अर्थपूर्ण जीवन जगणे

प्रत्येक संवेदनाक्षम जीव, मुख्यतः माणसामध्ये सुख आणि दुःख, चांगले आणि वाईट, विघातक आणि विधायक गोष्टीतील फरक ओळखण्याची क्षमता असते. विविध भावनांमधील तफावत ओळखण्याच्या आणि त्यात फरक करण्याच्या आपल्या क्षमतांमुळे सुख प्राप्तीची मनोकामना आणि दुःखापासून दूर राहण्याच्या आपल्या इच्छा एकसमान असतात.

इथे या विविध भावना कशा उत्पन्न होतात या गहन विचारात पडून त्या कशा विकसित होतात, ते मी पाहणार नाही, पण आपणा सर्वांना स्पष्ट जाणीव आहे की आपल्यात सुखाची कामना आणि दुःखाप्रति अस्वीकाराची भावना असते. त्यामुळेच आपण एक असे आयुष्य जगणे महत्त्वाचे असते जे सामोपचार, ऐक्य आणि शांती घेऊन येईल आणि अशांती आणि गोंधळ आणणार नाही.

जिथे सुख आणि शांतीचा संबंध आहे, सुख आणि शांती फक्त भौतिक समृद्धीतून मिळते, असा विचार करणे चुकीचे आहे. भौतिक सुविधांमुळे आपण काही प्रमाणात भौतिक सुखसमाधान मिळवून शारीरिक समस्या कमी करू शकतो. पण आपण भौतिक सुविधांमधून जे हस्तगत करतो, ते शारीरिक अनुभवांपुरतेच मर्यादित असते.

प्राण्यांच्या अन्य प्रजातींच्या तुलनेत मानवाकडे विचार करण्याची, गणती करण्याची, पारख करण्याची आणि दीर्घ कालीन योजना आखण्याची अद्भुत क्षमता असते. त्यामुळे माणूस म्हणून आपण जे समाधान किंवा वेदना अनुभवतो त्याही तुलनेने अधिक तीव्र आणि शक्तिशाली असतात. त्याच कारणांमुळे मानवाला अधिक वेदना सहन कराव्या लागू शकतात, ज्या मानवाच्या विचार करण्याच्या क्षमतेशी संबंधित असतात.

उदाहरणार्थ, आपण माणसे इतर प्राण्यांप्रमाणे तात्पुरते सुख मिळवल्याने किंवा तात्पुरते दुःख कमी करण्याने समाधानी होत नाही. याचे कारण आपल्याकडे दीर्घकालीन योजना आणि गणती करण्याची क्षमता असते आणि त्यामुळेच आपण आपल्यात आणि इतरांमध्ये फरक किंवा भेदही करू शकतो. या भेदाच्या आधारावरच आपण विविध देश, विविध वंश आणि विविध धर्मांबाबत चर्चा करू शकतो. आपण अगणित भेद करतो आणि त्याच आधारावर आपण कितीतरी असंगत विचार आणि चुकीच्या धारणा विकसित करतो. त्यांच्यामुळेच आपण कधी कधी खूप आशावादी असतो तर कधी कधी फार साशंकित असतो.

त्यामुळेच आपण मानवी बुद्धी आणि संकल्पनांवर आधारलेले दुःखाचे विविध प्रकार अनुभवत असतो. हे आर्यदेवांच्या प्रसिद्ध चारशे श्लोकांच्या ग्रंथामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. ज्यात त्यांनी सांगितले आहे की (II.8) : ‘सुखवस्तू लोकांच्या जगण्यात मानसिक तणाव असतो, तर सामान्य लोक शारीरिक पीडा अनुभवतात’.  याचा अर्थ ज्या लोकांकडे अधिक सत्ता, अधिक संपत्ती असते, त्यांना शारीरिक पीडा कदाचित कमी असतील, पण ते कितीतरी अधिक प्रमाणात मानसिक तणाव अनुभवत असतात. आणि सामान्य लोकांच्या बाबतीत ते कदाचित पुरेशा अन्न-वस्त्राअभावी शारीरिक पीडा अनुभवत असतील. अशाप्रकारे हे स्पष्ट होते की माणूस त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे आपल्या त्रासात भर घालत असतो.

