धर्मापलीकडील नैतिकता

दुय्यम गोष्टींवर भर दिल्याने होणारे नुकसान

प्रिय बंधु भगिनींनो, तुमच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. प्रथमतः मी भाषण देताना सुरुवातीलाच स्पष्ट करतो की कृपया तुम्ही स्वतःचा मानवी जीव म्हणून विचार करा. उदाहरणार्थ ‘मी स्विस आहे,’ ‘मी इटालियन आहे,’ किंवा ‘मी फ्रेंच आहे’ असा विचार करू नका. माझ्या भाषांतरकराने असा विचार करू नये की तो फ्रेंच आहे. मी सुद्धा विचार करू नये की मी तिबेटी आहे. पुढे जाऊन मी असाही विचार करू नये की मी बौद्ध आहे. कारण माझ्या भाषणांमध्ये येणारा सुखी आणि तणावमुक्त जीवनाचा संदर्भ आपण मानवी जीव असण्याशी आहे.

सहा बिलियन मानवी जिवांपैकी प्रत्येकाला सुखी आयुष्याची कामना असते आणि प्रत्येकाला ते उद्दिष्ट साध्य करण्याचा पूर्ण हक्क आहे. जर आपण दुय्यम गोष्टींवर भर दिला जसे की ‘मी तिबेटी आहे’ असा विचार केल्यास मला तिबेटबद्दल अधिक काळजी वाटू लागेल. ‘मी बौद्ध आहे’ म्हणणे सुद्धा इतर बौद्ध धर्मीयांशी अधिक जवळीक सांगणारे आणि पर्यायाने इतर धर्मीयांशी काही प्रमाणात अंतर निर्माण करणारे आहे.

अशा पद्धतीचा दृष्टिकोनच खरेतर अनेक प्रकारच्या समस्या आणि मानवी इतिहासात मोठ्या प्रमाणात घडलेल्या हिंसेचा आणि एकविसाव्या शतकातही होत असलेल्या हिंसेसारख्या इतर समस्यांचे मूळ कारण आहे. तुम्ही इतरांचा स्वतःप्रमाणेच माणूस म्हणून विचार केला तर कधीच हिंसा होणार नाही. एकमेकांच्या जिवावर उठण्याचे खरेतर काहीच कारण नाही, पण जेव्हा आपण मानवतावादातील ऐक्याचे तत्त्व विसरतो आणि ‘माझा देश’ आणि  ‘त्यांचा देश’,  ‘माझा धर्म’ आणि  ‘त्यांचा धर्म’ अशा दुय्यम फरकांवर भर देतो, तेव्हा आपण आपल्यात आणि इतरात फरक करायला लागतो. तेव्हा आपल्याला आपल्या लोकांची आणि आपल्या धर्माच्या अनुयायांची अधिक काळजी असते. तेव्हा आपण दुसऱ्याच्या हक्कांचा अनादर करतो आणि अगदी आपल्याला दुसऱ्यांच्या आयुष्याबद्दलही आदर राहत नाही. आज आपण अनुभवत असलेल्या अनेक समस्या दुय्यम पातळीवरील फरकांना अति महत्त्व दिल्यानेच उद्भवलेल्या आहेत.

आता यावर एकमेव उपाय आहे तो म्हणजे स्वतःविषयी विवेकवादी विचार करून कोणत्याही सीमांचा अडसर न आणू देता स्वतःचा माणूस म्हणून विचार करणे. उदाहरणार्थ, मी भाषण देतेवेळी स्वतःला तिबेटी बौद्ध समजले किंवा स्वतःला ‘परमपूज्य दलाई लामा’ म्हणून पाहिले तर श्रोत्यांमध्ये आणि माझ्यात एक प्रकारची दरी निर्माण होईल. तो फारच मूर्खपणा होईल. जर मला प्रामाणिकपणे तुमच्या भल्याची काळजी असेल तर मी माणूसपणाच्या पातळीवर बंधुत्वाच्या आणि भगिनीभावाच्या पातळीवरच तुमच्याशी संवाद साधायला हवा. वास्तविकतः आपण सर्व मानसिक, भावनिक आणि शारीरिक पातळीवर एकसारखेच असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाला वेदनारहित सुखी जीवन हवे आहे. आणि मी ही तसाच आहे. त्यामुळे आपण त्याच पातळीवर संवाद साधू.

