुरूने म्हटल्याप्रमाणे, आपण सर्व जण स्वतःच्या शरीराचे गुलाम असतो.

आपलं मन, तसंच आपल्या भावभावना, हेसुद्धा मर्यादित असतं. आपल्या मनाला शिकवावं व प्रशिक्षण द्यावं लागतं आणि तरीही आपल्याला अनेक गोष्टी कळत नाहीत. आपल्याला कशाचंच पूर्ण चित्र दिसत नाही- उदाहरणार्थ, जागतिक तापमानवाढ, कृत्रिम प्रज्ञा, रोबोटिक्स, आभासी वास्तवातील वातावरण, इत्यादींचे परिणाम आपल्याला कळत नाहीत. मग स्वतःच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी कळणं तर दूरच. त्याहून वाईट म्हणजे वृद्धावस्थेसोबत आपलं मन, आपलं शरीर यांची झीज होत जाते, आपली अल्पकालीन स्मृती जाते, आपलं मन अधिक संथपणे काम करू लागतं आणि आपण सहजपणे संभ्रमात पडतो.

त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या भावना सहजपणे दुखावतात, आपण उत्तेजित होतो, आणि आपल्याला स्पष्टपणे विचार करणंही शक्य होत नाही. पण यातील खरी समस्या ही आहे की, आपली मर्यादित शरीरं, मनं व भावभावना स्वतःला चिरस्थायी करू पाहतात; ते स्वतःकडे अधिकाधिक काही मिळवू पाहतात.

आपल्या मर्यादित शरीरामधील खऱ्या दुःखाचे चार पैलू

बुद्धाने आपल्या मर्यादित शरीराच्या चार पैलूंशी खऱ्या दुःखाची सांगड असल्याचं उलगडून दाखवलं-

  • एक, शरीर अशाश्वत असतं. काही वेळा आपली तब्येत चांगली असते आणि आपल्याला चांगलं वाटत असतं, पण थोडक्याशा गोष्टीने आपल्या शरीराचा समतोल बिघडतो, आपण आजारी पडतो आणि आपल्याला भयंकर वाटू लागतं. आपलं शरीर किती नाजूक असतं पाहा- थोडक्याशा गोष्टी आपल्याला इजा व वेदना होऊ शकतात. प्रत्येक क्षण आपल्याला मृत्यूच्या नजीक नेत असतो, हे यातील अंतःस्थ सूत्र आहे. आपण स्वतःचं शरीर कायम सुदृढ व बळकट ठेवू शकतो, आपण वयस्कर झालो, तरी आपल्याला तरुणपणासारखंच खाता येईल व तसंच वावरता येईल, अशी आपली कल्पना असते. पण यात आपण स्वतःलाच फसवत असतो, तरुण राहण्याच्या आपल्या अथक संघर्षातून आपल्या चिंता व ताणच सहन करावे लागतात.
  • दोन, आपली शरीरच मुळात समस्याग्रस्त असतात. आपण अत्तर लावून किंवा मेक-अप करून किंवा स्नायू पीळदार करून आपली शरीरं अधिक आकर्षक केली, तर आपण सुखी होऊ, असं आपल्याला वाटू शकतं. पण आपण स्वतःला कितीही सुंदर केलं, तरी आपण पुरेसे चांगले दिसत नाही किंवा आपलं सुंदर रूप ओसरतं आहे, अशी चिंता आपल्या वाटतच राहते. कितीही मेक-अप केला किंवा स्नायू पीळदार केले, किंवा कितीही पोषक आहार घेतला, तरी आपली शरीरं आजारी पडतातच, आपण आजारी पडतोच, किंवा आपला अपघात होण्याची व इजा पोचण्याची शक्यता असतेच.
  • तीन, आपण आंघोळ केली नाही तर आपल्या शरीराची दुर्गंधी येते, आपण दात घासले नाहीत तर तोंडातून घाण वास येतो आणि आपल्या लघवीला व विष्ठेलाही घाण वास येतो. आपण थोडं चावलेला घास कोणाला देऊ केला, तर कोणी ते अन्न स्वच्छ मानून खाईल का? आपण ‘मी’ म्हणून स्वतःच्या शरीरापासून वेगळे, स्वतंत्र अस्तित्वात नसतो, ‘सुंदर शरीरा’च्या कल्पित जगामध्ये राहत नसतो. आपण या शरीरांमध्ये अडकलेले असतो, आणि शरीराच्या कितीही उणिवा असल्या, तरी आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते आणि दुःखावत मात करण्याच्या व इतरांना मदत करण्याच्या आपल्या प्रयत्नांसाठी त्यांचा योग्य वापर करावा लागतो.
  • चार, वास्तव जीवनात इतरांना आपलं शरीर दिसलं नाही तर आपणही दिसणार नाही. आपण इतरांना दाखवण्यासाठी ऑनलाइन रूप निर्माण करू शकतो, इतरांनी आपल्याला व्हिडिओ गेमसारखं पहावं अशी तजवीज करू शकतो, पण तरीसुद्धा कोणी आपल्याला ‘वास्तव जगा’मध्ये भेटतं, तेव्हा ते आपली शरीरं आहेत तशी पाहतात. आपण साठीत गेल्यावर विशीतल्यासारखे दिसू, अशी कल्पना आपण मनात केली, तरी इतर लोक आपल्याकडे पाहतील तेव्हा त्यांना साठीतलं शरीरच दिसणार. हे आपण समजून घेतलं नाही व स्वीकारलं नाही, तर आपण स्वतःचीच फसवणूक करू आणि वयाशी विसंगत वर्तन करून समस्या निर्माण करू.

सारांश

आपली शरीरं अशाश्वत, समस्याग्रस्त असतात, आपण त्यांच्यापासून फारकत घेऊ सकत नाही, आणि इतर लोक आपल्याकडे बघतात तेव्हा आपलं शरीरच त्यांना दिसतं, आपल्याला हे आवडो वा न आवडो. त्यामुळे आपली मर्यादित शरीरं हे खऱ्या दुःखाचे दाखले आहेत. अशा प्रकारचं शरीर असणं ही पुरेशी समस्या आहे, पण दर आयुष्यात अशाच प्रकारचं शरीर घेऊन आपण दुःखाचं णि समाधान न होणाऱ्या सुखाचं अथक वाटणारं चक्र अनुभवत राहतो, हे समजून घेण्याची गरज आहे, असं बुद्ध म्हणतो. हे खरोखरच तुम्हाला हवं आहे का?

Top