मी आधी सांगितल्याप्रमाणे, भौतिक सुखाच्या प्राप्तीने शारीरिक पीडा कमी करता येऊ शकतात. पण मनोवृत्तीमुळे निर्माण झालेला मानसिक तणाव भौतिक सुख वाढवून कमी करता येऊ शकत नाही. एक स्पष्ट उदाहरण आपण पाहू शकतो की श्रीमंत माणसांच्या पायाशी सर्व भौतिक सुविधा लोळण घेत असल्या तरी त्यांचा मानसिक तणाव कायम असतो. हे आपण सर्वच जण पाहत असतो. त्यामुळे हे स्पष्टच आहे की तुमच्या मनोवृत्तीमुळे निर्माण झालेली अशांती, समस्या आणि वेदना मनोदृष्टी बदलूनच कमी किंवा नष्ट करता येऊ शकतात, बाह्य भौतिक सुविधांच्या मदतीने त्या कमी करता येत नाहीत.

थोडक्यात स्पष्ट करायचे झाल्यास, आपण जेव्हा सुख किंवा दुःख अनुभवण्याविषयी बोलतो, ते अनुभवण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला इंद्रिय संवेदनांशी निगडित आहे- याचा अर्थ आपण पंचेंद्रियांच्या माध्यमातून अनुभवतो ते सुख किंवा वेदना- आणि दुसरी पातळी म्हणजे आपण मनोवृत्तीतून अनुभवतो ते सुख किंवा दुःख होय. या दोन्ही पैकी आपण जे सुख किंवा दुःख मनाच्या माध्यमातून अनुभवतो ते इंद्रिय संवेदनांपेक्षा अधिक प्रभावी असते.

एक स्पष्ट उदाहरण पाहायचे झाल्यास, जरी तुमच्या जवळ सर्व भौतिक सुविधा असल्या आणि कसलीही शारीरिक समस्या नसली तरी तुमचे मन अशांत असेल आणि तुम्ही मानसिक तणाव अनुभवत असाल तर तुमची भौतिक सुखे तुमच्या मनोवस्थेमुळे निर्माण झालेल्या समस्या कमी करू शकत नाहीत. तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला काही शारीरिक वेदना त्रास देत असतील, पण तुम्ही मानसिक पातळीवर परिस्थितीचा शांतपणे स्वीकार करत असाल, तर तुम्ही ती शारीरिक वेदना सहन करू शकता.

उदाहरणादाखल धार्मिक विधींना समर्पित असणारी एखादी धार्मिक व्यक्तीच पाहा. ते धार्मिक विधी करताना भलेही त्याला शारीरिक वेदनांना सामोरे जावे लागेल, पण संतोषाची आणि समाधानाची भावना आणि आपल्या ध्येयाबाबतची स्पष्टता त्याला त्या त्रासालाही मौल्यवान समजायला लावेल. त्यामुळे महान ध्येय नजरेसमोर ठेवून एखाद्याला मानसिक सामर्थ्याच्या जोरावर शारीरिक वेदनांवर विजय मिळवता येऊ शकतो. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत, जेव्हा आपण एखाद्या महत्त्वाच्या ध्येयावर काम करत असताना शारीरिक वेदनांवर विजय मिळवला असेल. अशा प्रकरणांमध्ये आपल्याला भलेही प्रचंड शारीरिक वेदना सहन करायला लागोत, आपण त्या समस्यांना आनंदाने, सुखाने आणि त्यांना मौल्यवान समजून त्या सहन करू शकतो.

या मुद्द्याचे सार सांगायचे झाल्यास, इंद्रिय अनुभव आणि मानसिक अनुभव अशा दोन अनुभवांपैकी मानसिक अनुभव अधिक महत्त्वाचे असतात.

जेव्हा मानसिक समस्या सोडवण्याची वेळ येते, तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे, ज्या समस्या तुमच्या मनोवृत्तीतून आणि दृष्टिकोनामुळे निर्माण झालेल्या असतात, त्या तुमचा दृष्टिकोन बदलून कमी वा नष्ट करता येऊ शकतात. त्यामुळे इथे मानसिक समस्या सोडवण्यासाठी मार्ग आहे, साधन आहे आणि पद्धतीही आहे. त्यामुळे ज्या साधनांमुळे आणि पद्धतींमुळे मानसिक समस्या संपवता येऊ शकतात, त्याविषयी अधिक जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पुढे जाऊन आपण जेव्हा मानसिक समस्या सोडवणाऱ्या पद्धती आणि साधनांविषयी चर्चा करतो तेव्हा आपल्यातील जन्मजात चांगल्या मानवी गुणांना ओळखणेही गरजेचे आहे.