धर्मनिरपेक्ष नैतिकता

धर्मनिरपेक्ष नैतिकता जैविक घटकांशी अधिक संबंधित आहे, पण धार्मिक श्रद्धा फक्त माणसांमध्ये असतात. मानवामध्ये श्रद्धा विकसित झाल्या आहेत, पण तो जैविक घटक नक्कीच नाही. धर्मनिरपेक्ष नैतिकता सर्व सात बिलियन मानवी लोकसंख्येला लागू होते. जसे की मी काल सांगितले होते, सात बिलियन लोकांपैकी एक बिलियन लोकांनी अधिकृतपणे सांगितले आहे की ते नास्तिक आहेत आणि उरलेल्या सहा बिलियन तथाकथित धार्मिक लोकांचा विचार करायला तर त्यातील कित्येक लोक भ्रष्ट आहेत. शोषण, भ्रष्टाचार, फसवणूक, खोटेपणा आणि गुंडगिरीची कितीतरी उदाहरणे आहेत. आणि माझा विश्वास आहे की हे सर्व नैतिकतेच्या सिद्धांतावरील अविश्वासामुळे घडते. त्यामुळे धर्माचा उपयोग चुकीच्या गोष्टींसाठीही केला जातो. काल मी याचा उल्लेख केला की नाही हे आठवत नाही, पण मला खरोखर वाटते की धर्म आपल्याला पाखंडी वागायला शिकवतो. आपण ‘प्रेम’ आणि  ‘करुणा’ सारख्या चांगल्या गोष्टींविषयी बोलतो, पण वास्तवात आपण तसे वागत नाही, म्हणूनच इतका अन्याय घडतो.

धर्म या चांगल्या गोष्टींविषयी पारंपरिक मार्गाने शिकवण तर देतो, पण वास्तवात ती शिकवण मनाला स्पर्शून जाणारी नसते. हे सर्व लोकांमधील नैतिकतेच्या अभावामुळे किंवा नैतिक सिद्धांताच्या उपयुक्ततेत विश्वास नसल्याने घडते. आपण आस्तिक असो वा नास्तिक, आपल्याला नैतिकतेबाबत लोकांचे प्रबोधन करण्याचा गांभीर्याने विचार करायला हवा. असे केल्यानंतर जर आपण ते धार्मिकतेशी जोडले, तर तो खरा प्रामाणिक धर्म असेल. काल मी उल्लेख केल्याप्रमाणे सर्व धर्म या मूल्यांची शिकवण देतात.

आपल्या कार्यक्षेत्राप्रति अनासक्ती निर्माण करणे

आधीच्या शतकात जेव्हा लोक एकमेकांची हत्या करत होते, तेव्हा ते दोघेही देवाची प्रार्थना करत असायचे. किती कठीण आहे हे! अगदी आजही काहीवेळा धर्माच्या नावावर तंटे निर्माण होतात. आणि मला वाटते दोन्ही गटातले लोक देवाची पूजा करतात. मी काही वेळा विनोदाने म्हणतो की, बहुदा देवसुद्धा गोंधळलेला असेल. जेव्हा तंटा करणारे दोन्ही गट त्याच्याकडे प्रार्थना करत असतील, तेव्हा त्याने निर्णय कसा घ्यायचा. हे कठीणच आहे. एकदा अर्जेंटिनामध्ये काही शास्त्रज्ञ आणि धर्मगुरूंचे एक चर्चासत्र होते. तशी काही ती आंतरधर्मीय सभा नव्हती. माझी तिथे मातुराना नावाच्या भौतिक शास्त्रज्ञांशी भेट झाली. ते दिवंगत वारेला यांचे गुरू होते. मी त्यांना पूर्वी स्वित्झर्लंडमध्ये आणि एकदा अर्जेंटिनामध्ये भेटलो होतो, पण त्यानंतर भेट झाली नव्हती. त्यांच्या भाषणात ते म्हणाले की भौतिक शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी त्यांच्या वैज्ञानिक क्षेत्राबद्दल आसक्ती बाळगली नाही पाहिजे. अशा पद्धतीने मी एक अद्भुत आणि ज्ञानपर गोष्ट शिकलो.

मी बौद्ध म्हणून बौद्ध धर्माबद्दल आसक्ती बाळगली नाही पाहिजे कारण आसक्ती नकारात्मक भावना आहे. तुमच्यात आसक्ती निर्माण झाली की तुमची मते पक्षपाती होतात. एकदा मनात भेदभाव निर्माण झाला की तुम्ही निष्पक्षपणे निर्णय घेऊ शकत नाही.

