आनंदाच्या स्रोताच्या रूपात करुणा

Compassion as a source of happiness

आनंद प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहणे हेच जीवनाचे ध्येय

आपण जिवंत आहोत आणि आपल्याला जिवंत राहण्याचा अधिकार आहे. अगदी संवेदना नसलेल्या फुलांनाही जिवंत राहण्याचा अधिकार आहे. त्यांच्यावर एखाद्या प्रतिकूल बळाचा वापर झाला तर रासायनिक स्तरावर ते स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःवर उपचार करतात. पण (त्याहून अधिक) आपण मानवी जीव आणि कीटक, अगदी अमिबासारखा सूक्ष्म जीवसुद्धा संवेदनाक्षम मानले जातात. (आणि संवेदनाक्षम जीव असल्याने आपल्याकडे जिवंत राहण्यासाठी अधिक परिणामकारक यंत्रणा आहे.)

शास्त्रज्ञांसोबतच्या चर्चेतून मला समजले आहे की, संवेदनाक्षम जीव असण्याचा संबंध अशा जिवांशी आहे जे आपल्या इच्छाशक्तीच्या प्रेरणेतून हालचाल करू शकतात. ‘संवेदनाक्षम’ असणे म्हणजे फक्त जाणीव असणे नाही किंवा जाणिवांच्या पातळीवर मानवी जीव असणेही नाही. खरेतर ‘जाणीव’ किंवा ‘भान’ याची व्याख्या करणेच अवघड आहे. सामान्यतः याचा अर्थ मनाची सचेतन अवस्था असा मानला जातो, पण तसे असल्यास आपण बेशुद्ध किंवा अर्धवट शुद्धीत असताना जाणीव अस्तित्वात नसते का? कीटकांमध्ये जाणीव असते का? कदाचित जाणिवेपेक्षा ‘संज्ञानात्मक/आकलन क्षमता’ यावर बोलणे सयुक्तिक ठरेल.

मुख्यतः इथे (आकलन क्षमता म्हणताना) आपण वेदना, समाधान किंवा स्थिरतेसारख्या भावनांच्या आकलनाविषयी चर्चा करत आहोत. खरेतर सौख्य आणि पीडा (आणि आनंद व दुःख) यासारख्या गोष्टींच्या सखोल अभ्यासाची गरज आहे. उदाहरणार्थ, प्रत्येक संवेदनाक्षम जिवाला जिवंत राहण्याचा अधिकार आहे आणि जिवंत राहण्यासाठी त्याला आनंद आणि सुखाची अपेक्षा करण्याचाही अधिकार आहे. म्हणूनच संवेदनाक्षम जीव जिवंत राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपले अस्तित्व आशेवर अवलंबून असते- चांगल्याची आशाः अर्थात आनंदाची आशा. त्यामुळेच मी नेहमी याच निष्कर्षावर येतो की, सुखप्राप्ती हेच आयुष्याचे ध्येय आहे. आशा आणि आनंदमय भावनांमुळे आपल्या शरीराला सुखाची जाणीव होते. त्यामुळे आशा आणि आनंद आपल्या आरोग्यासाठीचे सकारात्मक घटक आहेत. मनाच्या आनंदी अवस्थेवर आरोग्य अवलंबून असते.

दुसरीकडे, राग वा क्रोध असुरक्षिततेच्या भावनेवर आधारित असतो आणि आपल्यात भयाची भावना निर्माण करतो. जेव्हा आपण एखाद्या चांगल्या गोष्टीचा अनुभव घेतो, आपल्याला सुरक्षित वाटते. पण जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटते, आपल्याला असुरक्षित वाटते आणि आपल्याला राग येतो. क्रोध आपल्या मनाचा असा भाग आहे, जो अस्तित्वावरील संकटापासून स्वतःचा बचाव करत असतो. पण क्रोध (स्वतःच दुःख निर्माण करतो.) आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतो.

आसक्ती एक असा घटक आहे, जो आपल्याला जिवंत राहण्यासाठी साहाय्यभूत ठरतो. त्यामुळेच जाणीव-विरहित रोपांमध्येही काही रासायनिक घटक असतात, जे त्यांचे संरक्षण करतात आणि त्यांच्या वाढीसाठी साहाय्य करतात. भौतिक पातळीवर आपले शरीरही तसेच असते. पण मानवी देहामुळे आपल्यात भावनिक स्तरावर सकारात्मक घटकही असतात, जे एखाद्याप्रति किंवा आपल्या सुखाप्रति आसक्ती निर्माण करतात. (तर दुसरीकडे क्रोध त्यातील) हानिकारक घटक आपल्याला अनेक गोष्टींपासून (ज्यात आनंदही समाविष्ट आहे.) दूर लोटतात. भौतिक पातळीवर, समाधान (आनंदातून उत्पन्न झालेले) आपल्या शरीरासाठी सुखकारक असते; तर क्रोध (आणि त्यातून निर्माण होणारे दुःख) हानिकारक असतो. त्यामुळे (जीवन जगण्याच्या दृष्टिकोनातून) सुखप्राप्ती हेच आयुष्याचे ध्येय आहे.