उदाहरणादाखल मी हा मुद्दा अशा पद्धतीने स्पष्ट करेन: तुम्ही काळजीपूर्व पाहिल्यास या मानवी समाजात आपण सामाजिक प्राणी आहोत. याचा अर्थ आपण समाजात राहतो आणि आपण एकमेकांवर पूर्णतः अवलंबून आहोत. अगदी जन्मलेल्या क्षणापासून ते आपण प्रौढ होऊन स्वतःची काळजी स्वतः घ्यायला लागेपर्यंत आपल्याला आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी इतरांच्या दयेवर अवलंबून राहायला लागते. हे सर्व आपल्या जीवशास्त्रीय आणि शारीर स्वरूपामुळे होते. आपण जितकी अधिक आपुलकी दर्शवतो, करुणा विकसित करतो आणि एकमेकांबद्दल काळजी व्यक्त करतो, तितकेच आपल्याला सुख आणि शांती प्राप्त होते. या मूलभूत मानवी मूल्यांच्या फायद्यामुळेच आपण मूलभूत मानवी मूल्ये महत्त्वाची मानतो. ती महत्त्वाची असतात, म्हणूनच त्यासाठी विशिष्ट गुण महत्त्वाचे असतात.

इतर काही प्राण्यांच्या बाबतीत पाहिल्यास, फुलपाखरे किंवा कासवांची पिल्ले आणि त्यांच्या आईमध्ये परस्पर अवलंबनाची भावना नसते. उदाहरणार्थ, फुलपाखरे एकदा अंडी घालून निघून गेल्यानंतर त्यांच्या पिल्लांना नंतर आपल्या पालकांना भेटता येत नाही. आणि कासवांच्या बाबतीतही अंडी घालून झाल्यावर कासव अदृश्य होते. अगदी तुम्ही त्या पिल्लाला त्याच्या आईजवळ नेले तरी ते आपल्या पालकांप्रति प्रेम आणि आपुलकी व्यक्त करेल का, याबाबत मला शंका वाटते. कारण त्यांनी अगदी जन्मापासूनच स्वतंत्र आयुष्य जगलेले असते. याला कदाचित त्यांच्या पूर्वायुष्यातील सवयी आणि त्यांचे शारीरिक स्वरूप कारणीभूत असते. कासवांच्या बाबतीत कदाचित त्यांच्या पूर्वायुष्यातील सवयी आणि शारीरिक स्वरूपामुळेच त्यांना स्वतःच स्वतःची काळजी घेता येते. ते जेव्हा समुद्राची गाज ऐकतात, ते समुद्राच्या दिशेने जाऊ लागतात आणि स्वतःच स्वतःची काळजी घेतात. त्यांची आई अर्थातच त्यांच्या स्वागताला किंवा त्यांना पोहायला शिकवायला येत नाही. तिथे अशा गोष्टी नसतात. त्यामुळेच ते स्वावलंबी आयुष्य जगतात. आणि म्हणूनच तिथे पिल्लांमध्ये आणि त्याच्या पालकांमध्ये ममत्वाची भावना दिसत नाही.

आता मानवी जगण्याकडे पाहू. मानवाच्या शारीरिक स्वरूपामुळे आपल्या जन्माच्या क्षणापासूनच आपण आपल्या पालकांप्रति प्रेम आणि आपुलकी दर्शवू शकतो, विशेषतः आईप्रति. मी या गोष्टी अधोरेखित करतो आहे, त्यामागे धार्मिकता आणि गत आयुष्य व भविष्य स्वीकारण्याबाबतचा दृष्टिकोन नाही, तर आपण मानव कशा पद्धतीने जगतो, विकसित होतो हे काळजीपूर्वक पाहिल्यास माणसाच्या जगण्यात मानवी मूल्ये, प्रेम आणि करुणा किती महत्त्वपूर्ण आहे, ते आपल्या ध्यानात येईल. माणसाच्या मुलांकडे पाहिल्यास ती जन्मतः आईच्या दुधावर अवलंबून असतात, आणि हळूहळू मोठे होत जात असतानाही ते पालकांच्या प्रेम आणि काळजीवर अवलंबून असतात. शिवाय अगदी मोठे झाल्यावरही ते इतरांच्या दयेवर अवलंबून असतात.