याच कारणांमुळे जे धर्माच्या नावावर होणाऱ्या तंट्यांमध्ये सहभागी होतात, त्यातील बहुतांश प्रकरणांमध्ये मला वाटते की धार्मिकतेपेक्षा आर्थिक आणि राजकीय हित लपलेले असते.

पण काही प्रकरणात, जसे मूलतत्त्ववादी, स्वतःच्या धर्माशी फार बांधील असतात आणि त्यामुळे इतर धार्मिक परंपरांच्या मूल्यांचे महत्त्व ओळखू शकत नाहीत.

मातुरानांचे विधान माझ्यासाठी फार मौल्यवान सल्ला होता. खूप लोकांच्या भेटीगाठींमुळे मी इतर परंपरांचा आदर करतो आणि मला आशा आहे की मी कट्टरपंथी किंवा रूढीवादी नाही. काही वेळा मी उल्लेख करतो की मी एकदा दक्षिण फ्रान्समधील लॉर्देसला गेलो होतो. मी तिथे तीर्थयात्रेसाठी गेलो होतो आणि तिथे एका येशूच्या पुतळ्यासमोर मी जलग्रहण केले होते. त्या पुतळ्यासमोर मी उभा होतो आणि त्या लाखो लोकांचा विचार करत होतो, जे शेकडो वर्षांपासून समाधानाच्या शोधात येथे भेट देतात. मी असेही ऐकले की काही आजारी माणसेही येथे येऊन आपल्या विश्वासाच्या बळावर बरी झालेली आहेत. त्या सर्व गोष्टींचा विचार मनात प्रतिबिंबित होताच मला ख्रिश्चन धर्माबाबत सखोल कृतज्ञता भाव निर्माण झाला आणि माझे डोळे डबडबले. आणखी एकदा फातिमा, पोर्तुगाल येथे मी आश्चर्यजनक अनुभव घेतला. सभोवार कॅथलिक आणि ख्रिश्चन असताना मेरीच्या छोट्याशा पुतळ्यासमोर आम्हाला ध्यानधारणेची संधी मिळाली. जेव्हा मी आणि इतर जण जायला निघालो, मी परतून पाहिले तर मेरीचा पुतळा माझ्याकडे पाहून स्मितहास्य करत होता. मी पुनःपुन्हा पाहिले आणि हो, ती हसत होती. मला वाटले की कदाचित मेरीला माझा असांप्रदायिक दृष्टिकोन आवडला होता. पण मी तत्त्वज्ञानावर चर्चेसाठी मेरीजवळ अधिक वेळ थांबलो तर कदाचित काही गंभीर मुद्दे समोर येतील.

अगदी कोणत्याही प्रकारे, स्वतःच्या धर्माप्रति आसक्ती असणे चांगले नाही. काहीवेळा धर्मांमुळे तंटे आणि मतभेद वाढतात आणि ही फारच गंभीर बाब आहे. धर्म क्रोध आणि तिरस्कार दूर करणाऱ्या करुणा आणि क्षमाशीलतेच्या वाढीचे माध्यम असायला हवा. त्यामुळे धर्म स्वतःच तिरस्कार निर्माण करत असेल, तर तो असे औषध होईल, जे आजार संपवण्याऐवजी आजार बळावायला मदत करते. मग काय करावे? या सर्व वाईट गोष्टी नैतिकतेवरील विश्वासाच्या अभावामुळे वाढीस लागतात. त्यामुळे माझा विश्वास आहे की धर्मनिरपेक्ष नैतिकता वाढीस लागण्यासाठी आपल्याला प्रामाणिक प्रयत्नांच्या दिशेने पावले उचलत विविध पद्धती आणि साधनांचा विकास करायला हवा.

