What is compassion

बौद्ध धर्मानुसार,  इतरांना वेदनेपासून आणि वेदनेच्या कारणांपासून मुक्त करण्याची इच्छा म्हणजे करुणा होय. इतरांच्या भावनांचा आदर राखण्याच्या जाणिवेवर ती आधारलेली आहे. विशेषतः जेव्हा  आपणही  त्या प्रकारच्या समस्येतून गेलेले असतो. जरी आपण त्या समस्येतून गेलो नसलो तरी आपण स्वतःला त्यांच्या जागी ठेवून, अनुभवू शकतो की ते किती त्रासदायक असू शकते. तशा समस्येतून बाहेर पडण्याची आपल्याला किती इच्छा असू शकली असती, याची कल्पना करून आपण इतरांनीही त्यातून मुक्त व्हावे, याची तीव्र इच्छा करू शकतो.

प्रेम आणि करुणा ही चैन नसून गरजा आहेत, त्यांच्याशिवाय माणसाचं अस्तित्व टिकू शकत  नाही.- १४वे दलाई लामा

करुणा आपल्याला एकलकोंड्या, आत्मकेंद्री आणि आपल्यापुरता विचार करण्याच्या वृत्तीतून मुक्त करून इतरांसाठी आपल्या हृदयाची कवाडे खुली करते. आपण सर्वच जण जीवनात समस्यांचा सामना करत आहोत आणि जेव्हा आपल्यात इतरांप्रति भावनिक रीत्या जोडले गेल्याची भावना असते, आपण एकांतवास आणि चिंतेपासून मुक्त होतो. करुणामयी असणे आपल्याला सुखी आणि सुरक्षित बनवते, हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे. इतरांचे दुःख व  त्यांच्या वेदना समजून घेण्याचे गांभीर्य  आणि त्यांना मदत करण्याची भावना आपल्याला मनोबल  आणि आत्मविश्वास बहाल करते. आपण स्वतःला करुणा विकसित करण्यासाठी प्रशिक्षित केले तर तो आपल्या सुखी जीवनाचा गहन स्रोत ठरतो.

करुणा इतरांचे दुःख संपवण्यासाठी प्रेरणा देणारी आणि सक्रिय असायला हवी. आपली मदत करण्याची क्षमता मर्यादित असू शकते, तरीही आपल्याला जितके शक्य आहे, तितके प्रयत्न करायला हवेत. कारण इतरांना दुःखी आणि वेदनेने त्रस्त पाहत शांत बसून राहणे अशक्य असते.  

करुणेला ज्ञान आणि विवेकाची जोड मिळाल्यास ती अधिक परिणामकारक ठरू शकते. त्यातून योग्य-अयोग्याची नेमकी जाणीव होऊन आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. जर आपण भावनात्मकदृष्ट्या परिपक्व असू, तर इतरांना मदत करण्यास असक्षम ठरलो तरी करुणा एका प्रेरणास्रोतासारखी काम करते आणि आपल्या कमतरतांवर मात करून आपल्यातील सर्वोच्च क्षमता विकसित करण्यास साहाय्यभूत ठरते.

Top