What is love zach lucero unsplash

इतरांच्या आनंदासाठीची मनोकामना करणे आणि त्यांच्या सुखासाठी प्रयत्नशील असणे, त्या सुखाची कारणे शोधणे म्हणजे प्रेम होय. प्रत्येकाला या भावनेची गरज आहे, या आधारतत्त्वावर प्रेम सार्वभौम आणि अमर्याद ठरते. इतरांच्या गरजांबाबत संवेदनशील असणे आणि त्यांच्या सुखप्राप्तीसाठी योगदान देण्याची इच्छा बाळगणे, या गोष्टी यात अंतर्भूत आहेत. एखाद्याचे आपल्यासोबतचे नाते कसे आहे, तो आपल्याशी कसा वागला आहे किंवा त्याच्याकडून प्रत्युत्तरादाखल आपल्याला प्रेम मिळो अथवा ना मिळो, या गोष्टींचा परिणाम पडू न देता प्रेम वाटता येऊ शकते. बौद्ध धर्मात प्रेम हा सुखाचा सर्वात महान स्रोत आहे.   

प्रेम विरुद्ध आसक्ती

प्रेमासोबत अनेकदा इतर भावनाही जोडल्या गेलेल्या असतात. विकृत आसक्तीमुळे आपण एखाद्याचे गुण व्यक्त करताना अतिशयोक्ती करू शकतो-मग ते खरे असोत वा काल्पनिक-आणि त्याच्यातील कमतरता नजरअंदाज करतो. आपण सतत त्यांना बिलगू लागतो आणि त्यांचे आपल्याकडे दुर्लक्ष झाल्यास लगेच या विचाराने अस्वस्थ होतो की, ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे; मला कधीही सोडून जाऊ नकोः मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.’

सर्व प्राणीमात्रांच्या सुखाची निःपक्षपातीपणे इच्छा बाळगणे म्हणजेच खरे प्रेम होय, मग समोरील व्यक्तीला तुम्ही आवडो वा न आवडो. – याॅंगझिन लिंग रिंपोछे   

बौद्ध धर्मातील प्रेमाच्या संकल्पनेत इतरांशी जवळिकीची भावना अंतर्भूत आहे, पण ते प्रेम इतरांचे आपल्यावरील प्रेम किंवा त्यांच्याकडून घेतली जाणारी काळजी यावर आधारलेले नाही, त्यामुळे या प्रेमात कोणावर अवलंबनाचा प्रश्न नाही. आसक्ती आणि अवलंबन मिश्रित प्रेम अस्थिर असते. आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीने आपण दुखावले जाण्याजोगे वर्तन केल्यास, आपण त्या व्यक्तीवर प्रेम करणे बंद करू शकतो. अनेक लग्नांची सुरुवात प्रेमाने होते आणि घटस्फोटाने शेवट होते, त्याचेच उदाहरण पाहा ना! पण आपण जेव्हा कोणतीही अपेक्षा नसलेले निस्पृह प्रेम करतो, तेव्हा आपल्याला कोणतीच गोष्ट विचलित करू शकत नाही. जसे पालक आपल्याला खट्याळ मुलावर प्रेम करतात आणि सतत त्याच्या भल्याचा विचार करतात. स्थिर प्रेमभावनेच्या विकासातून आपल्याला एखाद्या आव्हानात्मक व्यक्तिमत्त्वाशीही सहजतेने वागण्याचे बळ मिळते. यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, पण आपल्या सर्वांमध्ये त्या क्षमता नक्कीच आहेत.

आत्मप्रेम

सार्वभौम प्रेमात एक नेहमी दुर्लक्षित राहणारा घटकही अंतर्भूत आहेः आपण स्वतःवरही प्रेम करणे आवश्यक आहे- आत्मकेंद्री किंवा आत्मप्रौढीच्या स्वरूपात नव्हे, तर स्वतःच्या तात्कालिक आणि दीर्घकालीन कल्याणाची काळजी बाळगून. कदाचित आपल्या व्यक्तिमत्त्वातील काही आत्मघातकी घटक आपल्याला आवडत नसतील, पण त्याचा अर्थ आपल्याला आपण दुःखी झालेले आवडू शकत नाही. नैसर्गिकपणे आपल्यालाही सुख हवे असते.

आपण स्वतःवर प्रेम करतो, याचा अर्थ असा नाही की आपण समाधान आणि मनोरंजनाच्या अमर्याद इच्छा ठेवाव्या. अशा गोष्टीतून मिळणारा अत्यल्प आनंद शाश्वत नसतो आणि आपण कायम अधिक हवे असण्याच्या इच्छेपाशी येऊन थांबतो. जर आपण स्वतःवर खरे प्रेम केले, क्षणिक सुखापेक्षा आपण शाश्वत सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू. जेव्हा आपण खरेच स्वतःवर प्रेम करायला लागू, तेव्हाच आपण इतरांवरही प्रेम करू शकू.  

Top