धर्मनिरपेक्षता आणि इतरांप्रति आदराची भावना

आता आपण धर्मनिरपेक्ष नैतिकतेविषयी चर्चा करू. भारताचे माजी उप-पंतप्रधान आडवाणी माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत. एका प्रसंगी त्यांनी सांगितले की एका कॅनेडियन दूरदर्शनने त्यांची मुलाखत घेतली होती आणि त्यांना विचारण्यात आले होते की भारतातील लोकशाही व्यवस्थेच्या यशस्वितेचे मूळ काय आहे? त्यांनी उत्तर दिले होते की भारतात हजारो वर्षांपासून विविध दृष्टिकोन आणि मतांतरे असतानाही एकमेकांचा आदर राखण्याची परंपरा आहे. त्यांनी मला सांगितले की तीन हजार वर्षांपूर्वी भारतात चार्वाक किंवा ‘शून्यवादी’ दार्शनिक तत्त्वज्ञानाचा विकास झाला. इतर दार्शनिक त्यांच्या विचारांवर टीका करत, त्यांच्या विचारांचे खंडन करत होते. पण तरीही चार्वाक दृष्टिकोनाला ऋषीतुल्य अर्थात ‘ज्ञानी’ दर्जा देण्यात आला. मतांतरे आणि उत्तेजनात्मक चर्चा घडत असतानाही तिथे आदराची भावनाही होती, याचा हा संकेत आहे. याचाच अर्थ आपण नास्तिकांचाही आदर करायला हवा.

काल मी सांगितले की, माझ्या काही ख्रिश्चन आणि मुस्लिम मित्रांना माझ्या ‘धर्मनिरपेक्ष’ शब्दाबद्दल आक्षेप आहे. मला वाटते, याला फ्रेंच क्रांती किंवा बोल्शेविक क्रांती दरम्यान निर्माण झालेली धर्मविरोधी प्रवृत्ती कारणीभूत आहे. पण मी इथे धर्म आणि धार्मिक संस्थांमध्ये स्पष्ट फरक नोंदवू इच्छितो, त्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. कोणताही संवेदनशील व्यक्ती धर्माच्या विरोधात का असेल? धर्म म्हणजे प्रेम आणि करुणा आणि कोणीही या गोष्टींची टीका करू शकणार नाही. पण धार्मिक संस्था वेगळ्या असतात. फ्रेंच आणि बोल्शेविक क्रांतीच्या काळात सत्ताधारी वर्गांनी सामान्यांचे खरेच शोषण केले. शिवाय सत्ताधारी वर्गांना धार्मिक संस्थांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. त्यामुळे पर्यायाने सत्ताधारी वर्गांच्या विरोधासाठी धार्मिक संस्थांनाही विरोध करण्यात आला. यातून धर्म किंवा ईश्वरविरोधी प्रवृत्ती जन्माला आली.

अगदी आजही, जर एखाद्या धार्मिक संस्थांमध्ये, अगदी बौद्ध समुदायातसुद्धा काही शोषणाचे प्रकार आढळत असतील तर आपण त्या विरोधात उभे राहायला हवे. जिथपर्यंत माझ्या स्वतःच्या याबाबतच्या अंगीकाराविषयी बोलायचे झाले तर मी दोन वर्षांपूर्वी चारशे वर्षं जुनी परंपरा संपवली, ज्यात दलाई लामा स्वतः तिबेटींचे सांसारिक आणि आध्यात्मिक असे दोन्ही गुरू होत असत. मी ती स्वखुषीने, आनंदाने आणि अभिमानाने मोडली. अशा गोष्टी धर्माच्या खऱ्या मूल्यांना बाधक असतात. त्यामुळे आपल्याला धार्मिक संस्था आणि वास्तविक धर्मपद्धती आणि संदेशांमध्ये फरक करता यायला हवा.

धर्मनिरपेक्षतेच्या भारतीय दृष्टिकोनानुसार, इथे कधीच धर्माप्रति नकारात्मकतेची भावना नव्हती, उलट सर्वधर्मसमभाव आणि नास्तिकांबद्दलही आदर बाळगला जातो. मला हा दृष्टिकोन फार सामंजस्यपूर्ण वाटतो. आपल्याला याचा प्रसार कसा करता येईल? उपदेशाच्या माध्यमातून हे करता येईल का? नाही. मग प्रार्थनेच्या माध्यमातून तरी करू शकतो का? नाही. पण शिकवणीतून. होय, नक्कीच. आपल्याला शारीरिक स्वच्छतेबाबत शिक्षण दिले जाते, मग मानसिक आणि भावनिक आरोग्याबाबत, मनस्वास्थ्य कसे सुधारावे याचे साधेसरळ शिक्षण का नको? ईश्वर, पूनर्जन्म, बुद्ध किंवा निर्वाणाविषयी बोलायलाच नको, पण स्वतःला एका निरोगी मनाच्या व्यक्तीत कसे विकसित करता येईल याविषयी बोलायला हवे. एक सुखी, आनंदी व्यक्ती त्याच्या कुटुंबाला, त्याच्या समुदायाला सुखी आणि आनंदी करू शकतो, त्यामुळे मला वाटते आपल्याला मानसिक स्वास्थ्याविषयीच्या शिकवणीची गरज आहे.

मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य म्हणजे काय? याचा अर्थ आपले मानसिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण मिळवणे. उदाहरणार्थ, मानसिक आजारांसारखे घटक, कारण या नकारात्मक भावना फक्त तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर हल्ला करत नाहीत, तर तुमच्या न्यायबुद्धीवरही परिणाम करतात. त्यामुळे तुमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते कारण जेव्हा तुम्ही प्रचंड रागावलेले असता, तुम्ही वास्तव पाहू शकत नाही आणि तुमचे मन पक्षपाती होते. एखाद्या गोष्टीप्रति आसक्ती असल्यानेही असेच होते, तुम्ही वास्तव पाहू शकत नाही. हा मनाचा आजार आहे. जागरूकता हा मनाचा मूळ स्वभाव आहे आणि अशा पद्धतीचे मानसिक घटक जागरूक राहण्याच्या क्षमता कमी करतात, त्यामुळे ती नकारात्मक गोष्ट आहे.

अशी रीतीने मानसिक आरोग्य नकारात्मक भावनांचा प्रभाव कमी करणारी आणि मानसिक संतुलन कायम राखणारी प्रक्रिया आहे, जे मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी आपल्याला यात रस निर्माण व्हायला हवा आणि आपण तशी मनाची मशागत करायला हवी. यात रस असल्याशिवाय तुम्ही लोकांना ते करण्याची सक्ती करू शकत नाही. कोणताही कायदा किंवा घटनात्मक तरतूद हे करू शकत नाही. ते व्यक्तिगत पातळीवर उत्स्फूर्तपणे यायला हवे, जे त्याचे महत्त्व कळल्यावरच होऊ शकते. आणि ही तीच मूल्ये आहेत, जी आपण शिकवू शकतो.

मन आणि भावनांबाबतचे वैज्ञानिक निष्कर्ष

आता आपण विज्ञानाकडे पाहू. पूर्वी आधुनिक विज्ञानाचा भर पदार्थ विज्ञानावर होता, ज्यात मोजमाप करणे शक्य होते. पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि आता एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अधिकाधिक शास्त्रज्ञ मन आणि भावनांबाबतच्या संशोधनात रस दाखवत आहेत. कारण आरोग्याचा विचार करताना मन आणि भावनांचा घनिष्ट संबंध आहे. काही शास्त्रज्ञ ‘स्वस्थ मन, स्वस्थ शरीर’ याबबात बोलतात. वैद्यकीय चिकित्सकांचेही म्हणणे आहे की सततची भीती, क्रोध आणि तिरस्कार रोगप्रतिकार शक्ती संपवून टाकतात. पण करुणामय मन आरोग्य चांगले ठेवते आणि आरोग्य सुधारण्यासही मदत करते. स्पष्टच आहे की जे लोक मानसिकदृष्ट्या सुखी आहेत, त्यांना शारीरिक पातळीवरही त्याचा लाभ होतो.

नकारात्मक परिस्थितीत सकारात्मक गोष्टी ओळखणे

माझ्या स्वतःच्या आयुष्यात सोळा वर्षांचा असतानाच मी अनेक जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या. त्या वेळी परिस्थिती फारच कठीण होती. नंतर जेव्हा मी चोवीस वर्षांचा होतो, मी माझ्या देशाला दुरावलो आणि माझे बहुतांश जीवन मला निर्वासित म्हणून व्यतीत करावे लागले. दरम्यान तिबेटमध्ये अनेक समस्या उद्भवल्या. आणि लोकांना माझ्याकडून मोठ्या आशा आहेत. पण मी असहाय्य आहे. पण माझ्यामधील मनःशांतीमुळे मी या सर्व गोष्टींकडे वास्तववादी दृष्टिकोनातून पाहू शकतो. जसे शांतिदेव यांनी सांगितले आहे की, जर समस्यांवर उपाय असेल तर चिंतेचे कारण नाही. आणि परिस्थिती इतकी जटिल असेल की त्यावर उपायच नसेल, तरीही चिंता करण्याचा काही फायदाच नाही. हे फार वास्तववादी आहे, म्हणूनच मी अंगीकारले आहे.

