वैश्विक नीतिशास्त्र म्हणजे काय?

Uv what are universal values

वैश्विक नीतिशास्त्राचा अर्थ

“वैश्विक नीतिशास्त्र” या संज्ञेचा अर्थ काय? प्रत्येकाला, श्रद्धाळू व्यक्तीला किंवा अश्रद्धालाही स्वीकारता येईल, अशी अर्थछटा वैश्विकमध्ये सामावलेली आहे. कोणी हिंदू असो, मुस्लीम असो, ख्रिस्ती असो, बौद्ध असो, ज्यू असो किंवा जैन किंवा कोणीही असो, ही मूल्यं स्वीकारता येतील अशी असावीत. वैज्ञानिक किंवा वैज्ञानिक नसलेले, शिक्षित किंवा अशिक्षित, प्रत्येकाला ही मूल्य स्वीकारता यावीत आणि स्वतःच्या सुखासाठी या तत्त्वांना अनुसरणं महत्त्वाचं असल्याचं त्या व्यक्तीच्या लक्षात यावं. हा यातील वैश्विक भाग आहे. नीतिशास्त्र म्हणजे आपल्याला सुखी व्यक्ती होण्यासाठी आणि इतरांच्या सुखाला पाठबळ पुरवण्यासाठी आवश्यक असलेली वर्तनाची रीत आहे, त्याच्याशी आपण प्रतिबद्ध राहणं सुखासाठी आवश्यक असतं. त्याने समुदाय सुखी होतो आणि तुम्हीही सुखी होता. या दोन्हींचा संयोग केल्यावर वैश्विक नीतिशास्त्र तयार होतं.

मानवी जीव हा, आपण ज्याला विश्व म्हणतो त्या एकसंधतेचा एक भाग आहे. हा भाग कालावकाशाने मर्यादित असतो. तो स्वतःचा, स्वतःच्या विचारांचा व भावनांचा अनुभव घेतो. इतरांहून विभक्त रितीने हा अनुभव घेतला जातो, हा एक प्रकारे त्याच्या जाणिवेचा दृष्टिभ्रम असतो. आपल्यासाठी हा दृष्टिभ्रम तुरुंगासारखा आहे, त्यातून आपल्या वैयक्तिक इच्छांना निर्बंध येतात आणि आपल्या सर्वांत निकटवर्तीय असलेल्या मोजक्या लोकांविषयीच्या ममत्वालाही त्याने मर्यादा पडते. सर्व सजीवांना व सर्व सुंदर निसर्गाला कवटाळून आपलं करुणेचं वर्तुळ विस्तारणं आणि या तुरुंगातून स्वतःला मुक्त करणं, हे आपलं कार्य असायला हवं. – अल्बर्ट आइनस्टाइन

आपण स्वतःच्या संकुचित विचारांमध्ये स्वतःला बंदिस्त करून ठेवलेलं असतं, आपण केवळ स्वतःचा विचार करतो व केवळ एका लहान अंतर्गत वर्तुळाचा विचार करतो, आणि उर्वरित विश्वाचा आपल्याला विसर पडतो, त्यातून आपण अनुभवत असलेल्या समस्या उद्भवतात, असं आइनस्टाइन म्हणत आहेत. केवळ लहान अंतर्गत वर्तुळाची ओढ वाटणं हा केवळ एक भ्रम आहे, असं ते सांगत आहेत. का? कारण, आपण सर्व एकमेकांशी जोडलेले आहोत. आपण या तुरुंगातून बाहेर कसे पडू शकतो? आपण इतरांचा समावेश करण्यासाठी स्वतःचं करुणेचं वर्तुळ विस्तारायला हवं, असं ते सांगतात. इतरांनीही आपल्याबाबतीत त्यांचं करुणेचं वर्तुळ विस्तारलं, तर आपण सर्व सुखी होऊ. याला ते प्रोत्साहन देत आहेत.

नीतिशास्त्राचं आचरण का करावं?

सद्सद्विवेकबुद्धीने केलेल्या मानवी कृतींचा समावेश नीतिशास्त्रांमध्ये होतो. व्यक्तीमध्ये व व्यापक समाजामध्ये अधिक सौहार्द, शांतता व सुख उत्पन्न करणाऱ्या या कृती असतात. कोणाला सुख मिळतं की दयनीयता वाट्याला येते, हे आपण आपल्या कृतींची निष्पत्ती म्हणून पाहू शकतो. आपल्याला जे काही हवं असतं त्याचं व आपल्या कृतींचं स्वरूप जोडलेलं असतं. सर्व कृतींमागे आपल्या विचारांची व भावनांची प्रेरणा असते. अनैतिक विचारांद्वारे केल्या जाणाऱ्या कृती अनिष्ट परिणाम करतात, हे आपण आजच्या जगामध्ये पाहतो आहोत. खालील तीन घटकांमधील योग्य कार्यकारणसंबंध समजून न घेतल्याने हे घडतं आहे:

  • विचार व भावना
  • आपल्या कृती
  • सुख वा वेदना या रूपातील निष्पत्ती

आपल्याला सुखाची आकांक्षा असेल, तरी आपण ज्या विचारांनी प्रेरित होतो, त्यातून केल्या जाणाऱ्या कृती वेदना व दयनीयतेलाच वाव देतात. त्यामुळे जाणीव म्हणजे काय, विचार व भावना म्हणजे काय, याचं योग्य ज्ञान मिळवणं गरजेचं आहे. अखेरीस, विशिष्ट निष्पत्ती साधणाऱ्या आपल्या कृतींचं नियमन करणारे विचार व जाणिवेचे प्रकार यांची यंत्रणाही आपण समजून घ्यायला हवी. मग आपण इष्ट परिणाम साधणाऱ्या कृतींची मानसिकता जोपासण्याइतके सुज्ञ होतो आणि आपल्या कृतींचं अधःपतन करणाऱ्या मनांचा वर्ग सोडून देतो. याला नीतिशास्त्र म्हणतात; नीतिशास्त्राची सर्व तत्त्व अधोरेखित करणारी करुणा असते.

आपली मनं सुख वा दुःख निर्माण करतात. कोणत्या भावना व भावनिक घटकांमधून प्रेरणा घेतली जाते, त्यावरही हे अवलंबून असतं. भावनांनी आपल्या विचारांना प्रेरणा मिळते, आपल्या विचारांनी आपल्या कृतींना प्रेरणा मिळते. ज्या भावना आपल्याला सुख देतात त्या “सकारात्मक भावना” असतात. वैश्विक अर्थाने, आपण “सर्वांत मोठं पाप” (कार्डिनल सिन) किंवा सर्वांत मोठं अमुक वा तमुक असं बोलू शकत नाही. आपल्याला अतिशय वैश्विक अर्थाने बोलावं लागतं. वैश्विक पातळीवर, आपण असं म्हणू शकतो की, अस्सल सुख निर्माण करतात त्या सकारात्मक भावना असतात आणि दयनीयता निर्माण करतात त्या विध्वंसक भावना असतात. आपण अभ्यास करण्याची गरज आहे आणि मनाच्या नकाशाचा भाग म्हणून हे शिकून घ्यायला हवं; अशा नकाशाने आपण लोकांना प्रशिक्षण द्यायला हवं.

शालेय व्यवस्थेत वैश्विक नीतिशास्त्र शिकवणं

व्यक्ती व समुदाय यांच्यासाठी काय अर्थपूर्ण आहे, हे शिकवण्यासाठी लोकांना उत्तेजित कसं करता येईल? काहींचं नीतिशास्त्र देवभोळेपणावर आधारलेलं असतं. काहींचा देवावर विश्वास नसतो, पण ते कर्मावर विश्वास ठेवतात आणि आपण काळजीपूर्वक चांगलं वागावं असा त्यांचा कर्माधारित विचार असतो. पण देव किंवा कर्म यांपैकी कशावरच विश्वास नसलेलेही लोक असतात. देव/ईश्वर व कर्म या संकल्पनेविना आपण नीतिशास्त्र आपलंसं करण्याबद्दल लोकांची मनं कशी वळवणार? यासाठी परम पूजनीय दलाई लामांनी तीन मुद्दे मांडलेले आहेत?

  • सामायिक अनुभव
  • सामायिक व्यवहारज्ञान
  • वैज्ञानिक निष्कर्ष

यावर आधारित तीन पायऱ्यांद्वारे आधुनिक शिक्षणव्यवस्थेमध्ये वैश्विक नीतिशास्त्र शिकवता येईल, असं परम पूजनीय दलाई लामांनी सुचवलं आहे.

सामायिक अनुभवावर आधारित शिक्षणाचा दाखला म्हणजे समोरचे सश्रद्ध असोत वा अश्रद्ध पण आई लहान बाळाला स्तनपान देते तसं शिकवावं. कोणतीही धार्मिकता वा तत्त्वज्ञान यांच्या अलाहिदा हा सामायिक अनुभव उभा आहे- आपल्या मातेकडून आपल्याला मिळणारं निखळ प्रेम व ममत्व हा सामायिक अनुभव आहे. या प्रेम व ममत्वामुळे आई व मूल यांच्यात एकमेकांविषयी विश्वासाचं घट्ट नातं तयार होतं, त्याममुळे इतर सगळ्या गोष्टी विरून जातात. विध्वंसक भावनाही यामुळे निवळून जातात आणि जगातील अनागोंदीही निवळून जाते. केवळ प्रेम व ममत्व राहतं. दहशतवाद, लिंगभावात्मक भेदभाव, आणि श्रीमंत व गरीब यांच्यातील तफावत, हे सगळं अस्तित्वात असतं, कारण एकमेकांविषयीचं प्रेम व ममत्व यांचा जगात अभाव आहे.

