१. प्रत्येकाला सुखी जीवनाची अपेक्षा असते, पण थोड्याच लोकांना सुखी जीवनाचा अर्थ उमगलेला असतो आणि ते साध्य करण्याची पद्धतही माहीत असते.
२. आपल्या भावना आणि दृष्टिकोन आपल्या जाणिवांवर, अनुभवांवर परिणाम करतात. प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण नकारात्मक भावनांपासून मुक्ती मिळवू शकतो आणि आरोग्यदायी व सकारात्मक भावना विकसित करू शकतो. अशा रीतीने आपण आपले जीवन अधिक आनंदी आणि अर्थपूर्ण करू शकतो.
३. क्रोध, भीती, लोभ आणि आसक्तीसारख्या त्रासदायक भावनांमुळे आपली मनःशांती आणि स्वनियंत्रण ढासळते. प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण त्रासदायक भावनांचा प्रभाव कमी करू शकतो.
४. क्रोध आणि लोभाच्या आहारी जाऊन केलेल्या वर्तनामुळे आपली दुःखाच्या दिशेने वाटचाल सुरू होते. प्रशिक्षणामुळे चित्त स्थिर ठेवण्यास, विचारांमध्ये स्पष्टता आणण्यास आणि सजगपणे वागण्यास मदत होते.
५. प्रेम, करुणा, संयम आणि समज यासारख्या सकारात्मक भावना आपले चित्त स्थिर ठेवून विचारांमध्ये स्पष्टता आणण्यास साहाय्यक ठरतात आणि आपल्या जीवनात आनंद आणतात. प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण त्यांना विकसित करू शकतो.
६. स्वयंकेंद्री आणि स्वार्थी वर्तन आपल्याला इतरांपासून तोडते आणि दुःखी करते. प्रशिक्षणाच्या मदतीने आपण त्यातून आपली सुटका करू शकतो.
७. आपल्यातील परस्परावलंबनाची जाणीव झाल्याने आणि आपले अस्तित्व इतरांवर अवलंबून असल्याचे उमगल्याने आपण इतरांप्रति अधिक स्वागतशील होतो. इतरांची अधिक काळजी घेऊ लागतो आणि त्यातून अधिक आनंद निर्मिती होते.
८. आपल्याला स्वतःबद्दल आणि इतरांबद्दलही वाटणाऱ्या बहुतांश भावना कपोलकल्पित असतात. आणि त्याच भावनांना जेव्हा आपण वास्तव समजतो, तेव्हा आपण स्वतःसोबत इतरांसाठीही समस्या निर्माण करतो.
९. योग्य आकलनातून आपण गोंधळाच्या स्थितीतून स्वतःची मुक्तता करू शकतो आणि वास्तव अधिक चांगल्या रीतीने समजून घेऊ शकतो. हे आपल्याला जीवनात कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी शांत आणि समंजस राहण्यास साहाय्यक ठरू शकते.
१०. एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी स्वतःवर काम करणे हे संपूर्ण आयुष्यासाठीचे आव्हान आहे. पण तीच जीवन सार्थक करणारी गोष्ट आहे.