घटनांकडे वास्तववादी दृष्टिकोनातून पाहणे फार महत्त्वाचे आहे. आणि सर्व घटनांमधील परस्परसंबंधही समजून घ्यायला हवा. काहीही घडले तरी त्यातून काहीतरी सकारात्मक परिणाम होऊ शकतो. अगदी माझेच उदाहरण पाहायचे झाले तर मी निर्वासित झाल्याने मला अनेक लोकांना भेटायची संधी लाभली आणि त्यातून मला विविध दृष्टिकोन समजून घेता आले. मी अगदी भिकारी, नेता, अनेक क्षेत्रातील विद्वान आणि धर्म-विरोधी लोकांना भेटतो. हे फार लाभकारक आहे, कारण मी तिबेटमध्येच राहिलो असतो तर माझे ज्ञान आत्ता आहे त्याच्या अर्धेच असते. त्यामुळे एकीकडे ती मोठी दुःखी घटना असली तरी दुसरीकडे त्यामुळे मला अनेक चांगल्या संधी लाभल्या आहेत. आपण विविध दृष्टिकोनातून पाहिले की आपल्याला छान वाटू लागते. वाईट घटना घडणारच, पण त्यात काही चांगल्या गोष्टीही असू शकतात.

पूर्वी तिबेटी लोग थोडे अलिप्त राहत असत, पण आता त्यांचे विचार व्यापक झाले आहेत. शेकडो वर्षांपासून तिबेटी लोक निद्रित अवस्थेत होते, पण आता ते जागृत होत आहेत. हे फार छान आहे. अशा पद्धतीने तुम्ही विविध अंगांनी गोष्टींकडे पाहिल्यास तुम्हाला सकारात्मक गोष्टी सापडू शकतात. त्यातून मनःशांती कायम राखण्यासाठी फार मदत होईल. हल्ली माझे खूप मित्र मला सांगतात की माझा चेहरा अजूनही तरुण दिसतो आणि ते मला त्याचे रहस्य विचारतात. मी त्यांना सांगतो की आठ ते नऊ तासांची झोप मनःशांतीसाठी आवश्यक असते. अर्थात हा एक घटक झाला, पण सर्वात लाभकारक काय असेल तर आपले मन आणि मनोवस्था तुलनेने शांत आणि स्थिर असायला हवी.

शांत मन तुम्हाला अगदी शस्त्रक्रियेनंतरच्या त्रासातून बरे व्हायलाही साहाय्यक ठरते. जेव्हा माझी पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली, तेव्हा परिस्थिती खरेच गंभीर होती. शल्यचिकित्सक सांगत होते की सामान्यतः अशा शस्त्रक्रियेला पंधरा ते वीस मिनिटे लागतात, पण माझी अवस्था इतकी गंभीर होती की मला जवळपास तीन तास लागले. कारण माझे पित्ताशय त्याच्या मूळ आकाराच्या दुप्पट मोठे झाले होते. आणि त्यात खूप पू साचला होता. पण त्याही स्थितीत मी पाच दिवसात बरा झालो. अशा रीतीने शांत मन आणि आशावादी दृष्टिकोन शरीर आरोग्यदायी राखण्यासाठी साहाय्यक ठरतात. आणि स्वास्थ्य बिघडले तरी ते सुधारण्यासाठी साहाय्य करतात. मनःशांती हा खरोखरच चांगल्या आरोग्याचा सर्वात मोठा घटक आहे.

आंतरिक सौंदर्य विरूद्ध बाह्य सौंदर्य

मी इथे थोडे विनोदाने आणि थट्टेने सांगतो की काही तरुणी सौंदर्यप्रसाधनांवर प्रचंड पैसे खर्च करतात. काही स्त्रिया त्यांच्या चेहऱ्यावर निळे, हिरवे असे विविध रंग फासतात. ते फार चांगले दिसत नाही, पण त्यांना ते फार सुंदर वाटते. असे वाटते की बाह्य सौंदर्यावर लोकांचे अधिक लक्ष आहे. एकदा एका सभेत एका मुलीच्या केसांचा रंग निळा होता. हे अगदी असामान्यच होते. त्यामुळे मी तिला थट्टेच्या स्वरात म्हटले की निळे केस सुंदर वाटतीलच असे नाही. अर्थात बाह्य सौंदर्य महत्त्वाचे आहेच, पण सर्वात महत्त्वाचे आंतरिक सौंदर्य आहे. ज्या तरुणी आपल्या बाह्य सौंदर्यावर प्रचंड पैसा खर्च करतात, त्यांनी आंतरिक सौंदर्याकडेही लक्ष द्यावे, ते अधिक चांगले होईल.