सामायिक व्यवहारज्ञान म्हणजे एखादी व्यक्ती अधिक प्रेमळ असेल, तर तिला जास्त मित्रमैत्रिणी असतात, त्यांना तिथे मोकळं वाटतं आणि त्यांच्या भोवतीचे लोक त्यांच्या भावाबहिणींसारखेच आहेत, असं त्यांना वाटतं. आपल्याला इतरांविषयी हे प्रेम व ममत्व वाटत नसेल, तेव्हा आपल्या घरातही आपल्याला मोकळं वाटणार नाही. आपल्या भावाबहिणींकडेही आपण शत्रू म्हणूनच पाहू. सामायिक व्यवहारज्ञानाच्या परिप्रेक्ष्यातून आपल्याला हे पटायला हवं की, प्रेम व ममत्व हे वैश्विक नीतिशास्त्राचे आधार आहे.

अखेरीस, वैज्ञानिक निष्कर्ष म्हणजे, उदाहरणार्थ- काही प्रयोगांमध्ये माकडांच्या बाळांना त्यांच्या मातांपासून वेगळं केलं जातं आणि त्यांना त्यांच्या आईचं प्रेम लाभत नाही, अशी माणसं मोठी झाल्यावर अतिशय आक्रमक होतात. इतरांशी कसं खेळायचं हे त्यांना कळत नाही, ते केवळ स्वतःचा बचाव करत राहतात व इतरांशी भांडतात. दुसऱ्या बाजूला, आईसोबत ठेवलेली माकडं सुखी व आनंदी असतात.

या तीन संकल्पनांच्या आधारे परम पूजनीय दलाई लामा असं प्रतिपादन करतात की, वैश्विक नीतिशास्त्राचा आधार असलेलं अस्सल प्रेम व ममत्व सर्वांच्या मनामध्ये निर्माण करायला हवं.

मानव म्हणून वैश्विक अस्मिता राखणं

वैश्विक नीतिशास्त्राच्या उपयोजनामधील एक आव्हान म्हणजे आपल्या अस्मिता. “मी तिबेटी आहे, मी चिनी आहे, मी बौद्ध आहे, मी हिंदू आहे”, असं आपल्याला वाटतं- स्वतःच्या अस्मितांशी असं बांधील असल्याचं वाटतं त्या क्षणी इतरांविषयी तिटकारा निर्माण होणं स्वाभाविक असतं. हे एक मोठं आव्हान आहे आणि अतिशय गंभीर मुद्दा आहे.

एका व्यक्तीच्या शेकडो भिन्न अस्मिता असू शकतात. उदाहरणार्थ, मी पुरुष आहे, असं मी म्हणू शकतो, त्यातून पुरुषी श्रेष्ठत्वाची भावना उद्भवते. पुरुषी श्रेष्ठत्वाच्या संदर्भात स्त्रीवाद समोर येतो. मी स्वतःला बौद्ध म्हणून पाहिलं, तर तुम्ही बौद्धेतर ठरतात. मी हिंदू वा मुस्लीम असेन, तर तुम्ही हिंद्वेतर किंवा मुस्लिमेतर ठरता. संबंधित व्यक्ती अतिशय प्रगल्भ नसेल, तर कमी महत्त्वाच्या अस्मितांना सर्वांत महत्त्वाच्या अस्मिता म्हणून पकडून ठेवण्याची मनोवृत्ती धोकादायक ठरते.

कमी महत्त्वाच्या अस्मितेला सर्वोच्च मानून पकडून ठेवल्यामुळे कट्टरतावाद व जहालवाद निर्माण झाले आहेत.

आपण केवळ मानव ही अस्मिता का राखू शकत नाही? समजा, परग्रहवासी आले आणि आपण पृथ्वीवासी असल्याचं कारण देऊन आपल्यावर गोळीबार करू लागले, तर आपण पृथ्वीवासी आहोत हीच आपल्या सर्वांची ओळख वा अस्मिता असेल, मग आपली एकी होईल. आपली अस्मिता निर्माण करण्यासाठी आपण बाह्य घटकाची वाट का पाहायची? आपण स्वतःची अस्मिता आत्ताच का निर्माण करू शकत नाही? कोणत्या अस्मितेमुळे आपल्याला व जगाला सुखी वाटतं? मानव ही अस्मिता जवळ केल्याने आपण सुखी असल्याचं जाणवतं आणि आपण सर्वांना आपले भाऊबहीण मानू लागतो.

Top