मी याच आधारभूत मानवी स्तराविषयी बोलतो आहे. मी दुय्यम धार्मिक स्तराविषयी बोलत नाही. धार्मिक स्तरावर अर्थातच जीवनाच्या ध्येयाविषयीच्या विविध व्याख्या आहेत. खरेतर दुय्यम घटक फार गुंतागुंतीचा आहे; त्यामुळे मूलभूत मानवी पातळीविषयी बोलणे चांगले आहे.

सुख काय आहे?

आपल्या जीवनाचे ध्येय आणि प्रयोजन सुखप्राप्ती आहे, तर सुख नक्की काय आहे? काही वेळा शारीरिक कष्टामुळेही सुखाच्या तीव्र भावनांची जाणीव होते (जसे खेळाडू थकवणाऱ्या शारीरिक सरावानंतर अनुभवतात.) त्यामुळे ‘सुख’ म्हणजे मुख्यतः समाधानाची सखोल जाणीव. त्यामुळे आपल्या जीवनाचे उद्दिष्ट किंवा ध्येय समाधानाची प्राप्ती आहे.

सुख, दुःख आणि वेदना- यांचे दोन स्तर असतातः एक संवेदनेचा स्तर तर दुसरा मानसिक स्तर. संवेदनेचा स्तर छोट्या सस्तन प्राण्यांमध्ये, माशीसारख्या कीटकांमध्येही समान असतो. थंड वातावरणात सूर्योद्यानंतर माशी आपला आनंद प्रदर्शित करतेः ती आनंदाने अवतीभोवती विहरत राहते. तर थंड खोलीत तिची गती थंड पडतेः ते दुःखाचे लक्षण असते. पण मेंदू सुसंस्कृत आणि अत्याधुनिक असेल तर संवेदनेचा स्तर अधिक तीव्र असतो. (त्याशिवाय) आपला सुसंस्कृत मेंदू आकारानेही मोठा असतो आणि त्यामुळे आपल्याकडे बुद्धीही असते.

(आता आपण मानवाचे उदाहरण घेऊ) ज्या माणसांना शारीरिक समस्या नसतात, त्यांचे आयुष्य आनंदी, सुखदायी असते. त्यांच्याकडे चांगली नोकरी, पत-प्रतिष्ठा आणि चांगले मित्र असतात. पण तरीही आपण पाहतो की काही लक्षाधीश, उदाहरणार्थ जे लोक स्वतःला समाजाचा महत्त्वपूर्ण घटक मानतात, पण व्यक्तिगत आयुष्यात ते खूप दुःखी असतात. काही प्रसंगी मी गर्भश्रीमंत, प्रभावशाली व्यक्तिंना भेटलो आहे, जे असे व्यक्त होत असतात की त्यांच्यामध्ये तणाव, काळजी आणि एकाकीपणाची तीव्र भावना असावी. त्यामुळे मानसिक पातळीवर ते पीडित असतात.

आपल्याकडे अद्भुत बुद्धी आहे, त्यामुळे आपला मानसिक स्तर भौतिक स्तराहून अधिक प्रबळ असतो. त्यातून शारीरिक पीडा कमी करणे शक्य आहे. एक छोटेसे उदाहरण सांगायचे झाल्यास, काही दिवसांपूर्वी मी एका गंभीर आजाराने पीडित होतो. आतड्यांचा हा आजार खूप वेदनादायी होता. त्यावेळी मी भारतातील सर्वात गरीब राज्य असणाऱ्या बिहारमधून जात होतो. मी बोधगया आणि नालंदा जवळून जात होतो. तिथे मी खूप गरीब मुले पाहिली. जी गाईचे शेण उचलत होती. त्यांच्यासाठी कोणतीही शैक्षणिक व्यवस्था नव्हती, त्याचे मला फार दुःख वाटले. नंतर बिहारची राजधानी असणाऱ्या पटनाजवळ मला तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि घाम येऊ लागला. तिथेच माझी नजर एका आजारी वृद्धावर पडली, त्याने अतिशय मळलेले पांढरे वस्त्र परिधान केले होते; ती स्थिती फारच दुखद होती. त्या रात्री माझ्या होटलच्या खोलीत माझ्या शारीरिक वेदना अधिकच तीव्र होत्या, पण माझे मन त्या मुलांचा आणि त्या वृद्धाचा विचार करत होते. त्या काळजी आणि सहानुभूतीच्या भावनेने माझ्या शारीरिक वेदनांची तीव्रता फार कमी केली.