जोवर तुमच्याजवळ मानवी करुणा आहे, जोवर कोणी तरी तुमची काळजी घेत आहे, तोपर्यंत तुम्ही शांतता, समाधान आणि घरपण अनुभवत असता. त्यामुळे तुम्ही असे आयुष्य जगणे महत्त्वाचे असते, ज्यात तुम्ही कोणालाही नुकसान न पोहचवता, इतरांना शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करता. तुमच्यामध्ये ही प्रेमाची भावना आणि इतर संवेदनाक्षम जीवांप्रति आपुलकीची भावना असेल तर प्रत्युत्तरादाखल तुम्हालाही प्रेमच मिळेल. आणि मृत्युसमयी तुम्हाला कोणतीही चिंता, भीती किंवा मानसिक तणाव नसेल.

तरी आपण मोठे झाल्यावर काहीवेळा आपल्यात एक अनावश्यक प्रबळ मानवी बुद्धिवाद दिसून येतो. आणि तो आपल्याला पोकळ आशावाद देतो. आपण बुद्धिच्या बळावर नवे विषय, नवी माहिती अवगत करतो. या ज्ञानाच्या आधारे आणि विशेषतः तुम्ही यशस्वी असाल तर तुम्ही विचार करता कीः ‘मी दुसऱ्यांवर दमदाटी करू शकतो. मी इतरांचा छळ करू शकतो कारण माझ्याकडे अद्भुत बुद्धिमत्ता आणि ज्ञान आहे. त्यामुळे माझ्याबाबतीत मानवी मूल्ये महत्त्वाची नाहीत.’ तुम्ही अशा पद्धतीच्या पोकळ आशावादात गुंतता आणि त्यातून एक विचित्र मानसिक दृष्टिकोन आकाराला येतो, आणि दुसऱ्यांना छळताना तुम्हाला काही वाटेनासे होते, जणू त्यातून तुम्हाला काही मोठा लाभ होणार असतो, अशी मानसिकता असते.

वास्तवात तुम्ही इतरांच्या आनंदाविषयी निष्काळजी होऊन जगत राहिलात तर कालांतराने प्रत्येक जण तुमचा शत्रू बनेल. तुमच्या आजूबाजूला, भोवतालात तुमच्यावर प्रेम करणारी एखादीही व्यक्ती मिळणार नाही. आणि असे नकारात्मक आयुष्य जगल्याने, कदाचित तुमच्या मृत्युप्रसंगी तुमच्या मृत्युच्या विचाराने इतर लोक आनंदित होतील. कदाचित तुम्ही स्वतःही स्वतःच्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना पश्चाताप कराल. तुम्ही ज्या पद्धतीने जगलात त्यामुळे तुमची काळजी करणारे कोणीही नाही, या विचाराने निराश व्हाल. त्यामुळे तुम्ही मूलभूत मानवी मूल्यांकडे दुर्लक्ष केल्यास खऱ्या प्रामाणिक सुखाची आणि दीर्घकालीन शांततेची अपेक्षा करणेच फोल आहे. आणि अशा स्थितीत तुम्ही मरण पावल्यास तुमच्यानंतर तुमची काळजी करणारे, प्रेम करणारे कुणी नसेल आणि तुम्ही अगदी रित्या हाताने आणि तीव्र निराशेने जगाचा निरोप घ्याल. त्यामुळे इतरांबाबत प्रेमभाव न ठेवता जगणे मूर्खपणाचे आहे.

दुसरीकडे तुम्ही मानवी बुद्धिमत्ता आणि शहाणपणाची जोड लाभलेल्या या मूलभूत मानवी मूल्यांचे पोषण करू शकलात, तर तुम्ही अमर्याद करुणा विकसित करू शकाल. अशा पद्धतीने आयुष्याला वळण दिल्यास ते खरे शहाणपणाचे होईल; आणि हाच अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग असेल.

Top