मन आणि भावनांचा शैक्षणिक विषय म्हणून अभ्यास

आपण वैज्ञानिक निष्कर्षांविषयी चर्चा करत आहोत. खरी मानसिक शांती खूप महत्त्वाची आहे. आत्मविश्वास आणि आत्मशक्ती मानसिक शांतीचा आधार आहे. जी प्रेम आणि करुणेच्या साधनेतून आणि इतरांप्रति आदर आणि कल्याणाच्या भावनेतून लाभते. हीच धर्मनिरपेक्ष नैतिकता आहे.

शिशुवर्गापासून विद्यापीठापर्यंत आपण मानसिक शांतीविषयक आणि आपल्या भावनांची काळजी कशी घ्यावी याचे शिक्षण देऊ शकतो. हा व्यापक विषय आहे आणि आपले मन व भावना आणि त्यांच्यातील परस्परसंबंध यांच्याविषयीच्या अनेकानेक व्याख्या आहेत. यात आपण कार्यकारणभाव पाहू शकतो, जसे मनाच्या एका कोपऱ्यात काही घडते, तेव्हा त्याचा परिणाम एखाद्या दुसऱ्या ठिकाणी झालेला असतो. त्यामुळे हे हाताळताना आपल्याला आपले मन आणि मेंदू यांच्यातील अंतर्संबंध सखोलपणे समजून घ्यायला हवा.

या व्यापक विषयाचा शैक्षणिक अभ्यास खूप उपयुक्त आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी या माहितीच्या आधारावर काही प्रयोग केले आहेत, ज्याचे ठोस निकाल समोर आले आहेत. परिणामी असे शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत, ज्यात धर्मनिरपेक्ष नैतिकतेची शिकवण दिली जाते. आता आपल्यावरही ही जबाबदारी आहे की आपणही धर्मनिरपेक्षतेवर आधारित अभ्यासक्रम तयार करायला हवा, जो धर्मनिरपेक्ष शिक्षण व्यवस्थेत समाविष्ट करता येईल.

इथे उपस्थित श्रोतावर्ग आणि विशेषतः शिक्षक आणि अभ्यासकांनी यावर अधिक गांभीर्याने विचार करायला हवा आणि संधी मिळाल्यास अशा चर्चांचे आयोजन करायला हवे. सद्यस्थितीत शैक्षणिक व्यवस्थेत मूल्यशिक्षणाचा अभाव आहे. त्यामुळे बहुतांश लोक यासाठी धार्मिक शिकवणीवर निर्भर राहतात. ते चांगलेच आहे, पण इथे असेही लोक आहेत ज्यांना धार्मिकतेत रस नसतो आणि त्यांना धार्मिक संकल्पना स्वीकारणे जड जाते. त्यामुळे हे अधिक कठीण होते. त्यामुळे आपल्याला सर्वमान्य धर्मनिरपेक्ष मार्ग शोधायला हवा.

समाप्त. आता आपण काही प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

प्रश्न

परमपूज्य, तुमच्या अखेरच्या टिपण्णीत तुम्ही मी विचारणार असलेल्या प्रश्नालाच स्पर्श केला. पण यासंदर्भात विस्तृत उत्तर मिळवण्यासाठी मी तुमची हरकत नसेल तर पुन्हा तो प्रश्न विचारू इच्छितो. शालेय आणि विद्यापीठ पातळीवर धर्मनिरपेक्ष नैतिकतेची शिकवण देण्यासाठी तुम्ही कुणासाठी शैक्षणिक उपक्रमाची आखणी करत आहात का? आणि तसे असेल काही शैक्षणिक किंवा आर्थिक संस्थांमार्फत तुम्हाला साहाय्य मिळते आहे का?