ऑलम्पिक खेळांसाठी सराव करणाऱ्यांचेच उदाहरण घ्या. ते फार श्रमपूर्वक जोरदार सराव करतात आणि कितीही वेदना किंवा कष्ट सोसावे लागले तरी ते मानसिक स्तरावर आनंदी, सुखी असतात. त्यामुळे भौतिक स्तरापेक्षा मानसिक स्तर महत्त्वाचा आहे. त्यामुळे जीवनात खरेच काय महत्त्वाचे आहे, तर ते म्हणजे सुख आणि समाधान आहे.

सुखाची कारणे

आता, सुखाची कारणे कोणती आहेत? मला वाटते की अशांत, अस्वस्थ मनाच्या तुलनेत स्थिर चित्त शरीरासाठी अनुकूल असते. त्यामुळे स्थिर चित्त फार महत्त्वाचे असते. आपली शारीरिक स्थिती कशीही असली तरी मानसिक स्थिरता महत्त्वाची आहे. तर आपण कशा रीतीने मानसिक स्थिरता मिळवू शकतो?

आता, सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्याविषयी बोलणे अव्यावहारिक ठरेल; आणि मनाला संवेदनाशून्य बनवून सर्व समस्यांपासून सुटका करून घेणेही सयुक्तिक होणार नाही. आपण आपल्या समस्यांकडे स्पष्टपणे पाहायला हवे आणि त्यांचा सामना करायला हवा. पण त्याच वेळी आपले मनही शांत ठेवायला हवे, जेणेकरून आपण वास्तववादी दृष्टिकोन बाळगून आपल्या समस्यांचा योग्य प्रकारे सामना करू शकू.

जिथे अशा लोकांचा संबंध आहे, जे प्रशांतक औषधे घेतात - मला याबाबत कसलाच अनुभव नाही. मला माहीत नाही की प्रशांतक औषधे घेणाऱ्या लोकांची बुद्धी औषधांमुळे कुशाग्र होते की मंद होते; ते त्यांना विचारायला हवे. उदाहरणार्थ, १९५९ साली जेव्हा मी मसुरीत होते, माझी आई की आणखी कुणीतरी खूप तणावाने आणि चिंतेने पीडित होतेः झोपही बाधित झाली होती. वैद्यकीय चिकित्सकांनी सांगितले होते की काही औषधे आहेत, जी त्यांना घेता येऊ शकतात, पण त्यामुळे मंदपणा जाणवू शकतो. मला त्यावेळी वाटले की ते फार चांगले नाही. एकीकडे तुमचे चित्त थोडेसे स्थिर होते, पण त्याच वेळी परिणामी मंदपणा जाणवणे फारसे चांगले नाही. मी एखादी दुसरी पद्धत स्वीकारेन. मी बुद्धी अधिक कार्यशील, जागृत आणि सजग असणे पसंत करेन. पण अस्वस्थता नको. अबाधित मानसिक शांती सर्वात चांगली स्थिती आहे.

यासाठी करुणादायी मानवी आसक्ती खरी महत्त्वाची आहेः आपले मन जितके अधिक करुणादायी असेल, आपला मेंदू तितकाच कार्यक्षम असेल. आपल्या मनात भीती आणि क्रोध उत्पन्न होतो, तेव्हा त्या स्थितीत आपला मेंदू असमाधानकारकपणे काम करतो. माझी एका प्रसंगी वयाची ऐंशी वर्षं ओलांडलेल्या शास्त्रज्ञाशी भेट झाली. त्याने मला त्याचे एक पुस्तक भेट दिले. त्याचे शीर्षक आपण क्रोधाचे बंधक आहोत असे काहीसे होते. त्याच्या अनुभवांबाबत चर्चा करताना त्याने सांगितले की, एखाद्या व्यक्ती किंवा गोष्टीबाबत राग उत्पन्न झाल्यास ती गोष्ट फार नकारात्मक भासू लागते. पण त्यातील नव्वद टक्के नकारात्मकता काल्पनिक असते. हे सर्व त्याच्या अनुभवातून आले होते.

बौद्ध धर्म हेच सांगतो. जेव्हा नकारात्मक भावना निर्माण होतात, आपण वास्तव पाहू शकत नाही. जेव्हा आपल्याला निर्णय घ्यायचे असतात आणि मन क्रोधाने व्यापलेले असते, तेव्हा आपण चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असते. कुणालाच कधीही चुकीचे निर्णय घ्यावेसे वाटत नाहीत, पण त्या परिस्थितीत आपल्या बुद्धी आणि मेंदूचा तो हिस्सा, जो चांगल्या-वाईटातील फरक ओळखून योग्य निर्णय घेण्यास मदत करतो, तो असमाधानकारकपणे कार्य करतो. अगदी महान नेतेही हा अनुभव घेतात.

त्यामुळे करुणा आणि आसक्ती मेंदूला सहजतेने कार्य करण्यास साहाय्य करतात. दुसरीकडे करुणा आपल्याला आंतरिक शक्ती बहाल करते. ती आपल्यात आत्मविश्वास रूजवते आणि त्यातून भय नाहीसे होते, परिणामी आपले मन शांत होते. त्यामुळे करुणेची दोन कार्ये आहेतः ती आपल्या मेंदूला अधिक कार्यक्षम बनवते आणि ती आंतरिक शक्ती बहाल करते. हीच सुखाची कारणे आणि निमित्ते आहेत. मला तसेच वाटते.

याशिवाय इतर क्षमताही सुख देतात. प्रत्येकाला पैसा आवडतो. उदाहरणार्थ, तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही चांगल्या सुविधा अनुभवू शकता. सामान्यतः आपण या गोष्टी सर्वोच्च समजतो. पण मला ते तसे वाटत नाही. भौतिक समाधान शारीरिक कष्टांच्या माध्यमातून प्राप्त करता येऊ शकते, पण मानसिक समाधान मानसिक प्रयत्नातूनच मिळवता येऊ शकते. आपण दुकानात जाऊन दुकानदाराला पैसे देत मानसिक शांती मागितली, तर तो सांगेल की, तो मानसिक शांती देऊ शकत नाही. अनेक दुकानदार हा वेडपटपणा समजतील आणि तुमच्यावर हसतील. काही इंजेक्शन आणि गोळ्या तुम्हाला क्षणिक आनंद आणि मनःशांती देऊ शकतात, पण पूर्ण क्षमतेने नाही. आपण समुपदेशनाचे उदाहरण पाहू शकतो, ज्यात चर्चा आणि कारणमीमांसेच्या माध्यमातून भावना हाताळल्या जातात. अशा पद्धतीने आपण मानसिक दृष्टिकोनाचा वापर करायला हवा. त्यामुळे मी माझ्या भाषणांमधून नेहमी सांगतो की आपण आधुनिक लोक बाह्य विकासावर अतिरिक्त भर देतो. आपण फक्त त्याच स्तरावर लक्ष केंद्रित केले तर ते पुरेसे नाही. खरे सुख आणि समाधान हे आतून यायला हवे.

करुणा आणि मानवी प्रेम यासाठीचे मूलभूत तत्त्व आहेत आणि ही तत्त्वे जैविकतेतून लाभतात. अर्भक म्हणून आपले जीवन पूर्णतः प्रेमावर अवलंबून असते. प्रेम असेल तर आपण सुरक्षितता अनुभवतो. प्रेम नसेल तर आपण चिंता आणि असुरक्षितता अनुभवतो. आईपासून दूर झाल्यास आपल्याला रडू येते. पण आपण आईच्या कुशीत, घट्ट अलिंगनात असू तर आपल्याला उबदार, आनंदी वाटते आणि आपल्याला शांत वाटते. लहान बाळाचा विचार करता हे एक जैविक तत्त्व आहे. उदाहरणादाखल एक शास्त्रज्ञ, जे माझे गुरू आणि जीवशास्त्रज्ञ आहेत, जे परमाणू हिंसेच्या विरोधात कार्यशील आहेत – सांगत होते की जन्मानंतर काही आठवडे आईचा स्पर्श बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. त्यातून सुरक्षिततेची आणि समाधानाची भावना उत्पन्न होते आणि त्यातून शारीरिक विकासासोबतच मेंदूच्या विकासालाही मदत होते.

त्यामुळे करुणा आणि प्रेमाचे बीज धर्मातून उत्पन्न होत नाही, तर ते जैविक आहे. आपण सर्व जण आईच्या गर्भातून जन्माला आलो आहोत आणि आईच्या प्रेम आणि काळजीमुळे जिवंत आहोत. भारतीय परंपरेत आपण पवित्र भूमीत कमळातून जन्मल्याच्या कथा एकतो. हे एकायला छान वाटते, पण तिथल्या लोकांना माणसांपेक्षा कमळाच्या फुलाबाबत अधिक प्रेम जाणवत असेल. त्यामुळे आईच्या उदरातून जन्म घेणे जास्त चांगले आहे. त्या स्थितीत करुणेचे बीज पहिल्यापासून आपल्या आत रूजलेले असते. त्यामुळे हेच सुखाचे निमित्त आहे.


Top