मी  आधी सांगितल्याप्रमाणे, भारतात दिल्लीच्या काही विद्यापीठांच्या साहाय्याने आम्ही एका अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करायला सुरुवात केली आहे. याशिवाय माईंड एण्ड लाइफ इन्स्टिट्यूटही आमच्यासोबत काम करत आहे. आणि अमेरिकेत विस्काँसिन युनिव्हर्सिटी, एमोरी युनिव्हर्सिटी, स्टॅण्डफोर्ड युनिव्हर्सिटी सारख्या संस्था व्यक्तिगत पातळीवर धर्मनिरपेक्ष नैतिकतेची शिकवण देण्याचे कार्य करत आहेत. आणि या संस्थेचा आम्ही युरोपातही विस्तार केला आहे. लवकरच आम्ही दिल्ली किंवा नजीकच्या परिसरात संस्थेची स्थापना करण्याच्या विचारात आहोत. सध्या तरी आम्ही इतकेच केले आहे. एकदा अभ्यासक्रम तयार झाला की आम्ही कदाचित शिक्षकांना प्रशिक्षण देऊ शकू आणि त्याचा काहीतरी परिणाम होईल. आशा आहे की हे उपयुक्त असेल, आपल्याला वाट पाहावी लागेल.

परमपूज्य, माझं या ग्रहावर आणि याच्या निर्मितीत समाविष्ट असलेल्या पृथ्वी, झाडे, प्राणी आणि आपल्यासारख्या माणसांवर प्रेम आहे. पण माणूस नेहमी ग्रह नष्ट करणाऱ्या गोष्टी करतो, कधीकधी प्लास्टिकची बाटली विकत घेण्यासारख्या लहानसहान गोष्टीतून तर कधी जंगलतोडीसारख्या भयंकर गोष्टीतून तो ग्रहाला नुकसान पोहोचवतो. मला माहिती आहे की मी संयम बाळगायला हवा, पण जेव्हा मी हे सर्व पाहतो, जेव्हा पाहतो की जीवन संपत चालले आहे, संकटात आहे, माझ्या आत फार क्रोध निर्माण होतो. आणि मला लढावे वाटते. तर माझा प्रश्न आहे की स्वस्थ क्रोध असे काही असते का? मी प्रेमपूर्वक लढू शकतो का?

मी आधी सांगितल्याप्रमाणे क्रोध हा प्रेरणेच्या भावनेशी जोडलेला आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीमुळे क्रोधित होणे आणि इतरांच्या भल्याच्या चिंतेतून क्रोधित होणे या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत.

परमपूज्य, तुम्ही या ग्रहावरच्या सहा बिलियन श्रदधाळू आणि एक बिलियन नास्तिकांविषयी बोलत होतात. पण मला आणखी एक तिसरा गट दिसतो आहे, जो पारंपरिक धार्मिक चौकटीत स्वतःला बसवू शकत नाही आणि तो नास्तिकही नाही, पण संस्थात्मक धार्मिकतेच्या पलीकडील अध्यात्माच्या शोधात आहे. तुमचा त्यांना काय सल्ला आहे?

अनेक वर्षांपूर्वी मी स्टॉकहोम येथे एका लहान गटाला भेटलो. ते लोक प्रचलित परंपरा किंवा धार्मिक अनुयायी नव्हते, पण तरीही आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात होते. होय. असे लोक आहेत. पण मला हे आढळले आहे की तुम्ही ज्याला ‘नवे युग’ म्हणता, तसे काही ठिकाणांहून जोडतोड करून नवे मिश्रण निर्माण करणे फार उपयुक्त ठरणार नाही.

मला वाटते की फक्त आपल्या भौतिक गरजा पूर्ण करणे महत्त्वाचे नाही, तर आपल्याला आंतरिक मूल्यांचा शोध घेऊन त्यांना मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्या जीवनाची समीक्षा करणे आणि आपला आनंद इंद्रियसुखातून उत्पन्न होत नाही, हे पाहणे लाभदायक असेल. उदाहरणार्थ जेव्हा संगीत वाजत असते, तेव्हा तुम्हाला समाधान मिळते, पण संगीत बंद झाले की समाधान संपून जाते. पण मानसिक पातळीवर विश्वास आणि करुणेच्या सखोल भावनेतून जे समाधान मिळते, ते दीर्घकालीन असते.

माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, असे तुम्हाला वाटते?

मी लोकांना कायम संदेश देत आलो आहे की माणसाच्या जीवनाचे ध्येयच सुखी जीवन हे आहे. आणि आनंद आणि सुख मिळवण्यासाठी इंद्रियसुखांवर आणि अनुभवांवर अवलंबून राहता कामा नये, तर मनोवस्थेवर अवलंबून असावे. त्यामुळे मी नेहमी सांगतो की आपल्याला आंतरिक मूल्यांवर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. धन्यवाद.

Top